Thursday, August 23, 2018

निवारा



आठवड्यातला एखादा दिवस देवळात जायचंच अस ठरवल्यावर गुरुवारी मैत्रिणींना भेटायची देऊळ ही एक हक्काची जागा झाली.देवळाचा परिसर,तिथली शांतता, भेटणारी माणसं सगळं सवयीच झालं.
दर्शनानंतर शांतपणे बसायच्या बाकावर आधीच एक आजी बसलेल्या असायच्या.चेह-यावर सुरकुत्यांच जाळं, ओढाताणीत काढलेल्या आयुष्याच दुःख डोळ्यात घेऊन बसलेल्या त्यांच्याकडे बघून हसण्या इतपतच ओळख झाली होती.पण एक दिवस देवळात जायला उशीर झाला आणि दर्शन होईपर्यंत पुजारी मंदिर बंद करू लागले.आजीदेखील हळूहळू बाहेर येऊन रस्त्यावरच्या बाकावर बसल्या."घरी नाही का जायचं?कोणाची वाट बघताय का?"मी अगदी सहज विचारलं."दीड वाजता सुन येईल ती घराच कुलुप काढेल मग मी जाईन"आजी म्हणाल्या.उत्तर नीटसं कळलं नाही पण उशीर झाला होता म्हणून "ठीक आहे" येवढंच बोलून मी निघाले.कोणीतरी दार उघडे पर्यंत घराबाहेर बसायचं!आजींच्या उत्तरानी अस्वस्थ केलं होतं.येत्या गुरुवारी आजींशी बोललंच पाहिजे असं ठरवलं.
गुरुवारी आजी जणू माझी वाटच बघत होत्या.मला हातानी बोलवून भाजीची पिशवी इथे ठेव असा इशारा केला.मी पण पिशवी त्यांच्याजवळ ठेवली आणि 'आलेच'अस म्हटलं.दर्शन करून आल्याआल्या मी आजींना विचारलं"कुठे राहता तुम्ही?सुनेची वाट बघत रस्त्यावर का बसला होतात? तुमच्या कडे किल्ली नव्हती का?"बैस इथे सांगते सर्व"आजी हळूच म्हणाल्या."आपण बाहेर वडाच्या पारावर बसून बोलूया.इथे देवळात नको."मी म्हटलं.
बाहेर आल्यावर आजींनी त्यांची कहाणी सांगायला सुरुवात केली."देवळाशेजारच्या चाळीत आम्ही रहातो.एकुलता एक मुलगा आमचा, माझे यजमान रेल्वेत नोकरीला होते.'आहे त्यात समाधानाने' माझा संसार चालला होता.रेल्वेच्या नोकरी मुळे आणि ह्यांच्या हौसेमुळे खूप हिंडलो फिरलो.पण लेकाच लग्न झालं आणि सगळ बिघडतच गेलं.सुन त्या छोट्या घरात खूष नव्हती त्यामुळे सारखी भांडणं सुरू झाली.तिला आम्ही नको होतो.कुठे जाणार? तिला ते घर तिच्या नावाने करून हवं होतं.तिच्या वागण्याचा ह्यांना खूप त्रास होत होता. मुलगा तिच्या पूर्ण आहारी गेल्यामुळे ह्यांची खूप चिडचिड होत असे.ह्या सगळ्याचा परिणाम म्हण किंवा माझ नशीब म्हण हे अचानक अॅटॅक येऊन मला एकटी करून गेले.आजींचे डोळे भरून आले होते.मी माझ्या जवळच पाणी दिलं.
"हे गेल्यावर सुनेने एका दुकानात नोकरी धरली".आजी थोड्या शांत झाल्यावर बोलू लागल्या."सकाळी ९.३०ते १ आणि संध्याकाळी ४ ते८.३०.ह्या वेळात ती घराला कुलूप लावून जाते आणि मी देवळात बसायचच अस तिनीच ठरवून टाकलंय!मुलाच म्हणणं असं की "आई,घरात एकट बसण्यापेक्षा देवळात बरं आहे की! सकाळचं जेवण बनवून मी तिच्या बरोबरच बाहेर पडते,ती कुलुप लावुन घेते आणि दुपारी दीडच्या सुमारास परत येते.पुन्हा साडेतीनला मी देवळात जाऊन बसते.संध्याकाळी माझा मुलगा साडेसातला देवळात घ्यायला येतो.आम्ही घरी आलो की जेवण मीच बनवून तयार ठेवायचं! आजींशी बोलताना कधी बारा वाजून गेले होते कळलच नाही."आजी मी बोलू तुमच्या सुनेशी."मी सुन्न होऊन गेले होते.."छे ग बाई, तिच्या तोफखान्यासमोर तू बोलूच शकणार नाहीस! "तुम्हाला नातवंड?मी हळूच विचारलं."नाहीत ना!मला तिच एक आशा होती की एखादं नातवंड झालं तर ह्यांना थोडी माझी गरज जाणवेल,प्रेम वाटेल,माझं पण मन रमेल पण कसच काय हिला मुलंच आवडत नाहीत म्हणे!घर ह्यांनी माझ्या नावावर करून ठेवलय आणि पेन्शन माझ्या नावांवर आहे म्हणून मला अन्न मिळतय, नेसायला वस्त्र देताहेत,निवारा आहे.मनात आलं हा कसला निवारा!!
त्यानंतर आम्ही सर्व मैत्रिणींनी आजींसाठी वेळ काढायला सुरुवात केली.ठरवून थोडंसं काहीतरी खायला नेऊ लागलो,त्यांच्याशी गप्पा मारू लागलो. पण मनात एकदातरी त्यांच्या सुनेला भेटायचंच अशी इच्छा होती.आजींना त्या वर्षी काही कारणांनी दोन साड्या दिल्या.फुकटच कोणी तरी देताय तर सुनेला बहुतेक चाललं असावं.आजी हसत म्हणाल्या"बरं झालं मी नऊवारी नेसते नाहीतर----
अचानक एके दिवशी मैत्रिणीचा फोन आला."अग, देवळाबाहेर आजींना स्कुटरचा धक्का बसला आणि त्या पडल्या.नशीबानी मी तिथेच होते त्यामुळे लगेच डाॅ.कडे नेलं.त्यांना ड्रेसिंग केल नशीबानी फ्रॅक्चर नव्हत.आणि महत्त्वाचं म्हणजे आजी नको नको म्हणत होत्या तरी मी त्यांना सोडायला घरी गेले.काय सांगू, आजींना बघून त्यांची सून जे काही बोलली ते ऐकवत नव्हतं! कसंबसं मी तिला अॅक्सिडंट बद्दल सांगितलं तर"येवढं सगळं केलत मग घरी घेऊन जायचं होतं ना! माझ्या मागची ब्याद गेली असती".आजी मला इथून जा अशी खूण करत होत्या.इतक अपमानित वाटतं होतं"मैत्रिणीला बोलवत नव्हतं.
दोन दिवस लक्ष ठेवून मी आजींची सुन गेल्यावर आजींच्या घरी गेले.मला बघितल्यावर शेजारच्या काकू लगबगीने आल्या.तुम्ही?त्यांनी विचारलं.दार उघडच होतं.मला बघितल्यावर आजींनी मला हाक मारली"ताई"----चार दिवसात आजींची रयाच गेली होती.शेजारच्या काकू घाईघाईने म्हणाल्या"किती वाट बघतायहेत आजी तुमची, उद्या त्यांना वृध्दाश्रमात नेऊन ठेवणार आहेत,जायच्या आधी तुम्हाला भेटायचं होतं त्यांना! मला खूप वाईट वाटत होतं. पण मनात आलं आजींना हक्काचा निवारा तरी मिळेल का? निघताना आजींना नमस्कार केला आणि त्यांच्या घरातल्या देवांना हात जोडून म्हटलं"आयुष्याच्या संध्याकाळी आजींना मनासारखं जगण्याचं स्वातंत्र्य मिळू दे रे देवा!
नुकतीच एका गुरुवारी भाजी घेऊन देवळात गेले.आजींची आठवण झाली त्यांच्या जागेवर एक आजोबा बसले होते.थबकून उभी राह्यले तर आजोबांनी मला हातानी बोलावून भाजीची पिशवी इथे ठेव असा इशारा केला.मी पण पिशवी त्यांच्या जवळ ठेवून'आलेच' म्हटलं........


                                                                               -ललिता छेडा


No comments:

Post a Comment