नाशिकच्या आमच्या पंधरा बंगल्यांच्या काॅलनीत आमचा बंगला गेटसमोर असल्यामुळे काॅलनीच्या मध्यावर आहे. आमच्या बंगल्याच्या डावीकडे वैद्यांचा आणि उजवीकडे सावंतांचा असे बंगले आहेत.आम्ही तीनही बिर्हाडं सर्वात जुनी! बाकीच्या बंगल्यांची खरेदी विक्री,भाड्यानी देणं असं सुरूच असतं.आमच्या तिघांच्याही सासर्यांनी बांधलेले हे बंगले आहेत.त्यामुळे आमच्या तिन्ही कुटुंबात एक चांगल नातं,जिव्हाळा आहे.आणि तसे आम्हा तिघींचे संसार वर्षाभरात मागेपुढेच सुरू झाले आहेत.
सावंत काका काकू,त्यांचे दोन मुलगे आणि एक मुलगी अस मोठं कुटुंब आहे.काकू खूपच साध्या, भाबड्या! सावंतांकडे सर्वचजण खरं म्हणजे उच्चशिक्षित तरीही खूप साधे.घरातल वातावरण पण आनंदी!आतातर दोन सुना आल्या आहेत.मोठी घरातच शिकवण्या घेतेय.आणि धाकटी नोकरी करणारी आहे.मोठ्या लेकीच लग्न होऊन ती मुंबईत रहातेय. काकानी निवृत्त झाल्यावर स्वत:ला सोसायटीच्या, घरातल्या कामात व्यस्त करून घेतलं आहे.
त्याच्या अगदी उलट म्हणजे वैद्यवहिनी, थोड्याशा शिष्ट, स्वत:ला शिस्तशीर समजणार्या! त्यांच्या अशा स्वभावामुळे थोडेसे अबोल असलेले वैद्यकाका आणि थोडासा उशिरा झालेला त्यांचा एकुलता एक मुलगा उन्मेष. त्याच्या आईचा इतका लाडका की आमची मुलं त्याला त्याच्या मागे मम्मा'ज बाॅय म्हणून चिडवतात.
लग्नाच्या वेळी शिक्षीका असलेल्या वैद्यवहिनी सध्या शाळेच्या प्रिन्सिपाॅल आहेत.स्वत:च्या ह्या कर्तृत्वाचा त्यांना फार अभिमान आहे. खर म्हणजे वैद्यकाकांचे वडिल जवळच असलेल्या मंदिरात पुजारी होते.त्यांच देवळाजवळ पुजेसाठी लागणार्या वस्तू,खेळणी अस दुकान आहे.आतासुध्दा वैद्यकाका तेच सांभाळतात.आणि हा बंगला सावंत आणि माझे सासरे ह्यांनी थोडी मदत,थोडा मैत्रीतला आग्रह करून घ्यायला लावला होता.वैद्यकाकांना ह्याची पूर्ण जाणीव आहे. पण वहिनींना मात्र ही आठवण,हा उल्लेख आवडत नाही.
माझे सासरे त्याकाळचे नामांकित वैद्य होते. आमच्या घरात तोच वारसा पुढे चालत आहे.माझ्या यजमानांचा जवळच दवाखाना आहे.आणि आता मुलगा,सुन स्वत:च हाॅस्पिटल काढण्याच्या तयारीत आहेत.मुलगी प्रिया मात्र मिडिया मध्ये आहे. आणि महत्वाचे म्हणजे ती वैद्यवहिनींची लाडकी आहे.
अश्या ह्या आमच्या तिन्हीं कुटुंबातील सहा मुलांचा एक छानसा गृप आहे.सण,उत्सव एकत्र साजरे करण्यात ह्या गृपचा मोठा हात असतो.
हल्ली मात्र वैद्यवहिनी थोड्याशा काळजीत होत्या.त्यांच्या देखण्या,काॅमप्युटर इंजिनिअर असलेल्या उन्मेषच त्यांना लग्न करायचं होतं.नुकतीच त्याला नाशिकमध्येच नोकरी पण मिळाली होती.
वहिनींच्या नशीबाने त्यांच्याच ओळखीने आलेल्या पहिल्याच स्थळाला दोन्ही कडून होकार झाला!आणि खरं सांगायचं तर रश्मी होतीच तशी! एखाद्या स्वच्छ पाण्याच्या झर्यासारखी खळखळून वाहणारी! आमच्या मुलांनी उन्मेषला घरी बोलावून विचारलं सुध्दा"तुला लग्न करायचं आहे.तेव्हा आई म्हणते म्हणून होकार नको देऊ."पण रश्मी प्रेमात पडावी अशीच होती.आणि उन्मेष अक्षरशः तिच्या प्रेमातच पडला होता.
फॅशन डिझायनर असलेली रश्मी देखील उन्मेषवर भाळली आहे ते जाणवत होतं.आम्हा सर्वांना मात्र ह्या परस्पर विरोधी स्वभावाच्या दोघी सासू सून कसं निभवतील अशी काळजी वाटत होती.पण तिला निवडलं वहिनींनीच होतं!तेव्हा त्या सांभाळून घेतील अशी आशाही होती.माझ्या लेकीनं तिला वहिनींच्या शिस्तीबद्दल बोलताबोलता कल्पनाही दिली होती!
लग्नाच्या पहिल्या रात्री रश्मीने उन्मेषला सरप्राइज गिफ्ट द्यायचे म्हणून नाशिकमधल्या ताज हॉटेलचे बुकिंग केले होते.आणि वहिनींनी आमच्या घरातली बेडरूम सजवली होती.गृहप्रवेश झाल्यावर हिने उन्मेषच्या हातात ती बुकिंगची रिसीट ठेवली आणि पहिल्याच दिवशी रिसीटवरची रक्कम बघून वहिनींना माघार घ्यावी लागली होती पण त्यांचा संताप सर्वांनाच जाणवत होता.मुल त्यांना सोडायला गेली पण ठिणगी पडल्याचे जाणवत होते.
त्यानंतर रश्मीची मुंबईला फेरी झाली.आणि पंधराच दिवसांनी रश्मी ओट्याजवळ मागचं आवरत होती आणि तिथेच काम करणारर्या बाईला तिने सहज उरलेला आमटीभात खायला दिला.बाई सहज म्हणाली"पहिल्यांदाच मी तुमच्याकडे जेवतेय"रश्मी "अग माझी आईतर आमच्या मावशींना रोज तिच्याबरोबर जेवायला देते!म्हणत होती आणि वहिनीनीं ते ऐकलं"हे बघ आम्ही शिळं खातो.अन्नाच हे असलं वाटप इथे नाही चालणार." बाईनी कसाबसा तो भात खाल्ला.आणि त्या पळाल्या.
संतापाने रश्मी आमच्याकडे आली.तिला समजावलं पण कळत होतं हे काही बरोबर होत नाहीये.
दुसऱ्याच दिवशी वहिनींकडे देवळाच्या विश्र्वस्तांची मिटींग होती.वर्षातुन अशा दोन-तीन मिटींग त्यांच्या घरी नेहमीच होत असतं.ती एक पद्धत होती.आम्हा दोघांना वहिनी मिटींगला आवर्जून बोलावत.सावंतकाकू इतक्या भाबड्या की मिटींग आहे असं कळलं की आवर्जून मदतीला यायच्या.आणि सगळी तयारी झाली की घरी जायच्या.त्यांना वहिनींनी कधीच थांबवलं नाही.
ह्यावेळी लग्नानंतरची पहिलीच मिटींग होती म्हणून बेत जरा खास होता.सर्व तयारी झाल्यावर काकू आवरून निघाल्या.आणि रश्मी म्हणाली "थांबाना काकू."हे बघ,मिटींगला त्या कधी थांबत नाहीत तू ह्यात पडू नकोस.जाऊदे त्यांना"वहिनी म्हणाल्या.आणि आदल्या दिवशीचा अपमान न विसरलेली रश्मी "चला काकू मी पण येते तुमच्या बरोबर असं म्हणून निघून गेली.सगळ इतक पटकन घडलं की कोणाला काही बोलताच आलं नाही.कारण बाहेर मंडळी यायला सुरुवात झाली होती.आणि वहिनींना आलेल्या सर्वाना नवीन सुनेला जरा बरं नाहीये म्हणून झोपलेय असं खोटं बोलाव लागलं.
संध्याकाळी उन्मेष तिला घ्यायला सावंतांकडे गेला पण इतके दिवस काका काकूनी सांभाळलेले संबंध मुलांना कळल्यामुळे चांगलेच ताणले गेले होते.
उन्मेषनी कसं आणि काय समजावलं कळलं नाही पण घरात शांतता होती.
वैद्यकाका मात्र ह्याप्रकारानी खूप अस्वस्थ झाले होते.त्यांनी ह्यांना "डाॅक्टरसाहेब, तुम्ही जरा उन्मेषशी बोला" अशीविनंती केली.
ह्यांनी पण गांभीर्य ओळखून उन्मेषला बोलावलं,थोड समजावलं.तिला घेऊन बाहेर फिरायला जात जा.त्यावर तो म्हणाला"काका आम्ही दर रविवारी बाहेर जेवायला जातो की!
"अरे वेड्या तू आईलाही घेऊन जातोस तिला एकटीला नेत जा, अधूनमधून, अजून तुम्ही हनीमूनला पण गेला नाहीत"हे अगदी आमच्या मनातलं बोलत होते.
जाणार आहे दिवाळी नंतर! मी रजा टाकलीय."उन्मेष.
ठीक आहे.मी काय बोललो ते लक्षात ठेव आणि जरा घरातल्या सर्वांना सांभाळून घ्यायची जबाबदारी तुझी आहे हे ध्यानात ठेव.तुझे बाबा सर्व गोष्टींमुळे अस्वस्थ झाले आहेत.ह्यांनी विषय संपवला होता.
नंतर सणवार, बाहेर फिरायला जाणं,ह्यात बरे दिवस गेले.
एक दिवस जेवताना रश्मीनी वैद्यकाकांना अगदी सहज विचारलं"मी तुमच्या दुकानात माझे डिझायनर ड्रेसेस ठेवू? आनंदाने वैद्यकाका म्हणाले"अग, नक्की ठेव मी पण आता कंटाळलो आहे दुकान चालवून! मी माझा माल सगळा संपवतो तोपर्यंत तू तयारीला लाग.
वहिनींसाठी त्यांना विचारात न घेता इतकी मोठी गोष्ट ठरतेय हे सहनच झालं नाही.
"हे पहा, मंदिराजवळ आपली सुन कपडे विकतेय हे मला अजिबात चालणार नाही".वहिनींनी रश्मीला जोरदार विरोध केला होता."येवढीच हौस असेल तर घरात तुझा व्यवसाय सुरू कर."
"शक्य नाही, मी सतत तुमच्या बरोबर घरात बसणं शक्यच नाही."रश्मीनी थोडंसं उगीचच ताणलं होतं अस आम्हा सर्वांनाच वाटलं.तिनी जेव्हा हे सगळं सांगितलं तेव्हा आम्ही त्या म्हणताहेत तर 'घरात सुरू तर कर' असं सांगून पाहिलं.
"पण मला आता सारख एकट्यानी लढायचा कंटाळा आलाय"असं म्हणून रश्मीनी माझ बोलणच संपवलं.पण मनात आलं "की किती पटकन हिने हार मानली! थोड सहन करायला हवं का?परत वाटलं का सहन करायचं? मनातून मात्र मी तिच्या बाजूचीच होते.
उन्मेष पण थोडासा आईच्या बाजूने होता.पुढचे आठ-दहा दिवस त्यांचं घर धुमसत होत.ते जाणवत होतं.
अचानक एक दिवस तिचे आई-वडील येऊन तिला मुंबईला घेऊन गेले.काय झालं कळलंच नाही.जाताना आम्हाला रस्त्यावरूनच ती बाय करून गेली.
उन्मेष आम्हाला टाळतोय हे कळत होतं
वैद्यकाकानी मात्र हे सगळं खूप मनाला लावून घेतलं होतं.दोन महिन्यांत ते हार्ट अॅटॅकनी गेले.
ते गेल्याचं कळल्यावर रश्मी आई-वडिलांबरोबर भेटायला आली. मी नेमकी तिथेच होते.उन्मेषही घरात होता.आल्यावर सगळेजण जुजबी बोलले.रश्मीची आई वहिनींजवळ बसून सांत्वनाचे दोन शब्द बोलली. वहिनीना रडू आवरलं नाही. मी उन्मेषला "रश्मीला थांब म्हण"अशा खूणा करत होते.तो देखील 'हो' अशी मान हलवत होता.पण दोनच दिवसांपूर्वी वडील गेल्यामुळे असेल किंवा तणावामुळे असेल तो नाही बोलू शकला. तासाभरात ती तिघही निघाली.रश्मीच्या बाबांनी हात जोडून निरोप घेतला.
मी तिथेच भेटल्यामुळे ती मंडळी सावंतांकडे गेली.हे नंतर मला सावंत काकूंकडून कळलं.काकूंनी त्यांना आग्रहानी जेवायला घालूनच पाठवलं होतं.
"पोरगी राह्यली असती हो थोडं 'रहा' म्हटलं असतं तर!" काकूंनी डोळ्याला पदर लावला.
तिच्या आई-वडिलांना काय झालं होतं जरा बोलायला"काकूंचा मुलगा थोडासा हळवा होऊन म्हणाला. काकांच निधन,रश्मीच माहेरी निघून जाणं आम्ही सगळेच खूप अपसेट झालो होतो.कोणी कोणाला काय समजवायच कळत नव्हतं.रश्मीच जाणं हूरहूर लावून गेलं होतं.
' जर प्रत्येकानी एक पाऊल मागेपुढे घेतल असतं तर हा घटस्फोट नक्की टळला असता'ही रूखरूख मात्र कायम सर्वांच्याच मनात राह्यली.
ललिता छेडा.

No comments:
Post a Comment