Thursday, September 20, 2018

नकार


बॅंकेत जाण्यासाठी निघालेल्या उर्मिलेच्या हातात तिच्या आईने गजरा ठेवला."आता हे काय? तुला माहित आहे ना मी बॅंकेत नोकरी करते! नटूनथटून जायला मला अजिबात आवडत नाही".उर्मिला थोड्याशा रागानेच बोलली.
"अग,त्या बॅंकेतल्या तांबे मॅडमच्या चुलत जावेच्या माहेरच्या नात्यातला मुलगा तुला भेटायला येणार आहे ना? म्हणून म्हटलं जरा तयार होऊन जा हो"आईनी थोडंसं चाचरत विचारलं.
"आई,तो बारावी पास आहे."उर्मिला
"पण त्याचा स्वत:चा व्यवसाय आहे ना?आई
"घरातच कॅटरिंगच्या आॅर्डर घेतोय.तरीसुध्दा मी त्यांचा मान ठेवायला त्याला भेटेन म्हटलंय.पण गजरा काही घालून जाणार नाही देवाला घाल".उर्मिलानी आईला निरूत्तर केल होतं.देवापूढे गजरा ठेवताना त्यांनी मनापासून हात जोडले."परमेश्वरा, एकुलत्या एक एम्.काॅम्.असलेल्या, उत्तम नोकरी असलेल्या माझ्या या लेकीच लग्न ठरू दे. सोळा सोमवार करीन.थोडी सावळी आहे पण बाकी नाकी डोळी नीटस आहे".आई आपल्या हक्काच्या परमेश्र्वराकडे गार्‍हाणं घालत होती.
आणि बॅंकेत जाताजाता उमा मात्र विचार करत होती आईला हे तांबे मॅडमच कोणी सांगितलं असेल?
बॅंकेत एक गोरापान, सडसडीत, स्मार्ट पुरुष बसला होता.त्यांच्याकडे दुर्लक्ष करून ती सरळ आपल्या केबिनमध्ये गेली.तिच्या पाठोपाठ त्याला घेऊन तांबे मॅडम आत आल्या.त्या दोघांशी जुजबी बोलून तिने कामालाच सुरवात केली.ते दोघं बाहेर गेल्यावर तिची खास मैत्रीण चित्रा आत आली आणि म्हणाली."हा कशाला आला होता तुझ्याकडे?"तू ओळखतेस? उर्मिलानी विचारलं.अग ह्याची आई घरगुती जेवणाच्या आॅर्डर घेते आणि हा पोचवतो.संध्याकाळी कट्ट्यावर येऊन बसलेला असतो.माझ्या घराजवळच रहातो.उर्मिलाला तांबेंचा प्रचंड राग आला त्याच रागात तिने चित्राला घडलेलं सगळं सांगितलं."लगेच तांबेबाईला बोलाव आणि तुझा नकार कळवून टाक. आज बरेच दिवसांनी आपल्याला नकार द्यायचा चान्स मिळालाय"चित्रा सहज बोलून गेली पण उर्मिला मात्र थोडीशी दुखावली.विषय बदलून ती कामाला लागली.पण चित्रानी सहजच सुचवलेलं मात्र तिने तांबेबाईंवर वापरायचंच असं ठरवलं.पण दिवसभरात कामामुळे तिला वेळच नाही मिळाला.

घरी आल्यावर आईची उत्सुकता तिच्या डोळ्यात दिसत होती.तिला सर्व सांगितल्यावर "कशी ही बाई फोन केलान तेव्हा जणू काही मोठा व्यावसायिक असावा असं वर्णन करत होती."आई रागाने बोलली उमाला मात्र आईला कसं कळलं ते कोडं उलगडलं.
दुसऱ्या दिवशी सकाळी बॅंकेत पोचल्यावर लगेच तांबे मॅडमना आधी आपण नकार सांगायचा असं ठरवूनच ती बॅंकेत आली.पण तांबेंनी डाव साधला आणि तिला दारातच सर्वांसमोर " साॅरी बाई उर्मिला, नकार दिलाय आमच्या वहिनींच्या भाच्यानी! पण चित्रा मात्र तयारीतच होती.तिला कळलं होतं ह्या काय करणार आहेत ते, तिनी लगेच तिथे येऊन "पण मॅडम,उम्मीनी मला कालच सांगितलं होतं माझाच नकार आहे असल्या डबे पोचवणार्‍या उद्योजकाला! आणि मॅडम जरा अशा गोष्टी सर्वांसमोर सांगू नयेत ह्याच भान राहू दे." असं ठणकावून सांगितलं.मॅडम फणकार्‍यात तिथून निघून गेल्या.
"साॅरी उम्मी,हे सर्व सगळ्यांसमोर झालं पण अशा माणसांना हीच भाषा कळते"चित्राने डोळे भरून आलेल्या उर्मिलाला समजावल.
"नको वाईट वाटून घेऊ.मला तर पावलोपावली अशा तांबे भेटतायत.फक्त त्यांचे विचार बदलायला हवेत आणि तुझ्यासारखी मानसिकता तयार व्हायला पाहिजे असं वाटतंय"शांतपणे बोलून उर्मिला केबिनमध्ये गेली.
स्वत:च्या खूर्चीवर बसून तिनं मान मागे टाकली.पंचविसाव्या वर्षांपर्यंतचा वेळ शिक्षण,नोकरीचा शोध ह्यातच गेला.त्यानंतर लग्नासाठी शोध सुरू केला.आणि पत्रिका जुळणं,सावळा रंग, चाळीत असलेलं घर अशा अनेक गोष्टींमुळे नकार यायला लागले.हे सगळं आवडत नसलं तरी आपल्याला लग्न हवंय हेही खरं होतं.पण अचानक बाबाच गेले आणि आपण खूप एकट्या झालो.कारण त्यांच्या पुरोगामी विचारांनी त्यांचा आधार असायचा.ते म्हणायचे"लग्न जितकं आवश्यक आहे तितकच स्वत:ला सिध्द करणं पण गरजेच आहे.उर्मिला भुतकाळातच होती आणि तिच्या बाॅस आल्या त्यांना सगळं कळलं होतं.मायेनी त्यांनी तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि उर्मिलानी दचकून त्यांच्याकडे बघितलं."साॅरी मॅडम"उमा ओशाळून म्हणाली."काही हरकत नाही, बॅंकेच्या कामासाठी बाहेर जायचय, तूच जा.गाडी खाली उभी आहे काम झालं की तिथूनच घरी जा.फ्रेश होशील."बाॅसच्या शब्दांनी उर्मिलाला बरं वाटलं.
घरी आल्यावर दारातच आईनी हसून स्वागत केलं.तिला हसताना बघून उर्मिला म्हणाली"येवढी खूष का?"अग,तुझा फोटो घेऊन गेलेल्या साटमांकडून होकार आलाय.आणि साटमवहिनींनी तुला बघितलय.पत्रिका पण जुळलेय.तेव्हा आता तू काही विचार करू नकोस.उद्या रवीवार आहे त्यामुळे तो मुलगा इथे येतोय आणि तुला बाहेर घेऊन जाणार आहे.उर्मिलाला वाटलं दिवसभराच्या मनस्तापाचा शेवट तरी बरा होतोय.
दुसऱ्या दिवशी चारच्या सुमारास उंच,थोडासा थोराड आणि दिसायला ठीक वाटणारा एक तरुण दारांत उभा राह्यला."नमस्कार मी अक्षय साटम काल आईशी झालेल्या बोलण्यानुसार उर्मिलाला बाहेर न्यायला आलोय.आई थोडीशी गडबडली."बसा तरी.मी चहा टाकते."नको आम्ही आधी शिवाजी पार्क जाणार आहोत.मला काम आहे."अक्षय मोजकच बोलत होता.
चाळीच्या खाली गाडी उभी होती.अक्षयनी स्वत: दरवाजा उघडून उर्मिलाला बसायला सांगितलं.गाडीत बसताना झालेला स्पर्श, उर्मिला मोहरली! तिच्या मनात आलं"आपल्या आयुष्यातला होकार romantic होईल असं दिसतंय!
गाडी शिवाजी पार्क जवळच्या गल्लीत उभी राहिली.गल्ली थोडी सुनसान होती."चल, माझ्या मित्राचं घर आहे".अक्षयनी गाडीतून उतरून तिचा दरवाजा उघडला.लिफ्टनी वर गेल्यावर अक्षयनी खिशातून ब्लाॅकची चावी काढली आणि दरवाजा उघडला.उर्मिला दाराशी थबकली."हे काय घरांत कोणी नाही?उर्मिलानी विचारलं.
‌‌ "आत ये"अक्षयच्या आवाजात कोणतीही भावना नव्हती.आता मागं फिरण्यापेक्षा पुढे जावं ह्या विचारानी उर्मिलानी पाय उचलला आणि त्यानं तिला आंत ओढून पटकन दार बंद केलं.आणि तिला मिठीत घेऊन कानाशी पुटपुटला"होकाराच्या आधी हे सुख ----हे ऐकल्याबरोबर तिने आपली संपूर्ण ताकद लावून त्याला ढकललं आणि दरवाजा उघडून ती बाहेर आली.लिफ्ट अजूनही त्याच मजल्यावर उभी होती.पटकन लिफ्ट मध्ये जाऊन तिने ती सूरू केली.लिफ्टमधून तिला दिसलं की तो बेसावध पडल्यामुळे अजून उठूच शकला नव्हता.

बिल्डिंग बाहेर आल्यावर समोर असलेल्या टॅक्सीत बसून तिनं मोकळा श्र्वास घेतला.वरच्या बाल्कनीत तो उभा असलेला जाणवलं."स्टेशन"टॅक्सी ड्रायव्हरला सांगून तिने डोळे बंद करून सीटवर मान‌ टाकली. केवढी मोठी किंमत मोजावी लागली असती ह्या होकाराच्या नादात!
 आपला 'नकार' सुध्दा ह्याला नाही कळवायचा.
खिडकीतून येणारी हवेची झुळुक मात्र त्या अनपेक्षित स्पर्शाची, अंगभर पसरलेल्या त्या गंधाची आठवण करून देत होती.
ललिता छेडा

No comments:

Post a Comment