निर्मलाकाकू आता कधीही जाईल अशा परिस्थितीत आहे हे सर्वांना समजत होतं.आणि तिचा जीव कशात अडकलाय ते पण सगळ्यांना कळत होतं.पण "मीनलला बोलवूया" असं मोठ्या काकांना कोणी सांगायचं तेच कळत नव्हतं.
निर्मला पण ताकद नसल्याने डोळे मिटून पडून होती.पण तिला सगळं ऐकू येत होतं.तिला वाटलं सांगावं"मला मीनल भेटायला हवीच आहे पण तिलाच नक्की माहित आहे की मला काय हवंय, माझा जीव कुठे अडकलाय! ज्या उंबरठ्यावरच माप ओलांडून मी ह्या घरात आले आणि माझा अचेतन देह जेव्हा उंबरठा ओलांडून बाहेर जाईल.तेव्हा तो उंबरठा स्वच्छ, रोजच्यासारखा रांगोळीने रेखाटलेला हवा.
मिटलेल्या डोळ्यांनी निमा भुतकाळात रमली होती.आज जवळजवळ चाळीस वर्ष झाली आपल्याला पुण्यातल्या ह्या केळकरांच्या वाड्यात लग्न करून आलो त्याला! मुंबईतल्या दोन खोल्यांच्या चाळीतून येवढ्या मोठ्या वाड्यात आल्यावर आपण किती हरखून गेलो होतो.
दिंडी दरवाजातून आत जायचा उंबरठा थोडा उंचच होता.त्याला ओळंगून पूढे आलं की दोन बाजूला दोन दोन बिर्हाडं! नंतर विहीर तिथेच धूण्याचा दगड, तिथंच सर्वांसाठी संडास-बाथरुम आणि आपल्या घरातल्यांसाठी मात्र मागच्या दरवाज्याजवळ हीच सोय स्वतंत्र केलेली होती.
पुढच्या बाजूला विहीरीनंतर छोटंसं तुळशीवृंदावन,नंतर ओटी, घरांतल्या मुख्य दरवाजाच्या चौकटीखाली छोटासा उंबरठा ज्यावर ठेवलेल्या धान्यानं शिगोशिग भरलेलं माप ओलांडून आपण घरात आलो.इतकी सुंदर रांगोळी काढलेली होती त्या उंबर्यावर! लक्ष्मीची पावलं कोपऱ्यात होती तर उंबरठ्यावर गोपद्म, स्वस्तिक काढलेली होती. आणि आत आल्याबरोबर स्वागत करायला छोटी 'मीनू' सगळ्यात मोठ्या दिरांची एकुलती एक मुलगी. आणि तेव्हापासून मीनल,निमाकाकूची गट्टी जमली. मधल्या जाऊबाईंचा एकुलता एक मुलगा आणि आपले दोन मुलगे, आणि सासूबाई, केवढं भरलेलं घर होतं आपलं! सासूबाईंनी आपल्या स्वभावानी सगळ्यांना जोडून ठेवलेलं होतं. आणि आज त्या नाहीत तरी आपण सगळे एकत्र राहतोय. दहा वर्षापूर्वी मुलांचे वडील अचानक गेले.पण नशीबानी दोन्ही सुना चांगल्या आहेत.धाकटी तर इतकी बडबडी आणि हौशी आहे की सगळ्या घरातलं चैतन्य आहे ती!
लक्ष्मी रोडवर साड्यांच छोटं दुकान दोन्ही मोठे दिर चालवायचे.आणि आपले यजमान पुण्यातच नोकरी करत होते.यजमानांनच्या आठवणीने निर्मलाचे डोळे भरून आले.कुणीतरी म्हणालं"वहिनींच्या डोळ्यात पाणी आलंय" निर्मलाच्या धाकट्या सुनेनं काळजीपूर्वक डोळे पुसले.आणि म्हणाली"मी बोलते मोठ्या काकांशी आणि बोलावून घेऊया मीनलला"
तिकडे मीनलला पण कळलं होतं की काकू खूप आजारी आहे. काकूला कॅन्सर झाल्याचं आपल्याला कोणीच सांगितलं नाही आणि आता ती सिरीयस झाल्यावर कळतंय, ती खूपच बेचैन झाली होती.
सिंधी मुलाशी लग्न केल्यानंतर बाबांनी "परत इकडे यायचं नाही.तुझा आमच्याशी संबंध संपला."असा मधल्या काकांनकडून फोन केला.आणि बारा वर्ष झाली आपण घरी गेलो नाही.
दोन-चारदा मैत्रीणींनी फोन लावून दिला त्यामुळे निमाकाकूशी,आईशी बोललो होतो.पण ते तेवढ्यापुरतं.
आपली सर्वात जवळची मैत्रीण म्हणजे निमाकाकू, मीनलला सकाळपासून वेड्यासारखी काकूची आठवण येत होती.पहाटे साडेपाच पासून काकूचा दिवस सुरू व्हायचा.घराच्या मागच्या दारापासून दिंडी दरवाजापर्यंत स्वच्छ कचरा काढल्यानंतर आंघोळ झाली की काकू तुळशी वृंदावनापाशी, देवघरात, आणि महत्त्वाचा तिचा खास उंबरठा त्यावर रांगोळी काढायची.इतकी पटकन पण सुरेख,रेखीव काढायची की घरात येणार्या प्रत्येकाची कौतुकाची नजर उंबर्याकडे जायची. आणि दुपारच्या जेवणानंतर शिलाई मशीनवर बसलेली काकू डोळ्यांसमोरून हलत नव्हती.मीनलनी ठरवलं पुण्याला जायचं.पण आपल्या वरून भाकर तुकडा ओवाळायला उंबर्यावर काकू नाही येणार.मीनलचे डोळे भरून आले.मधल्या काकूचा एकुलता एक लेक अमेरिकेत शिकायला निघाला आणि निमाकाकू म्हणाली होती " देशाचा उंबरठा ओलांडून विदेशात निघालायस पण परत ये बरं! पण तो काही आला नाही तिथंच सेटल झाला.नंतर मधली काकू गेल्याच कळलं!
मिनल घरच्या आठवणींनी व्याकुळ झाली होती.इतक्यात मोहन तिचा नवरा तिथं आला."क्या हुआ? त्यानं विचारलं आणि मीनलला रडू आवरेना."माझी निमाकाकू खूप आजारी आहे.मला तिची खूप आठवण येतेय"
अरे,फिर जाकर मिल आना।"मोहन सहज बोलला.गाडी लेकर जाना,तो तुरन्त वापस आ सकते हो।
दोघं बोलत असतानाच फोन वाजला "मी विद्या, तुमच्या निमाकाकूंची धाकटी सून! तुमची काकू खूप आजारी आहे.तुमची वाट बघतेय.लगेच निघाल?
मीनलच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता.
"काळजी नका करू, मी मोठ्या काकांच्या परवानगीनंच फोन केलाय"विद्याला फक्त "लगेच निघते"येवढं बोलून तिनं फोन ठेवला.
जातीपातीच्या पलिकडे असलेलं आपलं नातं बाबांनी जाणलं की काकू साठी आपला अभिमान बाजूला ठेवला.जाऊ दे, मी काकूला भेटणार हे महत्त्वाच!
रस्ताभर काकूचीच आठवण, आपण दोघी कशा ऐनवेळी पापड तळून तासनतास जेवत बसायचो,निमा-मीना उलटसुलट एकच वेलांटी अस म्हणून हसायचो!
विचारात ती पुण्याला कधी पोचली कळलंच नाही.
दाराशी काकूचा मुलगा,भाऊ जणू तिची वाटच बघत होते.
दिंडी दरवाजाचा उंबरठा ओलांडून जाताना मीनलला आठवलं "ह्या उंबर्यावर बसून काकू,आई बरोबर किती गप्पा मारल्यात.आपल तोंड रस्त्याकडे आणि काकूचं नेहमी घराच्या दिशेने!इथेच आपण काकूला सांगितलं "आपल्याला मिडीया रिपोर्टर व्हायचंय,इथे आपण आपलं मोहनवर प्रेम आहे हे काकूकडे कबूल केलं.
घराचा उंबरठा धूळीनी भरलेला केविलवाणा दिसत होता. मीनल आल्याची कुजबुज घरात सुरू झाली.पण कोणाकडेही न पाहता ती धावत काकू जवळ गेली."काकू मी आलेय,तुझी मिनू डोळे उघड ना!आणि तिचा आवाज ऐकून निर्मलानी क्षीणपणे डोळे उघडले.मीनल तिच्या डोक्यावरून हात फिरवत होती."काकू,आधी उंबरठ्यावर रांगोळी काढू ना? अस्वच्छ उंबरा बघवत नाहीय ना? मीनल बोलत बोलत उठली आणि हातात फडकं घेऊन घराचा,देवघराचा उंबरठा स्वच्छ पुसून काढला.काकूसारखीचं तिनं शिकवली तशीच सुरेख रांगोळी काढली.अनभिष नजरेनं निमाकाकू आणि सर्व घर तिच्या हालचाली बघत होतं. अगदी ठरवल्यासारखं कोणीही रडत नव्हतं.
निर्मला काकूंच्या जवळ येऊन मीनल म्हणाली" रांगोळी झाली की तू म्हणायचीस तसं एकदा म्हणं ना"मिनूताई, दूध पिऊन घ्या.आल्यापासून नुस्ती धावपळ चाललीये!
पण तिच्या निमाकाकूनी उंबरठ्यावरची रांगोळी पूर्ण झाल्यावरच शांतपणे डोळे मिटले होते.तिच्यासमोर हात जोडून उभ्या असलेल्या मीनलच्या वडिलांना रडू आवरत नव्हतं."जातीपातीच्या खोट्या विचारांत मी खरीखुरी नाती जपू नाही शकलो.वहिनी,माफ करा मला!
पण मीनलला डोळे भरून बघितल्यावर निर्मला तर रांगोळी रेखाटलेला उंबरठा ओलांडून अनंताच्या यात्रेला निघून गेली होती.
ललिता छेडा

कथानक चांगले आहे. सहवासाने जिव्हाळा निर्माण होतो।तसे दोघींचे झाले.
ReplyDeleteEk anokhya natyacha sunder ulgada karnari sunder katha
ReplyDeleteVery touching ! अप्रतीम! माझ्याही बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या!
ReplyDeleteसर्वांचे मनःपूर्वक आभार
ReplyDeleteउंबरठ्यावर किती गोष्टी रेंगाळतात न!!बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या असे नातेसम्बध दुर्मिळ झालेत
ReplyDelete