Thursday, April 4, 2019

द्वंद्व

     माझं सगळं आयुष्यच द्वंद्वानी भरलेलं आहे.सुख-दु:ख, चांगल-वाईट,न्याय-अन्याय, खरं-खोटं आणि खूप काही! म्हणूनच बहूतेक माझं नाव नर्मदा ठेवलं असावं.काहीही घडलं तरी वहात रहायचं! 
      सांगली जवळच्या एका खेड्यात जन्मलेल्या मला मामानी अकरावी म्हणजेच हल्लीची दहावी झाल्यानंतर पूढे शिकवतो असं माझ्या आईला सांगून मुंबईला आणलं. मी पण मुंबईला जायला मिळणा वोर म्हणून खूष होऊन बॅग भरून मामाबरोबर अक्षरशः नाचतच निघाले.तशी मी उफाड्याची त्यामुळे आईला माझी काळजी होतीच. ती सारखी मामाला बजावत होती."पोर भाबडी आहे.तिला सांभाळत जा.रात्रीची बाहेर पाठवत जाऊ नकोस"भरून आलेल्या डोळ्यांनी आईनं निरोप दिला. खरं म्हणजे तिला मला पाठवायचं नव्हतं.पण एकत्र कुटुंबात पंधराजणांच करताकरता ती थकून जात होती.तिला वाटलं तीन मुलीतल्या एखादीचं तरी भल व्हावं. 
       मुंबईत मामाच्या दोन खोल्या होत्या.कोपर्‍यातल्या असल्यामुळे त्यानं बाल्कीनीची बंद करून एक जास्तीची खोली केली होती.मला ती जागा फार आवडली.आणि दुसरी आवडलेली गोष्ट म्हणजे शेजारी रहाणारा 'विश्राम'. मेडिकलच्या शेवटच्या वर्षाला असणारा विश्राम अगदी थोड्या दिवसात माझा मित्र झाला.
     मामांनी मात्र मला काम करायलाच आणलेलं आहे हे मला महिन्याभरात लक्षात आलं.मामामामी दोघंही नोकरी करत होते.त्यांची दोन्ही मुलं शाळेत जाणारी होती. मला घरकाम करायला त्यानं आणलं होतं. तो माझ्या शिक्षणाबद्दल काहीच बोलत नव्हता.
      विश्रामला माझी घुसमट समजली आणि त्यानं मला नर्सिंग शिकशील? असं विचारलं.मी हो म्हटल्यावर मामाला समजावलं आणि मामाचं घर सांभाळून मी शिकले आणि नर्स झाले.आणि माझ्या उत्तम मार्कांमुळे त्याच सरकारी हाॅस्पिटलमध्ये मला नोकरी देखील मिळाली.
       विश्राम मात्र सर्जन झाल्यावर ठरवल्याप्रमाणे कोकणातल्या आपल्या गांवी हाॅस्पिटल काढायला चाळ सोडुन गेला. माझ्या आयुष्याला मात्र दिशा त्याच्यामुळेच मिळाली होती.
     माझ करिअर सुरू झाल्याचा 'आनंद' होता पण बरोबरीनं विश्रामच्या रत्नागिरीला जाण्याचं 'दुःख' होतंच. आणि हे द्वंद्व मी विश्रामच्या खरं म्हणजे प्रेमात पडले होते त्यामुळे मनातल्या मनातच संपवलं....

      गावाकडे माझ्या दोन्ही मोठ्या बहिणीं सातारा,मिरजेत लग्न करून रहायला लागल्या होत्या. नोकरीच्या निमित्ताने धाकटा भाऊ नाशिकमध्ये रहायला गेला होता.आम्ही सगळी भावंडं विखुरले गेलो होतो.
     मामीची मुलंही मोठी झाली होती.त्यामुळे तिला  माझी असलेली गरज संपली होती.
       आईच्या सांगण्यावरून मामींनी माझ्यासाठी स्थळं बघायला सुरुवात केली.आणि तिच्या नोकरीच्या ओळखीतून कांजूरमार्गला स्वत:ची छोटीशी चाळ असलेल्या पाटीलांच स्थळ सांगून आलं. एकत्र कुटुंब होतं.सासूसासरे, दोन वर्षांपूर्वी लग्न होऊन आलेल्या मोठ्या जाऊबाई  होत्या.त्यांना एक मुलगा होता.दोन लग्न झालेल्या नणंदा आणि चांगली नोकरी असलेला माझा होणारा नवरा. मी 'नाही' म्हणाव असं काहीच नव्हतं पण मला मात्र 'हो' म्हणावं असं वाटत नव्हतं.
पण.....
       लग्न झाल्यावर मी नोकरी सोडावी असं घरातल्या सगळ्याजणांचीच इच्छा होती पण मी मात्र सगळ्यांच्या मनाविरुद्ध जाऊन माझी नोकरी सूरूच ठेवली.आणि महत्त्वाचं म्हणजे माझ्या नवर्‍यानं मला चांगलाच सपोर्ट दिला.
      लग्नाला दहा वर्षे झाली होती.मला दोन मुली झाल्या होत्या.जाऊबाईंशी मात्र माझं काही जमत नव्हतं.त्या खूप चिडक्या आणिभांडकुदळ होत्या.
    सतत 'खर-खोटं' करणं ही त्यांची एक वाईट सवय होती.ज्याचा मला प्रचंड संताप यायचा.
     सासूबाई गेल्यावर मात्र मी घरातल्या घरात वेगळी झाले.सासरे माझ्याबरोबर रहात होते.पण वेगळं झाल्याच्या अवघ्या दोन महिन्यांत ह्यांना अर्धांगवायूचा मोठा झटका आला.आणि ह्यांनी अंथरुण धरलं.वेगळ होऊन निवांत वाटत असलेल्या 'सुखाला' ह्यांच्या आजारपणामुळे 'दुःखाची' किनार लागली होती. ह्या सुखदुःखाचं द्वंद्व विसरून मी पुन्हा एकदा पदर खोचून कामाला लागले.मुली पण शहाण्यासारख्या मला मदत करत होत्या.पण.....
       माझ्या नशिबात काही वेगळेच लिहीलेलं होतं.
       अजूनही तो दिवस माझ्या लक्षात आहे.ह्यांचा वाढदिवस होता म्हणून खीर केली होती.सेकंडशिफ्ट असल्यामुळे त्यांना भरवून हाॅस्पिटलला जायला निघाले.मुलीपण शाळेत गेल्या होत्या.सासर्‍यांवर ह्यांना सोडून मी हाॅस्पिटलला जेमतेम पोचले आणि घरातून फोन आला."ह्यांची तब्येत बिघडलीय म्हणून ताबडतोब घरी ये"काही कळेना, घरी पोचले तर ह्यांना उलट्या, जुलाब झाल्यामुळे जवळच्याच हाॅस्पिटलमध्ये अॅडमिट केलंय असं कळलं! धावत धावत तिथे पोचले तोपर्यंत हे आम्हाला सोडून गेले होते.पोस्टमाॅर्टमचा रिपोर्ट 'विषबाधेनी मृत्यू! 
        माझ्या साठी खूप मोठा धक्का होता.
जे जेवण भरवून मी गेले होते ते माझ्या शिवाय अजून पर्यंत कोणीच खाल्लं नव्हतं.आणि मला काहीच झालं नव्हतं.संशयाची सूई जाऊबाई बडबड करून माझ्या दिशेने वळवत होत्या.पोलिस तपास केल्यानंतर काय ते ठरवतील असा विचार करून मी शांत रहाण्याचा प्रयत्न करत होते.
      दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिस येऊन मला तपासासाठी पोलिस ठाण्यात घेऊन गेले.आणि ह्यांच्या खूनाच्या संशयावरून मला अटक झाली.
      मला काही कळतच नव्हतं.पोलिसांच्या गाडीत बसताना मुलींचे चेहरे डोळ्यासमोरून हलत नव्हते.सासरे ज्या असहाय्यपणे बसले होते ते आठवून सारखं भरून येत होतं.
    खरं-खोटंच्या द्वंद्वात मी चांगलीच सापडले होते.आता कितीही ओरडून मी खरी आहे असं सांगितलं तरी माझी सरकारी नोकरी जाणार होती.मला वकील कोण देणार?    
         त्या चार दिवसांत फक्त जाऊबाई येऊन गेल्या होत्या. सासरे आजारी आहेत येवढंच बोलल्या. मुली कश्या आहेत विचारल्यावर कुत्सितपणे हसल्या.
      त्या संपूर्ण काळात माहेरचं कोणीही फिरकलं सुध्दा नाही.
    काही दिवसांनी माझी रवानगी मोठ्या जेलमध्ये झाली.खटला उभा राहिला.सासर्‍यानी वकील केला होता.ह्या वयात ते जे काही करत होते ते शब्दातीत होते.पण सारखं वाटत होतं की ह्यांना कोणीतरी मदत करतोय.ते काहीच बोलत नव्हते.
   वकिलाने मला त्यादिवशी घडलेलं क्रमानी सांगा.अस सांगितल्यावर एकच गोष्ट बोलताबोलता आठवली की ‌ह्यांना खीर भरवताना जाऊबाई बटाटे मागायला आल्या होत्या.आणि वाटी तिथेच ठेऊन मी स्वैपाकघरात गेले होते.वकीलांनी सर्व नोंद करून घेतलं होतं.
     जवळपास आठ महिन्यांनी माझी 'पुराव्याअभावी' निर्दोष मुक्तता! आता पुन्हा एकदा न्याय आणि अन्यायाचं द्वंद्व! म्हणजे पुरावा मिळाला नाही म्हणून मी सुटले! निर्दोष आहे म्हणून नाही असं उगीचच वाटत राह्यलं.
     पण जेलमधले आठ महिने! माझ्यासाठी एक आयुष्यभराचा अनूभव होता.किती प्रश्र्न आणि त्यांची उत्तर शोधायला केलेले किती वेगवेगळे गुन्हे केलेल्या स्त्रिया!! माझ्यासारख्या न केलेल्या ‌गुन्ह्याची शिक्षा भोगणार्‍या पण काहीजणी.
       सुटका झाल्यावर जेलच्या बाहेर पडले. जेलच्या बाहेर सासरे एक मोठी गाडी घेऊन उभे होते. दरवाजा उघडून म्हणाले "बैस, सर्व सांगतो"दुसरा कोणताही पर्याय माझ्यासमोर नव्हता.गाडीत बसले.
       गाडी सुरू झाली आणि मी विचारलं"कुठे जातोय आपण?मुली कुठे आहेत?
      "आपण कोकणात जातोय! डॉ.विश्राम पंडितांच्या घरी! मुली तिथेच आहेत.
     मला प्रचंड मोठा धक्का बसला होता.
     "आयुष्यात पहिल्यांदा तुझ्या जावेनं वाईट करता करता चांगलं काम केलं.तिनं आपल्या माहेरी तू जेलमध्ये गेल्याचं कळवलं आणि योगायोगाने डॉ.विश्राम पण त्याच गावचे आणि देवाला तुझी काळजी, त्यांच्या कानावर हे सगळं गेलं आणि ते लगेच मला भेटायला आले.देवमाणूस आहे तो.त्यांनी दोन दिवसांत वकील नेमला. मुलींच्या शाळेत जाऊन त्यांचे स्कुल लिव्हींगचे दाखले मिळविण्यासाठी एक माणूस नेमला.आणि मुलींना स्वत: बरोबर घेऊन गेले. मी केसचा निकाल लागेपर्यंत तिथंच राह्यलो.आता मला उलगडा होत होता.की कोर्टात मला केसच्या वेळी हजर करताना मला भेटल्यावर मुलींबद्दल,स्वत: बद्दल हे काही बोलत का नव्हते.
   माझा माझ्या कानावर विश्वासच बसत नव्हता.इतक्या मोठ्या संकटातून मला विश्रामनी बाहेर काढलं! पुन्हा एकदा विचारांच्या संघर्षाला अर्थात द्वंद्वाला सुरवात! आपण त्याच्याकडे रहायचं की नाही.पण एकदा भेटुन आभार तर मानायलाच हवे होते.
      रात्री उशिरा विश्रामच्या घरी पोचलो.मुली जाग्याच होत्या. धावत येऊन इतक्या प्रेमानं बिलगल्या की गेल्या आठ-दहा महिन्यांपासून झालेला मनःस्ताप एक क्षणभर मी विसरले.आणि विश्रामनी केलेल्या उपकाराची कल्पना आली.आणि मी ओक्साबोक्शी रडायला लागले.थोडीशी भानावर आले तर कोणीतरी डोक्यावर हात ठेवला होता.मान वर करून बघितलं.
     "मी विश्रामची बायको, ताई आधी घरांत चला.खूप उशीर झालाय.आधी थोडंसं खाऊन घ्या."इतकं गोड आणि आदराने बोलत होती ती की मी नाही म्हणूच शकले नाही.घरात विश्राम आणि त्याची दोन्ही मुलं एक मुलगी एक मुलगा सोफ्यावर बसलेली होती.विश्रामच घर छोटंसं मागेपुढे अंगण असलेलं दिसत होतं.
     आमची सोय मात्र जवळच असलेल्या हाॅस्पिटलमधल्या नर्स क्वार्टर मध्ये केलेली होती. त्या दोन खोल्या पण व्यवस्थित होत्या.मुली म्हणाल्या"आई, आम्ही इथंच रहात होतो.जेवायला मावशीच्या घरी जायचो".विश्रामनी माझ्यावर न फिटणारं ऋण करून ठेवलं होतं.
                ------------*-------------*--------------
       वीस वर्षं झाली इथं कोकणात येऊन!इथे आल्यावर वर्षभरात सासरे गेले.मुलीपण चांगल्या शिकून दोघींनी उत्तम करिअर केली.माझा भूतकाळ माहित असलेल्या सुसंस्कृत घरात दोघींची लग्न झाली.विश्रामच्या हाॅस्पिटलच्या नोकरीतून माझं स्वत:चं छोटंसं घर घेतलं.
     एकदा सहज बोलता बोलता मी विश्रामला त्याच्या बायकोसमोरच विचारलं होतं की"तू इतकं का केलंस माझ्या साठी? तेव्हा तो म्हणाला होता"तुझ्या त्यावेळच्या अवस्थेला मी कारणीभूत होतो.कारण हाॅस्पिटल सुरू झालं की मी तुझ्या मामीकडे येऊन तुला मागणी घालणार होतो! असं वाटलच नाही की इतक्या पटकन तुझं लग्न होईल माझी चुक झाली होती की मी जाताना तुला माझ्या मनातलं सारं सांगायला हवं होतं.त्यानं पण मोकळेपणाने बायकोसमोर उत्तर दिलं होतं.माझ्या मनातल्या एका द्वंद्वाला उत्तर मिळालं होतं.
     आणि नुकत्याच अतिशय आजारी, विपन्नावस्थेत जाऊबाई त्यांच्या माहेरी आल्या होत्या. मीच पुढाकार घेऊन त्यांना विश्रामच्या हाॅस्पिटलमध्ये अॅडमिट केलं.पण दोनच दिवसात त्या गेल्या. जायच्या आधी  सर्वांसमोर म्हणाल्या"भावजींना विष मीच घातलं होतं.मला मुंबईतली ती चाळ माझ्या एकुलत्या एका मुलाच्या नावाने करायची होती.म्हणून हा वाईट मार्ग मला सुचला. सासर्‍यांना ह्या सगळ्याचा अंदाज आला होता. त्यांनी इकडे यायच्या आधी सर्व कागदपत्रं सह्या करून मला सोपवली. 
     नंतर मुलाने मात्र चाळ विकून मिळालेले पैसे वाईट संगतीत संपवले.त्याचे वडिल गेल्यावर मला ह्याअवस्थेत घराबाहेर काढलं.माझ्या गुन्ह्याची मला जिवंतपणीच शिक्षा मिळाली".
      माझ्या मनातला न्याय-अन्यायाचा संघर्षपण संपला होता.
      आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात अशी द्वंद्व सुरूच असतात.मला मिळाली तशी उत्तरं सगळ्यांनाच मिळतील असं नाही.पण चांगलं वागण्याचा मार्ग मात्र निश्चित उत्तरापर्यंत नेतो हेच माझ्या ह्या अनूभव सांगण्याचे इप्सित आहे....
                          ललिता छेडा

No comments:

Post a Comment