हुश्श करुन मामींनी सामान खाली ठेवल आणि कुलुप काढायला लागल्या. त्यांना तस दमलेल बघून मी पुढे झाले “मामी द्या इकडे किल्ली, मी उघडते दार आणि सामानही ठेवते घरात” “अग, राहू दे. हल्ली किल्ली लावायला दिसत नाही आणि ऊन किती आहे. डोळ्यासमोर अंधारल”.”तुम्ही कश्या आलात पुण्याहून” घरात गेल्यावर मी विचारल. “सकाळच्या ट्रेननी दादरला उतरले आणि लोकल पकडून आले”. मामी थकून खुर्चीवर बसल्या. “सामान घेवून?” मी कपाळाला हात लावला. “अग करतात मदत म्हातारी बघून” मामी हसत म्हणाल्या. “तुम्हाला न्यायला तर तो भाचा गाडी घेवून आला होता मग सोडायला नाही आला तो?” मी थोडस चिडूनच म्हणाले. “अग नव्हता त्याला वेळ” मामी केविलवाण्या म्हणाल्या!. अस नसत मामी, गरज संपली की असच वागतात माणस. कितीवेळा सांगितलय मी तुम्हाला नका जाऊ अशा कोणी मदतीला बोलावल तर. मी कळकळीने बोलले पण मला माहित होत की पुन्हा कोणी बोलावल की मामी जाणार!! मामी माझ्या सख्या शेजारीण त्यांचा एकुलता एक मुलगा अमेरीकेत सेटल झालाय. आणि बॅंकेत दर महिन्याला पैसे पाठवले की आईसाठीच कर्तव्य पूर्ण झाल अस गृहीत धरण्यातला एक आहे. मामांच्या अचानक मृत्युमुळे एकट्या झालेल्या मामींना कोणालाही नाही म्हणता येत नसे. ह्यावेळी मात्र मामी खूप थकलेल्या जाणवत होत्या.
“खर आहे तुझं” मामींच्या डोळ्यात पाणी तरळल होत “एकट्या रहाणाऱ्यांना फार गृहीत धरतात लोकं. एकटीला कसली काम, कसले खर्च अस म्हणतात. पण म्हणून आम्ही तुमच्या घरची काम करावी अशी अपेक्षा नका ना करू!!” मामी बोलत होत्या आणि वाटल एकटेपणाशी खंबीर लढणाऱ्या ह्या स्त्रियांना गृहीत धरल तर त्यांना जास्त दुःख होत!! आयुष्याच्या माळरानावर एकाकी चालताना रस्ता कधी कुठे संपेल हे माहित नाही अश्या परिस्थीतीत प्रेमाचा ओलावा शोधणाऱ्या मामींसारख्या स्त्रियांना दोन शब्द प्रेमांचे देखील नक्की बळ देतात.
No comments:
Post a Comment