Thursday, December 20, 2018

चौकट

आपल्या बेडरूमच्या खिडकीतून सुमित्रा खाली तिच्याच साठाव्या वाढदिवसाच्या समारंभाची तयारी बघत होती.सर्वांची चाललेली लगबग बघून तिला वाटलं तिचे दोन्ही मुलगे,सूना,एकूलती एक लेक कोणीही गेल्या कित्येक वर्षांत  आई,कशी आहेस तू?'असं विचारलं नाहीय.आणि आज त्यांच्या बाबांच्या म्हणजेच सुमित्रेच्या यजमानांच्या परिचयातली, राजकारणातली मोठी मोठी मंडळी येणार आहेत म्हटल्यावर तिघही समारंभासाठी धावपळ करत होती. मेन्यू मधल्या ह्या पदार्थाची निवड माझी,ही आयडिया मला सूचली अशी क्रेडिट्स घ्यायला हवीत ना! सुमित्राला हसू आलं.ह्यांना माझा आवडता पदार्थ तरी माहिती आहे की नाही कुणास ठाऊक?
     सुमित्राला आठवलं चाळीस वर्षांपूर्वी महेश तिच्या आयुष्यात आला तेव्हा तो तिच्या बाबांच्या मित्राचा मुलगा येवढीच त्याची ओळख होती.गावाकडचा वडिलांचा दुधाचा धंदा मुंबईत सूरु करण्यासाठी म्हणून सुमित्रा रहात असलेल्या सायन स्टेशनजवळच्या  सोसायटीतून तो भाड्याची खोली शोधत होता.  नशीबानं त्याला तिच्या सोसायटीतच जागा मिळाली.
       वर्षभरात त्याने त्या एरियात ओळखी वाढवून धंध्यात छान जम बसवला.
      सुमित्रा तिच्या नकळत त्याच्या प्रेमात पडली आणि महेशला पण आपणआवडतोय हेही तिला कळलं होतं. एकुलत्या एक लेकीसाठी स्थळ म्हणून नांव ठेवायला काहीच जागाच नसल्यामुळे दोन्ही घरातल्यांच्या संम्मतीने त्यांच लग्न झालं.
    लग्नाच्या वेळी बी.ए.असलेल्या सुमित्राने बी.एड.करून म्युनिसीपाल्टीच्या शाळेत नोकरी धरली होती.तिला शिकवायला फार आवडायचं आणि त्यातपण अशा शाळेत शिकवायचं तिचं स्वप्नच होतं.आणि तिला पाहिजे ते सगळंच मिळत गेल्याने ती खुष होती.
     लग्नानंतरची दहा वर्ष तिन्ही मूलांचा जन्म, नोकरी,महेशचा व्यवसाय ह्यात कुठे गेली कळलंच नाही.जवळच रहाणार्‍या आईची सुमित्राला  खूप मदत होत होती.आणि धंध्यात जम बसेपर्यंत महेशला सुमित्राच्या पगाराची जोड होती.
     सामाजिक कार्याची प्रचंड आवड असलेला महेश व्यवसायाबरोबर आपल्या सार्वजनिक कामातही व्यस्त असायचा. राजकारणाची पण त्याला आवड होतीच त्यामुळे त्याची सामाजिक कामं तो एका पार्टीच्या माध्यमातून करु लागला होता.त्यामुळेच ते रहात असलेल्या विभागापासून थोडशा लांब असलेल्या जागेवरुन महेशला पार्टी कडून नगरसेवक म्हणून निवडणूकीचं तिकीट मिळालं.आणि त्यांच्या आयुष्याला एक वेगळंच वळण लागलं.
   ती निवडणूक जिंकल्यावर महेशने मागे वळून पाहिलेच नाही.त्या एरियात त्याचा बंगला,गाड्या असं साम्राज्य उभं राहिलं.हे सगळं मुलांना त्यांच्या न कळत्या वयात मिळाल्याने त्यांना 'कष्ट' शब्दाची ओळखच राहिली नाही.सुमित्रा तिच्या कडून मुलांवर चांगले संस्कार व्हावेत यासाठी प्रयत्न करायची पण तिच्या ह्या विचारानी मूलं तिच्यापासून दूरावत गेली.
       त्यानंतरच्या पंचवीस वर्षांत आपल्या स्वभावानी,धडपडीने महेशनी केन्द्रात मंत्रीपद मिळवलं होतं.आणि महेशभाईचा कधी ते 'भाईसाहेब' झाले सुमित्राला कळलंच नाही.त्याचा चुकीच्या मार्गाने येणारा पैसा ही तिला आवडत नव्हता. 
   महेश दिल्लीत गेल्यावर  मुंबईतल आॅफिस, सगळ्या अपाॅंटमेंटस् सांभाळायला सेक्रेटरी म्हणून कांचनला नेमलं गेलं.आणि सुमित्राच्या मनाविरुद्ध अनेक गोष्टी घडू लागल्या.मुंबईच्या कार्यालयासाठी नेमलेली कांचन कधी दिल्लीचं काम सांभाळायला तिकडे राहू लागली कळलंच नाही.
     विचारात हरवलेल्या सुमित्राला खाली बागेत  तिचा जावई  हांका मारुन बोलावत होता.त्याच्या आवाजाने ती भूतकाळातून बाहेर आली.
    खरं म्हणजे तिचा जावई जातीने गुजराती, पण अस्खलित मराठी बोलयचा! तिच्या मनात आलं  "हा कोण आहे माझा,पण ह्याला जेवढी मी कळते माझ्या मुलांना नाही कळत असं का होतं?
    पैसा म्हणावं तर आपल्या जावयाचे वडिल पार्टीचा आर्थिक आधार आहेत, संस्कार म्हणाव तर ह्याच्या घरातलं वातावरण इतकं जुन्या वळणाच आहे पण ह्याचे विचार मात्र अगदी वेगळे आहेत.
      तिला वाटलं पैसा आणि संस्कारा पलिकडे काही तरी असतं ते ह्याच्यात आहे.
         तिच्या अपेक्षेप्रमाणे तो वर आला आणि म्हणाला"आई,तुमचा वाढदिवस आणि तुम्ही अजून तयार पण नाही झालात?
      नाही रे असल्या वाढदिवसाची मला आवड ही नाही आणि असले शो  मला आवडतही नाहीत.पण मी जे ठरवलंय ते सर्वांना सांगायला हा समारंभ योग्य आहे म्हणून मी होकार दिला."सुमित्रा अवघडलेल्या स्वरात बोलली.
    "म्हणजे अजून तुमच्या डोक्यातून तो विचार गेला नाहीय? त्यानं विचारलं.
      ""अरे तो माझा निश्चय आहे, विचार नाही."सुमित्रा ठामपणे म्हणाली.तू बोलला नाहीस ना कोणाला?"
    "नाही"तो थोडा अस्वस्थ झाला होता."तुम्हाला प्राॅमिस केलय मग कसं बोलेन?
      "तू हो पूढे मी येते तयार होऊन! सुमित्रानी विषय संपवला होता.
       ती खाली गेली तोपर्यंत खूपशी मंडळी आलेली होती.दोन्ही सूनांनी तिच्या दोन्ही बाजूला येऊन तिची  छानशी एन्ट्री केली.सर्वांनी टाळ्या वाजवून तिचं स्वागत केलं.
    स्टेजवर आधीपासून भाईसाहेब, तिन्ही मूलं उभीच होती.ती आल्यावर फोटोचे फ्लॅश उडाले.सुवासिनींनी एकसष्ट दिव्यानी ओवाळलं.
    कार्यक्रमाचा सूत्रसंचालक तिचं कौतुक करत होता.तिची साधी राहणी, तिचं म्युनिसीपाल्टीच्या शाळेच पिन्सिपल असणं,तिच पी.एच् डी.पर्यंतच शिक्षण आणि शेवटी "साहेबांच्या मागे खंबीरपणे उभ्या असलेल्या वहिनींना मी त्यांच मनोगत सांगण्याची विनंती करतो असं म्हटलं आणि माईक सुमित्राच्या हातात दिला.
      सुमित्रा शांतपणे उभी‌ राहून बोलू लागली.
      "सर्वप्रथम इतका देखणा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मी माझ्या कुटुंबाचे आणि तुम्ही सर्वजण आलात त्याबद्दल सर्वांंचे मनापासून आभार मानते.
     साठावं वर्ष हे निवृत्तीच वय मानलं जातं. आणि नुकतीच मी शाळेच्या नोकरीतून निवृत्त झाले.तशीच आता मी घरातूनही निवृत्ती घेणार आहे.उद्यापासून मी माझ्या वडिलांच्या सायनच्या घरी रहायला जाणार आहे.त्यांच्यानंतर त्यांनी ते घर माझ्या नांवावर केले होते..तिथे मला आर्थिकदृष्ट्या मागास मुलांसाठी मोफत क्लासेस सुरू करायचे आहेत.तेव्हा आता मला भेटायला तुम्हा सर्वांना तिथं यावं लागेल.
      सुमित्राचा हा निर्णय खर म्हणजे सर्वांना अनपेक्षित होता.पण महेश पक्का राजकारणी त्यानं लगेच माईक हातात घेतला आणि म्हणाला"अशीच निवृत्ती मी राजकारणातून घेतली की आम्ही दोघांनी त्या घरी आनंदात रहायचं ठरवलंय!आमचे निर्णय नेहमीच एकत्र येऊन घेतलेले असतात. तेव्हा आपण आता सहभोजनाचा आनंद घेऊया.सर्वांनी टाळ्या वाजवल्या.
      सुमित्रा महेशकडे बघून हसली.
      कार्यक्रम संपण्याआधीच सुमित्रा तिथून निघून गेली.
      दुसऱ्या दिवशी सकाळी चहाच्या टेबलावर सगळेच जण तिची वाट बघत होते.
    तिला बॅग घेऊन आलेली बघून महेश रागानेच म्हणाला"असं घर सोडून जायची काही गरज नाही.घराची चौकट मोडून जाण्याने तुझं हसं मात्र करून घेशील.
     सुमित्रानी हातातली बॅग खाली ठेवली आणि म्हणाली"कोणती चौकट?घरात एकत्र राहून ह्या माझ्या मोठ्या मुलाला, सुनेला गेले महिनाभर मी माझी पुस्तके, सामान घेऊन जातेय हे कळलं नाही.ह्याना माझ्या प्रकाशित दहा पुस्तकांपैकी दोन पुस्तकांची नांव तरी माहीत आहेत असली तरी बस्! तुमचा विरोध असतानाही ह्याला वकील व्हायचं होतं म्हणून मी त्याच्या पाठीशी उभी राहिले.आणि आज हा तुमच्या केसेस मॅनेज करतोय!ह्याच्यासाठी मी घरात कोणत्या नात्यानं राहू?
   ही तुमची लाडकी लेक प्रेमात पडली हे तिने प्रथम कांचनला सांगितलं.कोणत्या नात्यानं? आणि तिचा नवरा ना माझ्या नात्याचा,रक्ताचा तो कांचनशी बोलत देखील नाही.कांचनमुळे आपल्या आईला होणारा त्रास हिला कळत नाही?
       हा धाकटा मुलगा तो तुमचा दुधाचा धंदा स्वत:च्या नांवावर करून घेतो.मला सांगत सुध्दा नाही.वेगळा रहायला जातो.मला विचारत देखील नाही, तर सरप्राईज च्या नावानं अचानक नवीन घराच्या वास्तुशांतीला घर दाखवतो.
       आणि ह्या सगळ्याला जबाबदार महेश, तुम्ही आहात!माझी जागा तुम्ही घराच्या चौकटीच्या आत ठरवलीत.त्यामुळे मुलांना पण माझी दखल घ्यावी असं वाटलं नाही अगदी चौकटीच्या आतसुध्दा.त्यातसुध्दा कांचन बरोबर तुम्ही राजरोसपणे सेक्रेटरी म्हणून दिल्लीत रहाता आणि ह्या घरातल्या कोणत्या चौकटीबद्दल बोलताय?
      वाढदिवस साजरा करून मन नाही जिंकतायेत!
   ‌ "मी तिथे एकटीच रहाणार आहे."सुमित्रा बोलत होती.मी‌ चौकट मोडली नाही तर मोठी केलीय! माझ्या ह्या कृतीने एकीला जरी स्वत:ची घुसमट संपवायला प्रेरणा मिळाली तरी मी घराबाहेर टाकलेलं हे पाऊल यशस्वी झालंअसं समजेन.
    मागे वळून न पाहण्याच्या निश्र्चयानी सुमित्रानी ताठ मानेने बॅग उचलली आणि घराची चौकट ओलांडली!!!
            ललिता छेडा

No comments:

Post a Comment