असा कोसळणारा पाऊस पाहून रमाला नेहमीच त्या रात्रीची आठवण येत असे.ज्या रात्रीनी तिच आयुष्यच बदलून गेलं होतं.
आज स्वत:च्या साड्यांच्या दुकानात बसलेल्या तिला अशाच वेड्या पडणार्या पावसात तीसबत्तीस वर्षांपूर्वी पत्र्याच्या चाळीत असलेल्या तिच्या घरात अचानक जमिनीतून पाणी येऊ लागलं होतं त्याची आठवण झाली.पावसात बाहेरून पाणी आत यायचंच पण ह्या वेळी जमीनीतून पण येत होतं.त्यामुळे बघता बघता गुडघ्यापर्यंत पाणी झालं होतं.अवघ्या महिन्याभराची बाळंतीण होती ती आणि हातात ते साडीत गुंडाळलेल बाळ! ती घराबाहेर आली आणि समोर सत्या उभा होता."बर झालं तू बाहेर आलीस, मी तुलाच न्यायला आलोय.आई म्हणाली रमा एकटीच असेल काकांची नाईट आहे ना?"सत्या बोलत बोलत हळूहळू पुढे येत होता.त्यानी हात पुढे केल्यावर रमानी बाळाला त्याच्या हातात ठेवलं."तू हो पुढे, मी येतेय मागून"असं म्हणून ती घरात वळली.घरात होते तेवढे पैसे आणि बाळाची औषधं, कपडे एका पिशवीत भरून घेतले. न विसरता बारशाला आईनी दिलेली चेनही तिनं घेतली.आता तो प्रसंग आठवला की तिला दरवेळी वाटतं की किती योग्य सुचलं आपल्याला.नाहीतर दुसऱ्या दिवशी सकाळी घरी आल्यावर नवर्यांनी घातलेल्या गोंधळामुळे आपली किती पंचाईत झाली असती.सत्याच्या घरी आल्यावर तिला खरं म्हणजे खूप सेफ वाटलं होतं.तिच्या त्या चाळीसमोरच्या तीन मजली बिल्डींगमध्ये रहाणारा सत्या सर्वांना मदत करण्यात नेहमीच पूढे असायचा.
पावसाकडे बघताना रमा भूतकाळात हरवली.कोल्हापूरच्या जवळ असलेल्या गांवात तिच्या आईवडिलांच घर! गावाजवळ एक मोठा आश्रम असलेल्या बुवांच तिच्या घरात प्रस्थ होत.तिच्या प्रवचन,कीर्तन करणार्या बाबांना ते बुवा. एका गावात कार्यक्रमात भेटले होते.रमाची आई त्यांची भक्त झाली होती.रमाला आईचं थोडं आश्चर्य वाटायचं कारण आई तशी स्वभावानी स्वार्थी आहे हे तिला माहीत होतं. त्या बुवांच ऐकून अवघ्या अठराव्या वर्षी तिचं लग्न तिच्या आईनं एका तिशीच्या मुलांशी लावून दिलं.मुलाच गोरेगावला घर आहे, नोकरी आहे.अस सांगितलं त्यावर विश्वास ठेवुन आईनी बुवांचा आशीर्वाद समजून तिच्या मनाविरुद्ध लग्न लावून दिलं.
तिला सोडायला आलेली आई हे असलं घर, अत्यंत तुटपुंज्या पगाराची नोकरी, दारूचं व्यसन असलेला नवरा बघून थोडी दु:खी झाली पण ह्यात बाबांचा चांगलाच उद्देश असणार,'बघ तुझं भलं होणार असेल' असं समजावून निघून गेली.आणि गेली सहा वर्षे ती नवर्यांची दारू, मारझोड,संशय सहन करत होती.त्यात इतक्या वर्षांनी दिवस जाऊन मुलगा झाला होता.
ती रात्र सत्याकडे काढल्यावर सकाळी ती बाळ झोपलेला बघून घरी जाऊन किती नुकसान झाले आहे ते बघून येते असं सांगून निघाली.घरी नवरा आलेला होता."ए, घरात नाही यायचं .रात्रभर त्या सत्याच्या घरी झोपलीस ना!बस,ह्या घराचे दरवाजे बंद आहेत तुझ्यासाठी! सकाळीच पिऊन आला होता तो! रमाला कुठुन ताकद आली कुणास ठाऊक पण ती त्याला ढकलून घरात गेली.आणि स्वत:चे ओले घाण झालेले कपडे तिने पिशवीत भरले. तेवढ्यात नवरा पुन्हा अंगावर धावून आला."इथे नाही रहायच"रमा जोरात ओरडली"सोडूनच चाललेय, नाही येणार परत!त्याला हे अनपेक्षित होतं.
रमा सत्याकडे परतली आणि सत्याच्या आईला म्हणाली"काकू, कालपासून माझ्यावर तुमचे न विसरता येणारे उपकार आहेत.तुम्हाला कळलंच असेल काय घडलंय ते!कारण माझ्या नवर्याचा आरडाओरडा अजूनही सुरूच आहे.मी आईकडे जातेय प्लीज माझ्या बरोबर सत्याला येऊ देत का?सत्याच्या आईला सगळ्याच टेन्शनच यायला लागलं होतं.शिक्षीका असलेल्या त्यांनी नवर्यामागे कष्टांनी सत्यशीलला वाढवल होत्या. त्यामुळे त्यांनी तिला लगेच सत्याला घेऊन जायला परवानगी दिली.
गावाला घरी आल्यावर रमापुढे काही वेगळंच वाढून ठेवलं होतं.घरातली सगळीजण त्या बुवांच्या आश्रमात गेली होती.त्या बुवांच म्हणे अचानक निधन झालं होतं.आणि महत्त्वाचं म्हणजे बाबांना त्यांच्या गादीवर वारसदार म्हणून बसवलं होतं.रमाला आईच्या भक्तीच कारण कळलं होतं.
सत्याला घेऊन ती आश्रमात आली.ह्या सगळ्या प्रवासात तिला सत्याची हूशारी, धडाडी जाणवत होती.तो खूप ठामपणे तिच्या मागे उभा रहात होता.वीस वर्षांचा बी.काॅमच्या शेवटच्या वर्षाला असलेला सत्या वयापेक्षा जास्त मॅच्युअर वागत होता.
रमाच असं येणं तिच्या आईला आवडलं नव्हतं.रमाच्या बाबांमुळे ती आता आश्रमाची सर्वेसर्वा होणार होती.अशावेळी तिला रमा इथे नको होती.त्यात पुन्हा बरोबर एक तरूण मुलगा!आईनी त्या दोघांना एका खोलीत बोलावलं आणि म्हणाली"हे बघा इथे सगळी गडबड सुरू आहे तेव्हा आत्ता तुम्ही इथून जा.काही पैसे हवेत तर देते.एक मिनीट प्रचंड शांततेत गेलं.रमाला कालपासून दाबलेलं रडू फुटायला लागलं. तिला वाटलं इतक्या तान्ह्या नातवाची पण हिला दया येत नाहीय.एका हातात बाळ असलेल्या तिचा सत्यानी एका मित्राने धरावा तसा हात धरला.आणि "एक लाख द्या आम्ही जातो आणि ह्या पैशात ती सेटल होईल. मी जबाबदारी घेतो."सत्यानी ह्या परिस्थितीत कमाल हिम्मत दाखवली होती. तीस वर्षांपूर्वी लाख रुपये खूप मोठी रक्कम होती.रमा अवाक् झाली होती.माहित नाही कशी पण आई कबूल झाली.लढाई हरतोय म्हणे पर्यंत आयुष्यानी काही तरी वेगळंच वळण घेतलं होतं.गेल्या दोन दिवसांत रमाला वाटलं आपल्याला एकटेपण जाणवू लागला आणि मान वळवली की हा शेजारी उभा असतो.काय संबंध आहे माझा ह्याच्याशी!
त्या दोघांना परत आलेले बघून सत्याच्या आई खूपच अपसेट झाल्या.पण सत्यानी त्यांना काय समजावलं माहित नाही, त्यांनी तिच्या तिथे रहाण्याला विरोध नाही केला.बोलणं मात्र बंद केलं.
सुदैवानं आजूबाजूचे, शेजारचे लोक रमाच्या मदतीला धावून आले होते.तान्ह्या अथर्वला रमाच्या लेकाला सगळेजण आळीपाळीने सांभाळत होते. गेली पांचसहा वर्ष तिचे हाल सर्वांनाच दिसत होते.सत्याच्या चाळीत राहणारी आणि रमाची मैत्रीण असलेली वसुधा कोर्टात नोकरी करत होती.ती रमाला एका वकीलाकडे घेऊन गेली.
त्या वकीलाच्या सांगण्याप्रमाणे सत्या रमाच्या नवर्याकडे जाऊन"मी तुम्हाला पंन्नास हजार देतो.तू रमाला घटस्फोट द्यायचा आणि ही खोली तिच्या नांवावर करायची"सांगून आला.त्याच्या सारख्या दारूड्याला येवढी रक्कम त्याकाळात भरपूर होती.पूर्ण आयुष्यात तो इतकी रक्कम एकत्र मिळवू शकला नसता त्यामुळे तो लगेच तयार झाला.
दुकान बंद करायची वेळ झाली होती.दुकानातल्या बायकांनी रमाची तंद्री भंग केली."ताई निघू या का?आज तुम्ही घरी एकट्याच आहात ना? आम्ही येऊ कोणी सोबतीला.अथर्वदादा बायकोबरोबर बाहेर गेले आहेत ना?
"हो ना पण निघा तुम्ही, मी करेन दुकान बंद! वसुधा येणार आहे आज रहायला. तिच्या बरोबर जरा बाहेर जायचंय.तिचीच वाट बघतेय."रमानी सांगितल्यावर सगळ्याजणी गेल्या.
रमा दुकानाकडे बघून विचार करू लागली.सत्यामुळेच आपल्याला घर मिळालं, सुरवातीला त्याला कुठून तरी स्वस्तात मिळालेल्या साड्या विकून आपला हा व्यवसाय सुरू झाला.त्यानेही आपल्यासाठी साड्यांची खरेदी करताना स्वत:चा होलसेलचा कपड्याचा बिझनेस सुरू केला.
कुठेतरी आपल्या मनात त्याच्या बद्दल शारीरिक आकर्षण निर्माण होतय अशी रमाला जाणीव होऊ लागली होती.आणि एक दिवस अशाच आपण पावसात भिजून आलो होतो. सत्या घरात अथर्वला सांभाळतच होता.खेळताखेळता अथर्वला झोप लागली आणि जे स्पर्शाच्या भाषेतून कळाव अस रमाला वाटत होतं ते सगळं घडून गेलं.रमासाठी उत्कट प्रेमातल समर्पण होतं.पण सत्यासाठी तो एक अनुभव होता.रमा संसाराची स्वप्नं बघत होती आणि तो मात्र आनंद देणारा अनुभव वारंवार घेत होता.
आणि एक दिवस अचानक सत्या म्हणाला"रमा मी पारूलच्या प्रेमात पडलोय.गुजराथी आहे,तिच्या वडिलांच मार्केट मध्ये मोठ दुकान आहे.आपल्या ह्या व्यवसायामुळेच आम्ही भेटलो.तिला तुझ्या बद्दल सर्व माहित आहे.मुलुंडला रहातात ती मंडळी मी आईला घेऊन तिकडेच जातोय रहायला.साॅरी पण आता आपले हे संबंध आपण इथेच संपवूया.मी तिच्याशी लग्न करतोय.
रमाला जाणवलं आता येणार्या एकटेपणाशी झुंजताना सत्या शेजारी नसेल.
तिनी त्याला विचारलं"सत्यशील, कोणते संबंध?
त्या पावसाळी रात्री माणूसकीच्या दृष्टीनी घरी घेऊन गेलास ते संबंध!
की आईकडे माझा हात घट्ट धरून मैत्रीच्या भावनेने आईकडे पैसे मागितलेस तो संबंध!
का साड्यांच्या व्यवसायामुळे जुळलेले व्यावसायिक संबंध,
की गेले वर्षभर माझ्या समर्पणाच्या भावनेतून जुळलेले शारीरिक संबंध,
सत्या,जो संबंध आता एका मिनिटात माझ्यासाठी व्यभिचार झालाय.
तिला माहित होतं त्याच्याकडे उत्तर नव्हतं.
सतत आजूबाजूला असणारा तो पाठमोरा होऊन निघून गेला होता.
बाहेर पाऊस थांबला होता आणि वसुधा पण आली होती.तिच्या डोळ्यातलं पाणी बघून वसुधा म्हणाली"डोळे का भरुन आलेत.सत्याची आठवण झाली का?
"आठवायसाठी आधी विसरावं लागेल वसू ! रमा डोळे पुसुन दुकान बंद करायला लागली.
ललिता छेडा

No comments:
Post a Comment