आईचा हात धरून सकाळीच चिन्या भांडूप मधल्या वसाहतीत आला.कमानीतून आत गेल्यावर दोन चाळीसोडून तिसऱ्या चाळीच्या तळमजल्यावर जिन्याजवळच्या खोलीबाहेर आईनी नुकतच लग्न केलेले सदाशिव काका उभे होते.त्यांना येताना बघून चाळीतली मंडळी बाहेर आली होती.चिन्या त्याच्याच वयाच्या एका मुलाकडे बघून हसला. त्याबरोबर त्याच्या आईने त्याला खसकन ओढून घरात नेलं.पण तो मुलगा आईचा हात झटकून चिन्याजवळ आला आणि त्याचा हात धरून म्हणाला 'फ्रेन्ड' चिन्या खूष झाला! तो मुलगा हसून पळाला कारण त्याच्या आईनी त्याला रागाने'मनीष'घरी ये' अशी हाक मारली होती.चिन्याला वाटलं चिन्या,मन्याची जोडी जमली की!तो घराकडे जायला वळला,आई तर आंत गेली होती.काका दारातच उभे होते.चिन्या घरात येतोय असं बघून ते त्याला थोडंसं अडवूनच म्हणाले"चिन्मय,जा जरा चाळीत फिरून ये.वरती गच्ची आहे जा पळ बघून ये.आणि येवढं बोलून त्यांनी पटकन दरवाजा बंद केला.चिन्याला जाम राग आला त्याने आईला हाक मारली पण आतून काहीच आवाज आला नाही.तो रडवेला होऊन जिन्यात बसला.थोड्या वेळानी त्याला वाटलं"गच्चीवर जाऊन तर बघूया नाही तरी इथे त्याला येणारे जाणारे बघतच होते.त्याला आईचा पण राग आला होता.तिरमिरीत तो उठला आणि त्याला पाठीवरची त्याची बॅग कुठे ठेवावी तेच कळेना! शेवटी बॅगसकटच तो जिना चढू लागला.गच्चीच दार उघडच होतं.त्यानी डोकावून पाहिलं तर त्याच्या आजीच्या वयाच्या कोणीतरी तिथे बसलेल्या दिसल्या.त्याची चाहूल लागताच त्या वळल्या आणि म्हणाल्या"कोण रे तू? आणि इथे काय करतोयस?"मी चिन्मय"चिन्या चाचरत म्हणाला."कोण?"उन्हाने येणार्या तिरीपीला हातानं डोळ्यावर अडवून आजींनी विचारलं."अगबाई, रूक्मिणी आली वाटतं,अगदी आईसारखा दिसतोयस!चिन्याला वाटलं ह्या आजी आईला कशा ओळखतात?त्याच्या चेहऱ्यावरचे भाव ओळखून त्या म्हणाल्या"अरे लग्नाआधी तुझी आई इथे येऊन गेलीहोती तेव्हा मला भेटली होती.बाळा मी सदाच्या शेजारीच रहाते हो!.अरे पण तू गच्चीवर का आलास?"चिन्या रडवेला होऊन म्हणाला"त्या काकांनीच पाठवलं.आजींनी कपाळाला हात लावला.आणि त्याचा हात धरून गच्चीच्या कोपऱ्यात असलेल्या खोलीत घेऊन गेल्या.ठेव इथे सामान आणि बैस तिथं त्या मोडक्या सोफ्यावर!चिन्याला खोली खूप आवडली होती.मागच्या भिंतीवर दोन छोट्या पण खिडकीत बसू शकता येईल असे कट्टे असलेल्या खिडक्या होत्या.खिडकीतून मागचा रस्ता स्वच्छ दिसत होता.इतक्यात चिन्याचा नवीनच झालेला मित्र मनीष आला."अरे वा!खोली उघडी कशी?अच्छा माई इथेच आहेत म्हणून गच्ची,खोली सगळं उघडलय!माई पापड वाळवता आहात का? मनीष बडबड करत खिडकीत जाऊन बसला.चिन्याला कळलं की ह्या आजींना सगळे माई म्हणतायत.
इतक्यात त्याला आईच्या हांका ऐकू आल्या"चिन्या, चिन्मय अरे कुठे आहेस?"तो धावत जिन्यापाशी गेला आणि आईला बघून रडायलाच लागला.आई डिश मध्ये काहीतरी घेऊन आली होती.चिन्याला जाणवलं आपल्याला भूक लागलीय."रडू नकोस आता, खाऊन घे.किती शोधलं तुला पार रस्त्यावर जाऊन आले.तेव्हा कोणीतरी म्हणालं'तुला गच्चीवर जाताना पाह्यल म्हणून'आई उपमा घेऊन आली होती.चिन्या आईला घेऊन खोलीत आला.तिथे मनीष आणि माई सोफ्यावर बसून बोलत होते.चिन्यानी थोडा उपमा मित्राला दिला.
त्या दोघांना खाताना बघून माईनी रूक्मिणीला बाहेर बोलावलं.दोघी खोलीच्या बाहेर माईंच्या वाळवणां जवळ असलेल्या सिमेंटच्या कट्ट्यावर बसल्या.कशी आहेस? माईंनी आपुलकीने चिन्याच्या आईला विचारलं."चिन्यासाठी अक्षरशः डोळे मिटून हे लग्न केलय खर पण पुढे काय होईल त्याचा विचारही करवत नाहीय! हे आता नोकरी सोड असं म्हणताहेत! मला नाही सोडायचीय कारण त्या पैशातून मी चिन्याचा खर्च करू शकते"रूक्मिणीतली आई बोलली."अजिबात नको सोडूस चांगली असलेली नोकरी! माईंनी तिचा हात धरुन म्हटलं"मी तुला सांगितलंय ना त्या सदाची पहिली बायको ह्याच्या शरीरसुखाच्या अति हव्यासापोटी कशी टी.बी.होऊन गेली ते.अतिशय छळलं त्यानी ह्या एका गोष्टीवरून त्या माऊलीला."हे सगळं रूक्मिणीनी एकदा ऐकलं होतं आणि सदाशिवला नकार पण दिला होता.पण सदाशिव तिच्या आॅफिसवर येऊन तिला समजावून गेला होता.माईंनी सांगितलेलं तिनं स्पष्टपणे त्याला विचारलं होतं.हे सगळ ऐकल्यावर माईंनी तिला डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला.
माई,चिन्याच्या बाबाची पण खूप इच्छा होती की मी ही नोकरी सोडू नये.त्यांच्या हट्टामुळेच मी नोकरी धरली होती.खूप सुखाचा संसार होता आमचा आणि चिन्मय तर त्यांचा खूप लाडका होता.पण कॅन्सर झाला म्हणेपर्यंत सहा महिन्यांत तो गेलाच.आणि आमच्या हालाला सुरवात झाली.भाड्याच घर सोडून मला आईकडे येऊन रहावं लागलं.तिथे आई होती तोपर्यंत चिन्याची काळजी घेत होती पण सहा महिन्यांपूर्वी आई गेली आणि चिन्याचे त्याची मामी खाण्यापिण्याचे खूप हाल करू लागली.ती त्याला मारते असं शेजारचे सांगत.विचारल तर ती कांगावा करायची.आॅफिसातल्या मैत्रिणीनी हे स्थळ सुचवलं आणि मी खूप विचार करून चिन्मयसाठी होकार दिला."रुक्मिणीच शेवटच वाक्य चिन्यानी ऐकलं आणि तिच्या जवळ येऊन"चल खाली घरी जाऊया म्हणाला.मन्या,माई सर्वचजण खाली निघाले.जिन्यात दोन्ही पोरं "तू कितवीत? कोणती शाळा असं बोलत होती.दोघेही आठवीत गेले होते.फक्त चिन्या मराठीत आणि मनीष इंग्रजी माध्यमात होता.
घरी आल्यावर चिन्यानी हळूच आईला विचारलं"ते काका कुठे आहेत? अरे इथे जवळच त्यांच स्टेशनरीच दुकान आहे.सकाळी साडेनऊला दुकान उघडतात दुपारी जेवायला येतात आणि मग रात्री नऊ वाजता घरी येतात."आई मी गच्चीतल्या खोलीत छोपू! रुक्मिणीनी चमकून त्याच्याकडे बघितलं "ह्यानी माईंशी बोलताना ऐकलं तरी नाही?"पण त्याच्या डोळ्यांतले भाव बघून मात्र तसं काही वाटत नाही.
"का रे"रुक्मिणीनी विचारलं.
"मी झोपलो तर मनीष पण येईल सोबतीला, असाही तो गॅलरीतच झोपतो"चिन्या.
"माईंना विचारायला हवं"रूक्मिणीनी टाळायचा प्रयत्न केला."आम्ही विचारलंय"चिन्या तयारी तच होता.कधी विचारलत?तू ग,च्चीत इकडे तिकडे फिरत होतीस ना तेव्हा!!
"ठीक आहे"रूक्मिणीचे शब्द पूर्ण व्हायच्या आत चिन्या माईंकडे किल्ली घ्यायला गेला.
त्या रात्री चिन्याला झोप नाही लागली पण मन्या मात्र गाढ झोपला होता.सकाळी आई उठवायला आली तेव्हा नुकतीच त्याला झोप लागली होती."चिन्या आठची शाळा आहे तयार व्हायचय ना! आईच्या आवाजानी त्याला सुरक्षित वाटलं.
नंतर ती खोली चिन्मयच विश्र्वच झालं.खोलीसमोर एक जांभळाच झाड होतं.त्यावर येणारे पक्षी,खारी त्याचे मित्र झाले होते.आजुबाजुच्या चाळीतल्या मुलांनी पण यायला सुरुवात केली होती.एकत्र अभ्यास सुरू झाला होता.ह्यासगळ्यामुळे गच्ची उघडी रहात होती.घरी रियाज करू शकत नसल्याने चाळीतल्या निलीमाताई पहाटे गच्चीवर येऊन गायला लागल्या होत्या.मन्यानी कुठुनतरी कॅरम मिळवला होता.रात्री कॅरमच्या मॅच सुरू झाल्या.संपूर्ण एरियात गच्चीवरची ती खोली एक आनंददायी जागा झाली होती.चिन्यानी गच्चीभर झाडं लावली होती.इयत्ता आठवीत असलेला एक छोटासा चिन्या आपल्या स्वभावाने बारावीची परीक्षा देणारा चिन्मयदादा सर्वांचाच लाडका झाला होता.एकट्या रहाणार्या माईंना चिन्याच्या रूपानी जगण्यासाठी आनंदाचं निधानच सापडलं होतं.
रूक्मिणीला पण चिन्मयला आनंदात बघून आपला निर्णय योग्य होता ह्याचं समाधान वाटायचं. सदानंद पण तिच्या शिस्तबद्ध आणि सकारात्मक वागणूकीनी तिला घाबरूनच होता.रुक्मिणीला हे मात्र नक्की वाटायचं एका गच्चीतल्या खोलीनी, एका वास्तुनी तिच्या आयुष्यातले अनेक प्रश्र्न सहज सोडविले होते.
ललिता छेडा.


No comments:
Post a Comment