मेकओव्हर
समोरच्या नवीन टाॅवरमध्ये सामान उतरताना बघून मधूरा चाळीच्या गॅलरीत आली.पहिल्या मजल्यावर असलेल्या बाल्कनीबाहेर बोर्ड लावण्याच काम सुरू होतं.दारं, खिडक्या उघड्या असल्यामुळे सामानही तिथेच उतरताना दिसत होते.'मोहा'स् ब्युटी पार्लर' बोर्डावरच नांव वाचून मधूरा आनंदली."अरे व्वा, मोहिनीनी काकूंच्या जागेत पार्लर उघडलय वाटतं! म्हणजे आता मोहाची रोज भेट होईल"मधूरा विचार करतच होती इतक्यात मोहा स्कुटर वरून आली आणि समोर गॅलरीत उभ्या असलेल्या मधूराला बघून तिनं हात हलवला.रस्ता क्राॅस करून आली आणि"आज सुट्टी आहे ना?ये ना मग पार्लरवर! असं म्हटलं "येते थोड्या वेळानं"मधूनी तिला गॅलरीतून थोडंसं वाकुन सांगितलं.मोहाकडे बघताना मधूला वाटलं रेशमी केस सळसळवणारी,जीन्स-टीशर्ट मधली मोहा आपल्यापेक्षा दहा वर्षांनी लहान दिसतेय.खर म्हणजे एकाच वयाच्या आपण दोघी घट्ट मैत्रिणी मधूरा आणि मोहिनी!एकच शाळा एकच काॅलेज येवढंच नाही तर त्यांचा वाढदिवस पण एकाच दिवशी! अनेकदा दोन्ही वाढदिवस एकाच घरी साजरे होत असत.आणि त्यामुळेच त्या दोन्ही घरात एक छानस जिव्हाळ्याचं नातं होतं.
मोहाच लग्न झाल्यावर मात्र ती गावातच पण थोडी दूर रहायला गेली.
मोहाच्या लग्नानंतर थोड्याच दिवसात मधूराच्या आईवडिलांचा अचानक कार अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला.आणि मधूरावर इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षाला असलेल्या भावाची मंदारची आणि दहावीला असलेल्या छोट्या बहिणीची जबाबदारी आली.मधूराला काय करावं काही कळतच नव्हत.पण तेव्हा मोहिनी तिच्या बरोबर अक्षरशः सावली सारखी राहिली.मोहानी केलेल्या खटपटींमुळेच मधूराला वडिलांच्याच कंपनीत नोकरी मिळाली.मोहानी तिचे चुलत सासरे जे त्या कंपनीचे C.E.O होते त्या सानेसाहेबांशी बोलून,मधूराच्या हूशारीबद्दल खात्री देऊन नोकरी मिळवून दिली होती.कंपनी मल्टीनॅशनल होती त्यामुळे मधूराला मोठी संधी मिळाली.मोहाचा स्वभाव असाच होता धडाडीने निर्णय घेणारा तर मधूरा थोडीशी लाजरीबुजरी!
मधूरानी मात्र मोहाच्या प्रयत्नांना पूर्ण यश दिलं होतं.तिनं पुढच्या बारातेरा वर्षात त्या विदेशी कंपनीत आपल्या हूशारीने स्वत:च स्थान निर्माण केलं.नोकरी सांभाळून तिनं पी.एच् डी पण पूर्ण केल.अर्थात साने काकांच मार्गदर्शन होतच.
सानेंच्या निवृत्ती नंतर मधूराचच नांव त्यांच्याजागी चर्चिल जात होतं.मधल्या काळात मंदार इंजिनिअर होऊन बंगलोरला सेटल झाला. तो स्वत:च्या विश्वात रमल्यामुळे इकडची जबाबदारी पूर्णपणे मधूरावर आली. छोटीनी शिक्षण पूर्ण करून प्रेमविवाह केला होता.आणि सगळया जबाबदा-यातून मुक्त झाल्यावर मधूराला आता मात्र खूप एकटं वाटत होतं.आणि अश्यावेळी मोहा जवळ आल्यामुळे ती खूष झाली होती.
घरातलं थोडंसं आवरून मधूरा पार्लरवर गेली."या बाईसाहेब! किती दिवसांनी भेटताय, हल्ली फोन पण नाही करत!मोहाची बडबड सुरुच होती पण मधू पार्लरच्या इंटिरिअरकडे, रंगसंगतीकडे भारावून बघत होती."अग, किती सुंदर सजवलायस!मधू रिलॅक्स खूर्चीत बसत म्हणाली.
हे बघ मधू पुढच्या रविवारी पार्लरच उदघाटन आहे.आणि माझी पहिली कस्टमर आहे 'मधूरा मोहिते'मोहा मधूराच्या गळ्यात हात टाकून म्हणाली.
"ए बाई मी नाही हं हे काही करणार."मधू हात जोडत म्हणाली.
"मी विचारत नाही सांगतेय"मोहा हसत हसत म्हणाली."आठवतेय तुला, मी हा कोर्स करावा म्हणून बाबांना तुच समजावलस, त्यांना अजिबात आवडत नव्हतं कि मी हा कोर्स करतेय ते! पण तू माझ्या तर्फे शिक्षण न सोडता कोर्स पूर्ण करीन असा विश्वास दिलास.आणि त्यामुळेच लग्नानंतर अँडव्हान्स कोर्स करून गेली मी गेली दहा वर्षे घरात पार्लर चालवलं.माझ्या नव-याची सुहासची फिरतीची नोकरी आहे म्हटल्यावर तूच सुचवलस की मी घरात पार्लरच काम सुरू करावं."
"जेव्हा आईच्या जागेवर टाॅवर बनतोय कळलं तेव्हा मी माझी जुनी जागा विकून इथे आईच्या घरासमोर घर बुक केलं आणि आईच्या घरात पार्लर सुरू करायचं ठरवलं.त्यामुळे आई माझ्याकडेच राहिल, तशीही बाबा गेल्यापासून ती एकटीच झाली होती.आणि माझंही घराकडे लक्ष राहील असा मी विचार केला.अग माहेरी एकुलती एक आणि इकडे नवरा सतत फिरतीवर त्यामुळे निर्णय माझे मलाच घ्यावे लागतात". मोहा बोलत होती आणि मधूरा तिच्या कडे अभिमानाने बघत होती.तिच्या निर्णयाचा आदर करणा-या तिच्या नवऱ्याच पण मधूराला कौतुक वाटलं.
अचानक मोहानी डोळे मिचकावत विचारलं "मधू, सदाशिव अजून आहे का ग तुझ्या ऑफिसमध्ये?"तो कुठे आठवला तुला मध्येच?मधूनी चिडून विचारलं."चिडू नकोस ग पण तुला तेव्हा काकूबाई म्हणून नकार दिला होता ना!ते आठवलं.जाऊदे,"मोहानी विषय संपवला पण घरी जाताना मधूला मात्र त्या अपमानाची आठवण झाली.आता करीअरमध्ये सदाशिवला तिनं खूपच मागे टाकलं होतं. आता तो तिच्या आजूबाजूला पण फिरकत नव्हता.
उदघाटनाच्या आदल्या दिवशी मोहा खास मधूला बोलवायला आली."मधू उद्या दिवसभर तू मला पार्लरवर हवीस."नक्की येणार!मधूनी तिचा हात हातात घेऊन खात्री दिली."मधू, तुला गंमत सांगू , उद्या संध्याकाळी आमचा टाॅवर बांधणारा बिल्डर पण येणार आहे.त्याला तुमच्या चाळीतल्या लोकांशी बोलायचंय. मी तुझी ओळख करून देईन.मधूरा हसायलाच लागली"चला माझ्या बरोबर घराचाही मेकओव्हर होणार तर!
तो रविवार मधूरासाठी ब-याच दिवसांनी वेगळ्याच आनंदात उजाडला.लवकर तयार होऊन ती पार्लरवर पोचली.मोहा तिची वाटच बघत होती.मोहा डिझायनर साडीत खूपच सुंदर दिसत होती.उदघाटनाच्या तयारीसाठी सगळ्यांचीच धावपळ सुरू होती.काकूपण खूष होत्या. त्यांची लाडकी लेक त्यांच्या डोळ्यासमोर रहाणार होती.मोहाचा नवरा पण खास ओपनिंगसाठी सुट्टी घेऊन आला होता.मोहानी उदघाटन आपल्या आईच्या हस्ते केलं.आणि मधूराला सन्मानाने खूर्चीवर बसवून म्हटलं"माझी पहिली कस्टमर माझी सर्वात जवळची मैत्रीण"सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांच्या मैत्रीच जणू कौतुकच केलं.
त्यानंतरचे तीन तास मधूरासाठी स्वप्नवत होते.गेल्या कित्येक वर्षात तिनी स्वत: साठी कधी येवढा वेळच दिला नव्हता.नखशिखान्त होणारा बदल आरशात बघून तिचा विश्वासच बसत नव्हता.मोहा मधूनच येऊन मुलींना सुचना देत होती.पार्लरवरची वर्दळ वाढली होती.मधूराला ओळखणारी मंडळी तिला बघून आश्र्चर्यचकित होऊन मोहाच कौतुक करत होती.मधूराला वाटलं की 'प्रत्येक स्त्रीला असा स्वत: साठी वेळ देण किती गरजेचं आहे!'मोहानी तिला सुंदरसा ड्रेस भेट म्हणून दिला आणि संध्याकाळी हाच घालून यायचं अशी लाडाची धमकीही दिली.
मधूरा घरी आली आणि चाळीतल्या सगळ्यांनी तिचं हसून स्वागत केलं.शेजारच्या काकूंनी तर तिच्या गालावरून बोटं फिरवून दृष्टच काढली.
संध्याकाळी तयार होऊन मधूरा पार्लरवर गेली तेव्हा सानेसाहेब आलेले होते. मधूराला बघून हसत हसत म्हणाले"मोहा तू पार्लरच्या जाहिराती साठी फारच छान माॅडेल शोधलीस".मोहा लगेच म्हणाली" अरे असा तर मी विचारसुद्धा केला नव्हता काका! पण मधूरानी ज्याप्रकारे गेली दहा बारा वर्षे जबाबदारीनं धाकट्या भावंडांची आयुष्य घडवली,स्वत:ला सिध्द केलं त्याला माझ्यातर्फे ही कौतुकाची थाप होती."अग गंमत केली मी" सानेकाका हसले आणि मधूराकडे बघून म्हणाले "खूप छान दिसतेयस.ह्या बदलामुळे तुझ्या चेहऱ्यावर एक प्रकारचा आत्मविश्वास दिसतोय. पण एक गोष्ट लक्षात ठेव"दिसण्या इतकंच असणं पण खूप महत्त्वाचं असतं."तुझी हूशारी, कर्तृत्व हे तुझ्या साधेपणातपण होतंच. तू कंपनीची भावी C.E.O.आहेस.त्यासाठी मात्र ह्या मेकओव्हरची तुला नक्कीच मदत होईल.
"तू एकटी राहू नये ह्यासाठी पण मी आता प्रयत्न करणारच आहे. पण आधी तुमच्या चाळीचा मेक ओव्हर करूया"मोहा उत्साहात होती.
"काका तुम्ही माझे मार्गदर्शक, गुरु आहात.तुम्ही बोललात ते सर्व मी लक्षात ठेवीन." मधूरा सानेकाकांच्या शब्दांनी भारावली होती.नंतर मोहाकडे बघून म्हणाली"मोहा, तुझ्या ह्या मेकओव्हरनी आणि माझ्या जवळ रहायला येण्याने माझा एकटेपणा नक्की गेलाय.... वेगळा आत्मविश्वास पण जाणवतोय, मी तर सर्व स्त्रियांना सांगेन की स्वत:साठी वेळ द्या.जबाबदारी सांभाळताना आपलं दिसणं आणि असणं दोन्ही महत्त्वाचे आहे हे लक्षात ठेवा.""ह्याला कोणी जाहिरात म्हटलं तरी मला आवडेल."मधूरा काकांकडे बघून मिश्किलपणे म्हणाली.काकांनी पण तिला हसून मोकळेपणाने दाद दिली.
-----------
ललिता छेडा

No comments:
Post a Comment