Thursday, January 17, 2019

जुळून येती रेशीमगाठी (भाग२)


अनूला आठवलं
               .....त्या रात्री खरं म्हणजे कोणालाच झोप लागली नाही.
    कारण मंजिरीच्या घरातून निघताना अनूनी पार्थला
"उद्या सकाळी सोनियाला इथं बोलावून घे. किती वाजता येतेय ते मला कळव म्हणजे मी पण तेव्हाच येईन"असं सांगितलं होतं.
       घरी येताना अनूचा नवरा म्हणाला देखील"अनू, काही करायच ते सांभाळून कर कारण मंजिरीनी हे लग्न कितपत स्वीकारलाय कळत नाहीय! आणि घरी गेल्यावर मुलींच काही वेगळंच सूरू होतं "आई,पार्थदादाची बायको मारवाडी आहे म्हणजे चिक्कू मारवाडी असतात ते का ग?" "असं नाही बोलायच!अनूनी मुलींना दटावलं.
      सकाळी साडेदहाच्या सुमारास सोनिया आलेली अनूनी गॅलेरीतून बघितलं होतं.अनू बोलवलं त्यापेक्षा  थोडी उशिराच गेली.
      तिथं गेल्यावर बोलक्या डोळ्याची,जीन्स, शाॅर्ट कुडती घातलेली सोनिया बघताक्षणी सर्वांनाच आवडलीय हे अनूला जाणवलं.फक्त मंजिरीचा अंदाज येत नव्हता.पण कालपेक्षा ती आज जरा खूषीत दिसत होती.
   "काय ग मावशी किती उशीर केलास?पार्थ हसून विचारत होता.अनू काही बोलायच्या आत मंजिरी म्हणाली" अनू उशिरा येईल हे मला माहीत होत कारण तिनी सोनियाला येताना नक्की बघितलं असणार तिच्याशी आपलं थोडं बोलणं होण्यासाठी ती वेळ देणार! आणि उशिरा येणार!
     अनूला वाटलं किती ओळखतो आपण दोघी एकेमेकीला!
        सोनिया पटकन उठून अनूच्या पाया पडली."माझ्या मम्मीची बेस्ट फ्रेंड,जस्ट लाईक अ सिस्टर"पार्थनी ओळख करून दिली."आय नो दॅट,मम्मींनी सांगितलय मला"सोनिया बोलली."अरे व्वा, इतक्या गप्पा झाल्या आणि मराठी येतं वाटतं?अनूनी हसून विचारल."उत्तम बोलते ती मराठी"पार्थनी‌ लगेच बाजू घेतली.
     एकंदरीत सर्व आलबेल होतं.
      अचानक मंजिरी अनूला म्हणाली" आपल्याला भेटायला उद्या हिचे आई-वडील येणार आहेत, आत्ताच त्यांचा फोन आला होता"मम्मीजी वो दोनो नहीं,मेरे बडे चाचा-चाची, मौसी,और बुआजी भी साथमें होंगे।हम लोगोंमें ऐसे ही रिश्ता नक्की करने जाते हैं। सोनिया थोड्याशा अपराधी स्वरात म्हणाली."तस काही बोलली नाही तुझी मम्मी"मंजिरी थोड्याशा टेन्शननीच म्हणाली.सोनियानी लगेच आईला फोन लावला.आणि ती सगळी मंडळी यायचं ठरलं.
       जगण्यातले अर्थ शोधत न बसता, चांगल्या वाईट प्रसंगाना सहजतेने सामोरं जाण हा मंजिरी चा स्वभाव खरोखर कौतुकास्पद होता.
      त्या सर्वांच स्वागत मंजिरीनी खूपच उत्तमरित्या केलं.सोनियाचे वडील आपल्या उमद्या स्वभावामुळे सर्वांशी  मिसळून गेले. सोनिया अगदी वडिलांवर गेली होती.आई मात्र थोड्याशी स्थूल,काळ्यासावळ्या, डोक्यावर पदर, टिपीकल मारवाडी स्वभावाची असावी अशी वाटली.त्यांच हिंदी मिश्रित मराठी  ऐकायला मज्जा वाटत होती.अनूला वाटलं आपण फारच तर्क करतोय!
      मंजिरीनी पण तिचे दिर,जाऊ,नणंद, भाऊ वहिनींना बोलावलं होतं.दोन्ही कुटुंबाचं छान जमलं होतं.अगदी थोड्या वेळात गप्पा सुरू झाल्या होत्या.त्यात दोन्ही आजांचा सहभाग जास्त होता.आजोबांच सोनियाच्या पप्पांशी जमलं होतं.
     दोन्ही मुलं फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात अमेरिकेला परत जाणार होती.त्यामुळे लग्न जानेवारीत करायचं ठरलं.सोनियाकडची मंडळी मुहूर्त पाहूनच आली होती. 
       "पण लग्न आमच्या म्हणजेच मराठी पध्दतीनंच होणार "मंजिरीच्या सासूबाईंनी ठाम भूमिका घेतली.
     सोनियाच्या आई कशाबशा तयार झाल्या."फिरभी हमारे दो फंक्शन होणार!एक  मेहंदी,संगीतसंध्या' और एक 'मामेरा' त्या थोड्या घाईघाईत बोलल्या.हम लोगोंमे मेहंदी खास होती है.
      संगीत संध्या माहीत आहे पण हे 'मामेरा'काय?पार्थच्या काकू पुटपुटल्या.
     "हम लोगोमें मामा की तरफसे हम सबके लिए, आपके लिएभी गिफ्ट दी जाती है और वो फंक्शन करके दी जाती है। सोनियाच्या आईनं खूलासा केला.'उस गिफ्ट को 'मामेरा' बोलते हैं।
    अनूनी मंजिरीकडे बघितलं.मंजिरीनी हसून 'ठीक आहे' अशी खूण केली. लग्न एकंदर रंगायला लागलं होतं.ही सगळी गडबड पार्थ-सोनिया पण एन्जाॅय करत होते."तुमच्या भावाला सोनियाला मामाची पिवळी साडी द्यायला सांगा म्हणजे झालं!"मंजिरीची आई हळूच बोलली.आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं.
      दुसऱ्या दिवशी मंजिरी-अनू , सोनिया-पार्थ, आणि सोनियाचे आई-वडील असे लग्नासाठी हाॅल नक्की करायला भेटले.पवईला रहात असलेल्या सोनियाच्या घरच्यांनी तिथलाच लग्नाचा हॉल असलेलं हाॅटेल ठरवलं होतं.ठाण्याला रहाणार्‍या मंजिरी कडच्या मंडळींना थोड लांब होतं पण तो हाॅल सोनियाच्या पापांच्या मित्राचा होता.त्यामुळे कोणाचीच हरकत नव्हती.
    हाॅलच्या दाराशीच एक तरुण मुलगी उभी होती.पुढे येऊन तिनं सर्वांचं स्वागत केलं."मम्मी,ही सर्व इव्हेंटस् मॅनेज करणार आहे"सोनियांनी ओळख करून दिली.
    मंजिरीनी सोनियाला लगेच बाजूला घेतलं आणि"हे बघ, मला लग्नात उधळपट्टी झालेली आवडणार नाही.तू एकुलती एक आहेस त्यामुळे तुझ्या आईला हौस असणार म्हणून मी गप्प आहे.पण उगीचच खर्च मला नाही आवडणार!अस स्पष्ट सांगितलं.आणि तुमच्या हौसेचे कार्यक्रम तुम्ही करा.पण लग्नाचा खर्च मात्र आम्ही निम्मा देणार हे मी ठरवलंय.
    "मम्मीजी,ही इव्हेंट मॅनेजमेंटवाली रिचा, माझी जवळची मैत्रीण आहे.हे सगळं ती मला गिफ्ट म्हणून देणार आहे. और मुझे और मेरे घरवालों को मालूम है कि आपने अकेले कितने मुष्किलोसे पार्थको बड़ा किया है।आपकी हर बात को मानना है, ये पार्थने मूझे खास समझाया है।  सोनियांनी गोड बोलून मंजिरीला समजावलं आणि अर्धी लढाई जिंकली होती.
    हाॅलमध्ये शिरल्यावर सोनियांची आई म्हणाली" वरमाला मंडप इथेच बनवा""म्हणजे?अनूनी पटकन विचारलं.
    "आमच्यामध्ये लडका बारातके साथ आता है तभी  लडकी दरवाजेमेंही उसके गले में माला डालती है। और तीन फेरे वहां होते हैं और बाकी के चार फेरे विधी मंडप में।सोनियाची आई उत्साहात होती.
    "पण आम्ही तर अंतरपाट दूर झाल्यानंतर हार घालतो. आणि मग सप्तपदी होते."अनू थोडीशी चाचरत म्हणाली.मंजिरीपण प्रश्र्नार्थक
चेह-यानी बघू लागली.
    लगेच रिचा पूढे आली" आन्टी,आपण दोन वेळा हार घालूया. चालेल ना? 
     तिथे असलेल्या सर्वांनाच हसायला आलं.
     नवीन पिढी सर्वांना घेऊन, रीतिरिवाज पाळत,लग्नाचे विधी ठरवत होती.
     खरं म्हणजे पार्थ आणि सोनिया दोघेही इंजिनिअर!नुकताच पार्थ शिक्षण पूर्ण करून चांगल्या नोकरीला लागला होता.आणि सोनियाच एक वर्ष बाकी होत.पण दोघेही मनापासून घरी, बाहेर सगळीकडे पडेल ते काम करत होते.पार्थ प्रत्येक गोष्टीत लक्ष घालत होता.
    अनूला कौतुक वाटलं.
           
    सर्वजण स्वत:च्या मतापेक्षा एकत्रित विचार करत होते आणि हेच आवश्यक होतं.
    दोन तीन दिवस चाललेला लग्न सोहळा रिचामुळे खूप देखणा झाला.दोन्ही रीती पाळून अगदी मेन्यू पासून देण्याघेण्यापर्यंत प्रत्येक गोष्ट तिनी तिच्या व्यवसायाच्या अनूभवानी उत्तम मॅनेज केली. 
   त्यामुळेच दोन वेगळ्या जातींच रेशीम नातं छान जूळलं गेलं. 
    लग्नानंतरचे महिन्याभराचे दिवस भूर्रकन उडाले.सोनियानी त्या महिन्यात नातेवाईकांचे  वेगळे वेगळे गृप करून घरी छानशा पार्ट्या अरेंज केल्या.प्रत्येकवेळी अनूमावशी हवीच असा आग्रह ठेवला.सोसायटीत तर ती खूपच लोकप्रिय झाली.
     निघताना ती मंजिरीला म्हणाली"मम्मी, आम्ही पाच-सहा वर्षांत इंडियात परत नक्की येणार असं ठरवलय.आत्ता सध्यातरी आमच्या दोघांच्याही नोकर्‍या,शिक्षण उत्तम सूरू आहेत.थोडे पैसे जमले की परत यायचं म्हणतोय, कारण आम्ही दोघेही एकुलते एक आहोत तेव्हा तुम्हा सर्वांसाठी परत यायची खरंच इच्छा आहे."तिनं नुसतं म्हटल्याने मंजिरी भरून पावली होती.
     बघता बघता सरलेल्या वर्षभराच्या आठवणीत रमलेली अनू फोनच्या रिंगनी जागी झाली.
    फोन सोनियाचा होता"मावशी, दोन्ही मम्मी,पापा 'जुन' महिन्यात इकडे येताहेत.तूम्ही दोघानी पण त्यांच्या बरोबर यायचय. तयारीला लाग.सगळी अमेरिका फिरवते तुम्हा सर्वांना!
  ‌अनूला सोनियांच कौतुक वाटलं 'ह्या पोरीने आपल्या स्वभावानी जुळलेल्या रेशीम गाठी नक्कीच दृढ केल्यात'.
                ललिता छेडा

No comments:

Post a Comment