माईंच्या घरातून भजनाचे स्वर येत होते.आणि मला नक्की माहित होतं की आमच्या मजल्यावरच्या सगळ्या ब्लाॅकचे दरवाजे उघडे असतील अगदी आमच्या गुजराती भाभींचा सुध्दा!
दर सोमवारी सकाळी आणि गुरुवारी संध्याकाळी माईंच्या घरी भजनी मंडळाच्या बायका प्रॅक्टिस करायला येत असतात.आम्हा सगळ्यांनाच इतकं प्रसन्न वाटायचं ते सूर ऐकताना!
अचानकांचे आवाज थांबले म्हणून मी दरवाज्याबाहेर डोकावले.तर माईंची धाकटी सुन तिच्या दोन्ही मुलांना माईंकडे सोडायला आली होती.ही दारातूनच त्यांना सोडत होती आणि माई तिला विचारत होत्या"अग,शाळा नाही का आज?
"नाही,त्यांचे स्पोर्ट्स सुरू आहेत, त्यामुळे अकरा वाजता जातील.दोन दिवस इथेच राहतील आणि हे पण रात्री जेवायला इथंच येतील बरंका.मला दोन-तीन दिवस एका लग्नाची मोठी आॅर्डर आहे.त्यामुळे मला वेळच नाहीये.
मुलं आली की तुम्हाला आवडतं ना! म्हटलं तुम्हाला थोडा चेंन्ज!सुन माईंवर उपकार केल्याच्या आवाजात बोलून निघाली.
लिफ्ट मध्ये जाताना मला बाय करायला विसरली नाही.
मी माईंकडे बघितलं.त्यांच्या चेह-यावरची चिंता स्पष्ट दिसत होती.उद्या त्यांचा भजनाचा कार्यक्रम होता आणि हे सगळं गळ्यात पडलं होतं. मी माईंना हातांनी इशारा करून 'मी आहे,घेईन सांभाळून'अस सांगितलं.पण मनात आलं "तुम्हाला काही अडचण आहे का"? अस माईंना विचारायचं सौजन्यसुध्दा त्यांच्या सुनेकडे नव्हतं.
मला बाहेर जायचं होतं म्हणून मी आत गेले खरी पण डोक्यातून माईंची असहाय्यता जातच नव्हती.
नाना माईं आणि आम्ही सोसायटीत एकदमच रहायला आलो.माईंना दोन मुलगे.ती मंडळी सोसायटीत रहायला आली तेव्हा त्यांचा मोठा मुलगा नुकताच बॅंकेत नोकरीला लागला होता आणि धाकटा इंजिनिअर होणार होता.दोन्ही मुलगेच म्हणून आणि त्यांच्या सल्ल्यानीच नानांनी थ्री बेडरुमचा ब्लाॅक घेतला होता.मोठ्याचं लग्न झालं आणि सुन नोकरी करणारी होती. तिचं माई सगळं हौसेने करायच्या.पण धाकटी सून आली आणि मोठीनं अचानक नानांना "आम्हाला वेगळं रहायचंय" असं सांगितलं. म्हणे म्हणेपर्यंत बॅंकेतून कर्ज काढून ब्लाॅक घेऊन ते वेगळे रहायला पण गेले.
नाना त्यावेळी खूप चिडले होते.माईंनी त्यांना खूप समजावलं.तोपर्यंत आम्हा दोन्ही घरात पण खूप जवळचं नातं निर्माण झालं होतं.मला देखील मुलं लहान असल्यामुळे माईंचा आधार होता.आम्ही दोघ पण नानांशी बोललो पण ते दुखावलेच....
धाकट्या सुनेची पण लक्षणं ठीक दिसत नव्हती.तिला स्वत:च पार्लर काढायचं होतं.आणि ते मी माझ्या घरातच सूरू करेन, इथे नाही जमणार असं म्हणून ती पण एक दिवस वेगळी झाली. दोन्ही वेळेला मुलांच काही चाललं नाही याच मात्र मला राहून राहून नवल वाटत होतं.ह्यावेळी मात्र नाना शांत होते.
बाहेर पडताना माईंकडे डोकावले.भजनी मंडळाच्या बायका तर गेल्या होत्या.आणि माई जेवणाची तयारी करत होत्या. मी "माई ठरल्याप्रमाणे सुमनकडे जेवायला जातेय"असं दारातूनच सांगून निघाले.
हे टुरवर आणि वर्षाअखेरीची पार्टी करायला शनिवार-रवीवार मुलगा-सून मुंबई बाहेर जाणार असल्याने मी पण माझ्या मैत्रिणींना शनिवारी रात्री जेवायला बोलवायचं ठरवलं होतं. सुमन माझी आतेबहिण आणि मैत्रिणही असल्यामुळे तिच्याकडे सर्व ठरवायला येते असं म्हटल्यावर तिनं जेवायलाच बोलावलं होतं.माईंना तर सर्वच माहीत होत.
उशीर झाल्यामुळे सुमन पानं घेऊन वाटच बघत होती.तिची दोन्ही मुलं शाळाकाॅलेजला गेली होती.मिस्टरही कामावर गेले होते.त्यामुळे आम्ही दोघीच होतो.
शनिवारच्या माझ्या घरच्या जेवणाचा मेनू ठरवताना मला एकदम आठवलं "अग,सुमे तुझ्या मिस्टरांच्या गृपच दर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी गेट टू गेदर असायचं ना? अजूनही भेटता कां ग? आणि हा शनिवार शेवटचा आहे तरी सुद्धा तू माझ्या घरी यायचं आणि नंतर तिकडे उशिरा जा बाई! नाही तरी तुमचं ते नाईट आउट का काय असतं ना.तेव्हा उशिरा गेलीस तरी चालेल"मी तर सुमनवर भडीमारच केला होता.
"हे बघ,ते ह्यांच्या मित्राच्या बंगल्यावर शेवटच्या शनिवारी भेटणं अजूनही सुरू आहे.पण मी मात्र जात नाही.सुमी शांतपणे बोलली.
"ऐकलं बरं मिस्टरांनी"माझं कुतूहल.
"पहिल्या वेळी त्यांनी दुर्लक्ष केलं.दुसर्यावेळी खूप चिडचिड केली पण मी येणार 'नाही' इतक्या ठामपणे सांगितलं की त्यांना तो नकार स्वीकारावा लागला"सुमन बोलत असताना मध्येच मी विचारलं"अग, पण तू जाणं बंद का केलस?"
"खर सांगू,हे पुरुष ग्लास घेऊन बसणार. त्यांना काहीजणी कंपनी देणार, इतर बायकांचे विषय म्हणजे,माॅलमधली खरेदी,टी.व्ही.सिरीयल्स, आणि मला खूप कंटाळा यायचा. मन रमायचच नाही.आणि ठरवलं 'नाही' जायचं.सर्वानी खूप आग्रह केला.वेगवेगळे पर्याय सुचवले.हे थोडे दिवस रागावलेले होते पण मी ठाम राहिले.
"मी आता त्या दिवसाची वाट बघते कारण ती संध्याकाळ माझी असते कधी मुलांबरोबर,कधी छानस पुस्तक वाचत,मी माझी असते.तेव्हा आपल्या मनाविरुध्द दुसऱ्याचं मन राखण्यापेक्षा 'नाही' म्हणायला शिकावं".सुमन बोलत होती पण माझ्यासाठी तो नवीन वर्षाचा संकल्पच होता.
दुसऱ्या दिवशी सकाळी आवरून माईंकडे गेले.त्या खूप थकलेल्या वाटल्या."आज बसतील मुलं माझ्या घरी,तुम्ही जा भजनाला"मी माईंना म्हटलं."
"छे ग,धावपळ होईल.अग, एकटी रहाते तरी स्वैपाकाला,वरकामाला मी बायका ठेवल्यात. पण येवढं मोठ घर दोन्ही मुलंं एकत्र राहतील ह्या मोहानी घेऊन ठेवलंय आणि ही मुलं आली की पसारा करून ठेवतात.आवरताना थकायला होतं.आणि मुलांना खायला पण सारखं लागतं.माईंच खरं होतं.
माझ्या मनांत कालचा सुमनच्या 'नाही'चा विचार घोळतच होता. मी माईंना म्हटलं" तुम्ही आता दोन्ही सुनांना जेव्हा स्वत:ला नको वाटतं असेल तेव्हा 'नाही' म्हणायचं असा ह्या नवीन वर्षापासून संकल्प करा.
"अगदी खरं आहे तुझं,हल्ली मी हा विचार सारखा करतेय .माई माझ्या जवळ येऊन बसल्या आणि म्हणाल्या"अग तीन वर्षं झाली नानांना जाऊन त्यांच्या जाण्यानंतर तर ह्या दोघी मला फारच गृहित धरतात.नाना होते तोपर्यंत दोघी वचकून असायच्या.
नानांच्या आठवणींनी माईंना भरून आलं होतं.तरीसुध्दा त्या बोलत होत्या"गेल्या वर्षी आठवतं ना तुला मोठ्या सुनबाईंनी माई,चुंदा करून द्याना असं म्हणून दोन किलो कैर्या आणून ठेवल्या.किसून त्याची उस्तवार करताना खांदा दुखुन आला.
पण 'नाही' म्हणायचंच असं मात्र मनात आलं जेव्हा मला मोठ्या लेकानी कौतुकानं महाबळेश्वरला नेलं.पहिल्या दिवशी सकाळी त्याच्या दोन्ही मुली शाॅपिंगला गेल्या आणि येतो थोड्या वेळाने असं म्हणून ही दोघं गाडीने जी गेली ती चार वाजता आली.आणि आल्यावर सुन काय म्हणते"फाय स्टार हॉटेल आहे,फिरलात की नाही सगळीकडे! इतका संताप झाला ना! दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे उशिरा उठले मला मुलींबरोबर पाठवून आम्ही दोघे हाॅटेलवर आराम करतो म्हणाले.मला वाटलं मी का आले ह्यांच्या बरोबर? 'नाही'येणार असं कां नाही म्हटलं?
आम्ही दोघी बोलत होतो आणि माईंच्या धाकट्या सुनेचा माझ्या मोबाईलवर फोन आला" काकू माई फोन उचलत नाहीत.जरा बघता का?
अग, मी इथे माईंकडेच आहे.फोन आत असेल म्हणून कळलं नाही.थांब मी देते त्यांना आणि मी फोन माईकवर ठेवला "माई,आज रात्री मी येते मुलांना न्यायला पण शनिवार रविवार मला जरा आॅर्डरसाठी पुण्याला जावं लागतंय तिला पुढे बोलू न देता माई एकदम म्हणाल्या"हे बघ, मला शनिवारी भजनाचा कार्यक्रम आहे आणि रविवारी मला पण काही काम आहे तेव्हा मला ह्यावेळी 'नाही' जमणार! नंतर पण मला विचारल्या शिवाय काही ठरवत नको जाऊस.त्या काही बोलायच्या आधीच फोन बंद झाला होता.
"अरे माई, इतक्या पटकन तुम्ही निर्णय घेतलात"मी हळूच विचारलं.कारण त्यांच्या सुनेनी माझ्या फोनवर फोन केला होता.
"तू अजिबात काळजी करू नकोस.महाबळेश्र्वरच्या अनुभवानंतर मी किती दुखावलेय तुला कल्पना नाही.आणि काल धाकटी आतसुध्दा आली नाही.माझ्या भजनातल्या मैत्रीणींकडे बघितलं सुध्दा नाही.ह्या सगळ्यापुढे माझा नकार काहीच नाही.आणि हे सगळं मी त्या दोघींना प्रसंगांसह सांगणार आहे.नाना गेल्यापासून मी हे सहन करतेय.मी एकटी आहे म्हणून अपमान सहन 'नाही'करणार.नानांबरोबर मी खूप प्रवास केलाय.मी मरेपर्यंत ह्यांच्या पूढे हात पसरावा लागणार नाही इतका पैसा नानांनी ठेवलाय. मी 'नाही' म्हणायला थोडी उशिराच शिकले.
माईंचा संताप अनावर झाला होता.
मला मात्र माझा पहिलाच विद्यार्थी "नाही"म्हणण्यात यशस्वी झाला होता त्याचा खूप आनंद झाला होता.

अगदी पटतय.कधी कधी नाही अनेक वेळा केवळ समोरच्याच्या मनाचा विचार करून आपल मन मारून सगळ्याला हो म्हटल जात घुसमट होते पण नात तुटेल की काय अशी भिती वाटते म्हणून नकार द्यायचा टाळल जात. पण ब्लॉग मधल्या आजीं सारखं नाही म्हणता आलंच पाहिजे बघुया कितपत आणि कधी जमतंय ते
ReplyDelete