आभाळ

अपेक्षित असलेला स्वप्नाचा फोन आला आणि अमृतानी पुण्याला जायची तयारी सुरू केली.उद्याच निघायचं होतं आणि जवळ जवळ आठ दिवस तरी पुण्यात राहायलाच हवं होतं त्यामुळे घरी सासूबाई असल्यातरी तिला घरातलं आवरूनच निघायला हवं होतं.अमृता आणि स्वप्ना दोघींचं माहेर पुण्यात, एकाच गल्लीतल्या बंगल्यांच्या काॅलनीतल!आवरता आवरता स्वप्नालीच्या आठवणीनं अमृताला हसू आलं.आता उद्याचा मुंबई पुणे हायवे वरचा प्रवास मजेत होणार होता. मीडीयात काम करणारी, लहानपणापासूनच बंडखोर तरीही मनमोकळ्या स्वभावाची,कार ड्रायव्हींगची प्रचंड आवड असणारी स्वप्ना!आणि तिची मोठी बहीण सोनाली तिच्या अगदी विरुद्ध स्वभावाची शांत, अंतर्मुख आणि खूप अभ्यासू!! दोघीही अमृताच्या मैत्रिणी!
त्या दोघी बहिणींनी त्यांच्या बाबांचा वाढदिवस जोरदार करायचा ठरवल्यामुळे तयारीसाठी स्वप्ना लवकर निघाली होती.आणि अमृता तर त्यांच्या घरचीच,तेव्हा वाढदिवसाच्या धावपळीत ती हवीच.अमृतालाही आपल्या आईला भेटायचंच होतं,पुण्यातली काम आटपायची होती त्यामुळे तीही स्वप्ना बरोबर लवकर निघाली होती.
प्रवासात स्वप्ना 'बाबा' ह्या एकाच विषयावर भरभरून बोलत होती.कस त्या दोघी बहिणींनी बाबांना युरोप टूरच सरप्राइज गिफ्ट द्यायच ठरवलंय!आई गेली तेव्हा ती अवघी सहा वर्षांची होती पण बाबांनी कसं तिला आईच नसणं जाणवू सुध्दा दिलं नाही.सोनाताईशी तिच असलेलं मैत्रिणीच नातं,एकनादोन आठवणींचा कोलाज भरभरून बोलून स्वप्ना त्यात रंग भरत होती.त्या संपूर्ण चित्रातल्या प्रत्येक आठवणींची अमृता जवळची साक्षीदार होती.तरीसुध्दा ती स्वप्नाकडून नव्यानं ऐकत होती."अमु तुला आठवत,आई गेली आणि पंधरा वीस दिवसांतच माझा वाढदिवस होता.मी हट्टच धरला वाढदिवस साजरा करूया.किती समजावल सगळ्यांनी शेवटी रडत रडत मी म्हटलं "आईला तुम्ही नेलं तेव्हाच मी तिला वाढदिवसाला ये म्हटलाय.आता ती आली आणि वाढदिवस केला नाही तर ती परत जाईल ना! आणि आज कळतय कस बाबांनी दु:ख बाजूला ठेवून वाढदिवस साजरा केला असेल ते!आणि अमू तुला माहितीये आई आली होती मला भेटायला, ती गेटमधून आत येताना मलाच फक्त दिसली होती. तिला नेलं त्याच साडीत होती."हे सर्व अमृतानी कितीतरी वेळा ऐकलं होतं तरीही तिचे डोळे भरून आले. तिनी विषय बदलला आणि म्हणाली"स्वप्ना वाढदिवसासाठी ड्रेस का साडी? अर्थात ड्रेस,साडीत धावपळ नाही करता येणार" स्वप्नानी पण वातावरणातला ताण ओळखून जाणीवपूर्वक उत्तर दिलं.
वाढदिवसाच्या दिवशी स्वप्ना-सोना दोघी बहिणींचा उत्साह ओसंडून वाहत होता.बाबांच्या इच्छेनुसार बंगल्यातच समारंभ साजरा होत होता. बाहेर मंडप घातला होता.सकाळचे धार्मिक विधी, जेवणं, थोड्या गप्पा आराम झाल्यावर अमृतानी सर्वांना हाॅलमध्ये एकत्र बोलावून घेतलं आणि सांगितलं "आता 'मनोगत'हा कार्यक्रम होणार आहे.आजच्या समारंभाच्या तिन्ही उत्सवमूर्ती त्यांच्या मनातल आपल्या सर्वांच्या साक्षीनी एकेमेकाला सांगतील.सुरवात करेल 'सोनाली'
"अग,अमृता हे काय सगळं, अचानक काय बोलू"सोनाली गडबडून गेली.अमृतानी हसून सोनालीला समोर बोलावलं.सोनाली थोडा वेळ शांत उभी राहिली आणि बोलू लागली.
"बाबा, तू आम्हा दोघींच आभाळ आहेस.ह्या आभाळातल्या उन्हानी आम्हाला शिस्त लावली आणि चांदण्यांनी उबदार माया दिली.बाबा, आई गेली तेव्हा मी मोठी होते आणि तुला लग्न करायचा कोणी आग्रह केला की मला तुझा राग यायचा,लग्न करशील अशी भीती वाटायची!साॅरी बाबा आज लग्न झालेल्या मला जोडीदाराची गरज कळतेय.बाबा, तू मी जातीनी मद्रासी आणि शिक्षणानी इंजिनिअर असलेल्या श्रीरामशी लग्न ठरवल्याच कळल्यावर आनंदानी परवानगी दिलीस.आणि म्हणालास"बाळा आपल्याला नातं जोडायचय, जात नाही! आणि नुकतीच किती सहजपणे तुझी फॅक्टरी त्याच्या हाती देऊन निवृत्त झालास.आणि आवर्जून स्वप्नाला विचारलस"फॅक्टरी ताईला दिली तुला राग नाही ना आला? "अरे बाबा, तू आणि ताईंनी मला जे दिलंय त्यापुढे ह्या फॅक्टरीच काय घेऊन बसलास!"स्वप्नाच तिच्या स्वभावाप्रमाणे मोकळं उत्तर आलं.आभाळ अलगदपणे माझ्या ओंजळीत उतरल्यासारख वाटलं! अजून काय बोलू! माझ्या आभाळा मी तुला काय देवू? इथूनच नमस्कार!
. अमृतानी बाबांना या असा इशारा केला.बाबा हसत आले आणि अमृताला म्हणाले "तुझे खूप खूप आभार कारण माझी सोनाली तिची आई वसुधा गेल्यापासून पहिल्यांदा इतकं आणि मनातलं बोलली.आता माझ्या मनातलं----
वसूधाला जाऊन तीस वर्षे झाली आणि आज मला सत्तर वर्ष पूर्ण झाली.आमच्या लग्नानंतर वसूच्या हट्टापायी मी स्वत:चा व्यवसाय सुरू केला होता आणि आज त्यात खूप यशस्वी झालो.केवळ वसूमुळेच! लग्नानंतर दहा वर्षांनी सोनालीचा जन्म झाला.आणि आम्ही हा बंगला बांधला.त्यानंतर सहा वर्षानी स्वप्नालीचा जन्म झाला.पण वर्षभरात वसूला असाध्य आजाराने ग्रस्त केलं आणि स्वप्नाली सहा वर्षाची होती आणि वसू गेली.त्यानंतर अवघ्या वीस दिवसांत 'आई येणार' म्हणून स्वप्नानी वाढदिवस साजरा करायला लावला.मला कळलं"ह्या दोघींच भावविश्व हळूवारपणे मलाच जपायला हवं."
मी एकदाच व्याकुळ झालो जेव्हा सोनानी मला सांगितलं की "ती मोठी झालीय! मला कळेचना की हिला काय समजवायचं, काय सांगायचं पण तिनं मला येवढच म्हटलं"काळजी करू नका मला सर्व माहितीये.
स्वत:ला कधीच एकट नाही समजलो.माझ्या मुली,माझ वाचन,गाणी ऐकण्याची आवड आणि तुम्ही सर्वजण!ह्या सर्वांमुळे मला कधीच एकाकी नाही वाटलं. मी सर्वांनाच सांगेन "एकटेपणा काही आजार नाहीय त्याच्याशी मैत्री केली की सर्व सोपं होऊन जातं.
अमृतानी पूढे होऊन बाबांना तिथेच खूर्चीवर बसवलं.आणि स्वप्नाला बोलावलं.
स्वप्नानी सरळ बोलायलाच सुरवात केली"मला काही ताई, बाबासारख बोलता येत नाही पण दोन वेळा मी बाबांना घाबरवलं ते सांगते."पहिल्यांदा जेव्हा मी बाबाला म्हटलं की"बाबा माझ्यासाठी तुलाच मुलगा शोधायला लागणार आहे कारण मला काही प्रेमबीम जमलं नाही.बाबा जाम घाबरला.नंतर मग आत्याच्या मदतीने सुयशला माझ्या साठी शोधलं.सुयश नेहमी म्हणतो"मला तुझ्यापेक्षा तुझा बाबाच जास्त आवडलाआणि मी होकार दिला.दुसऱ्यांदा बाबा घाबरला जेव्हा मी म्हटलं"बाबा मी नोकरी सोडली.मला फ्री लान्सींग जर्नालिझम करायचंय मला लेखन,प्रवास करायचाय.बाबा एक मिनिट शांतपणे माझ्याकडे बघत राहिला.आणि ताईच्या भाषेत सांगायचं तर "आमच्या आभाळानी मला उंच भरारी घ्यायला परवानगी दिली.
मला बाबा आठवतोय आईकडे आमच्या वेण्या घालायला शिकणारा,पोळी जमत नाही म्हणून छोटे पराठे करणारा,आम्हा दोघींना हसताना पाहून का हसताय न विचारता हसत सुटणारा आमचा बाबा!आईला ए म्हणत होतात ना मग मलाही ए बाबा म्हणायच.अस म्हणणारं आमचं 'आभाळ' त्याला मनापासून सलाम!
अमृतानी सर्वांसमोर हात जोडले आणि म्हटलं"आपल्या सगळ्यांच्याच माथ्यावर एक आभाळ असतंच मान उंचावून फक्त वरती बघायची गरज असते.
ललिता छेडा

आठवड्यातला एखादा दिवस देवळात जायचंच अस ठरवल्यावर गुरुवारी मैत्रिणींना भेटायची देऊळ ही एक हक्काची जागा झाली.देवळाचा परिसर,तिथली शांतता, भेटणारी माणसं सगळं सवयीच झालं.
दर्शनानंतर शांतपणे बसायच्या बाकावर आधीच एक आजी बसलेल्या असायच्या.चेह-यावर सुरकुत्यांच जाळं, ओढाताणीत काढलेल्या आयुष्याच दुःख डोळ्यात घेऊन बसलेल्या त्यांच्याकडे बघून हसण्या इतपतच ओळख झाली होती.पण एक दिवस देवळात जायला उशीर झाला आणि दर्शन होईपर्यंत पुजारी मंदिर बंद करू लागले.आजीदेखील हळूहळू बाहेर येऊन रस्त्यावरच्या बाकावर बसल्या."घरी नाही का जायचं?कोणाची वाट बघताय का?"मी अगदी सहज विचारलं."दीड वाजता सुन येईल ती घराच कुलुप काढेल मग मी जाईन"आजी म्हणाल्या.उत्तर नीटसं कळलं नाही पण उशीर झाला होता म्हणून "ठीक आहे" येवढंच बोलून मी निघाले.कोणीतरी दार उघडे पर्यंत घराबाहेर बसायचं!आजींच्या उत्तरानी अस्वस्थ केलं होतं.येत्या गुरुवारी आजींशी बोललंच पाहिजे असं ठरवलं.
गुरुवारी आजी जणू माझी वाटच बघत होत्या.मला हातानी बोलवून भाजीची पिशवी इथे ठेव असा इशारा केला.मी पण पिशवी त्यांच्याजवळ ठेवली आणि 'आलेच'अस म्हटलं.दर्शन करून आल्याआल्या मी आजींना विचारलं"कुठे राहता तुम्ही?सुनेची वाट बघत रस्त्यावर का बसला होतात? तुमच्या कडे किल्ली नव्हती का?"बैस इथे सांगते सर्व"आजी हळूच म्हणाल्या."आपण बाहेर वडाच्या पारावर बसून बोलूया.इथे देवळात नको."मी म्हटलं.
बाहेर आल्यावर आजींनी त्यांची कहाणी सांगायला सुरुवात केली."देवळाशेजारच्या चाळीत आम्ही रहातो.एकुलता एक मुलगा आमचा, माझे यजमान रेल्वेत नोकरीला होते.'आहे त्यात समाधानाने' माझा संसार चालला होता.रेल्वेच्या नोकरी मुळे आणि ह्यांच्या हौसेमुळे खूप हिंडलो फिरलो.पण लेकाच लग्न झालं आणि सगळ बिघडतच गेलं.सुन त्या छोट्या घरात खूष नव्हती त्यामुळे सारखी भांडणं सुरू झाली.तिला आम्ही नको होतो.कुठे जाणार? तिला ते घर तिच्या नावाने करून हवं होतं.तिच्या वागण्याचा ह्यांना खूप त्रास होत होता. मुलगा तिच्या पूर्ण आहारी गेल्यामुळे ह्यांची खूप चिडचिड होत असे.ह्या सगळ्याचा परिणाम म्हण किंवा माझ नशीब म्हण हे अचानक अॅटॅक येऊन मला एकटी करून गेले.आजींचे डोळे भरून आले होते.मी माझ्या जवळच पाणी दिलं.
"हे गेल्यावर सुनेने एका दुकानात नोकरी धरली".आजी थोड्या शांत झाल्यावर बोलू लागल्या."सकाळी ९.३०ते १ आणि संध्याकाळी ४ ते८.३०.ह्या वेळात ती घराला कुलूप लावून जाते आणि मी देवळात बसायचच अस तिनीच ठरवून टाकलंय!मुलाच म्हणणं असं की "आई,घरात एकट बसण्यापेक्षा देवळात बरं आहे की! सकाळचं जेवण बनवून मी तिच्या बरोबरच बाहेर पडते,ती कुलुप लावुन घेते आणि दुपारी दीडच्या सुमारास परत येते.पुन्हा साडेतीनला मी देवळात जाऊन बसते.संध्याकाळी माझा मुलगा साडेसातला देवळात घ्यायला येतो.आम्ही घरी आलो की जेवण मीच बनवून तयार ठेवायचं! आजींशी बोलताना कधी बारा वाजून गेले होते कळलच नाही."आजी मी बोलू तुमच्या सुनेशी."मी सुन्न होऊन गेले होते.."छे ग बाई, तिच्या तोफखान्यासमोर तू बोलूच शकणार नाहीस! "तुम्हाला नातवंड?मी हळूच विचारलं."नाहीत ना!मला तिच एक आशा होती की एखादं नातवंड झालं तर ह्यांना थोडी माझी गरज जाणवेल,प्रेम वाटेल,माझं पण मन रमेल पण कसच काय हिला मुलंच आवडत नाहीत म्हणे!घर ह्यांनी माझ्या नावावर करून ठेवलय आणि पेन्शन माझ्या नावांवर आहे म्हणून मला अन्न मिळतय, नेसायला वस्त्र देताहेत,निवारा आहे.मनात आलं हा कसला निवारा!!
त्यानंतर आम्ही सर्व मैत्रिणींनी आजींसाठी वेळ काढायला सुरुवात केली.ठरवून थोडंसं काहीतरी खायला नेऊ लागलो,त्यांच्याशी गप्पा मारू लागलो. पण मनात एकदातरी त्यांच्या सुनेला भेटायचंच अशी इच्छा होती.आजींना त्या वर्षी काही कारणांनी दोन साड्या दिल्या.फुकटच कोणी तरी देताय तर सुनेला बहुतेक चाललं असावं.आजी हसत म्हणाल्या"बरं झालं मी नऊवारी नेसते नाहीतर----
अचानक एके दिवशी मैत्रिणीचा फोन आला."अग, देवळाबाहेर आजींना स्कुटरचा धक्का बसला आणि त्या पडल्या.नशीबानी मी तिथेच होते त्यामुळे लगेच डाॅ.कडे नेलं.त्यांना ड्रेसिंग केल नशीबानी फ्रॅक्चर नव्हत.आणि महत्त्वाचं म्हणजे आजी नको नको म्हणत होत्या तरी मी त्यांना सोडायला घरी गेले.काय सांगू, आजींना बघून त्यांची सून जे काही बोलली ते ऐकवत नव्हतं! कसंबसं मी तिला अॅक्सिडंट बद्दल सांगितलं तर"येवढं सगळं केलत मग घरी घेऊन जायचं होतं ना! माझ्या मागची ब्याद गेली असती".आजी मला इथून जा अशी खूण करत होत्या.इतक अपमानित वाटतं होतं"मैत्रिणीला बोलवत नव्हतं.
दोन दिवस लक्ष ठेवून मी आजींची सुन गेल्यावर आजींच्या घरी गेले.मला बघितल्यावर शेजारच्या काकू लगबगीने आल्या.तुम्ही?त्यांनी विचारलं.दार उघडच होतं.मला बघितल्यावर आजींनी मला हाक मारली"ताई"----चार दिवसात आजींची रयाच गेली होती.शेजारच्या काकू घाईघाईने म्हणाल्या"किती वाट बघतायहेत आजी तुमची, उद्या त्यांना वृध्दाश्रमात नेऊन ठेवणार आहेत,जायच्या आधी तुम्हाला भेटायचं होतं त्यांना! मला खूप वाईट वाटत होतं. पण मनात आलं आजींना हक्काचा निवारा तरी मिळेल का? निघताना आजींना नमस्कार केला आणि त्यांच्या घरातल्या देवांना हात जोडून म्हटलं"आयुष्याच्या संध्याकाळी आजींना मनासारखं जगण्याचं स्वातंत्र्य मिळू दे रे देवा!
नुकतीच एका गुरुवारी भाजी घेऊन देवळात गेले.आजींची आठवण झाली त्यांच्या जागेवर एक आजोबा बसले होते.थबकून उभी राह्यले तर आजोबांनी मला हातानी बोलावून भाजीची पिशवी इथे ठेव असा इशारा केला.मी पण पिशवी त्यांच्या जवळ ठेवून'आलेच' म्हटलं........
-ललिता छेडा

गेलं वर्षभर आजारी असलेले बाबा गेले.आणि त्यानंतर पुढचे तेरा दिवस आॅफिस मधून रोज आईकडे जायचंच अस मधूरांनी ठरवल होत.पण तिथे गेल्यावर दोन बेडरूम,हाॅल, किचनमध्ये दोन भाऊ, त्यांच्या बायका, मोठ्याच्या दोन मुली,धाकट्याचा मुलगा आणि आई असं आठ जणांच कुटुंब रहाताना बघून तिला वाटायचं कसे राहतात हे सर्व एकत्र, काही स्पेसच नाही ह्यांना स्वत: साठी! त्यामुळे ती तिथून लगेच स्वत:च्या घरी जायला निघायची.तिच तसं जाणं आईला खटकायच! येते काय जरा इकडे तिकडे केलं की जेवायला आल्यासारखी जेवते काय, आणि निघते काय! कधी वहिनींशी हवं नकोच बोलणं नाही, भावांची प्रेमानी विचारपूस नाही.पण आता हे सर्व बोलायची वेळ नाही असा विचार करून आई गप्प बसायची!मधुरा मात्र भेटायला आलेल्यांजवळ "मी आॅफीसमधून अगदी रोज येते हं"हे वाक्य आवर्जून म्हणायची!
मधुरा स्वत:च्या घरी आली की तिला वाटायचं आपल्या घटस्फोटानंतर आपण एकटं रहायच ठरवल तेव्हा सर्वांनी किती विरोध केला.पण बाबांनी पुढाकार घेऊन आणि आर्थिक मदत करून स्टेशन जवळच हे दोन बेडरूमच घर घ्यायला लावलं,ते किती बरं झालं नाहीतर मला पण त्यासर्वांबरोबर रहावं लागलं असत.कारण आत्ता जागा घेण म्हणजे आर्थिक दृष्ट्या अशक्यच आहे.
खर म्हणजे तेेव्हा बाबांच्या मनात आपल्या बरोबर ह्या घरात रहायचं होतं पण आईला मुलानातवंडां बरोबर रहायचं होतं.त्यामुळे त्यांच तिच्या घरी रहायला येण्याच राहूनच गेलं!मग बाबांनी त्यांच्याच घरात हाॅल आणि टेरेसच्या मध्ये सोसायटीच्या परवानगीने छोटीशी खोली बनवून घेतली.ती खोली मधुराच्या आई-बाबांची खास जागा होती.बाबांची पुस्तक, आईच्या विठ्ठल रखुमाईच्या छोट्या देखण्या मुर्ती!
मधुराच्या मनात नेहमी यायचं की बर झाल आपण एकट्या रहातोय.आपल्याला आपली स्पेस मिळतेय!सी.ए.सी. एस्.असलेली मधुरा मोठ्या कंपनीत उत्तम पगारावर काम करत होती.स्वत:च्या तथाकथित उच्च राहणीमानाचा, करिअरचा तिला थोडा अभिमानच होता.तसही तिचा बाॅस देवेंद्र पटेलशी असलेल्या तिच्या मैत्रीसाठी तिच हे एकट राहण पुरकच होत.पण ती मैत्री सोसायटीतल्या लोकांच्या नजरेत येत असल्याचे मधुराला जाणवत असल्याने ती शेजा-यांशी थोडी फटकूनच वागत असे.
शेवटच्या दिवशी दादा म्हणजेच मधुराचा मोठा भाऊ अचानक म्हणाला"मधु,आईला थोडे दिवस तुझ्या घरी घेऊन जा.गेल वर्षभर ती घराबाहेर पडलीच नाहीय तुझ्याकडे गेली की तिलाही थोडासा बदल मिळेलआणि अक्कामावशी सुध्दा तुझ्या घराजवळच रहाते ना?.तिच्या सोबतीने आईपण जरा बाहेर पडेल.मधुरासाठी हा अनपेक्षित धक्काच होता.पण दादाच्या कडक आणि शिस्तप्रिय स्वभावामुळे मधुराची काही बोलायची हिंमतच झाली नाही."मी उद्या येते घ्यायला!अस हळूच बोलत ती निघाली.आणि आईजवळ येऊन म्हणाली"तुला यायचं ना?"हो अग लगेच नाही पण दादाची इच्छा आहे आणि त्याचही म्हणणं बरोबर आहे मी इथून गेले की इकडच येणजाणही कमी होईल, त्यांचे नोकरी व्यवसायही सुरू होतील.तुला तर दादाचा स्वभाव माहीतच आहे,त्याचे सर्व निर्णय तुझ्या बाबांसारखे पूर्ण विचारांती घेतलेले असतात.दोघही व्यवसायाने वकीलच ना!
आईच्या बोलण्याकडे तिचं अजिबात लक्ष नव्हतं.तिने घाबरत दादाला विचारलं"कधी नेऊ?"तू नको नेऊ! मीच येणार आहे तिला सोडायला.चार दिवसांनी रविवारी सकाळी आम्ही येऊ."दादा म्हणाला आणि मधूला हुश्श झालं.
रविवारी आई आली आणि त्याचदिवशी मावशी तिला भेटायला आली.मधूरा मावशीशी जास्त बोललीच नाही.मावशी गेल्यावर आईने अपेक्षेप्रमाणे विचारलं"मधूरा दहा-बारा वर्ष झाली तुला इथे रहायला येऊन मावशी एकदाही तुझ्या घरी नाही आली?मावशी म्हणत होती"आज पहिल्यांदाच ती तुझ्या घरी आलीय." अग,माणसं जोडावी लागतात.आईच बोलण ऐकून मधूरेला वाटलं 'झाली माझी शाळा सुरू!'हे बघ आई माझ्याकडे अजिबात वेळ नसतो, आठवडाभर आॅफिसच काम आणि शनिवारी रविवारी माझी काम!
दुसऱ्या दिवशी सकाळी मधूरा उठली तर आईनी चहा, थालिपीठं तयार ठेवली होती.सैपाकघरांत आईचे विठ्ठल रखुमाई विराजमान झाले होते.त्यांच्यासमोर उदबत्ती लावली होती.तिला खूपच प्रसन्न वाटलं.मुर्तिंसमोर न कळत हात जोडून तिने विचारल"ह्यांना पण घेऊन आलीस?"अग आले माझ्या बरोबर तुझ्या घरी!आई हसत हसत म्हणाली."आज संध्याकाळी आक्की बरोबर जाऊन घरात काय काय हवंय ते बघून घेऊन येईन म्हणते"मधूराला कळलं की आईनी तिच्या स्वभावाप्रमाणे घराचा ताबा घेतलाय. "आई माझ्याकडे स्वयंपाकाला बाई आहे."मधुराने एक प्रयत्न केला"असूदे की मी घेईन तिच्याशी जमवून."आई ऐकणार नाही हे आता तिला कळलं होतं.
नंतरच्या आठ-दहा दिवसात आईच्या हातचं खाऊन मधूराला छान वाटत होतं. तिच्या मनात आलं"आईच्या येण्यानी तिच्या घराला घरपण आलंय! शेजारपाजारचे येतजात होते, कोणी तिच्याशी बोलत नव्हते पण आई मात्र सोसायटीत लोकप्रिय झाली होती.
रवीवारी मधूरा आईला म्हणाली"माझा एक मित्र आपल्याकडे तुला भेटायला येणार आहे.तो गुजराथी आहे आणि माझा बाॅस पण आहे ,तो कांदिवली ला राहातो, इतक्या दूरुन येणार तर मी जेवायलाच सांगेन चालेल ना?"काय बनवायचय? आईनी थोडं रूक्षपणेच विचारलं.आईचा मुड बघून मधूरानी पटकन म्हटलं"मावशीला पण बोलावं हवंतर!"नको"आईनं विषय संपवला होता.
देवेंद्र आला, जवळजवळ दिवसभर होता.आईशी मस्त गप्पा मारत होता.मधूराला थोडं बरं वाटल.
तो गेल्यावर मात्र आईनी थेटच विचारलं"मधुरा ह्याच लग्न झालंय आणि ह्याला तीन मुलं आहेत.तुमची मैत्री त्याच्या घरी माहित आहे?हा दिवसभर इथे होता ते त्याच्या बायकोला माहीत होतं? आईचा आवाज चढलेला होता. मला काय माहीत? मधुरा रागाने म्हणाली. मावशीने तुझे कान भरलेत ना?" मी काही लहान नाही कोणी तरी मला सांगेल आणि मी संशय घेईन!तो प्रत्येक फोनवर बोलताना 'मी लोणावळ्याला आहे' असे सांगत होता.आणि माझ्या कडे बघून डोळे मिचकावत होता.मी पण हसुन साजर केलं.पण मला सांग तुमच्या ख-या मैत्रीला असा खोटा आधार का घ्यावा लागतोय..तुला हवी असलेली हीच ती'स्पेस' का?हे तर मनाला येईल तसे वागायचे 'स्वातंत्र्य'आहे.
मधूरा, तुझ्या बाबांनी मला अमृता प्रीतम ह्यांची'चौथा कमरा'ही कथा वाचून दाखवली आहे.स्वत:ला शोधण्यासाठी, समजण्यासाठी शांतपणे बसायची जागा म्हणजे ही स्पेस असं मला वाटतं!जी त्या छोट्याश्या खोलीत सुध्दा आम्हाला मिळायची.
तुला माहितीये"एकत्र रहाण्याचा निर्णय तुझ्या भावांनी ठरवून घेतलाय.ते चौघेही नोकरी व्यवसायामुळे दिवसभर बाहेर असतात आणि त्यामुळेच मुलांसाठी एकत्र रहायच त्यांनी ठरवलं.त्यांच्याकडे पैसे नाहीत असं नाहीये पण त्यांच्यावर जबाबदाऱ्या आहेत.तुझ्या शिक्षणाचा, पैशाचा आम्हाला अभिमान तेव्हा वाटेल जेव्हा तू एखाद्या गरीब मुलाला शिकायला मदत करशील.मधुरा हे सगळं ऐकून घेतेय आणि चेह-यावरचे भाव अपराधी असल्याचे जाणवल्यावर दादानी ज्या उद्देशाने आपल्याला इथं पाठवलं त्यात आपण थोडेसे जिंकलोय असं आईला वाटलं!
"आई इथून नको जाऊस! मला कळत होतं पण परतीचा मार्ग दिसत नव्हता.तू इथे असलीस की मला स्वत:ला शोधायला मदत होईल."मधुराच्या शब्दातला खरेपणा तिच्या चेहऱ्यावर दिसत होता.आईनी त्या घरात स्वत:ची जागा मिळवली होती.

- ललिता छेडा
साडेनऊला अर्ध्या तासात येतो असं सांगून गेलेला तिचा नवरा आनंद,साडेबारा झाले तरी आला नाही त्यामुळे अस्वस्थ झालेली गौरी पुन्हा पुन्हा गॅलरीत जात होती.आनंद मोबाईल पण घरी विसरून गेला होता.असीमनी तर पप्पा कुठे गेलाय? कधी येणार?विचारून भंडावून सोडलं होतं.नुकत्याच बोलायला लागलेल्या छोटया अनन्याकडे बघून तिला वाटलं ह्या दोघांना घेऊन मी शोधायला तरी कुठे जाऊ? तिने आपल्या भावाला फोन लावला. "मी निघालोच आहे"एवढं बोलून दादानी फोन ठेवला गौरी अजुनच गोंधळली.ह्याला काय कळलय म्हणून हा इकडे यायला निघालाय.अनन्याला कडेवर घेऊन ती पुन्हा गॅलरीत गेली तर गेटवर तिला तिची आई आणि भाऊ येताना दिसले, आणि त्यांना सोसायटीतली काही मंडळी सामोरी गेली.दोघजण दादाला बाजूला घेऊन काही तरी बोलू लागले.गौरीच्या मनात आलं"काय चाललंय ह्यांच आणि ही आई कशाला आलीय इतक्या दुपारी! आणि हा दादा आईला कां घेऊन आलाय?एकतर आईला कमरेच्या त्रासामुळे चालवत नाही! तिला काहीतरी वाईट घडल्याची चाहूल लागली.
सर्वजण वरती आले.इतकीजण अचानक घरांत आल्यामुळे गौरीपण थोडीशी भांबावली."काकू,कस सांगू कळत नाहीय! आनंदकाकाचा अपघात झालाय."शेजारचा मंदार चाचरत म्हणाला."कुठे? कधी?" गौरी अक्षरशः थरथरत होती.तो कुठे आहे?मला घेऊन चल त्याच्याकडे!तिची आई तिच्या जवळ आली आणि हमसाहमसी रडू लागली.दादानी तिच्याकडे बघत नाही अशी मान हलवली."अरे दादा तू नाही काय म्हणतोस! गौरी अनावर झाली होती .कोणालाहि न जुमानता तिने मंदारचा हात धरून मला घेऊन चल असं म्हणत त्याला दरवाजाकडे ओढून नेऊ लागली."गौरी शांत हो, अघटीत घडलंय पण आनंद आता आपल्याला सोडून गेलाय हे खर आहे. अपघात झाला तेव्हा मंदार तिथेच होता त्यामुळे लगेच कळलं! दादा बोलत होता पण गौरीला काही कळत नव्हतं.अत्यंत बधिर मनाने आणि यांत्रिकपणे रात्रीपर्यंत सर्व आटपले.काळ कोणासाठी थांबत नाही हेच खरं!
"तो"नसताना पण पहाट झाली होती.गौरीनी उठून घरभर नजर फिरवली.आनंदचा मोठा भाऊ- वहिनी बाहेर सोफ्यावर बसले होते. तिला बघून दोघेही उठून जवळ आले.दादा मुलांबरोबर आत झोपला होता.तिची चाहूल लागल्यावर तोही उठून आला.मुलांना बघून तिला भडभडून आलं."गौरी ड्रायव्हिंग शिक,गौरी तुझा फॅशन डिझायनिंगचा बिझनेस वाढव,गौरी कम्पुटर शिक.सतत आपल्याला प्रोत्साहन देणारा, उमदा सिव्हील इंजिनिअर असलेला,आपला नवरा असा कसा काहीच न बोलता आपल्याला एकट करून गेला.आपल्याला त्यावेळी कटकट वाटायची.तिला वाटल आयुष्य रिव्हाईंड कराव आणि त्याला सांगाव सगळ तू सांगशील ते करेन पण सोडून नको जाऊस!खूप हिंमत करून एकवटलेला तिचा धीर पुन्हा एकदा सुटला.ती ओक्साबोक्शी रडू लागली.दादांनी सर्वांना हातानी 'रडू दे तिला' अशी खूण केली.
इतक्यात समोरच्या घरातल्या नर्मदाभाभी चहा घेऊन आल्या.गौरीला रडताना बघून त्यांनी तिला जवळ घेतले.त्यांच्या आश्र्वासित स्पर्शानी गौरी शांत झाली."अनन्याची काळजी नका करू! मी आहे"भाभीनी हळूच गौरीच्या कानात सांगितलं!गौरीला पण माहीत होतं अनन्याला भाभींचा किती लळा आहे.
पुढचे तेरा दिवस आनंदनी जोडलेली माणसं, नातेवाईक ह्यांच्या येण्याजाण्यात कुठे गेले कळलच नाही.दादा ,भावजीआणि जाऊबाई सावलीसारखे तिच्या बरोबर होते.गौरीला वाटलं'भावाबहिणीच नातं जपणा-या आपल्याला गेल्या तेरा दिवसात दादा किती नव्यानी कळला.वहिनी जेव्हा अचानक म्हणाली"गौरीताई आईंना पाहिजे तर तुमच्या कडे ठेवून घ्या.तेवढीच तुम्हाला मदत!त्यावर दादा लगेच म्हणाला"अरे तू तर रोज मला म्हणतेस तुमच्या आईच मलाच करावं लागतं काही मदत होत नाही आणि हिला कशी मदत होईल?वहिनीला परस्पर उत्तर दिल्यामुळे गौरीला दादाच कौतुक वाटलं.तिला आता ह्या परिस्थितीत नव्यानी स्वत:ला उभं करायच होत आणि त्यामुळे तिला आता खरंच कोणी नको होत.
तुझी असुनही तूं नाही अन्
मी असुनी मज अनोळखी! अशी कवितेतल्या ओळींसारखी तिची अवस्था होती.
संध्याकाळी सर्वजण जायला निघाले.तेव्हा भाभी पण आल्या.दादाला म्हणाल्या"काळजी नका करू, थोडे दिवस मी इथेच झोपणार आहे.दादानी त्यांच्या कडे बघून हात जोडले.तुमचा खूप आधार वाटतो आम्हाला!
सर्वजण गेल्यावर गौरीनी असीमला जवळ घेतलं "किती दिवसांनी भेटलास बेटा, तुला माहितीये आपले पप्पा तर देवाच्या घरी गेलेत कधीच परत न येण्यासाठी आणि आपली अनन्या तर खूपच छोटी आहे.तेव्हा आपल्या दोघांनाच तिला सांभाळायचय! करशील ना मला मदत? वागशील ना शहाण्यासारखा? गौरीला भरून आलं.असीमनी तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला"प्राॅमिस मम्मा,मी एकटासुध्दा घरी राहीन! मी आता बिग बॉय झालोय.फक्त रडू नकोस मग मला पण रडायला येतं.गौरीला जाणवलं की असीम साठी आपण खंबीर असलच पाहिजे.भाभी सर्व ऐकत होत्या.त्यांनी गौरीकडे बघितलं आणि तिच्या मनातलं समजल्या सारख म्हणाल्या"तुला कठीण व्हायलाच पाहिजे.नाहीतर असीम ढीला पडेल.गुजराथी असलेल्या भाभी विचारांनी खूप पुढारलेल्या होत्या.मी पण तुला एक गोष्ट सांगते तू तुझा ड्रेस बनवायचा काम सुरू कर.अनन्याची काळजी नको करू मी सांभाळेन तिला.मला घरांत काम कमीच असतं माझा पण वेळ जाईल. आणि त्याबदल्यात माझ्या नवीन सुनेला तुझ काम शिकव.तीची तुला मदतच होईल.गुजराथी आहे आम्ही,"इस हात दे इस हात ले"बरेच दिवसांनी वातावरण थोड हलक झाल होत.
गौरीला भाभींची आॅफर ऐकून खूप बरं वाटल! तिला आनंदची आठवण झाली.मागे लागून त्यानी ड्रेस डिझाईनींगच काम सुरू ठेवायला लावले होते.नाहीतर असीम नंतर दहा वर्षांनी अनन्याच्या वेळी दिवस गेले तेव्हा तो व्यवसाय ती बंदच करणार होती."भाभी दादाशी, आनंदच्या भावाशी बोलते आणि मग एकत्र बसून ठरवूया.तुमच्या यजमांनाशी पण मला बोलायला लागेल! अरे गौरीबेन त्यांच्याशी बोलल्याशिवाय मी तुझ्याशी कशी बोलेन?ते तर पहिले असणार आपण बोलणार तेव्हा!
गौरीला वाटलं ही आनंदचीच ईच्छा असणार.कारण रडणारी, केविलवाणी गौरी त्याला आवडलीच नसती."तो"नसताना ती आलेल्या परिस्थितीतून धैर्याने मार्ग काढणार.आणि दोन्ही मुलांना वाढवताना त्यांच्याकडे जग अभिमानाने पाहिल असच ध्येय ठेवून वागणार.दोन्ही मुलांना जवळ घेऊन गौरीनी आनंदच्या फोटोकडे समजल्या सारख बघितलं.
-Lalita Chheda

बॅंकेत स्वत:च्या केबिनमध्ये शिरत असतानाच मीनलचा मोबाईल वाजला,अनोळखी नंबर बघून'हॅलो, कोण?'मीनलनी घाईघाईने विचारल..मीनल सबनीस बोलताहेत का?साहिल सबनीसच्या आई!समोरचा आवाज बाईचा होता. कोण बोलतय?मीनलच्या स्वरात काळजी होती."मी साहिलच्या शाळेतून बोलतेय"साहिलच्या प्रगतीबाबत चर्चा करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी दहा वाजता शाळेत यायचय. साहिलच्या वडिलांनाही ह्याचवेळी यायचं आहे.अर्थात तसा त्यांना फोन केलाय .मीनलनी काही विचारण्या आधी फोन ठेवला होता.इतक्यात बॅंकेच्या स्टाफमधली प्रज्ञा आत आली.मीनलच्या चेह-यावरची काळजी बघून म्हणाली"काय झालं मॅडम?अग साहिलच्या शाळेतून फोन आला होता, उद्या आम्हा दोघांना सकाळी दहा वाजता शाळेत बोलावलय!काय सांगणार आहेत कोणास ठाऊक?तू सकाळी सांभाळून घेशील ना? मी लंच पर्यंत येतेच.पण नाहीच जमल यायला तर मी तुला कळवेनच.
संध्याकाळी मीनल घरी पोचली तर सतीश तिचा नवरा तिची वाटच बघत होता."या, उद्या शाळेत बोलावलय ना! एकुलत्या एका लेकाचे पराक्रम ऐकले का चार विषयात नापास झालाय. त्यामुळे आपल्याला शाळेत बोलावून घेतलय!साहिल रडवेल्या चेह-यानी खाली मान घालून बसला होता."माझा, सतीश सबनीसचा मुलगा सातवीच्या सहामाही परीक्षेत नापास होतो! सतीश त्याच्या स्वभावाप्रमाणे 'मी'शब्दाभोवती फिरत होता.मीनलला वाटलं त्याला सांगाव"अरे बाबा असं का झालं त्याबद्दल साहिलशी बोलूया ना!!पण आपण अस काही बोललो तर नेहमी प्रमाणे भांडण होणार.त्यापेक्षा तिनी ठरवल साहिलला घेऊन त्याच्या खोलीत जाऊया.
"अरे साहिल नको रे त्या चौकीदाराच्या मुलाशी बाबूशी खेळत जाऊ,त्याच्या घरी जात जाऊस!! तुला प्रायव्हेट ट्युशन लावूया का? आपल्या इतक्या पाॅश सोसायटीत आमची लाज नको रे घालवू."मीनलची असहाय्यता आवाजात लपत नव्हती.
"पण मम्मा बाबू तर त्याच्या वर्गात पहिला आलाय"साहिल निरागसपणे म्हणाला.अरे तुझी ठाण्यातली शाळा किती मोठी आणि पाॅश आहे.तुझ्या शाळेत खूप काॅम्पिटीशन असते बेटा! मीनलला कळत होतं की ह्याच्या मनात काही तरी वेगळच आहे.आणि आपण काही तरी वेगळंच बोलतोय!
"चल जेवायला"मीनलनी साहिलला जवळ घेऊन म्हटल."मी बाबूच्या घरी जेवलो"साहिल खाली बघत बोलला.मला डॅडींची भीती वाटत होती"
बाबू,बाबू काय आहे त्या घरात? किती वेळा सांगितलं तुला नको जाऊस त्यांच्या घरी!तुझा डॅडी किती ओरडतो मला, सोसायटीतल्या बायका पण तू तिथे का जातोस म्हणून विचारत असतात!! मीनलची चिडचिड झाली होती."बाबूच्या दोन बहिणी, आई ,बाबा सगळे जण माझे खूप लाड करतात.माझ्याशी गप्पा मारतात"मीनलच्या प्रश्र्नांना उत्तर द्यावं असं साहिलला मनापासून वाटलं.
पण तो "साॅरी मम्मा" येवढच बोलून झोपायची तयारी करायला लागला!
सकाळी घरातल वातावरण अस्वस्थच होत! सतीशनी घराबाहेर पडताना"उगीचच काही तरी ते शाळेतले मला शिकवायला लागले तर मी अजिबात ऐकून घेणार नाही!"असा मीनलला दम दिला.तिनी फक्त त्याच्या पुढे हात जोडले. रस्ताभर सतीशची बडबड सुरूच होती. गाडीतून उतरल्यावर मीनलनी साहिलला जवळ घेऊन"मी आहेना,काळजी नको करू"अस म्हटल.
शाळेत त्यांना प्रिन्सिपलच्या खोलीत बोलावल आणि साहिलला त्याच्या वर्गावर पाठवल. तिथे प्रिंन्सिपल मॅडम बरोबर अजुनही एक मॅडम होत्या."Meet Mrs. Vaidehi Soman, Our School's Counselor. And Mrs. Vaidehi, they are the parents of Sahil Sabnis." प्रिन्सिपलमॅडमनी एकमेकांशी ओळख करून दिली.
. "आपण मराठीतच बोलूया, त्यामुळे मला तुमच्याशी मोकळेपणाने बोलता येईल."वैदेही मॅडमनी सुरवात केली.मीनलला तीसपस्तीशीतली जीन्स टी शर्ट घातलेली वैदेही आवडली होती. तिच्या बोलण्यातल्या ठामपणामुळे सतीशपण थोडा शांत वाटत होता! टेंशन नका घेऊ!साहिल नापास झाला आहे तो चुकीची उत्तरे लिहिल्यामुळे नाही तर त्यानी पेपर लिहीलाच नाही, त्या चारही पेपरांपैकी एकेका पेपरात त्यानी जेमतेम तीन-चार उत्तर लिहीली आहेत. वैदेही सांगत होती आणि मीनलच्या मनांत आलं "साहिल जर पेपर लवकर देवून टाकत असेल तर तेव्हाच टीचरच्या लक्षात का नाही आलं?"
साहिलनी लवकर पेपर दिला ते टिचरच्या लक्षात कसं नाही आल असं तुमच्या मनात आलं ना! वैदेहीनी मीनलला विचारलं.टिचरला पहिल्याच पेपरला लक्षात आलं होतं आणि तिने मला तस सांगितल सुध्दा!मीच टिचरना परीक्षा पूर्ण होऊदे असं म्हटल.वैदेही संपूर्ण तयारीनिशी आली आहे ते दोघांनाही जाणवल!काय सांगू सबनीस मॅडम त्याला नापासच व्हायच होत!कारण कधीतरी रागाने सबनीस सरांनी त्याला म्हटल होत कि"तू नापास झालास तर टाकेन त्या बाबूच्या शाळेत! साहेबांनी ठरवल नापास व्हायच! इतरही बरेच प्लॅन होते त्याच्या डोक्यात.
मी गेले पंधरा दिवस साहिलशी बोलतेय! अनेक वेळा त्याच बोलणं रेकाॅर्ड पण करुन ठेवलय! अर्थात त्याला ह्याची काहीच कल्पना नाही.फक्त प्रिन्सिपल मॅडमना ह्याची माहिती होती.कारण पालक असं म्हणू शकतात कि आमचा मुलगा अस बोलणारच नाही.वैदेहीच्या अभ्यासपूर्ण बोलण्याने, तिच्या व्यक्तिमत्त्वामुळे सतीश प्रभावित झालाय ते बघून मीनल पण रिलॅक्स झाली होती
"तुमच्या मुलाचा प्राॅब्लेम आहे त्याच एकटेपण! तुम्ही बॅंकेत नोकरी करता ना?" वैदेहीनी मीनलला विचारलं. आणि तुम्ही? सतीशकडे बघून विचारलं"माझा स्वत:चा व्यवसाय आहे."साहिल शाळेतून घरी १ वाजता येत असेल तेव्हा घरात कोण असत"वैदेहीनी विचारलं.आमच्या स्वैपाकाच्या मावशी असतात आणि त्या संध्याकाळपर्यंत थांबतात."मीनलनी सांगितल.आता मी सांगते ते नीट ऐका वैदेही त्या दोघांकडे बघत म्हणाली "साहिलच्या म्हणण्या प्रमाणे तो घरी येतो तेव्हा त्या टी.व्ही.बघत असतात किंवा झोपलेल्या असतात.तो आपल आपलच जेवण वाढून जेवतो.
रात्री पण तो एकटाच जेवतो कारण डॅडी ड्रींक्स घेतात म्हणून उशीरा जेवतात, मग मम्मीशी खूप भांडतात.त्याला खूप भीती वाटते.तेव्हा त्याला वाटत की आपल्याला पण बाबूसारखी एकतरी बहिण हवी होती.मीनलच्या डोळ्यातले अश्रू बघून वैदेही म्हणाली"आपण प्रश्र्न सोडवायला भेटलो आहे.हल्ली ब-याच घरांतल्या एकुलत्या एक मुलांचा हा प्रश्न आहे.आईवडिल दोघेही नोकरी, व्यवसायानिमित्ताने घराबाहेर असतात.आणि मुल एकलकोंडी होतात.कधी वाईट संगतीला लागतात.एकुलत्या एका मुलासाठी भरपूर पैसे खर्च केले म्हणजे जबाबदारी संपत नाही.तुमच्या नशिबाने साहिलला बाबूच घर आहे जिथे तो गप्पा मारतो,हसतो, एकत्र जेवतो.पण तुम्हाला तेही आवडत नाही.तुम्हाला माहीत आहे का "मी काल साहिल बरोबर बाबूच्या घरी पण जाऊन आले.वैदेही हसत हसत म्हणाली.सबनीस मॅडम मी एकदा केस हातात घेतली की तिचा पूर्ण अभ्यास करते! बाबूच्या दोघी बहिणी दहावी बारावीला आहेत.उत्तम मार्क मिळवताहेत!बाबू पण वर्गात पहिला आलाय.निव्वळ तुमच्या उच्चभ्रू सोसायटीच्या चौकीदाराची मुल म्हणून त्यांना लांब ठेवणं किती चुकीचे आहे.
" वैदेही ताई मला माझी चूक समजलीय."मीनल शांतपणे म्हणाली.साहिलसाठी मला जे काही निर्णय घ्यावे लागतील ते मी घेईन.मी तुम्हाला उद्या फोन करेन चालेल ना?बोलता बोलता मीनल उठली.सतीश त्याच्या स्वभावाप्रमाणे चिडला होता पण वैदेहीच बोलण इतकं स्पष्ट आणि खर होत कि तो तिच्याशी न बोलता न बघताच निघाला.
शाळेबाहेर पडल्यावर सतीशनी उपरोधाने विचारलं"काय निर्णय घेणार आहात?"गाडीत बसता बसता मीनल म्हणाली"आपण तुमच्या आईला आणायला कांदिवलीला जाणार आहोत.तुमच्या स्वभावाला,दारूला कंटाळून त्या एकट्या त्यांच्या घरी रहायला गेल्यात.आणि त्यानंतरच हे सगळं घडलय.
साहिल शाळेतून यायच्या आधी आपण आजींना घेऊन यायचं.आणि त्याला सरप्राइज द्यायच.वैदेही जे काही बोलली आहे त्यावर तुम्हालाच विचार करायचा आहे .स्वभाव बदलात तर उत्तम नाहीतर मी साहिलला, आजींना घेऊन कांदिवलीला जाऊन राहीन.मीनलचा स्वर निर्णायक होता.
सतीशनी गाडी कांदिवलीच्या दिशेला निमुटपणे वळवली होती.
ललिता छेडा