Thursday, June 28, 2018

दखल

      आईची चाहूल लागल्याबरोबर राधा पांघरूण बाजूला सारून उठली.तशी तिला रात्रभर झोप लागलीच नव्हती.आईला मागून मिठी मारुन ती म्हणाली"गुड मॉर्निंग माय स्वीट आई"उगीच लाडात येऊन मस्का नको मारु" नलुताई हळूच म्हणाल्या"आणि इतक्या लवकर कशी उठलीस! का झोपच नाही आली?
आई, मीराताईला बाबांनी बोलावलय ना आज?राधानी विचारल. पण येवढ्यात मागून आत्याचा आवाज आला"इतक्या सकाळी मायलेकीची काय कुजबुज चाललीय?काम नाहीत का,चहा टाका सगळ्यांचा!आत्याच्या आवाजातली जरब ऐकून नलूताई ओट्याशी गेल्या.
‌. आईला भेदरलेली बघून राधाला वाटल आज वेळेवर बोलेलना ही! कि अशीच घाबरून जाईल?राधानी थोडस रागानी आत्याकडे बघितल.
नलुताईंची रोजची कामं सुरू झाली पण मन मात्र भूतकाळात गेलं.आज तीस वर्षं होतील आपल्या लग्नाला! किती आनंदात होतो आपण असा मोठा वाडा, दोन दिर, दोन नणंदा ,सासू सासरे,अस भरलेल पुण्यातल घर आपल्याला मिळाल म्हणून! कोकणातल्या छोट्या गावात मामाकडे लहानाची मोठी झालेल्या नलूला पुण्यात स्वतःच साड्यांच दुकान असलेल्या मांडक्यांच स्थळ आल आणि मामीनी लगेच लग्न उरकून घेतल.
लग्नानंतर चार दिवसांतच नलूला कळल कि संतापी नवरा आणि करड्या शिस्तीच्या सासूबाईंनी आपल्याला घरकाम करण्यासाठीच आणल आहे.त्यात तिला दोन्ही मुलीच झाल्या त्यामुळे मुलींच्या बाबांना रागाला अजून एक कारण मिळाल.
घरातली लग्नकार्य, सणवार करता करता नलूताईंना स्वतःच आयुष्यच उरल नाही.त्यात पुन्हा मोठी नणंद लग्नानंतर वर्षभरातच माहेरी परतली. तिच्या येण्यानी सासुबाईंनी सगळी जबाबदारी लेकीवरच टाकली आणि इतक्या मोठ्या भरलेल्या घरात नलूताई एकट्या होऊन गेल्या.पण मुली जशा मोठ्या होऊ लागल्या त्यांना आईची घुसमट समजू लागली.त्यातही मोठी मीरा त्यांच्या सारखी बाबांना घाबरत होती पण राधा मात्र पहिल्यापासून बंडखोर!
मुली मोठ्या होऊ लागल्या आणि नलुताईंची काळजी वाढू लागली. मीरानी घरातल्यांनी जिथं ठरवल तिथे लग्न केल.सुदैवानी तिला सासरही चांगल मिळाल.
‌. राधानी मात्र आपल लग्न आपणच ठरवल्याच बाबांना सांगितल आणि घरात वादळच उठलं.
बाबांनी सर्वांना एकत्र बोलावून घेतलं आणि मीराला पण यायला सांगितलं ती आपल्या सासूबाईंना घेऊन आली.
विषयाच्या सुरवातीलाच बाबांनी"हे बघ राधा आम्ही ठरवू तिथेच तू लग्न करायच आहे . तुझी मनमानी चालणार नाही..'अस म्हटलं. राधानी आईकडं बघितल 
हे बघा राधानी ठरवलेल्या मुलाशीच तिच लग्न व्हाव अशी माझी इच्छा आहे"तीस वर्षांनी संपूर्ण घरापूढे धाडसानी बोलायची हिंमत आपल्यात कुठून आली अस नलूताईंना वाटल, त्यांना हेही माहित होतं कि आजची संधी घेतली नाही तर मुली आपल्या पासून दुरावतील.त्यामुळे राधाचा हात घट्ट धरून त्या म्हणाल्या"राधानी पसंत केलेल्या मुलाला मी भेटले आहे मुलगा चांगला, उच्चशिक्षित, कर्तृत्ववान आहे जातीपातीचा मी विचार करत नाही.
राधाचे बाबा संतापाने थरथरत उभे राहिले आणि म्हणाले"तू मुलाला कुठे भेटलीस?
माझ्या घरी!मीरा शांतपणे म्हणाली.बाबा,मीच राधाच लग्न माझ्या घरी लावून देणार आहे.आई त्या लग्नाला येणार आहे.तुमच्या स्वभावाला अनुसरून तुम्ही जर 'लग्नाला गेलीस तर घरात घेणार नाही'अस म्हणालात तर मी आईला आयुष्यभर सांभाळीन, आणि हे मी माझ्या सासूबाईं समोर बोलतेय तेव्हा माझ सासर माझ्या पाठीशी उभ आहे हे तुम्हाला कळलंच असेल! किंबहुना आईला ही हिंमत त्यांनीच दिली आहे.एकट्या पडलेल्या बाबांकडे बघवत नव्हत 
नलूताईंना मात्र अश्रु आवरत नव्हते.आपल्यातुनच उमललेल्या ह्या दोन कळ्यांनी आपल्या घुसमटीची दखल घेतल्याने मिळालेल्या मोकळ्या श्र्वासाचे ते आनंदाश्रु होते.   

Thursday, June 21, 2018

स्पर्श

मीनल,माझी जवळची मैत्रीण! एका मोठ्या अपघातातून बचावली होती. रस्त्याच्या कडेने चालणा-या
तिला बेदरकारपणे वेगाने जाणाऱ्या कोणीतरी उडवल होत. आणि गेले पंधरा दिवस ती मृत्यूशी अक्षरशः लढत होती. पण डाॅक्टरांची अफाट मेहनत आणि सर्वांच्या शुभेच्छांमुळे धोका टळला होता. आता फक्त काळजी घ्यायची होती. जी आम्ही मैत्रिणी, नातेवाईक आळीपाळीने घेणार होतो. त्यानुसार तीन दिवस मी दिवसभर तिच्या जवळ बसणार होते.
मीनलची खोली खूपच छान, हवेशीर होती. समोर मोठ्या खिडक्यांजवळ एकच पेशंट होती. खिडकी शेजारी मोठा सोफा होता. जिथे बसल्यावर खालचा वाहता रस्ता दिसत होता. मीनलला झोप लागली होती, त्यामुळे मी सोफ्यावर बसून पुस्तक वाचायला लागले. समोरची पेशंट पण वाचत पडली होती मी तिच्याकडे बघून हसले पण तिनी जाणीवपूर्वक लक्ष नाही अस दाखवल.चाळीशीच्या आसपास असलेली ती अजिबात पेशंट वाटत नव्हती. व्यवस्थित बांधलेले केस,रंगवलेली नख,हलकी लिपस्टीक!मला गंमत वाटली.
त्यानंतर सकाळी दहा ते एक भेटण्याची वेळ असल्यामुळे येणाऱ्यांशी बोलण्यात वेळ कुठे गेला कळलच नाही.
जेवण झाल्यावर मीनल झोपली मी पण सोफ्यावर पडले होते तेवढ्यात कण्हल्याचा आवाज आला बघितल तर ती पेशंटच कण्हत होती मी तिच्या जवळ गेले आणि तिच्या डोक्यावर हात ठेवला, तिनी डोळे उघडले! तिला खूप ताप होता,डोळ्यातून पाणी येत होते. मी जरा डोकं दाबल, तळपाय घासले,नर्सला बोलावल, डॉ. पण आले मी हळूच त्या नर्सला विचारल 'काय होतय हिला?अहो असाच खूप ताप येतोय सगळ्या तपासण्या झाल्या पण निदान होत नाहीय रोज रात्री ताप येतोय आज दुपारीच आला. औषधानी ताप उतरला आणि तिला झोप लागली. ती उठल्यावर मी तिच्या साठी काॅफी मागवली तिनी पण निमुटपणे प्यायली.आता माझी घरी जायची वेळ झाली होती. जाताना तिचा हात हातात घेऊन मी म्हटल'काळजी घे,मी आता उद्या येईन.' तिनी हात घट्ट धरून ठेवला. दगडाला पाझर फोडण्यात बहुतेक मी यशस्वी झाले होते.
दुसऱ्या दिवशी सकाळी मी आल्याबरोबर ती काॅटवरून उतरून माझ्याकडे आली.माझा हात हातात घेऊन घेऊन म्हणाली"thanks,काकू काल तुम्ही माझ्या डोक्यावरून हात फिरवला आणि मला माझ्या आईची आठवण झाली.तिचे डोळे भरून आले होते."अग किती ताप होता तुला! मी काळजीने म्हटल.हो काकू कळत का नाही का येतोय! अचानक मला जाणवल काल पासून हिला भेटायला कोणीही आल नाहीय. त्यामुळे स्वभावाप्रमाणे तिला विचारल'घरी कोण आहे'? "कोणी नाही" तिनी शांतपणे उत्तर दिल. पांच वर्ष झाली आई गेली!छोट्याशा कारणांनी भावाशी भांडण झालं तेव्हा पासून त्याच्याशी संबंध नाहीत. ती मोकळेपणाने बोलत होती. मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीत नोकरी करते मी काकू माझी करीअर,माझी नोकरी, माझा पैसा हे सगळ माझ्या एकटेपणावर मात करेल असा मला वाटायचं पण कालचा तुमचा मायेचा स्पर्श मला खूप काही शिकवून गेला. तो स्पर्श नाही मी विकत घेऊ शकणार!
अनोळखी व्यक्तीवर इतक प्रेम करण माझ्या साठी कठीण होत.
इतक्यात मीनलला भेटायला येणा-यांची वर्दळ सुरू झाली. दुपारी जेवण झाल्यावर मी तिला म्हटलं 'तुझ्या भावाचा नंबर दे'तिनी पण खळखळ न करता दिला. भाऊ तर इतका छान बोलला आणि म्हणाला"मी येतो संध्याकाळी!
आम्ही दोघी संध्याकाळची वाट बघू लागलो. मीनल पण आमच्यात सहभागी झाली. त्या छोट्याश्या खोलीत सुंदर बदल घडत होता!
भाऊ आला बरोबर वहिनी आणि अडीच-तीन वर्षाची गोड मुलगी पण होती. आल्याआल्या त्या छोटीनी त्या खोलीचा ताबाच घेतला. भावानी छोटीला सांगितल ही तुझी आतू!त्या चिमुरडीनी तिला 'आतू' म्हणून गालाला हात लावला. आत्या खूष!! मंडळी गेल्यावर थोड्यावेळाने मी पण निघाले. तिच्याकडे बघत मी म्हटलं'आज रात्री ताप येणार नाही अस मनाशी नक्की ठरव. तिनी मला घट्ट मिठी मारली आणि माझा हात तिच्या डोक्यावर ठेवला. विनाकारण स्वतःभोवती विणलेल्या एकटेपणाच्या कोषाला तिच्याच स्पर्शानी तिनी उघडला होता. एका स्पर्शानी केलेली जादू अविश्वसनीय होती.



Thursday, June 14, 2018

उर्जा

        
     


  आमच्या घराच्या बाजूला थोडीशी मोकळी जागा आहे.त्या जागेच्या कोपऱ्यात एक मोठं पिवळ्या रंगाची फुले असणार झाड आहे.त्याला मी पिवळा गुलमोहर म्हणते.झाड आमच्या कंम्पाॅउडच्या भिंतीला टेकूनच आहे त्यामुळे झाडावर येणारे पक्षी, त्यांची घरटी बाहेर अंगणात आले कि सहज दिसतात.शिवाय मी झाडाच्या खाली कट्ट्यावर पक्ष्यांसाठी पाणी ठेवते. येणाऱ्या पक्षांशी ओळखही झाली आहे.एक कावळा ज्याच्या मानेवरचा ग्रे रंग पंखांपर्यंत उतरलेला आहे त्याची तर रोजचीच फेरी असते.गेल्यावर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला तोच कावळा कट्ट्यावर बसून मान वाकडी करून वेगळाच आवाज करु लागला.जणू कोणाला तरी साद घालत होता. आणि थोड्याच वेळाने कावळीण ही आलीच! तिनेपण त्याला आवाजाने प्रतिसाद दिला.बघताबघता त्या दोघांचा रोमान्स सुरू झाला. आणि त्या झाडावर घरटं बांधण सुरू झालं दोन चार वेळा हवेनी,वा-यानी ते पडत होतं ते बघून मला मदत करावी अस वाटल. शेवटी एकदाच ते बांधून झालं.प्राण्यांच्या सृष्टीतले निर्मितीचे आविष्कार बघून गंमत वाटत होती.थोड्या दिवसांनी तिथे पिल्लांचा चिवचिवाट ऐकू येऊ लागला.तो कावळा थोडे दिवस घरट्याच रक्षण करत होता. अचानक तो दिसेनासा झाला.कावळीण मात्र प्रेमानी पिल्लांना सांभाळत होती.तिला कोणी 'परित्यक्ता' म्हणून हिणवत नव्हते! महिन्याभरात पिल्ल येऊन फांद्यांवर नाचू लागली. आणि एक दिवस अचानक उडून गेली.पाऊस पण खूप पडत होता आणि त्यामुळेच बहूतेक तो कावळा दिसत नव्हता पण कावळीण पिल्ले उडे पर्यंत त्यांच्या अवतीभवतीच होती वाटलं प्राण्यांच जग किती अलिप्त असूनही सुंदर आहे.माणसांसारखी जगण्याला लेबल नाही लावत.
          त्यानंतर ह्या उन्हाळ्याच्या आधी एका संस्थेतर्फे ती मोकळी जागा स्वच्छ करण्यात आली. आणि त्यांनी त्या माझ्या एकट्या झाडाखाली दोन बांक ठेवली आजूबाजूला झाड लावली.त्यांच्या कामाला 
मनापासून दाद दिली.त्या उदास वाटणा-या जागेवर सकारात्मक उर्जा निर्माण झाली होती.ह्या वर्षी माझा पिवळा गुलमोहर थोडा ज्यास्तच बहरला!
        झाडाखालच्या बेंचवर तरूणांच्या सेल्फी सुरू झाल्या. ज्येष्ठांच्या भेटीगाठी होऊ लागल्या.
         पावसाची चाहूल लागली आणि पहिला पाऊस पडला! आणि माझ्या ओळखीचा कावळा कट्ट्यावर बसून मान वाकडी करून साद घालू लागला.
          अरे, सृष्टीच्या सृजनाचा सोहळा सुरू झाला की!   

Thursday, June 7, 2018

गृहीत

                         
हुश्श करुन मामींनी सामान खाली ठेवल आणि कुलुप काढायला लागल्या. त्यांना तस दमलेल बघून मी पुढे झाले “मामी द्या इकडे किल्ली, मी उघडते दार आणि सामानही ठेवते घरात” “अग, राहू दे. हल्ली किल्ली लावायला दिसत नाही आणि ऊन किती आहे. डोळ्यासमोर अंधारल”.”तुम्ही कश्या आलात पुण्याहून” घरात गेल्यावर मी विचारल. “सकाळच्या ट्रेननी दादरला उतरले आणि लोकल पकडून आले”. मामी थकून खुर्चीवर बसल्या. “सामान घेवून?” मी कपाळाला हात लावला. “अग करतात मदत म्हातारी बघून” मामी हसत म्हणाल्या. “तुम्हाला न्यायला तर तो भाचा गाडी घेवून आला होता मग सोडायला नाही आला तो?” मी थोडस चिडूनच म्हणाले. “अग नव्हता त्याला वेळ” मामी केविलवाण्या म्हणाल्या!. अस नसत मामी, गरज संपली  की असच वागतात माणस. कितीवेळा सांगितलय मी तुम्हाला नका जाऊ अशा कोणी मदतीला बोलावल तर. मी कळकळीने बोलले पण मला माहित होत की पुन्हा कोणी बोलावल की मामी जाणार!! मामी माझ्या सख्या शेजारीण त्यांचा एकुलता एक मुलगा अमेरीकेत सेटल झालाय. आणि बॅंकेत दर महिन्याला पैसे पाठवले की आईसाठीच कर्तव्य पूर्ण झाल अस गृहीत धरण्यातला एक आहे. मामांच्या अचानक मृत्युमुळे एकट्या झालेल्या मामींना कोणालाही नाही म्हणता येत नसे. ह्यावेळी मात्र मामी खूप थकलेल्या जाणवत होत्या.
       “खर आहे तुझं” मामींच्या डोळ्यात पाणी तरळल होत “एकट्या रहाणाऱ्यांना फार गृहीत धरतात लोकं. एकटीला कसली काम, कसले खर्च अस म्हणतात. पण म्हणून आम्ही तुमच्या घरची काम करावी अशी अपेक्षा नका ना करू!!” मामी बोलत होत्या आणि वाटल एकटेपणाशी खंबीर लढणाऱ्या ह्या स्त्रियांना गृहीत धरल तर त्यांना जास्त दुःख होत!! आयुष्याच्या माळरानावर एकाकी चालताना रस्ता कधी कुठे संपेल हे माहित नाही अश्या परिस्थीतीत प्रेमाचा ओलावा शोधणाऱ्या मामींसारख्या स्त्रियांना दोन शब्द प्रेमांचे देखील नक्की बळ देतात.