रविवारी दिनेश बघायला येणार असा काकूचा फोन आला आणि आईची नेहमीची धावपळ सुरू झाली. शीलानी मनातल्या मनात मोजलं तर हा चौदावा बघण्याचा कार्यक्रम होता.पण आईचा उत्साह अगदी पहिल्या सारखाच होता.
आणि त्यात पुन्हा काकूच्या माहेरच स्थळ असल्याने माणसं ओळखीची होती.मुलाला आई नव्हती आणि वडिल गावालाच रहात होते. लग्न झालेली एक बहिण होती जी पुण्यात रहात होती.त्यामुळे इथे कसलीही जबाबदारी नव्हती.
शीलाला माहीत होत की तिच्या मागे तिची बहीण नीला उभीच आहे.त्यामुळे त्या दोघींची लग्नं झालं की आई जबाबदारीतून मोकळी होणार होती.
नीला दिसायला सुरेख पण उच्छृंकल स्वभावाची, शिक्षणाची अजिबात आवड नसलेली आणि त्यामुळेच कशीबशी बारावी पास होती. त्याउलट शीला काळी सावळी,नाकी डोळी नीटस आणि शिक्षणात खूप हूशार होती. एम्.काॅमच्या शेवटच्या वर्षाला होती.त्या दोघींचा धाकटा भाऊ अजित दहावीला होता.पण आईच थोडं लाडाच झूकत माप नीलालाच होतं.
वडिलांच्या मागे घरोघरी जाऊन स्वैपाकाची काम करून आपल्या तिघांना मोठं करणाऱ्या आईबद्दल शीलाला खूप आदर होता.तिला आईच्या कष्टाची जाणीव होती त्यामुळे तिच्यासाठी ती आवडत नसलं तरी दाखवण्याच्या कार्यक्रमाला तयार होत असे.
दिनेश बघून गेला आणि अपेक्षित नकार आला.पण नकार कळवताना मात्र "त्याला नीला आवडलीय आणि तो तिच्याशी लग्न करायला तयार आहे असं त्यानं काकूच्या मार्फत कळवलं.
काकूच्या समोरच नीला सूरू झाली "शी, मला नको असला नोकरी करणारा,भाड्याच्या घरात रहाणारा आणि महत्त्वाचे म्हणजे कसले कपडे घालून आला होता तो"नीलाची बडबड ऐकून काकू काहीही न बोलता निघून गेली.
शीलाला मात्र दिनेश आवडला होता.पण नीलाच ऐकल्यावर ती गप्प बसली.
एम्.काॅम झाल्यावर शीलाला एका मोठ्या काॅलेजमध्ये नोकरी मिळाली.आणि त्यामुळे घरातले सर्वचजण खूष झाले होते.
नीला पण एका सोंदर्यप्रसाधनाच्या दुकानात नोकरी करू लागली होती.तिच्या आवडीच दुकान असल्यामुळे तिचा खर्च तरी ती काढत होती.
साधारण वर्षभराने काकू अचानक आली आणि म्हणाली "दिनेशला शीलाला नकार दिला त्याचा पश्र्चाताप होतोय.त्याला शीलाला भेटायचय!"साॅरी,काकू मला नाही भेटायचय त्याला!"
शीलानी विषय संपवला आणि ती काॅलेजला निघाली."अग, पण कारण तरी काय?आई मध्येच बोलली."आई एक म्हणजे त्याला नीला आवडली होती.माझ्याशी लग्न करून तो नीलापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करू शकतो.दुसर म्हणजे मला लागलेली नोकरी! पगार बघून पण मन बदललं असेल.येवढ बोलून ती घराबाहेर पडली.
संध्याकाळी ती घरी आली तर दिनेश आईशी गप्पा मारत बसला होता.तिला बघून पटकन उठून उभा राह्यला.आणि हात जोडले."साॅरी, मी तुम्हाला दुखावलं पण तुमच्या दोन्ही शंका कळल्यावर मी मुद्दाम बोलायला आलो.तुम्हाला नोकरी लागल्याच कळल्यावर मला नक्की बरं वाटलं कारण मला नोकरी सोडून व्यवसाय सुरू करायचाय.बायको कमवती असेल तर मी नोकरी सोडून धंध्याकडे व्यवस्थित लक्ष देऊ शकतो.आणि नीलाची मतं तुमच्या काकूंकडून कळल्यावर मी तो विषय मनातून काढून टाकलाय.
मला तुमच्या पेक्षा नीला आवडली होती म्हणजे तुम्ही चांगल्या नाही असा अर्थ नका करून घेऊ .
कुठेतरी आईचा चेहरा बघून शीलानी माघार घेतली.आणि ती लग्नाला तयार झाली.
लग्नानंतरची दोन वर्षे खूप छान गेली.दिनेशनी स्वत:चा व्यवसाय सुरू केला होता.त्यासाठी त्यानं बॅंकेचे लोन काढले होते.शीलानी पी.एच.डी.ची तयारी सुरू केली होती.पण शीलाला दिवस गेले.आणि त्या दोघांच्या आयुष्याला एक गोड वळण मिळालं.दोघही खूप खूष होते.
अचानक सातव्या महिन्यात काही कारण नसताना नीला ताईला मदत करण्याच कारण काढून शीलाकडे रहायला आली.
नीलाची नोकरी तर गेली होती.तिथे काहीतरी मालकाच्या मुलाशी गडबड केलीन् आणि मालकानं काढून टाकलं.आलेल्या स्थळांमध्ये खुसपट काढून नकार देणं तर सूरूच होतं.त्यामुळे तिचं येण शीलाला अजिबात आवडल नव्हतं.पण तिला इथे पाठवणार्या आईच मात्र तिला नवल वाटलं.
बाळंतपणासाठी तिनं माहेरी यावं असं आईनं निमंत्रण दिले आणि शीलानी लगेच जायचं ठरवलं.नीलासह ती आईकडे आली.अक्षयच्या, शीलाच्या मुलाच्या जन्मानंतर पंधराच दिवसांनी तिच्या घरमालकिणबाईं तिला भेटायला आल्या.बोलता बोलता सहज म्हणाल्या"तुम्ही इथे आहात तर मग नीला कां तुमच्या घरी येते? विचारल की म्हणते घर आवारायला आलेय!अहो ताई, रोज संध्याकाळी दिनेश यायच्या वेळी कसलं घर आवरते?"मालकीणबाईं जे बोलत होत्या तो संशय शीलाला होताच.कारण हल्ली दिनेश काही तरी कारणं देऊन तिला भेटायला येत नव्हता.आणि रोज संध्याकाळी नीला घरातून बाहेर असायची.
त्या आल्या त्यावेळी अजित, शीलाचा भाऊ घरातच होता.तो तर भयंकर चिडला.त्या गेल्यावर म्हणाला"आई फार लाड करते तिचे,येऊ देत घरी मी तिला घराबाहेरच काढतो."शीलाच्या मनात आलं की घरातून बाहेर काढलं की ती सरळ माझ्या घरी जाईल.तितकी ती निर्लज्ज नक्कीच आहे.
शीलानी दिनेशला फोन केला आणि सरळच विचारलं"नीला तिथे रोज येते का?आणि तुला ते चालतंय का? घरी येऊन बोलतो असं म्हणून,दिनेशनी फोन ठेवला.
घरी आल्यावर "साॅरी, पुन्हा असं नाही होणार!अस काही तरी बोलू लागला.अजित तर त्याला मारायलाच धावला.शीला हताश होऊन बसली होती."तिनं विचारलं"आत्ता नीला कुठे आहे?
"आपल्या घरी! दिनेश घाबरत बोलला.
तू तिला घेऊन का नाही आलास?शीलानी शांतपणे विचारल
"ती घाबरलेय, येणार नाही म्हणतेय."दिनेश.
"मला उत्तर मिळालं.तू जाऊ शकतोस.शीलानी शांतपणे सांगितलं.
त्यानंतर आई समजवायला जाऊ का म्हणू लागली.
शेजारच्या मामी येऊन "तू घरी जाऊन तिला हाताला धरून बाहेर काढ म्हणू लागल्या.
पण शीलानी सर्वांना "ती आज रात्री परत येते का ते बघुया आणि त्यानंतर मी सकाळी काय करायचं ते ठरवेन असं सांगितलं.अजितनी"ताई तू जो काही निर्णय घेशील त्यात मी तुझ्या बरोबर आहे.पण आत्ता हा विषय थांबवू या असं ठामपणे सांगितलं.कारण आवाज ऐकून शेजारीपाजारी दाराशी येऊन उभे राहिले होते.
अपेक्षेप्रमाणे नीला रात्री आलीच नाही.रात्रभर घरात कोणीच झोपलं नाही.
शीलाचा निर्णय झाला होता.एकदा आईसाठी आपण माघार घेतली पण आता नाही.
सकाळी काकू आली.बहूतेक दिनेशनी फोन केला असावा.
शीलाची जवळची मैत्रीण निमा पण सगळं कळल्यावर आली होती.
शीलानी सर्वांना बाहेरच्या खोलीत बोलावलं. आई आणि काकू तुम्हा दोघींसाठी मी काय सांगतेय ते नीट ऐका"शीलानी बोलायला सुरुवात केली.
"मी दिनेशशी घटस्फोट घेणार आहे.आणि अक्षयला एकटीनेच वाढवणार आहे.अक्षयच्या मागे नांव पण माझच असेल.
कोणीही तिथे जाऊन संसार सावर, थोडं अॅडजस्ट कर,सहन कर असला सल्ला देऊ नका.कारण मुलांसाठी,म्हातार्या आईवडिलांसाठी, आर्थिकदृष्ट्या कमकुवत असल्यानं,स्रीया माघार घेतात पण मी कोणत्याही परिस्थीतीत त्या दोघांसमोर कोणत्याही प्रकारांनी माघार घेणार नाही.
गेल्या महिन्याभरात इथल्या आर्थिक परिस्थितीची मला कल्पना आली आहे तेव्हा अजित स्वत:च्या पायावर उभा राहीपर्यंत आई आणि त्याची जबाबदारी माझ्यावर असेल. मी इथे असेपर्यंत नीलाला ह्या घरात प्रवेश नाही.हे मी अजितशी बोलून ठरवलय.आईला जर नीलाला बाहेर कुठेही भेटायचं असेल तर आमच्या दोघांची काही हरकत नाही."धाप लागल्यामुळे शीला थांबली पण थांबल्यावर मात्र तिला तिच्या मनाविरुद्ध रडायला आलं.
निमा उठली आणि तिनं शीलाला जवळ घेतलं.आणि म्हणाली"अवघ्या बारा तासात येवढा मोठा निर्णय घेतलास खूप अभिमान वाटतोय की तू माझी जवळची मैत्रीण आहेस. निमा रडतच बोलत होती "मला कोणी बोलावलं माहीत आहे शीला? तुझ्या आईनी! तिनीच सर्व सांगितलं आणि म्हटलं उद्या सकाळी शीलाचा काहीही निर्णय असला तरी तिला कोणाचा तरी आधार लागेल. मी तो अधिकार गमवून बसलेय तेव्हा तू ये असं म्हणून तुझ्या आईनी मला बोलावून घेतलय.तुझा निर्णय ऐकून वाटतंय आम्ही काय तुला आधार देणार? ह्या परिस्थितीत आम्ही फक्त तुझ्या बरोबर आहोत येवढंच आश्र्वासन सर्वांतर्फे मी देऊ शकते.निमा बोलायची थांबली होती आणि सगळेच जण नि:शब्द झाले होते.
ललिता छेडा

Thanks Akalpita
ReplyDelete