आज वर्ष झालं मंजिरी कडच्या लग्नाला! पण अनूराधासाठी आठवणी मात्र अजूनही ताज्या होत्या.
गेल्या दिवाळीत मंजिरीनी अनुराधाला "तिचा लेक अमेरिकेतून नव्हेंबरमध्ये तीन महिन्यांसाठी येतोय आणि लग्न करूनच जाणार आहे"असं सांगितलं आणि एका वेगळ्याच अनुभवाला सुरवात झाली.
मंजिरीची आणि अनुराधाची बाल्कनी अगदी समोरासमोर, अनुला बागेची आवड त्यामुळे तिची सकाळी झाडांना पाणी घालायची वेळ आणि मंजिरीची सकाळच्या चहाची वेळ एकच असायची.एकेमेकींकडे बघून हसण्यापासून जवळच्या मैत्रिणी होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास खरं म्हणजे सोसायटीतल्या मंडळींसाठी कुतुहलाचा विषय होता.कारण मंजिरीची एकंदर इमेज शिष्ट अशीच होती.कारणाशिवाय आणि कामाव्यतिरिक्त ती कोणाशीही बोलत नसे.
अनूला मात्र मंजिरीच्या ह्या वागण्यामागचं कारण माहित होतं.तिच्या लेकाच्या म्हणजेच पार्थच्या जन्मानंतर पाचच वर्षांत मंजिरीच्या यजमानांना कॅन्सर झाला.. दोन वर्षे त्यांच्या आजारपणाशी लढताना मंजिरीनी नवऱ्याचा एजन्सी चा व्यवसाय समजून घेतला.आणि नवर्याच्या मृत्यूनंतर स्वत:ला व्यवसायात आणि पार्थला मोठं करण्यात इतकं गुंतवून घेतलं की तिचा आजुबाजुच्या जगाशी संबंधच राह्यला नाही एकल पालकत्व स्वीकारलेल्या स्त्रीयांच असं थोडंसं होतच हे अनू जाणून होती.त्यामुळेच अनूला मंजिरी आवडायची. त्यात पुन्हा मंजिरीचा मुळचा स्वभाव थोडासा शिस्तीचाच होता.
पण मंजिरीसाठी अनूची मैत्री मात्र खास होती.प्रत्येक गोष्ट अनूला सांगणं हे मंजिरीच 'मोकळ होणं' असायचं.त्यामुळेच पार्थसाठी मुली बघण्यापासून लग्न ठरवण्यापर्यंत"तू माझ्या बरोबरच हवीस" अशी मंजिरीनी अनूला प्रेमळ ताकीदच दिली होती.
दिवाळीनंतरच्या गुरुवारी पार्थ आला. दोन दिवस जेटलॅग मध्येच गेले.शनिवारी संध्याकाळी अनू मिस्टरांबरोबर मंजिरीकडे गेली कारण रविवारपासून मुली बघायला सूरवात होणार होती.
मंजिरीनी जवळपास दहा पंधरा मुलींचे बायोडेटा निवडून ठेवले होते,त्यांच्या पत्रिका जूळवून ठेवल्या होत्या. मुलींना बघायला जायचे दिवस,वेळ अतिशय व्यवस्थित ठरवून ठेवलं होतं.
पार्थ येणार म्हणून मंजिरीचे कोकणातून सासू सासरे, मुंबईतच रहाणारीआई असे सगळेजण आले होते.
पण अनू घरातून निघत असतानाच पार्थचा what's app वर मेसेज आला.'मावशी, माझं लग्न मी ठरवलंय आणि हे आईशी बोललोय.ती जरा चिडलेय, सांभाळून घे." अनूनी मेसेज नवर्याला वाचायला दिला.
अनूला मंजिरीकडे आलेलं बघून दोन्ही आज्यांनी तिचं मनापासून स्वागत केलं.मंजिरीची आई हळूच जवळ येऊन म्हणाली" मंजिरी तिच्या बेडरूममध्ये लॅपटॉप घेऊन बसलेय.तुझीच वाट बघत होतो.तूला कळलय ना?"हो,पार्थनी आत्ताच मेसेज केलाय.पण अजून नीटसं कळलं नाही."अनु बोलत बोलत आत गेली.
अनूला बघितल्यावर मंजिरीनी लॅपटॉप बंद केला आणि 'ये' असं म्हणून जवळच्या खुर्चीवर बैस अशी खूण केली.अनू मागोमाग पार्थ पण आला.त्याच्याकडे न बघता "बघितलस गेले सहा महिने मी ह्याच्याशी मुली बघण्याविषयी बोलतेय हा पठ्ठ्या सगळ ऐकतोय आणि आज दुपारी जेवताना म्हणतोय"आई, मला सोनिया बरोबर लग्न करायचंय.ती मारवाडी आहे.ती पण अमेरिकेत शिकतेय""बोल आता काय करायचं?मंजिरीच खरं होतं.तिनी तिच्या शिस्तीत केलेल्या तयारीला पार्थनी सुरूंगच लावला होता.
साॅरी,मम्मा मला वाटलं इतक्या दूरून अमेरिकेतून सांगण्यापेक्षा भेटल्यावर नीट सांगेन. तुझी थोडी भीती पण वाटत होती!सोनियापण माझ्या बरोबरच इंडियात आलेय! वाटलं,तुझी तिची भेट घालून देऊ.तिच्या घरी सर्व माहित आहे.त्याना मी पसंत आहे.तिचे आई-वडील गेल्या वर्षी तिथं आले होते तेव्हाच मी त्यांना भेटलो होतो"पार्थ एका दमात बोलला.अनूमावशी आल्यामुळे त्याला धीर आला होता.
मंजिरीला आता नेमकं काय वाटतंय ते अनूला समजलं होतं. पण तोपर्यंत दोन्ही आज्या, आजोबा,अनूचा नवरा सगळेच आत आले.गंमत म्हणजे अनूच्या दोन्ही मूली पण आल्या होत्या.कारण पार्थच लग्न हा सगळ्यांच्याच आनंदाचा विषय होता.
अनूच्या मुलींकडे बघत मंजिरी म्हणाली"नशीबवान आहेस दोघींची पाठवणी केली की तू मोकळी!
"मंजिरी, आता मी जरा बोलू का?अनूनी बोलायला सुरुवात केली." उद्या आपण आता येणार नाही हे आधी मुलींकडच्यांना कळवायला हवं. आपण त्यांच्याकडे येणार म्हणून ती मंडळी तयारी करत असतील.
पार्थ, सोनिया कडच्या मंडळींना आपण कधी, कुठे भेटायचं ते ठरवं!अनूनी परिस्थिती हातात घेतली होती. त्याबरोबर हळूहळू सगळेजण सवयीप्रमाणे मोबाईल वर बोलत बोलत बाहेर गेले.
बेडरूममध्ये अनू एकटी राह्यल्यावर मंजिरीचे डोळे भरून आले.अनूला माहीत होतं की 'वास्तव स्वीकार' हे सांगणं सोपं असतं पण मनातलं वादळ अश्रूंवाटे बाहेर पडणारच होतं.त्यासाठी त्या दोघींनी एकट असणं आवश्यक होतं.
"अनू त्यानी प्रेमविवाह करायला माझी काहीच हरकत नव्हती.पण त्याला मला सांगाव असं वाटलं नाही ह्याच दु:ख होतंय.माझी शिस्त, कठोरपणा हा परिस्थीतीनुसार आवश्यकच होता येवढं देखील कळलं नाही ह्या मुलाला"बोलल्यावर शांत झालेली ती थोडावेळ डोळे मिटून बसली."चल, मी जरा फ्रेश होऊन येते नंतर कामाला लागूया" म्हणाली आणि वातावरणातला ताण कमी झालाय ते अनुला जाणवलं.
स्वभावाप्रमाणे मंजिरीनी स्वत:ला सावरलं होतं.पण आंत कुठेतरी दुखावल्याच मात्र लपत नव्हतं."चल बाहेर जाऊया, पार्थच्या आजी-आजोबांना भेटते.आशिर्वाद घेते.आणि आपण उद्याची कामं सूरू करूया"मंजिरी कामाला लागली होती.
बाहेर सर्वजण त्या दोघींची वाटच बघत होते. आल्याआल्या मंजिरी सुरुच झाली, "हे बघअनू ,सर्वात प्रथम पार्थच नांव नोंदवलं होतं त्या दोन्ही संस्थांना मी ई-मेल करते.तू उद्या ज्यांच्या घरी मुली बघायला जाणार होतो,त्यांना फोन लावून दे मी बोलेन! ज्यांना मेल चालू शकतील.त्यांना मेल करूया".अनू तिची कामाची शिस्त,झपाटा बघून थक्क झाली.आणि हे सगळं ऐकून पार्थला आईनं आपल्यासाठी किती तयारी केली होती त्याची थोडी थोडी कल्पना येऊ लागली. तो पटकन उठून आईसमोर दोन्ही कानाला हात लावून उभा राहिला.साॅरी माॅम, खूप चुकलं माझं!मंजिरीनी 'ठीक आहे' असं म्हटलं आणि ती डायरीत नंबर शोधू लागली.
विचारांच्या नादात आपण गेल्या वर्षी पार्थचं लग्न ठरवण्याचा अनुभव अक्षरशः पुन्हा जगलो असं अनुराधाच्या मनांत आलं.
त्यानंतर ते दोन वेगवेगळे रीतीरिवाज एकत्र करून केलेलं लग्न, प्रत्येकाला अपेक्षित असलेलं लग्न, सोनिया-मंजिरीच सासुसुनेच नातं,ही तर एक वेगळी कथाच होईल.तेव्हा आठवणीची ही कथा आपण ही आता दुसऱ्या भागात आठवूया.अनूला मनाशी खुदकन हसू आलं.....
- ललिता छेडा
अर्थात पुढच्या गुरुवारी पुढचा भाग'जुळून येती.....

No comments:
Post a Comment