Thursday, December 27, 2018

दृष्टीकोन




हल्ली सुमंतला भेटायला जायचं म्हणजे त्याच 'मी, मी' ऐकायच्या तयारीने जावं लागतंय असं  मनात आलं आणि सुहासला हसूच आलं.आणि सुमंतच नेहमीच वाक्य "माझ्या दृष्टीने मला असं वाटतं"एका वाक्यातले दोन 'मी!'
    सुहासच्या मनांत यायचं त्याला सांगावं "त्या तुझ्या दृष्टीला वेगवेगळे कोन लावून बघ काही तरी वेगळं मिळेल" 
     खर म्हणजे कोणीही कौतुक करावं असंच सुमंतच कर्तृत्व! पण यश डोक्यात गेलं की काय होतं ह्याच उत्तम उदाहरण म्हणजे सुमंत! पण सुहासला जवळचा मित्र आणि महत्त्वाचं म्हणजे धाकट्या बहिणीचा नवरा असलेल्या सुमंत कडे महिन्यातून एखादी तरी फेरी मारावीच लागे.
    त्यादिवशी सकाळी आईनी फर्मानच काढलं"सुहास, उद्या सुमंतचा वाढदिवस आहे.म्हणून त्याला आवडणाऱ्या पुरणपोळ्या दुपारी करणार आहे.आॅफिसमधून आलास की तुम्ही दोघं जाऊन देऊन या. 
    "आपण येतोय ते पुर्णिमावन्संना कळवून ठेवा.कारण सुमंतभावजींना कळवल्याशिवाय गेलेलं आवडत नाही लक्षात आहे ना? सुहासच्या बायकोनी आईसमोर  ऐकवायचा चान्स घेतला.
     सुहासला आठवलं सुमंतची आणि आपली ओळख इंजिनिअरिंग कॉलेज मधली.दोघंही सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये! सुमंत सोलापूर जवळच्या गावातून आला होता. तो एका गरीब शेतकऱ्यांचा मुलगा पण त्याची हूशारी बघून एका स्वयंसेवी संस्थेनी त्याच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली होती.शिवाय त्याला गणिताची शिष्यवृत्तीही मिळाली होती. 
       शिकत असताना एका नातेवाईकांकडे तो रहात होता.अतिशय कष्टांनी त्यानी घेतलेलं शिक्षण सुहासने खूप जवळून बघितलं होतं.शिक्षण पूर्ण झाल्यावर सुहासला नशीबाने चांगली सरकारी नोकरी मिळाली. सुमंतच मात्र कुठेच काही जमत नव्हतं.त्या स्ट्रगलच्या काळात तो सुहासच्या घरी खूपवेळा येत असे.आणि तिथेच त्याच आणि सुहासच्या बहिणीचे जुळलं.तसं दोन्ही घरातून विरोध असल्याचं कारण नव्हतच. फक्त सुमंतची करिअर सूरू व्हायची सर्वजण वाट बघत होते.
   बांधकाम व्यवसायातलं पडेल ते काम करत असतानाच दोन अडीच वर्षांनी सुमंतला एक मोठ बिल्डींगच काम मिळालं.ते काम काही कायदेशीर अडचणीत सापडलं होतं.पण सुमंतनी हूशारीने आणि खडतर काळात झालेल्या ओळखींच्या मदतीने तो प्रश्र सोडवला आणि ते काम यशस्वीपणे पूर्ण केल.त्यानंतर जमिनीचे व्यवहार, कायदा, बांधकामाच्या सर्व गोष्टींचा अभ्यास करून त्याने हळूहळू स्वत:चा ह्या व्यवसायात जम बसवला.आणि‌ त्याच्या ह्या वैशिष्ट्यांमुळे आणि जोडीला असलेल्या प्रामाणिकपणामुळे त्याच्याकडे मोठ्या मोठ्या व्यक्तिंची येजा सूरू झाली.ह्या सगळ्याचा मात्र त्याला अभिमान येऊ लागला.
      शिस्तीच्या नावाखाली लोकांना अपमानित करायचं,गरीब,गरजू लोकांना मदत करायची पण त्यांना स्वत:च्या कष्टांबद्दल ऐकवायचं, एकाच क्षेत्रात असल्यामुळे अधूनमधून सुहास सुमंतच्या आॅफिसवर जायचा.तेव्हा सुमंतच्या स्वभावाचे किस्से त्याला लोकांकडून ऐकायला मिळायचे.
    अनेकदा सुहास म्हणायचा"अरे किती बदललास तू?त्यावर पूढे काही बोलू न देता सुमंत म्हणायचा"खूप कष्टाने मी इथे पोचलोय.हे वैभव,यश, कीर्ती मी परिश्रमातून मिळवलंय.उगीच कोणाचं ऐकून नाही घेणार"सुहासला वाटायचं"अरे बाबा तुझ्या यशाला अहंकाराची जोड नको देऊ,नम्रपणाच कोंदण मिळालं तर आम्हाला अभिमान वाटेल"असं सांगावं.
    पण त्याच्या आवेशापुढे न बोलणंच योग्य आहे,अस दरवेळी सुहास ठरवायचा...
      संध्याकाळी पुरणपोळ्या घेऊन सुहास बायकोबरोबर गेला खरा पण सुमंत थोडासा अस्वस्थ वाटला. 
     पुर्णिमा मात्र खूष दिसत होती."उद्या होणा-या ह्यांच्या पंच्चानव्या वाढदिवसासाठी सकाळच्या घरगुती नातेवाईकांसाठी होणार्‍या कार्यक्रमाला तुम्ही सगळे या. संध्याकाळच्या फाईव्ह स्टार हॉटेलमधल्या पार्टीला मात्र तुम्ही दोघेच या.लिमीटेड क्रीम आॅफ सोसायटी आहे ना!" पुर्णिमानी अगदी सुमंतच्या बायको सारखं आमंत्रण दिलं होतं.ती चहा आणायला आंत गेली आणि तिची लेक केतकी सुहास जवळ आली आणि म्हणाली" मामा,मला तुझ्याशी बोलायचंय.अगदी सहज मला आज तुझ्या घरी बोलाव ना रहायला!!.मग मी तुझ्या घरी गेल्यावर तुझ्याशी बोलू शकेन.    
     येवढ्यात पुर्णिमा चहा घेऊन आली.आणि सुहास काही बोलायच्या आत केतकी म्हणाली"मामा आज रहायला बोलावतोय, उद्या त्यांच्या बरोबर येईन.चालेल ना? नाहीतर असं करतो, उद्या सकाळी तुझ्या मदतीला मी आणि मामी लवकर येऊ"केतकीनी कोणालाही बोलायची संधी न देता सांगून टाकलं.तेवढ्यात आतून सुमंत फ्रेश होऊन आला.त्याच्याकडे बघून पुर्णिमा म्हणाली"अहो, केतकी आजीकडे आज रात्री रहायला जाऊ का विचारतेय पाठवू ना?सुमंतनी केतकीकडे रोखून बघितलं पण तिनं नजर चुकवली.
       सुहासला जाम टेन्शन आलं.गेल्याच वर्षी केदार, सुमंतचा मुलगा इंजिनिअर झाला आणि फोटोग्राफी शिकायला घर सोडून निघून गेला.आणि जाताना"डॅड, मी तुमच्यासाठी इंजिनिअर झालोय पण माझी आवड फोटोग्राफी तर आहेच त्यात पण खास वाइल्ड लाइफ फोटोग्राफी माझ पॅशन आहे... तेव्हाही सुमंत असाच खूप  अस्वस्थ झाला होता.पण त्याला 'अरे घरी राहून कर काय करायचं ते' असंही नाही म्हणाला.त्याचा इगो आड आला बहुतेक.
       मामी बरोबर केतकी दरवाजात जाऊन उभी राह्यली.सुमंतनी सुहासच्या खांद्यावर हात ठेवला.हाताच्या त्या स्पर्शात हळवा बाप आधार मागतो आहे असं सुहासला उगीचच वाटलं.
     घरी आल्यावर केतकीनी बाॅम्बच टाकला.ती स्वत: एका प्रसिद्ध टी.व्ही.चॅनलवर न्युज रिपोर्टर म्हणून काम करतच होती.आणि‌ तिथेच तिची ओळख नाट्यचित्र क्षेत्रात काम मिळवण्यासाठी धडपडणाऱ्या अजिंक्यशी झाली.दोघं प्रेमात पडले.आणि हे सगळं सुमंतला कळलं होतं.केतकी तिच्या निर्णयावर ठाम होती.तिला फक्त दोन वर्षाचा वेळ हवा होता.आणि त्यासाठी तिला मामाची मदत हवी होती.
      वाढदिवसाचा पूर्ण दिवस सुमंत त्याच्या नेहमीच्या रूबाबात वावरला.सुहासनी पण काही विषय काढला नाही.
     पण दुसऱ्या दिवशी सकाळी अचानक सुमंत सुहासच्या आॅफिसवर आला.सगळ आॅफिस त्याच्या येण्यानं भारावून गेलं होतं.तो पण ह्या सगळ्या नजरांचे झेले झेलत आॅफिसभर सगळ्यांना भेटत होता.
    सुहासच्या केबिनमध्ये आल्यावर "अरे व्वा तुला केबिन आहे नाही का? छान छान! ही प्रस्तावना सुमंत स्पेशल होती.सुहासला हसू आलं.थोड्याच वेळात माझ्याच केबिनमध्ये ह्याला त्याच्या लाडक्या लेकीचा निर्णय मला ऐकवायचाय.
     "काय म्हणत होती केतकी? सुमंतनी सरळ विषयाला हात घातला.
        "सुमंत तुला सगळं माहीत आहे आणि आज तुला ते शांतपणे स्वीकारायचय"सुहासनी पण आज ठरवलंच होतं सुमंतचा इतरांकडे क्षुल्लक नजरेनी बघायचा दृष्टिकोन बदलायचाच.मेव्हण्यापेक्षा मित्राच्या भूमिकेत जाऊन बोलायचं!
    "तुला काय म्हणायचंय"मी त्या नाटक्याशी माझ्या मुलीचं लग्न लावून देऊ? माझ्या दृष्टीकोनातून त्याची माझ्या मुलीच्या जवळसुध्दा उभ रहायची लायकी नाहीय."सुमंत प्रचंड चिडला होता.
      आता मात्र सुहास ला रहावेना.
    "सुमंत,तो FTII चा पदवीधर आहे. उत्तम लिहीतो.स्पर्धेसाठी त्यानी‌ लिहीलेल्या एकांकिका बक्षिसं मिळवतात.अतिशय चांगल्या घरचा मुलगा आहे.आईवडिलांबरोबर स्वत:च्या घरात रहातो. 
    सुमंत,तू स्वत:चे दिवस विसरलास.गरीब शेतकऱ्याचा मुलगा तू, नातेवाईकांकडे रहात होतास पण सुमंत, माझ्या वडिलांनी एक मिनिट सुध्दा विचार केला नाही कारण तू हूशार आहेस 'लाथ मारशील तिथं पाणी काढशील'अशी क्षमता ठेवतोस हे त्यांनी ओळखलं होतं.आणि तू त्या मुलाला बघितलं सुध्दा नाहीस आणि लायकी काढतोयस! आज सुहासने ठरवलंच होतं की सुमंतच्या डोळ्यावरचा अहंकाराचा चष्मा उतरवायचाच.
     ज्याची बाजू घेतो आहेस त्याला तू तरी किती ‌ओळखतोस? सुमंत गुरगुरला.
       " काल केतकी आली तेंव्हा रात्री तोही आमच्या घरी आला.आणि बोलता बोलता आमच्या आॅफीसमध्येच त्याचे वडील काम करतात हे कळलं.अतिशय चांगलं कुटुंब आहे ते! उलट त्यांनाच त्यांच्या मुलासाठी तुझी मुलगी 'नाकापेक्षा मोती जड'वाटतेय"सुहास शांतपणे बोलला.
    " सुमंत, आपल्या स्वत:च्या आई-वडिलांना भेटायला शेवटच कधी गेला आहेस? आठवतंय?त्यांना तुझ्या घरी उगीचच कधी आणलस? आठवतंय?पैसे खूप पाठवतोस त्यांना, पण त्यांना तुझा सहवास हवाय त्याच काय? तुझ्या अहंकारामुळे तुझा मुलगा तुला सोडून गेलाय.आणि आता तू मुलीला गमवू नये म्हणून मी तुला समजवायचा प्रयत्न करतोय.
    तुझा 'दृष्टीकोन' म्हणजे तुझी विचार करण्याची पद्धत असं जर म्हटलं तर तुझा अहंकार जो परिस्थिती किंवा समोरच्याचा विचार न करता तुझं मत बनवतो असा दृष्टिकोन आणि तो दृष्टीकोन फार कमी वेळा सकारात्मक असतो सुमंत!!
      सुमंत केबिन बाहेर बघू लागला.
     "माझी केबिन साऊंड प्रुफ आहे, बाहेरच्यांना आतलं दिसतही नाही. आठवतं,अशीच तुझी केबिन आहे ज्याचा गर्वानी कितीवेळा उल्लेख केला आहेस तू माझ्या जवळ!" सुहास मिश्कीलपणे म्हणाला.
      अचानक सुमंत उठला.सुहासला वाटलं संपले संबंध बहुतेक!
        "सुहास,तुझ्या आॅफिसमध्ये त्या मुलाचे वडील आहेत ना? उद्या संध्याकाळी आपण त्यांच्या घरी जाऊया का? भेटून पुढचं ठरवूया.त्यांना तसं सांगशील?"सुहासला सुमंतच हे बोलतोय ह्यावर विश्वासच बसत नव्हता.नाही म्हणायचा प्रश्र्नच नव्हता.
          ..............................
       दुसऱ्या दिवशी सकाळीच सुमंत केतकीला घेऊन सुहासच्या घरी आला.त्याला बघून सगळेच चकित झाले.कारण काल जे घडलं ते दोघा मित्रांमध्येच होतं.सुहास घरी काहीच बोलला नव्हता.आणि ती खात्री सुमंतला पण होतीच.
      "थॅंक यू सुहास, आजुबाजुला जे घडत असत ते पाहणं आणि दिसणं यातला तिसरा कोन दृष्टीचा असतो जो मी अहंकारानी दुषित केला होता. माझ्या वागण्याचं थोडस समर्थन नाही,पण खडतर दिवसात आलेल्या वाईट अनुभवांमुळे हा कडवटपणा आला असेल बहुतेक, पण जवळची माणसं आता मला गमवायची नाहीत. मी आई-बाबांना आणायला गाडी पाठवली आहे.म्हणून मी कालच जाऊया असं न म्हणता एक दिवस घेतला.सगळी बोलणी व्यवस्थित झाली तर तुझ्या आणि माझ्या आईला,वहिनींना तिथं बोलावून घेऊ".सुमंत मनापासून बोलत होता.
     केतकी मामाला अंगठा दाखवून हसली आणि लगेच पुढे येऊन त्याच्या पाया पडली.सुहासच्या मनांत आलं"खरंच, आपला दृष्टीकोन म्हणजे आपली जगण्याची सकारात्मक जाण असली पाहिजे!
                                                                            - ललिता छेडा

Thursday, December 20, 2018

चौकट

आपल्या बेडरूमच्या खिडकीतून सुमित्रा खाली तिच्याच साठाव्या वाढदिवसाच्या समारंभाची तयारी बघत होती.सर्वांची चाललेली लगबग बघून तिला वाटलं तिचे दोन्ही मुलगे,सूना,एकूलती एक लेक कोणीही गेल्या कित्येक वर्षांत  आई,कशी आहेस तू?'असं विचारलं नाहीय.आणि आज त्यांच्या बाबांच्या म्हणजेच सुमित्रेच्या यजमानांच्या परिचयातली, राजकारणातली मोठी मोठी मंडळी येणार आहेत म्हटल्यावर तिघही समारंभासाठी धावपळ करत होती. मेन्यू मधल्या ह्या पदार्थाची निवड माझी,ही आयडिया मला सूचली अशी क्रेडिट्स घ्यायला हवीत ना! सुमित्राला हसू आलं.ह्यांना माझा आवडता पदार्थ तरी माहिती आहे की नाही कुणास ठाऊक?
     सुमित्राला आठवलं चाळीस वर्षांपूर्वी महेश तिच्या आयुष्यात आला तेव्हा तो तिच्या बाबांच्या मित्राचा मुलगा येवढीच त्याची ओळख होती.गावाकडचा वडिलांचा दुधाचा धंदा मुंबईत सूरु करण्यासाठी म्हणून सुमित्रा रहात असलेल्या सायन स्टेशनजवळच्या  सोसायटीतून तो भाड्याची खोली शोधत होता.  नशीबानं त्याला तिच्या सोसायटीतच जागा मिळाली.
       वर्षभरात त्याने त्या एरियात ओळखी वाढवून धंध्यात छान जम बसवला.
      सुमित्रा तिच्या नकळत त्याच्या प्रेमात पडली आणि महेशला पण आपणआवडतोय हेही तिला कळलं होतं. एकुलत्या एक लेकीसाठी स्थळ म्हणून नांव ठेवायला काहीच जागाच नसल्यामुळे दोन्ही घरातल्यांच्या संम्मतीने त्यांच लग्न झालं.
    लग्नाच्या वेळी बी.ए.असलेल्या सुमित्राने बी.एड.करून म्युनिसीपाल्टीच्या शाळेत नोकरी धरली होती.तिला शिकवायला फार आवडायचं आणि त्यातपण अशा शाळेत शिकवायचं तिचं स्वप्नच होतं.आणि तिला पाहिजे ते सगळंच मिळत गेल्याने ती खुष होती.
     लग्नानंतरची दहा वर्ष तिन्ही मूलांचा जन्म, नोकरी,महेशचा व्यवसाय ह्यात कुठे गेली कळलंच नाही.जवळच रहाणार्‍या आईची सुमित्राला  खूप मदत होत होती.आणि धंध्यात जम बसेपर्यंत महेशला सुमित्राच्या पगाराची जोड होती.
     सामाजिक कार्याची प्रचंड आवड असलेला महेश व्यवसायाबरोबर आपल्या सार्वजनिक कामातही व्यस्त असायचा. राजकारणाची पण त्याला आवड होतीच त्यामुळे त्याची सामाजिक कामं तो एका पार्टीच्या माध्यमातून करु लागला होता.त्यामुळेच ते रहात असलेल्या विभागापासून थोडशा लांब असलेल्या जागेवरुन महेशला पार्टी कडून नगरसेवक म्हणून निवडणूकीचं तिकीट मिळालं.आणि त्यांच्या आयुष्याला एक वेगळंच वळण लागलं.
   ती निवडणूक जिंकल्यावर महेशने मागे वळून पाहिलेच नाही.त्या एरियात त्याचा बंगला,गाड्या असं साम्राज्य उभं राहिलं.हे सगळं मुलांना त्यांच्या न कळत्या वयात मिळाल्याने त्यांना 'कष्ट' शब्दाची ओळखच राहिली नाही.सुमित्रा तिच्या कडून मुलांवर चांगले संस्कार व्हावेत यासाठी प्रयत्न करायची पण तिच्या ह्या विचारानी मूलं तिच्यापासून दूरावत गेली.
       त्यानंतरच्या पंचवीस वर्षांत आपल्या स्वभावानी,धडपडीने महेशनी केन्द्रात मंत्रीपद मिळवलं होतं.आणि महेशभाईचा कधी ते 'भाईसाहेब' झाले सुमित्राला कळलंच नाही.त्याचा चुकीच्या मार्गाने येणारा पैसा ही तिला आवडत नव्हता. 
   महेश दिल्लीत गेल्यावर  मुंबईतल आॅफिस, सगळ्या अपाॅंटमेंटस् सांभाळायला सेक्रेटरी म्हणून कांचनला नेमलं गेलं.आणि सुमित्राच्या मनाविरुद्ध अनेक गोष्टी घडू लागल्या.मुंबईच्या कार्यालयासाठी नेमलेली कांचन कधी दिल्लीचं काम सांभाळायला तिकडे राहू लागली कळलंच नाही.
     विचारात हरवलेल्या सुमित्राला खाली बागेत  तिचा जावई  हांका मारुन बोलावत होता.त्याच्या आवाजाने ती भूतकाळातून बाहेर आली.
    खरं म्हणजे तिचा जावई जातीने गुजराती, पण अस्खलित मराठी बोलयचा! तिच्या मनात आलं  "हा कोण आहे माझा,पण ह्याला जेवढी मी कळते माझ्या मुलांना नाही कळत असं का होतं?
    पैसा म्हणावं तर आपल्या जावयाचे वडिल पार्टीचा आर्थिक आधार आहेत, संस्कार म्हणाव तर ह्याच्या घरातलं वातावरण इतकं जुन्या वळणाच आहे पण ह्याचे विचार मात्र अगदी वेगळे आहेत.
      तिला वाटलं पैसा आणि संस्कारा पलिकडे काही तरी असतं ते ह्याच्यात आहे.
         तिच्या अपेक्षेप्रमाणे तो वर आला आणि म्हणाला"आई,तुमचा वाढदिवस आणि तुम्ही अजून तयार पण नाही झालात?
      नाही रे असल्या वाढदिवसाची मला आवड ही नाही आणि असले शो  मला आवडतही नाहीत.पण मी जे ठरवलंय ते सर्वांना सांगायला हा समारंभ योग्य आहे म्हणून मी होकार दिला."सुमित्रा अवघडलेल्या स्वरात बोलली.
    "म्हणजे अजून तुमच्या डोक्यातून तो विचार गेला नाहीय? त्यानं विचारलं.
      ""अरे तो माझा निश्चय आहे, विचार नाही."सुमित्रा ठामपणे म्हणाली.तू बोलला नाहीस ना कोणाला?"
    "नाही"तो थोडा अस्वस्थ झाला होता."तुम्हाला प्राॅमिस केलय मग कसं बोलेन?
      "तू हो पूढे मी येते तयार होऊन! सुमित्रानी विषय संपवला होता.
       ती खाली गेली तोपर्यंत खूपशी मंडळी आलेली होती.दोन्ही सूनांनी तिच्या दोन्ही बाजूला येऊन तिची  छानशी एन्ट्री केली.सर्वांनी टाळ्या वाजवून तिचं स्वागत केलं.
    स्टेजवर आधीपासून भाईसाहेब, तिन्ही मूलं उभीच होती.ती आल्यावर फोटोचे फ्लॅश उडाले.सुवासिनींनी एकसष्ट दिव्यानी ओवाळलं.
    कार्यक्रमाचा सूत्रसंचालक तिचं कौतुक करत होता.तिची साधी राहणी, तिचं म्युनिसीपाल्टीच्या शाळेच पिन्सिपल असणं,तिच पी.एच् डी.पर्यंतच शिक्षण आणि शेवटी "साहेबांच्या मागे खंबीरपणे उभ्या असलेल्या वहिनींना मी त्यांच मनोगत सांगण्याची विनंती करतो असं म्हटलं आणि माईक सुमित्राच्या हातात दिला.
      सुमित्रा शांतपणे उभी‌ राहून बोलू लागली.
      "सर्वप्रथम इतका देखणा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मी माझ्या कुटुंबाचे आणि तुम्ही सर्वजण आलात त्याबद्दल सर्वांंचे मनापासून आभार मानते.
     साठावं वर्ष हे निवृत्तीच वय मानलं जातं. आणि नुकतीच मी शाळेच्या नोकरीतून निवृत्त झाले.तशीच आता मी घरातूनही निवृत्ती घेणार आहे.उद्यापासून मी माझ्या वडिलांच्या सायनच्या घरी रहायला जाणार आहे.त्यांच्यानंतर त्यांनी ते घर माझ्या नांवावर केले होते..तिथे मला आर्थिकदृष्ट्या मागास मुलांसाठी मोफत क्लासेस सुरू करायचे आहेत.तेव्हा आता मला भेटायला तुम्हा सर्वांना तिथं यावं लागेल.
      सुमित्राचा हा निर्णय खर म्हणजे सर्वांना अनपेक्षित होता.पण महेश पक्का राजकारणी त्यानं लगेच माईक हातात घेतला आणि म्हणाला"अशीच निवृत्ती मी राजकारणातून घेतली की आम्ही दोघांनी त्या घरी आनंदात रहायचं ठरवलंय!आमचे निर्णय नेहमीच एकत्र येऊन घेतलेले असतात. तेव्हा आपण आता सहभोजनाचा आनंद घेऊया.सर्वांनी टाळ्या वाजवल्या.
      सुमित्रा महेशकडे बघून हसली.
      कार्यक्रम संपण्याआधीच सुमित्रा तिथून निघून गेली.
      दुसऱ्या दिवशी सकाळी चहाच्या टेबलावर सगळेच जण तिची वाट बघत होते.
    तिला बॅग घेऊन आलेली बघून महेश रागानेच म्हणाला"असं घर सोडून जायची काही गरज नाही.घराची चौकट मोडून जाण्याने तुझं हसं मात्र करून घेशील.
     सुमित्रानी हातातली बॅग खाली ठेवली आणि म्हणाली"कोणती चौकट?घरात एकत्र राहून ह्या माझ्या मोठ्या मुलाला, सुनेला गेले महिनाभर मी माझी पुस्तके, सामान घेऊन जातेय हे कळलं नाही.ह्याना माझ्या प्रकाशित दहा पुस्तकांपैकी दोन पुस्तकांची नांव तरी माहीत आहेत असली तरी बस्! तुमचा विरोध असतानाही ह्याला वकील व्हायचं होतं म्हणून मी त्याच्या पाठीशी उभी राहिले.आणि आज हा तुमच्या केसेस मॅनेज करतोय!ह्याच्यासाठी मी घरात कोणत्या नात्यानं राहू?
   ही तुमची लाडकी लेक प्रेमात पडली हे तिने प्रथम कांचनला सांगितलं.कोणत्या नात्यानं? आणि तिचा नवरा ना माझ्या नात्याचा,रक्ताचा तो कांचनशी बोलत देखील नाही.कांचनमुळे आपल्या आईला होणारा त्रास हिला कळत नाही?
       हा धाकटा मुलगा तो तुमचा दुधाचा धंदा स्वत:च्या नांवावर करून घेतो.मला सांगत सुध्दा नाही.वेगळा रहायला जातो.मला विचारत देखील नाही, तर सरप्राईज च्या नावानं अचानक नवीन घराच्या वास्तुशांतीला घर दाखवतो.
       आणि ह्या सगळ्याला जबाबदार महेश, तुम्ही आहात!माझी जागा तुम्ही घराच्या चौकटीच्या आत ठरवलीत.त्यामुळे मुलांना पण माझी दखल घ्यावी असं वाटलं नाही अगदी चौकटीच्या आतसुध्दा.त्यातसुध्दा कांचन बरोबर तुम्ही राजरोसपणे सेक्रेटरी म्हणून दिल्लीत रहाता आणि ह्या घरातल्या कोणत्या चौकटीबद्दल बोलताय?
      वाढदिवस साजरा करून मन नाही जिंकतायेत!
   ‌ "मी तिथे एकटीच रहाणार आहे."सुमित्रा बोलत होती.मी‌ चौकट मोडली नाही तर मोठी केलीय! माझ्या ह्या कृतीने एकीला जरी स्वत:ची घुसमट संपवायला प्रेरणा मिळाली तरी मी घराबाहेर टाकलेलं हे पाऊल यशस्वी झालंअसं समजेन.
    मागे वळून न पाहण्याच्या निश्र्चयानी सुमित्रानी ताठ मानेने बॅग उचलली आणि घराची चौकट ओलांडली!!!
            ललिता छेडा

Thursday, December 13, 2018

श्रद्धा

सुधाचा दिवस खरं म्हणजे पहाटे पाच वाजताच सूरू व्हायचा पण आज मार्गशीर्षातला पहिला गुरुवार आणि ह्यावर्षी भजनी मंडळाच्या बायकांनी सगळ्यांनी त्यांचा घरातल्या देवीच्या मूर्तीची एकत्र पुजा करण्याचं ठरवलं होतं.त्यामुळे त्या अंमळ लवकरच उठल्या.हाॅल मधल त्यांच देवीच मंदिर स्वच्छ कराव लागेल,हाॅलपण आवरावा लागेल ह्या विचारांनीच त्यांना जाग आली होती.
          देवीच्या मूर्ती समोर उभ्या राहिल्यावर सुधाला आठवलं ती गांवच्या घरातून मुंबईला जायला निघाली तेव्हा सासुबाईंनी किती प्रेमानी विचारलं होतं की"तुला काय हवंय ह्या घराची आठवण म्हणून?"तिनी क्षणाचाही विचार न करता म्हटलं होतं"कमळात बसलेली देवघरातली संगमरवरी देवीची मूर्ती! आणि सासूबाईंनी पण आनंदाने मूर्ती न्यायला परवानगी दिली.
     कारण ती सदाशिवशी लग्न करून कोल्हापूरजवळच्या त्या छोट्याश्या गावात आली तेव्हापासून तिची देवघरातल्या त्या मुर्तिशी
जवळीक निर्माण झाली होती.तिला ती मूर्ती अतिशय आवडली होती. आणि सासूबाईंपण तिची त्या मुर्तिवरची श्रद्धा जाणून होत्या.
     आणि  तिची ह्या घरातली दुसरी आवडती गोष्ट म्हणजे दागिने बनवण्याच्या घरच्या व्यवसायातले दागिने!           
       सुधाचे दोन्ही मोठे दिर दागिने बनविणारे कारागीर होते.आणि घरातल्या दोन खोल्यात त्यांचे ते काम सुरू असे.बनलेला प्रत्येक दागिना मनातल्या मनात घालून बघायचा सुधाला नादच होता.  
   सगळे दागिने घालून फोटो काढायचं तिचं एक स्वप्न होत.
     मोठमोठ्या सराफांची त्यांच्या घरी उठबस असे. 
     तिच्या नवर्‍याला सदाशिवला मात्र ह्या गोष्टीची आवड नव्हती.त्यामुळे तो शिकला आणि मुंबईत चांगल्या नोकरीला लागला.
      भांडूपमधल्या सोसायटीत घर घेतल्यावर सदाशिवनी जवळजवळ दोन वर्षानी सुधाला मुंबईला बोलावलं.सुरवातीला सुधानी ती मुर्ति स्वैपाकघरात ठेवली.काही वर्षांनी घराला रंग द्यायच्या निमित्ताने सुधानी छानसं मखर करून मूर्ती बाहेर आणून ठेवली.आणि घर गेटजवळ पहिलंच असल्याने येणार्‍याजाणार्‍यांच्या नजरेस पडू लागली.नकळत मंडळी हात जोडू लागली.
    त्या एरियातल्या भजनी मंडळाच्या बायकांनी देवीसमोर भजनाची प्रॅक्टिस सूरू केली.
    एक दिवस हसत हसत सदाशिवनी सुधाला म्हटलंसुद्धा"घराचं मंदिर नको व्हायला येवढं लक्षात असू दे.
     त्यावर सुधा हळव्या स्वरात म्हणाली"आपल्याला नाही मुलंबाळं, मला एकटीला कंटाळा येतो तुम्ही पण नसता दिवसभर, ह्या बायकांच्या येण्यानी,भजनांनी माझा वेळ छान जातो.
    सुधा हातानं कामं करत होती,पण विचारात गढली होती.
    अचानक सोसायटीतल्या इराची हांक आली"सुधामामी,उठलीस का? आणि तिच्या आवाजानी सुधा विचारांतून बाहेर आली. 
     अग, ये ना आणि उठलीस का काय विचारतेस? घर आवरतेय आज पूजा आहे ना घरी!सुधानी दार उघडलं आणि इराला घरांत घेतलं.
       "त्या पूजेचच मला शूटिंग करायचंय! आमच्या चॅनलला मार्गशीर्ष महिन्याचा इव्हेंट दाखवायचाय"इरा कॅमेर्‍यासकटच आली होती.
      इरांनी सुधाची छोटीशी मुलाखतच घेतली.मार्गशीर्ष महिन्याच महत्व,मुर्तिचा इतिहास सुधा खूप छान बोलली."अग मामी, तू कॅमर्‍यात काय मस्त दिसतेयस!बोललीस पण किती छान!
         दुसऱ्या दिवशी टी.व्ही.वर साग्रसंगीत पूजा बघताना सगळ्यांनाच खूप गंमत वाटली.
       तिसऱ्या-चौथ्या दिवशी सुधाला एका मोठ्या दागिन्यांच्या कंपनीच्या जाहिरातीसाठी तुम्ही काम कराल का?अस विचारणारा फोन आला.सुधाला काहीच कळेचना तिनं इराला बोलावलं.इरानी त्या कंपनीला परत फोन केला.आणि तिला कळलं की त्या कंपनीला तीन पिढ्या त्यांच्याकडे दागिने घेतात अशी जाहिरात करायची आहे.आणि मधली पिढी म्हणून सुधामामींना निवडलाय.त्यांना टी.व्ही.वर बघून त्यांनी तो फोन केला होता."अग पण फोटो काढायला येवढे दागिने कुठे आहेत माझ्याकडे?सुधाचा भाबडा प्रश्न ऐकून इरा हसली आणि म्हणाली"मामी, दागिने ते देणार!तुम्ही फक्त ते घालायचे सांगतील तस बसायचं आणि फोटो काढून घ्यायचा.! तुम्हाला त्याचे पैसे पण मिळतील."
      सुधा अवाक् होऊन ऐकत राह्यली.तिच स्वप्न देवीनं पूर्ण केलं होतं.मार्गशीर्षातल्या गुरवारची पूजा तिला फळली होती.
  बघता बघता सोसायटीत ही बातमी पसरली आणि सगळेजण मामींच्या घरी जमा झाले.सुधाला तर काय करावं काही सुचत नव्हतं.तिच्या स्वप्नाबद्दल ऐकल्याबरोबर कोणीतरी असंच माझं स्वप्न पूर्ण होऊदे 'माझ्या मुलाला नोकरी लागू दे' असं म्हणून देवीला हळदकुंकू वाह्यलं आणि बघता बघता एक छोटीशी लाईनच देवीपूढे लागली.
    हे सगळं बघून सदाशिवला मात्र"हे सगळं श्रद्धेकडून अंधश्रद्धेकडे जाताय की काय अशी शंका आली.आणि ह्यासाठी काही तरी करायला हव असं पण जाणवलं.
   जाहिरातीच्या शूटिंगसाठी सुधाबरोबर इरा आणि सदाशिव दोघेही आले होते.सुधाला सुंदर साडी आणि गळ्यात, हातात घालायला दागिने दिले आणि ती अक्षरशः मोहरून गेली.
    कंपनीने जमलं तर टी.व्ही.मधली मूर्ती पण आणा असं म्हटल्यामुळे मूर्ती पण बरोबर होतीच.मूर्तीजवळच एका झोपाळ्यावर तीनही पिढ्यांच्या स्त्रीयांना बसवून शुटिंग सुरू होत.सुधाला आपल्या अंगावर इतके  दागिने आहेत ह्यावर विश्वासच बसत नव्हता.ती सारखी आरशात जाऊन बघत होती.आयुष्यभराचं स्वप्न असं पूर्ण होईल ह्याचा आनंद काही औरच होता.
   मूर्तिला थोड्या वेळात खूप सुंदर स्वच्छ करून आणि छान रंगवल होतं.मुर्तिला तिच्या मापाचे दागिने घातले होते.मूर्ति खूप तेजस्वी दिसत होती.
       सगळ्यांनी दिवसभराच शुटिंग एन्जाॅय केलं होतं.
      घरी परताना बघितलं तर मूर्ती एका फुलांनी सजवलेल्या मखरात प्रवेशद्वारावर ठेवली होती.  अगोदरच तिथे एक गणपतीची मूर्ती होती तिच्या शेजारी देवीची मूर्ती छान वाटत होती. राहू दे थोडे दिवस इथेच अशी त्या मंडळीनी विनंती केली. 
    आणि सदाशिवला हळूच कंपनीच्या मालकांनी "तुम्ही परवानगी दिलीत तर आयुष्यभर इथेच छान मखरात ठेवू" असं म्हटलं.सदाशिवनी हसून सुधाकडे हात दाखवला.सुधा मूर्ती समोर डोळे मिटून उभी राह्यली होती.
        सोसायटीत सगळेजण वाटच बघत होते.नवस बोलणार्‍या काकूंच्या लेकाला इंटरव्ह्यूचा काॅल आला होता.त्यामुळे सर्वजण दारातच मूर्तीची चौकशी करू लागले.
   कोणीतरी म्हणालं सुध्दा"आता आपण गेटवर त्या देवीच मंदिरच बनवूया"
     सदाशिवला मंदीर बनवण्यापेक्षा मूर्तीला छान स्थान मिळालय असं वाटत होतं.पण म्हणजे देवीला आपल्या घरातून आपण बाहेर काढतोय का? त्याला काहीच कळत नव्हतं.का इतकी वर्ष आहे तशी आपल्या घरातच ठेवावी.सदाशिवला वाटलं आपण फार विचार करतोय.ठरवू दे सुधाला काय करायचं ते! कारण ती मूर्ती तिनीच आणली होती.
   त्याच्या मनातलं ओळखल्या सारख सुधा म्हणाली"हे बघा सध्या तरी आम्ही मूर्ती तिथेच ठेऊन आलोय त्या मंडळींनी मूर्ती शोभून दिसेल अशा जागेवर ठेवलीय.आम्हाला ते आवडलय.
     सदाशिवला बरं वाटलं की सुधाची परमेश्वरावरची श्रध्दा खरी आहे.त्यासाठी‌ तिला मूर्तीची गरज नाही.

                                                                              -ललिता छेडा.


Thursday, December 6, 2018

पम्मीआन्टी


पंचेचाळीस वर्षांपूर्वी खारच आमचं घर म्हणजे एका मोठ्या बंगल्याच्या आवारातल मागच्या बाजूला असलेल्या आऊट हाऊसमधल्या तीन खोल्यांचं भाड्याच घर होतं.आणि आमच्या खोल्यांसमोर बंगल्याला लागून तीन खोल्यांची गेस्ट रूम होती.तिथे शर्माअंकल रहायचे.माझे सासरे आणि शर्मा दोघेही एकाच कंपनीत कामाला होते.आणि चांगले मित्रही होते. जागेच्या शोधात असताना पंजाबी घरमालक असलेल्या ह्या बंगल्यात शर्मांच्या ओळखीनं ह्या दोघांना मनासारख्या जागा मिळाल्या.
         मी लग्न करून आले तेंव्हा खार इतकं गजबजलेलं नव्हतं. काही नटनट्यांचे बंगले, छोट्या छोट्या चाळी आजूबाजूला होत्या पण आमच्या पुढचा बंगला आणि त्याच्या भोवतालची बाग, झोपाळा, छोटासा हौद हे सगळं इतकं सुंदर होतं की मी त्या घराच्या प्रेमातच पडले. आम्हाला घर लावून दिल्यावर  माझे सासुसासरे गिरगावात धाकट्या दिराकडे रहायला गेले.
    आमच्या सारखे शर्मा अंकल,आंन्टी आणि त्यांचा नुकताच डाॅक्टर झालेला मुलगा अजय असे दुसरे भाडेकरू! 
       सर्वजण ज्यांना बडेपापा म्हणून ओळखत होते असे आमच्या बंगल्याचे मालक! 
      आणि त्यांच मुलाबाळांनी भरलेलं घर! मला छानसा पंजाबी मनमोकळा शेजार मिळाला होता.
     वर्षभरात माझ्या लेकीचा जन्म झाला आणि त्यानंतर थोड्याच दिवसांत डॉ.अजयच लग्न ठरलं.मुलगी दिल्लीची होती.लग्नही दिल्लीला होणार होतं.शर्माअंकलनी आम्हां सर्वांना खूप आग्रहानी दिल्लीला नेलं.आणि तिथे छान बडदास्तही ठेवली.
      नवी नवरी खूपच सुंदर होती.पंजाबी लालसर गोरेपण,नितळ त्वचा, लांबसडक केस, तिच्याकडे बघितलं की नजर दुसरीकडे जातच नव्हती.तिचं नांव पमिला का कायसं होतं पण सर्वजण तिला 'पम्मी' म्हणत होते.
    अजय तर अगदी वेडावला होता.पम्मी पण खूष दिसत होती.मुंबईला परताना त्या दोघांना कुपे होता पण अजय रात्री झोपण्यापूर्वी आम्हा सर्वांना भेटायला पम्मीला घेऊन आमच्या डब्यात आला.माझ्या जवळ बसून पम्मी हळूच म्हणाली" हमारे घर के बाजु में कोई पिक्चरका स्टुडियो है क्या? मुझे सिनेमामें काम करना है! मी अवाक झाले काय बोलावं कळेना.पण लगेच सावरून म्हणाले"पहले घर चलो,फिर ढुंढलेना।
      आमच्या सर्वांच स्वागत बडेपापानी जोरदार केलं.बंगल्यावर सगळ्यांना जेवायला बोलावलं.आणि जेवताना सहज म्हणाले"अरे अजय तेरी बीबी तो सिनेमाकी हिराॅईन लगती है! झालं,पम्मीनी ते उचलून धरलं."सचमुच मुझे पिक्चर में काम करना है,आप परमिशन दोगे। तिने लाडात येऊन अजयला विचारलं.आणि त्या माहौलमध्ये तो देखील "ठीक है"म्हणून गेला.
   दुसर्‍याच दिवशी छानशी तयार होऊन पम्मी मला सांगून स्टुडिओच्या शोधात बाहेर पडली.वर्षभरानी तिला एक सिनेमा पण मिळाला.आम्ही सर्व बघायला गेलो.ती फक्त दोन सीनमध्ये ओझरती दिसली.पण तेवढ्यावर ती जाम खुश झाली होती.
    घरी आल्यावर मी अजय समोरच तिला म्हटलं"अग,येवढ्याशा कामासाठी किती धावपळ करतेयस?"भाभीजी,बडे पडदेपर दिखना मेरा सपना है।वो कैसे पुरा हो रहा है वो मैं नहीं सोचती। मुझे कोई भी गलत कदम उठाके आगे नहीं बढ़ना।"ती इतका विचार करतेय हे ऐकून बरं वाटलं.तिला तसे हळूहळू छोटे रोल मिळू लागले होते.
  त्यानंतर तिला दिवस गेले.मुलगी झाली.अजयला वाटलं ही विसरेल पण पम्मीनी मुलीला सांभाळायला बाई ठेवली.आणि पुन्हा जोरात फिरु लागली. अजय पण त्याच्या प्रॅक्टिस मध्ये गुंतला. लवकर रिटायरमेंट घेऊन सासरे दिल्लीला निघून गेले.
    प्रत्येक नटांबरोबर स्वत:चे वेगवेगळ्या सिनेमांच्या सेटवर फोटो काढायचे हा तिचा आवडता छंद होता.त्या फोटोंचे पम्मीने अल्बम बनवले होते.नट्यांबरोबर राहून तिनं मेकअपच तंत्र शिकुन घेतलं.ती सतत घरात सुध्दा मेकअप केलेलीच असायची.आणि गडद रंगाचे कपडे घालायची.
     एका छोट्या जाहिरातीत एकटीच झळकल्यावर तर तिला आभाळ ठेंगणं झालं.
     तिला थोडं यश मिळत असतानाच अचानक दोन घटना तिच्या मनाविरुद्ध घडल्या.
     जवळजवळ दहा वर्षांनी तिला दिवस गेले, आणि बडेपापानी प्राॅपर्टी डेव्हलपमेंटला दिली. 
      बडेपापांची दोन्ही मुले अमेरिकेत स्थायिक झाली..त्यामुळे त्यांनी तिकडेच  जायचं ठरवलं.पण जाताना त्यांनी आम्हा दोन्ही भाडेकरूंना तिथेच उत्तम जागा मिळाली पाहिजे अशी बिल्डरला अट घातली.आणि आमच्यावर आयुष्यभराचे उपकार केले.
     विक्रमचा,पम्मीच्या मुलाचा जन्म आणि जागांसाठी अदलाबदल ह्यात पम्मी सिनेसृष्टीपासून दूर गेली.त्या दोन वर्षांत  बदलीची जागा दूर मिळाल्यामुळे आम्ही पण लांब रहायला गेलो होतो. नाहीतर माझ्या दोन मुली एक मुलगा असलेल्या कुटुंबात तिची मुलगी सहज मिसळून जायची.
      आपल्या दोन्ही मुलांचे जन्म चुकीच्या वेळी झाल्याने आपल्याला सिनेमात करिअर करता आली नाही अस पम्मीच ठाम मत होतं. . तशी तिची बडबड सुरु पण असायची! कदाचित त्याचा परिणाम असेल तिच्यात आणि मुलांमध्ये जिव्हाळ्याचे संबंध कधी निर्माणच झाले नाहीत.विकीला तर तिचा मेकअप अजिबात आवडत नसे.
       नवर्‍यावर मात्र पम्मीच खरंखुरं प्रेम होतं.अजय पण तसाच खराखुरा पंजाबी होता. Happy Go Lucky! प्रत्येक गोष्ट पाॅझिटीव्हली स्वीकारणारा,आनंदी!पम्मीला त्यानं गाडी पण घेऊन दिली होती.ती चालवायची पण छान.आम्हा दोघांना, मुलांना ती नेहमी कुठेही सोडायला तयार असायची.पण माझ्या सासूबाई आणि हे दोघेही तिच्या सततच्या मेकअपनी चिडचिड करायचे.
     मला बाई आवडायचं तिच असं नटणं! आणि तिचं म्हणणं"नेहमी छान तयार रहावं काय माहित कोण कधी फोटो मागेल आणि पिक्चरची आॅफर मिळेल." मला ही निरागसता पण आवडायची.
       पम्मीची मुलं मात्र त्यांच्या वडिलांच्या खूप जवळ होती.अजयनी सांगितलेलं ऐकायची.पम्मीच्या ह्या सिनेमा वेडानी अजयनी विकीला हाॅस्टेलला ठेवायचं ठरवलं आणि मला थोडं वाईट वाटल.
     आमच्या जुन्या जागेवर दोन टाॅवर आणि सहा राॅ हाऊसची मोठी सोसायटी बनली होती.आम्हाला दोघांना बिल्डरनी शेजारी शेजारी राॅ हाऊस दिली होती.खूप छान घरं होती.
   हळूहळू आमची मुलं मोठी होत होती.माझ्या दोन्ही मुलींची लग्न झाली.आणि मुलगा वडिलांच्या सारखाच वकील झाला होता.
      पम्मीची मुलगी पण एम.बी.ए.करून नोकरी करत होती.मुलगा विकी दहावीला होता.
   पम्मीला सोसायटीतली मुलं 'पम्मीआन्टी' म्हणायला लागली होती.तिला ते अजिबात आवडत नव्हतं. कारण ती अजून भुतकाळातच रमलेली होती.प्रत्येकाला अल्बम दाखवणं, डायलॉग बोलून दाखवणं तिचा आवडता टाइमपास होता.आणि पम्मीची इंडस्ट्री मात्र  झपाट्याने बदलत होती.नवीन चेहरे, नवीन टेक्नॉलॉजी,त्यात तिला स्थान मिळत नव्हतं.ती मात्र न हरता परत परत प्रयत्न करत होती.
      आणि अचानक डॉ.अजयच हार्ट अॅटकनी दु:खद निधन झालं.पम्मीचा आधारच गेला.नंतरच्या दिवसात दोन्ही मुलं तिच्याशी थोडी फटकूनच वागत होती.पंधरा दिवसांनी विकीनी त्याच सर्व सामान आवरून दादाजीं बरोबर दिल्ली जात असल्याच जाहीर केलं आणि थोरल्या मुलीनी  एका परधर्मिय मुलाबरोबर "मी लग्न ठरवल" असून ती त्याच्या बरोबर लग्नानंतर दुबई जाणार असल्याचं जाहीर केलं.पम्मी प्रचंड दुखावली.सिनेमाच्या वेडात आपण मुलं गमावल्याच दारुण सत्य तिला कळत नव्हतं उलट तिला मुलांना आपलं कौतुक नाही ह्याचच दु:ख झाल होतं.
      येवढ्या मोठ्या घरात पम्मी आन्टी एकटी झाली . हातात सतत देवानंद, दिलीपकुमार, शाहरुख चे फोटो असलेले आल्बम, चेह-यावर मेकअप केलेली पम्मी केविलवाणी दिसायची.सोसायटीच्या बागेत, किंवा कोणाच्याही घरी गेली की "पम्मी आन्टी सिनेमाकी बाते बताओ ना" मुलंअशी चेष्टा करत!
    तिची दिवसात एखादी तरी फेरी माझ्या घरी होत असे. सुरवातीला मी तिला समजवायचा प्रयत्न केला पण तिची ओळख भुतकाळात जगणारी एक अपयशी सिनेनटी अशी उरली होती.
      त्यादिवशी सकाळीच पम्मी आमच्याकडे आली."भाभीजी, दोपहर को खाना खाने आऊ क्या? जरा तबियत ठीक नहीं है। पीठमे दर्द है!आप घरपे हो ना? तिने मला विचारलं. मी आनंदाने"अग ये की, विचारतेस काय?अस म्हटलं.
    दुपारी दीड वाजला तरी आली नाही म्हणून मी तिला बघायला गेले.खूप दरवाजा ठोठावला पण ती उघडेना.सोसायटीतल्या मंडळींनी पोलीसांना बोलावून दरवाजा तोडून उघडला.
     समोर सोफ्यावर छान ड्रेस घातलेली, मेकअप केलेली, उराशी आल्बम धरून ठेवलेली पम्मी शांतपणे झोपलेली होती.जवळ जाऊन बघितल्यावर जाणवलं"ती गेलेय"
      माझे अश्रू अनावर झाले होते पण "तिच्या हातातले आल्बम तिच्या हातातच राहू देत" येवढच बोलून मी तिथून निघाले.
      आयुष्यभर सिनेमावर प्रेम करणारी,भुतकाळात रमणारी पम्मी आता भुतकाळ झाली होती.


                                                                                      -ललिता छेडा





Thursday, November 29, 2018

पत्रास कारण की


समीर,
           आपल्या कडाक्याच्या भांडणानंतर तू बॅग भरून निघून गेलास.आणि वाटलं नेहमी प्रमाणे तू तुझ्या आईकडे दापोलीला गेला असशील! पण दुसऱ्याच दिवशी आईंचा फोन आला, तू घाटकोपरला जव्हेरींकडे रहातोयस.
     काळजी नव्हती वाटत पण एक रुखरुख होती.
      अंतराच सारख बाबा, बाबा सुरू होतं त्यामुळे असेल कदाचित आणि काय योगायोग आहे ती पहिला शब्द बोलतेय'बाबा'!
       आणि काल, पंधरा दिवसांनंतर माझ्या साठी घटस्फोटाच्या वकीली नोटीशीच कुरिअर आलं.क्षणभर आत कुठेतरी काहीतरी हातातून निसटतय असं जाणवलं.पण क्षणभरच! कारण हे कधीतरी होणार ते अपेक्षितच होतं!
     नोटीस शांतपणे उघडून बघितली.पण समीर, तितक्या शांतपणे नाही वाचू शकले.मनाविरूध्द डोळे वहात होते.दु:खानी नाही तर अपमानानी रडायला येत होतं.ज्याच्यावर जिवापाड प्रेम केलं त्यानं असे घाणेरडे आरोप करावे हे दु:ख डोळ्यातून वहात होतं.
    मनात आल बरं झालं हे बघायला बाबा नाहीत. तुला भेटल्यावर ते म्हणाले होते 'हा मुलगा आळशी आहे.आणि त्याला अजिबात महत्त्वाकांक्षा नाहीय पण तुझ्यासाठी मी त्याला स्वीकारतोय!
      आणि त्यामुळेच माझी बाजू कळावी हेच माझ्या ह्या पत्राच कारण आहे.किती तरी वेळा बोललेय पण --- 
      तुझा पहिला आरोप आहे की माझं आणि अक्षयच अफेअर आहे.किंबहूना नोटीशीतला शब्द आहे'अनैतिक संबंध'
     समीर,अक्षय तुझा जवळचा, शाळेपासूनचा मित्र!जे.जे.मध्ये आपण तिघे भेटलो आणि आपल्या तिघांच मैत्रीच एक सुंदर नातं जुळत गेलं.
     अक्षयच्या वडिलांची स्वत:ची प्रसिद्ध अॅडव्हटायझिंग एजन्सी! आर्थिकदृष्ट्या समृद्ध घरातला अक्षय आणि आपण दोघेही मध्यमवर्गीय पण हे कधीच अक्षयनी मैत्रीच्या आड येऊ दिलं नाही. 
     मी आणि अक्षय डिझाईनींगमध्ये तर तू चित्रकार, उत्तम फोटोग्राफर, तुझ्या रंगाची जाण,रेषांवरच प्रभूत्व तुला चित्र काढताना बघणं हा माझ्यासाठी आनंदानुभव असायचा.तुझ्या चित्रांनी मला वेड लावलं होतं.
       आपलं लग्न अक्षयच्या पुढाकारामुळेच होऊ शकलं, हे तू सोयिस्कररित्या विसरलास. तुला फ्री लान्सींग करायचं होतं त्यासाठीच अक्षयने सुरवातीला तुला जव्हेरींच्या जाहिरातीच काम मिळवून दिलं. जव्हेंरीच्या महाराष्ट्रभर दागिन्यांच्या दुकानाच्या शाखा आणि बिल्डर म्हणूनही नावलौकिक! मात्र त्यांच्या  एका कामावर गेली चार वर्ष तू फक्त स्वत:चा खर्च चालवतो आहेस.आणि आता तर तू त्यांच्या आश्रयाला गेला आहेस.
      इतका मोठा आरोप करताना अक्षयनी तुझ्यावर केलेले उपकार तर स्मरायचे होतेस.
     त्याच्या सुखी संसाराची अशी थट्टा करताना थोडातरी विचार करायचास! 
     तू माझ्या प्रेमाचा आणि माझ्या मैत्रीचा फार मोठा अपमान केला आहेस.
      तुझा दुसरा आरोप मी तुला डाॅमिनेट करते.रोज संध्याकाळी ग्लास घेऊन बसणार्‍या तुला ह्या व्यसनांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न म्हणजे तुला डॉमिनेशन वाटत असेल कदाचित! पण मला सांग "आपल्या लग्नानंतर गेल्या चार वर्षांत एका तरी महिन्यात घराचा बॅंकेचा हप्ता भरलास का? कधीतरी घरखर्चासाठी पैसे दिलेस का? तरीही मी हे निमुटपणे
सहन करावं अशी तुझी अपेक्षा त्यामुळे संतापाने बडबड करणारी मी, ह्याला तू वर्चस्व गाजवणे म्हणत असशील पण मी ह्याला अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे म्हणते!   
     आपल्या लग्नाच्या वेळी मला उत्तम पगाराची नोकरी होती.अंतराचा जन्म झाल्यावर वर्षभर तुझी आई आपल्याकडे रहायला आली पण तुझ वागणं बघुन कायमच्या रहायला आलेल्या त्या परत दापोलीला गेल्या.वडिलांच्या मागे कष्टानी वाढवलेल्या तू त्यांना खूप निराश केलंस.
       त्या गेल्यावर "मी अंतराला सांभाळणार नाही"असं तू  म्हटलस आणि मी नोकरी सोडून घरातून काम सुरू केलं,आता तर सर्व घरखर्च मी त्या कामातूनच चालवतेय ह्याला वर्चस्व गाजवणं असं कोणी म्हणत असेल तर  मला काही फरक पडत नाही! कारण जे फ्री लान्सीग करायचंय असं तू म्हणत होतास ते मी करून दाखवलंय.
        तुझी तिसरी मागणी 'मी सध्या रहात असलेल्या घरावर तुझा पण हक्क आहे.तेव्हा घराच्या अर्ध्या किमती एवढे पैसे मी तुला द्यावेत.    
     आपल्या घराच डाऊन पेमेंट माझ्या बाबांनी आपल्या लग्नाची भेट म्हणून केलं होतं. कारण आपण लग्न रजिस्टर केलं.तेव्हा माझी नोकरी सुरू होती त्यामुळे उरलेल्या रकमेच कर्ज मी माझ्या नावांवर घेतलं.आणि बाबांच्या इच्छेनुसार आणि तू कमवत नसल्यामुळे घर माझ्या एकटीच्या नांवावर घेतलं.तेव्हा तुझा घरावर कोणताही हक्क नाही.
    समीर,जो घटस्फोट परस्पर संमतीने झाला असता आणि त्यानंतर सुध्दा आपण दोघे चांगले मित्र राहिलो असतो त्या संबंधात नोटीस बजावून इतका कडवटपणा,व्यवहार तू आणलास की त्यामुळेच मला हे पत्र लिहाव लागलं.
      पत्र वाचून तुला उपरती व्हावी ही अपेक्षा अजिबात नाही.कारण माझ्या बाजूने हे संबंध संपले आहेत.
       संबंध कसे ठेवावेत हे तुझ्या आईकडून शिक.तू घरातून निघून गेला आहेस हे कळल्याबरोबर आई लगेच अंतरासाठी इथं आल्यात.आणि महत्त्वाचं म्हणजे अंतराची आजी ह्या नात्यानं त्यानी आमच्या बरोबर रहायला माझी हरकत नाही.
       त्या स्वाभिमानी आहेत त्यामुळे मला गरज आहे असं वाटून त्या आल्यात.
       मी माझ्या आईला बोलावू शकत होते पण ती माझ्या भावाकडे सुखात आहे.  
      समीर,मनातून एकटी झालेय ती तुझी आई!
      पत्राखाली सही करताना तू मला "सानी" हाक मारायचास ते आठवलं.माझं नांव 'सानिका' पण तू म्हणायचास आपल्या प्रेमात 'का' नकोच!पण आता मात्र तूच माझ्या आयुष्यात अनेक प्रश्न निर्माण करून ठेवले आहेस.काळजी नको करू ते सोडवायला मी एकटी खूप सक्षम आणि आत्मनिर्भर आहे. त्यामुळेच------अंतराची आई---
                      सानिका.
                                                                
ललिता छेडा

Thursday, November 22, 2018

स्वप्न

झोपडीचा दरवाजा हलकेच ठोकल्याचा आवाज आला आणि काशीनी चमकून घड्याळाकडे बघितलं."इतक्या सकाळी कोण आलं असेल?असा विचार करेपर्यंत तिच्या नवऱ्याने दार उघडलं होतं.दारात भाईला बघून तो हातातला चहाचा कप घेऊन बाहेर ओट्यावर जाऊन बसला.जायच्या आधी गीताच्या म्हणजेच त्याच्या झोपलेल्या लेकीच्या अंगावरचं पांघरूण नीट करायला विसरला नाही.
"ताई, हे माझ्याशी बोलत का नाहीत?भाईंनी बाहेर बघत विचारलं.हात झटकून"ते सोडा तुम्ही इतक्या सकाळी का आलात ते काम बोला"काशीनी थोडंसं चिडून विचारलं.तिला त्याच इतक्या सकाळी येणं आवडलं नव्हतं.
"ताई, पुढच्या महिन्यात आपल्या पार्टीच्या आपल्या एरियात दोन महासभा आणि एक रॅली आहे.बायकांची जमवाजमव होईल ना?सभेचे आणि रॅलीचे वेगळे वेगळे पैसे मिळतील.काशीचे डोळे चमकले."ताई, तुमच्या जीवावर पार्टीला गर्दी होईल असा मी शब्द दिलाय" भाईचा आवाज ऐकून हेमंत काशीचा मुलगा पण उठला.
"अरे भाई, तुम्ही!भाईला बघून हेमंत खूष झाला होता.
"निवडणूकीची तयारी करायचीय भावी नगरसेवक!भाईंच्या शब्दानी हेमंत फुशारुन गेला आणि भाईच्या पायाशी बसला. बारावीनंतर संपूर्ण वेळ पार्टीसाठी वाहून घेतलेला हेमंता भाईचा उजवा हात होता.त्यामुळेच भाईनी बॅंकेच्या निवडणुकीत निवडून आल्यावर त्याला बाईक घेऊन दिली होती.
"माईंच्या बचतगटाच्या महिला मिळतील?भाईनी अचानक विचारलं.
"नाही रे बाबा मी नाही माईंना विचारणार"काशीनी भाईला अक्षरशः झटकून टाकलं.
त्या झोपडपट्टीत महिला आणि मुलांसाठी माईंच अतिशय निरपेक्ष काम होतं.झोपडपट्टीजवळच्या शाळेत माई प्रिंन्सिपाॅल होत्या.
माई सध्या गीताच्या शिक्षणासाठी आर्थिकच नाही तर सर्व प्रकारची मदत करत होत्या.आणि शिक्षणाची खूप आवड असलेली गीताही त्यांना मनापासून संपूर्ण सहकार्य करत होती.तिच कलेक्टर व्हायचं स्वप्न होतं त्यासाठीची तयारीही माईच करून घेत होत्या.
.
पुढचा संपूर्ण महिना रॅली आणि महासभेच्या गडबडीत गेला.
भाईंनी बचतगटाच्या महिलांना पण त्यात सहभागी करून घेतलं होतं.पैशानी आपल काम करून घेण्यात भाई हूशार होता.
दुसऱ्या महासभेनंतर रात्री बराच वेळ हेमंत न आल्याने काशी महासभेच्या जागी गेली.गेटवर काही मुलं दारू पित बसली होती.तिथे हेमंताला नसलेला बघून तिनं मुलांना विचारलं"हेमंत कुठे आहे रे?"
". तो काय तिथं मुख्यमंत्र्यांच्या खूर्चीत झोपलाय आणि भावी मुख्यमंत्री पदाची स्वप्न बघतोय! मुलांनी एकेमेकाला टाळ्या दिल्या."हेमंता दारू नाही ना रे प्यायला"काशीनी चाचरत विचारलं."नाही हो काकू तुम्ही शपथ घातली आहे ना! तो पाळतो!मुलांनी मनापासून कबुली दिली.
काशी तिथून निघाली घराच्या दारात रस्त्यावरच्या लाईटमध्ये गीता अभ्यास करत होती.तिला बघून काशीच्या मनांत आलं "ही बघत असलेली जागेपणीची स्वप्न खरी रे देवा! आता भाईला थोडं लांबच ठेवायचं.
काशीनी ठरवलं माईंना सांगून हेमंताला बाहेरून पदवी परीक्षा द्यायला समजवायचं! आणि माईंच्याच ओळखीने त्याच्यासाठी एखादी नोकरी पण शोधायची.ह्या राजकारणाच्या स्वप्नांनी पोरगं हातातून जाईल.आई म्हणून मुलांबाबतचे निर्णय आपण एकटीनेच घेतले पाहिजेत हे तिला समजलं होतं.
आईला समोर बघून तिच्या‌ मनातलं कळल्यासारखी गीता तिच्याकडे बघून हसली.
ललिता छेडा
(लघुकथा)

Thursday, November 15, 2018

नैराश्य




        सुमित्रा बाईंना सोसायटीच्या बागेत बसलेल्या बघून प्रिया थबकली. "काकू इथे का बसल्या आहात इतक्या दुपारच्या वेळी? पण सुमित्राबाईंच‌ लक्षच नव्हतं. तिने हलकेच काकूंच्या खांद्यावर हात ठेवला आणि सुमित्राबाई दचकल्या. "घाबरू नका काकू मी प्रिया आहे" ती त्यांच्या जवळ बसली. त्यांचा हात हातात घेऊन म्हणाली  "घरी कोणी नाहीये का?"नाही ना ग! हे बॅंकेत गेलेत. त्यांचीच वाट बघत होते. का कुणास ठाऊक घरात घुसमटल्यासारख वाटलं म्हणून बाहेर येऊन बसले" काकू थकलेल्या आवाजात म्हणाल्या. काका येतील, चला आपण घरी जाऊयात" प्रियानी काकूंना जबरदस्तीने उभं केलं. प्रियाला माहिती होतं अनघाचा म्हणजेच काकूंच्या लेकीचा साखरपुडा मोडल्या पासून त्या खूपच हळव्या झाल्या आहेत. त्यात पुन्हा काकूंच्या मोठ्या लेकाची विजयची घटस्फोटाची केस सुरू होती. प्रिया काकूंच्या शेजारीच रहात होती. प्रिया आणि तिचा नवरा दोघंही डॉक्टर होते आणि सोसायटी जवळच त्यांच छोटंसं हाॅस्पिटल होतं. प्रियानी तिच्या लेकीच्या म्हणजेच मायराच्या जन्मानंतर काम कमी केलं होतं. काकूंना पण मायराचा लळा होता. पण हल्ली त्या मायराला खेळवत नव्हत्या. हे प्रियाला जाणवलं होतं.
       प्रियानी काकूंना स्वत:च्या घरी नेलं. "काकू दरवाजा आपण उघडाच ठेवूया, म्हणजे काका आलें तर आपल्याला कळेल. आणि मायराची पण नर्सरीतून यायची वेळ झालीय."
   अचानक प्रियाच लक्ष काकूंच्या हातांकडे गेलं. हातावर पुरळ उठलेले दिसलं. तिनी "काकू हाताला काय झालंय?"अग रात्री झोप लागली नाही की हातापायाला खाज सुटते आणि असं लाल होतं." काकु थोड्याशा ओशाळून म्हणाल्या. डाॅ.प्रियाला जाणवलं की काकूंना डिप्रेशन येतय! तिनी काकांशी, अनघाशी बोलायच ठरवलं. प्रियाला त्या दोघांशी बोलल्यावर त्यांनाही काकूंच वागणं, बोलणं थोडंसं वेगळं वाटतंय हे कळलं आणि दोघांनीही तिला आवश्यक ते उपचार सुरू कर असंही सांगितलं. प्रियाला बरं वाटलं कारण मानसिक आजाराकडे सकारात्मक बघणं किती आवश्यक आहे हे तिला माहीत होतं त्यासाठी कुटुंबाकडून जो सपोर्ट तिला हवा होता तो मिळाला होता. आता पुढची पायरी होती काकूंना मानसोपचारतज्ञाकडे जाण्यासाठी तयार करणं! काकू सुरवातीला घाबरल्या आणि‌ म्हणाल्या "अग बाई मी वेडीबिडी झाले की काय?"नाही हो काकू, आपल्याला ताप आला किंवा पोट दुखल तर कसं औषध घेतो तसच तुमचं मन आजारी पडलंय त्याच्यावर उपचार करायचेत! काळजी नका करू मी आहे ना तुमच्या बरोबर! काकू कशाबशा तयार झाल्या. प्रियानी आपल्या मैत्रिणीला डॉ.राधिकाला फोन करून तिची वेळ घेतली. राधिकाला तिनी केस थोडक्यात समजावून सांगितली. प्रियाला माहीत होतं की राधिकाचा नैराश्य किंवा डिप्रेशन हा विषय खास अभ्यासाचा आहे. तिचे ह्यावरचे लेख, मुलाखती प्रियानी ऐकल्या होत्या.
    राधिकानी तिला दोन दिवसांनी येणाऱ्या मंगळवारची वेळ दिली. घाटकोपर स्टेशनजवळच असलेल्या राधिकाच्या क्लिनीकवर प्रिया काका, काकूंसह पोचली तेव्हा राधिका त्यांची वाटच बघत होती. काकूना तिनी मुद्दामच शेवटी ठेवलं होतं. त्यामुळे क्लिनीक रिकामच होतं. राधिकानी काकूंना एकटच आत बोलावलं. आत गेल्यावर काकूंना खूप प्रसन्न वाटलं. खोलीत छान उजेड होता. राधिकानी त्यांच हसून स्वागत केलं."या, काय म्हणताय? इथे बसा असं म्हणून तिनी त्यांना स्वत: जवळच्या खूर्चीत बसवलं! काकू थोड्या रिलॅक्स झाल्या होत्या.
"आता मला गेल्या वर्षभरात घडलेल्या आनंददायी आणि अप्रिय दोन्ही घटना अगदी थोडक्यात सांगायच्या." राधिकानी काकूंशी बोलायला सुरुवात केली. राधिकाच्या आश्र्वासक स्वरामुळे असेल किंवा काकूंना बरेच दिवसांपासून कोणाजवळ तरी मन मोकळं करायचं होतं म्हणून असेल काकूंनी बोलायला सुरुवात केली "माझ्या लेकाच, विजयचं लग्न झालं तो दिवस आम्हां सर्वांसाठी आनंदाचा दिवस होता त्यानंतर मात्र सगळं बिनसतच गेलं. नवीन सून आमच्या घरात रमलीच नाही. तिची विजयशी जवळीक निर्माणच झाली नाही. जेमतेम वर्ष झालं आणि ती माहेरी निघून गेली. कधीही परत न येण्यासाठी! विजयनी एक दिवस सांगितलं की "तिनी आई-वडिलांच्या दवाबामुळेच माझ्याशी लग्न केलं होतं तिच दुसऱ्या कोणावर तरी प्रेम होतं. आणि ती त्याला विसरूच शकत नव्हती. मग मीच तिला तिच्या आईकडे सोडून आलो." विजयनीच घटस्फोटासाठी अर्ज केला होता. पण आजूबाजूची लोकं इतकं काही बोलायचे की मला टेन्शन यायचं. कोणीतरी म्हणालं की "वर्षभरात जर सून माहेरी गेली असेल तर सासूसासर्‍यांची कायदेशीर चौकशी होते. आम्ही साधी माणसं हे पोलिस घरी येणं वगैरे सहनच नाही होणार हो. काकूंचे डोळे भरून आले होते. आवंढा गिळून त्या बोलू लागल्या. राधिका उठून   त्यांच्या जवळ गेलीआणि तिने पाणी दिलं. राधिकाला काकूंच्या भीतीच कारण समजल होतं. पाणी पिऊन थोडं शांत झाल्यावर त्या पुन्हा बोलू लागल्या. "सगळ्या गडबडीत अनघासाठी म्हणजेच माझ्या लेकीसाठी स्थळ सांगून आलं. सगळं चांगलं आहे ह्याची खात्री करून आम्ही साखरपुड्याचं ठरवलं. साखरपुडा झाल्यावर चार दिवसांनी कौतुकानी त्यांनी अनघाला संध्याकाळच जेवायला बोलावलं. पण घरी आल्यावर तिनं जे सांगितलं ते ऐकून आम्हाला धक्काच बसला."त्यांच्या घरी म्हणे रोज दोन्ही भाऊ,वडिल सर्वजण संध्याकाळी दारू पितात. आणि एखाद्या वेटरसारखी आपल्या आईला, बायकोला, वहिनीला वागणूक देतात. ते सगळं बघून अनघा प्रचंड चिडली. आणि आम्हाला म्हणाली "त्या वातावरणात मी रहाणं शक्यच नाही". तिच खरं होतं पण मला मात्र हे सगळं सहनच होतं नव्हतं. अनघानी दुसऱ्या दिवशी फोन करून साखरपुडा मोडला.आणि पुन्हा एकदा आजुबाजुला कुजबुज सुरु झाली. काकूंना बोलताना धाप लागली होती. राधिकानी त्यांना खांद्यावर थोपटून "आता मला सांगा की ह्या दोन्ही प्रसंगात तुमची काय चुक आहे? किंवा तुमच्या मुलांचं तरी काही चुकलाय का? काकूंनी नकारार्थी मान हलवली. मग झालं तर! आता आज आपण इथेच थांबूया. मी प्रिया आणि अंकलना बोलावून घेते. राधिकानी बेल वाजवून त्या दोघांना बोलावून घेतलं. प्रिया आत आल्यावर राधिकानी काही औषधं लिहून दिली. आणि पुढच्या मंगळवारी काकूंनी एकटंच यायचय असं बजावलं. आणि "आॅंटी विचार फक्त विचार असतात ते सत्य नसतं तेव्हा विचारांना आणि आजुबाजुच्या लोकांना किती महत्त्व द्यायचं ते तुमचं तुम्हीच ठरवायचं आहे". अस हसत सांगितलं.
       त्यानंतरचा आठवडा काकू रिलॅक्स दिसत होत्या. मंगळवारी थोड्या लवकरच निघून प्रियाला सांगून काकू ठाण्याला ट्रेनमध्ये चढल्या. घाटकोपरला उतरून जिना चढून उतरल्यावर थोडस दमल्यासारख वाटल्याने त्या स्टेशन जवळच्या ज्युसवाल्याकडे टेकल्या. तिथे दोन छोट्या मुली खेळत होत्या. काकूंनी त्यांना पर्स मधून चाॅकलेट काढून दिली. ज्युसवाला खूष झाला म्हणाला "हमारी बेटियां हैं, जुड़वां हैं. उनकी मां नहीं है तो मैं यहां सम्हालता हूं।"काकू  दवाखान्यात पोचेपर्यंत त्या ज्युसवाल्याच्या विचारातच होत्या. गेल्यागेल्या राधिकानी त्यांना आंत बोलावलं आणि विचारलं "काय म्हणताय?" बरी आहे. पण सांगू का तुझ्या दवाखान्याजवळच्या ज्युसवाल्याच्या जुळ्या मुली इतक्या गोड आहेत पण बिच्यार्‍यांना आई नाही, तो कसा सांभाळत असेल काय माहित? आणि तुमच्या दवाखान्याखाली गजरे  विकणार्‍या आजींच काय वय असेल? ह्या वयांत काम करावं लागतंय बिच्यार्‍यांना! काकू इथे का आलो ते विसरून बोलत होत्या. राधिकाला कळलं होतं "काकूंनी स्वत:च निर्माण केलेल्या दु:खाची रेषा खरीखुरी दु:ख बघून लहान होऊ लागलीय. काकूंनी तिथलं मासिक वाचायला घेतलं होतं." एक मिनिट असं म्हणून राधिका बाहेर आली आणि तिन प्रियाला फोन लावला "प्रिया, पेशंट उपचारांना चांगला प्रतिसाद देतोय. तुझ मात्र कौतुक आहे. दुस-यांच्या जखमेवरची खपली काढण्याऐवजी तू हळुवार फुंकर घातलीस! सर्वांनीच असं जागरूकपणे घरात, आजूबाजूला वेगळं वागणा-या व्यक्तींकडे लक्ष दिलं तर हल्ली वाढलेल्या डिप्रेशनच्या केसेस मध्ये फरक पडेल." प्रियानी थॅन्क्स म्हणून फोन ठेवला.
        राधिकानी काचेतून काकूंकडे बघितलं. त्या मग्न होऊन वाचत होत्या आणि चेह-यावरचे भाव शांत होते. 






-ललिता छेडा

Thursday, November 8, 2018

जगणं झालं चांदणं



नवरात्र झाली की घराघरात दिवाळीची लगबग सुरू होते. 
      पण ह्यावेळी आमच्याकडे थोडा आराम होता.कारण दोनच वर्षांपूर्वी लग्न झालेल्या आमच्या लेकानी बायकोबरोबर दिवाळी म्हैसूरला करायची ठरवली होती.त्यामुळे ऐन दिवाळीत आम्ही दोघेच होतो.
      पार्ल्यातच सासर असलेल्या ‌लेकीकडे नणदेचा दिवाळसण होता.त्यामुळे " ह्या दिवाळीत मी खूप बिझी आहे तेव्हा तुम्हीच माझ्याकडे जमेल तेव्हा या".अस सांगून ती मोकळी झाली होती.ह्या पिढीच एक बरं आहे मनात येतं ते बोलून मोकळे होतात.
        " हे बघ,तू धावपळीत असशील तेव्हा आम्ही तुझ्याकडे जमेल तशी चक्कर  मारून जाऊ.तुम्ही मात्र सर्वजण  दिवाळीनंतरच्या रविवारी जेवायला या. तोपर्यंत दादा पण आला असेल"असं मी पण तिला कळवून टाकलं.
      ह्यांनी मला "आपण दोघेच आहोत तर उगीच फराळाचं नको करत बसू.नेवैद्यापुरतं विकत आणुया"अस सांगून खूष केलं होतं.लग्नानंतरची ही पहिलीच दिवाळी होती की मला फराळाचा घाट घालायचा नव्हता.
        आणि अचानक ह्यांच्या चुलत भावाचा कणकवलीहून फोन आला."दादा, तुम्ही दोघे दिवाळीत इथे येऊ शकाल का? आम्ही घरातल्या सगळ्यांनी दिवाळीत गोव्याला हिच्या माहेरी जायचं ठरवलय तशी गाडी देखील ठरवलीयआणि बाबांना सांभाळायला ठेवलेल्या सामंताना खूप ताप आल्यामुळें हाॅस्पिटलमध्ये  ठेवलंय! तुम्ही आलात तर आम्हाला जाता येईल.जरा कळवाल का?
      वडिलांच्या मृत्यूनंतर हे कणकवलीत काकांकडेच लहानाचे मोठे झाले असल्यामुळे ते नाही म्हणणं शक्यच नव्हतं.आणि काकांवर त्यांच खूप प्रेम होत.
      "तू  येणार का? ह्यांनी विचारलं.मला जायची इच्छा कमी होती त्यामुळे मी हळूच विचारलं"नाही आले तर चालेल का?
      "अगदी चालेल,आपला लेक नाहीय त्यामुळे ड्रायव्हर, गाडी आहेच ती घेऊन जातो!बरोबर सोबतीला बर्व्याला नेतो.वहिनी गेल्यापासून फार एकटा झालाय.बर्वे ह्यांचा अगदी जवळचा मित्र! सहा महिन्यांपूर्वी त्यांची बायको गेल्यामुळे ते फार एकटे झाले होते.आणि एकुलता एक मुलगा अमेरिकेत रहात असल्यामुळे लादलेल्या एकटेपणाशी जुळवून घेत होते.त्यांना दिवाळीच्या दिवसात गावाला न्यायची ह्यांची कल्पना मला फार आवडली.
      मला पण आयुष्यात पहिल्यांदाच अशी  मनसोक्त, मनाप्रमाणे दिवाळी साजरी करता येणार होती.
     "मी नक्की येतोय.तुम्ही निघा" असा भावाला फोन करून हे धनत्रयोदशीच्या दिवशी सकाळीच निघाले.बर्वेकाकांचा उत्साह, आनंद डोळ्यात मावत नव्हता.
     भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी येतोय असं म्हणून ती दोघं निघाली आणि मी लगेच नंदीनीला फोन लावला.
     नंदिनी,माझी सख्खी मामेबहीण! व्यवसायाने आयुर्वेदिक डॉक्टर असलेल्या नंदिनीचा अंधेरीला दवाखाना होता.दुर्दैवानी तरूणपणीच विधवा झालेली ती एकटीच रहात होती.व्यवसाय, त्याबद्दलचा अभ्यास, लिखाण ह्यात तिनी स्वत:ला छान व्यग्र ठेवलं होतं.
         नंदिनी माझ्या बहिणीपेक्षा मैत्रिण ज्यास्त होती.त्यामुळे माझा फोन बघितल्यावर तिने"ऐन दिवाळीत फोन?स्वच्छता,फराळ,येणजाण, मुलं ह्यात बुडालेल्या बाईसाहेबांना रिकामटेकड्या लोकांची कशी आठवण झाली?
     ए, चेष्टा पूरे! मी हसून बोलले खरी पण तिच खरंच होतं.लग्न झाल्यापासून मी संसारात सतत गुरफटलेलीच होते.लग्न झाल तेव्हा सासुबाई,एक घटस्फोटीत नणंद, दोन उपवर नणंदा! इतक्याजणांच कुटुंब होतं.दोन्ही नणंदांची लग्नं होईपर्यंत आमचापण संसार वाढला.मुलांच करण्यात आणि सगळ्या कुटुंबाचे व्यवहार सांभाळता सांभाळता पस्तिस वर्ष कधी गेली कळलीच नाहीत.
         "हे बघ नंदिनी,ह्या वर्षी पहिल्यांदाच मी दिवाळीत एकटीच आहे.तेव्हा पुढचे चार दिवस तू माझ्या बरोबर असणार आहेस! मला हे मिळालेलं स्वातंत्र्य तुझ्या सोबतीने अविस्मरणीय करायचंय."मी उत्साहाने बोलत होते पण नंदिनी काहीच बोलत नव्हती."काय ग,तू आहेस ना इथे की काही कार्यक्रम आहे तुझा! मी थोडंसं चाचरत विचारलं.
          "नाही माझा काही कार्यक्रम नाही.पण थोडंसं भरून आलं. आज ह्यांना जाऊन इतकी वर्ष झाली पण तीन भाऊ,दिर, नणंदा कोणालाही मी दिवाळीत एकटी  आहे ह्याची जाणीव सुध्दा नसते.पुण्यात रहाणारे दोन्ही भाऊ पाळीपाळीने भाऊबीजेला येऊन जातात.तू बोलल्यावर पहिलं मनात आलं की पुण्याला कळवून टाकायचं ह्यावर्षी नका‌ येऊ मी बिझी आहे."नंदिनी बोलत होती आणि मला वाटल की बरं झालं मी हिला बोलावलं.
     बोल काय करायचं? नंदिनी
      "मला केंव्हापासून दिवाळी पहाटचा कार्यक्रम एन्जाॅय करायचाय, ह्यांना गाण्याची आवड नाही त्यामुळे खूप इच्छा असूनही कधी जमलच नाही!मी
     डन्! मी पार्ल्यातलीच तिकीटं काढते आणि गाडी घेऊन तुला घ्यायला येते."उत्तम प्लॅनिंग नंदिनीचा स्वभावच होता.""आता ऐक, कार्यक्रमानंतर मी तुला मस्त हाॅटेलमध्ये जेवण देणार आणि आपण माझ्या घरी रहाणार! दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्या गाडीने आपण दोघी माझ्या आईकडे जाऊया.
      "मामी कडे,चौलला? मी आनंदाने अक्षरशः किचाळले.अग हे मला कसं सुचलं नाही?
      पण पाडव्याच्या रात्री मात्र परत यायचं बर! कारण भाऊबीजेला मी वहिनीला बोलावलय.दादाच्या आजारपणामुळे गेली चार पाच वर्ष ती कुठेच गेली नाहीय. मी ह्यावेळी तिच्या सुनेला सांगितलय एक दिवस सांभाळ दादाला, वहिनीला मी संध्याकाळपर्यंत पाठवेन.
     लग्नाच्या आधी आम्ही दिवाळीला नेहमी चौलला आजीकडेच जायचो.जाम धमाल यायची.नंदिनी तीन भावांची एकुलती एक बहिण!आता एक भाऊ अमेरिकेत आणि दोन पुण्यात रहातात.मामी एकटीच चौलला रहात होती.
   दिवाळी पहाट, मस्त जेवण, गप्पा दिवस कधी संपला कळलच नाही.दुसर्‍या दिवशी  पहाटे उठून आम्ही सकाळी दहा पर्यंत चौलला पोचलो.
    आम्हाला दोघींना बघून मामीच्या डोळ्यातून अक्षरशः आनंदाचे अश्रू आले.तिला काय करू नि काय नको कळतच नव्हतं. मी पण मामीची लाडकी होते त्यामुळे भाकरतुकडा ओवाळताना तिच्या डोळ्यातल आनंदाच चांदणे अंगणभर पसरलं.
    मनात आलं अचानक आलेल्या माझ्या जगण्यातला एकटेपणा घालवताना मी  माझ्या जवळच्या कितीजणांना  सहवासातून आनंद देऊ शकतेय.
     दुपारच मोदकांच जेवण झाल्यावर मस्त ताणून दिली.
    रात्री नंदिनीनी समुद्रावर जायचं ठरवलं कारण दुसऱ्या दिवशी आम्ही आलो म्हणून मामींनी गावातल्या बायकांच भजन ठेवले होते.
    समुद्रकिनार्‍यावर चालतच जायचं ठरल्यावर मामीच सुरू झालं"ज्यास्त लांब जाऊ नका? अंधार आहे ना!
      आई,आता आम्ही म्हातार्‍या झालो नको काळजी करू."नंदिनीनी हसून सांगितलं.
    किनाऱ्याच्या दिशेनी चालायला लागल्यावर नंदिनी म्हणाली" समुद्र खर म्हणजे एकट्याने अनुभवायची जागा आहे.लाटांच किनार्‍यावर येऊन परतणं, आणि परतताना आपल्या पायाखालची वाळू सरकणं, प्रत्येक लाटेचा स्वतंत्र आवाज,स्वतंत्र रुप तरीही सगळ्या एकत्र किनार्‍यावर भेटून परतणार! ती बोलत होती पण मी मात्र ते काळं निळं आभाळ,त्यात लूकलूकणार्‍या चांदण्या बघून हरखून गेले होते.मनात आलं"प्रत्येकाला दिसणारं,जाणवणारं आभाळ वेगळ असू शकतं.मला तरी आत्ता ते एकटं वाटत होतं.
     
      न बोलता हवेतला गारवा, आजूबाजूचं चैतन्य अनुभवतच आम्ही समुद्रावर पोचलो.दिवाळीमुळे बीचवर तुरळक गर्दी होती.समुद्राची गाज ऐकत वाळूत बसलो. समोर क्षितीजापर्यंत पसरलेल्या समुद्राकडे बघत असताना इतकं शांत वाटतं होतं आणि आम्ही दोघी काही न बोलता खूप काही बोलत होतो.
       मामी कडून निघताना"अग बायांनो, तीन दिवसांत तुम्ही मला पुढच्या तीनशे दिवसांच्या आठवणी दिल्यात!ह्या मामीच्या शब्दानी गहिवरून आलं.मी पण आयुष्यभराच्या आठवणी घेऊन परतत होते.
     भाऊबीजेचा दिवस वहिनीसाठी होता.जाताना ती म्हणाली"अग,आजारी असले तरी हे आहेत, सुनमुलगा आहेत, नातवंड आहेत पण इतक्या भरलेल्या घरांत मला एकटं वाटायचं पण आजच्या दिवसाची उर्जा मला पुन्हा नवी उमेद देऊन गेली".
          रात्री एकटी खिडकीत उभी असताना सहज वरती आभाळाकडे बघितलं आणि जाणवलं"अरे, माझ्या खिडकीतून दिसणारं माझं आभाळ चांदण्यानी गच्च भरलेलं आहे.



ललिता छेडा

Thursday, November 1, 2018

खंत


नाशिकच्या आमच्या पंधरा बंगल्यांच्या काॅलनीत आमचा बंगला गेटसमोर असल्यामुळे काॅलनीच्या मध्यावर आहे. आमच्या बंगल्याच्या डावीकडे वैद्यांचा आणि उजवीकडे सावंतांचा असे बंगले आहेत.आम्ही तीनही बिर्‍हाडं सर्वात जुनी! बाकीच्या बंगल्यांची खरेदी विक्री,भाड्यानी देणं असं सुरूच असतं.आमच्या तिघांच्याही सासर्‍यांनी बांधलेले हे बंगले आहेत.त्यामुळे आमच्या तिन्ही कुटुंबात एक चांगल नातं,जिव्हाळा आहे.आणि तसे आम्हा तिघींचे संसार वर्षाभरात मागेपुढेच सुरू झाले आहेत.
सावंत काका काकू,त्यांचे दोन मुलगे आणि एक मुलगी अस मोठं कुटुंब आहे.काकू खूपच साध्या, भाबड्या! सावंतांकडे सर्वचजण खरं म्हणजे उच्चशिक्षित तरीही खूप साधे.घरातल वातावरण पण आनंदी!आतातर दोन सुना आल्या आहेत.मोठी घरातच शिकवण्या घेतेय.आणि धाकटी नोकरी करणारी आहे.मोठ्या लेकीच लग्न होऊन ती मुंबईत रहातेय. काकानी निवृत्त झाल्यावर स्वत:ला सोसायटीच्या, घरातल्या कामात व्यस्त करून घेतलं आहे.
त्याच्या अगदी उलट म्हणजे वैद्यवहिनी, थोड्याशा शिष्ट, स्वत:ला शिस्तशीर समजणार्‍या! त्यांच्या अशा स्वभावामुळे थोडेसे अबोल असलेले वैद्यकाका आणि थोडासा उशिरा झालेला त्यांचा एकुलता एक मुलगा उन्मेष. त्याच्या आईचा इतका लाडका की आमची मुलं त्याला त्याच्या मागे मम्मा'ज बाॅय म्हणून चिडवतात. 
लग्नाच्या वेळी शिक्षीका असलेल्या वैद्यवहिनी सध्या शाळेच्या प्रिन्सिपाॅल आहेत.स्वत:च्या ह्या कर्तृत्वाचा त्यांना फार अभिमान आहे. खर म्हणजे वैद्यकाकांचे वडिल जवळच असलेल्या मंदिरात पुजारी होते.त्यांच देवळाजवळ पुजेसाठी लागणार्‍या वस्तू,खेळणी अस दुकान आहे.आतासुध्दा वैद्यकाका तेच सांभाळतात.आणि हा बंगला सावंत आणि माझे सासरे ह्यांनी थोडी मदत,थोडा मैत्रीतला आग्रह करून घ्यायला लावला होता.वैद्यकाकांना ह्याची पूर्ण जाणीव आहे. पण वहिनींना मात्र ही आठवण,हा उल्लेख आवडत नाही.
माझे सासरे त्याकाळचे नामांकित वैद्य होते. आमच्या घरात तोच वारसा पुढे चालत आहे.माझ्या यजमानांचा जवळच दवाखाना आहे.आणि आता मुलगा,सुन स्वत:च हाॅस्पिटल काढण्याच्या तयारीत आहेत.मुलगी प्रिया मात्र मिडिया मध्ये आहे. आणि महत्वाचे म्हणजे ती वैद्यवहिनींची लाडकी आहे.
अश्या ह्या आमच्या तिन्हीं कुटुंबातील सहा मुलांचा एक छानसा गृप आहे.सण,उत्सव एकत्र साजरे करण्यात ह्या गृपचा मोठा हात असतो.
हल्ली मात्र वैद्यवहिनी थोड्याशा काळजीत होत्या.त्यांच्या देखण्या,काॅमप्युटर इंजिनिअर असलेल्या उन्मेषच त्यांना लग्न करायचं होतं.नुकतीच त्याला नाशिकमध्येच नोकरी पण मिळाली होती.
वहिनींच्या नशीबाने त्यांच्याच ओळखीने आलेल्या पहिल्याच स्थळाला दोन्ही कडून होकार झाला!आणि खरं सांगायचं तर रश्मी होतीच तशी! एखाद्या स्वच्छ पाण्याच्या झर्‍यासारखी खळखळून वाहणारी! आमच्या मुलांनी उन्मेषला घरी बोलावून विचारलं सुध्दा"तुला‌ लग्न करायचं आहे.तेव्हा आई म्हणते म्हणून होकार नको देऊ."पण रश्मी प्रेमात पडावी अशीच होती.आणि उन्मेष अक्षरशः तिच्या प्रेमातच पडला होता.
फॅशन डिझायनर असलेली रश्मी देखील उन्मेषवर भाळली आहे ते जाणवत होतं.आम्हा सर्वांना मात्र ह्या परस्पर विरोधी स्वभावाच्या दोघी सासू सून कसं निभवतील अशी काळजी वाटत होती.पण तिला निवडलं वहिनींनीच होतं!तेव्हा त्या सांभाळून घेतील अशी आशाही होती.माझ्या लेकीनं तिला वहिनींच्या शिस्तीबद्दल बोलताबोलता कल्पनाही दिली होती!
लग्नाच्या पहिल्या रात्री रश्मीने उन्मेषला सरप्राइज गिफ्ट द्यायचे म्हणून नाशिकमधल्या ताज हॉटेलचे बुकिंग केले होते.आणि वहिनींनी आमच्या घरातली बेडरूम सजवली होती.गृहप्रवेश झाल्यावर हिने उन्मेषच्या हातात ती बुकिंगची रिसीट ठेवली आणि पहिल्याच दिवशी रिसीटवरची रक्कम बघून वहिनींना माघार घ्यावी लागली होती पण त्यांचा संताप सर्वांनाच जाणवत होता.मुल त्यांना सोडायला गेली पण ठिणगी पडल्याचे जाणवत होते.
त्यानंतर रश्मीची मुंबईला फेरी झाली.आणि पंधराच दिवसांनी रश्मी ओट्याजवळ मागचं आवरत होती आणि तिथेच काम करणारर्‍या बाईला तिने सहज उरलेला आमटीभात खायला दिला.बाई सहज म्हणाली"पहिल्यांदाच मी तुमच्याकडे जेवतेय"रश्मी "अग माझी आईतर आमच्या मावशींना रोज तिच्याबरोबर जेवायला देते!म्हणत होती आणि वहिनीनीं ते ऐकलं"हे बघ आम्ही शिळं खातो.अन्नाच हे असलं वाटप इथे नाही चालणार." बाईनी कसाबसा तो भात खाल्ला.आणि त्या पळाल्या.
संतापाने रश्मी आमच्याकडे आली.तिला समजावलं पण कळत होतं हे काही बरोबर होत नाहीये.
दुसऱ्याच दिवशी वहिनींकडे देवळाच्या विश्र्वस्तांची मिटींग होती.वर्षातुन अशा दोन-तीन मिटींग त्यांच्या घरी नेहमीच होत असतं.ती एक पद्धत होती.आम्हा दोघांना वहिनी मिटींगला आवर्जून बोलावत.सावंतकाकू इतक्या भाबड्या की मिटींग आहे असं कळलं की आवर्जून मदतीला यायच्या.आणि सगळी तयारी झाली की घरी जायच्या.त्यांना वहिनींनी कधीच थांबवलं नाही.
ह्यावेळी लग्नानंतरची पहिलीच मिटींग होती म्हणून बेत जरा खास होता.सर्व तयारी झाल्यावर काकू आवरून निघाल्या.आणि रश्मी म्हणाली "थांबाना काकू."हे बघ,मिटींगला त्या कधी थांबत नाहीत तू ह्यात पडू नकोस.जाऊदे त्यांना"वहिनी म्हणाल्या.आणि आदल्या दिवशीचा अपमान न विसरलेली रश्मी "चला काकू मी पण येते तुमच्या बरोबर असं म्हणून निघून गेली.सगळ इतक पटकन घडलं की कोणाला काही बोलताच आलं नाही.कारण बाहेर मंडळी यायला सुरुवात झाली होती.आणि वहिनींना आलेल्या सर्वाना नवीन सुनेला जरा बरं नाहीये म्हणून झोपलेय असं खोटं बोलाव लागलं.
संध्याकाळी उन्मेष तिला घ्यायला सावंतांकडे गेला पण इतके दिवस काका काकूनी सांभाळलेले संबंध मुलांना कळल्यामुळे चांगलेच ताणले गेले होते.
उन्मेषनी कसं आणि काय समजावलं कळलं नाही पण घरात शांतता होती.
वैद्यकाका मात्र ह्याप्रकारानी खूप अस्वस्थ झाले होते.त्यांनी ह्यांना "डाॅक्टरसाहेब, तुम्ही जरा उन्मेषशी बोला" अशीविनंती केली.
ह्यांनी पण गांभीर्य ओळखून उन्मेषला बोलावलं,थोड समजावलं.तिला घेऊन बाहेर फिरायला जात जा.त्यावर तो म्हणाला"काका आम्ही दर रविवारी बाहेर जेवायला जातो की!
"अरे वेड्या तू आईलाही घेऊन जातोस तिला एकटीला नेत जा, अधूनमधून, अजून तुम्ही हनीमूनला पण गेला नाहीत"हे अगदी आमच्या मनातलं बोलत होते.
जाणार आहे दिवाळी नंतर! मी रजा टाकलीय."उन्मेष.
ठीक आहे.मी काय बोललो ते लक्षात ठेव आणि जरा घरातल्या सर्वांना सांभाळून घ्यायची जबाबदारी तुझी आहे हे ध्यानात ठेव.तुझे बाबा सर्व गोष्टींमुळे अस्वस्थ झाले आहेत.ह्यांनी विषय संपवला होता.
नंतर सणवार, बाहेर फिरायला जाणं,ह्यात बरे दिवस गेले.
एक दिवस जेवताना रश्मीनी वैद्यकाकांना अगदी सहज विचारलं"मी तुमच्या दुकानात माझे डिझायनर ड्रेसेस ठेवू? आनंदाने वैद्यकाका म्हणाले"अग, नक्की ठेव मी पण आता कंटाळलो आहे दुकान चालवून! मी माझा माल सगळा संपवतो तोपर्यंत तू तयारीला लाग.
वहिनींसाठी त्यांना विचारात न घेता इतकी मोठी गोष्ट ठरतेय हे सहनच झालं नाही.
"हे पहा, मंदिराजवळ आपली सुन कपडे विकतेय हे मला अजिबात चालणार नाही".वहिनींनी रश्मीला जोरदार विरोध केला होता."येवढीच हौस असेल तर घरात तुझा व्यवसाय सुरू कर."
"शक्य नाही, मी सतत तुमच्या बरोबर घरात बसणं शक्यच नाही."रश्मीनी थोडंसं उगीचच ताणलं होतं अस आम्हा सर्वांनाच वाटलं.तिनी जेव्हा हे सगळं सांगितलं तेव्हा आम्ही त्या म्हणताहेत तर 'घरात सुरू तर कर' असं सांगून पाहिलं.
"पण मला आता सारख एकट्यानी लढायचा कंटाळा आलाय"असं म्हणून रश्मीनी माझ बोलणच संपवलं.पण मनात आलं "की किती पटकन हिने हार मानली! थोड सहन करायला हवं का?परत वाटलं का सहन करायचं? मनातून मात्र मी तिच्या बाजूचीच होते.
उन्मेष पण थोडासा आईच्या बाजूने होता.पुढचे आठ-दहा दिवस त्यांचं घर धुमसत होत.ते जाणवत होतं.
अचानक एक दिवस तिचे आई-वडील येऊन तिला मुंबईला घेऊन गेले.काय झालं कळलंच नाही.जाताना आम्हाला रस्त्यावरूनच ती बाय करून गेली.
उन्मेष आम्हाला टाळतोय हे कळत होतं
वैद्यकाकानी मात्र हे सगळं खूप मनाला लावून घेतलं होतं.दोन महिन्यांत ते हार्ट अॅटॅकनी गेले.
ते गेल्याचं कळल्यावर रश्मी आई-वडिलांबरोबर भेटायला आली. मी नेमकी तिथेच होते.उन्मेषही घरात होता.आल्यावर सगळेजण जुजबी बोलले.रश्मीची आई वहिनींजवळ बसून सांत्वनाचे दोन शब्द बोलली. वहिनीना रडू आवरलं नाही. मी उन्मेषला "रश्मीला थांब म्हण"अशा खूणा करत होते.तो देखील 'हो' अशी मान हलवत होता.पण दोनच दिवसांपूर्वी वडील गेल्यामुळे असेल किंवा तणावामुळे असेल तो नाही बोलू शकला. तासाभरात ती तिघही निघाली.रश्मीच्या बाबांनी हात जोडून निरोप घेतला.
मी तिथेच भेटल्यामुळे ती मंडळी सावंतांकडे गेली.हे नंतर मला सावंत काकूंकडून कळलं.काकूंनी त्यांना आग्रहानी जेवायला घालूनच पाठवलं होतं.
"पोरगी राह्यली असती हो थोडं 'रहा' म्हटलं असतं तर!" काकूंनी डोळ्याला पदर लावला.
तिच्या आई-वडिलांना काय झालं होतं जरा बोलायला"काकूंचा मुलगा थोडासा हळवा होऊन म्हणाला. काकांच निधन,रश्मीच माहेरी निघून जाणं आम्ही सगळेच खूप अपसेट झालो होतो.कोणी कोणाला काय समजवायच कळत नव्हतं.रश्मीच जाणं हूरहूर लावून गेलं होतं.
' जर प्रत्येकानी एक पाऊल मागेपुढे घेतल असतं तर हा घटस्फोट नक्की टळला असता'ही रूखरूख मात्र कायम सर्वांच्याच मनात राह्यली.


ललिता छेडा.