नानींना दोन भाकर्या झाल्या की मागेच ठेवलेल्या स्टुलावर बसताना बघून नानांना गलबललं.ते त्यांच्या जवळ जाऊन म्हणाले"दमायला होतय ना? आता लेकाचं,नातवंडांच जेवण झालय ना आपण दोघं सकाळच्या पोळ्या आहेत ना त्याच खाऊया मला चालतील"."पण मला नाही ना चालणार! तुम्हाला गरम भाकरी किती आवडते माहितेय ना मला!नानी हसत म्हणाल्या."तुझ्या सुनेलाही माहीत झालय की तुला स्वैपाकाची किती आवड आहे त्यामुळे तिने छान पैकी तुझ्या गळ्यात हे काम घातलय! नाना वैतागून म्हणाले.घरापासून जवळच स्वत:च फॅशन बुटीक असणारी त्यांची सुन रश्मी सध्या बंगलोरला व्यवसायाच्या खरेदीसाठी गेली होती.आणि लेकाच्या फर्माइशीमुळे नानींनी गरम भाकरी पिठल्याचा बेत केला होता.
जेवणं झाल्यावर नाना हाॅलमध्ये आले.दुसर्या दिवशी शनिवार असल्याने शाळेला सुट्टी होती. मुलं मोबाईलवर खेळत होती.मोठी नात दहावीला आणि धाकटा नातू आठवीला होता.आणि त्यांचा मुलगा अमित लॅपटॉप घेऊन काम करत होता.नानानीं आपल्या बेडरूम मधला टी.व्ही.सूरू केला.त्यांना माहीत होतं नानींना काम आवरायला अजून अर्धा तास तरी लागेल.पूर्वी जुन्या घरात ते नानींच आवरेपर्यंत गप्पा मारत तिथेच बसत.दिवसभरातल्या आॅफिसमधल्या,घरच्या गप्पांची ती वेळ ठरलेली असे.पण ह्या नवीन घरातल्या स्वैपाकघरात बसायला जागाच नव्हती.डायनिंग टेबल बाहेर हाॅलमध्ये!
नानांना घेतलेली निवृत्ती आणि ह्या नवीन पाॅश सोसायटीत थ्री बेडरूमच्या बंदिस्त ब्लाॅकमुळे आलेल्या एकटेपणाचा त्यांना कंटाळा आला होता.पण पंधरा लाखाच पॅकेज घेणारा त्यांचा लेक आणि ड्रेस डिझायनर म्हणून प्रसिद्ध असलेली सून ह्यांनी हौसेनी घेतलेल्या ब्लाॅकमध्ये त्यांना यावं लागलं होतं.आधी पण ५/६ बिल्डींगची सोसायटीच होती पण सगळेजण एकमेकांशी जोडलेले होते.
नानी खोलीत आल्या तोपर्यंत नानांना झोप लागली होती.त्यांना नानांची घुसमट समजत होती.मुलगा,सुन त्यांच्या विश्र्वात दंग होते.नातवंड त्यांच्या!सून नानींवर घर सोडून व्यवसायात दंग होती.पण हल्ली नानीना पण थकवा जाणवत होता.स्वैपाकाची आवड असली तरी कंटाळा येत होता.रश्मीनी जरी कामाला,स्वैपाकाला बायका ठेवलेल्या असल्यातरी नानीनां दिवसभर काम पुरत होतं.सगळ्यांचे डबे वेळच्यावेळी भरून पाठवायचे, मुलांच्या शाळा-क्लासच्या वेळा सांभाळायच्या एक ना दोन त्या सतत कामात असायच्या.
शनिवारी दिवसभर मुलांचे मित्र मैत्रीणीं आल्या होत्या.नानी दिवसभर त्यांची आनंदाने उठबस करत होत्या. दुसर्या दिवशी सकाळी नानांनी अमितला म्हटलं "अमित आज मी तुझ्या नानीला घेऊन जवळच्या हाॅटेलात जेवायला जाणार आहे.आज रवीवार आहे त्यामुळे मुलांना तू जेवायला ने."अरे नाना, रश्मी नाहीय त्यामुळे मी दिवसभर मित्रांना इथे बोलावलंय.मॅच आहे ना!संध्याकाळी बाहेरून मागवून घेऊ. सकाळी नानी बघेल." अमितनी विषय संपवला होता. नाना एक शब्दही बोलले नाही.दिवसभर पुन्हा नानींची खूप दमणूक झाली.संध्याकाळी मात्र नाना त्यांना घेऊन बाहेर जेवायला गेले.मुल अर्थात त्यांच्या बरोबर होतीच.
दुसऱ्या दिवशी रश्मी आली.आल्याआल्या खरेदीसाठी आपण किती धावपळ केली आणि त्यामुळे किती दमलो आहे.हे सांगायला सुरुवात केली.आणि मग तिचा मोर्चा नानींकडे वळला."आई, मुलांनी मॅगी साठी हट्ट नाही ना केला?अमितनी रोज डबा नेला की नाही? माझ्या दुकानाची किल्ली वेळेवर नेत होते ना?नानी भांबावल्या."रश्मी,अमितच नाही तर तुझासुध्दा डबा ती अनेकदा तुझ्या दुकानात पाठवते, आणि गेले चार दिवस तिने घर, मुलं सगळ इतकं व्यवस्थित सांभाळलं आहे.त्याच कौतुक तर नाही तू प्रश्र्न काय विचारतेस?"नानांचा आवाज थोडा चढला होता."तस नाही हो नाना, मला माहित आहे ना त्या किती करतात ते! मी आपली गंमत केली."रश्मी गडबडली होती."ठीक आहे.पण ह्यापुढे ती कोणाच्याही प्रश्र्नाला उत्तर द्यायला बांधील नाही.हे लक्षात ठेवा. येवढं बोलुन नाना खोलीत निघून गेले.साध्याभोळ्या नानी रश्मीला म्हणाल्या"जाऊ दे ग, त्यांच नको घेऊस मनावर.पण रश्मीला नाना चिडले आहेत ते जाणवलं.
पुढचे चार-पाच दिवस नाना शांत होते.आणि ही शांतता अमितच्या परिचयाची होती.नानींना पण कळत होतं आता काही तरी निर्णय होणार.अमित,रश्मी दोघांनाही आपली चूक समजली होती.अमितनी पुण्यात सासर असलेल्या दोन्ही बहिणींना फोन केले.चैताली थोडी बिझी होती पण नानांची लाडकी मिताली कामासाठी मुंबईला येणारच होती.तिनी अमितला मात्र फोनवर चांगलच ऐकवल" ह्या घरी आल्यापासून तुमची लाईफस्टाईल आणि स्वभाव दोन्ही बदलत चाललंय.तुला तर माहीत आहे नाना किती फुडी आहेत आपल्याला लहानपणापासून नवीन नवीन हाॅटेलमध्ये न्यायचे, आणि घरी सुद्धा भरीत, आंबोळ्या, थालिपीठ असे पदार्थ स्वत: करायचे.हल्ली मात्र 'आमच्या घरी सारखं पनीर,पराठे, बिर्याणी असले पदार्थ रेडी टू इट येतात. मॅगी,पास्तां ह्याच प्रस्थ वाढत चाललंय' असं नाना नेहमी मला फोनवर सांगत असतात.नातवंडांना आपले पदार्थ कळले पाहिजेत अस त्यांना वाटतं असत.मी येतेय पण त्यांनी जे ठरवलं असेल ते होणारच".मिताली बोलली पण अमितला ते आधीच समजलं होतं.
चार-पाच दिवसांनंतर अमितनी रात्री जेवताना नानांना विचारलं"आपल्या पुण्यातल्या जागेत रहाणार्या पटवर्धनांनी तुम्हाला फोन केला होता ना?"हो त्यांच भाड्याच अॅग्रीमेंट पूर्ण होतंय आणि आता ते स्वत:च्या जागेत रहायला जात आहेत."नानांनी अमितकडे न बघता उत्तर दिलं."तस नाही नाना,त्यांनी दुसरा भाडेकरू बघितला होता पण तुम्ही आता आम्हाला भाड्यांनी द्यायचं नाही असं म्हणालात म्हणून विचारलं"अमित चाचरत बोलला."अमित,त्या जागेची थोडी रंगरंगोटी,रिपेअरींग करून घेणार आहे.ते ऐकल्यावर अमित पटकन ओके, ओके म्हणत उठायला लागला."एक मिनिट,माझ, बोलणं पूर्ण झालं नाहीये.नानांनी अमितला हातानी खाली बस अशी खूण केली.ती जागा व्यवस्थित करून मी आणि नानी काही दिवस तिथे रहायला जाणार आहोत.नानांनी विषय पूर्ण केला होता.हे इतकं अनपेक्षित होतं की अमितसकट रश्मी,नानी सगळेच जण एकेमेकाकडे बघू लागले."हे मी ठरवलं आहे.साधारण नवरात्रीच्या सुरवातीला आम्ही जातोय."नानींना मनापासून ही कल्पना आवडली होती.त्यामुळे त्यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही.त्या नानांपाठोपाठ खोलीत आल्या.आणि म्हणाल्या"कसं सुचलं तुम्हाला?इतका कंटाळा आला होता इथे!""आपल्या सारख्या वयस्क मंडळींना घरातले फार गृहित धरतात.आपल नशीब चांगलं आहे की आपलं पुण्यात घर आहे जिथे आपण जाऊ शकतोय.पण ज्यांना असा काही पर्याय नसेल त्यांच्यासाठी काही तरी करायचा माझा विचार आहे.आपण परत आल्यावर काही संस्थांशी बोलून ज्येष्ठांसाठी 'विरंगुळा केंद्र'सुरु करायचा प्रयत्न करणार आहे"नाना हसून म्हणाले.
ती दोघं पुण्याला गेल्यावर रश्मीला पदोपदी नानींच नसणं जाणवत होतं.नाना मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष देत होते ते स्वत: बघायला लागल्यावर किती कठीण आहे ते कळत होतं.आणि पुण्याला फोन केला की"नानीची चुलत बहीण आलेय आम्ही पत्ते खेळतोय,भाऊकाका जेवायला आलेत मस्त श्रीखंड पुरीचा बेत आहे, आम्ही सातार्याला चाललोय अशी उत्तरं मिळत होती.कधी चैताली, मिताली फोन उचलत होत्या.
शेवटी न राहवून अमितनी नानांना फोन केला"नाना परत येणार आहात ना?
"अरे असं कां विचारतोस, आम्ही वेगळं रहायला आलोय तुमच्या पासून वेगळं व्हायचं नाहीये.
आमच्या नातीच्या दहावीच्या परीक्षेसाठी आम्ही जानेवारीला परत येऊ.कारण तेव्हा आमची तिथे गरज असेल.नंतर मात्र जेव्हा वाटेल तेव्हा इथे येणार! नानांनी मोबाईल स्पीकरवर टाकला.
"नाना, माझी चूक मला कळलीय.पैसे कमवण्याच्या नादात आम्ही छोटे छोटे आनंद द्यायला आणि घ्यायला विसरलोय तुमच्या वेगळ्या रहाण्यानी प्रत्येकाला हव्या असणार्या मोकळ्या श्र्वासाची गरज समजलीय.अमित बोलत होता आणि नाना डोळे मिचकावत नानींकडे बघून हसत होते.
ललिता छेडा

No comments:
Post a Comment