Thursday, August 16, 2018

स्पेस


गेलं वर्षभर आजारी असलेले बाबा गेले.आणि त्यानंतर पुढचे तेरा दिवस आॅफिस मधून रोज आईकडे जायचंच अस मधूरांनी ठरवल होत.पण तिथे गेल्यावर दोन बेडरूम,हाॅल, किचनमध्ये दोन भाऊ, त्यांच्या बायका, मोठ्याच्या दोन मुली,धाकट्याचा मुलगा आणि आई असं आठ जणांच कुटुंब रहाताना बघून तिला वाटायचं कसे राहतात हे सर्व एकत्र, काही स्पेसच नाही ह्यांना स्वत: साठी! त्यामुळे ती तिथून लगेच स्वत:च्या घरी जायला निघायची.तिच तसं जाणं आईला खटकायच! येते काय जरा इकडे तिकडे केलं की जेवायला आल्यासारखी जेवते काय, आणि निघते काय! कधी वहिनींशी हवं नकोच बोलणं नाही, भावांची प्रेमानी विचारपूस नाही.पण आता हे सर्व बोलायची वेळ नाही असा विचार करून आई गप्प बसायची!मधुरा मात्र भेटायला आलेल्यांजवळ "मी आॅफीसमधून अगदी रोज येते हं"हे वाक्य आवर्जून म्हणायची!
मधुरा स्वत:च्या घरी आली की तिला वाटायचं आपल्या घटस्फोटानंतर आपण एकटं रहायच ठरवल तेव्हा सर्वांनी किती विरोध केला.पण बाबांनी पुढाकार घेऊन आणि आर्थिक मदत करून स्टेशन जवळच हे दोन बेडरूमच घर घ्यायला लावलं,ते किती बरं झालं नाहीतर मला पण त्यासर्वांबरोबर रहावं लागलं असत.कारण आत्ता जागा घेण म्हणजे आर्थिक दृष्ट्या अशक्यच आहे.
खर म्हणजे तेेव्हा बाबांच्या मनात आपल्या बरोबर ह्या घरात रहायचं होतं पण आईला मुलानातवंडां बरोबर रहायचं होतं.त्यामुळे त्यांच तिच्या घरी रहायला येण्याच राहूनच गेलं!मग बाबांनी त्यांच्याच घरात हाॅल आणि टेरेसच्या मध्ये सोसायटीच्या परवानगीने छोटीशी खोली बनवून घेतली.ती खोली मधुराच्या आई-बाबांची खास जागा होती.बाबांची पुस्तक, आईच्या विठ्ठल रखुमाईच्या छोट्या देखण्या मुर्ती!
मधुराच्या मनात नेहमी यायचं की बर झाल आपण एकट्या रहातोय.आपल्याला आपली स्पेस मिळतेय!सी.ए.सी. एस्.असलेली मधुरा मोठ्या कंपनीत उत्तम पगारावर काम करत होती.स्वत:च्या तथाकथित उच्च राहणीमानाचा, करिअरचा तिला थोडा अभिमानच होता.तसही तिचा बाॅस देवेंद्र पटेलशी असलेल्या तिच्या मैत्रीसाठी तिच हे एकट राहण पुरकच होत.पण ती मैत्री सोसायटीतल्या लोकांच्या नजरेत येत असल्याचे मधुराला जाणवत असल्याने ती शेजा-यांशी थोडी फटकूनच वागत असे.
शेवटच्या दिवशी दादा म्हणजेच मधुराचा मोठा भाऊ अचानक म्हणाला"मधु,आईला थोडे दिवस तुझ्या घरी घेऊन जा.गेल वर्षभर ती घराबाहेर पडलीच नाहीय तुझ्याकडे गेली की तिलाही थोडासा बदल मिळेलआणि अक्कामावशी सुध्दा तुझ्या घराजवळच रहाते ना?.तिच्या सोबतीने आईपण जरा बाहेर पडेल.मधुरासाठी हा अनपेक्षित धक्काच होता.पण दादाच्या कडक आणि शिस्तप्रिय स्वभावामुळे मधुराची काही बोलायची हिंमतच झाली नाही."मी उद्या येते घ्यायला!अस हळूच बोलत ती निघाली.आणि आईजवळ येऊन म्हणाली"तुला यायचं ना?"हो अग लगेच नाही पण दादाची इच्छा आहे आणि त्याचही म्हणणं बरोबर आहे मी इथून गेले की इकडच येणजाणही कमी होईल, त्यांचे नोकरी व्यवसायही सुरू होतील.तुला तर दादाचा स्वभाव माहीतच आहे,त्याचे सर्व निर्णय तुझ्या बाबांसारखे पूर्ण विचारांती घेतलेले असतात.दोघही व्यवसायाने वकीलच ना!
आईच्या बोलण्याकडे तिचं अजिबात लक्ष नव्हतं.तिने घाबरत दादाला विचारलं"कधी नेऊ?"तू नको नेऊ! मीच येणार आहे तिला सोडायला.चार दिवसांनी रविवारी सकाळी आम्ही येऊ."दादा म्हणाला आणि मधूला हुश्श झालं.
रविवारी आई आली आणि त्याचदिवशी मावशी तिला भेटायला आली.मधूरा मावशीशी जास्त बोललीच नाही.मावशी गेल्यावर आईने अपेक्षेप्रमाणे विचारलं"मधूरा दहा-बारा वर्ष झाली तुला इथे रहायला येऊन मावशी एकदाही तुझ्या घरी नाही आली?मावशी म्हणत होती"आज पहिल्यांदाच ती तुझ्या घरी आलीय." अग,माणसं जोडावी लागतात.आईच बोलण ऐकून मधूरेला वाटलं 'झाली माझी शाळा सुरू!'हे बघ आई माझ्याकडे अजिबात वेळ नसतो, आठवडाभर आॅफिसच काम आणि शनिवारी रविवारी माझी काम!
दुसऱ्या दिवशी सकाळी मधूरा उठली तर आईनी चहा, थालिपीठं तयार ठेवली होती.सैपाकघरांत आईचे विठ्ठल रखुमाई विराजमान झाले होते.त्यांच्यासमोर उदबत्ती लावली होती.तिला खूपच प्रसन्न वाटलं.मुर्तिंसमोर न कळत हात जोडून तिने विचारल"ह्यांना पण घेऊन आलीस?"अग आले माझ्या बरोबर तुझ्या घरी!आई हसत हसत म्हणाली."आज संध्याकाळी आक्की बरोबर जाऊन घरात काय काय हवंय ते बघून घेऊन येईन म्हणते"मधूराला कळलं की आईनी तिच्या स्वभावाप्रमाणे घराचा ताबा घेतलाय. "आई माझ्याकडे स्वयंपाकाला बाई आहे."मधुराने एक प्रयत्न केला"असूदे की मी घेईन तिच्याशी जमवून."आई ऐकणार नाही हे आता तिला कळलं होतं.
नंतरच्या आठ-दहा दिवसात आईच्या हातचं खाऊन मधूराला छान वाटत होतं. तिच्या मनात आलं"आईच्या येण्यानी तिच्या घराला घरपण आलंय! शेजारपाजारचे येतजात होते, कोणी तिच्याशी बोलत नव्हते पण आई मात्र सोसायटीत लोकप्रिय झाली होती.
रवीवारी मधूरा आईला म्हणाली"माझा एक मित्र आपल्याकडे तुला भेटायला येणार आहे.तो गुजराथी आहे आणि माझा बाॅस पण आहे ,तो कांदिवली ला राहातो, इतक्या दूरुन येणार तर मी जेवायलाच सांगेन चालेल ना?"काय बनवायचय? आईनी थोडं रूक्षपणेच विचारलं.आईचा मुड बघून मधूरानी पटकन म्हटलं"मावशीला पण बोलावं हवंतर!"नको"आईनं विषय संपवला होता.
देवेंद्र आला, जवळजवळ दिवसभर होता.आईशी मस्त गप्पा मारत होता.मधूराला थोडं बरं वाटल. 
तो गेल्यावर मात्र आईनी थेटच विचारलं"मधुरा ह्याच लग्न झालंय आणि ह्याला तीन मुलं आहेत.तुमची मैत्री त्याच्या घरी माहित आहे?हा दिवसभर इथे होता ते त्याच्या बायकोला माहीत होतं? आईचा आवाज चढलेला होता. मला काय माहीत? मधुरा रागाने म्हणाली. मावशीने तुझे कान भरलेत ना?" मी काही लहान नाही कोणी तरी मला सांगेल आणि मी संशय घेईन!तो प्रत्येक फोनवर बोलताना 'मी लोणावळ्याला आहे' असे सांगत होता.आणि माझ्या कडे बघून डोळे मिचकावत होता.मी पण हसुन साजर केलं.पण मला सांग तुमच्या ख-या मैत्रीला असा खोटा आधार का घ्यावा लागतोय..तुला हवी असलेली हीच ती'स्पेस' का?हे तर मनाला येईल तसे वागायचे 'स्वातंत्र्य'आहे.
मधूरा, तुझ्या बाबांनी मला अमृता प्रीतम ह्यांची'चौथा कमरा'ही कथा वाचून दाखवली आहे.स्वत:ला शोधण्यासाठी, समजण्यासाठी शांतपणे बसायची जागा म्हणजे ही स्पेस असं मला वाटतं!जी त्या छोट्याश्या खोलीत सुध्दा आम्हाला मिळायची.
तुला माहितीये"एकत्र रहाण्याचा निर्णय तुझ्या भावांनी ठरवून घेतलाय.ते चौघेही नोकरी व्यवसायामुळे दिवसभर बाहेर असतात आणि त्यामुळेच मुलांसाठी एकत्र रहायच त्यांनी ठरवलं.त्यांच्याकडे पैसे नाहीत असं नाहीये पण त्यांच्यावर जबाबदाऱ्या आहेत.तुझ्या शिक्षणाचा, पैशाचा आम्हाला अभिमान तेव्हा वाटेल जेव्हा तू एखाद्या गरीब मुलाला शिकायला मदत करशील.मधुरा हे सगळं ऐकून घेतेय आणि चेह-यावरचे भाव अपराधी असल्याचे जाणवल्यावर दादानी ज्या उद्देशाने आपल्याला इथं पाठवलं त्यात आपण थोडेसे जिंकलोय असं आईला वाटलं!
"आई इथून नको जाऊस! मला कळत होतं पण परतीचा मार्ग दिसत नव्हता.तू इथे असलीस की मला स्वत:ला शोधायला मदत होईल."मधुराच्या शब्दातला खरेपणा तिच्या चेहऱ्यावर दिसत होता.आईनी त्या घरात स्वत:ची जागा मिळवली होती.



                                                                          - ललिता छेडा

No comments:

Post a Comment