Thursday, June 14, 2018

उर्जा

        
     


  आमच्या घराच्या बाजूला थोडीशी मोकळी जागा आहे.त्या जागेच्या कोपऱ्यात एक मोठं पिवळ्या रंगाची फुले असणार झाड आहे.त्याला मी पिवळा गुलमोहर म्हणते.झाड आमच्या कंम्पाॅउडच्या भिंतीला टेकूनच आहे त्यामुळे झाडावर येणारे पक्षी, त्यांची घरटी बाहेर अंगणात आले कि सहज दिसतात.शिवाय मी झाडाच्या खाली कट्ट्यावर पक्ष्यांसाठी पाणी ठेवते. येणाऱ्या पक्षांशी ओळखही झाली आहे.एक कावळा ज्याच्या मानेवरचा ग्रे रंग पंखांपर्यंत उतरलेला आहे त्याची तर रोजचीच फेरी असते.गेल्यावर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला तोच कावळा कट्ट्यावर बसून मान वाकडी करून वेगळाच आवाज करु लागला.जणू कोणाला तरी साद घालत होता. आणि थोड्याच वेळाने कावळीण ही आलीच! तिनेपण त्याला आवाजाने प्रतिसाद दिला.बघताबघता त्या दोघांचा रोमान्स सुरू झाला. आणि त्या झाडावर घरटं बांधण सुरू झालं दोन चार वेळा हवेनी,वा-यानी ते पडत होतं ते बघून मला मदत करावी अस वाटल. शेवटी एकदाच ते बांधून झालं.प्राण्यांच्या सृष्टीतले निर्मितीचे आविष्कार बघून गंमत वाटत होती.थोड्या दिवसांनी तिथे पिल्लांचा चिवचिवाट ऐकू येऊ लागला.तो कावळा थोडे दिवस घरट्याच रक्षण करत होता. अचानक तो दिसेनासा झाला.कावळीण मात्र प्रेमानी पिल्लांना सांभाळत होती.तिला कोणी 'परित्यक्ता' म्हणून हिणवत नव्हते! महिन्याभरात पिल्ल येऊन फांद्यांवर नाचू लागली. आणि एक दिवस अचानक उडून गेली.पाऊस पण खूप पडत होता आणि त्यामुळेच बहूतेक तो कावळा दिसत नव्हता पण कावळीण पिल्ले उडे पर्यंत त्यांच्या अवतीभवतीच होती वाटलं प्राण्यांच जग किती अलिप्त असूनही सुंदर आहे.माणसांसारखी जगण्याला लेबल नाही लावत.
          त्यानंतर ह्या उन्हाळ्याच्या आधी एका संस्थेतर्फे ती मोकळी जागा स्वच्छ करण्यात आली. आणि त्यांनी त्या माझ्या एकट्या झाडाखाली दोन बांक ठेवली आजूबाजूला झाड लावली.त्यांच्या कामाला 
मनापासून दाद दिली.त्या उदास वाटणा-या जागेवर सकारात्मक उर्जा निर्माण झाली होती.ह्या वर्षी माझा पिवळा गुलमोहर थोडा ज्यास्तच बहरला!
        झाडाखालच्या बेंचवर तरूणांच्या सेल्फी सुरू झाल्या. ज्येष्ठांच्या भेटीगाठी होऊ लागल्या.
         पावसाची चाहूल लागली आणि पहिला पाऊस पडला! आणि माझ्या ओळखीचा कावळा कट्ट्यावर बसून मान वाकडी करून साद घालू लागला.
          अरे, सृष्टीच्या सृजनाचा सोहळा सुरू झाला की!   

No comments:

Post a Comment