Thursday, January 31, 2019

माघार


रविवारी दिनेश बघायला येणार असा काकूचा फोन आला आणि आईची नेहमीची धावपळ सुरू झाली. शीलानी मनातल्या मनात मोजलं तर हा चौदावा बघण्याचा कार्यक्रम होता.पण आईचा उत्साह अगदी पहिल्या सारखाच होता.
        आणि त्यात पुन्हा काकूच्या माहेरच स्थळ असल्याने माणसं ओळखीची होती.मुलाला आई नव्हती आणि वडिल गावालाच रहात होते. लग्न झालेली एक बहिण होती जी पुण्यात रहात होती.त्यामुळे इथे कसलीही जबाबदारी नव्हती.
    शीलाला माहीत होत की तिच्या मागे तिची बहीण नीला उभीच आहे.त्यामुळे त्या दोघींची लग्नं झालं की आई जबाबदारीतून मोकळी होणार होती.
    नीला दिसायला सुरेख पण उच्छृंकल स्वभावाची, शिक्षणाची अजिबात आवड नसलेली आणि त्यामुळेच कशीबशी बारावी पास  होती. त्याउलट शीला काळी सावळी,नाकी डोळी नीटस आणि शिक्षणात खूप हूशार होती. एम्.काॅमच्या शेवटच्या वर्षाला होती.त्या दोघींचा धाकटा भाऊ अजित दहावीला होता.पण आईच थोडं लाडाच झूकत माप नीलालाच होतं.
    वडिलांच्या मागे घरोघरी जाऊन स्वैपाकाची काम करून आपल्या तिघांना मोठं करणाऱ्या आईबद्दल शीलाला खूप आदर होता.तिला आईच्या कष्टाची जाणीव होती त्यामुळे तिच्यासाठी ती आवडत नसलं तरी दाखवण्याच्या कार्यक्रमाला तयार होत असे.
    दिनेश बघून गेला आणि अपेक्षित नकार आला.पण नकार कळवताना मात्र "त्याला नीला आवडलीय आणि तो तिच्याशी लग्न करायला तयार आहे असं त्यानं काकूच्या मार्फत कळवलं.
    काकूच्या समोरच नीला सूरू झाली "शी, मला नको असला नोकरी करणारा,भाड्याच्या घरात रहाणारा आणि महत्त्वाचे म्हणजे कसले कपडे घालून आला होता तो"नीलाची बडबड ऐकून काकू काहीही न बोलता निघून गेली.
     शीलाला मात्र दिनेश आवडला होता.पण नीलाच ऐकल्यावर ती गप्प बसली.
      एम्.काॅम झाल्यावर शीलाला एका मोठ्या काॅलेजमध्ये नोकरी मिळाली.आणि त्यामुळे घरातले सर्वचजण खूष झाले होते.
     नीला पण एका सोंदर्यप्रसाधनाच्या दुकानात नोकरी करू लागली होती.तिच्या आवडीच दुकान असल्यामुळे तिचा खर्च तरी ती काढत होती.
         साधारण वर्षभराने काकू अचानक आली आणि म्हणाली "दिनेशला शीलाला नकार दिला त्याचा पश्र्चाताप होतोय.त्याला शीलाला भेटायचय!"साॅरी,काकू मला नाही भेटायचय त्याला!"
      शीलानी विषय संपवला आणि ती काॅलेजला निघाली."अग, पण कारण तरी काय?आई मध्येच बोलली."आई एक म्हणजे त्याला नीला आवडली होती.माझ्याशी लग्न करून तो नीलापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करू शकतो.दुसर म्हणजे मला लागलेली नोकरी! पगार बघून पण मन बदललं असेल.येवढ बोलून ती घराबाहेर पडली.
         संध्याकाळी ती घरी आली तर दिनेश आईशी गप्पा मारत बसला होता.तिला बघून पटकन उठून उभा राह्यला.आणि‌ हात जोडले."साॅरी, मी तुम्हाला दुखावलं पण तुमच्या दोन्ही शंका कळल्यावर मी मुद्दाम बोलायला आलो.तुम्हाला नोकरी लागल्याच कळल्यावर मला नक्की बरं वाटलं कारण मला नोकरी सोडून व्यवसाय सुरू करायचाय.बायको कमवती असेल तर मी नोकरी सोडून धंध्याकडे व्यवस्थित लक्ष देऊ शकतो.आणि नीलाची मतं तुमच्या काकूंकडून कळल्यावर मी तो विषय मनातून काढून टाकलाय.
     मला तुमच्या पेक्षा नीला आवडली होती म्हणजे तुम्ही चांगल्या नाही असा अर्थ नका करून घेऊ .
       कुठेतरी आईचा चेहरा बघून शीलानी माघार घेतली.आणि ती लग्नाला तयार झाली.
        लग्नानंतरची दोन वर्षे खूप छान गेली.दिनेशनी स्वत:चा व्यवसाय सुरू केला होता.त्यासाठी त्यानं बॅंकेचे लोन काढले होते.शीलानी पी.एच.डी.ची तयारी सुरू केली होती.पण शीलाला दिवस गेले.आणि त्या दोघांच्या आयुष्याला एक गोड वळण मिळालं.दोघही खूप खूष होते.

   अचानक सातव्या महिन्यात काही कारण नसताना नीला ताईला मदत करण्याच कारण काढून शीलाकडे रहायला आली.
      नीलाची नोकरी तर गेली होती.तिथे काहीतरी मालकाच्या मुलाशी गडबड केलीन् आणि मालकानं काढून टाकलं.आलेल्या स्थळांमध्ये खुसपट काढून नकार देणं तर सूरूच होतं.त्यामुळे तिचं येण शीलाला अजिबात आवडल नव्हतं.पण तिला इथे पाठवणार्‍या आईच मात्र तिला नवल वाटलं.
       बाळंतपणासाठी तिनं माहेरी यावं असं आईनं निमंत्रण दिले आणि शीलानी लगेच जायचं ठरवलं.नीलासह ती आईकडे आली.अक्षयच्या, शीलाच्या मुलाच्या जन्मानंतर पंधराच दिवसांनी तिच्या घरमालकिणबाईं तिला भेटायला आल्या.बोलता बोलता सहज म्हणाल्या"तुम्ही इथे आहात तर मग नीला कां तुमच्या घरी येते? विचारल की म्हणते घर आवारायला आलेय!अहो ताई, रोज संध्याकाळी दिनेश यायच्या वेळी कसलं घर आवरते?"मालकीणबाईं जे बोलत होत्या तो संशय शीलाला होताच.कारण हल्ली दिनेश काही तरी कारणं देऊन तिला भेटायला येत नव्हता.आणि रोज संध्याकाळी नीला घरातून बाहेर असायची. 
      त्या आल्या त्यावेळी अजित, शीलाचा भाऊ घरातच होता.तो तर भयंकर चिडला.त्या गेल्यावर म्हणाला"आई फार लाड करते तिचे,येऊ देत घरी मी तिला घराबाहेरच काढतो."शीलाच्या मनात आलं की घरातून बाहेर काढलं की ती सरळ माझ्या घरी जाईल.तितकी ती निर्लज्ज नक्कीच आहे.
     शीलानी दिनेशला फोन केला आणि सरळच विचारलं"नीला तिथे रोज येते का?आणि तुला ते चालतंय का? घरी येऊन बोलतो असं म्हणून,दिनेशनी फोन ठेवला.
    घरी आल्यावर "साॅरी, पुन्हा असं नाही होणार!अस काही तरी बोलू लागला.अजित तर त्याला मारायलाच धावला.शीला हताश होऊन बसली होती."तिनं ‌विचारलं"आत्ता‌ नीला कुठे आहे?
"आपल्या ‌घरी! दिनेश घाबरत बोलला.
तू तिला घेऊन का नाही आलास?शीलानी शांतपणे विचारल
"ती घाबरलेय, येणार नाही म्हणतेय."दिनेश.
"मला उत्तर मिळालं.तू जाऊ शकतोस.शीलानी शांतपणे सांगितलं.
  त्यानंतर आई समजवायला जाऊ का म्हणू लागली.
शेजारच्या मामी येऊन "तू घरी जाऊन तिला हाताला धरून बाहेर काढ म्हणू लागल्या.
     पण शीलानी सर्वांना "ती आज रात्री परत येते का ते बघुया ‌आणि त्यानंतर मी सकाळी काय करायचं ते ठरवेन असं सांगितलं.अजितनी"ताई तू जो काही निर्णय घेशील त्यात मी तुझ्या बरोबर आहे.पण आत्ता‌ हा विषय थांबवू या असं  ठामपणे सांगितलं.कारण आवाज ऐकून शेजारीपाजारी दाराशी येऊन उभे राहिले होते.
    अपेक्षेप्रमाणे नीला रात्री आलीच नाही.रात्रभर घरात कोणीच झोपलं नाही.
    शीलाचा निर्णय झाला होता.एकदा आईसाठी आपण माघार घेतली पण आता नाही.
    सकाळी काकू आली.बहूतेक दिनेशनी फोन केला असावा.
    शीलाची जवळची मैत्रीण निमा पण सगळं कळल्यावर आली होती.
   शीलानी सर्वांना बाहेरच्या खोलीत बोलावलं. आई आणि काकू तुम्हा दोघींसाठी मी काय सांगतेय ते नीट ऐका"शीलानी बोलायला सुरुवात केली. 
      "मी दिनेशशी घटस्फोट घेणार आहे.आणि अक्षयला एकटीनेच ‌वाढवणार आहे.अक्षयच्या मागे नांव पण माझच असेल.
     कोणीही तिथे जाऊन संसार सावर, थोडं अॅडजस्ट कर,सहन कर असला‌ सल्ला देऊ नका.कारण मुलांसाठी,म्हातार्‍या आईवडिलांसाठी, आर्थिकदृष्ट्या कमकुवत असल्यानं,स्रीया माघार घेतात पण मी कोणत्याही परिस्थीतीत त्या दोघांसमोर कोणत्याही प्रकारांनी माघार घेणार नाही.
    गेल्या महिन्याभरात इथल्या आर्थिक परिस्थितीची मला कल्पना आली आहे तेव्हा अजित स्वत:च्या पायावर उभा राहीपर्यंत आई‌ आणि त्याची जबाबदारी माझ्यावर असेल. मी इथे असेपर्यंत नीलाला ह्या घरात प्रवेश नाही.हे मी अजितशी बोलून ठरवलय.आईला जर नीलाला बाहेर कुठेही भेटायचं असेल तर आमच्या दोघांची काही हरकत नाही."धाप लागल्यामुळे शीला थांबली पण थांबल्यावर मात्र तिला तिच्या मनाविरुद्ध रडायला आलं.
      निमा उठली आणि तिनं शीलाला जवळ घेतलं.आणि म्हणाली"अवघ्या बारा तासात येवढा मोठा निर्णय घेतलास खूप अभिमान वाटतोय की तू माझी जवळची मैत्रीण आहेस. निमा रडतच बोलत होती "मला कोणी बोलावलं माहीत आहे शीला? तुझ्या आईनी! तिनीच सर्व सांगितलं आणि म्हटलं उद्या सकाळी शीलाचा काहीही निर्णय असला तरी तिला कोणाचा तरी आधार लागेल. मी तो अधिकार गमवून बसलेय तेव्हा तू ये असं म्हणून तुझ्या आईनी मला बोलावून घेतलय.तुझा निर्णय ऐकून वाटतंय आम्ही काय तुला आधार देणार? ह्या परिस्थितीत आम्ही फक्त तुझ्या बरोबर आहोत येवढंच आश्र्वासन सर्वांतर्फे मी देऊ शकते.निमा बोलायची थांबली होती आणि सगळेच जण नि:शब्द झाले होते.

             ललिता छेडा

Thursday, January 24, 2019

मेकओव्हर


मेकओव्हर

 

      समोरच्या नवीन टाॅवरमध्ये सामान उतरताना बघून मधूरा चाळीच्या गॅलरीत आली.पहिल्या मजल्यावर असलेल्या बाल्कनीबाहेर बोर्ड लावण्याच काम सुरू होतं.दारं, खिडक्या उघड्या असल्यामुळे सामानही तिथेच उतरताना दिसत होते.'मोहा'स् ब्युटी पार्लर' बोर्डावरच नांव वाचून मधूरा आनंदली."अरे व्वा, मोहिनीनी काकूंच्या जागेत पार्लर उघडलय वाटतं! म्हणजे आता मोहाची रोज भेट होईल"मधूरा विचार करतच होती इतक्यात मोहा स्कुटर वरून आली आणि समोर गॅलरीत उभ्या असलेल्या मधूराला बघून तिनं हात हलवला.रस्ता क्राॅस करून आली आणि"आज सुट्टी आहे ना?ये ना मग पार्लरवर! असं म्हटलं "येते थोड्या वेळानं"मधूनी तिला गॅलरीतून थोडंसं वाकुन सांगितलं.मोहाकडे बघताना मधूला वाटलं रेशमी केस सळसळवणारी,जीन्स-टीशर्ट मधली मोहा आपल्यापेक्षा दहा वर्षांनी लहान दिसतेय.खर म्हणजे एकाच वयाच्या आपण दोघी घट्ट मैत्रिणी मधूरा आणि मोहिनी!एकच शाळा एकच काॅलेज येवढंच नाही तर त्यांचा वाढदिवस पण एकाच दिवशी! अनेकदा दोन्ही वाढदिवस एकाच घरी साजरे होत असत.आणि त्यामुळेच त्या दोन्ही घरात एक छानस जिव्हाळ्याचं नातं होतं.
       मोहाच लग्न झाल्यावर मात्र ती गावातच पण थोडी दूर रहायला गेली.
       मोहाच्या लग्नानंतर थोड्याच दिवसात मधूराच्या आईवडिलांचा अचानक कार अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला.आणि मधूरावर इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षाला असलेल्या भावाची मंदारची आणि दहावीला असलेल्या छोट्या बहिणीची जबाबदारी आली.मधूराला काय करावं काही कळतच नव्हत.पण तेव्हा मोहिनी तिच्या बरोबर अक्षरशः सावली सारखी राहिली.मोहानी केलेल्या खटपटींमुळेच मधूराला वडिलांच्याच कंपनीत नोकरी मिळाली.मोहानी तिचे चुलत सासरे जे त्या कंपनीचे C.E.O होते त्या सानेसाहेबांशी बोलून,मधूराच्या हूशारीबद्दल खात्री देऊन नोकरी मिळवून दिली होती.कंपनी मल्टीनॅशनल होती त्यामुळे मधूराला मोठी संधी मिळाली.मोहाचा स्वभाव असाच होता धडाडीने निर्णय घेणारा तर मधूरा थोडीशी लाजरीबुजरी!
            मधूरानी मात्र मोहाच्या प्रयत्नांना पूर्ण यश दिलं होतं.तिनं पुढच्या बारातेरा वर्षात त्या विदेशी कंपनीत आपल्या हूशारीने स्वत:च स्थान निर्माण केलं.नोकरी सांभाळून तिनं पी.एच् डी पण पूर्ण केल.अर्थात साने काकांच मार्गदर्शन होतच.
    सानेंच्या निवृत्ती नंतर मधूराचच नांव त्यांच्याजागी चर्चिल जात होतं.मधल्या काळात मंदार इंजिनिअर होऊन बंगलोरला सेटल झाला. तो स्वत:च्या विश्वात रमल्यामुळे इकडची जबाबदारी पूर्णपणे मधूरावर आली. छोटीनी शिक्षण पूर्ण करून प्रेमविवाह केला होता.आणि सगळया जबाबदा-यातून मुक्त झाल्यावर मधूराला आता मात्र खूप एकटं वाटत होतं.आणि अश्यावेळी मोहा जवळ  आल्यामुळे ती खूष झाली होती.
      घरातलं थोडंसं आवरून मधूरा पार्लरवर गेली."या बाईसाहेब! किती दिवसांनी भेटताय, हल्ली फोन पण नाही करत!मोहाची बडबड सुरुच होती पण मधू पार्लरच्या इंटिरिअरकडे, रंगसंगतीकडे भारावून बघत होती."अग, किती सुंदर सजवलायस!मधू रिलॅक्स खूर्चीत बसत म्हणाली.
       हे बघ मधू पुढच्या रविवारी पार्लरच उदघाटन आहे.आणि माझी पहिली कस्टमर आहे 'मधूरा मोहिते'मोहा मधूराच्या गळ्यात हात टाकून म्हणाली.
      "ए बाई मी नाही हं हे काही करणार."मधू हात जोडत म्हणाली.
       "मी विचारत नाही सांगतेय"मोहा हसत हसत म्हणाली."आठवतेय तुला, मी हा कोर्स करावा म्हणून बाबांना तुच समजावलस, त्यांना अजिबात आवडत नव्हतं कि मी हा कोर्स करतेय ते! पण तू माझ्या तर्फे शिक्षण न सोडता कोर्स पूर्ण करीन असा विश्वास दिलास.आणि त्यामुळेच लग्नानंतर अँडव्हान्स कोर्स करून गेली मी गेली दहा वर्षे  घरात पार्लर चालवलं.माझ्या नव-याची सुहासची फिरतीची नोकरी आहे म्हटल्यावर तूच सुचवलस की मी घरात पार्लरच काम सुरू करावं."
"जेव्हा आईच्या जागेवर टाॅवर बनतोय कळलं तेव्हा मी माझी जुनी जागा विकून इथे आईच्या घरासमोर घर बुक केलं आणि आईच्या घरात पार्लर सुरू करायचं ठरवलं.त्यामुळे आई माझ्याकडेच राहिल, तशीही बाबा गेल्यापासून ती एकटीच झाली होती.आणि माझंही घराकडे लक्ष राहील असा मी विचार केला.अग माहेरी एकुलती एक आणि इकडे नवरा सतत फिरतीवर त्यामुळे निर्णय माझे मलाच घ्यावे लागतात". मोहा बोलत होती आणि मधूरा तिच्या कडे अभिमानाने बघत होती.तिच्या निर्णयाचा आदर करणा-या तिच्या नवऱ्याच पण मधूराला कौतुक वाटलं.
     अचानक मोहानी डोळे मिचकावत विचारलं "मधू, सदाशिव अजून आहे का ग तुझ्या ऑफिसमध्ये?"तो कुठे आठवला तुला मध्येच?मधूनी चिडून विचारलं."चिडू नकोस ग पण तुला तेव्हा काकूबाई म्हणून नकार दिला होता ना!ते आठवलं.जाऊदे,"मोहानी विषय संपवला पण घरी जाताना मधूला मात्र त्या अपमानाची आठवण झाली.आता करीअरमध्ये सदाशिवला तिनं खूपच मागे टाकलं होतं. आता तो तिच्या आजूबाजूला पण फिरकत नव्हता.
       उदघाटनाच्या आदल्या दिवशी मोहा खास मधूला बोलवायला आली."मधू उद्या दिवसभर तू मला पार्लरवर हवीस."नक्की येणार!मधूनी तिचा हात हातात घेऊन खात्री दिली."मधू, तुला गंमत सांगू , उद्या संध्याकाळी आमचा टाॅवर बांधणारा बिल्डर पण येणार आहे.त्याला तुमच्या चाळीतल्या लोकांशी बोलायचंय. मी तुझी ओळख करून देईन.मधूरा हसायलाच लागली"चला माझ्या बरोबर घराचाही मेकओव्हर होणार तर!         
    तो रविवार मधूरासाठी ब-याच दिवसांनी वेगळ्याच आनंदात उजाडला.लवकर तयार होऊन ती पार्लरवर पोचली.मोहा तिची वाटच बघत होती.मोहा डिझायनर साडीत खूपच सुंदर दिसत होती.उदघाटनाच्या तयारीसाठी सगळ्यांचीच धावपळ सुरू होती.काकूपण खूष होत्या. त्यांची लाडकी लेक त्यांच्या  डोळ्यासमोर रहाणार होती.मोहाचा नवरा पण खास ओपनिंगसाठी सुट्टी घेऊन आला होता.मोहानी उदघाटन आपल्या आईच्या हस्ते केलं.आणि मधूराला सन्मानाने खूर्चीवर बसवून म्हटलं"माझी पहिली कस्टमर माझी सर्वात जवळची मैत्रीण"सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांच्या मैत्रीच जणू कौतुकच केलं.
     त्यानंतरचे तीन तास मधूरासाठी स्वप्नवत होते.गेल्या कित्येक वर्षात तिनी स्वत: साठी कधी येवढा वेळच दिला नव्हता.नखशिखान्त होणारा बदल आरशात बघून तिचा विश्वासच बसत नव्हता.मोहा मधूनच येऊन मुलींना सुचना देत होती.पार्लरवरची वर्दळ वाढली होती.मधूराला ओळखणारी मंडळी तिला बघून आश्र्चर्यचकित होऊन मोहाच कौतुक करत होती.मधूराला वाटलं की 'प्रत्येक स्त्रीला असा स्वत: साठी वेळ देण किती गरजेचं आहे!'मोहानी तिला सुंदरसा ड्रेस भेट म्हणून दिला आणि संध्याकाळी हाच घालून यायचं अशी लाडाची धमकीही दिली. 
   मधूरा घरी आली आणि चाळीतल्या सगळ्यांनी तिचं हसून स्वागत केलं.शेजारच्या काकूंनी तर तिच्या गालावरून बोटं फिरवून दृष्टच काढली.
    संध्याकाळी तयार होऊन मधूरा पार्लरवर गेली तेव्हा सानेसाहेब आलेले होते. मधूराला बघून हसत हसत म्हणाले"मोहा तू पार्लरच्या जाहिराती साठी फारच छान माॅडेल शोधलीस".मोहा लगेच म्हणाली" अरे असा तर मी विचारसुद्धा केला नव्हता काका! पण मधूरानी ज्याप्रकारे गेली दहा बारा वर्षे जबाबदारीनं धाकट्या भावंडांची आयुष्य घडवली,स्वत:ला सिध्द केलं त्याला माझ्यातर्फे ही कौतुकाची थाप होती."अग गंमत केली मी" सानेकाका हसले आणि मधूराकडे बघून म्हणाले "खूप छान दिसतेयस.ह्या बदलामुळे तुझ्या चेहऱ्यावर एक प्रकारचा आत्मविश्वास दिसतोय. पण एक गोष्ट लक्षात ठेव"दिसण्या इतकंच असणं पण खूप महत्त्वाचं असतं."तुझी हूशारी, कर्तृत्व हे तुझ्या साधेपणातपण होतंच. तू कंपनीची भावी C.E.O.आहेस.त्यासाठी मात्र ह्या मेकओव्हरची तुला नक्कीच मदत होईल.
    "तू एकटी राहू नये ह्यासाठी पण मी आता  प्रयत्न करणारच आहे. पण आधी तुमच्या चाळीचा मेक ओव्हर करूया"मोहा उत्साहात होती.
    "काका तुम्ही माझे मार्गदर्शक, गुरु आहात.तुम्ही बोललात ते सर्व मी लक्षात ठेवीन." मधूरा सानेकाकांच्या शब्दांनी भारावली होती.नंतर मोहाकडे बघून म्हणाली"मोहा, तुझ्या ह्या मेकओव्हरनी आणि माझ्या जवळ रहायला येण्याने माझा एकटेपणा नक्की गेलाय.... वेगळा आत्मविश्वास पण जाणवतोय, मी तर सर्व स्त्रियांना सांगेन की स्वत:साठी वेळ द्या.जबाबदारी सांभाळताना आपलं दिसणं आणि असणं दोन्ही महत्त्वाचे आहे हे लक्षात ठेवा.""ह्याला कोणी जाहिरात म्हटलं तरी मला आवडेल."मधूरा काकांकडे बघून मिश्किलपणे म्हणाली.काकांनी पण तिला हसून मोकळेपणाने दाद दिली.
                                      -----------

                                    ललिता छेडा 

Thursday, January 17, 2019

जुळून येती रेशीमगाठी (भाग२)


अनूला आठवलं
               .....त्या रात्री खरं म्हणजे कोणालाच झोप लागली नाही.
    कारण मंजिरीच्या घरातून निघताना अनूनी पार्थला
"उद्या सकाळी सोनियाला इथं बोलावून घे. किती वाजता येतेय ते मला कळव म्हणजे मी पण तेव्हाच येईन"असं सांगितलं होतं.
       घरी येताना अनूचा नवरा म्हणाला देखील"अनू, काही करायच ते सांभाळून कर कारण मंजिरीनी हे लग्न कितपत स्वीकारलाय कळत नाहीय! आणि घरी गेल्यावर मुलींच काही वेगळंच सूरू होतं "आई,पार्थदादाची बायको मारवाडी आहे म्हणजे चिक्कू मारवाडी असतात ते का ग?" "असं नाही बोलायच!अनूनी मुलींना दटावलं.
      सकाळी साडेदहाच्या सुमारास सोनिया आलेली अनूनी गॅलेरीतून बघितलं होतं.अनू बोलवलं त्यापेक्षा  थोडी उशिराच गेली.
      तिथं गेल्यावर बोलक्या डोळ्याची,जीन्स, शाॅर्ट कुडती घातलेली सोनिया बघताक्षणी सर्वांनाच आवडलीय हे अनूला जाणवलं.फक्त मंजिरीचा अंदाज येत नव्हता.पण कालपेक्षा ती आज जरा खूषीत दिसत होती.
   "काय ग मावशी किती उशीर केलास?पार्थ हसून विचारत होता.अनू काही बोलायच्या आत मंजिरी म्हणाली" अनू उशिरा येईल हे मला माहीत होत कारण तिनी सोनियाला येताना नक्की बघितलं असणार तिच्याशी आपलं थोडं बोलणं होण्यासाठी ती वेळ देणार! आणि उशिरा येणार!
     अनूला वाटलं किती ओळखतो आपण दोघी एकेमेकीला!
        सोनिया पटकन उठून अनूच्या पाया पडली."माझ्या मम्मीची बेस्ट फ्रेंड,जस्ट लाईक अ सिस्टर"पार्थनी ओळख करून दिली."आय नो दॅट,मम्मींनी सांगितलय मला"सोनिया बोलली."अरे व्वा, इतक्या गप्पा झाल्या आणि मराठी येतं वाटतं?अनूनी हसून विचारल."उत्तम बोलते ती मराठी"पार्थनी‌ लगेच बाजू घेतली.
     एकंदरीत सर्व आलबेल होतं.
      अचानक मंजिरी अनूला म्हणाली" आपल्याला भेटायला उद्या हिचे आई-वडील येणार आहेत, आत्ताच त्यांचा फोन आला होता"मम्मीजी वो दोनो नहीं,मेरे बडे चाचा-चाची, मौसी,और बुआजी भी साथमें होंगे।हम लोगोंमें ऐसे ही रिश्ता नक्की करने जाते हैं। सोनिया थोड्याशा अपराधी स्वरात म्हणाली."तस काही बोलली नाही तुझी मम्मी"मंजिरी थोड्याशा टेन्शननीच म्हणाली.सोनियानी लगेच आईला फोन लावला.आणि ती सगळी मंडळी यायचं ठरलं.
       जगण्यातले अर्थ शोधत न बसता, चांगल्या वाईट प्रसंगाना सहजतेने सामोरं जाण हा मंजिरी चा स्वभाव खरोखर कौतुकास्पद होता.
      त्या सर्वांच स्वागत मंजिरीनी खूपच उत्तमरित्या केलं.सोनियाचे वडील आपल्या उमद्या स्वभावामुळे सर्वांशी  मिसळून गेले. सोनिया अगदी वडिलांवर गेली होती.आई मात्र थोड्याशी स्थूल,काळ्यासावळ्या, डोक्यावर पदर, टिपीकल मारवाडी स्वभावाची असावी अशी वाटली.त्यांच हिंदी मिश्रित मराठी  ऐकायला मज्जा वाटत होती.अनूला वाटलं आपण फारच तर्क करतोय!
      मंजिरीनी पण तिचे दिर,जाऊ,नणंद, भाऊ वहिनींना बोलावलं होतं.दोन्ही कुटुंबाचं छान जमलं होतं.अगदी थोड्या वेळात गप्पा सुरू झाल्या होत्या.त्यात दोन्ही आजांचा सहभाग जास्त होता.आजोबांच सोनियाच्या पप्पांशी जमलं होतं.
     दोन्ही मुलं फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात अमेरिकेला परत जाणार होती.त्यामुळे लग्न जानेवारीत करायचं ठरलं.सोनियाकडची मंडळी मुहूर्त पाहूनच आली होती. 
       "पण लग्न आमच्या म्हणजेच मराठी पध्दतीनंच होणार "मंजिरीच्या सासूबाईंनी ठाम भूमिका घेतली.
     सोनियाच्या आई कशाबशा तयार झाल्या."फिरभी हमारे दो फंक्शन होणार!एक  मेहंदी,संगीतसंध्या' और एक 'मामेरा' त्या थोड्या घाईघाईत बोलल्या.हम लोगोंमे मेहंदी खास होती है.
      संगीत संध्या माहीत आहे पण हे 'मामेरा'काय?पार्थच्या काकू पुटपुटल्या.
     "हम लोगोमें मामा की तरफसे हम सबके लिए, आपके लिएभी गिफ्ट दी जाती है और वो फंक्शन करके दी जाती है। सोनियाच्या आईनं खूलासा केला.'उस गिफ्ट को 'मामेरा' बोलते हैं।
    अनूनी मंजिरीकडे बघितलं.मंजिरीनी हसून 'ठीक आहे' अशी खूण केली. लग्न एकंदर रंगायला लागलं होतं.ही सगळी गडबड पार्थ-सोनिया पण एन्जाॅय करत होते."तुमच्या भावाला सोनियाला मामाची पिवळी साडी द्यायला सांगा म्हणजे झालं!"मंजिरीची आई हळूच बोलली.आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं.
      दुसऱ्या दिवशी मंजिरी-अनू , सोनिया-पार्थ, आणि सोनियाचे आई-वडील असे लग्नासाठी हाॅल नक्की करायला भेटले.पवईला रहात असलेल्या सोनियाच्या घरच्यांनी तिथलाच लग्नाचा हॉल असलेलं हाॅटेल ठरवलं होतं.ठाण्याला रहाणार्‍या मंजिरी कडच्या मंडळींना थोड लांब होतं पण तो हाॅल सोनियाच्या पापांच्या मित्राचा होता.त्यामुळे कोणाचीच हरकत नव्हती.
    हाॅलच्या दाराशीच एक तरुण मुलगी उभी होती.पुढे येऊन तिनं सर्वांचं स्वागत केलं."मम्मी,ही सर्व इव्हेंटस् मॅनेज करणार आहे"सोनियांनी ओळख करून दिली.
    मंजिरीनी सोनियाला लगेच बाजूला घेतलं आणि"हे बघ, मला लग्नात उधळपट्टी झालेली आवडणार नाही.तू एकुलती एक आहेस त्यामुळे तुझ्या आईला हौस असणार म्हणून मी गप्प आहे.पण उगीचच खर्च मला नाही आवडणार!अस स्पष्ट सांगितलं.आणि तुमच्या हौसेचे कार्यक्रम तुम्ही करा.पण लग्नाचा खर्च मात्र आम्ही निम्मा देणार हे मी ठरवलंय.
    "मम्मीजी,ही इव्हेंट मॅनेजमेंटवाली रिचा, माझी जवळची मैत्रीण आहे.हे सगळं ती मला गिफ्ट म्हणून देणार आहे. और मुझे और मेरे घरवालों को मालूम है कि आपने अकेले कितने मुष्किलोसे पार्थको बड़ा किया है।आपकी हर बात को मानना है, ये पार्थने मूझे खास समझाया है।  सोनियांनी गोड बोलून मंजिरीला समजावलं आणि अर्धी लढाई जिंकली होती.
    हाॅलमध्ये शिरल्यावर सोनियांची आई म्हणाली" वरमाला मंडप इथेच बनवा""म्हणजे?अनूनी पटकन विचारलं.
    "आमच्यामध्ये लडका बारातके साथ आता है तभी  लडकी दरवाजेमेंही उसके गले में माला डालती है। और तीन फेरे वहां होते हैं और बाकी के चार फेरे विधी मंडप में।सोनियाची आई उत्साहात होती.
    "पण आम्ही तर अंतरपाट दूर झाल्यानंतर हार घालतो. आणि मग सप्तपदी होते."अनू थोडीशी चाचरत म्हणाली.मंजिरीपण प्रश्र्नार्थक
चेह-यानी बघू लागली.
    लगेच रिचा पूढे आली" आन्टी,आपण दोन वेळा हार घालूया. चालेल ना? 
     तिथे असलेल्या सर्वांनाच हसायला आलं.
     नवीन पिढी सर्वांना घेऊन, रीतिरिवाज पाळत,लग्नाचे विधी ठरवत होती.
     खरं म्हणजे पार्थ आणि सोनिया दोघेही इंजिनिअर!नुकताच पार्थ शिक्षण पूर्ण करून चांगल्या नोकरीला लागला होता.आणि सोनियाच एक वर्ष बाकी होत.पण दोघेही मनापासून घरी, बाहेर सगळीकडे पडेल ते काम करत होते.पार्थ प्रत्येक गोष्टीत लक्ष घालत होता.
    अनूला कौतुक वाटलं.
           
    सर्वजण स्वत:च्या मतापेक्षा एकत्रित विचार करत होते आणि हेच आवश्यक होतं.
    दोन तीन दिवस चाललेला लग्न सोहळा रिचामुळे खूप देखणा झाला.दोन्ही रीती पाळून अगदी मेन्यू पासून देण्याघेण्यापर्यंत प्रत्येक गोष्ट तिनी तिच्या व्यवसायाच्या अनूभवानी उत्तम मॅनेज केली. 
   त्यामुळेच दोन वेगळ्या जातींच रेशीम नातं छान जूळलं गेलं. 
    लग्नानंतरचे महिन्याभराचे दिवस भूर्रकन उडाले.सोनियानी त्या महिन्यात नातेवाईकांचे  वेगळे वेगळे गृप करून घरी छानशा पार्ट्या अरेंज केल्या.प्रत्येकवेळी अनूमावशी हवीच असा आग्रह ठेवला.सोसायटीत तर ती खूपच लोकप्रिय झाली.
     निघताना ती मंजिरीला म्हणाली"मम्मी, आम्ही पाच-सहा वर्षांत इंडियात परत नक्की येणार असं ठरवलय.आत्ता सध्यातरी आमच्या दोघांच्याही नोकर्‍या,शिक्षण उत्तम सूरू आहेत.थोडे पैसे जमले की परत यायचं म्हणतोय, कारण आम्ही दोघेही एकुलते एक आहोत तेव्हा तुम्हा सर्वांसाठी परत यायची खरंच इच्छा आहे."तिनं नुसतं म्हटल्याने मंजिरी भरून पावली होती.
     बघता बघता सरलेल्या वर्षभराच्या आठवणीत रमलेली अनू फोनच्या रिंगनी जागी झाली.
    फोन सोनियाचा होता"मावशी, दोन्ही मम्मी,पापा 'जुन' महिन्यात इकडे येताहेत.तूम्ही दोघानी पण त्यांच्या बरोबर यायचय. तयारीला लाग.सगळी अमेरिका फिरवते तुम्हा सर्वांना!
  ‌अनूला सोनियांच कौतुक वाटलं 'ह्या पोरीने आपल्या स्वभावानी जुळलेल्या रेशीम गाठी नक्कीच दृढ केल्यात'.
                ललिता छेडा

Thursday, January 10, 2019

जुळून येती रेशीमगाठी


आज वर्ष झालं मंजिरी कडच्या लग्नाला! पण अनूराधासाठी आठवणी मात्र अजूनही ताज्या होत्या.
      गेल्या दिवाळीत मंजिरीनी अनुराधाला "तिचा लेक अमेरिकेतून नव्हेंबरमध्ये तीन महिन्यांसाठी येतोय आणि लग्न करूनच जाणार आहे"असं सांगितलं आणि एका वेगळ्याच अनुभवाला सुरवात झाली.
     मंजिरीची आणि अनुराधाची बाल्कनी अगदी समोरासमोर, अनुला बागेची आवड त्यामुळे तिची सकाळी झाडांना पाणी घालायची वेळ आणि मंजिरीची सकाळच्या चहाची वेळ एकच असायची.एकेमेकींकडे बघून हसण्यापासून जवळच्या मैत्रिणी होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास खरं म्हणजे सोसायटीतल्या मंडळींसाठी कुतुहलाचा विषय होता.कारण मंजिरीची एकंदर इमेज शिष्ट अशीच होती.कारणाशिवाय आणि कामाव्यतिरिक्त ती कोणाशीही बोलत नसे.
     अनूला मात्र मंजिरीच्या ह्या वागण्यामागचं कारण माहित होतं.तिच्या लेकाच्या म्हणजेच पार्थच्या जन्मानंतर  पाचच वर्षांत मंजिरीच्या यजमानांना कॅन्सर झाला.. दोन वर्षे त्यांच्या आजारपणाशी लढताना मंजिरीनी नवऱ्याचा एजन्सी चा व्यवसाय समजून घेतला.आणि नवर्‍याच्या मृत्यूनंतर स्वत:ला व्यवसायात आणि पार्थला मोठं करण्यात इतकं गुंतवून घेतलं की‌ तिचा आजुबाजुच्या जगाशी संबंधच राह्यला नाही एकल पालकत्व स्वीकारलेल्या स्त्रीयांच असं थोडंसं होतच हे अनू जाणून होती.त्यामुळेच अनूला मंजिरी आवडायची. त्यात पुन्हा मंजिरीचा मुळचा स्वभाव थोडासा शिस्तीचाच होता.
     पण मंजिरीसाठी अनूची मैत्री मात्र खास  होती.प्रत्येक गोष्ट अनूला सांगणं हे मंजिरीच 'मोकळ होणं' असायचं.त्यामुळेच पार्थसाठी मुली बघण्यापासून लग्न ठरवण्यापर्यंत"तू माझ्या बरोबरच हवीस" अशी मंजिरीनी अनूला प्रेमळ ताकीदच दिली होती.
    दिवाळीनंतरच्या गुरुवारी पार्थ आला. दोन दिवस जेटलॅग मध्येच गेले.शनिवारी संध्याकाळी अनू मिस्टरांबरोबर मंजिरीकडे गेली कारण रविवारपासून मुली बघायला सूरवात होणार होती.
      मंजिरीनी जवळपास दहा पंधरा मुलींचे बायोडेटा निवडून ठेवले होते,त्यांच्या पत्रिका जूळवून ठेवल्या होत्या. मुलींना बघायला जायचे दिवस,वेळ अतिशय व्यवस्थित ठरवून ठेवलं होतं. 
    पार्थ येणार म्हणून मंजिरीचे कोकणातून सासू सासरे, मुंबईतच रहाणारीआई असे सगळेजण आले होते.
    पण अनू घरातून निघत असतानाच पार्थचा what's app वर मेसेज आला.'मावशी, माझं लग्न मी ठरवलंय आणि हे आईशी बोललोय.ती जरा चिडलेय, सांभाळून घे." अनूनी मेसेज नवर्‍याला वाचायला दिला.
       अनूला मंजिरीकडे आलेलं बघून दोन्ही आज्यांनी तिचं मनापासून स्वागत केलं.मंजिरीची आई हळूच जवळ येऊन म्हणाली" मंजिरी तिच्या बेडरूममध्ये लॅपटॉप घेऊन बसलेय.तुझीच वाट बघत होतो.तूला कळलय ना?"हो,पार्थनी आत्ताच मेसेज केलाय.पण अजून नीटसं कळलं नाही."अनु बोलत बोलत आत गेली.
      अनूला बघितल्यावर मंजिरीनी लॅपटॉप बंद केला आणि 'ये' असं म्हणून जवळच्या खुर्चीवर बैस अशी खूण केली.अनू मागोमाग पार्थ पण आला.त्याच्याकडे न बघता "बघितलस गेले सहा महिने मी ह्याच्याशी मुली बघण्याविषयी बोलतेय हा पठ्ठ्या सगळ ऐकतोय आणि आज दुपारी जेवताना म्हणतोय"आई, मला सोनिया बरोबर लग्न करायचंय.ती मारवाडी आहे.ती पण अमेरिकेत शिकतेय""बोल आता काय करायचं?मंजिरीच खरं होतं.तिनी तिच्या शिस्तीत केलेल्या तयारीला पार्थनी सुरूंगच लावला होता.
     साॅरी,मम्मा मला वाटलं इतक्या दूरून अमेरिकेतून सांगण्यापेक्षा भेटल्यावर नीट सांगेन. तुझी थोडी भीती पण वाटत होती!सोनियापण माझ्या बरोबरच इंडियात आलेय!  वाटलं,तुझी तिची भेट घालून देऊ.तिच्या घरी सर्व माहित आहे.त्याना मी पसंत आहे.तिचे आई-वडील गेल्या वर्षी तिथं आले होते तेव्हाच मी त्यांना भेटलो होतो"पार्थ एका दमात बोलला.अनूमावशी आल्यामुळे त्याला धीर आला होता.
     मंजिरीला आता नेमकं काय वाटतंय ते अनूला समजलं होतं. पण तोपर्यंत दोन्ही आज्या, आजोबा,अनूचा नवरा सगळेच आत आले.गंमत म्हणजे अनूच्या दोन्ही मूली पण आल्या होत्या.कारण पार्थच लग्न हा सगळ्यांच्याच आनंदाचा विषय होता.
   अनूच्या मुलींकडे बघत मंजिरी म्हणाली"नशीबवान आहेस दोघींची पाठवणी केली की तू मोकळी!
    "मंजिरी, आता मी जरा बोलू का?अनूनी बोलायला सुरुवात केली." उद्या आपण आता येणार नाही हे आधी मुलींकडच्यांना कळवायला हवं. आपण त्यांच्याकडे येणार म्हणून ती मंडळी तयारी करत असतील.  
    पार्थ, सोनिया कडच्या मंडळींना आपण कधी, कुठे भेटायचं ते ठरवं!अनूनी परिस्थिती हातात घेतली होती. त्याबरोबर हळूहळू सगळेजण सवयीप्रमाणे मोबाईल वर बोलत बोलत बाहेर गेले.
    बेडरूममध्ये अनू एकटी राह्यल्यावर मंजिरीचे डोळे भरून आले.अनूला माहीत होतं की 'वास्तव स्वीकार' हे सांगणं सोपं असतं पण मनातलं वादळ अश्रूंवाटे बाहेर पडणारच होतं.त्यासाठी त्या दोघींनी एकट असणं आवश्यक होतं.
    "अनू त्यानी प्रेमविवाह करायला माझी काहीच हरकत नव्हती.पण त्याला मला सांगाव असं वाटलं नाही ह्याच दु:ख होतंय.माझी शिस्त, कठोरपणा हा परिस्थीतीनुसार आवश्यकच होता येवढं देखील कळलं नाही ह्या मुलाला"बोलल्यावर शांत झालेली ती थोडावेळ डोळे मिटून बसली."चल, मी जरा फ्रेश होऊन येते नंतर कामाला लागूया" म्हणाली आणि वातावरणातला ताण कमी झालाय ते अनुला जाणवलं.
     स्वभावाप्रमाणे मंजिरीनी स्वत:ला सावरलं होतं.पण आंत कुठेतरी दुखावल्याच मात्र लपत नव्हतं."चल बाहेर जाऊया, पार्थच्या आजी-आजोबांना भेटते.आशिर्वाद घेते.आणि आपण उद्याची कामं सूरू करूया"मंजिरी कामाला लागली होती.
    बाहेर सर्वजण त्या दोघींची वाटच बघत होते. आल्याआल्या मंजिरी सुरुच झाली, "हे बघअनू ,सर्वात प्रथम पार्थच नांव नोंदवलं होतं त्या दोन्ही संस्थांना मी ई-मेल करते.तू उद्या ज्यांच्या घरी मुली बघायला जाणार होतो,त्यांना फोन लावून दे मी बोलेन! ज्यांना मेल चालू शकतील.त्यांना मेल करूया".अनू तिची कामाची शिस्त,झपाटा बघून थक्क झाली.आणि हे सगळं ऐकून पार्थला आईनं आपल्यासाठी किती तयारी केली होती त्याची थोडी थोडी कल्पना येऊ लागली. तो पटकन उठून आईसमोर दोन्ही कानाला हात लावून उभा राहिला.साॅरी माॅम, खूप चुकलं माझं!मंजिरीनी 'ठीक आहे' असं म्हटलं आणि ती डायरीत नंबर शोधू लागली.
      विचारांच्या नादात आपण गेल्या वर्षी पार्थचं लग्न ठरवण्याचा अनुभव अक्षरशः पुन्हा जगलो असं अनुराधाच्या मनांत आलं. 
     त्यानंतर ते दोन वेगवेगळे  रीतीरिवाज एकत्र करून केलेलं लग्न, प्रत्येकाला अपेक्षित असलेलं लग्न, सोनिया-मंजिरीच सासुसुनेच नातं,ही तर एक वेगळी कथाच होईल.तेव्हा आठवणीची ही कथा आपण ही आता दुसऱ्या भागात आठवूया.अनूला मनाशी खुदकन हसू आलं.....
                                                                                                                                                            - ललिता छेडा

अर्थात पुढच्या गुरुवारी पुढचा भाग'जुळून येती.....

Thursday, January 3, 2019

नाही म्हणायला शिकूया


माईंच्या घरातून भजनाचे स्वर येत होते.आणि मला नक्की माहित होतं की आमच्या मजल्यावरच्या सगळ्या ब्लाॅकचे दरवाजे उघडे असतील अगदी आमच्या गुजराती भाभींचा सुध्दा!  
   दर सोमवारी सकाळी आणि गुरुवारी संध्याकाळी माईंच्या घरी भजनी मंडळाच्या बायका प्रॅक्टिस करायला येत असतात.आम्हा सगळ्यांनाच इतकं प्रसन्न वाटायचं ते सूर ऐकताना!
     अचानकांचे आवाज थांबले म्हणून मी दरवाज्याबाहेर डोकावले.तर माईंची धाकटी सुन तिच्या दोन्ही मुलांना माईंकडे सोडायला आली होती.ही दारातूनच त्यांना सोडत होती आणि माई तिला विचारत होत्या"अग,शाळा नाही का आज?
      "नाही,त्यांचे स्पोर्ट्स सुरू आहेत, त्यामुळे अकरा वाजता जातील.दोन दिवस इथेच राहतील आणि हे पण रात्री जेवायला इथंच येतील बरंका.मला दोन-तीन दिवस एका लग्नाची मोठी आॅर्डर आहे.त्यामुळे मला वेळच नाहीये.
मुलं आली की तुम्हाला आवडतं ना! म्हटलं तुम्हाला थोडा चेंन्ज!सुन माईंवर उपकार केल्याच्या आवाजात बोलून निघाली.
    लिफ्ट मध्ये जाताना मला बाय करायला विसरली नाही.
   मी माईंकडे बघितलं.त्यांच्या चेह-यावरची चिंता स्पष्ट दिसत होती.उद्या त्यांचा भजनाचा कार्यक्रम होता आणि हे सगळं गळ्यात पडलं होतं. मी माईंना हातांनी इशारा करून 'मी आहे,घेईन सांभाळून'अस सांगितलं.पण मनात आलं  "तुम्हाला काही अडचण आहे का"? अस माईंना विचारायचं सौजन्यसुध्दा त्यांच्या सुनेकडे नव्हतं.
  ‌   मला बाहेर जायचं होतं म्हणून मी आत गेले खरी पण डोक्यातून माईंची असहाय्यता जातच नव्हती.
      नाना माईं आणि आम्ही सोसायटीत एकदमच रहायला आलो.माईंना दोन मुलगे.ती मंडळी सोसायटीत रहायला आली तेव्हा त्यांचा मोठा मुलगा नुकताच बॅंकेत नोकरीला लागला होता आणि धाकटा इंजिनिअर होणार होता.दोन्ही मुलगेच म्हणून आणि त्यांच्या सल्ल्यानीच नानांनी थ्री बेडरुमचा ब्लाॅक घेतला होता.मोठ्याचं लग्न झालं आणि सुन नोकरी करणारी होती. तिचं माई सगळं हौसेने करायच्या.पण धाकटी सून आली आणि मोठीनं अचानक नानांना "आम्हाला वेगळं रहायचंय" असं सांगितलं. म्हणे म्हणेपर्यंत बॅंकेतून कर्ज काढून ब्लाॅक घेऊन ते वेगळे रहायला पण गेले.
    नाना त्यावेळी खूप चिडले होते.माईंनी त्यांना खूप समजावलं.तोपर्यंत आम्हा दोन्ही घरात पण खूप जवळचं नातं निर्माण झालं होतं.मला देखील मुलं लहान असल्यामुळे माईंचा आधार होता.आम्ही दोघ पण नानांशी बोललो पण ते दुखावलेच....
    धाकट्या सुनेची पण लक्षणं ठीक दिसत नव्हती.तिला स्वत:च पार्लर काढायचं होतं.आणि ते मी माझ्या घरातच सूरू करेन, इथे नाही जमणार असं म्हणून ती पण एक दिवस वेगळी झाली. दोन्ही वेळेला मुलांच काही चाललं नाही याच मात्र मला राहून राहून नवल वाटत होतं.ह्यावेळी मात्र नाना शांत होते.
    बाहेर पडताना माईंकडे डोकावले.भजनी मंडळाच्या बायका तर गेल्या होत्या.आणि माई जेवणाची तयारी करत होत्या. मी "माई ठरल्याप्रमाणे सुमनकडे जेवायला जातेय"असं दारातूनच सांगून निघाले.
    हे टुरवर आणि वर्षाअखेरीची पार्टी ‌करायला शनिवार-रवीवार मुलगा-सून मुंबई बाहेर जाणार असल्याने मी पण माझ्या मैत्रिणींना शनिवारी रात्री जेवायला बोलवायचं ठरवलं होतं. सुमन माझी आतेबहिण आणि मैत्रिणही असल्यामुळे तिच्याकडे सर्व ठरवायला येते असं म्हटल्यावर तिनं जेवायलाच बोलावलं होतं.माईंना‌ तर‌ सर्वच माहीत होत.
     उशीर झाल्यामुळे सुमन पानं घेऊन वाटच बघत होती.तिची दोन्ही मुलं शाळाकाॅलेजला‌ गेली होती.मिस्टरही कामावर गेले होते.त्यामुळे आम्ही दोघीच होतो.
   शनिवारच्या माझ्या घरच्या जेवणाचा मेनू ठरवताना मला एकदम आठवलं "अग,सुमे तुझ्या मिस्टरांच्या गृपच दर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी गेट टू गेदर असायचं ना? अजूनही भेटता कां ग? आणि हा शनिवार शेवटचा आहे तरी सुद्धा तू माझ्या घरी यायचं आणि नंतर तिकडे उशिरा जा बाई! नाही तरी तुमचं ते नाईट आउट का काय असतं ना.तेव्हा उशिरा गेलीस तरी चालेल"मी तर सुमनवर भडीमारच केला होता.
    "हे बघ,ते ह्यांच्या मित्राच्या बंगल्यावर शेवटच्या शनिवारी भेटणं अजूनही सुरू आहे.पण मी मात्र जात नाही.सुमी शांतपणे बोलली.
         "ऐकलं बरं मिस्टरांनी"माझं कुतूहल.
      "पहिल्या वेळी त्यांनी दुर्लक्ष केलं.दुसर्‍यावेळी खूप चिडचिड केली पण मी येणार 'नाही' इतक्या ठामपणे सांगितलं की त्यांना तो नकार स्वीकारावा लागला"सुमन बोलत असताना मध्येच मी विचारलं"अग, पण तू जाणं बंद का केलस?"
   "खर सांगू,हे पुरुष ग्लास घेऊन बसणार. त्यांना काहीजणी कंपनी देणार, इतर बायकांचे विषय म्हणजे,माॅलमधली खरेदी,टी.व्ही.सिरीयल्स, आणि मला खूप कंटाळा यायचा. मन‌ रमायचच नाही.आणि ठरवलं 'नाही' जायचं.सर्वानी खूप आग्रह केला.वेगवेगळे पर्याय सुचवले.हे थोडे दिवस रागावलेले होते पण मी ठाम राहिले.
    "मी आता त्या दिवसाची वाट बघते कारण ती संध्याकाळ माझी असते कधी मुलांबरोबर,कधी छानस पुस्तक वाचत,मी माझी असते.तेव्हा आपल्या मनाविरुध्द दुसऱ्याचं मन राखण्यापेक्षा 'नाही' म्हणायला शिकावं".सुमन बोलत होती पण माझ्यासाठी तो नवीन वर्षाचा संकल्पच होता.
     दुसऱ्या दिवशी सकाळी आवरून माईंकडे गेले.त्या खूप थकलेल्या वाटल्या."आज बसतील मुलं माझ्या घरी,तुम्ही जा भजनाला"मी माईंना म्हटलं."
    "छे ग,धावपळ होईल.अग, एकटी रहाते तरी स्वैपाकाला,वरकामाला मी बायका ठेवल्यात. पण येवढं मोठ घर दोन्ही मुलंं एकत्र राहतील ह्या मोहानी घेऊन ठेवलंय आणि ही मुलं आली की पसारा करून ठेवतात.आवरताना थकायला होतं.आणि मुलांना खायला पण सारखं लागतं.माईंच खरं होतं.
      माझ्या मनांत कालचा सुमनच्या 'नाही'चा विचार घोळतच होता. मी माईंना म्हटलं" तुम्ही आता दोन्ही सुनांना जेव्हा स्वत:ला नको वाटतं असेल तेव्हा 'नाही'  म्हणायचं असा ह्या नवीन वर्षापासून संकल्प करा.
     "अगदी खरं आहे तुझं,हल्ली मी हा विचार सारखा करतेय .माई माझ्या जवळ येऊन बसल्या आणि म्हणाल्या"अग तीन वर्षं झाली नानांना जाऊन त्यांच्या जाण्यानंतर तर ह्या दोघी मला फारच गृहित धरतात.नाना होते तोपर्यंत दोघी वचकून असायच्या.
      नानांच्या आठवणींनी माईंना भरून आलं होतं.तरीसुध्दा त्या बोलत होत्या"गेल्या वर्षी आठवतं ना तुला मोठ्या सुनबाईंनी माई,चुंदा करून द्याना असं म्हणून दोन किलो कैर्‍या आणून ठेवल्या.किसून त्याची उस्तवार करताना खांदा‌ दुखुन आला.
        पण 'नाही' म्हणायचंच असं मात्र मनात आलं जेव्हा मला मोठ्या लेकानी कौतुकानं महाबळेश्वरला नेलं.पहिल्या दिवशी सकाळी त्याच्या दोन्ही मुली शाॅपिंगला गेल्या आणि येतो थोड्या वेळाने असं म्हणून ही दोघं गाडीने जी गेली ती चार वाजता आली.आणि आल्यावर सुन काय म्हणते"फाय स्टार हॉटेल आहे,फिरलात की नाही सगळीकडे! इतका संताप झाला ना! दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे उशिरा उठले मला मुलींबरोबर पाठवून आम्ही दोघे हाॅटेलवर आराम करतो म्हणाले.मला वाटलं मी का आले ह्यांच्या बरोबर? 'नाही'येणार असं कां नाही म्हटलं?
     आम्ही दोघी बोलत होतो आणि माईंच्या धाकट्या सुनेचा माझ्या मोबाईलवर फोन आला" काकू माई फोन उचलत नाहीत.जरा बघता का?
     अग, मी इथे माईंकडेच आहे.फोन आत असेल म्हणून कळलं नाही.थांब मी देते त्यांना आणि मी फोन माईकवर ठेवला "माई,आज रात्री मी येते मुलांना न्यायला पण शनिवार रविवार मला जरा आॅर्डरसाठी पुण्याला जावं लागतंय तिला पुढे बोलू न देता माई एकदम म्हणाल्या"हे बघ, मला शनिवारी भजनाचा कार्यक्रम आहे आणि रविवारी मला पण काही काम आहे तेव्हा मला ह्यावेळी 'नाही' जमणार! नंतर पण मला विचारल्या शिवाय काही ठरवत नको जाऊस.त्या काही बोलायच्या आधीच फोन बंद झाला होता.
    "अरे माई, इतक्या पटकन तुम्ही निर्णय घेतलात"मी हळूच विचारलं.कारण त्यांच्या सुनेनी माझ्या फोनवर फोन केला होता.
     "तू अजिबात काळजी करू नकोस.महाबळेश्र्वरच्या अनुभवानंतर मी किती दुखावलेय तुला कल्पना नाही.आणि काल धाकटी आतसुध्दा आली नाही.माझ्या भजनातल्या मैत्रीणींकडे बघितलं सुध्दा नाही.ह्या सगळ्यापुढे माझा नकार काहीच नाही.आणि हे सगळं मी त्या दोघींना प्रसंगांसह सांगणार आहे.नाना गेल्यापासून मी हे सहन करतेय.मी एकटी आहे म्हणून अपमान सहन 'नाही'करणार.नानांबरोबर मी खूप प्रवास केलाय.मी मरेपर्यंत ह्यांच्या पूढे हात पसरावा लागणार नाही इतका पैसा नानांनी ठेवलाय. मी 'नाही' म्हणायला थोडी उशिराच शिकले.
     माईंचा संताप अनावर झाला होता.
     मला मात्र माझा पहिलाच विद्यार्थी "नाही"म्हणण्यात यशस्वी झाला होता त्याचा खूप आनंद झाला होता.
                                                                              -ललिता छेडा