Thursday, October 25, 2018

कोलाज



माझी आणि मानसीची ओळख ट्रेन मधली आणि!ट्रेनमधल्या प्रवासात होणारी मैत्री कधी कधी खूप घनिष्ट होऊन जाते असा बहूतेकांचा अनुभव असतो.आमच्या दोघींचं ही तसंच झालं.
पहिल्यांदा मानसी भेटली तेव्हा ट्रेनमध्ये माझ्या समोरच्या सीटवर बसलेली होती.आणि तिच्या हातातल्या कॅमेर्‍यातले फोटो बघत होती.अचानक दाराशी उभ्या असलेल्या दोघींचं काही तरी कारणाने भांडण सुरू झालं.दोघी एकेमेकींबरोबरच होत्या.विषय कळला नाही पण आवाज जोरात येऊ लागला.हिनी त्यांच्या नकळत पटकन त्यांचा फोटो काढला.आणि हसून मला दाखवला.काय परफेक्ट भांडणाचा मुड पकडला होता! मी मस्त अशी खूण केली.ती आपणहून बोलू लागली "मी रेल्वे प्रवासावर एक फोटोशुट करतेय मला एक छान पोझचा फोटो मिळाला".मग काय सी.एस.टी.येईपर्यंत गप्पा सुरू झाल्या. नांव मानसी शर्मा आणि व्यवसायानी ती कोलाज आर्टीस्ट होती.विविध प्रकारचे कोलाज करत होती.फोटो, फॅब्रिक आणि बरंच काही! ती तशी तिशीची वाटत होती आणि मी तीन वर्षांत निवृत्त होणार म्हणजेच तिच्या वयाच्या दुप्पट! पण त्या तासात आमचं चांगलच जुळलं.खूप गप्पा झाल्या.मी सहज तिला विचारलं "तू मराठी इतकं छान कसं बोलतेस?"माझी मम्मी मराठी आहे."तिने हसून सांगितलं." लेखिका,कवियत्री राधा शर्मा"माझं वाक्य पूर्ण व्हायच्या आत 'माझी मम्मा' तिनी उत्तर दिलं.अरे वा! मला त्यांचे विचार फार आवडतात.मला भेटायला आवडेल."नक्की"मानसी बोलता बोलता उठली.स्टेशन आलं होतं.
स्टेशनवर उतरल्यावर एक मध्यमवयीन मुलगा आमच्याकडे आला."हा राघव माझा फ्रेन्ड,फिलाॅसाॅफर,गाईड तिने हसून ओळख करून दिली.
"चलो दीदी बाय"मानसीनी निरोप घेतला.मला दीदी फार आवडलं.नाहीतर आपली मराठी मुलगी काकू,आजी, मावशी म्हणाली असती.मला तरूण झाल्यासारखं वाटलं.
मी रहायला दादरला आणि ऑफिस फौंटनला! त्यामुळे रोजचाच ट्रेनचा प्रवास कधी मानसी कधी राघव मला भेटू लागले.
त्यानंतर आठएक दिवसांनी आॅफीस सुटायच्या वेळी ती दोघं तिथं आली आणि चलो दीदी माझ्या घरी जाऊया, तुम्हाला मम्मीला भेटायचं आहे ना?राघव गाडी लेके आया है"मानसीनी जवळजवळ ओढून नेलं."अग माझा दिवसभराचा कसा अवतार आहे! मी केविलवाणा प्रयत्न केला.
गाडीत बसल्यावर "आता आपण सायनला आमच्या स्टुडीओवर जाणार आहोत.तिथे तुम्ही फ्रेश व्हा.तोपर्यंत मानसी तिच तिच्या घरी घेऊन जायचं सामान पॅक करेल! नंतर आपण मानसीच्या घरी विक्रोळीला जाऊया. चालेल ना"राघवनी गाडी सुरू करून सर्व कार्यक्रम सांगितला.
त्यांचा स्टुडिओ म्हणजे सायन मधल्या एका बिल्डींगच्या तळमजल्यावर टू बेडरूम चा ब्लाॅक होता.एका बेडरूममध्ये चित्रकार मानसीचा पसारा होता आणि दुसरी व्यवसायाने फोटोग्राफर असलेल्या राघवची डार्क रुम होती.आम्ही दोघी आमची काम करेपर्यंत राघवनी मस्त चहा करून आणला.
सायनहून निघल्यावर गाडी मानसीनी चालवायला घेतली. मी पुढे बसले आणि राघव मागे बसून लॅपटॉप वर काम करायला लागला.
"दीदी,अंकल कुठे काम करतात?" मानसीने अगदी सहज विचारलं.
"वो एक बड़ी फाॅरेन कंपनीमे एम.डी.है। मी उगीचच हिंदीत बोलले.
राघवचा मागून हसण्याचा आवाज आला."दोन मराठी माणसं असताना हिंदी का? दीदी म्हटल्यामुळे असेल बहुतेक!राघव बोलला आणि आम्ही सगळे हसलो.
"बरं बाबा,तुमचे अंकल साॅफ्टवेअर कंपनीत मोठ्या पोस्टवर आहेत. त्यामुळे वर्षातले सहाआठ महिने कामानिमित्त देशांत किंवा देशाबाहेर फिरतीवर असतात. मी मधून मधून त्यांच्या बरोबर जाते.मला दोन मुली आहेत.एकीच लग्न झालय आणि ती बंगलोरला असते धाकटी शिक्षणासाठी नुकतीच लंडनला गेलीय.त्यामुळे सध्यातरी हिंदू काॅलनीतल्या आमच्या घरी अस्मादिक एकट्याच असतात.मी एका प्रायव्हेट कंपनीत कामाला आहे.आणि अजून तीन वर्षांनी निवृत्ती घेणार! माझ्या एका दमात सगळं सांगण्यामुळे दोघेही खूप हसायला लागले.
"हसू नका,आता तुमची ओळख द्या"मी लटक्या रागात म्हटलं.
"ओ.के.मी राघव! मानसी आणि मी जे.जे.चे पदवीधर आहोत.जे.जे.पासूनच आमची मैत्री जुळली. मी आईबरोबर कल्याणला रहातो.लहान असतानाच वडिल गेले.आईनी कष्टानं मला शिकवलं.कॅमेरा माझं पॅशन आहे. पण कमाईसाठी मोठ्या मोठ्या लग्नांच्या फोटो आॅर्डर घेतो.छोट्या फिल्मस् बनवतो.बस् this is Raghav!
बोलता बोलता घर आलं होतं.तीनचार बिल्डींगच्या सोसायटीत मानसीच तळमजल्यावर घर होतं.घरांत प्रवेश केल्यावर घर प्रेमात पडावं इतकं नीटनेटकं होतं.
"या" फिक्या निळ्या रंगावर छोटी आॅरेंज रंगाची फुलं असलेल्या,सलवार कमीज घातलेल्या, प्रसन्न चेहऱ्याच्या राधाजींनी आमचं स्वागत केलं.मानसीचे पापाजी आणि मोठा भाऊ पण तिथेच बसले होते."अमित,दीदीके मिस्टर साॅफ्टवेअरमे हैं"मानसीने भावाला सांगितलं."क्या नाम है उनका?पापानी विचारलं."सुहास थत्ते"मी बोलले आणि अमित एकदम म्हणाला" बहोत नाम है उनका मुझे उनसे कबसे मिलना है"तो साॅफ्टवेअर इंजिनिअर होता.मी लगेच त्यासर्वांना ह्या महिनाअखेर हे येतील तेव्हा जेवायलाच या अस निमंत्रण दिलं.आणि राघवला म्हटलं"तू पण त्यादिवशी आईला घेऊन ये."नक्कीच, कारण माझं आडनाव पण आहे 'थत्ते' त्यामुळे मी आता हक्कानी येणार"राघव बोलल्यावर मला योगायोगाची कमाल वाटली.ओळखीच एक आवर्तन पूर्ण झालं होतं.
आमच्या घराच्या पार्टीत राघवनी चिक्कार फोटो काढले.त्याच छानस कोलाज माझ्या पॅसेजमध्ये लागलं.
नंतरची तीन वर्षे माझ्या साठी धमाल होती.त्या दोघांबरोबर मी न बघितलेली मुंबई बघितली.मला बरोबर घेतलं की घरातून पण परवानगी! आणि ती दोघंही वागायला खूपच डिसेंट होती. माझ्या मुलीकडे बंगलोरला ही दोघं बरोबर, अलिबागला राघवच्या आजीकडे आम्ही तिघे एकत्र! फोटोंसाठी, चित्रांसाठी मुंबई आणि जवळच्या सर्व समुद्राना भेटी! आणि महत्वाचं म्हणजे मुली आणि हे खूष माझी "एकटं वाटतंयची"कटकट बंद झाली होती.धाकटीनी तर नांव ठेवलं होतं"मम्मीचा कोलाज"
त्यांच्याशी गप्पा मारताना समजलं "मानसीचं वडिलांनी ठरवलेलं पंजाबी मुलाशी लग्न त्यांच्या सततच्या मागण्यांमुळे मोडलं.त्या मंडळींना लग्न मोडून धडा शिकविण्यात राधाजींनी खूप पुढाकार घेतला होता.नंतर मानसी एका मराठी मुलाच्या प्रेमात पडली पण त्या मुलाने ऐनवेळी हिम्मत न दाखवता आईनं सांगितलेल्या मुलीशी लग्न केलं.आणि ह्या सगळ्याचा एकमेव साक्षीदार राघव! ज्याच हिच्यावर खरं प्रेम.
आणि आता त्या दोघांचं लग्न मी जमवावं म्हणून दोन्ही कुटुंब माझ्याकडे आशेने बघत होती.सर्वांच्या प्रयत्नानी आमच्या घरात सगळे जमलेले असताना अचानक राघवनी मानसीला गुलाब देऊन मागणी घातली आणि महत्त्वाचं म्हणजे मानसीने होकार दिला.दोन अनुभवांमुळे ती लग्नाला नाहीच म्हणत होती.
मी पण निवृत्त झाले होते.महिन्याभरांनी ह्यांच्या बरोबर परदेशात फिरणार होते.येताजाता लेकीकडे लंडनला रहाणार होते.मी तीन साडेतीन वर्षाची मोठी सुट्टी घेतली होती.त्यामुळे लग्न लवकर करायच ठरलं.
इतकं सगळं छान चाललेलं पण कल्पना ही करू शकणार नाही असं दृष्टावलं! राघवचा अॅक्सिडंट झाला आणि-----
कोणाची समजूत कोणी काढायची.दोन्ही घरातल्या दु:खाला सीमाच नव्हती. मी पण अक्षरशः हादरले होते.अस घडू शकतं विश्र्वासच बसत नव्हता.पण माझ्या मदतीसाठी आणि लग्नासाठी आलेल्या ह्यांनी सर्वांना कमालीचं समजावलं सगळी परिस्थिती शांतपणे हाताळली.आमच जाणं पंधरा दिवसांनी लांबवल.
खूप काही तरी गमवून विमनस्क मनस्थितीत मी मुंबई सोडली.
पण काळासारख औषध नाही.त्यामुळे दु:ख हळूहळू कमी होत गेलं. मानसीशी फोन, मेसेज, Whatsapp,वर कनेक्टेड होते.हल्ली तिचे फोटो तान्ह्या बाळा बरोबर असायचे.स्टेटस् पण छोटीच्या फोटोंचा असायचा.कोण आहे विचारलं की भारतात या मग कळेल अस म्हणायची.तिनी फक्त "मी स्टुडिओवर रहाते" हे मात्र कळवलं होतं.
जवळपास चार वर्षानी मी परतले.आल्यावर दुसऱ्याच दिवशी मानसीला भेटायला स्टुडिओवर गेले.बाहेर एक सुंदर बोर्ड होता.
बेल वाजवली.
‌ जिया
मानसी शर्मा
नर्मदा थत्ते
ह्यांचा
'रामा' स्टुडिओ
बोर्ड वाचून डोळे भरून आले.दारात कडेवर छोटीला घेऊन मानसी उभी होती."या"मला बघून तिच्या चेहऱ्यावरचा आनंद लपत नव्हता."खूप मिस केलं तुम्हाला दीदी!"मी पण "दोघींनी अक्षरशः मिठी मारली.थोडावेळ मनसोक्त रडून घेतलं.
"मी जियाला दत्तक घेतलय.माझं आणि राघवच पहिली मुलगी दत्तक घ्यायची असं ठरलंच होतं."मानसी हळूच बोलली."आणि राघवच्या आई इथे माझ्या बरोबर रहातात" मधून मधून मम्मा पापाजी पण येतात.
दु:ख विसरायला मानसीतल्या चित्रकाराने तिच्या आयुष्याचा कॅनव्हास सुंदर कोलाज करून रंगवला होता.तिच्या पावलापुरता प्रकाश उजळला होता.



ललिता छेडा

Thursday, October 18, 2018

मैं भी तेरे जैसा हूं

सकाळी हाॅस्पिटलमध्ये आल्यावर डाॅ.भास्कर रिसेप्शनवर कोणीतरी देऊन गेलेल्या चिठ्ठीमुळे गंभीर झाले."उद्या संध्याकाळी साडेसात नंतर तुम्हा सर्वांना भेटायला घरी येतेय"शिल्पा.
जवळजवळ तीसबत्तीस वर्षांनी हे नाव ह्या चिठ्ठीमुळे पुन्हा त्यांच्या आयुष्यात आलं होतं.आता ही चिठ्ठी अक्षयला त्यांच्या लेकाला दाखवायची की नाही ह्या विचारानी त्यांना अस्वस्थ वाटलं.पण "ती घरी येणार" असं लिहीतेय म्हणजे घरात सर्वांनाच सांगायला हवं.
आज अक्षयला दोन ऑपरेशन्स होती म्हणजे तो दुपारपर्यंत बिझी असेल.नंतर बोलू असा विचार करून त्यांनी हाॅस्पिटलची रोजची कामं आटपली.अक्षयनी हाॅस्पिटल सांभाळायला सुरवात केल्यापासून ते निवृत्तच झाले होते.आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांचा तिथे दवाखाना होता पण अक्षय सर्जन झाल्यावर तिथेच त्याने मोठ हाॅस्पिटल केलं होतं. ते रोज फक्त त्यांचे पेशंट तपासत त्याशिवाय अक्षयची बायको सुचेता पॅथाॅलाॅजिस्ट असल्यामुळे तिथेच तिची लॅबही होती.लंच बहुतेक तिघेही घरून टिफीन आला की हाॅस्पिटलमधेच घेत असत.इतक्या छान चाललेल्या आयुष्यात आता त्या चिठ्ठीमुळे वादळ आलं होतं.
भास्कर आपल्या केबिनमध्ये आले आणि रिसेप्शनवर फोन करून"अक्षय फ्री झाला की त्याला आणि सुचेताला आत पाठवा"असा निरोप ठेवला.त्यांचे पेशंटही संपले होते.सकाळपासून त्या चिठ्ठीमुळे त्यांना प्रचंड अस्वस्थता जाणवत होती.कोणाशी काही बोलताही येत नव्हतं."का येतेय ही?ह्या प्रश्नानी त्यांना भंडावून सोडलं होतं.मन सारख भूतकाळात जात होतं.जे आपण पूर्णपणे विसरलो आहे असं समजत होतो तेच सारख आठवत होतं.
भास्कर सारख्या अनाथ मुलांला दत्तक घेऊन सुप्रसिद्ध उद्योजक आबासाहेब इनामदारांनी त्याच्यावर खरं म्हणजे उपकारच केले होते.अनाथआश्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राह्यलेल्या आबांना भास्करच्या डोळ्यातलं बुध्दीच तेज दिसल.मुलबाळ नसलेल्या आबांनी आपल्या पत्नीला विचारून भास्करला दत्तक घेतलं.आजूबाजूच्यांनी,नातेवाईकांनी त्यांना असं अनाथ मुलांला दत्तक घेऊ नये म्हणून खूप समजावलं पण ते आपल्या निर्णयावर ठाम होते.आणि भास्करनी पण त्यांचा निर्णय यथार्थ ठरवला.आबांच्या इच्छेनुसार तो डाॅक्टर झाला.माईंच म्हणजेच आबांच्या पत्नीच तर भास्करवर सख्ख्या मुलापेक्षा जास्त प्रेम होतं.दवाखाना काढतानाच आबांनी भास्कर कडून वचन घेतले होतं.'तू तुझ्या डाॅक्टर असण्याचा ज्यास्तीतज्यास्त फायदा गरीब आणि गरजू लोकांना करून द्यायचा'
डाॅ.भास्करनी पण तो शब्द आयुष्यभर पाळला.
त्यांच्या आयुष्यात शिल्पा आली आणि भास्करच आयुष्यच बदलून गेलं.आबांसारख्याच एका मोठ्या उद्योगपतींची ती एकुलती एक मुलगी! एका कार्यक्रमात त्यांची ओळख झाली.शिल्पाच्या पुढाकारानेच त्यांच लग्न ठरलं.माई तर नुसत्या हरखून गेल्या होत्या.इतकी सुंदर मोठ्या घर कळवणार.ची लाडकी लेक सून म्हणून येणार होती.आबा मात्र एकदा म्हणाले"हिच्या वडीलांना पैशाची खूप घमेंड आहे.हिला तशी नसावी म्हणजे झालं."भास्कर लगेच म्हणाला होता की"तुम्ही नाही म्हणत असाल तर आपण इथेच थांबूया.""नाही रे, मला तुझ्या डोळ्यात तिच्या वरच प्रेम दिसतंय.मी फक्त शक्यता बोललो"आबांनी विषय संपवला होता.पण अशा शक्यता बहूतेक खर्‍या ठरतात.शिल्पा भास्करच्या घरात एखाद्या पाहूण्यासारखी रहात होती.आबांना आणि भास्करला संगीताची आवड आणि हिला गाणं शब्दांशी वैर,माईंना स्वैपाकाची हौस तर ही स्वैपाकाला बाई आहे म्हणून तिकडे फिरकणारच नाही.
लग्नानंतर दोनच महिन्यांत तिला दिवस गेले. माईंना,भास्करला खूप आनंद झाला आणि त्यांना वाटल आता ही ह्या घरची होईल.पण तिनी अॅबाॅरशनचा हट्ट धरला.तिला येवढ्यात ही जबाबदारी नको होती.माईंनी,तिच्या आईनं खूप समजावलं तेव्हा ती कशीबशी तयार झाली.अक्षयच्या जन्मानंतर तर तिचा आडमुठेपणा जास्तच झाला. शिल्पाला आबांचा बिझनेस स्वत:च्या नांवावर करून हवा होता. किंबहुना लग्नामागचा हेतूच तो होता आणि आबा तिच्या ह्या इच्छेकडे पूर्ण दुर्लक्ष करत होते.त्याउलट आबांनी स्वैपाकाच्या काकूंना तुमच्या मूलीला मी इंजिनिअर करेन आणि व्यवसायाची जबाबदारी तिला घ्यावी लागेल असं म्हटल्यावर तर तिचे वाद,भांडणं अधिकच वाढली.भास्करला आबा माईंसाठी खूप वाईट वाटायचं.
अक्षयचा आठवा वाढदिवस होता.शिल्पाला तो पंचतारांकित हॉटेलमध्ये करायचा होता.आबा अगदी सहज म्हणाले"उगीच येवढा खर्च करण्यापेक्षा आपल्या बंगल्याच्या गच्चीवर छान पार्टी देऊया" भास्करनी पण त्याला दुजोरा दिला.आणि शिल्पा उसळून म्हणाली"तुम्ही सर्वजण अनाथआश्रम मेंटलिटीतून वर येणारच नाही का? मला कळतच नाहीय मी का रहातेय इथे? आबांनी हताश होऊन भास्करकडे बघितलं."मग तू तूला जिकडे जायचं तिकडे जाऊ शकतेस!भास्करनी शांतपणे उत्तर दिलं.
संतापाने बॅग भरून ती अक्षयला घेऊन घरातून बाहेर पडली.माई तिच्या मागे जायला लागल्या पण आबांनी त्यांना थांबवलं. आणि शिल्पाला "ह्या घराबाहेर पडलात तर परत यायचं नाही.तेव्हा पाऊल उचलताना विचार करा".असं उंच आवाजात सुनावलं.पण ती मागे न बघता निघून गेली.माई गहिवरून"अहो अक्षयला घेऊन गेली ना"काळजी नका करू,ती जास्तीतजास्त आठ दिवस अक्षयला सांभाळेल.आबानी माईंना घरात घेऊन दार बंद केलं.आणि ते म्हणाले तसच घडलं पाचव्या दिवशी ती अक्षयला सोडून गेली.भूतकाळात रमलेल्या भास्करची तन्द्री भंगली जेव्हा अक्षयसुचेता त्यांच्या केबिनमध्ये दार ढकलून आले.
काय झालंय बाबा, रिसेप्शनवर कळलं की कसली तरी चिठ्ठी तुम्हाला आलेय.आणि तुम्ही डिस्टर्ब आहात!अक्षय नी सरळ विषयालाच हात घातला होता.त्यांनी खिशातून चिठ्ठी काढून त्याच्या हातात ठेवली.एक मिनीटच अपसेट झाल्यासारखा भाव त्याच्या चेहऱ्यावर आला पण लगेच शांतपणे "don't worry, मी बघतो काय करायचं ते! असं बोलून सुचेताला जेवून घेऊया अशी खूण केली.भास्करला आबांची आठवण झाली.अगदी त्यांच्या सारखाच वागला होता अक्षय!
दुसऱ्या दिवशी बरोबर साडेसातला बंगल्याची बेल वाजली.भास्कर दरवाजा आड बसला होता.समोरच्या आरशात त्याला दरवाज्यातल दिसत होतं.पण दरवाजातल्या व्यक्तिला तो दिसणार नव्हता.ही कल्पना पण अक्षयचीच होती.
दरवाजात शिल्पा उभी होती.बाॅबकट,जीन्समध्ये खूप स्मार्ट दिसत होती.चेहर्‍यावरच वय मात्र लपत नव्हतं."डाॅक, नाहीय का? भास्कर च्या अंगावर काटा आला.किती दिवसांनी डॉक हा शब्द ऐकला होता.शिल्पा त्याला हीच हांक मारायची.
"साॅरी, मी डाॅक्टरअक्षय भास्कर इनामदार.आपल काय काम आहे? मॅडम.
"अरे मी तुझी माॅम"शिल्पा आत यायला बघत होती. तिच्याकडे एक खांद्यावर एक हातात अशा दोन बॅगा होत्या.
"अच्छा,मॅडम बत्तीस वर्षांपूर्वी तुम्ही मला ह्याच जागेवर सोडून गेला होतात. त्याची आठवण करून देताय का? साॅरी,पण ते सर्व मी विसरलोय. त्यानंतर माझ्या रडण्याचा आवाज ऐकून बाबा धावत बाहेर आले होते आणि मला उचलून आत घेऊन गेले होते.जाताना फक्त "लंडनला जातेय अक्षयचा व्हिसा पाठवते" येवढंच बोललात.व्हिसाची वाट कधीच बघितली नाही कारण तो येणार नाही याची खात्री होती".अक्षय प्रचंड शांतपणे बोलत होता.
इतक्यात सुचेता पूढे आली."तुझी बायको? शिल्पांनी घाबरत विचारलं.तिला अक्षयचा अॅटिट्युड सहन होत नव्हता.
Yes,sucheta my wife.आणि ही दोन मुलं साहिल, संगिता! अजून काही विचारायचय?
भास्कर कुठे आहे? शिल्पानी चाचरत विचारलं.
ते नाही भेटणार तुम्हाला!अक्षय विषय संपवला होता.
"मी इथे आपल्या घरी परतलेय".शिल्पा हळवी झाल्यासारखी वाटली.
"साॅरी, तुम्ही घरातून गेलात तेव्हा आजोबांनी काय सांगितलं होतं आठवतंय ना? मी खूप लहान होतो पण तरीही मला आठवतंय!"अक्षय बत्तीस वर्षाचा राग व्याजासह वसूल करत होता.आणि आज त्याला अडवायच नाही हे भास्करनी ठरवलच होतं.
आत्ता या वेळी मी कुठे जाऊ? शिल्पा असहाय्य झालेली जाणवत होती.
Oh, अपेक्षित प्रश्न! लंडनमध्ये दोन अयशस्वी लग्न आणि वडिलांच्या मृत्यूनंतर व्यवसायात आलेल्या तोट्यानंतर हेच घडणार होतं.भास्करला वाटलं ह्याला कसं कळल हे सगळं?माई आबांना नेहमी म्हणायची तुम्हाला कसं कळतं घरात बसून?आबा हसून म्हणायचे"माणसं जोडावी लागतात.डोळे उघडे ठेवावे लागतात. 
तुमची सोय आमच्या हाॅस्पिटलमध्ये केली आहे. तळमजल्यावर दोन खोल्या आहेत.तिथे राहू शकता!संपत आमचा ड्रायव्हर तुम्हाला सोडून येईल".अक्षय पूर्ण तयारीनिशी बोलत होता."हा इतका कसा आबांसारखा"भास्कर अभिमानाने त्यांच्याकडे बघत होता.
नाईलाजाने शिल्पा वळली होती.ती गाडीत बसल्या बरोबर अक्षयनी दरवाजा बंद केला.
आणि भास्करच्या जवळ येऊन म्हणाला"खूप रूडली वागलो ना?पण आई अशी सोडून गेली की फार भोगावं लागतं मुलांना! आपण दोघे किती एकटे होतो तरीही एकेमेकांसाठी होतो. आणि आपल्या दोघांना आबा होते.
ही मात्र पुढचं आयुष्य आपण आजूबाजूला असून सुद्धा एकटी असेल.
"तुला असं वागताना बघून मला आबांची फार आठवण झाली"भास्कर गहिवरून म्हणाला.
"चला तर मग आजोबांसाठी तुमची आवडती गझल लावूया.
अपनी धूनमे रहता हूं , मैं भी तेरे जैसा हूं!
गुलाम अलींचे स्वर बंगल्यात अलगद पसरले.
ललिता छेडा



Thursday, October 11, 2018

अष्टभुजा




स्वैंपाकाच्या फडके काकूंनी"ताप आलाय त्यामुळे दोन दिवस येणारे नाही".असा फोन केला तेव्हाच नंदिनीला कळलं की उद्याचा दिवस धावपळीत जाणार आहे.एकतर उद्या जवळजवळ तीन साडेतीन महिन्यांनी सासूबाई येणार होत्या.त्या त्यांच्या लाडक्या लेकीच रंजनाच बाळंतपण करायला पुण्याला गेल्या होत्या.तिला पुण्याच्या ज्या डाॅक्टरांची ट्रीटमेंट सुरू होती तिथेच बाळंतपण करायचं ठरल्यामुळे सासूबाई तिथे रहायला गेल्या होत्या.रंजनाला सासूबाई नसल्यामुळे मोठ कोणी तरी हवं त्यामुळे त्यांनी जाणं आवश्यकच होतं. पुन्हा वाड्यातलं तिच घरही मोठं होतं.एकत्र कुटुंब असलेल्या त्या घरात मोठी जाऊ, तिची मुलं, सासरे, चुलत सासरे,जवळच सासर असलेली नणंद,असं मोठं कुटुंब होतं.आणि सासुबाईंना पुण्याला रहायला फार आवडायचं.हेही त्यांच्या जाण्यातलं एक महत्त्वाचं कारण होतं.
त्या पुण्याहून आल्या की रंजनाच्या घराच कौतुक नंदिनीला नेहमीच ऐकावं लागायचं.तिला त्याची सवयच झाली होती. लेकीच्या सासरी थोड्या वेळासाठी जाऊन आल्या की त्या दोघी जावा कश्या एकत्र गुण्यागोविंदानी रहातात,तिची नणंद लगेच येऊन कशी माहेरी काम करते अशा अनेक गोष्टी ऐकाव्या लागायच्या.तिला वाटायचं की मी आणि मोठ्या जाऊबाई दोघीही नोकरी करतोय.आणि रंजना आणि तिची जाऊ गृहीणी आहेत.हा फरक ह्यांना कळत कसा नाही?
कालचा शनि-रवी तिनं घराच्या आवराआवरीत घालवला होता.राजेशनी, तिच्या नवऱ्याने चिडवलं पण होत"अग,आई तिच्या घरीच येतेय कोणी पाहूणी होऊन नाही येतेय! तिच्या दोन्ही मुलींना पण कपाटं आवरायला लावली तर दोघीही"माॅम,आजी आली की लगेच आमची कपाटं नाही बघणार ग, तू उगीच हायपर होते आहेस.पण नंदिनीचा स्वभाव थोडासा शिस्तीचाच होता.तिच म्हणणं होतं त्यानिमित्ताने घर तर आवरलं जातंय.
तिची सोमवारची सकाळ जरा उशीराच उजाडली.जणू काही ठरवावं असा गजर झालाच नाही.दूध गॅसवर ठेवून ती चहाचं आधण ठेवायला गेली आणि दुध फुटलं! कसं? माहित नाही. आज तर घरात दुध आणायलाच हवं.नंदिनीच लक्ष घड्याळाकडे होतं.वेळेचं गणित आता चुकलं होतं.
एका मोठ्या जाहिरात कंपनीत आर्ट डिपार्टमेंटची ती प्रमुख होती.आज तिचं खूप महत्त्वाचं प्रेझेंटेशन होतं.त्यामुळे सुट्टी घेणं सुध्दा शक्य नव्हतं.
तेवढ्यात तिची मोठी लेक तिच्या कामाची चाहूल लागून उठून आली."मम्मा रात्री झोपलीस की नाही? आणि दुधाच हे असं काय झालंय?
तिला बघूनच नंदिनीच अर्ध टेन्शन कमी झालं. "मानसी प्लीज दुध घेऊन ये, आणि मधुराला उठव, तिला शाळेची तयारी करायला मदत कर, मी तयार होते.नंदिनी बोलत होती आणि तिच्या कडे बघून मानसी हसत होती."चिल,माॅम पहिली गोष्ट म्हणजे मी आज काॅलेजला जाणार नाहीय, कारण मला जर्नल्स पूर्ण करायची आहेत.दुसर म्हणजे आपली काकू पुरणपोळ्या पाठवणार आहे. स्वैपाकाच्या फडकेताई तिच्याकडे पण जातात ना! त्यामुळे तिला माहित आहे त्या येणार नाहीयेत.आजी येतेय आणि ती तिची पण सासू आहे,नाही का? मम्मा,मधूरा आता नववीत आहे.ती मॅनेज करते सर्व आता.आज तू उगीचच हायपर झाली आहेस.मानसीनी सर्व प्रश्र्न सोडवले होते.
आॅफीसला गेल्यापासून नंदिनीचा दिवस इतका बिझी गेला की तिला संध्याकाळ कधी झाली कळलच नाही.निघताना तिनें मानसीला फोन केला."आजी केव्हा येईल? काही फोन आला होता का?
"माॅम,आजी सकाळीच आलीय!मानसी हसत म्हणाली"तुला फोन केला पण तू उचललाच नाहीस."नंदिनीला आठवलं आपण आॅफिसमध्ये आल्याबरोबर फोन म्युट केला होता."मम्मा,अग रंजनाआत्याच्या दिलीप काकांचं अचानक मुंबईत काम निघाल.त्यामुळे आजीला स्वत:च्या गाडीने तिचे जावईबापू सोडायला आले.ते इथेच जेवले. मी सगळ आजीच्या मदतीने छान जमवलं.नंदिनीला तिच्या आईची आठवण झाली.तिनी पहिल्यांदाच कुकर लावला तेव्हा आईला झालेला आनंद तिला आज कळला.
घरी आल्यावर नंदिनीला घरातल्या सर्वांना गप्पा मारताना बघून मस्त वाटलं.भावजी, वहिनी, मुलं पण आजीना भेटायला आले होते.सासूबाई मात्र बारीक आणि थकलेल्या वाटल्या.
"चला, मी पटकन फ्रेश होवून स्वैंपाकाकडे बघते"नंदिनी म्हणाली आणि मधूरा जोरात ओरडली"सरप्राइज मम्मा,आजीनी सर्व जेवण करून ठेवलंय."बसा जाऊबाई, किती दिवस झाले आपण गप्पा नाही मारल्यात".वहिनींनी नंदिनीला अक्षरशः हाताला धरून बसवलं.
"कशा आहात?"नंदिनीनी सासूबाईंकडे बघून विचारलं.
"खर सांगू,अष्टभूजेसारख्या काम करणाऱ्या तुम्हा दोघींच आधी मला कौतुक करायचं आहे.रंजना माझीच मुलगी आणि तिच्या जाऊबाई दिवसभर काहीच करत नाहीत हे मला तिथं राह्यल्यामुळे कळलं.त्यांच्या बद्दल अवघ्या दोन तासात जे काही मत बनवून तुम्हाला विशेषतः नंदिनीला मी जे बोलायची ते किती चुकीचं होतं ते कळलं! सासूबाई मनापासून बोलत होत्या."तुम्ही दोघींनी ह्या घराला किती आपलस केलंत आणि नोकरी करून गणपती, नवरात्र सगळं कसं सांभाळताय.पण हेच सगळे संस्कार मी रंजनावर करायला कमी पडले की काय असं वाटतंय!वाडा जुना आहे म्हणून त्या दोघी आवरतच नाहीत.स्वैपाकाला बाई आहे म्हणून त्या स्वैपाकघरात जातच नाहीत.
आई, सर्वात प्रथम तुम्ही आमच्या आणि रंजनाच्या संसाराची तुलना करू नका.प्रत्येकाचा स्वभाव, विचार वेगळे असतात.आणि संस्कार करू म्हणून होत नाहीत.संस्कार होण्यासाठी आपला स्वभाव, आजूबाजूची परिस्थिती, माणसं हे जबाबदार असतात.एकदा स्वत:चा शोध घेऊन दुसऱ्याला आनंद देता आला की समृद्ध आयुष्य जगता येतं."नंदिनी बोलत होती.आणि सर्वचजण ऐकत होते.
आम्हाला अष्टभुजा म्हणालात मला खूप छान वाटलं पण माझ्या दोन हातांना तुमच्या आणि जाऊबाईंच्या दोन हातांनी घराच्या व्यवस्थापनाचे धडे दिले,घरी कामासाठी येणार्‍या दोन्ही बायकांच्या हातांनी मला नोकरीसाठी घराबाहेर पडायला बळ दिलं, आणि माझ्या दोन्ही मुलींचे हात तर जबाबदारीच भान देणारेच आहेत."नंदिनी भरून आल्यामुळे बोलायची थांबली.जाऊबाई उठून तिच्याजवळच आल्या."किती सुंदर बोललीस".त्याबोलत होत्या आणि वातावरणातला ताण कमी करण्यासाठी राजेश हसत हसत म्हणाला"अरे नवर्‍याचा हाताला काही किंमत आहे की नाही ह्या घरात?
"बाबांनो तो हात धरून तर त्या ह्या घरात आल्यात" आजीला हसताना बघून पोरांनी एकेमेकाला टाळ्या दिल्या.
ललिता छेडा

Thursday, October 4, 2018

संबंध



असा कोसळणारा पाऊस पाहून रमाला नेहमीच त्या रात्रीची आठवण येत असे.ज्या रात्रीनी तिच आयुष्यच बदलून गेलं होतं.
आज स्वत:च्या साड्यांच्या दुकानात बसलेल्या तिला अशाच वेड्या पडणार्‍या पावसात तीसबत्तीस वर्षांपूर्वी पत्र्याच्या चाळीत असलेल्या तिच्या घरात अचानक जमिनीतून पाणी येऊ लागलं होतं त्याची आठवण झाली.पावसात बाहेरून पाणी आत यायचंच पण ह्या वेळी जमीनीतून पण येत होतं.त्यामुळे बघता बघता गुडघ्यापर्यंत पाणी झालं होतं.अवघ्या महिन्याभराची बाळंतीण होती ती आणि हातात ते साडीत गुंडाळलेल बाळ! ती घराबाहेर आली आणि समोर सत्या उभा होता."बर झालं तू बाहेर आलीस, मी तुलाच न्यायला आलोय.आई म्हणाली रमा एकटीच असेल काकांची नाईट आहे ना?"सत्या बोलत बोलत हळूहळू पुढे येत होता.त्यानी हात पुढे केल्यावर रमानी बाळाला त्याच्या हातात ठेवलं."तू हो पुढे, मी येतेय मागून"असं म्हणून ती घरात वळली.घरात होते तेवढे पैसे आणि बाळाची औषधं, कपडे एका पिशवीत भरून घेतले. न विसरता बारशाला आईनी दिलेली चेनही तिनं घेतली.आता तो प्रसंग आठवला की तिला दरवेळी वाटतं की किती योग्य सुचलं आपल्याला.नाहीतर दुसऱ्या दिवशी सकाळी घरी आल्यावर नवर्‍यांनी घातलेल्या गोंधळामुळे आपली किती पंचाईत झाली असती.सत्याच्या घरी आल्यावर तिला खरं म्हणजे खूप सेफ वाटलं होतं.तिच्या त्या चाळीसमोरच्या तीन मजली बिल्डींगमध्ये रहाणारा सत्या सर्वांना मदत करण्यात नेहमीच पूढे असायचा.
पावसाकडे बघताना रमा भूतकाळात हरवली.कोल्हापूरच्या जवळ असलेल्या गांवात तिच्या आईवडिलांच घर! गावाजवळ एक मोठा आश्रम असलेल्या बुवांच तिच्या घरात प्रस्थ होत.तिच्या प्रवचन,कीर्तन करणार्‍या बाबांना ते बुवा. एका गावात कार्यक्रमात भेटले होते.रमाची आई त्यांची भक्त झाली होती.रमाला आईचं थोडं आश्चर्य वाटायचं कारण आई तशी स्वभावानी स्वार्थी आहे हे तिला माहीत होतं. त्या बुवांच ऐकून अवघ्या अठराव्या वर्षी तिचं लग्न तिच्या आईनं एका तिशीच्या मुलांशी लावून दिलं.मुलाच गोरेगावला घर आहे, नोकरी आहे.अस सांगितलं त्यावर विश्वास ठेवुन आईनी बुवांचा आशीर्वाद समजून तिच्या मनाविरुद्ध लग्न लावून दिलं.
तिला सोडायला आलेली आई हे असलं घर, अत्यंत तुटपुंज्या पगाराची नोकरी, दारूचं व्यसन असलेला नवरा बघून थोडी दु:खी झाली पण ह्यात बाबांचा चांगलाच उद्देश असणार,'बघ तुझं भलं होणार असेल' असं समजावून निघून गेली.आणि गेली सहा वर्षे ती नवर्‍यांची दारू, मारझोड,संशय सहन करत होती.त्यात इतक्या वर्षांनी दिवस जाऊन मुलगा झाला होता.
ती रात्र सत्याकडे काढल्यावर सकाळी ती बाळ झोपलेला बघून घरी जाऊन किती नुकसान झाले आहे ते बघून येते असं सांगून निघाली.घरी नवरा आलेला होता."ए, घरात नाही यायचं .रात्रभर त्या सत्याच्या घरी झोपलीस ना!बस,ह्या घराचे दरवाजे बंद आहेत तुझ्यासाठी! सकाळीच पिऊन आला होता तो! रमाला कुठुन ताकद आली कुणास ठाऊक पण ती त्याला ढकलून घरात गेली.आणि स्वत:चे ओले घाण झालेले कपडे तिने पिशवीत भरले. तेवढ्यात नवरा पुन्हा अंगावर धावून आला."इथे नाही रहायच"रमा जोरात ओरडली"सोडूनच चाललेय, नाही येणार परत!त्याला हे अनपेक्षित होतं.
रमा सत्याकडे परतली आणि सत्याच्या आईला म्हणाली"काकू, कालपासून माझ्यावर तुमचे न विसरता येणारे उपकार आहेत.तुम्हाला कळलंच असेल काय घडलंय ते!कारण माझ्या नवर्‍याचा आरडाओरडा अजूनही सुरूच आहे.मी आईकडे जातेय प्लीज माझ्या बरोबर सत्याला येऊ देत का?सत्याच्या आईला सगळ्याच टेन्शनच यायला लागलं होतं.शिक्षीका असलेल्या त्यांनी नवर्‍यामागे कष्टांनी सत्यशीलला वाढवल होत्या. त्यामुळे त्यांनी तिला लगेच सत्याला घेऊन जायला परवानगी दिली.
गावाला घरी आल्यावर रमापुढे काही वेगळंच वाढून ठेवलं होतं.घरातली सगळीजण त्या बुवांच्या आश्रमात गेली होती.त्या बुवांच म्हणे अचानक निधन झालं होतं.आणि महत्त्वाचं म्हणजे बाबांना त्यांच्या गादीवर वारसदार म्हणून बसवलं होतं.रमाला आईच्या भक्तीच कारण कळलं होतं.
सत्याला घेऊन ती आश्रमात आली.ह्या सगळ्या प्रवासात तिला सत्याची हूशारी, धडाडी जाणवत होती.तो खूप ठामपणे तिच्या मागे उभा रहात होता.वीस वर्षांचा बी.काॅमच्या शेवटच्या वर्षाला असलेला सत्या वयापेक्षा जास्त मॅच्युअर वागत होता.
रमाच असं येणं तिच्या आईला आवडलं नव्हतं.रमाच्या बाबांमुळे ती आता आश्रमाची सर्वेसर्वा होणार होती.अशावेळी तिला रमा इथे नको होती.त्यात पुन्हा बरोबर एक तरूण मुलगा!आईनी त्या दोघांना एका खोलीत बोलावलं आणि म्हणाली"हे बघा इथे सगळी गडबड सुरू आहे तेव्हा आत्ता तुम्ही इथून जा.काही पैसे हवेत तर देते.एक मिनीट प्रचंड शांततेत गेलं.रमाला कालपासून दाबलेलं रडू फुटायला लागलं. तिला वाटलं इतक्या तान्ह्या नातवाची पण हिला दया येत नाहीय.एका हातात बाळ असलेल्या तिचा सत्यानी एका मित्राने धरावा तसा हात धरला.आणि "एक लाख द्या आम्ही जातो आणि ह्या पैशात ती सेटल होईल. मी जबाबदारी घेतो."सत्यानी ह्या परिस्थितीत कमाल हिम्मत दाखवली होती. तीस वर्षांपूर्वी लाख रुपये खूप मोठी रक्कम होती.रमा अवाक् झाली होती.माहित नाही कशी पण आई कबूल झाली.लढाई हरतोय म्हणे पर्यंत आयुष्यानी काही तरी वेगळंच वळण घेतलं होतं.गेल्या दोन दिवसांत रमाला वाटलं आपल्याला एकटेपण जाणवू लागला आणि मान वळवली की हा शेजारी उभा असतो.काय संबंध आहे माझा ह्याच्याशी!
त्या दोघांना परत आलेले बघून सत्याच्या आई खूपच अपसेट झाल्या.पण सत्यानी त्यांना काय समजावलं माहित नाही, त्यांनी तिच्या तिथे रहाण्याला विरोध नाही केला.बोलणं मात्र बंद केलं.
सुदैवानं आजूबाजूचे, शेजारचे लोक रमाच्या मदतीला धावून आले होते.तान्ह्या अथर्वला रमाच्या लेकाला सगळेजण आळीपाळीने सांभाळत होते. गेली पांचसहा वर्ष तिचे हाल सर्वांनाच दिसत होते.सत्याच्या चाळीत राहणारी आणि रमाची मैत्रीण असलेली वसुधा कोर्टात नोकरी करत होती.ती रमाला एका वकीलाकडे घेऊन गेली.
त्या वकीलाच्या सांगण्याप्रमाणे सत्या रमाच्या नवर्‍याकडे जाऊन"मी तुम्हाला पंन्नास हजार देतो.तू रमाला घटस्फोट द्यायचा आणि ही खोली तिच्या नांवावर करायची"सांगून आला.त्याच्या सारख्या दारूड्याला येवढी रक्कम त्याकाळात भरपूर होती.पूर्ण आयुष्यात तो इतकी रक्कम एकत्र मिळवू शकला नसता त्यामुळे तो लगेच तयार झाला.
दुकान बंद करायची वेळ झाली होती.दुकानातल्या बायकांनी रमाची तंद्री भंग केली."ताई निघू या का?आज तुम्ही घरी एकट्याच आहात ना? आम्ही येऊ कोणी सोबतीला.अथर्वदादा बायकोबरोबर बाहेर गेले आहेत ना?
"हो ना पण निघा तुम्ही, मी करेन दुकान बंद! वसुधा येणार आहे आज रहायला. तिच्या बरोबर जरा बाहेर जायचंय.तिचीच वाट बघतेय."रमानी सांगितल्यावर सगळ्याजणी गेल्या.
रमा दुकानाकडे बघून विचार करू लागली.सत्यामुळेच आपल्याला घर मिळालं, सुरवातीला त्याला कुठून तरी स्वस्तात मिळालेल्या साड्या विकून आपला हा व्यवसाय सुरू झाला.त्यानेही आपल्यासाठी साड्यांची खरेदी करताना स्वत:चा होलसेलचा कपड्याचा बिझनेस सुरू केला.
कुठेतरी आपल्या मनात त्याच्या बद्दल शारीरिक आकर्षण निर्माण होतय अशी रमाला जाणीव होऊ लागली होती.आणि एक दिवस अशाच आपण पावसात भिजून आलो होतो. सत्या घरात अथर्वला सांभाळतच होता.खेळताखेळता अथर्वला झोप लागली आणि जे स्पर्शाच्या भाषेतून कळाव अस रमाला वाटत होतं ते सगळं घडून गेलं.रमासाठी उत्कट प्रेमातल समर्पण होतं.पण सत्यासाठी तो एक अनुभव होता.रमा संसाराची स्वप्नं बघत होती आणि तो मात्र आनंद देणारा अनुभव वारंवार घेत होता.
आणि एक दिवस अचानक सत्या म्हणाला"रमा मी पारूलच्या प्रेमात पडलोय.गुजराथी आहे,तिच्या वडिलांच मार्केट मध्ये मोठ दुकान आहे.आपल्या ह्या व्यवसायामुळेच आम्ही भेटलो.तिला तुझ्या बद्दल सर्व माहित आहे.मुलुंडला रहातात ती मंडळी मी आईला घेऊन तिकडेच जातोय रहायला.साॅरी पण आता आपले हे संबंध आपण इथेच संपवूया.मी तिच्याशी लग्न करतोय.
रमाला जाणवलं आता येणार्‍या एकटेपणाशी झुंजताना सत्या शेजारी नसेल.
तिनी त्याला विचारलं"सत्यशील, कोणते संबंध? 
त्या पावसाळी रात्री माणूसकीच्या दृष्टीनी घरी घेऊन गेलास ते संबंध!
की आईकडे माझा हात घट्ट धरून मैत्रीच्या भावनेने आईकडे पैसे मागितलेस तो संबंध!
का साड्यांच्या व्यवसायामुळे जुळलेले व्यावसायिक संबंध,
की गेले वर्षभर माझ्या समर्पणाच्या भावनेतून जुळलेले शारीरिक संबंध, 
सत्या,जो संबंध आता एका मिनिटात माझ्यासाठी व्यभिचार झालाय.
तिला माहित होतं त्याच्याकडे उत्तर नव्हतं.
सतत आजूबाजूला असणारा तो पाठमोरा होऊन निघून गेला होता.
बाहेर पाऊस थांबला होता आणि वसुधा पण आली होती.तिच्या डोळ्यातलं पाणी बघून वसुधा म्हणाली"डोळे का भरुन आलेत.सत्याची आठवण झाली का?
"आठवायसाठी आधी विसरावं लागेल वसू ! 
रमा डोळे पुसुन दुकान बंद करायला लागली.
ललिता छेडा