Thursday, September 27, 2018

वेगळं रहायचंय



नानींना दोन भाकर्‍या झाल्या की मागेच ठेवलेल्या स्टुलावर बसताना बघून नानांना गलबललं.ते त्यांच्या जवळ जाऊन म्हणाले"दमायला होतय ना? आता लेकाचं,नातवंडांच जेवण झालय ना आपण दोघं सकाळच्या पोळ्या आहेत ना त्याच खाऊया मला चालतील"."पण मला नाही ना चालणार! तुम्हाला गरम भाकरी किती आवडते माहितेय ना मला!नानी हसत म्हणाल्या."तुझ्या सुनेलाही माहीत झालय की तुला स्वैपाकाची किती आवड आहे त्यामुळे तिने छान पैकी तुझ्या गळ्यात हे काम घातलय! नाना वैतागून म्हणाले.घरापासून जवळच स्वत:च फॅशन बुटीक असणारी त्यांची सुन रश्मी सध्या बंगलोरला व्यवसायाच्या खरेदीसाठी गेली होती.आणि लेकाच्या फर्माइशीमुळे नानींनी गरम भाकरी पिठल्याचा बेत केला होता.
जेवणं झाल्यावर नाना हाॅलमध्ये आले.दुसर्‍या दिवशी शनिवार असल्याने शाळेला सुट्टी होती. मुलं मोबाईलवर खेळत होती.मोठी नात दहावीला आणि धाकटा नातू आठवीला होता.आणि त्यांचा मुलगा अमित लॅपटॉप घेऊन काम करत होता.नानानीं आपल्या बेडरूम मधला टी.व्ही.सूरू केला.त्यांना माहीत होतं नानींना काम आवरायला अजून अर्धा तास तरी लागेल.पूर्वी जुन्या घरात ते नानींच आवरेपर्यंत गप्पा मारत तिथेच बसत.दिवसभरातल्या आॅफिसमधल्या,घरच्या गप्पांची ती वेळ ठरलेली असे.पण ह्या नवीन घरातल्या स्वैपाकघरात बसायला जागाच नव्हती.डायनिंग टेबल बाहेर हाॅलमध्ये!
नानांना घेतलेली निवृत्ती आणि ह्या नवीन पाॅश सोसायटीत थ्री बेडरूमच्या बंदिस्त ब्लाॅकमुळे आलेल्या एकटेपणाचा त्यांना कंटाळा आला होता.पण पंधरा लाखाच पॅकेज घेणारा त्यांचा लेक आणि ड्रेस डिझायनर म्हणून प्रसिद्ध असलेली सून ह्यांनी हौसेनी घेतलेल्या ब्लाॅकमध्ये त्यांना यावं लागलं होतं.आधी पण ५/६ बिल्डींगची सोसायटीच होती पण सगळेजण एकमेकांशी जोडलेले होते.
नानी खोलीत आल्या तोपर्यंत नानांना झोप लागली होती.त्यांना नानांची घुसमट समजत होती.मुलगा,सुन त्यांच्या विश्र्वात दंग होते.नातवंड त्यांच्या!सून नानींवर घर सोडून व्यवसायात दंग होती.पण हल्ली नानीना पण थकवा जाणवत होता.स्वैपाकाची आवड असली तरी कंटाळा येत होता.रश्मीनी जरी कामाला,स्वैपाकाला बायका ठेवलेल्या असल्यातरी नानीनां दिवसभर काम पुरत होतं.सगळ्यांचे डबे वेळच्यावेळी भरून पाठवायचे, मुलांच्या शाळा-क्लासच्या वेळा सांभाळायच्या एक ना दोन त्या सतत कामात असायच्या.
शनिवारी दिवसभर मुलांचे मित्र मैत्रीणीं आल्या होत्या.नानी दिवसभर त्यांची आनंदाने उठबस करत होत्या. दुसर्‍या दिवशी सकाळी नानांनी अमितला म्हटलं "अमित आज मी तुझ्या नानीला घेऊन जवळच्या हाॅटेलात जेवायला जाणार आहे.आज रवीवार आहे त्यामुळे मुलांना तू जेवायला ने."अरे नाना, रश्मी नाहीय त्यामुळे मी दिवसभर मित्रांना इथे बोलावलंय.मॅच आहे ना!संध्याकाळी बाहेरून मागवून घेऊ. सकाळी नानी बघेल." अमितनी विषय संपवला होता. नाना एक शब्दही बोलले नाही.दिवसभर पुन्हा नानींची खूप दमणूक झाली.संध्याकाळी मात्र नाना त्यांना घेऊन बाहेर जेवायला गेले.मुल अर्थात त्यांच्या बरोबर होतीच.
दुसऱ्या दिवशी रश्मी आली.आल्याआल्या खरेदीसाठी आपण किती धावपळ केली आणि त्यामुळे किती दमलो आहे.हे सांगायला सुरुवात केली.आणि मग तिचा मोर्चा नानींकडे वळला."आई, मुलांनी मॅगी साठी हट्ट नाही ना केला?अमितनी रोज डबा नेला की नाही? माझ्या दुकानाची किल्ली वेळेवर नेत होते ना?नानी भांबावल्या."रश्मी,अमितच नाही तर तुझासुध्दा डबा ती अनेकदा तुझ्या दुकानात पाठवते, आणि गेले चार दिवस तिने घर, मुलं सगळ इतकं व्यवस्थित सांभाळलं आहे.त्याच कौतुक तर नाही तू प्रश्र्न काय विचारतेस?"नानांचा आवाज थोडा चढला होता."तस नाही हो नाना, मला माहित आहे ना त्या किती करतात ते! मी आपली गंमत केली."रश्मी गडबडली होती."ठीक आहे.पण ह्यापुढे ती कोणाच्याही प्रश्र्नाला उत्तर द्यायला बांधील नाही.हे लक्षात ठेवा. येवढं बोलुन नाना खोलीत निघून गेले.साध्याभोळ्या नानी रश्मीला म्हणाल्या"जाऊ दे ग, त्यांच नको घेऊस मनावर.पण रश्मीला नाना चिडले आहेत ते जाणवलं.
पुढचे चार-पाच दिवस नाना शांत होते.आणि ही शांतता अमितच्या परिचयाची होती.नानींना पण कळत होतं आता काही तरी निर्णय होणार.अमित,रश्मी दोघांनाही आपली चूक समजली होती.अमितनी पुण्यात सासर असलेल्या दोन्ही बहिणींना फोन केले.चैताली थोडी बिझी होती पण नानांची लाडकी मिताली कामासाठी मुंबईला येणारच होती.तिनी अमितला मात्र फोनवर चांगलच ऐकवल" ह्या घरी आल्यापासून तुमची लाईफस्टाईल आणि स्वभाव दोन्ही बदलत चाललंय.तुला तर माहीत आहे नाना किती फुडी आहेत आपल्याला लहानपणापासून नवीन नवीन हाॅटेलमध्ये न्यायचे, आणि घरी सुद्धा भरीत, आंबोळ्या, थालिपीठ असे पदार्थ स्वत: करायचे.हल्ली मात्र 'आमच्या घरी सारखं पनीर,पराठे, बिर्याणी असले पदार्थ रेडी टू इट येतात. मॅगी,पास्तां ह्याच प्रस्थ वाढत चाललंय' असं नाना नेहमी मला फोनवर सांगत असतात.नातवंडांना आपले पदार्थ कळले पाहिजेत अस त्यांना वाटतं असत.मी येतेय पण त्यांनी जे ठरवलं असेल ते होणारच".मिताली बोलली पण अमितला ते आधीच समजलं होतं.
चार-पाच दिवसांनंतर अमितनी रात्री जेवताना नानांना विचारलं"आपल्या पुण्यातल्या जागेत रहाणार्‍या पटवर्धनांनी तुम्हाला फोन केला होता ना?"हो त्यांच भाड्याच अॅग्रीमेंट पूर्ण होतंय आणि आता ते स्वत:च्या जागेत रहायला जात आहेत."नानांनी अमितकडे न बघता उत्तर दिलं."तस नाही नाना,त्यांनी दुसरा भाडेकरू बघितला होता पण तुम्ही आता आम्हाला भाड्यांनी द्यायचं नाही असं म्हणालात म्हणून विचारलं"अमित चाचरत बोलला."अमित,त्या जागेची थोडी रंगरंगोटी,रिपेअरींग करून घेणार आहे.ते ऐकल्यावर अमित पटकन ओके, ओके म्हणत उठायला लागला."एक मिनिट,माझ, बोलणं पूर्ण झालं नाहीये.नानांनी अमितला हातानी खाली बस अशी खूण केली.ती जागा व्यवस्थित करून मी आणि नानी काही दिवस तिथे रहायला जाणार आहोत.नानांनी विषय पूर्ण केला होता.हे इतकं अनपेक्षित होतं की अमितसकट रश्मी,नानी सगळेच जण एकेमेकाकडे बघू लागले."हे मी ठरवलं आहे.साधारण नवरात्रीच्या सुरवातीला आम्ही जातोय."नानींना मनापासून ही कल्पना आवडली होती.त्यामुळे त्यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही.त्या नानांपाठोपाठ खोलीत आल्या.आणि म्हणाल्या"कसं सुचलं तुम्हाला?इतका कंटाळा आला होता इथे!""आपल्या सारख्या वयस्क मंडळींना घरातले फार गृहित धरतात.आपल नशीब चांगलं आहे की आपलं पुण्यात घर आहे जिथे आपण जाऊ शकतोय.पण ज्यांना असा काही पर्याय नसेल त्यांच्यासाठी काही तरी करायचा माझा विचार आहे.आपण परत आल्यावर काही संस्थांशी बोलून ज्येष्ठांसाठी 'विरंगुळा केंद्र'सुरु करायचा प्रयत्न करणार आहे"नाना हसून म्हणाले.
ती दोघं पुण्याला गेल्यावर रश्मीला पदोपदी नानींच नसणं जाणवत होतं.नाना मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष देत होते ते स्वत: बघायला लागल्यावर किती कठीण आहे ते कळत होतं.आणि पुण्याला फोन केला की"नानीची चुलत बहीण आलेय आम्ही पत्ते खेळतोय,भाऊकाका जेवायला आलेत मस्त श्रीखंड पुरीचा बेत आहे, आम्ही सातार्‍याला चाललोय अशी उत्तरं मिळत होती.कधी चैताली, मिताली फोन उचलत होत्या.
शेवटी न राहवून अमितनी नानांना फोन केला"नाना परत येणार आहात ना?
"अरे असं कां विचारतोस, आम्ही वेगळं रहायला आलोय तुमच्या पासून वेगळं व्हायचं नाहीये.
आमच्या नातीच्या दहावीच्या परीक्षेसाठी आम्ही जानेवारीला परत येऊ.कारण तेव्हा आमची तिथे गरज असेल.नंतर मात्र जेव्हा वाटेल तेव्हा इथे येणार! नानांनी मोबाईल स्पीकरवर टाकला.
"नाना, माझी चूक मला कळलीय.पैसे कमवण्याच्या नादात आम्ही छोटे छोटे आनंद द्यायला आणि घ्यायला विसरलोय तुमच्या वेगळ्या रहाण्यानी प्रत्येकाला हव्या असणार्‍या मोकळ्या श्र्वासाची गरज समजलीय.अमित बोलत होता आणि नाना डोळे मिचकावत नानींकडे बघून हसत होते.
ललिता छेडा

Thursday, September 20, 2018

नकार


बॅंकेत जाण्यासाठी निघालेल्या उर्मिलेच्या हातात तिच्या आईने गजरा ठेवला."आता हे काय? तुला माहित आहे ना मी बॅंकेत नोकरी करते! नटूनथटून जायला मला अजिबात आवडत नाही".उर्मिला थोड्याशा रागानेच बोलली.
"अग,त्या बॅंकेतल्या तांबे मॅडमच्या चुलत जावेच्या माहेरच्या नात्यातला मुलगा तुला भेटायला येणार आहे ना? म्हणून म्हटलं जरा तयार होऊन जा हो"आईनी थोडंसं चाचरत विचारलं.
"आई,तो बारावी पास आहे."उर्मिला
"पण त्याचा स्वत:चा व्यवसाय आहे ना?आई
"घरातच कॅटरिंगच्या आॅर्डर घेतोय.तरीसुध्दा मी त्यांचा मान ठेवायला त्याला भेटेन म्हटलंय.पण गजरा काही घालून जाणार नाही देवाला घाल".उर्मिलानी आईला निरूत्तर केल होतं.देवापूढे गजरा ठेवताना त्यांनी मनापासून हात जोडले."परमेश्वरा, एकुलत्या एक एम्.काॅम्.असलेल्या, उत्तम नोकरी असलेल्या माझ्या या लेकीच लग्न ठरू दे. सोळा सोमवार करीन.थोडी सावळी आहे पण बाकी नाकी डोळी नीटस आहे".आई आपल्या हक्काच्या परमेश्र्वराकडे गार्‍हाणं घालत होती.
आणि बॅंकेत जाताजाता उमा मात्र विचार करत होती आईला हे तांबे मॅडमच कोणी सांगितलं असेल?
बॅंकेत एक गोरापान, सडसडीत, स्मार्ट पुरुष बसला होता.त्यांच्याकडे दुर्लक्ष करून ती सरळ आपल्या केबिनमध्ये गेली.तिच्या पाठोपाठ त्याला घेऊन तांबे मॅडम आत आल्या.त्या दोघांशी जुजबी बोलून तिने कामालाच सुरवात केली.ते दोघं बाहेर गेल्यावर तिची खास मैत्रीण चित्रा आत आली आणि म्हणाली."हा कशाला आला होता तुझ्याकडे?"तू ओळखतेस? उर्मिलानी विचारलं.अग ह्याची आई घरगुती जेवणाच्या आॅर्डर घेते आणि हा पोचवतो.संध्याकाळी कट्ट्यावर येऊन बसलेला असतो.माझ्या घराजवळच रहातो.उर्मिलाला तांबेंचा प्रचंड राग आला त्याच रागात तिने चित्राला घडलेलं सगळं सांगितलं."लगेच तांबेबाईला बोलाव आणि तुझा नकार कळवून टाक. आज बरेच दिवसांनी आपल्याला नकार द्यायचा चान्स मिळालाय"चित्रा सहज बोलून गेली पण उर्मिला मात्र थोडीशी दुखावली.विषय बदलून ती कामाला लागली.पण चित्रानी सहजच सुचवलेलं मात्र तिने तांबेबाईंवर वापरायचंच असं ठरवलं.पण दिवसभरात कामामुळे तिला वेळच नाही मिळाला.

घरी आल्यावर आईची उत्सुकता तिच्या डोळ्यात दिसत होती.तिला सर्व सांगितल्यावर "कशी ही बाई फोन केलान तेव्हा जणू काही मोठा व्यावसायिक असावा असं वर्णन करत होती."आई रागाने बोलली उमाला मात्र आईला कसं कळलं ते कोडं उलगडलं.
दुसऱ्या दिवशी सकाळी बॅंकेत पोचल्यावर लगेच तांबे मॅडमना आधी आपण नकार सांगायचा असं ठरवूनच ती बॅंकेत आली.पण तांबेंनी डाव साधला आणि तिला दारातच सर्वांसमोर " साॅरी बाई उर्मिला, नकार दिलाय आमच्या वहिनींच्या भाच्यानी! पण चित्रा मात्र तयारीतच होती.तिला कळलं होतं ह्या काय करणार आहेत ते, तिनी लगेच तिथे येऊन "पण मॅडम,उम्मीनी मला कालच सांगितलं होतं माझाच नकार आहे असल्या डबे पोचवणार्‍या उद्योजकाला! आणि मॅडम जरा अशा गोष्टी सर्वांसमोर सांगू नयेत ह्याच भान राहू दे." असं ठणकावून सांगितलं.मॅडम फणकार्‍यात तिथून निघून गेल्या.
"साॅरी उम्मी,हे सर्व सगळ्यांसमोर झालं पण अशा माणसांना हीच भाषा कळते"चित्राने डोळे भरून आलेल्या उर्मिलाला समजावल.
"नको वाईट वाटून घेऊ.मला तर पावलोपावली अशा तांबे भेटतायत.फक्त त्यांचे विचार बदलायला हवेत आणि तुझ्यासारखी मानसिकता तयार व्हायला पाहिजे असं वाटतंय"शांतपणे बोलून उर्मिला केबिनमध्ये गेली.
स्वत:च्या खूर्चीवर बसून तिनं मान मागे टाकली.पंचविसाव्या वर्षांपर्यंतचा वेळ शिक्षण,नोकरीचा शोध ह्यातच गेला.त्यानंतर लग्नासाठी शोध सुरू केला.आणि पत्रिका जुळणं,सावळा रंग, चाळीत असलेलं घर अशा अनेक गोष्टींमुळे नकार यायला लागले.हे सगळं आवडत नसलं तरी आपल्याला लग्न हवंय हेही खरं होतं.पण अचानक बाबाच गेले आणि आपण खूप एकट्या झालो.कारण त्यांच्या पुरोगामी विचारांनी त्यांचा आधार असायचा.ते म्हणायचे"लग्न जितकं आवश्यक आहे तितकच स्वत:ला सिध्द करणं पण गरजेच आहे.उर्मिला भुतकाळातच होती आणि तिच्या बाॅस आल्या त्यांना सगळं कळलं होतं.मायेनी त्यांनी तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि उर्मिलानी दचकून त्यांच्याकडे बघितलं."साॅरी मॅडम"उमा ओशाळून म्हणाली."काही हरकत नाही, बॅंकेच्या कामासाठी बाहेर जायचय, तूच जा.गाडी खाली उभी आहे काम झालं की तिथूनच घरी जा.फ्रेश होशील."बाॅसच्या शब्दांनी उर्मिलाला बरं वाटलं.
घरी आल्यावर दारातच आईनी हसून स्वागत केलं.तिला हसताना बघून उर्मिला म्हणाली"येवढी खूष का?"अग,तुझा फोटो घेऊन गेलेल्या साटमांकडून होकार आलाय.आणि साटमवहिनींनी तुला बघितलय.पत्रिका पण जुळलेय.तेव्हा आता तू काही विचार करू नकोस.उद्या रवीवार आहे त्यामुळे तो मुलगा इथे येतोय आणि तुला बाहेर घेऊन जाणार आहे.उर्मिलाला वाटलं दिवसभराच्या मनस्तापाचा शेवट तरी बरा होतोय.
दुसऱ्या दिवशी चारच्या सुमारास उंच,थोडासा थोराड आणि दिसायला ठीक वाटणारा एक तरुण दारांत उभा राह्यला."नमस्कार मी अक्षय साटम काल आईशी झालेल्या बोलण्यानुसार उर्मिलाला बाहेर न्यायला आलोय.आई थोडीशी गडबडली."बसा तरी.मी चहा टाकते."नको आम्ही आधी शिवाजी पार्क जाणार आहोत.मला काम आहे."अक्षय मोजकच बोलत होता.
चाळीच्या खाली गाडी उभी होती.अक्षयनी स्वत: दरवाजा उघडून उर्मिलाला बसायला सांगितलं.गाडीत बसताना झालेला स्पर्श, उर्मिला मोहरली! तिच्या मनात आलं"आपल्या आयुष्यातला होकार romantic होईल असं दिसतंय!
गाडी शिवाजी पार्क जवळच्या गल्लीत उभी राहिली.गल्ली थोडी सुनसान होती."चल, माझ्या मित्राचं घर आहे".अक्षयनी गाडीतून उतरून तिचा दरवाजा उघडला.लिफ्टनी वर गेल्यावर अक्षयनी खिशातून ब्लाॅकची चावी काढली आणि दरवाजा उघडला.उर्मिला दाराशी थबकली."हे काय घरांत कोणी नाही?उर्मिलानी विचारलं.
‌‌ "आत ये"अक्षयच्या आवाजात कोणतीही भावना नव्हती.आता मागं फिरण्यापेक्षा पुढे जावं ह्या विचारानी उर्मिलानी पाय उचलला आणि त्यानं तिला आंत ओढून पटकन दार बंद केलं.आणि तिला मिठीत घेऊन कानाशी पुटपुटला"होकाराच्या आधी हे सुख ----हे ऐकल्याबरोबर तिने आपली संपूर्ण ताकद लावून त्याला ढकललं आणि दरवाजा उघडून ती बाहेर आली.लिफ्ट अजूनही त्याच मजल्यावर उभी होती.पटकन लिफ्ट मध्ये जाऊन तिने ती सूरू केली.लिफ्टमधून तिला दिसलं की तो बेसावध पडल्यामुळे अजून उठूच शकला नव्हता.

बिल्डिंग बाहेर आल्यावर समोर असलेल्या टॅक्सीत बसून तिनं मोकळा श्र्वास घेतला.वरच्या बाल्कनीत तो उभा असलेला जाणवलं."स्टेशन"टॅक्सी ड्रायव्हरला सांगून तिने डोळे बंद करून सीटवर मान‌ टाकली. केवढी मोठी किंमत मोजावी लागली असती ह्या होकाराच्या नादात!
 आपला 'नकार' सुध्दा ह्याला नाही कळवायचा.
खिडकीतून येणारी हवेची झुळुक मात्र त्या अनपेक्षित स्पर्शाची, अंगभर पसरलेल्या त्या गंधाची आठवण करून देत होती.
ललिता छेडा

Thursday, September 13, 2018

स्वल्पविराम


आजोबांना असं चिडलेलं राधानी कधीच पाहिलं नव्हतं.चिडण्यापेक्षा त्यांची चिडचिड होत होती ते जाणवतं होतं.त्यांच जुनी गाणी गुणगुणत आजीला चिडवणं,स्वैपाकघरात आईच्या मागे मदतीच्या नावाखाली लूडबूड करणं सगळंच थांबलं होतं.आजोबा म्हणजे घरातलं चैतन्य होतं.राधाला आठवलं आता जरी गौरीताई सासरी गेली असली आणि अभिदादा शिक्षणासाठी पुण्याला गेला असला तरी त्या तिघांचे आजोबा जवळचे मित्र होते.
पण गेल्या वर्षी गणपती झाल्या झाल्या त्यांचा बंगला आणि बंगल्या मागचा प्लाॅट विकासासाठी बिल्डरला दिला तेव्हाच असं नक्की झालं होतं की त्यांचा बंगला पुढे आणि मागच्या असलेल्या जागेत बिल्डींग!!!पण त्यांचा बंगला आधी आणि बिल्डींग नंतर बांधायचे मुख्य कारण म्हणजे गणपती नवीन घरीच यायला हवेत असा आजोबांचा हट्टच होता.कारण त्या जागेवर सर्वप्रथम त्यांच्या पंणजोबांचा वाडा होता.नंतर तिथे त्यांच्या आजोबांनी बंगला बांधला आणि आता हा नवीन पिढीच्या सोयीसुविधा जाणून बांधला जाणारा बंगला!! आणि पिढ्यानपिढ्याचा गणपती इथेचआणला गेला पाहिजे असा आजोबांचा आग्रहच होता.पुन्हा बिल्डरनी तात्पुरती वर्षभरासाठी दिलेली जागा पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरचे छोटे ब्लाॅक होते.तिथे गणपती आणणं जिकीरीचं होणार होतं.गेलं वर्षभर काम खूप पटापट झालं होतं पण पावसाळा सुरू झाला आणि काही ना काही तरी कारणांमुळे काम रखडायला लागलं.आणि बिल्डरनी मागच्या बाजूच्या बिल्डींगच काम पण सूरू केलं. होतं.त्यामुळे तिथे खूप लोखंड, सिमेंटचा पसारा पडला त्यामुळे राधाच्या बाबांना कळलं होतं की गणपती पर्यंत बंगला होणं शक्य नाही.पण आजोबांना हे सांगायचं कसं? त्यासाठी त्यानी राधाच्या आई आणि आजीला सांगून नारळी पौर्णिमेला आजोबांच्या धाकट्या भावाला म्हणजेच सदाकाकाला आणि बहिण माईआत्याला जेवायला बोलावलं.राधाला सगळ्या लपवालपवीची भारी मज्जा येत होती.
तिला वाटलं आजोबा तर किती समजूतदार आहेत. ही मंडळी उगीचच घाबरताहेत! तिला आठवलं ती गेल्यावर्षी ऐन बारावीच्या परीक्षेवेळी खूप आजारी पडली तेव्हा आई खूप अपसेट झाली होती आणि ती परीक्षेला बसूच शकली नाही.तेव्हा आजोबा किती छान बोलले होते"अग,हा तिच्या आयुष्यातला 'स्वल्पविराम' आहे असं समज काही आभाळ कोसळल नाही!वेगळा पर्याय मिळणार असेल म्हणून ती आजारी पडली अस समज! एका वर्षाच्या स्वल्पविरामानी ती त्या काळात करीअरबद्दलच्या पर्यायांचा विचार करेल.आणि ते १००टक्के खरं ठरलं होतं,तिनी वर्षभरासाठी लावलेला अॅनिमेशनचा क्लास तिला खूप इंटरेस्टिंग वाटत होता.
"आजोबा हा सलपविराम काय आहे"असं आपण विचारल्यावर ते म्हणाले होते "काॅमा."आणि मराठीतला उच्चार नीट करून दाखवला होता.त्यानंतर लग्नाला वर्षच झालेली ताई अचानक बॅग घेऊन आली आणि पुन्हा एकदा आई,आजी काळजी करू लागल्या होत्या.आणि ताई तर अगदी सहजच आलेय म्हणत होती.आजोबांनी आई, आजीला ताई बाहेर गेली असताना सांगितले"शांत रहा ती चार दिवसांत परत जाईल, नाही तर तिचा नवरा तिला घ्यायला येईल, किंवा कारण गंभीर असेल तर त्यांचा फोन येईल. राहू दे तिला इथे!मिळू दे तिला वेळ विचार करायला.पण चौथ्याच दिवशी तिचा नवरा तिला घ्यायला आला.आणि राधानी हांक मारून"आजी जिजू आलेत आणि आजोबा तुमचा स्वल्पविराम सक्सेसफुल! असं हसत हसत सांगितलं होतं आणि अशा आजोबांना ही मंडळी उगीचच चुकीचं समजताहेत असं राधाला खात्रीपूर्वक वाटत होतं.
ठरल्याप्रमाणे आत्या,काका आले आणि जेवणं झाल्यावर आत्या म्हणाली"झाला का नवीन बंगला तयार, कधी होताय शिफ्ट?त्यावर राधाचे बाबा पटकन म्हणाले"नाही ना, बहुतेक गणपती ह्यावेळी काकांकडे आणावे लागतील! आणि त्याबरोबर आजोबा उसळून म्हणाले"अजिबात चालणार नाही.त्याच वास्तुत गणपती आणण्याची आपली परंपरा आहे.ती तशीच चालू राह्यली पाहिजे.दोन्ही घरच्या माहेरवाशिणी चार दिवस रहायला येतात. सगळ कस जमेल तिथं?उद्या पासून मीच लक्ष घालतो बांधकामात.तेवढ्यात आजी म्हणाली"अहो सदाभाऊजी पण तुमचा सख्खाभाऊच आहे की मग त्यांच्या घरी का नाही चालणार गणपती? आणि त्यांच्या समोरचा ब्लाॅक आहे ना रिकामा किल्ली असतें त्यांच्या कडेच! का त्यांची नातसून गुजराती आहे म्हणून नाही म्हणताय!आजीनी आजोबांच्या रागात चांगलच तेलच ओतलं होतं.तेव्हापासून आजोबा कोणाशीच बोलत नव्हते.त्यात पुन्हा त्यांनी चार दिवस साईटवर जाऊन प्रयत्न पण केला त्यात पण ते अयशस्वी झाले होते.भरलेल्या घरात उगीचच एकटे झाले होते.
गणपती यायच्या दोन दिवस आधी आजी तयारीसाठी तिकडे जायला निघाल्या."तुम्ही कधी येणार आहात? असं आजोबांना विचारल्यावर "मी फक्त प्राणप्रतिष्ठेच्या वेळी येईन"असं तुटक उत्तर त्यांनी दिलं."आजी मी आजोबांबरोबर"राधानी आपली पार्टी जाहीर केली.आणि आजोबांच्या चेह-यावर थोडं हसू आलं.
आजी तिथे पोचल्यावर तासाभरात सदाआजोबांची नातसून उर्मि आली.आल्याआल्या आजोबांच्या पाया पडली आणि म्हणाली"दादाजी, मी तुम्हाला न्यायला आली आहे.आपल्या घरी बाप्पा येणार तेव्हा आम्हा सर्वांना तुम्ही हवातच! मी असं मानते की बाप्पानीच हा आम्हाला मान दिला आहे.पण तुमच्याशिवाय तुमच्या भावाला हा आनंद कसा घेता येईल?उर्मि तिच्या लहजात मराठी बोलत होती.आजोबा तिच्या कडे बघून हसले आणि राधाला म्हणाले
"राधा,चल माझी तुझी बॅग भरूया"
"आजींनी तुमची बॅग भरून ठेवलीय"उर्मि हळूच बोलली.
"माझी‌तर कधीच तयार आहे."राधा हसली.
आजोबांच त्या घरी मस्त स्वागत झालं. सदाकाकाचे डोळे आनंदाने भरून आले होते.बाप्पांच मखर उर्मिनी साड्यांचे गोफ करून बनवलं होतं.उर्मिच्या आई त्यांच्या पध्दतीचे लाडू घेऊन आल्या होत्या.त्या लाडवांना त्यांच्यात मोदक म्हणतात हे पण आवर्जून सांगत होत्या.
"चला राधाताई अर्धविराम देता देता आपला बंगला,सदाकाकाच घर ह्यातून हे घर निवडून तुमच्या आजोबांनी स्वल्पविरामाच्या कथेला छानसा पूर्णविराम दिला."आजी हसत हसत म्हणाल्या.
दुसऱ्या दिवशी बाप्पांना आणायला जायचं म्हणून आजोबांनी टोपी घातली.आणि राधाला"चल की तू पण! म्हणाले.राधानी "एका अटीवर येईन,मला सांगा इतके हट्टाला पेटलेले तुम्ही इतक्या सहजपणे कसे इथे यायला तयार झालात?
"असं बघ, मी तुला मराठी पुस्तक वाचायला दिली तेव्हा तुला विरामचिन्हे आली की कधी थांबायचं, प्रश्र्नचिन्ह कसं वाचायच, कधी शब्दांवर जोर द्यायचा हे शिकवलं होतं.
आयुष्य जगताना पण पुस्तकासारख वाचलं की जाणवतं "जगाला बदलायला जाण्यापेक्षा स्वत:लाच बदलण योग्य असतं"त्यामुळे ह्या वयातलं जगण सोप्पं होऊन जातं.आजोबा भारावून बोलत होते.
"मिळालं का उत्तर,चला मग गणपती आणायला"राधानी आजोबांकडे अभिमानाने पाह्यलं.
मागे उभ्या असलेल्या आजींचा हात हातात घेऊन उर्मिनी तो हलकासा दाबला.
ललिता छेडा


Thursday, September 6, 2018

गच्चीतली खोली


आईचा हात धरून सकाळीच चिन्या भांडूप मधल्या वसाहतीत आला.कमानीतून आत गेल्यावर दोन चाळीसोडून तिसऱ्या चाळीच्या तळमजल्यावर जिन्याजवळच्या खोलीबाहेर आईनी नुकतच लग्न केलेले सदाशिव काका उभे होते.त्यांना येताना बघून चाळीतली मंडळी बाहेर आली होती.चिन्या त्याच्याच वयाच्या एका मुलाकडे बघून हसला. त्याबरोबर त्याच्या आईने त्याला खसकन ओढून घरात नेलं.पण तो मुलगा आईचा हात झटकून चिन्याजवळ आला आणि त्याचा हात धरून म्हणाला 'फ्रेन्ड' चिन्या खूष झाला! तो मुलगा हसून पळाला कारण त्याच्या आईनी त्याला रागाने'मनीष'घरी ये' अशी हाक मारली होती.चिन्याला वाटलं चिन्या,मन्याची जोडी जमली की!तो घराकडे जायला वळला,आई‌ तर आंत गेली होती.काका दारातच उभे होते.चिन्या घरात येतोय असं बघून ते त्याला थोडंसं अडवूनच म्हणाले"चिन्मय,जा जरा चाळीत फिरून ये.वरती गच्ची आहे जा पळ बघून ये.आणि येवढं बोलून त्यांनी पटकन दरवाजा बंद केला.चिन्याला जाम राग आला त्याने आईला हाक मारली पण आतून काहीच आवाज आला नाही.तो रडवेला होऊन जिन्यात बसला.थोड्या वेळानी त्याला वाटलं"गच्चीवर जाऊन तर बघूया नाही तरी इथे त्याला येणारे जाणारे बघतच होते.त्याला आईचा पण राग आला होता.तिरमिरीत तो उठला आणि त्याला पाठीवरची त्याची बॅग कुठे ठेवावी तेच कळेना! शेवटी बॅगसकटच तो जिना चढू लागला.गच्चीच दार उघडच होतं.त्यानी डोकावून पाहिलं तर त्याच्या आजीच्या वयाच्या कोणीतरी तिथे बसलेल्या दिसल्या.त्याची चाहूल लागताच त्या वळल्या आणि ‌म्हणाल्या"कोण रे तू? आणि इथे काय करतोयस?"मी चिन्मय"चिन्या चाचरत म्हणाला."कोण?"उन्हाने येणार्‍या तिरीपीला हातानं डोळ्यावर अडवून आजींनी विचारलं."अगबाई, रूक्मिणी आली वाटतं,अगदी आईसारखा दिसतोयस!चिन्याला वाटलं ह्या आजी आईला कशा ओळखतात?त्याच्या चेहऱ्यावरचे भाव ओळखून त्या म्हणाल्या"अरे लग्नाआधी तुझी आई इथे येऊन गेलीहोती तेव्हा मला भेटली होती.बाळा मी सदाच्या शेजारीच रहाते हो!.अरे पण तू गच्चीवर का आलास?"चिन्या रडवेला होऊन म्हणाला"त्या काकांनीच पाठवलं.आजींनी कपाळाला हात लावला.आणि त्याचा हात धरून गच्चीच्या कोपऱ्यात असलेल्या खोलीत घेऊन गेल्या.ठेव इथे सामान आणि बैस तिथं त्या मोडक्या सोफ्यावर!चिन्याला खोली खूप आवडली होती.मागच्या भिंतीवर दोन छोट्या पण खिडकीत बसू शकता येईल असे कट्टे असलेल्या खिडक्या होत्या.खिडकीतून मागचा रस्ता स्वच्छ दिसत होता.इतक्यात चिन्याचा नवीनच झालेला मित्र मनीष आला."अरे वा!खोली उघडी कशी?अच्छा माई इथेच आहेत म्हणून गच्ची,खोली सगळं उघडलय!माई पापड वाळवता आहात का? मनीष बडबड करत खिडकीत जाऊन बसला.चिन्याला कळलं की ह्या आजींना सगळे माई म्हणतायत.
इतक्यात त्याला आईच्या हांका ऐकू आल्या"चिन्या, चिन्मय अरे कुठे आहेस?"तो धावत जिन्यापाशी गेला आणि आईला बघून रडायलाच लागला.आई डिश मध्ये काहीतरी घेऊन आली होती.चिन्याला जाणवलं आपल्याला भूक लागलीय."रडू नकोस आता, खाऊन घे.किती शोधलं तुला पार रस्त्यावर जाऊन आले.तेव्हा कोणीतरी म्हणालं'तुला गच्चीवर जाताना पाह्यल म्हणून'आई उपमा घेऊन आली होती.चिन्या आईला घेऊन खोलीत आला.तिथे मनीष आणि माई सोफ्यावर बसून बोलत होते.चिन्यानी थोडा उपमा मित्राला दिला.
त्या दोघांना खाताना बघून माईनी रूक्मिणीला बाहेर बोलावलं.दोघी खोलीच्या बाहेर माईंच्या वाळवणां जवळ असलेल्या सिमेंटच्या कट्ट्यावर बसल्या.कशी आहेस? माईंनी आपुलकीने चिन्याच्या आईला विचारलं."चिन्यासाठी अक्षरशः डोळे मिटून हे लग्न केलय खर पण पुढे काय होईल त्याचा विचारही करवत नाहीय! हे आता नोकरी सोड असं म्हणताहेत! मला नाही सोडायचीय कारण त्या पैशातून मी चिन्याचा खर्च करू शकते"रूक्मिणीतली आई बोलली."अजिबात नको सोडूस चांगली असलेली नोकरी! माईंनी तिचा हात धरुन म्हटलं"मी तुला सांगितलंय ना त्या सदाची पहिली बायको ह्याच्या शरीरसुखाच्या अति हव्यासापोटी कशी टी.बी.होऊन गेली ते.अतिशय छळलं त्यानी ह्या एका गोष्टीवरून त्या माऊलीला."हे सगळं रूक्मिणीनी एकदा ऐकलं होतं आणि सदाशिवला नकार पण दिला होता.पण सदाशिव तिच्या आॅफिसवर येऊन तिला समजावून गेला होता.माईंनी सांगितलेलं तिनं स्पष्टपणे त्याला विचारलं होतं.हे सगळ ऐकल्यावर माईंनी तिला डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला.
माई,चिन्याच्या बाबाची पण खूप इच्छा होती की मी ही नोकरी सोडू नये.त्यांच्या हट्टामुळेच मी नोकरी धरली होती.खूप सुखाचा संसार होता आमचा आणि ‌चिन्मय तर त्यांचा खूप लाडका होता.पण कॅन्सर झाला म्हणेपर्यंत सहा महिन्यांत तो गेलाच.आणि आमच्या हालाला सुरवात झाली.भाड्याच घर सोडून मला आईकडे येऊन रहावं लागलं.तिथे आई होती तोपर्यंत चिन्याची काळजी घेत होती पण सहा महिन्यांपूर्वी आई गेली आणि चिन्याचे त्याची मामी खाण्यापिण्याचे खूप हाल करू लागली.ती त्याला मारते असं शेजारचे सांगत.विचारल तर ती कांगावा करायची.आॅफिसातल्या मैत्रिणीनी हे स्थळ सुचवलं आणि मी खूप विचार करून चिन्मयसाठी होकार दिला."रुक्मिणीच शेवटच वाक्य चिन्यानी ऐकलं आणि तिच्या जवळ येऊन"चल खाली घरी जाऊया म्हणाला.मन्या,माई सर्वचजण खाली निघाले.जिन्यात दोन्ही पोरं "तू कितवीत? कोणती शाळा असं बोलत होती.दोघेही आठवीत गेले होते.फक्त चिन्या मराठीत आणि मनीष इंग्रजी माध्यमात होता.
घरी आल्यावर चिन्यानी हळूच आईला विचारलं"ते काका कुठे आहेत? अरे इथे जवळच त्यांच स्टेशनरीच दुकान आहे.सकाळी साडेनऊला दुकान उघडतात दुपारी जेवायला येतात आणि मग रात्री नऊ वाजता घरी येतात."आई मी गच्चीतल्या खोलीत छोपू! रुक्मिणीनी चमकून त्याच्याकडे बघितलं "ह्यानी माईंशी बोलताना ऐकलं तरी नाही?"पण त्याच्या डोळ्यांतले भाव बघून मात्र तसं काही वाटत नाही.
"का रे"रुक्मिणीनी विचारलं.
"मी झोपलो तर मनीष पण येईल सोबतीला, असाही तो गॅलरीतच झोपतो"चिन्या.
"माईंना विचारायला हवं"रूक्मिणीनी टाळायचा प्रयत्न केला."आम्ही विचारलंय"चिन्या तयारी तच होता.कधी विचारलत?तू ग,च्चीत इकडे तिकडे फिरत होतीस ना तेव्हा!!
"ठीक आहे"रूक्मिणीचे शब्द पूर्ण व्हायच्या आत चिन्या माईंकडे किल्ली घ्यायला गेला.
त्या रात्री चिन्याला झोप नाही लागली पण ‌मन्या मात्र गाढ झोपला होता.सकाळी आई उठवायला आली तेव्हा नुकतीच त्याला झोप लागली होती."चिन्या आठची शाळा आहे तयार व्हायचय ना! आईच्या आवाजानी त्याला सुरक्षित वाटलं.
नंतर ती खोली चिन्मयच विश्र्वच झालं.खोलीसमोर एक जांभळाच झाड होतं.त्यावर येणारे पक्षी,खारी त्याचे मित्र झाले होते.आजुबाजुच्या चाळीतल्या मुलांनी पण यायला सुरुवात केली होती.एकत्र अभ्यास सुरू झाला होता.ह्यासगळ्यामुळे गच्ची उघडी रहात होती.घरी रियाज करू शकत नसल्याने चाळीतल्या निलीमाताई पहाटे गच्चीवर येऊन गायला लागल्या होत्या.मन्यानी कुठुनतरी कॅरम मिळवला होता.रात्री कॅरमच्या मॅच सुरू झाल्या.संपूर्ण एरियात गच्चीवरची ती खोली एक आनंददायी जागा झाली होती.चिन्यानी गच्चीभर झाडं लावली होती.इयत्ता आठवीत असलेला एक छोटासा चिन्या आपल्या स्वभावाने बारावीची परीक्षा देणारा चिन्मयदादा सर्वांचाच लाडका झाला होता.एकट्या रहाणार्‍या माईंना चिन्याच्या रूपानी जगण्यासाठी आनंदाचं निधानच सापडलं होतं.
रूक्मिणीला पण चिन्मयला आनंदात बघून आपला निर्णय योग्य होता ह्याचं समाधान वाटायचं. सदानंद पण तिच्या शिस्तबद्ध आणि सकारात्मक वागणूकीनी तिला घाबरूनच होता.रुक्मिणीला हे मात्र नक्की वाटायचं एका गच्चीतल्या खोलीनी, एका वास्तुनी तिच्या आयुष्यातले अनेक प्रश्र्न सहज सोडविले होते.
                                                                                                                                                             ललिता छेडा.