Thursday, August 30, 2018

आभाळ

आभाळ

अपेक्षित असलेला स्वप्नाचा फोन आला आणि अमृतानी पुण्याला जायची तयारी सुरू केली.उद्याच निघायचं होतं आणि जवळ जवळ आठ दिवस तरी पुण्यात राहायलाच हवं होतं त्यामुळे घरी सासूबाई असल्यातरी तिला घरातलं आवरूनच निघायला हवं होतं.अमृता आणि स्वप्ना दोघींचं माहेर पुण्यात, एकाच गल्लीतल्या बंगल्यांच्या काॅलनीतल!आवरता आवरता स्वप्नालीच्या आठवणीनं अमृताला हसू आलं.आता उद्याचा मुंबई पुणे हायवे वरचा प्रवास मजेत होणार होता. मीडीयात काम करणारी, लहानपणापासूनच बंडखोर तरीही मनमोकळ्या स्वभावाची,कार ड्रायव्हींगची प्रचंड आवड असणारी स्वप्ना!आणि तिची मोठी बहीण सोनाली तिच्या अगदी विरुद्ध स्वभावाची शांत, अंतर्मुख आणि खूप अभ्यासू!! दोघीही अमृताच्या मैत्रिणी!
त्या दोघी बहिणींनी त्यांच्या बाबांचा वाढदिवस जोरदार करायचा ठरवल्यामुळे तयारीसाठी स्वप्ना लवकर निघाली होती.आणि अमृता तर त्यांच्या घरचीच,तेव्हा वाढदिवसाच्या धावपळीत ती हवीच.अमृतालाही आपल्या आईला भेटायचंच होतं,पुण्यातली काम आटपायची होती त्यामुळे तीही स्वप्ना बरोबर लवकर निघाली होती.
प्रवासात स्वप्ना 'बाबा' ह्या एकाच विषयावर भरभरून बोलत होती.कस त्या दोघी बहिणींनी बाबांना युरोप टूरच सरप्राइज गिफ्ट द्यायच ठरवलंय!आई गेली तेव्हा ती अवघी सहा वर्षांची होती पण बाबांनी कसं तिला आईच नसणं जाणवू सुध्दा दिलं नाही.सोनाताईशी तिच असलेलं मैत्रिणीच नातं,एकनादोन आठवणींचा कोलाज भरभरून बोलून स्वप्ना त्यात रंग भरत होती.त्या संपूर्ण चित्रातल्या प्रत्येक आठवणींची अमृता जवळची साक्षीदार होती.तरीसुध्दा ती स्वप्नाकडून नव्यानं ऐकत होती."अमु तुला आठवत,आई गेली आणि पंधरा वीस दिवसांतच माझा वाढदिवस होता.मी हट्टच धरला वाढदिवस साजरा करूया.किती समजावल सगळ्यांनी शेवटी रडत रडत मी म्हटलं "आईला तुम्ही नेलं तेव्हाच मी तिला वाढदिवसाला ये म्हटलाय.आता ती आली आणि वाढदिवस केला नाही तर ती परत जाईल ना! आणि आज कळतय कस बाबांनी दु:ख बाजूला ठेवून वाढदिवस साजरा केला असेल ते!आणि अमू तुला माहितीये आई आली होती मला भेटायला, ती गेटमधून आत येताना मलाच फक्त दिसली होती. तिला नेलं त्याच साडीत होती."हे सर्व अमृतानी कितीतरी वेळा ऐकलं होतं तरीही तिचे डोळे भरून आले. तिनी विषय बदलला आणि म्हणाली"स्वप्ना वाढदिवसासाठी ड्रेस का साडी? अर्थात ड्रेस,साडीत धावपळ नाही करता येणार" स्वप्नानी पण वातावरणातला ताण ओळखून जाणीवपूर्वक उत्तर दिलं.
वाढदिवसाच्या दिवशी स्वप्ना-सोना दोघी बहिणींचा उत्साह ओसंडून वाहत होता.बाबांच्या इच्छेनुसार बंगल्यातच समारंभ साजरा होत होता. बाहेर मंडप घातला होता.सकाळचे धार्मिक विधी, जेवणं, थोड्या गप्पा आराम झाल्यावर अमृतानी सर्वांना हाॅलमध्ये एकत्र बोलावून घेतलं आणि सांगितलं "आता 'मनोगत'हा कार्यक्रम होणार आहे.आजच्या समारंभाच्या तिन्ही उत्सवमूर्ती त्यांच्या मनातल आपल्या सर्वांच्या साक्षीनी एकेमेकाला सांगतील.सुरवात करेल 'सोनाली'
"अग,अमृता हे काय सगळं, अचानक काय बोलू"सोनाली गडबडून गेली.अमृतानी हसून सोनालीला समोर बोलावलं.सोनाली थोडा वेळ शांत उभी राहिली आणि बोलू लागली.
"बाबा, तू आम्हा दोघींच आभाळ आहेस.ह्या आभाळातल्या उन्हानी आम्हाला शिस्त लावली आणि चांदण्यांनी उबदार माया दिली.बाबा, आई गेली तेव्हा मी मोठी होते आणि तुला लग्न करायचा कोणी आग्रह केला की मला तुझा राग यायचा,लग्न करशील अशी भीती वाटायची!साॅरी बाबा आज लग्न झालेल्या मला जोडीदाराची गरज कळतेय.बाबा, तू मी जातीनी मद्रासी आणि शिक्षणानी इंजिनिअर असलेल्या श्रीरामशी लग्न ठरवल्याच कळल्यावर आनंदानी परवानगी दिलीस.आणि म्हणालास"बाळा आपल्याला नातं जोडायचय, जात नाही! आणि नुकतीच किती सहजपणे तुझी फॅक्टरी त्याच्या हाती देऊन निवृत्त झालास.आणि आवर्जून स्वप्नाला विचारलस"फॅक्टरी ताईला दिली तुला राग नाही ना आला? "अरे बाबा, तू आणि ताईंनी मला जे दिलंय त्यापुढे ह्या फॅक्टरीच काय घेऊन बसलास!"स्वप्नाच तिच्या स्वभावाप्रमाणे मोकळं उत्तर आलं.आभाळ अलगदपणे माझ्या ओंजळीत उतरल्यासारख वाटलं! अजून काय बोलू! माझ्या आभाळा मी तुला काय देवू? इथूनच नमस्कार!
‌‌. अमृतानी बाबांना या असा इशारा केला.बाबा हसत आले आणि अमृताला म्हणाले "तुझे खूप खूप आभार कारण माझी सोनाली तिची आई वसुधा गेल्यापासून पहिल्यांदा इतकं आणि मनातलं बोलली.आता माझ्या मनातलं----
वसूधाला जाऊन तीस वर्षे झाली आणि आज मला सत्तर वर्ष पूर्ण झाली.आमच्या लग्नानंतर वसूच्या हट्टापायी मी स्वत:चा व्यवसाय सुरू केला होता आणि आज त्यात खूप यशस्वी झालो.केवळ वसूमुळेच! लग्नानंतर दहा वर्षांनी सोनालीचा जन्म झाला.आणि आम्ही हा बंगला बांधला.त्यानंतर सहा वर्षानी स्वप्नालीचा जन्म झाला.पण वर्षभरात वसूला असाध्य आजाराने ग्रस्त केलं आणि स्वप्नाली सहा वर्षाची होती आणि वसू गेली.त्यानंतर अवघ्या वीस दिवसांत 'आई येणार' म्हणून स्वप्नानी वाढदिवस साजरा करायला लावला.मला कळलं"ह्या दोघींच भावविश्व हळूवारपणे मलाच जपायला हवं."
मी एकदाच व्याकुळ झालो जेव्हा सोनानी मला सांगितलं की "ती मोठी झालीय! मला कळेचना की हिला काय समजवायचं, काय सांगायचं पण तिनं मला येवढच म्हटलं"काळजी करू नका मला सर्व माहितीये.
स्वत:ला कधीच एकट नाही समजलो.माझ्या मुली,माझ वाचन,गाणी ऐकण्याची आवड आणि तुम्ही सर्वजण!ह्या सर्वांमुळे मला कधीच एकाकी नाही वाटलं. मी सर्वांनाच सांगेन "एकटेपणा काही आजार नाहीय त्याच्याशी मैत्री केली की सर्व सोपं होऊन जातं.
अमृतानी पूढे होऊन बाबांना तिथेच खूर्चीवर बसवलं.आणि स्वप्नाला बोलावलं.
स्वप्नानी सरळ बोलायलाच सुरवात केली"मला काही ताई, बाबासारख बोलता येत नाही पण दोन वेळा मी बाबांना घाबरवलं ते सांगते."पहिल्यांदा जेव्हा मी बाबाला म्हटलं की"बाबा माझ्यासाठी तुलाच मुलगा शोधायला लागणार आहे कारण मला काही प्रेमबीम जमलं नाही.बाबा जाम घाबरला.नंतर मग आत्याच्या मदतीने सुयशला माझ्या साठी शोधलं.सुयश नेहमी म्हणतो"मला तुझ्यापेक्षा तुझा बाबाच जास्त आवडलाआणि मी होकार दिला.दुसऱ्यांदा बाबा घाबरला जेव्हा मी म्हटलं"बाबा मी नोकरी सोडली.मला फ्री लान्सींग जर्नालिझम करायचंय मला लेखन,प्रवास करायचाय.बाबा एक मिनिट शांतपणे माझ्याकडे बघत राहिला.आणि ताईच्या भाषेत सांगायचं तर "आमच्या आभाळानी मला उंच भरारी घ्यायला परवानगी दिली.
मला बाबा आठवतोय आईकडे आमच्या वेण्या घालायला शिकणारा,पोळी जमत नाही म्हणून छोटे पराठे करणारा,आम्हा दोघींना हसताना पाहून का हसताय न विचारता हसत सुटणारा आमचा बाबा!आईला ए म्हणत होतात ना मग मलाही ए बाबा म्हणायच.अस म्हणणारं आमचं 'आभाळ' त्याला मनापासून सलाम!
अमृतानी सर्वांसमोर हात जोडले आणि म्हटलं"आपल्या सगळ्यांच्याच माथ्यावर एक आभाळ असतंच मान उंचावून फक्त वरती बघायची गरज असते.
ललिता छेडा

No comments:

Post a Comment