पण गेल्या वर्षी गणपती झाल्या झाल्या त्यांचा बंगला आणि बंगल्या मागचा प्लाॅट विकासासाठी बिल्डरला दिला तेव्हाच असं नक्की झालं होतं की त्यांचा बंगला पुढे आणि मागच्या असलेल्या जागेत बिल्डींग!!!पण त्यांचा बंगला आधी आणि बिल्डींग नंतर बांधायचे मुख्य कारण म्हणजे गणपती नवीन घरीच यायला हवेत असा आजोबांचा हट्टच होता.कारण त्या जागेवर सर्वप्रथम त्यांच्या पंणजोबांचा वाडा होता.नंतर तिथे त्यांच्या आजोबांनी बंगला बांधला आणि आता हा नवीन पिढीच्या सोयीसुविधा जाणून बांधला जाणारा बंगला!! आणि पिढ्यानपिढ्याचा गणपती इथेचआणला गेला पाहिजे असा आजोबांचा आग्रहच होता.पुन्हा बिल्डरनी तात्पुरती वर्षभरासाठी दिलेली जागा पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरचे छोटे ब्लाॅक होते.तिथे गणपती आणणं जिकीरीचं होणार होतं.गेलं वर्षभर काम खूप पटापट झालं होतं पण पावसाळा सुरू झाला आणि काही ना काही तरी कारणांमुळे काम रखडायला लागलं.आणि बिल्डरनी मागच्या बाजूच्या बिल्डींगच काम पण सूरू केलं. होतं.त्यामुळे तिथे खूप लोखंड, सिमेंटचा पसारा पडला त्यामुळे राधाच्या बाबांना कळलं होतं की गणपती पर्यंत बंगला होणं शक्य नाही.पण आजोबांना हे सांगायचं कसं? त्यासाठी त्यानी राधाच्या आई आणि आजीला सांगून नारळी पौर्णिमेला आजोबांच्या धाकट्या भावाला म्हणजेच सदाकाकाला आणि बहिण माईआत्याला जेवायला बोलावलं.राधाला सगळ्या लपवालपवीची भारी मज्जा येत होती.
तिला वाटलं आजोबा तर किती समजूतदार आहेत. ही मंडळी उगीचच घाबरताहेत! तिला आठवलं ती गेल्यावर्षी ऐन बारावीच्या परीक्षेवेळी खूप आजारी पडली तेव्हा आई खूप अपसेट झाली होती आणि ती परीक्षेला बसूच शकली नाही.तेव्हा आजोबा किती छान बोलले होते"अग,हा तिच्या आयुष्यातला 'स्वल्पविराम' आहे असं समज काही आभाळ कोसळल नाही!वेगळा पर्याय मिळणार असेल म्हणून ती आजारी पडली अस समज! एका वर्षाच्या स्वल्पविरामानी ती त्या काळात करीअरबद्दलच्या पर्यायांचा विचार करेल.आणि ते १००टक्के खरं ठरलं होतं,तिनी वर्षभरासाठी लावलेला अॅनिमेशनचा क्लास तिला खूप इंटरेस्टिंग वाटत होता.
"आजोबा हा सलपविराम काय आहे"असं आपण विचारल्यावर ते म्हणाले होते "काॅमा."आणि मराठीतला उच्चार नीट करून दाखवला होता.त्यानंतर लग्नाला वर्षच झालेली ताई अचानक बॅग घेऊन आली आणि पुन्हा एकदा आई,आजी काळजी करू लागल्या होत्या.आणि ताई तर अगदी सहजच आलेय म्हणत होती.आजोबांनी आई, आजीला ताई बाहेर गेली असताना सांगितले"शांत रहा ती चार दिवसांत परत जाईल, नाही तर तिचा नवरा तिला घ्यायला येईल, किंवा कारण गंभीर असेल तर त्यांचा फोन येईल. राहू दे तिला इथे!मिळू दे तिला वेळ विचार करायला.पण चौथ्याच दिवशी तिचा नवरा तिला घ्यायला आला.आणि राधानी हांक मारून"आजी जिजू आलेत आणि आजोबा तुमचा स्वल्पविराम सक्सेसफुल! असं हसत हसत सांगितलं होतं आणि अशा आजोबांना ही मंडळी उगीचच चुकीचं समजताहेत असं राधाला खात्रीपूर्वक वाटत होतं.
ठरल्याप्रमाणे आत्या,काका आले आणि जेवणं झाल्यावर आत्या म्हणाली"झाला का नवीन बंगला तयार, कधी होताय शिफ्ट?त्यावर राधाचे बाबा पटकन म्हणाले"नाही ना, बहुतेक गणपती ह्यावेळी काकांकडे आणावे लागतील! आणि त्याबरोबर आजोबा उसळून म्हणाले"अजिबात चालणार नाही.त्याच वास्तुत गणपती आणण्याची आपली परंपरा आहे.ती तशीच चालू राह्यली पाहिजे.दोन्ही घरच्या माहेरवाशिणी चार दिवस रहायला येतात. सगळ कस जमेल तिथं?उद्या पासून मीच लक्ष घालतो बांधकामात.तेवढ्यात आजी म्हणाली"अहो सदाभाऊजी पण तुमचा सख्खाभाऊच आहे की मग त्यांच्या घरी का नाही चालणार गणपती? आणि त्यांच्या समोरचा ब्लाॅक आहे ना रिकामा किल्ली असतें त्यांच्या कडेच! का त्यांची नातसून गुजराती आहे म्हणून नाही म्हणताय!आजीनी आजोबांच्या रागात चांगलच तेलच ओतलं होतं.तेव्हापासून आजोबा कोणाशीच बोलत नव्हते.त्यात पुन्हा त्यांनी चार दिवस साईटवर जाऊन प्रयत्न पण केला त्यात पण ते अयशस्वी झाले होते.भरलेल्या घरात उगीचच एकटे झाले होते.
गणपती यायच्या दोन दिवस आधी आजी तयारीसाठी तिकडे जायला निघाल्या."तुम्ही कधी येणार आहात? असं आजोबांना विचारल्यावर "मी फक्त प्राणप्रतिष्ठेच्या वेळी येईन"असं तुटक उत्तर त्यांनी दिलं."आजी मी आजोबांबरोबर"राधानी आपली पार्टी जाहीर केली.आणि आजोबांच्या चेह-यावर थोडं हसू आलं.
आजी तिथे पोचल्यावर तासाभरात सदाआजोबांची नातसून उर्मि आली.आल्याआल्या आजोबांच्या पाया पडली आणि म्हणाली"दादाजी, मी तुम्हाला न्यायला आली आहे.आपल्या घरी बाप्पा येणार तेव्हा आम्हा सर्वांना तुम्ही हवातच! मी असं मानते की बाप्पानीच हा आम्हाला मान दिला आहे.पण तुमच्याशिवाय तुमच्या भावाला हा आनंद कसा घेता येईल?उर्मि तिच्या लहजात मराठी बोलत होती.आजोबा तिच्या कडे बघून हसले आणि राधाला म्हणाले
"राधा,चल माझी तुझी बॅग भरूया"
"आजींनी तुमची बॅग भरून ठेवलीय"उर्मि हळूच बोलली.
"माझीतर कधीच तयार आहे."राधा हसली.
आजोबांच त्या घरी मस्त स्वागत झालं. सदाकाकाचे डोळे आनंदाने भरून आले होते.बाप्पांच मखर उर्मिनी साड्यांचे गोफ करून बनवलं होतं.उर्मिच्या आई त्यांच्या पध्दतीचे लाडू घेऊन आल्या होत्या.त्या लाडवांना त्यांच्यात मोदक म्हणतात हे पण आवर्जून सांगत होत्या.
"चला राधाताई अर्धविराम देता देता आपला बंगला,सदाकाकाच घर ह्यातून हे घर निवडून तुमच्या आजोबांनी स्वल्पविरामाच्या कथेला छानसा पूर्णविराम दिला."आजी हसत हसत म्हणाल्या.
दुसऱ्या दिवशी बाप्पांना आणायला जायचं म्हणून आजोबांनी टोपी घातली.आणि राधाला"चल की तू पण! म्हणाले.राधानी "एका अटीवर येईन,मला सांगा इतके हट्टाला पेटलेले तुम्ही इतक्या सहजपणे कसे इथे यायला तयार झालात?
"असं बघ, मी तुला मराठी पुस्तक वाचायला दिली तेव्हा तुला विरामचिन्हे आली की कधी थांबायचं, प्रश्र्नचिन्ह कसं वाचायच, कधी शब्दांवर जोर द्यायचा हे शिकवलं होतं.
आयुष्य जगताना पण पुस्तकासारख वाचलं की जाणवतं "जगाला बदलायला जाण्यापेक्षा स्वत:लाच बदलण योग्य असतं"त्यामुळे ह्या वयातलं जगण सोप्पं होऊन जातं.आजोबा भारावून बोलत होते.
"मिळालं का उत्तर,चला मग गणपती आणायला"राधानी आजोबांकडे अभिमानाने पाह्यलं.
मागे उभ्या असलेल्या आजींचा हात हातात घेऊन उर्मिनी तो हलकासा दाबला.
ललिता छेडा

No comments:
Post a Comment