Tuesday, December 29, 2020

नवे वर्ष, नवे संकल्प...

         सगळ्या जगाच्या जगण्यात बदल करून अनेक प्रश्न निर्माण करून २०२० हे वर्ष संपेल. त्याबरोबर एक दशक ही संपेल. कोणत्याही क्षणाला, दिवसाला अगदी वर्षाला सुध्दा लांबी रुंदी मिळते ती त्यावेळी आलेल्या अनुभवांच्या आधारावर!! आणि सरत्या वर्षाने कुठुनतरी निर्माण झालेल्या सुक्ष्म जीवाणूंनी निसर्गाचे अफाट सामर्थ्य आणि अहंकारी माणसाला आपल्या क्षुद्रपणाची जाणीव करून दिली आहे. 

       कितीतरी आपल्या जवळचे, नात्यातले, नामवंत चेहरे आपल्या आठवणीत राहून आयुष्यातुन‌ वजा झाले आहेत. ह्या वर्षात आपण शिकलो की पैशांनी हवं ते विकत घेता येत पण आॅक्सिजन विकत घेता येत नाही आणि साधं सोपं सरळ आयुष्य जगणंच खरं जगणं आहे. सगळ्या अडथळ्यांच्या शर्यतीतून आपण ह्या अवघड वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात आलो आहे आणि ३१डिसेंबरच्या रात्री नंतर उगवणार्‍या आशेच्या सोनेरी सकाळची आपण आतुरतेने वाट पहात आहोत.

       ३१ डिसेंबरची रात्र नेहमीच उद्या सकाळी नवं वर्ष नवा संकल्प! अशा विचारात जाते. डायटिंगसाठी आवडते आणि वजन वाढवणारे पदार्थ सोडायचे, सकाळी चालायला जायचं, डायरी लिहायला सुरुवात करायची, घरातली कामं वेळच्या वेळी रोज करायची असे अनेक संकल्प जे कमीत कमी दोन दिवस आणि जास्तीतजास्त एक महिना चालू शकतात. ह्या वर्षी मात्र सर्वसाधारण पूर्ण-अपूर्ण संकल्पांचे संदर्भच बदलून गेले आहेत.

      रोजच्या धावपळीच्या जीवनात कोरोनामुळे अचानक थांबावं लागलं आणि त्या काळात जाणवलं की आपलं स्वतःसाठी जगणं राहूनच गेलं आहे!! 

      त्यासाठीच नवीन वर्षाच्या सुरुवातीला संकल्प करूया की स्पर्धेच्या युगात आपण आपले छंद, आवड ह्याकडे ही लक्ष देऊया.

      अचानक घरकाम करणाऱ्या महिला कामाला यायच्या बंद झाल्या आणि घरातली कामं वाटून घ्यावी लागली. आता मात्र नवीन वर्षाच्या सुरुवातीला मुलगा मुलगी असा भेद न करता प्रत्येकानं घरकाम, स्वैपाक शिकून घ्यायचा संकल्प करायलाच हवा.

       ह्या काळात एकटे रहाणारे जेष्ठ नागरिक, आजारी मंडळी ‌ह्यांना मदतीची खूप गरज भासली. ह्या वर्षात आपण अशा गरजूंना लागणारी मदत करून माणूसकीची नाती जोडणं शक्य आहे. व्यावहारिक संबंधांपलिकडे जाऊन अशी मदत केली तर आपल्या मनाला भावनिक आनंद नक्कीच मिळेल. शेवटी असे नातेसंबंध आपल्या जगण्यावरचा विश्वास दृढ करतात. तेव्हा अनोळखी असले तरी गरजू लोकांना मदत हा संकल्प नवीन वर्षासाठी होऊ शकतो.

      कोरोनाच्या काळात नोकरी करणं हे सर्वात सुरक्षित असं जे समजलं जातं होतं ह्या संकल्पनेला छेद मिळाला आणि अनेक घरगुती व्यवसाय सुरू झाले. आमच्या गल्लीत दोन इंजिनिअर मुलं सकाळच्या वेळ ताजी फळं, भाज्या विकताना दिसली. आपली आवड जाणून घेऊन एखाद्या व्यवसायाचं ज्ञान घेण्याचा संकल्प करायला काहीच हरकत नाही.

      सर्वात महत्त्वाचं म्हणजे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी करायचा संकल्प! जगण्यासाठी आवश्यक असलेला प्राणवायू म्हणजे झाड, वृक्ष आहे. ज्यांचा भरमसाठ नाश आपण केला आहे. तेव्हा सर्वांनी वृक्षारोपणाचा संकल्प करायला हवाय.‌ कारण ह्या कमी प्रदुषण काळात सर्वांनीच पृथ्वीचे प्रेमगीत अनुभवलय. स्वच्छ नद्याचं वाहणं, प्रदुषणमुक्त हवेमुळे शहरांतून दिसणारी हिमशिखरे हे सर्व नक्कीच आनंददायी होत. तेव्हा कचर्‍याची योग्य व्यवस्था, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेचे नियम पाळणे, एखादं तरी झाड लावायचं, ह्या अगदी साध्यासुध्या संकल्पांमुळे स्वतः आणि समाज म्हणून आपली जबाबदारी निश्चित पार पाडता येईल.

       अनेक प्रकारांनी मी ३१ डिसेंबर साजरा केला आहे. मोठ्या हाॅटेलातल्या पार्ट्या बघितल्या आहेत. घरी मित्र-मैत्रिणींना बोलावून खूप धमाल केली आहे. पण ‌ह्यावेळी मात्र कुठे तरी आयुष्यातली असुरक्षितता व्याकूळ करून जातेय. ह्या असुरक्षिततेची लढाई आपल्या सर्वांना द्यायची आहे. एकत्रित येऊन द्यायची आहे. तेव्हाच २०२१ ची सकाळ सोनेरी होईल आणि ‌नव्या वर्षाचं स्वागत नव्या संकल्पानी करता येईल.


                             मार्गशीर्ष पौर्णिमा

                            ता. २९.१२.२०२०

                               ललिता छेडा


       

       




     

Tuesday, December 15, 2020

कृतज्ञ मार्गशीर्ष

      'मासानां मार्गशीर्षोऽहम्' असं म्हटलं जाणाऱ्या ह्या महिन्यांपासून हेमंत ऋतूची सुरुवात होते. ह्या महिन्यात जरी कोणतेही सण नसले तरी दत्त जयंती ह्याच महिन्यातल्या पौर्णिमेला असते. मी स्वत: दत्तभक्त असल्यामुळे माझ्यासाठी हा महिना भक्तीचा आहे. मार्गशीर्ष महिना डिसेंबर महिन्यात येत असतो त्यामुळे वर्षभर घडलेल्या चांगल्या घटनांसाठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीही हा महिना योग्य आहे असं मला मनापासून वाटतं. 

       त्यात ह्या वर्षी तर सगळेच महिने प्रत्येकासाठी परीक्षेचे गेले. एका जीवघेण्या आजारानं संपूर्ण जगाला हादरवून टाकलं. पण सगळ्या अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणारे 'कोविडयोध्दे' सरळ सरळ त्या महामारीशी जाऊन भिडले. त्या सर्वांनी अतिशय समर्पित भावनेने काम केले. म्हणूनच वर्षाच्या शेवटच्या दिवसात त्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करणं आवश्यक वाटतंय.

       माझ्यासाठी ह्या वर्षी घर बदलणं, लेकीच्या घरी रहायला जावं लागणं हे अचानक बदल घडले आणि घर म्हटलं की आठवते चिऊ-काऊची गोष्ट! वाहून गेलेल्या घरामुळे चिऊताईच्या दारात आलेल्या काऊची‌ गोष्ट सांगताना माझ्या नातवानं‌ मला विचारलं होतं "उन्हात मेणाचं घर वितळले असेल ना मोठी मम्मी? मग चिऊताई कावळ्याच्या घरट्यात रहायला गेली ना? लहान मुलं कधी कधी निरागसपणे शिकवून जाणारं बोलून जातात. असो, हा सगळा घर बदलण्याचा अनुभव मला पण खूप काही शिकवून गेला आणि म्हणूनच‌ ह्यावर्षी माझ्यात झालेल्या बदलासाठी माझ्या मैत्रिणी, जवळचे सुह्रद ह्यांच्यामुळे परिस्थितीत सकारात्मक मनस्थिती ठेवायला मदत झाली त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटतेय!!
        ह्याच काळात सुधा मूर्ती यांचे विचार वाचण्यात आले. "Attachment in Detachment" कोणत्याही नात्यातल्या ओढीपासून अलिप्तपणापर्यंतचा प्रवास!! सुधाताई म्हणतात "मुलं आपापल्या सोडून गेली की आपण मानसिक दृष्ट्या मॅच्युअर होतो आणि वयामुळे आलेली इमोशनस् ची पोकळी सहज टॅकल करू शकतो. कारण त्यांना हवं तसं जगू दिलं तर मी पण ते जसे आहेत तसे स्वीकारायला तयार होईन! त्याचबरोबर आपण स्वत:च्या आवडीनिवडी जपाव्यात आणि आपण करतो त्याच्यावर प्रेम करण्यापेक्षा आपलं ज्या गोष्टींवर प्रेम आहे त्या कराव्यात" त्यांच्या या विचारानं माझ्यातला बदल हा वाचण्याच्या सवयीने झालाय हे कळलं आणि वाचण्याची सवय लावणाऱ्या वडिलांची आठवण झाली. अर्थात ह्या निमित्तानं त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटली.
       वाचण्यावरून नुकतीच एका पुस्तक-विक्रेत्यानी टाकलेली पोस्ट वाचली त्याची आठवण झाली. विषय होता मार्गशीर्ष महिन्यातील 'गुरवारी करायच्या लक्ष्मीव्रतासंबंधी!' शेवटच्या गुरवारी अनेक महिला हळदीकुंकू समारंभ करून पोथ्या वाटतात आणि पुस्तकविक्रेत्यांची अक्षरशः शेकड्यांनी पोथ्यांची विक्री होते. खरोखर अशा पोथ्या वाटून लक्ष्मी प्रसन्न होईल? असा प्रश्न त्यांनी स्वत: विक्रेता असूनही उपस्थित केलाय. नफा होत असूनही त्यांच्या मनात जे आलंय त्याचा आपणही विचार करायला हवा ना? त्याऐवजी त्या पैशातून एखाद्या गरजू महिलेला भाजी, धान्य द्यावं. त्या‌ महिलेचे आशिर्वाद मात्र नक्कीच मिळतील तरच खर्‍या अर्थानं मार्गशीर्षातली भक्ती कृतज्ञतेची होईल असं वाटतं.
        दुर्गाबाई भागवतांनी मार्गशीर्षाबद्दल‌ लिहीताना म्हटलं आहे" छायेची शांती, छायेचा स्पर्श, छायेचे सौंदर्य मार्गशीर्षातल्या लांबच लांब रात्रीत जसे भासते तसे इतर वेळी भासत नाही. ह्या दिवसातली उन्ह तर हवीहवीशी वाटतातच पण छायेचे खेळही गमतीचे असतात"
       अगदी तसेच मार्गशीर्ष महिन्या निमित्ताने कृतज्ञतेचे माझे हे विचार सर्वांना शांती, आनंद, सौंदर्यपूर्ण व्हावेत हीच दत्तात्रया चरणी प्रार्थना!!

                           मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा
                              ता. १५.१२.२०२०
                                ललिता छेडा





Monday, November 30, 2020

गृहीणी


गृहीणी...

घर सावरते घर आवरते...
तरीही घड्याळाच्या काट्यावर धावते

धावता धावता थकली दमली तरी...
स्वत:च्या गायन वाचनाचे छंदही जपते

रोज मनाच्या खिडक्या आनंदाने उघडते...
आणि खिडकीतल्या कुंड्यांमध्ये निसर्ग शोधते

नोकरी व्यवसाय करावा असा मनातला ध्यास..
घराचा कोपरा न कोपरा मात्र सजवते खास

मुलांसाठी ऊन पाऊस झेलत लढत रहाते...
पण उडालेल्या पिल्लांकडेे दूरूनच पहाते

घरातल्यांच्या खुशीचा मार्ग पोटातून जातो हे जाणते..
आयुष्यभर करायच्या स्वैपाकात नाविन्य शोधत रहाते

सासर-माहेर नणंदा-भावजया नात्यांत अडकून पडते..
आणि सांभाळताना नाती स्वत:ला शोधायला विसरते

खिडकीतून दिसणारं तिचं आभाळ मधूनच अंधारते..
पण लावलेल्या पणतीनं ती घराच अंगणच उजळते

धाग्यानं वडाभोवती ज्याच्यासाठी फेऱ्या घालते...
त्याचा अहंकार,त्याचा राग,धाग्याच्या गाठी सोडवत जगते

हाताला लागणारे चटके, डोळ्यात येणारं पाणी...
होणारे पराभव सगळं हसत हसत सहन करून जाते

दिवसभराची कामं मोलाची अपेक्षा न करता करत जाते..
दिवसभर करतेस काय? ह्या प्रश्राचं उत्तर शोधत रहाते.

३ नव्हेंबरचा राष्ट्रीय गृहिणी-दिन त्यानिमित्ताने
मनांत आलं 'गृहीत' धरली जाते ती 'गृहीणी' की जिच्या 'ऋणात' सारं घर असतं ती 'गृहिणी!! आणि म्हणूनच जे मनात आलं ते लिहीलं. गृहिणीला मन असतं, विचार असतात, कलागुण असतात ह्याची जाणीव सर्वांना असायला हवीच पण ती जाणीव तिच्यापर्यंत पोचणं पण आवश्यक आहे.
कोरोनाच्या ह्या अवघड काळात जिच्या मनोबलावर अवघा समाज टिकून राह्यला होता ती घरातली गृहिणी होती. कारण तिनं.
Work from home.. केलं
Work for home..... केलं आणि
Work with patience... शिकवलं.
अशा सर्व गृहिणींना माझा मनापासून सलाम!

कार्तिक पौर्णिमा
ता. ३०. ११. २०२०
ललिता छेडा.

Sunday, November 15, 2020

लखलख चंदेरी.....कार्तिक

        समृद्धीचा एक उत्सव म्हणजे दीपोत्सव! दिवाळीतलं उत्सवी वातावरण, थंडीची सुरवात आणि अभ्यंगस्नान हे सगळं पारंपरिक असलं तरी आपण प्रत्येक दिवाळी फराळ, साफसफाई, खरेदी ह्या सगळ्यांमुळे नव्यानं अनुभवतो.

        माझी लहानपणीची दिवाळी परळ, गिरगावातल्या चाळींमध्ये साजरी झाली आहे.‌ दोन खोल्यांची ती घरं दिवाळीच्या आधीच्या आठवड्यात साबण घालून धुवून स्वच्छ करायची आणि मग फराळ बनवायला सुरुवात व्हायची. वसूबारसेला आई बरोबर देवळात जाऊन गाय आणि वासरू ह्यांची पूजा करायची आणि त्यांना नेवैद्य म्हणून आई गव्हाच्या पिठाचे लाडू करून न्यायची. नरकचतुर्दशीच्या दिवशी ‌आंघोळीच्या वेळी फुलबाज्या लावायच्या, फराळाबरोबर दही पोहे इतके मस्त लागायचे की अजूनही ती चव जिभेवर रेंगाळतेय. खरेदी म्हणजे वडिलांची धोतर-जोडी, आईला एक साडी आणि मला घरी आईनं शिवलेला फ्राॅक!! खरेदी गिरगावातल्या माझ्या ‌मामांच्या दुकानातच व्हायची. चाळीत, नातेवाईकांसाठी द्यायला फराळाचे डबे तयार व्हायचे. झिरमिळ्यांचे कंदील घरी बनायचे. अशी अगदी साध्यासुध्या गोष्टींत आनंद शोधत त्यावेळी दिवाळी साजरी व्हायची.
        लग्नानंतर डोंबिवलीत आल्यावर माझ्या मैत्रिणी जयश्री आणि अनघा आम्ही तिघी दिवाळीचा फराळ एकत्रच‌ बनवत असू. खूप धमाल यायची. आम्ही तिघी दिवाळीची खरेदी करायला क्राॅफर्ड मार्केटला जायचो. तेव्हा ट्रेनला हल्ली सारखी गाड्यांना गर्दी नसायची. त्यामुळे ती क्राॅफ्रर्ड मार्केटची खरेदी आठवणीतली ट्रीप होत होती येवढं मात्र खरं!! एकदा तर आम्ही तिघींनी इतकी खरेदी केली की आम्हाला हमाल करावा लागला होता...‌
        आता अनघा आमच्यात नाही पण तिच्या अनेक आठवणी मनात रेंगाळत असतात...
        डोंबिवलीत आल्यावर दरवर्षी लक्ष्मीपूजनाला माझ्या नवऱ्याचे मित्र आणि माझ्या मैत्रिणी संध्याकाळी आमच्या आमच्या घरी येतात आणि आमचं एक छानसं गेट-टूगेदर आम्ही कायम करत आहोत. दिवाळीची एक कायमची आठवण!!
        सुवर्ण मंगल महिला सहकारी बॅंकेच्या संचालक पदामुळे अठरा वर्षे व्यावसायिक दिवाळीचा वेगळाच अनुभव घेतला! स्टाफचा बोनस, खातेदारांसाठी नवीन स्कीम जाहीर करणं, लक्ष्मीपूजन अशी वेगळ्या पध्दतीची, वेगळ्या विचारांची दिवाळी अनुभवलीय.
ह्याच बॅंकेच्या अध्यक्षपदी असताना डोंबिवलीचं ग्रामदैवत असलेल्या गणेश मंदिरात तर्फे दिवाळी पहाटेच्या सकाळी माझा सन्मान करण्यात आला तो क्षण अविस्मरणीय!!‌ अर्थात माझं नेहमीच कौतुक करणाऱ्या आबासाहेब पटवारींचा इथं आवर्जून उल्लेख करावासा वाटतोय.
        ह्यावर्षीच्या दिवाळीत मात्र कोरोनाच्या अंध:काराला आरोग्यपूर्ण जगण्याच्या छोट्याश्या पणतीनं भेदायचंय. त्याशिवाय ह्या आजारपणामुळे थकलेल्या वृध्द पावलांना, कष्टकरी हातांना, नैसर्गिक आपत्तींमुळे बेजार शेतकऱ्यांना जमेल तसं सहकार्य करून एक सामाजिक भान जपायचं आहे. प्रदुषणमुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी फटाके आता उडवायचेच नाहीत असं सर्वांनीच ठरवायचं आहे.
       अशा ह्या दिवाळीच्या प्रत्येक दिवसाच्या कथा आहेत. भाऊबीजेची एक कथा माझी आजी सांगायची "असं म्हणतात भाऊबीजेला यम आपल्या बहिणीकडे "यमीकडे" दिवसभरासाठी जातो आणि जाताना नरकाचे दरवाजे बंद करून स्वर्गाची दारे सताड उघडी ठेवतो! आणि त्यामुळे भाऊबीजेला मृत्यू झाला तर ती व्यक्ती सरळ स्वर्गात जाते आणि माझ्या आईचा मृत्यू भाऊबीजेला झालाय....


                          कार्तिक शुद्ध प्रतिपदा
                            ता. १६-११-२०२०
                               ललिता छेडा

Friday, October 30, 2020

पारंपरिक ते काॅन्टिनेंटल

       १६ आॅक्टोबरचा 'जागतिक अन्न दिन' साजरा करताना अन्नाची गरज रोजच्या जगण्यात किती आहे ते ह्या वर्षी आलेल्या अनेक प्रसंगांतून कळलं. 

       लाॅकडाऊनच्या सुरवातीच्या काळात अनेक श्रमिक, गरीब, कुटुंबांना एकवेळच्या जेवणापासून वंचित रहावं लागलं. स्थलांतरित, हातावर पोट असलेल्यांना अक्षरश "अन्नासाठी दाही दिशा" कराव्या लागल्या. अशावेळी अनेक महिलांनी, काही संस्थांनी पुढाकार घेऊन ह्या मंडळींच्या दोन वेळच्या जेवणाची सोय केली होती. ह्याकाळाच्या सुरवातीला घरातून बाहेर न पडता आल्यामुळे अनेक एकट्या राहणाऱ्या ज्येष्ठ मंडळींचे पण खाण्यापिण्याचे हाल झाले.
       दुसरं महत्त्वाचं म्हणजे सध्या आलेलं आजारपण संसर्गजन्य असल्यामुळे घरकाम करणाऱ्या महिला कामाला यायच्या बंद झाल्या आणि घरातली सगळीच मंडळी घरकाम करायला लागली. त्यामुळे स्वैपाक आणि स्वच्छता ह्याबाबतीतला‌ घरातल्या प्रत्येकाचा सहभाग अनिवार्य झाला आणि मग सूरू झाली पारंपरिक ते काॅन्टिनेंटल पदार्थांची रेलचेल! जोडीला what's app आणि Google search होतंच. नातवंड आजीच्या मदतीनं पारंपरिक पदार्थ शिकत होती तर परदेशातल्या केक, पास्ता, पिझ्झाचं इंडियन वर्जन घरात पोळ्यांना पर्याय म्हणून आवडायला लागलं. काही मंडळींनी आयतं मिळताय ते काहीही मदत न करता एन्जाॅयही केलं.
      खरं म्हणजे ह्या परिस्थितीनं प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आहारातले बदल, हळदीच्या दुधाची गरज हे सगळं 'उदर भरण नोहे'...हे खर्‍या अर्थानं शिकवलं.
      पारंपरिक पदार्थांची आठवण म्हटलं की प्रत्येकालाच आपल्या लहानपणीचे आई, आजीच्या हाताची चव असलेले पदार्थ आठवतात. मला तर त्या पदार्थांबरोबर उष्ट-खरकट, सोवळं-ओवळं, वाढतांना डाव्या-उजव्या बाजूचे पदार्थ ह्या शब्दांची शिकवण आणि शिस्त मनांत येते.
      आईची अजून एक आठवण म्हणजे प्रत्येक पदार्थ प्रमाणात व्हायला हवा हा तिचा अट्टाहास! तिचं म्हणणं असायचं" खिचडी कशी मऊ- मोकळी व्हायला हवी, श्रीखंड कसं योग्य प्रमाणात आंबटगोड हवं, जिलबीचा खुटखुटीतपणा (जिलब्या ती नेहमी घरीच करत असे) मोदकांच्या बाहेरच्या पारीचा तलमपणा, हलव्यावरचा काटा कसा एक सारखा हवा, सगळं कसं अगदी उत्तम हवं!! आता मनांत येतं पारंपरिक पदार्थांच्या अशा प्रमाणबद्धतेमुळेच त्या काळच्या स्त्रीयांना आयुष्याचा समतोल राखायला छान जमलं होतं.
       हल्ली 'काॅन्टिनेन्टल फुड' तर आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. काॅन्टिनेन्टल खरं म्हणजे 'युरोपियन' फुड! जे बिना तेलाचं, बिना मसाल्याचं लंच-डिनरला किंवा कधी कधी तर नुसत्या उकडलेल्या भाज्या असतात तेच जेवण! पण आपण भारतीयांनी मात्र जसं चायनीज पदार्थांना इंडियन चायनीज बनवलं तसंच ह्या उकडलेल्या भाज्या वेगवेगळ्या मसाल्यांनी स्वादिष्ट केल्या.
       आम्ही इटलीला पिझ्झा ‌खाल्ला त्याची चव खूप छान आणि वेगळी होती. ज्या गावचा जो पदार्थ प्रसिद्ध असतो तो तिथंच खायची खरी गंमत आहे. अमेरिकेत जाणवलेलं वैशिष्ट्यं म्हणजे तिथले पदार्थ चीज, बटर शिवाय पूर्णच होत नाहीत.
       तरीसुद्धा पारंपरिक महाराष्ट्रीयन नेवैद्याचं ताट ज्यात वरणभात, मसालेभात, वर तुपाची धार, पक्वान्न, डाव्या बाजूला चटणी, कोशिंबीर, लिंबाची फोड, उजव्या बाजूला भाज्या, वाटीत अळूची भाजी ह्याची बरोबरी कशाशीच होऊ शकत नाही. तसंच दाक्षिणात्यांच्या इडली डोशाबरोबर केळीच्या पानावरचा गरमागरम सांबार भात, अवियल, खीर बघून कसं प्रसन्न वाटतं!‌ तर सजलेल्या गुजराथी थाळीतल्या ५-६ वाट्यांमधली तोंडीलावणी, ढोकळा, भजी, दोन तरी मिष्टान्नं मन तृप्त करतात आणि तिकडे उत्तरेला पंजाबी समोसा, परोठा, आलू मटार आणि मोठा ग्लास लस्सी ह्या सर्वांची मजाच काही और!! आणि दही तर सर्वत्र हवंच. असा हा आपला भारत विविधतेने नटलेल्या पदार्थांमुळे एकेमेकांशी अन्नामुळे जोडलेला आहे.
       सामिष आहार करणार्‍यांवर तर एक वेगळा लेखच लिहावा लागेल.
       पण जागतिक अन्न दिनाला खरी आठवण केली पाहिजे शेतकऱ्यांची!! ज्यांचं ह्या वर्षी कोरोनाबरोबर महापूर, परतीच्या पावसामुळे झालेलं नुकसान ह्यामुळे जे हाल झाले आहेत. ते शब्दात व्यक्त करायचे तर...
          निसर्ग हा कोपला भारी, धान्याची धुळधाण करी।
          भाजीपाला सडला तरी, त्यासी कोणी मदत न करी।
          बळीराजाच्या श्र्वासाची किंमत‌ आहे काय तरी?
      कृषीप्रधान म्हणवल्या जाणाऱ्या आपल्या देशाची ही खूप मोठी शोकांतिका आहे. तेव्हा पारंपरिक असेल किंवा काॅन्टीनेन्टल...पुढ्यात आलेल्या अन्नामागच्या कष्टांची जाणीव प्रत्येकानं ठेवून वागलं पाहिजे.

      भुकेल्या पोटी स्वप्न बघत अनेक 
      गरीब मुलं झोपी जातात।
      तेव्हा अन्नाची नासाडी टाळूया।
      जगण्यासाठी आवश्यक तेवढंच खाऊया।
      कारण अन्न कमवायला ही आपण 
      धावतोय आणि ते पचवायला ही आपण धावतोय हे            लक्षात असुद्या।


                              अश्र्विन पौर्णिमा
                             ता. ३०.१०.२०२०
                                 ललिता छेडा


Saturday, October 17, 2020

प्रेरणादायी अश्र्विन

      अश्र्विन शुद्ध प्रतिपदेपासून शरद ऋतूच आगमन होतं आणि शारदीय नवरात्रौत्सवाची चाहूल लागते. आपल्याला मात्र बाजारात झेंडू, शेवंती, अॅस्टरची फुलं दिसू‌ लागली की नवरात्रीचे नऊरंग, घरोघरी होणारें आदिमाया आदिशक्तीचं पूजन, अखंड दीप ह्या सगळ्यांबरोबर भोंडल्याची, गरब्याची गाणी मनात रुंजी घालू लागतात.

      मी मात्र ह्या नवरात्रीच्या निमित्ताने माझ्या आयुष्यातल्या नव दुर्गांच्या आठवणींची ओंजळ रिकामी करायची ठरवलीय. 

             त्यात सर्वात पहिली "माझी आई"...
      शाळेत असताना आपण सर्वांनीच आपल्या आईवर निबंध लिहीलाय. त्या निबंधाचा तकलादूपण आपण आई झाल्यावर कळतो आणि हसू देखील येतं पण खरी आई कळते आपल्या आयुष्यातुन ती निघून गेल्यावर आणि संपूर्ण उलगडते आपण तिच्या वयाचे झाल्यावर!
       माझा आईचं माहेरच नांव 'शांता' आणि सासरचं 'सुमती'. दोन्ही नांव सार्थ ठरवणारा तिचा स्वभाव होता. सतत कामं करत रहाणं हे तिचं पॅशन (मराठी शब्द 'आवड') होतं. तिनं एका सुईवर जवळ जवळ तीन वर्षं सतत विणून सुंदर मोठी चादर विणलीय.‌ त्यात तिचं नांव, कलात्मक चित्रं हे सगळं तिनं स्वत: तयार केलंय! ती चादर माझ्यासाठी तिची सुंदर आठवण आहे. म्हणूनच मी पॅशन म्हटलं, अगदी शेवटपर्यंत ती काही जमत नव्हतं तर वाती आणि गव्हले करत असायची.
       तिचा दुसरा आनंद म्हणजे 'माणसं!! लहानथोर, गरीब-श्रीमंत कोणाशीही तिचं सहज जमून जायचं आणि‌ जुळलेलं नातं ती जिवापाड जपायची. ती सुगरण होतीच पण सर्वांना खायला करून घालणं हे पण तिच्या आवडीचं काम होतं. "मामींनी ऐनवेळी करून घातलेल्या पिठलं-भाताची चव अजूनही जिभेवर रेंगाळतेय! असं म्हणणारी अनेकजण अजूनही‌ तसं सांगतात. सर्वांचे वाढदिवस तिच्या लक्षात असायचे आणि ती आवर्जून त्या व्यक्तीला भेटीबरोबर दोन ओळींची कविताही करून द्यायची. सासर-माहेर कोणाच्या कडच्याही लग्न-मुंजीत ती सगळी जबाबदारी आवडीनं उचलायची आणि मनापासून सर्व पार पाडायची.
       आमच्या परळच्या घरच्या माझ्या लहानपणीच्या अनेक आठवणीत सतत नातेवाईकांचं येणं-जाणं, परळ भगिनी मंडळ, दामोदर हॉल मधली नाटकं हे सगळं आहेच. त्यातसुद्धा दादांचा (माझे वडील) तापट स्वभाव! पण आज मागे वळून बघताना आईनं किती सोशिकपणे हे सगळं निगुतीने सांभाळून नेलं त्याची जाणीव होते.
‌ ‌ ‌      माझं लग्न तिच्या मनाविरुद्ध झालं आणि तिची कोणतीच हौस झाली नाही म्हणून ती थोडी खट्टू झाली. पण नंतर माझं डोहाळजेवण, माझ्या लेकीच बारस तिनं थाटामाटात साजरं केलं आणि सगळी हौस पूर्ण करून घेतली!! आहे त्यात समाधानी असणं तिची खासियत होती.
       आईच्या माझ्या मनात असलेल्या आठवणी न संपणाऱ्या आहेत. त्यांना इतक्या थोड्या शब्दात व्यक्त करणं कठीण आहे. पण सुगरण म्हणजे आई...कामसू म्हणजे आई....सोशिक म्हणजे आई... नातं जपणारी म्हणजे आई... प्रत्येक गोष्टीत कलात्मकता आणणारी‌ म्हणजे माझी आई...
             माझी दुसरी दुर्गा म्हणजे माझी आजी...
       आजी म्हणजे माझ्या आईची आई! तिचं नांव ‌सरस्वती होतं पण ती खरीखुरी दुर्गा होती. तिचा खंबीरपणा, कोणत्याही परिस्थितीला न डगमगता धीराने सामोरं जाणं, अविरत कष्ट करण्याची ताकद हे गुण माझे आदर्श आहेत. आमच्या घरातल्या प्रत्येक चांगल्या-वाईट प्रसंगात ती आमच्या आईचा आधार असायची. तिला भजनं म्हणायला खूप आवडायची. तिचं आवडतं भजन "कैवल्याचा‌ पुतळा प्रगटला भूतला...हे होतं.
       ती तरुणपणी विधवा झाली, दोन मुलांना घेऊन कोकणात भावाकडे रहायला आली. मुलं मोठी झाल्यावर ‌त्यांना घेऊन मुंबईत आली. माझ्या आईचं लग्न करून दिलं पण मामानं मात्र तिला कधीच सुख दिलं नाही. तिनं मात्र त्याबद्दल कधीही बाहेर चकार शब्दही काढला नाही आणि जमेल तेवढं आणि जमेल तसा मामीच्या मदतीनं संसाराचा गाडा ओढला. अनेक प्रसंगात तिचं ठामपणे उभं राहणं माझ्या आठवणीत आहे. हलवा करणं, गोधड्या करणं, उन्हाळ्यात वाळवणं घालणं अशी अनेक कामं करून ती मामीच्या मदतीनं संसाराला आर्थिक मदत करत होती.
                  माझी तिसरी दुर्गा म्हणजे माझी आत्या...
       तिचं माहेरचं नांव मथु होतं. माझ्यासाठी ती खूप खास आहे. कारण हल्ली अनेकदा मला मी तिच्या सारखीच वागते असं खूप जाणवतं. तिची तब्येत हे तिचं आवडतं काळजी करायचं काम असायचं आणि मग त्यासाठी आपला आहार तिचा तिच ठरवायची. हल्ली माझं पण असंच होतं असतं. माणसं जमवणं, समारंभ आयोजणं ही तिची खासियत होती. पण खूप गंमतीशीर गोष्ट म्हणजे तिला त्या समारंभात अचानक थकवा जाणवू लागायचा आणि ती चक्क तो सगळा घोळ तसाच मागच्या माणसावर सोपवून पडायला जायची. मलाही तसंच अचानक थकायला होतं आणि तिची आठवण येते.
       ती एकमेव होती जी दादांना तिला जे काही वाटत असेल ते न घाबरता सांगायची. दादा पण तिचं ऐकून घेत. पण अशा वेळा फार कमी आल्यात कारण तिचा आपल्या भावाच्या निर्णयांवर पूर्ण विश्वास होता. माझी आई आणि ती मनानं खूप जवळ होत्या. माझ्यावर तिचं खूप प्रेम होतं. जे अनेक प्रसंगातून मला जाणवलंय. तिचं फलटणंच घर, तिचं डोक्यावर पदर घेऊन तुळशी जवळ दिवा लावणं, 'आरती ज्ञानराजा' ही आरती संध्याकाळी तन्मयतेने म्हणणं! अशी ही माझी आत्या अनेकदा‌ मला माझ्या वागण्यातून डोकावताना दिसते.
                  माझी चौथी दुर्गा माझी मामी...
       त्या‌ पिढीतल्या सोसणाऱ्या, न बोलता सहन करणार्‍या स्रीयांच प्रतिनिधित्व करणारी माझी मामी..सुशीला! अतिशय सुगरण असलेली मामी एक वाटी डाळीत पाच वाट्या पाणी घालून अप्रतिम आमटी करायची. तुटपुंज्या पैशात तिनं नेहमी हसतमुखानं संसार केला. तिच्या लाडक्या लेकीचा मृत्यू तिनं धीरानी सहन केला. नोकरीच्या निमित्तानं ती गिरगावातून परळला यायची. तिचं येणं-जाणं आमच्या दारावरूनच व्हायचं. पण कधी उगीचच येऊन आपलं रडगाणं सांगणं, काही मागणं, कधीच नाही. असं वागायला खूप ताकद लागते. आणि ती तिच्यात नक्कीच होती. माझ्यासाठी ती आदर्श दुर्गा आहे.
               माझी पाचवी दुर्गा आहे माझी नलू आत्या...
         माझ्या वडिलांची मामेबहीण असलेली ही आत्या म्हणजे माझ्या आईची नणंदेपेक्षा जवळची मैत्रीण होती. दोघींच्यात खरंखुरं शेअरिंग-केअरिंग होतं. सुरवातीला आईची लेक म्हणून ती माझे लाड करायची. मी साडी नेसायला लागल्यावर तिनं लगेच दोन सुंदर साड्या मला दिल्या आणि ‌ते साड्या देणं शेवटपर्यंत सुरुच राह्यलं. तिचं माहेरचं नांव नलिनी! ती पण एखाद्या कमळाची कशी प्रत्येक पाकळी स्वतंत्र सुंदर असते तशी आपल्या गाण्यानं, सौंदर्यदृष्टीनं, टापटीपीनं, सर्वांना सुंदर भेटी‌ देऊन ती कमळासारखी नेहमी प्रफुल्लित असायची आणि तिचं सासरच नांव 'प्रतिभा! तेही तिनं आपल्या कलागुणांनी सार्थ ठरवलं होतं. माझ्या लग्नानंतर ती माझी पण लाडकी आत्या होऊ लागली. तिचं पुण्यातलं घर माझं हक्काचं माहेर झालं होतं. तिच्या घरी कधीही गेलं तरी ते स्वच्छ, सजवलेलं, नीटनेटकं असायचं. इतकं प्रसन्न दिसायचं की ‌तिच्या सौंदर्यदृष्टीचं कौतुक वाटायचं. खरं म्हणजे तिचं आयुष्य तरूण मुलाचा‌ मृत्यु, प्रतारणा अशा ‌दु:खाच्या अनेक‌ अनुभवांनी खडतर झालं होतं. पण त्या खडकावर ‌फुलं फुलवायचा तिचा नेहमीच प्रयत्न असायचा. तिच्या घरी राहून सकाळी तिला गाताना ऐकणं ही माझ्या आत्याची आठवणीतली अत्तरकुपी!!
               माझी सहावी दुर्गा म्हणजे माझ्या सासूबाई...
        माझ्या सासूबाईंच नांव'लक्ष्मी' आणि त्या तशाच होत्या. त्यांच्या मनाविरुद्ध मी त्यांच्या घरात आले त्यामुळे ‌पहिले थोडे दिवस त्या थोड्याशा फटकून वागत होत्या. पण एकदा आमचं जमल्यावर मात्र त्यांनी स्वैपाकघरातली स्वच्छता जे त्यांच पॅशन होतं ते माझ्या कडून अक्षरशः गिरवून घेतलं. त्या खूप स्पष्टवक्त्या होत्या. त्यामुळे अनेकदा माणसं त्यांना घाबरून असायची.
              माझी सातवी दूर्गा म्हणजे माझी मोठी नणंद...
‌         ह्या नणंदेमुळे मला ह्या घरानं मनापासून स्वीकारलं. हिचं नाव 'हरकव़ंती'. प्रचंड उत्साह आणि सर्वांच्या मदतीला धावून जायचा त्यांचा स्वभाव ह्यामुळे त्या माझी सासरची छान मैत्रीण झाल्या.
             माझी आठवी दूर्गा म्हणजे माझी दुसरी नणंद...
‌‌        हिचं नाव 'निर्मला' ती मोठ्या नणंदेपेक्षा थोडी‌वेगळी! देवधर्म करणारी, थोडी मागे मागे रहाणारी, सासरच्या मोठ्या कुटुंबात रमणारी अशी आहे. मला जैन धर्म तिच्याकडून शिकायला मिळाला.
              माझी नववी दुर्गा माझी‌ धाकटी जाऊ सविता...
          आम्हा दोघींची लग्न दोन महिन्यांच्या फरकानीच झाल्यामुळे आमचा दोघींचा संसार तसा दोन रूळांसारखा समांतर होत गेला. ती मुंबईत आणि मी डोंबिवलीत पण रोजचे फोन, प्रत्येक गोष्ट        एकेमेकीला विचारून, सांगून करण्याची सवय आम्हा दोघींना कधी लागली कळलंच नाही. आमच्या मुलांना पण नेहमी ‌आईपेक्षा काकी जास्त जवळची वाटते.
        ह्या माझ्या आयुष्यातल्या आदिमाया आदिशक्ती! ज्यांनी मला शिकवलं, घडवलं आणि म्हणूनच ह्या नवरात्रीच्या निमित्ताने ही त्यांच्याबद्दलच्या कृतज्ञतेची ओंजळ देवीला अर्पण केली.
       दहावा दिवस "दसरा" जो माझ्या आते-मामे बहिणी, शाळा-काॅलेजच्या मैत्रीणी आणि गेली पन्नास वर्ष डोंबिवलीत राहिल्यामुळे माझ्या इथल्या सर्व सख्यांना समर्पित! ज्या माझ्या‌ प्रत्येक आनंदात सहभागी झाल्या आणि दु:खात मला धीर द्यायला पाठीशी उभ्या राहिल्या. अशा सगळ्या दुर्गांना मनोमन शतशः प्रणाम...



                           अश्र्विन शुद्ध प्रतिपदा
                              ता. १७.१०.२०२०
                                 ललिता छेडा.




Wednesday, September 30, 2020

अनुभवातून आयुष्याचा.....प्रवास

       आपण आयुष्यभर केलेल्या प्रवासाकडे २७ सप्टेंबरला असणार्‍या जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने जाणीवपूर्वक बघायचं ठरवलं. नुसतं प्रवासवर्णन न लिहिता प्रवासात आलेले समृद्ध अनुभव, नद्या, डोंगर ह्यांच्यामुळे नव्यानं उलगडणारा निसर्ग ह्याबद्दल लिहावंस वाटलं!    

      प्रत्येक जागेचं आपलं स्वत:च आगळंच सौंदर्य असतं. कन्याकुमारीचा बीच आणि विवेकानंद मेमोरियल म्हणजे भारून टाकणारी जागा! तिथला सुर्योदय एका ठराविक जागेवरून बघितला तर 'सुर्य' विवेकानंद राॅक आणि तिरूवल्लुवर‌ स्टॅच्यु या दोन्ही प्रेरणादायी वास्तुंच्या मधून उगवतो. आम्ही मुद्दाम त्याजागी जावून तो सूर्योदय बघितला. तीन समुद्रांचा संगम समोर वाळूवर पसरलेला पिवळा रंग, आकाशात उधळलेला केशरी रंग! अचानक मनांत आलं ते दृश्य जणू सांगतंय की" उठा, जागे व्हा आणि लक्ष्य प्राप्त झाल्याशिवाय थांबू नका" खूप वर्ष झाली कन्याकुमारीला जावून पण तो उर्जा देणारा सुर्योदय अजूनही विसरता येत नाहीये...तसाच दुसरा हिमालयाला सोनेरी मुकुट घालणारा सुर्योदय म्हणजे दार्जिलिंगचा....आपण उभं असलेल्या जागेसमोर निळसर आभाळ डाव्या बाजूला नुसता अंधार आणि मध्ये फक्त जाणवणारी खोल दरी, अचानक समोर आभाळाचे रंग बदलू लागतात लाल, नारंगी अशा अनेक रंगांची उधळण सुरू होते आणि तो दिमाखात हळूहळू दृष्य क्षितीज रेषेखालून वर येऊ लागतो आणि डावीकडे एक चमत्कार घडतो...आपण हिमालयासमोर उभे आहोत हे कळतं आणि जसाजसा तो उगवतो तशी तशी हिमालयाची उत्तुंग शिखरं सोनेरी होऊ लागतात. तो क्षण फक्त डोळ्यांच्या कॅमेऱ्यातून ह्रदयात निशब्द होऊन साठवून ठेवलाय. कोणत्याही उदास क्षणी क्षितीज रेषेखालून येऊन हिमालयाला सोनेरी करणारं ते दृश्य पुन्हा एकदा प्रेरणा देऊन जातं....

        नदी...मला तरी प्रवासात अनेकदा अनेक रूपात भेटलेय. 

       ऋषिकेशच्या लक्ष्मणझुल्या खाली खळाळत वाहणारी गंगा, हरिद्वारच्या हर की पौडीला रात्रीच्या वेळी होणार्‍या तिच्या आरतीच्या वेळी दिसणारं अखंड गतिमान चिरंतन गंगेचं रूप, रुद्रप्रयागला अलकनंदा आणि ‌मंदाकिनी ह्यांच्या संगमानंतर एक देखणं रुप घेऊन गंगा‌ म्हणून वाहतानाच सोज्वळ रूप! अशी ही गंगा जी एका काठावर स्मशान आणि दुसर्‍या काठावर बहरलेली संस्कृती ह्यांचा समतोल साधत एका लयीत वाहत जातेय. कुलु ते मनालीच्या प्रवासात बियास नदी आपल्या खळाळणार्‍या आवाजांनी आपल्याला संगीतमय सोबत करते. मनालीची‌ आठवण म्हणजे कानात रूंजी घालणारा‌ बियासचा आवाज!!
       पिठापूरला जाताना राजमुंद्रीला विस्तीर्ण पात्र असलेली‌ स्वच्छ, संथ वाहणारी गोदावरी मन मोहून टाकते. तिचा पुतळा ह्या स्टेशनवर एकमेव नदीचा पुतळा म्हणून आपलं स्वागत करतो. लेह-लडाखला‌ अचानक सिंधू नदी भेटते. तिच्या पात्रात पाय सोडून बसल्याचा आनंद अवर्णनीय असतो. जबलपूरच्या भेडाघाटात नर्मदा जलप्रपातच्या रौद्र रूपात भेटते. बद्रीकेदारला आदिबद्री जवळ उगमाशीच लुप्त झालेली सरस्वती! गुजरातमध्ये फिरताना साबरमतीच्या किनार्‍यावर असलेल्या म. गांधींजींच्या आश्रमांमुळे साबरमती संतांच्या रूपात भेटते. अशा ह्या नद्या, पाण्याशी निगडित असलेल्या संस्कृतीतल्या बदलांना स्वीकारताना त्यांच्या धारांचा, प्रवाहाचा अनाहत नाद आपल्याला त्या‌ क्षणापुरता तरी मुक्ती देत असावा.
       लग्नाच्या आधीचे प्रवास खूप वेगळे होते. एस्. टी, ट्रेन ह्यांचे प्रवास अतिशय नियोजित आणि आर्थिकदृष्ट्या काटकसरीचे असायचे तरीसुध्दा मजेत व्हायचे. 
       लग्नानंतर मुलांसाठी त्यांच्या सुट्टीत त्यांच्याबरोबर केलेले प्रवास वेगळ्याच आठवणी मनात ठेवून गेलेत.
       साठीनंतर युरोप-अमेरिकेच्या परदेशच्या टूर! हे प्रवास ट्रॅव्हल कंपन्यांबरोबर केल्यामुळे वेगवेगळ्या विचारांची, विविध संस्कृतींची माणसं भेटली. काहीजणांशी तर घट्ट मैत्री देखील झाली. भूतानचा‌ प्रवास निसर्ग बघताना करावा लागणारा बस प्रवास थकवून ‌टाकतो. तर अंदमानला जाणं म्हणजे देशभक्तीचा अंगार फुलवून येणं असा अनुभव देऊन जातो.
        युरोप अप्रतिम निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी जावं तर टेक्नाॅलाॅजीसाठी अमेरिका अनुभवावी. युरोप मधल्या आॅस्ट्रीयाच्या मी तरी प्रेमातच पडले. व्हॅटिकन सिटी ह्या छोट्याश्या देशात चालताना पाय दमतात पण तिथल्या वास्तुशास्त्र आणि कला ह्याचं दर्शन मनाला भुरळ घालतं! भित्तिचित्रं आणि छतावरच्या कलाकृती 'लास्ट जजमेंट'च्या निर्मात्याला जागोजागी भेटवतात.
       अमेरिका म्हणजे प्रत्येकाचं स्वप्न 'नायगरा...जो तिथं गेल्यावर पूर्ण स्वप्नपूर्तीचा आनंद देतो आणि ट्वीन् टाॅवरचं स्मारक म्हणजे अमेरिकेला पडलेलं दु:स्वप्न!!
        हे सगळे प्रवास कोणाबरोबर तरी केलेले आहेत पण लेह लडाखचा प्रवास मात्र अनोळखी गृपबरोबर एकटीने केला. तो माझ्यासाठी लक्षात रहाणारा ठरलाय. तो नुसता अप्रतिम              निसर्गसौंदर्य असणारा प्रदेश नाहीये तर ती एक संस्कृती आहे. तिथले अनेक रंगांचे पर्वत आणि पेन्गाॅन लेक फक्त अविस्मरणीय!
       धबधबे खूप बघितले पण तामिळनाडूतल्या कुडतालम् चे 5 falls, म्हणजे जंगलात पाण्याचे पाच अखंड स्त्रोत्र ज्यांचा नुसता स्पर्श आपलं शरीरच नाही तर मन पण निर्मळ करून जातात!!
       असे हे माझे आठवणीतले काही प्रवास ज्यांचं अनपेक्षित वळण खूप छान अनुभव देऊन गेले आहेत.
       एखाद्या कलाकाराचा संघर्षाचा प्रवास, भविष्यकाळ शोधणारा ज्योतिषांचा प्रवास, अडचणी, अडथळ्यातून केलेला जगण्याचा प्रवास आपण सर्वचजण करतोय!
       पण निवांत, निसर्गरम्य ठिकाणी जगण्याला एक सुंदर सुर असतो जो आपल्याला निसर्गाच्या लयीत मिसळून टाकतो आणि तोच खरा अनुभवातून आयुष्याचा प्रवास...


                      अधिक अश्र्विन पौर्णिमा
                          ता. ३०-९- २०२०
                              ललिता छेडा

Friday, September 18, 2020

महिना...अधिकाचा

                    जगणं... अधिक-उणं


          ह्यावर्षी अधिक अश्र्विन आला आहे. आणि अधिक महिना ही खरं म्हणजे खगोलशास्त्रीय अॅडजस्टमेंट आहे. अगदी साध्या भाषेत सांगायचं तर दैनंदिन जीवनचर्या ठरवताना सुर्यामधले बदल नोंदवून कालगणना करण कठीण जात होतं आणि म्हणूनच दैनंदिन जीवनात चंद्र उपयोगी ठरला. त्यामुळेच जगभरातील अनेक संस्कृतींमध्ये दैनिक व्यवहारासाठी चांद्र आणि वार्षिक व्यवहारासाठी सौर कॅलेंडर वापरले जाऊ लागले. या दोन्ही कॅलेंडर मधल्या कालगणनेत तफावत येऊ नये म्हणून काही सुधारणा करून चांद्रवर्षामध्ये ठराविक कालावधीनंतर म्हणजेच तीन वर्षांनंतर एक महिना अधिक घेतला जाऊ लागला.
          ह्यावेळचा अधिक महिना मात्र काही तरी वेगळं शिकवून जाणार आहे. एखाद्या देशाच्या नव्हे तर जगभरातल्या सीमा ओलांडून कोरोना विषाणूने संपूर्ण जगासमोर भयंकर आव्हान उभं केलंय. त्यातही चक्रीवादळ, आर्थिक मंदी अशा अनेक संकटांनी आपल्या देशाला घेरून ठेवलंय!
          ह्या परिस्थितीत फेसबुकवर एक सुंदर पण विचार करायला लावणारी पोस्ट वाचली. लेखिकेने अपरिग्रहावर तिचे विचार मांडलेत....
          "कमळ हे अपरिग्रहाचं प्रतिक मानलं जातं! अलिप्ततेचं न गुंतण्याचं प्रतिक!! अनेक धर्मात, मातीत, लोकांत 'कमळ सांगते स्वत:कडे साठवून ठेवू नको, वाहू दे पानावरून ओघळू दे. जितकं धरून बसशील तितकं ते दूर जाणार!!
          लेखिकेने लिहीलेले संदर्भ ‌तिचे स्वत:चे आहेत. पण ‌मला मात्र हे‌ विचार कुठेतरी आजच्या परिस्थितीशी जोडून घ्यावेसे वाटले...
‌‌ आज कोरोनाशी लढताना जाणवलं की आपण आपल्या गरजा नकळत अपरिग्रहाच्या दिशेने नेत होतो. गरजेच्या पूढे सुरू होतो तो मोह आणि त्यानंतर येतो हव्यास! आज घरात बसलेल्या आपल्या सर्वांना गेल्या सहा महिन्यांत वापरलेल्या कपड्यांच आणि कपाटात जमा असलेल्या कपड्यांच्या संख्येचं गणित गरजेपेक्षा अधिक असल्यांच जाणवतंय! मोठेपणा साठी लग्नावर पैसा, अन्न ह्यांची वारेमाप उधळण करणाऱ्या आपल्याला ५० जणांना बोलवून पण लग्न समारंभ संपन्न करता येतोय ते कळतंय. महत्वाचं म्हणजे हे सगळं वेगवेगळ्या बाबतीत सगळ्यांनाच जगण्यातलं अधिक- उणं दाखवून देतंय.
           माझ्यासाठी अधिक महिना म्हणजे आई करत असलेले अनारसे, कारण तिला अनारसे खूप आवडायचे आणि त्यासाठी ती एखाददुसरी आॅडरही घ्यायची आणि अनेकदा ती ह्या महिन्यात जेवताना मौन पाळायची त्या‌ आठवणी !!
          तशीच एक बोचरी आठवण आहे ती म्हणजे "आमच्या ओळखीतल्यांच्या घरी माझ्या आई-वडिलांना ३०+३ मेहूणातले एक म्हणून बोलावलं होतं. समारंभ खूप थाटामाटात आणि देखणा व्हावा ह्यासाठी सर्वजण धावपळ करताना दिसत होते. त्या काकू माझ्या आईची मैत्रीण त्यामुळे आईनी अगदी सहज विचारलं" का गं, तुझी बहिण दिसत नाही कुठे? त्यावर काकू उतरलेल्या ‌चेहर्‍यानी म्हणाल्या होत्या तिचे यजमान गेल्या वर्षी गेले ना, म्हणून सासूबाई तिला बोलावू नको म्हणाल्या!! त्यावेळी माझं वय अडनेडी होतं. पण तरीही मला ते काही पटलं नव्हतं येवढं नक्की आठवतंय.
          घरी आल्यावर मी आईला विचारलं होतं की "‌हे ३०+३ काय आहे. तेव्हा तिनं काय सांगितलं ते आठवत नाही पण तिलाही काकूंच्या बहिणीला जी वागणूक दिली गेली ते‌ आवडलं नव्हतं असं जाणवलं.
         आज‌ वाटत विचारांचा सुध्दा अपरिग्रह नसावा, प्रत्येकाबद्दल भूतकाळातल्या घटनांमधून मतं बनवून मनात साठवून ठेवण्यापेक्षा माणसं काळानुसार बदलतात हे लक्षात घेऊन नदीसारखं वाहतं रहावं.
         ही पोस्ट लिहीण्यासाठी वाचन करताना कळलं की जावयाला ‌दीपदान आणि अनारसे ह्यांचं अधिकाच वाण देण्यामागची संकल्पना म्हणजे मुलीला आणि जावयाला लक्ष्मी-नारायणाचा जोडा समजून‌ हे वाण द्यायचं आणि म्हणूनच तेहत्तीस न म्हणता ३०+३ म्हणायची पद्धत आहे. म्हणूनच अधिक महिन्यांला पुरुषोत्तम (विष्णू) मास म्हणतात.‌ ह्यावेळी तर लीप ईयर आहे त्यामुळे असा योग १६० वर्षांनंतर जुळून आला आहे.
         माझी मैत्रीण मेधाताईं बोडस ह्यांनी अधिक महिन्याची एक वेगळीच गोष्ट सांगितली. त्यांच माहेर अलिबागचं असल्यामुळें अलिबाग पासून २ कि. मी. वर असलेल्या वरसोली गावांत एका नारळाच्या वाडीत असलेल्या देवळाची कथा त्यांनी सांगितली. त्या नारळाच्या वाडीत एक चौथरा आहे ज्याला चार खांब आहेत तिथे एक शिवलिंग आहे जे कायम नारळाच्या झावळ्यांनी झाकलेलं असतं. पण ज्यावेळी अधिकमास येतो तेंव्हा झापं काढून शिवलिंग मोकळं केलं जातं. त्यामुळे अधिकमासात तिथे खूपजण दर्शनासाठी जातात. त्यांनी हे सांगितल्यावर मनांत आलं...
         ह्या अधिक महिन्यांपासून अपरिग्रहाची, जुन्या चुकीच्या रीतरिवाजांची झापं काढून मन मोकळं करायला हवं.
         जावयाला दान देताना माझ्या लेकीला सन्मानाची वागणूक दे आणि लेकीला सासरी सर्वाना प्रेमाने जिंकुन घे असं सांगायला हवं.
         ३०+३ गरीब विद्यार्थ्यांना पुस्तकाचं,एकल महिलांना जगण्याच्या बळाचं अधिकाचं वाण द्यायला हवं.
         तरच जगण्यातलं, मनातलं उणं जाऊन अधिक महिना सफळ सुफळ संपूर्ण होईल.


               अधिक अश्र्विन शुद्ध प्रतिपदा
                       ता. १८- ९-२०२०
                          ललिता छेडा



Tuesday, September 1, 2020

स्वातंत्र्य..... तुमचं, माझं,आपलं सर्वांचं!

          आॅगस्ट म्हणजे देशभक्तीचा महिना! ह्याच महिन्यातल्या ९ आॅगस्टला क्रांती ‌दिन साजरा केला जातो. कारण ८ आॅगस्टला गांधीजींनी ब्रिटीशांना 'भारत छोडो'चा इशारा दिला आणि ९ तारखेला सर्वत्र जनक्षोभ उसळला. तो स्वातंत्र्याचा शेवटचा आणि मोठा लढा! ह्याच वेळी अरूणा असफली यांनी इंग्रजांना‌ न जुमानता गोवालिया टॅंकवर तिरंगा फडकवला होता. हे सगळं लिहीण्याचं कारण म्हणजे नुकतेच टी. व्ही. वर स्वातंत्र्यदिनादिवशी तरुण पिढीला काही प्रश्र्न विचारले जात होते आणि दुर्दैवानं बरीचशी उत्तरं त्यांना देता येत नव्हती!! त्यातला एक प्रश्न होता "स्वातंत्र लढ्यात सहभागी असलेल्या एका महिलेच नांव सांगा? १५/२० जणांमध्ये कोणालाही एक नांव सांगता आलं नाही. प्रश्र्न रस्त्यावर विचारत होते. त्यामुळे एक मुलगा म्हणाला"असं अचानक कसं आठवेल? त्यावर पत्रकारानी छान उत्तर दिलं "स्वात्रंत्र्याविषयी काहीही झोपेतसुध्दा विचारलं तर उत्तर यायला हवं! "तुम मुझे खून दो.. कोणी म्हटलं आहे? ९० टक्के मुलांना उत्तर सांगता आलं नाही. 

         तेव्हा मनात विचार आला की ह्या पिढीला मिळालेलं स्वातंत्र्य ही‌ अशी संकल्पना आहे जी हक्क आणि जबाबदारीची जाणीव करून देते हे सांगण्याची आवश्यकता आहे असं जाणवतंय! त्यामुळे 'इंडिपेंडन्स' म्हणजे आपल्यावर कोणाचंही बंधन नाही असा साळसूद अर्थ काढला जातो. 

ह्यावर्षीचा आपला ७४ वा स्वातंत्र दिन होता. पण तो कोरोनाच्या छायेतच साजरा करावा‌ लागला. 

‌         कोरोनाच्या ह्या काळात ‌बंधन आणि स्वातंत्र्य दोन्ही गोष्टी ‌हातात‌ हात घालून चालायला हव्या होत्या. पण‌ तसं होताना कमी जाणवलं. लोकांनी स्वत: पूढे होऊन सरकारी यंत्रणेला मदत करावी अशी अपेक्षा होती. पण हातावर पोट असलेल्या लोकांबरोबर उगीचच मास्क न लावता फिरणारे ही बरेच होते. हा स्वातंत्र्याचा दुरूपयोग आहे असं वाटलं!! त्याचबरोबर नियोजनाच्या अभावामुळे लाॅकडाऊनमध्ये व्यवस्थापनही नीट होऊ शकत नव्हतं.
         स्वातंत्र्या विषयी अच्युत गोडबोले ह्यांनी खूप छान लिहिलंय "स्वातंत्र्य ह्या संकल्पनेला ठराविक चौकटीत बसवण्यापेक्षा ह्या संकल्पनेच्या अर्थाचा आता शोध घ्यायला हवाय. म्हणजेच भारतातल्या प्रत्येकाला अगदी तळागाळातील लोकांपर्यंत किमान सोईसुविधा ‌निवारा, वीज, शिक्षण, वाहतूकीसाठी सोय आणि महत्त्वाचं म्हणजे आरोग्य हे सर्व मिळालंच पाहिजे"
         तसंच मिळालेलं स्वातंत्र्य खऱ्या अर्थानं प्रत्येकानं कसं जोपासावं‌ हा सुध्दा एक महत्त्वाचा सामाजिक विचार होऊ शकतो. स्वत:वर अनेक सामाजिक बाबींबाबत स्वत:चं नियंत्रण असलंच पाहिजे. अगदी साधी‌ रस्त्यावर थुकण्याची‌ सवय!! हा स्वच्छतेचा साधा नियम पाळण्याची किती गरज आहे आणि आता आरोग्याचा प्रश्न इतका गंभीर झाला आहे अशावेळी तरी असे साधे साधे स्वच्छतेचे नियम पाळणं आवश्यक आहे नाही का?
चंगळवाद, पर्यावरणाचा समतोल, निसर्गाची जपणूक ह्या सगळ्या गोष्टींचा जाणीवपूर्वक विचार करणं म्हणजे स्वातंत्र्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकणं आहे. इथं सर्च संस्थेच्या डॉ. आनंद बंग ह्याना लोकसंख्येवर‌ प्रश्र्न विचारल्यावर "माणसं 'किती' पेक्षा 'कशी' आहेत ‌हे‌ महत्वाचं आहे." असं उत्तर दिलं होतं. तेव्हा माणसं कशी आहेत ह्यावर समाजाच्या स्वातंत्र्याचं भविष्य ठरणार आहे हे लक्षात घेतलं पाहिजे.
         स्वातंत्र्य अंमलबजावणीत मोठी अडचण स्त्रीयांच्या बाबतीत येते. स्वातंत्र्य मिळालं आहे पण त्याचा वापर कसा करायचा ते मात्र दुसरं कोणी तरी ठरवणार. अशा परिस्थितीशी लढा द्यायला बळ देणार्‍या अनेक संस्थां/स्रिया अशा महिलांच्या पाठीशी उभ्या ‌आहेत.‌ पण जेव्हा एखादी स्त्री नोकरीच्या ठिकाणी होणाऱ्या त्रासाविरूध्द आवाज उठवेलं किंवा घरातल्या जवळच्या नातेवाईकाकडून लैंगिक छळाविषयी प्रतिकार करेल तेव्हा स्वातंत्र्याचा अर्थ कळतोय असं म्हणू शकतो.
        १५ आॅगस्टच्या निमित्ताने स्वातंत्र्याविषयी संकल्पना, संवेदना ह्यावर वाचलेल्या लेखांमधून, आजूबाजूला घडणाऱ्या घटनांमधून मला जे वाटलं ते ‌लिहीण्याचा प्रयत्न केला. 
कारण आपल्या सर्वांची,
'देश हा देव असे माझा'
‌‌ हीच भावना मनात कायम असते आणि तशीच असली पाहिजे.
                   

                  भाद्रपद शुद्ध पौर्णिमा
                      ता. १.८.२०२०
                        ललिता छेडा


Wednesday, August 19, 2020

भक्तीचा भाद्रपद

          । त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोसी।


श्रावणसरीत न्हातच भाद्रपद येतो आणि गणरायाच्या आगमनाची चाहूल लागते. सत्-चित्-आनंदरुपी अशा गणेशाची मूर्ती आणताना सर्वांनाच  जाणवत असतं की हिची ज्ञान आणि विज्ञान अशी दोन रूपे आहेत. उत्सवाच्या निमित्तानं अथर्वशीर्ष कानावर पडत आणि हे वाक्य सतत मनात रूंजी घालत रहातं. त्यामुळेच विज्ञानाच्या जोडीनं येणारं ज्ञानच खरं आहे हे मनातल्या मनात नक्की होत जात...

     माझ्या माहेरी गणपती येत नसल्याने माझ्यासाठी लहानपणी गणेश उत्सव म्हणजे गणेश दर्शनासाठी आईसोबत तिच्या मैत्रीणींच्या घरी जायचं आणि दादांबरोबर (वडिलांना मी दादा म्हणायचे) गिरगाव, परेल मधले मोठे मोठे गणपती बघायला जायचं येवढाच होता. तेव्हा हल्ली सारखी नवसाची वेगळी, व्ही. आय. पी. वेगळी, फक्त मुखदर्शन अशा रांगांची व्हरायटी नसायची. दुपारच्या वेळी मंडपात दहा बारा पोरं खेळत असायची. त्यातलाच एक धावत येऊन प्रसाद द्यायचा. आजुबाजुचे दुकानदार ‌सुखेनैव व्यापार करायचे. हल्ली मात्र अफाट गर्दीमुळे म्हणे त्या दुकानदारांना दहा दिवस दुकानं बंद ठेवावी लागतात. त्यावेळी शांतपणे दर्शन घेतलं की मुर्ती भोवतालच्या देखाव्यांविषयी चर्चा आणि ऐतिहासिक गोष्टींवर आधारित तो देखावा असेल ती गोष्ट ऐकत पुढच्या गणपतीला जायचं असं सगळं साग्रसंगीत दर्शन व्हायचं. दादांना गोष्टी सांगायला खूप आवडायचं आणि ते त्या सांगायच्याही रंगवून. 

माझा मात्र आवडीचा दिवस म्हणजे 'अनंत चतुर्दशी' कारण त्यादिवशी आम्हाला खारला रहाणार्‍या माझ्या आतेभावाकडे दरवर्षी अनंताची पूजा असायची. पूजेच्या तयारीपासून गुरूजींच जेवणं आटपेपर्यंत सर्व जबाबदारी आत्यांनी माझ्या आईला दिलेली होती आणि आई ती अगदी मनापासून आणि आनंदाने निभवायची.

    त्या आतेभावाचं घर खारला एका मोठ्या, देखण्या बंगल्याच्या आऊट हाउस मध्ये होत. बंगल्या भोवतालची बाग, एक मोठा हौद, बागेत बसायला संगमरवरी बाकं, सुंदर झोपाळा त्यामुळेच माझं आकर्षण म्हणजे पूजा होईपर्यंत त्या बागेत मनसोक्त हूंदडायचं. त्याशिवाय गेटजवळ एक चौथरा होता त्यावर बसलं की पूर्ण रस्ता दिसायचा. त्या गल्लीत अनेक सिनेसृष्टीतील कलाकारांचे बंगले होते आणि तो दिवस सुट्टीचा असल्यानं अनेकदा पुढच्या गल्लीतल्या खार जिमखान्यात जाणार्‍या अनेक सुप्रसिद्ध नटनट्यांच दर्शन होत असे. त्यांना तसं बघताना मजा वाटायची. ह्या सगळ्या आठवणी पन्नास वर्षांपूर्वीच्या आहेत त्यामुळे आत्तासारखी सिक्युरिटी, महागड्या गाड्या असं काहीच नव्हतं.

    जेवणं झाली की आम्ही लगेच परळला घरी परतायचो. कारण आमच्या दारावरुन विसर्जनाच्या मिरवणुकी सुरू व्हायच्या! आठवणीतली मिरवणूक म्हणजे राजकमलच्या गणपतीची! आणि त्या मिरवणूका बघायला पाहुणे यायचेच. आई पुन्हा संध्याकाळच्या तयारीला लागायची. आता विचार केला तर वाटतं इतकी ऊर्जा हिच्याकडे कुठुन यायची. पुन्हा थकवा नाही, स्वैपाकाचं टेन्शन नाही. मला वाटतं कारण एकच तिला सर्वांना जेवू घालायला आवडायचं.

     लग्नानंतर श्रावण-भाद्रपदातला 'पर्युषण' हा सण मी कच्छी जैनांची सुन झाल्यामुळे कळला आणि स्वभावाप्रमाणे एकंदरच जैन धर्म आणि पर्युषण पर्व ह्याबद्दल खूप वाचन केलं. त्यामुळे मला कळलेला पर्युषण म्हणजे ज्ञान, दर्शन आणि संयमसाधना ह्याचं महत्त्व जाणवून देणारा जैन धर्मातील खास सण हे कळलं. हे पर्व आठ दिवस असल्याने पर्युषणाला 'अठ्ठाई' असे सुध्दा म्हटलं जातं. यापर्वात पाच महत्त्वाची कर्तव्य मानली जातात.

१) अहिंसा-ज्यात निष्क्रिय 'अहिंसा' म्हणजे कोणत्याही जिवाला न मारणे आणि सक्रिय 'अहिंसा' म्हणजे एखाद्या जिवाला वाचवणे.

२) साधर्मिक भक्तीप्रत्येकानं आपल्या आजूबाजूला रहाणाऱ्या सहधर्मिकाविषयी काळजी घेणे, आदर ठेवणे.

३) क्षमा-मनातला क्रोध संपवून क्षमाशील व्हायचं. वर्षभर आपण कृतीनं, शब्दानं ज्यांना दुखावलं असेल तर त्यांची क्षमा मागायची.

४) अठमतप-अठम म्हणजे तीन दिवस संपूर्ण उपास! तीन दिवस सुर्योदयापासून सुर्योदयापर्यंत फक्त उकळलेले पाणी पिऊन रहावयाचे. ह्या तपस्येला अनन्यसाधारण महत्व आहे.

५) चैत्य परिपाटी-चैत्य म्हणजे जैन मंदिरे आणि परिपाटी म्हणजे परिभ्रमण! वेगवेगळ्या देवळात जाऊन चोवीस तीर्थंकरांच दर्शन घेणं. ही पांच प्रमुख कर्तव्ये पर्युषण पर्वात महत्त्वाची मानली जातात.

चौथ्या दिवसापासून 'कल्पसुत्र' ह्या जैन धर्मातील पवित्र पोथीचे वाचन मंदीरात जैन साधू आपल्या प्रवचनातून सुरू करतात. ‌

  पाचव्या दिवशी पोथीतलं महावीरांच्याआईला गरोदरपणात पडलेल्या चौदा स्वप्नांविषयी त्यांच्या वडिलांच्या म्हणजेच सिध्दार्थराजांच्या वैभवाच्या वर्णनाच्या विषयीच्या कथांचं वाचन होतं.‌

सहाव्या दिवशी महावीरांच समग्र चरित्र सांगितलं जातं. सातव्या दिवशी पोथी पूर्ण होते.

  सात दिवसांच्या साधनेच्या फलश्रुतीचा आठवा संवत्सरीचा दिवस! जो भाद्रपद शुद्ध पंचमीला असतो. ह्या दिवशी बहूतेक सर्वजण उपवास करतात. या दिवशी देवळात किंवा घराघरात जैन बांधव एकत्र येऊन अडीच तीन तासांची एक धर्मक्रीया करतात. ज्याचा उद्देशच आहे आत्मशुध्दी आणि सर्वांवर प्रेम!! त्यानंतर सर्वजण नमस्कार करून 'मिच्छामी दुकड्डम्' असे म्हणतात. मिथ्या मे दुष्कृत्यम्। म्हणजेच माझी दुष्कृत्ये, चुका विसरुन मला क्षमा करा.

   असे ‌हे क्षमा शिकवणारे जैनांचे पर्युषण पर्व मला तरी आत्मभान जागृत करणारे आहे असं  मनापासून वाटतं.

    असा हा भाद्रपद महिना, श्रावणातल्या सोनेरी उन्हाला आणि अश्र्विनातल्या पिवळ्या धमक उन्हाला जोडणारा एक सुंदर दुवा! फुलं-पत्रीनी सजणारे गौरी गणपती आपल्याला निसर्गाच्या जवळ घेऊन जातात. ऋषींची भाजी, उकडीचे मोदक, घावनघाटल अशा आजी-आईनी शिकवलेल्या पदार्थांमुळे सजणारी ताटं त्या त्या ऋतूत काय खावं ह्याचे धडे देतात. 

      ह्याच महिन्यात येणारा पितृपक्ष जो आपल्या पुर्वजां प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा पंधरवडा असतो आणि त्यामुळेच ह्या दिवसात शुभकार्य करू नये ही अंधश्रद्धा अजिबात बाळगु नये. कारण त्या पुर्वजांनी केलेले संस्कार, परंपरांचे स्मरण करून देणारा तर हा भाद्रपद महिना आहे आणि तो सण, उत्सवांना घेऊन  येतोच मुळी निसर्गाच्या हिरव्यागार पायघड्यांवरून! 

      निसर्ग तोच आहे पण आपण मात्र पर्यावरणाची काळजी न घेतल्याने सध्या ऋतुचक्र वेडंवाकडं फिरताना दिसतंय. जिकडे तिकडे उभ्या केलेल्या सिमेंटच्या जंगलांनी आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणावर केलेल्या वृक्षतोडीमुळे डोंगरांवरच्या दरडींच स्खलन होतंय, पूरस्थिती निर्माण होतेय आणि ह्यासाठी आपल्या प्रत्येकाला ह्या भाद्रपदात येणाऱ्या सार्वजनिक सणांच्या निमित्ताने पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी स्वत:ला शिस्त लावून घेतली पाहिजे. वृक्षवेलींशी दुरावलेल्या आपल्या नात्याला पुन्हा एकदा जपल पाहिजे. त्यानंतरच आपल्याला पावसाच्या नंतर भाद्रपदात दिसणाऱ्या इंद्रधनुष्याचे स्वागत करता येईल.

ह्या वर्षीच्या भाद्रपदाला मात्र कोरोनाची काळी किनार लागली आहे. तुफान पाऊस, भयंकर साथीच्या आजाराची भीती, एकंदर आलेल्या परिस्थितीमुळे करावं लागलेलं स्थलांतर सगळंच कसं परीक्षा घेणार ठरलं आहे.
ह्या बदलत्या काळानुसार रीती-परंपरांचा वेगळा विचार करायला हवाय. अनेक संस्थांनी गणेशोत्सवा ऐवजी आरोग्य उत्सव करण्याचं ठरवलं आहे आणि हाच बदल स्वागतार्ह आहे.

सर्वांचच पुन्हा एकदा आरोग्यपूर्ण जीवन सुरू व्हावे हीच ‌विघ्नहर्त्या गजाननाला मनापासून प्रार्थना.


भाद्रपद शुद्ध प्रतिपदा
ता.१९.८.२०२०
ललिता छेडा

Monday, August 3, 2020

मृद् गंध- एक ऋणानुबंध

          'इंदिरा संत' माझ्या आवडत्या लेखिका, कवियत्री.....त्यांचा स्मृतिदिन जुलै महिन्यात येतो तेव्हा त्यांच्याच माझ्या आवडत्या पुस्तकाबद्दल लिहायचं ठरवलं. त्यांचा 'मृद् गंध' हा ललित लेखांचा संग्रह म्हणजे माझं अतिशय जवळच पुस्तक.
त्यांचे विचार, त्यांच्या आठवणी आणि त्यांचे अनुभव सहजसुंदर प्रवाही भाषेत असणं हे ह्या लेखांच वैशिष्ट्य आहे. आत्मकथनात्मक आठवणींमुळे अनेकदा ते प्रत्येकाला आपले स्वत:चेच अनुभव वाटतात.
 खिडकी झोपाळ्यावरी बसू, चुलघरात, भाववाहिनीच्या काठावर हे लेख आपल्या प्रत्येकाला स्वत:च्या घरातल्या खास जागेशी असलेलं नातं आठवून एक प्रसन्न अनुभव देतात. प्रत्येक स्त्रीला चुलघर वाचताना इंदिराबाई म्हणतात तसं 'ज्या घरातील स्वैंपाकघर आनंदमय, प्रसन्न असते, ते घर मला धन्य धन्य वाटते'. अशी भावना निर्माण करते.
प्रभाकर पाध्यांनी ह्या लेखांबद्दल खूप छान लिहिलंय" कोकणात गुळपाण्याने स्वागत करतात त्यातला आपलेपणा, गोडवा आणि सांस्कृतिक सहजता सर्वांनाच फार भावते....तसंच काहीसं तुमच्या सगळ्या लेखांतून जाणवतं" लेख वाचताना आपल्याला पण एक गोष्ट जाणवते की स्वत:शी बोलत असताना त्या आपल्याशी पण बोलत असल्याचा आपलेपणा वाचकांना वाटतो. उदाहरण द्यायचं तर 'माझं ऐक' ह्या लेखात अनाहूतपणे 'माझं ऐक' सांगणार्‍या लोकांना आपल्या सल्ल्यामुळे होणार्‍या परिणामांची कल्पना पण नसते हे‌ स्वानुभवातून इंदिराबाईंनी इतकं सहजसोप्या भाषेत सांगितलंय की ते आपल्याला मनोमनी पटून जातं.
तवंदीच्या आठवणी तर प्रत्येक माहेरवाशिणीला आपल्या गावाला, माहेराला घेऊन जातात. त्यांच्या झोपाळ्यावरच्या गप्पात जवळची फुलं, दूरचा यळ्ळूरगड, शेजारचा माळ सगळं सामील असतंच. त्याशिवाय त्यांच्या लेखातली पाणंदीची वाट, धुळफुलांची वास लेवून जाणारी पाऊलवाट, अष्टमीचं चांदणं सगळ सगळ मनावर पसरून जात..कर्‍हाड, बेळगाव ह्या गावांचे अनुभव पण असेच निसर्गरम्य आठवणींचे, वेगवेगळ्या अनुभवांचे आहेत.
संसार संगीतातल्या सुरांबद्दल 'सुर.... संवादी विसंवादी' ह्या लेखात लिहीताना त्या संसाराची सुरेल भैरवी व्हायला हवी असं म्हणतात. मैत्रिणीच्या मुलीची लग्नाबद्दलची मतं ऐकून आता मुली किती गंभीरपणे आणि स्वतंत्रपणे विचार करू लागल्या आहेत, आपली‌ मतं घरच्यां समोर मांडू लागल्या आहेत आणि हे इंदिराबाईंना मनापासून आवडतंय असं त्या आवर्जून लिहीतात.
माझे संमेलनाध्यक्षपद, एक न दिलेली मुलाखत असे लेख खरं म्हणजे त्यांना आलेले अनुभव आहेत पण त्यांनी ते सुद्धा त्यातली कटुता जास्त न दाखवता पारदर्शकपणे लिहीले आहेत.
माझी मैत्रीण सरोज हिने वाचलेला इंदिराबाईंच्या आयुष्यातील एक हृदय प्रसंग मला सांगितला 'संत पतिपत्नींनी विवाहाच्या आणाभाका घेताना एकेमेकांच्या बोटात बुचाच्या फुलांच्या मुद्रिका घातल्या होत्या. निसर्ग साक्षीचा किती सुंदर प्रसंग!
स्वच्छ सोनेरी उन्हाने
कधी झळालेलं मन
केव्हा कधी संपणार
माझ्या मनातील रात
असं लिहीणार्‍या इंदिराबाईंनी पति प्रा. ना. मा. संत यांच्या निधनानंतर चिरवियोगाचं दु:ख मनात ठेवून आपल्या तीन मुलांचं संगोपन केलं. त्याचकाळात लहान मुलांसाठी गोष्टी लिहून त्यांनी त्यांचा साहित्यिक प्रवासही सुरू केला. त्यानंतर मात्र त्यांनी लिहीलेल्या कवितांची निसर्ग, प्रेम, एकटेपणा आणि स्त्रीत्व हीच चार सुत्र होती.
असा हा माझा आवडता 'मृद् गंध'!!
आत्मचरित्र किंवा आत्मकथन हा प्रकार वाचायला मला नेहमीच आवडतो. लेखकाच्या अनुभवातून कुठेतरी आपण माणसं वाचायला शिकतो. त्यातसुध्दा स्री-आत्मचरित्र मनात अनेक प्रश्नांचे काहूर निर्माण करतात. ह्या आत्मचरित्राच्या लेखिकांचा स्वत: कडे पहाण्याचा आणि समाजाचा तिच्याकडे पहाण्याचा दृष्टीकोन एक वाचक म्हणून आपल्याला नक्कीच काहीतरी शिकवून जातो.
आत्मकथनातील‌ माहेरच्या गावाची ओढ, नात्यांची जपणूक, मैत्रीचे नाते हे सगळं इतकं सुंदर गुंफलेले असतं की आज राखी पौर्णिमा असल्याने मृद् गंधातल्या भावकवितेनं शेवट करते.


‌ "नेणता बंधू माझा,
‌ सांभाळ पाठभूज
मी ग ओवी गाते,
जन्म देणाऱ्या देवा एका
नेणता बंधू माझा
फुलपाकळीमधी राखा"
अशी ही एका अनाम मालणीची एक भावगाथा.


‌श्रावण शुद्ध पौर्णिमा
ता.३ आॅगस्ट २०२०
ललिता छेडा



Tuesday, July 21, 2020

श्रावणझुला..

             पंचमीला ग बांधून झुला
श्रावण आला ग सखी श्रावण आला।
प्रत्येकाच्या मनाच्या कोपऱ्यात उत्सवांचा ऋतू फुलवणारा श्रावण कायम हर्षच आणत असतो...
आषाढाचे २० दिवस नंतर श्रावण, भाद्रपद, अश्र्विन आणि पुन्हा कार्तिकाच्या सुरवातीचे १० दिवस असा एकूण चार महिन्यांचा चातुर्मास! त्या चार महिन्यातला श्रावण म्हणजे सृष्टीच्या चैतन्याचा महिना! ह्या महिन्यात प्रत्येकांसाठी आनंद देणारे सण-सोहळे साजरे केले जातात.
नवविवाहितेसाठी मंगळागौर, जिवतीची पुजा करुन मुलांना ओवाळणार्‍या आईसाठी मायेची ऊब, भावा-बहिणीचं नातं जपणारं रक्षाबंधन, घराघरात होणारी सत्यनारायणाची पूजा, त्याशिवाय गल्लीपासून मोठ्या मोठ्या चौकापर्यंत तरूणांसाठी गोकुळाष्टमीचा सार्वजनिक आनंदोत्सव, नारळी पौर्णिमेला निसर्गाची म्हणजेच समुद्राची पूजा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या महिन्यात आपल्या परंपरेनुसार प्राणीमात्रांसाठी सुध्दा कृतज्ञता व् श्रावणसरी! निसर्ग फक्त हिरव्यागार गालिच्यांनी सजलेला नसतो तर विविध रंगांची उधळणही करत असतो. एखादी सर येऊन गेल्यावर पडणारं पिवळं-केशरी ऊन, संध्याकाळी पाऊस पडून गेल्यावर ढगांची जांभळ्या, तांबड्या रंगांची रंगपंचमी, सुखावून टाकणारी वार्‍याची झुळूक! अशा पावसाळी वातावरणात डोंगरदऱ्यात फिरण्यासारखं सुख नाही पण ह्यावर्षी मात्र कोरोना संकटामुळे पावसाळी पर्यटन बंदच आहेत. पण निसर्गानी मात्र त्यामुळे मोकळा श्वास घेतलेला दिसतो.

माझी आई दर चातुर्मासात वेगवेगळे नेम धरत असे.
माझ्या आठवणीतले म्हणजे पांढरी फुलं, बेल, तुळस, दुर्वांच्या जुडी वाहायच्या, वाती लावायच्या असे चार महिने तिचे वेगवेगळे नेम चालायचे. तिच्या मैत्रिणी तिला त्यासाठी खूप मदत करायच्या. दामोदर हॉलच्या मागे छोटीशी बाग होती तिथं तिला खूप फुलं, दुर्वा मिळायच्या.
श्रावणातल्या दर शुक्रवारी जिवतीची पूजा मग मला ओवाळणं! एखाद्या शुक्रवारी सवाष्ण जेवायला असायची त्यादिवशी कधी पुरणपोळी कधी पुरणाच्या दिंडांचा बेत असं सगळं साग्रसंगीत असायचं. श्रावण सोमवारी शाळा लवकर सुटायची आणि त्यादिवशी जेवणं पण लवकर व्हायची. भाजलेल्या धान्याची खिचडी, धिरडी असा मेन्यू असायचा. श्रावणात आई प्रत्त्येक रानभाजी करायची. केन्या, टाकळा आणायला आम्ही दोघी कधी कधी डोंबिवलीला आत्यांकडे एखादी चक्कर सुध्दा मारत असू. मला आवडतात म्हणून ओल्या नारळाच्या करंज्या आणि नारळी भात हमखास ह्या महिन्यात व्हायचाच.
आमच्या परळच्या घरात माझ्या आईनं उषाकाकुची खूप हौसेनं मंगळागौर साजरी केली होती. रात्रभर खेळलेले मंगळागौरीचे खेळ, पहाटेची काॅफी सगळं अगदी लख्ख आठवणींत राहिलं आहे.
लग्नानंतर डोंबिवलीला आल्यावर श्रावणाचे खूप संदर्भ बदलले. गुजराती मंडळींची गोकुळाष्टमीच्या आदल्या दिवशी शिळासप्तमी असते. मी ती आवर्जून करायला लागले. सप्तमीच्या आदल्या दिवशी भेळेची तयारी, वर्‍याचे तांदूळ आदल्या दिवशी शिजवून फ्रीजला ठेवायचे, दहीवडे, घारगे असे बरेच पदार्थ ह्यानिमित्तानं बनवून ठेवायचे आणि त्यामुळे सप्तमीचा दिवस मस्त आरामात जायचा. हा उपास आपल्या मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी करावा हे कळल्यावर तर त्याला एक भावनिक जोड ही मिळाली.
ज्ञानदीप आणि महिला बॅंकेत काम करायला लागल्यावर हळदीकुंकू, सवाष्णीची ओटी भरणं ह्यासगळ्याला सामाजिक अर्थ असलेला जाणवला आणि विचार बदलले.
जैनांचं पर्युषण पर्व ह्याच महिन्यात सुरू होतं आणि भाद्रपदात संपत. त्यामुळे ती माहिती अर्थात भाद्रपदात येईल.
असा हा आठवणीतला श्रावण झुला......
महानोरांच्या शब्दात म्हणजे

।।रानांत रानांत जांभूळवनात
झडली श्रावणगाणी
गंधल्या मातीत पुनव उजट
अंकुरे लाख वितांनी।।

श्रावण
 शुद्ध प्रतिपदा
ता. २१ जुलै २०२०
ललिता छेडा.




Sunday, July 5, 2020

दादा आणि मी....

         गेल्या काही वर्षांत अनेक प्रकारचे 'डे' दर महिन्याला साजरे होऊ लागलेत. त्याचा एक मोठा फायदा झालाय आणि तो म्हणजे काही व्यक्ति, संबंध ह्यांचा विचार आपण फार कमी करत होतो, त्याविषयी व्यक्त होण्याची संधी मिळू लागली. असंच एक नातं म्हणजे वडील आणि मुलांचे नातेसंबंध!
जुन महिन्याच्या तिसऱ्या रविवारी येणारा 'फादर्स डे' माझ्यासाठी हा लेख लिहायला प्रेरणा देऊन गेलाय.
ह्या लेखाच्या निमित्ताने बापलेकीच्या नात्यातल्या वेगवेगळ्या वळणांचा, विविध टप्प्यांवर बदलेल्या संबंधांचा विचार करायला लावणार्‍या अनेक आठवणी ताज्या झाल्या. संगोपन, समुपदेशन हे शब्द आमच्या पिढीतल्या अनेकांना अजिबात माहीत नव्हते. कारण आई वाढेल ते निमुटपणे खायचं आणि वडील म्हणतील ते काहीही न बोलता ऐकायचं! अशी साधारणपणे त्याकाळाची लाईफस्टाईल होती.
दादांच्या स्वभावातला रागीटपणा, शिस्त ह्याचं दडपण नक्कीच होतं. त्यांच्या रागीटपणाचा अनुभव त्यांच्या जवळच्या बहुतेकांनी कमी-जास्त प्रमाणात घेतलेलाच आहे. पण मी मात्र त्यांच्या स्वभावातली खास वैशिष्ट्यं, आम्हां बापलेकीच्या नात्यातल्या गमतीजमती इथं शेअर करणार आहे.
दादांच वाचन खूप होतं. त्यातसुद्धा वाचलेल्या गोष्टींची टिपणं काढण्याची त्यांची वेगळी पध्दत होती. ती टिपणं म्हणजे वाचलेल्या लेखांवर, गोष्टींवर त्यांचं भाष्य असायचं. मला आवर्जून ते वाचायला सांगत असत. पण मी मात्र तेव्हा वाचायला अळंमटळंम करत असे. आज त्याचा नक्कीच पश्र्चाताप होतोय. सकाळी रोज सगळे मराठी पेपर आॅफीसमुळे आमच्या घरी यायचे. जवळजवळ तासभर त्यांचं पेपर वाचन चालायचं. आमच्या घरी नवशक्ती यायचा बाकीचे पेपर ते खाली आॅफिसमध्ये घेऊन जायचे. साधारण सहावी इयत्तेनंतर मी रोज शाळा सुटल्यावर इंग्रजी पेपर वाचायला आॅफिसमध्ये जात असे, तेव्हा इतर पेपरातल्या महत्त्वाच्या बातम्या, अग्रलेख मी वाचावेत यासाठी खूणा करून ठेवलेले असायचे. त्यांच्यामुळेच मला वाचायची आणि टिपणे काढायची सवय लागली आहे. ह्या लेखाच्या निमित्ताने हे सांगायला मिळतंय हेही नसे थोडके!! त्यांच्या आईचे काका म्हणजे नाटककार आदरणीय कृ. प. खाडिलकर! त्यांची सर्व नाटकं त्यांच्या जवळ होती. तुकाराम गाथा, गीतारहस्य, सार्थ ज्ञानेश्वरी, दासबोध अशी अनेक पुस्तकं त्यांच्या संग्रहात होती आणि त्या पुस्तकांची त्यांनी अक्षरशः पारायण केली होती. परेलहून डोंबिवलीला शिफ्ट होताना त्यांनी ती पुस्तकं त्यांच्या जवळच्या मंडळींना गिफ्ट म्हणून दिली. तेव्हा मी मुलं खूपच लहान असल्यामुळे माझ्या व्यापात इतकी व्यस्त होते की ती पुस्तकं आपल्या जवळ ठेवावीत हे खरंच सुचलं नाही आणि एक मौल्यवान ठेवा मी गमावला. दादांच्या वाचनात इतकीच रोजची पूजा खूप आठवणीत रहाणारी होती आणि आई त्या पुजेची तयारी छान करून द्यायची. पण त्यांना देवळात आवर्जून गेलेलं मात्र आठवत नाही.
दादाना सगळ्या खेळांची आवड होती. ते स्वत: फुटबॉल खेळत होतेच. ते स्टेट लेव्हलवर देखील खेळले आहेत. त्यांनी कॅरम बोर्ड एका स्ट्रोक मध्ये सर्व काळ्या किंवा सर्व पांढऱ्या सोंगट्या घेतलेल्या मी बघितल्या आहेत. आई आणि माझ्या बरोबर कॅरम खेळताना आमच्या दोघींचे शाॅट बघून ते दोन बोटं कपाळाला ज्यापध्दतीने लावायचे जाम हसू यायचं अर्थात त्यांना ते हसणं आवडतं नसे पण आमचा खेळ काही सुधारला नाही. पत्ते खेळताना पण ते खूप मनापासून आणि आवडीने खेळत. ब्रिज त्यांचा आवडता खेळ! आम्ही तिघं कत्थ्रोट खेळायचो. खेळ ब्रिजसारखाच पण चौथी गेम जास्त बोललेल्यासाठी ओपन होत असे. बाकीचे दोघे भिडू! आम्ही भिडू झालो की आईला हरवायला आम्ही दोघे जाम चिटींग करत असू, तिला ते कधीच कळलं नाही. मला बुद्धीबळ त्यांनीच शिकवलं. ते उत्तम खेळायचे. पण माझी त्या खेळातली गती बघून त्यांनी तो नाद सोडून दिला. ते म्हणायचे" लल्या, तुला खेळ समजलाना बास झालं! अरे हो, माझं माहेरचं लाडाचं नांव 'लल्या' आहे. पुढे नातवंडांशी पण तितक्याच उत्साहानं ते कॅरम, पत्ते, बुद्धीबळ खेळत असत.
त्यांना आॅफिसला सोमवारी सुट्टी असल्यामुळे रविवारी दुपारी जेवणं झाल्यावर अनेकदा ते म्हणायचे" चला, लल्या, 'तिर्र गो' करायला जाऊया. 'तिर्र गो' हा त्यांचा खास शब्द त्याचा अर्थ 'उगीचच फिरायला जायचं' आणि मग ते मला इराॅस, रिगल, मेट्रो थिएटरमध्ये इंग्रजी सिनेमा बघायला न्यायचे. सिनेमा अर्थात चार्ली चॅप्लीन, लाॅरेल- हार्डी ह्यासारखे पिक्चर तसेच काही क्लासिकल इंग्रजी चित्रपट पण आम्ही बघितले आहेत. गणेशोत्सवात गिरगाव, दादर, परळ, लालबागचे गणपती बघायला जायचा आम्हां दोघांचा कार्यक्रम रविवार/सोमवारच्या दुपारचा ठरलेला असायचा. त्यांचा त्या दर्शनाचा रूट निश्चित होता आणि तो त्यांनी कधीच बदलला नाही. महत्त्वाचं म्हणजे शक्यतो चालत जायचं. गोकुळाष्टमीला गिरगांवातले चित्ररथ मला खांद्यावर घेऊन मी ६/७ वर्षांची होईपर्यंत दाखवले आहेत. त्यानंतर ते त्यादिवशी वर्षातून एकदा आजीकडे जेवायला जायचे. आई-आजीला तोच आनंद असायचा. त्याशिवाय ते सभासद असलेल्या एशियाटिक लायब्ररी, गिरगांव चौपाटीला मधून मधून जायचंच! आमच्या कडे आलेल्या नातेवाईकांना मुंबई दर्शन करावावं तर त्यांनीच! अनेकांना त्यांनी दाखवलेली राणीची बाग अजुनही आठवत असेल. तिथे पण रूट ठरलेला. आईसफ्रुट खायची जागा नक्की! प्रत्त्येक गोष्ट एका शिस्तीतच व्हायला हवी हा त्यांचा अट्टाहास असायचा. तत्व आणि शिस्त त्यांच्या जगण्याचा अविभाज्य भाग होता.
त्यांना अभ्यास घ्यायला आवडायचं पण शिकताना विद्यार्थ्याची फटका खायची तयारी हवीच.
दादांचं गोष्ट सांगणं म्हणजे खूप आनंददायी अनुभव असायचा. त्यांची 'तीच ग मी' ही गोष्ट ज्यांनी ज्यांनी ऐकलेय ते कोणीच गोष्ट ऐकतानाच घाबरणं विसरणारच नाही.
दादा पट्टीचे पोहणारे होते. सांगलीला असताना कृष्णेच्या पुरात पोहल्याच्या अनेक आठवणी ते सांगत असत. मला पोहायला शिकवावे असं त्यांच्या मनात आलं आणि एका मे महिन्याच्या सुट्टीत मला भोपळा बांधुन विहीरीत ढकललं आणि ते पण विहीरीत उतरले थोड्याच वेळात त्यांना कळलं की मला पायाला आणि हाताच्या कोपराना लागलंय! रक्त येत होतं. त्यांनी पटकन मला बाहेर काढलं आणि म्हणाले" काही गरज नाही पोहायला शिकायची! खूप अपसेट झाले होते ते मला लागलेलं बघून!
त्यांच्या आयुष्यातलं अतिशय महत्त्वाचं वळण म्हणजे त्यांच्या मनाविरुद्ध मी केलेलं लग्न! मी घरातून गेल्यावर त्यांना झालेला मनस्ताप नंतर सर्वांनी सांगितलाच पण मी घरी येऊ का? असं विचारल्यावर' लग्नाचं सर्टिफिकेट घेऊन ये! आणि एकटीच ये. येवढंच बोलले. मी घरी गेले तेव्हा शांतपणे दोन शब्द बोलून बाहेरच्या खोलीत जाऊन बसले. त्यानंतर जावई म्हणून डॉ.चा स्वीकार करायला त्यांनी सहा महिने घेतले. आमचं स्वत:च डोंबिवलीत घर झाल्यावर घरी येऊन डॉ.शी बोलायला सुरुवात केली.
लग्नानंतर मला खूप कांजण्या झालेल्या. त्यावेळी त्यांनी माझी केलेली सेवा, घेतलेली काळजी मी कधीच विसरणार नाही.
डोंबिवलीत रहायला आल्यावर नातवंडांना गोष्टी सांगायला, अभ्यास घ्यायला ते रोज माझ्या घरी येत असत. नंतर ते आजारी झाल्यावर माझ्याच बिल्डींगमध्ये देवाच्या कृपेने त्यांना तळमजल्यावर जागा मिळाली. ह्या सगळ्या वर्षात त्यांनी कधीच माझ्या लग्नाबद्दल काही विषय कधीच काढला नाही.
अनेकदा काही प्रसंगात त्यांच्या कठोरपणामुळे आईला जे सोसावं लागलं ते मनातून जात नाही. पण त्याकाळी सर्वसाधारणपणे स्त्रीयांनी निमुटपणे सहन करायचं अशी परिस्थितीच होती. आजच्या लेखात आईबद्दल लिहायचं शक्यतो टाळलंय!
माझं लिखाण, पुस्तक प्रकाशित झालं हे सर्व बघायला ते दोघंही नाहीत ही खंत वाटते. पण त्यांच्यामुळेच मी लिहीती झालेय. हे पण तितकंच खरं आहे.
आम्हा बाप-लेकीची नातं उलगडताना माझी एक स्मरणयात्रा घडली. आज गुरु पौर्णिमा, त्यामुळे माझ्या पहिल्या गुरुं बद्दल लिहायला मिळालं हे माझं नशीब! ह्यानिमित्ताने माझ्या आई- वडिलांच्या स्मृतीला वंदन करते आणि इथंच थांबते.


                       आषाढ शुद्ध
 पौर्णिमा
                          ता. ५-७-२०२०

                           ललिता छेडा
                   
                     

Monday, June 22, 2020

ओलाकंच आषाढ

         पाऊस...आषाढातला
रिमझिम बरसणारा, उत्स्फुर्तपणे कोसळणारा, मुसळधार झोडपणारा आणि अंधारून आलेल्या संध्याकाळी एखादीच सर येऊन मनाला ओलाकंच करणारा तो‌ प्रत्येकाच्या आठवणीत वेगवेगळ्या रुपात असतो.
माझ्या आठवणीतला पाऊस काॅलेजच्या दिवसांत तो पडत असताना बघितलेल्या मॅटिनी मधला आहे...जो अजूनही तसाच पहिल्या पावसासारखा माझ्या मनात ताजा आहे.
तो पाऊस 'रिमझिम के तराने लेके आयी बरसात' म्हणणार्‍या वहिदा-देवआनंदच्या डोळयातला असतो. त्या दिवसांत मी आणि माझी मैत्रीण लता गोठोस्कर आम्ही दोघींनी सिनेमा बघण्याचे आमचेच अनेक विक्रम आम्हीच तोडलेत. आम्ही कालाबाझार बघायला गेलो असताना खूप पाऊस पडत होता आणि दोघीनी नखशिखांत भिजून तो सिनेमा पाहिला आहे. सिनेमात वरचं गाणं ती दोघंही एका छत्रीत चालताना आहे. लता माझ्या कानात कुजबुजली होती "आपण दोघींनी एक तरी छत्री आणायला हवी होती ना" ती हे बोलल्यावर आजुबाजुच्या शुक-शुक कडे लक्ष न देता आम्ही दोघी वेड्यासारख्या हसत सुटलो होतो ते आठवतं.
गाईड सिनेमातल्या 'मेघ दे, पानी दे, छाया देरे तू रामा....एस्. डी. बर्मन ह्यांच्या सुरातली पावसाला केलेली विनवणी आणि त्या गाण्याचं
पिक्चरायझेशन फक्त अविस्मरणीय!
'परख' सिनेमा फक्त 'ओ सजना बरखा बहार आयी' ह्या गाण्यापुरताच लक्षात आहे. पण त्या गाण्यानं गारुड मात्र प्रत्येकाच्या मनावर कायमच केलेलं आहे. पाऊस पडला की हे गाणं एकदा तरी मनात गुणगुणलंच जातं.
मल्हार हा पावसाळ्याचा राग आहे हे माहित होतं पण सिनेसंगीताचा अभ्यास असलेल्या विनय नवरेशी बोलताना कळलं की' ह्या ‌रागाचे मुळ नांव 'मलरूहका' असं आहे. त्याचा अपभ्रंश 'मल्हार' असा झाला आहे. पुस्तकांतून ही ह्याविषयी लिहिलेलं आढळलं! 'मलका हरण करने वाला वो मल्हार! हे वाचनात आलं.
ग्रीष्मातलं ते कोरडं वातावरण, मरगळलेला दिवस, धुळीने भरलेली झाडं आणि अचानक मल्हारच्या सुरांसारख्या पावसाच्या धारा सुरू होतात आणि तो सोहळा पंचेन्द्रियांना सुखावून जातो. असंच एक सुखावणारं गाणं म्हणजे...
आहा रिमझिम के ये प्यारे प्यारे गीत लिये।
आयी रात सुहानी देखो प्रीत लिए।
रोमॅंन्टिक मेलडी!! साधीसुधी पण सुंदर नंदा, भाबड्या पण देखण्या चेहर्‍याचा सुनील दत्त! शैलेंद्र आणि सलिल चौधरी शब्द-सुरांचा एक अप्रतिम ठेवा! मुलायम आवाजाचे तलतजी आणि साक्षात लतादीदींचे स्वर!! १९६० साली आलेल्या उसने कहां था।ह्या सिनेमातलं हे गाणं मनाच्या कोणत्याही अवस्थेत फक्त आनंदच देतं. सुरवातीचा म्युझिकचा पीस, त्यानंतरचे 'झींगुर बोले चिकीमिकी' हे कानाला सुखावणारे शब्द आणि शेवटचे आहाहा, आहा च्या नक्षीदार ताना! ह्या गाण्यासाठी परत परत बघितलेला सिनेमा! आजही मी अनेकदा यु ट्युबवर हे गाणं ऐकते.
माझ्या मॅटिनी बघण्याच्या क्राईममधल्या अनेक पार्टनर होत्या पण लता खास आणि कुंदा मुजुमदार, मंगल कुलकर्णी ह्यांच्यासारख्या अनेकजणी ह्या सिनेमाच्या वेडात सहभागी असायच्या. काॅलेज आणि पाऊस नेहमी एकत्रच सुरू व्हायचे त्यामुळे माझ्या मॅटिनीच्या आठवणीत पाऊस खूप आहे.
हिंदी-मराठी पावसातली, पावसावरची गाणी तर चिक्कार आहेत. त्यांचे नुसते उल्लेख केले तरी एक पुस्तक होईल.
गाण्यांशिवाय पाऊस असाही खूप आठवणी देऊन गेलाय. आम्ही परळला रहात असताना हिंदमाता पासून जवळच रहात असल्याने थोडासा पाऊस जरी पडला‌ तरी‌ घरासमोरच्या रस्त्यावर पाणी भरत असे. त्या पाण्यात मुलांची धमाल, खेळ बघायला मजा यायची. कधी कधी अगदी कमरेपर्यंत पाणी भरत असे आणि गंमत म्हणजे आज पन्नास वर्षे झाली तरी तितकंच पाणी भरतय. अनेक पक्ष, अनेक नगरसेवक आले-गेले पण ‌पाऊस आणि हिंदमाताला भरणारं पावसाळ्यातंल पाणी तसंच आणि तितकंच आहे.
डोंबिवलीला आल्यावर स्टेशनजवळ पाणी भरतच असतंआणि पुर्वी पाणी भरलं की मी आणि जयश्री (माझी‌ सख्खी शेजारीण) पाणी ‌बघायला जात असू. एका वर्षी पाणी नुस्तं न बघता पाण्यात शिरलो. कमरे एवढ्या पाण्यात गंमत म्हणून चालतांना जयश्रीचे दीर समोरून आले नंतर जे काही झालं तेव्हा पासून आमचं पाणी बघायला जाणं बंद झालं.
आषाढातल्या पावसाचा आठवणीतला प्रसंग म्हणजे डोंबिवलीतच माझ्या नणंदेच्या सासरी जायला आम्ही दोघी पाऊस पडत होता तरी निघालो. संध्याकाळची दिवेलागणीची वेळ होती. रस्त्यावर लाईट नव्हते त्यामुळे माझ्या नणंदबाई शाॅर्टकट मारायच्या नादात दलदलीत अडकुन पडल्या. अंधारात काय झालंय ते मला काहीच कळत नव्हतं. पाऊसही जोरात पडायला लागला होता. फक्त त्यांच्या हाका ऐकू येत होत्या. इतक्यात तिथं एक बाई आली तिच्याकडे बॅटरी होती. बॅटरीच्या उजेडात काय घडलंय त्याची कल्पना आली. प्रसंग खूप कठीण होता. पण त्या बाईच्या मदतीनं आणि माझ्या नणंदेच्या हिमतीनं त्यांना आम्ही बाहेर काढलं. नेहमी मनांत येतं ती बाई जर आली नसती आणि तिच्या जवळ बॅटरी नसती तर काय झालं असतं?
असा हा आठवणीतला आषाढ!
आज तर आषाढाचा पहिला दिवस!
जो 'कविकुलगुरू कालिदास दिन' म्हणून साजरा केला जातो. ह्या लेखाच्या निमित्ताने अजरामर काव्ये, नाटके आणि लघुकाव्ये लिहीणार्‍या कालिदासांचे स्मरण करून...
'आषाढस्य प्रथम दिवसे' सर्व लेखकांना आणि रसिक वाचकांना वंदन करते आणि ह्या दिवसांच्या शुभेच्छा देते.


                 
आषाढ शुद्ध प्रतिपदा
                   ता. २२- ६-२०२०
                     
 ललिता छेडा




Friday, June 5, 2020

वसुधैव कुटुंबकम्

         १५ मे जागतिक कुटुंब दिन म्हणून साजरा करत असताना टी.व्ही. वर आपल्या गावी, आपल्या कुटुंबात जाण्यासाठी धडपडणाऱ्या मजुरांना बघताना 'कुटुंब' शब्दाचा अर्थ कळत होता.
कोरोनाच्या लाॅकडाऊनमुळे घराबाहेर न पडणारी मी महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडले होते. सकाळी अकरा वाजता ऊन अक्षरशः भाजून काढत होतं. अशा वेळी डोंबिवली म्युनिसिपाल्टीसमोर कमीत कमी हजार माणसांची लाईन होती. उत्सुकतेनं त्यांना विचारल्यावर ही मंडळी गावाला घरी परतण्यासाठी लागणाऱ्या सर्टिफिकेट, सह्या ह्यासाठी लाईनीत उभी होती. त्यातला एका ओळखीच्यालाच मी विचारलं "कहां जा रहे हो? "राजस्थान" त्यानं उत्तर दिलं. "यहां एक हाॅटेलमें काम करता था, गांव में घर पे बुड्ढे मां-बाप, बीबी-बच्चे है। इधर दसजन साथ में रहते थे। अब इस महामारी में साथ में रहभी नहीं सकता। अब जो होगा फॅमिली के साथ रहकर ही होने दो" तो बोलत होता आणि त्याच्या मनातलं दुःख डोळ्यात भरून आलं होतं. तो उभा असलेल्या लाईनीतला त्याचा नंबर दुपारी दोन वाजेपर्यंत लागेल की नाही कळतं नव्हतं. एक छोटीशी बॅग घेऊन तो निघाला होता. त्याला कळलं होतं' कुटुंबाबरोबर जगण्यासाठी सामान नाही तर फक्त इच्छा लागते'.
आपल्या भारतीय परंपरेत कुटुंबवत्सलतेचा संस्कार खूप महत्त्वाचा मानला जातो. विभक्त कुटुंब पद्धती आता वाढत असली तरी कुटुंबाशी जुळलेलं रहायला हवं हे आता ‌सर्वानाच कळलेलं आहे.
आता त्यातही भर पडली आहे 'एक्स्टेंडेड फॅमिली' अर्थात 'विस्तारित कुटुंबांची'! रक्ताच्या नात्यांच्या इतकंच महत्व असलेल्या ह्या जिवलग मित्र मैत्रिणींच जवळचं कुटुंब बनलेलं असतं. रक्ताची नसली तरी मनानं, मायेनं जोडलेली ही नाती अनेकदा जगण्याला बळ देतात.
'वसुधैव कुटुंबकम्' हे शब्द खर्‍या अर्थानं अनेक व्यक्ती-संस्था सार्थ करत असतात. माझी मैत्रीण भारती मोरे एकल महिलांसाठी तिच्या ज्ञानदीप स्री जागृती मंचातर्फे गेली अनेक वर्षं काम करतेय. एकट्या राहणाऱ्या महिलांना आर्थिक, मानसिक आधार देण्याचं काम ही संस्था करतेय. ह्या संस्थेमुळे ओळख झालेल्या अनेकजणींचे इतके जवळचे संबंध झाले आहेत की एखाद्या कुटुंबाप्रमाणे त्या एकेमेकीच्या आनंदात सहभागी होतात, अडीअडचणीला मदतीला धावून जातात. विस्तारित कुटुंबाच एक सुंदर उदाहरण ह्या 'एकल पण एकत्र' रहाणार्‍या महिलांनी सर्वांसमोर ठेवलं आहे.
माझी दुसऱी मैत्रीण ज्योती पाटकर, जी आता आमच्यात नाही पण तिनं उभा केलेला टिटवाळ्यातला 'मुक्ता बालिकाश्रम' सुध्दा एक 'एक्स्टेंडेड फॅमिली' म्हणजे काय ते छान समजावून देते. ५ ते १८ वर्षाच्या अनाथ, अन्याय झालेल्या बालिकांसाठी हा आश्रम आहे. त्या मुलींना सांभाळणार्‍या, शिकवणार्‍या सगळ्या ताईसुध्दा एखाद्या कुटुंबाप्रमाणे त्यांना शेअरिंग केअरिंग शिकवतात. जेणेकरून ‌त्या आश्रमातून बाहेर पडल्यावर सुध्दा सर्वांशी मिळून मिसळून राहू शकतील.
सध्याचे समाजमाध्यमातले फॅमिली गृप! म्हणजे कुटुंब शब्दाचा परीघ मोठा करू लागलेत. प्रत्यक्ष भेट होत नसली तरीही ‌जगभरातले नातेवाईक, शाळेतल्या मैत्रीणी‌ फेसबुक, व्हाॅटस्‌ ॲप वरून फॅमिली बनू लागलेत. सध्याच्या कोरोनाच्या दिवसांत ही माध्यमातली कुटुंब खूप उपयोगी पडताहेत.
आयुष्याच्या सेकंड इनिंग मध्ये आपल्या कुटुंबातून काही कारणांनी बाहेर पडलेले अनेकजण वृध्दाश्रमातले शांत, निवांत जगणं कधी ऐच्छिक कधी मनाविरुद्ध स्वीकारतात आणि ‌तो वृध्दाश्रम ‌त्यांच कुटुंब ‌बनतं.
जागतिक कुटुंब दिनानिमित्ताने इतक्या प्रकारच्या कुटुंब कथा आठवल्या. पण खर्‍या अर्थानं विश्र्वातील समस्त जीवांच्या हिताचे 'पसायदान' मागणार्‍या ज्ञानेश्वरांनी सर्व विश्र्वालाच कुटुंब मानलंय! आणि तसं मानणं हेच खरं आणि योग्य आहे.



                    जेष्ठ शुध्द पौर्णिमा
                    ता. ५ जुन २०२०
‌                       ललिता छेडा

Saturday, May 23, 2020

जेष्ठातला मृद् गंध

 ‌   पहिल्या पावसाच्या सरीं नंतर दरवळतो तो मातीचा सुगंध! ज्येष्ठ महिन्याच्या म्हणजेच मे महिन्याच्या साधारणपणे शेवटच्या आठवड्यात ह्या पहिल्या पावसाच्या सरींनी तृप्त झालेली धरा कृतज्ञतेचा गंधित हुंकार देते.
कधी कधी मे अखेरीस काही ठिकाणी गारांचा पाऊस देखील पडतो. मुंबईकरांनी मात्र वळीवाच्या सरी अनुभवल्या असल्या तरी गारांचा पाऊस मात्र त्यांना बघायला मिळत नाही.
माझ्या आठवणीत एकदा पुण्यात असताना अगदी दोन मिनिटांसाठी छोट्या छोट्या गारा पडल्या होत्या. पण फलटणमध्ये आत्याच्या घरी मात्र अचानक गारांचा पाऊस अनुभवायला मिळाला होता. हवेतला उष्मा इतका वाढला होता की आत्या म्हणालीसुध्दा" ललिते, आज तुला गारांचा पाऊस बघायला मिळणार बहूतेक! आणि खरंच अवघ्या अर्ध्या तासात घराच्या पत्र्यांवर तडतड आवाज येऊन गारा पडू लागल्या. त्या आभाळातून जमिनीवर जितक्या पटकन पडत होत्या तितक्याच पटकन ‌वाटीत जमवेपर्यंत विरघळत होत्या. मला गारांचा‌ पाऊस बघायला मिळाला म्हणून दादांना झालेला आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता आणि त्यांचा तो आनंद माझ्या अजूनही नजरेसमोर आहे.
जेष्ठ महिन्यातले दिवस मोठे असतात म्हणूनच बहूतेक ह्या महिन्याला ' जेष्ठ' म्हणत असावेत.
ह्या काळात शाळांना सुट्टी असल्यामुळे बहूतेकांचे प्रवासाचे बेत ठरलेले असतात. आम्हीपण मुलांना घेऊन उन्हाळ्यातल्या सुट्टीत खूप फिरलो आहोत. भटकंतीला कुठेही गेलं तरी काही ठिकाणं, काही जागांच सौंदर्य आगळंच असतं. कन्याकुमारी'चा सुर्यास्त असाच माझ्यासाठी अविस्मरणीय आहे.
ती उन्हाळ्यातली संध्याकाळ असल्यामुळे सहा वाजले तरी कन्याकुमारीच्या समुद्र किनाऱ्यावर अजून उन्हांचा पिवळा प्रकाश पसरलेला होता. तीन समुद्रांच्या संगमावर क्षितीजापर्यंत पसरलेल्या त्या किनाऱ्यावर आम्ही येऊन उभं राह्यलो. समोर आकाश आणि पाणी ह्या मधली निळ्या रंगाची किनार आता लालसर केशरी रंगाची उधळण झाल्यामुळे अस्पष्ट होऊ लागली होती. पिवळसर रंगाचा सूर्य त्या रंगात मिसळून पाण्यात अस्त होण्यासाठी हळूहळू खाली सरकत होता. एका बाजूला विवेकानंद राॅक मेमोरियलची विस्तीर्ण देखणी वास्तू आणि समोर दिसणारा सुर्यास्त! सूर्याच्या त्या समुद्रात अस्ताला जाताना दिसलेलं निसर्गाचं गुढ, अनाकलनीय रूप आणि समुद्रातच उभी असलेली मानव निर्मित विवेकानंद स्मारकाची प्रेरणादायी वास्तू बघून तिथं असलेले सर्वजण निशब्द होऊन गेले होते. अचानक आमच्या शेजारी उभे असलेले एकजण म्हणाले" मागे बघा, चंद्रोदय होतोय आणि चैत्री पौर्णिमेला तर सुर्य आणि चंद्र दोन्ही एकाचवेळी आकाशात दिसतात. आतादेखील जेष्ठी पौर्णिमा आलीच आहे ना! ते गृहस्थ विवेकानंद केंद्राचे काम करत असल्यामुळे इथं त्यांचं नेहमी येणं जाणं होतं. समोर किनाऱ्यावर लाटा परतून फिरताना एक गाज ऐकू येत होती. छायाप्रकाशाच्या खेळातली जपून ठेवलेल्या आनंदाच्या क्षणातली एक अविस्मरणीय संध्याकाळ होती ती!!
सर्व सणांची सुरवात होते ती जेष्ठातल्या वटपौर्णिमेपासून! श्रद्धा- अंधश्रद्धा ह्यातली रेषा अंधूक करणारा हा सण. योगायोगाने वसुंधरा दिनाच्या आजूबाजूलाच ही पौर्णिमा येते. पण अनेक ‌स्रिया ह्या पुजेसाठी वडाच्या फांद्या तोडून घरी पूजा करतात. अनेकदा त्या तोडलेल्या फांदीला लालसर फळं सुध्दा असतात. पक्ष्यांची घरटी असणारं, सावली देणारं, पारंब्यांनी विस्तारलेलं देखणं वडाचं झाड नक्कीच पूजनीय आहे. पण ते पर्यावरणाच्या दृष्टीनं बघितलं तरच जाणवलं पाहिजे. जन्मोजन्मी हाच पती मिळावा यासाठी ह्या वृक्षाची पूजा करणं हे मलातरी पटत नाही. जन्मजन्माचं नातं जोडण्यापेक्षा मिळालेल्या जन्मात एकमेकांना मानानं वागवलं, इच्छा अपेक्षांचा आदर केला तर जास्त चांगलं होईल असं मला मनापासून वाटतं. त्यासाठी वटवृक्षासारखं मन मोठं व्हावं ह्यासाठी पूजा करणं निश्चितच संयुक्तिक ठरेल. पण पुन्हा एकदा श्रद्धा-अंधश्रध्देतली प्रत्येकाची अस्पष्ट रेघ...
परळला असताना लहानपणी आई वडाची पूजा करायला देवळात जाताना मला बरोबर घेऊन जायची. आई नऊवारी साडी,नथ घालून साग्रसंगीत पुजेची तयारी करून निघायची ते चांगलंच आठवतंय. आईच्या मैत्रीणी तिथं तिला भेटायच्या त्यांची पुजा‌ होईपर्यंत आम्ही मुलं देवळाच्या आवारात खेळत असू.
मी डोंबिवलीला आल्यावर आई-दादा पण डोंबिवलीत आले. इथं आल्यावर मात्र तिनं वडाची पूजा करायची थांबवली. वडाला नुस्त हळदीकुंकु वाहून यायची.
निसर्गाकडून काही तरी घ्यावं असं शिकवणार्‍या सणावारांकडे आपण शहरी जीवन जगणारे आपल्या सोयीप्रमाणे त्या सणवारांकडे बघू लागलो आहोत. तरी सुद्धा घरातल्या भिंतीवर बाहेरच्या बाजूला उगवलेल्या वडाचे झाड तोडताना त्याची कोवळी पानं मनाला सुखावून टाकतात.
म्हणूनच सरत्या ग्रीष्माला निरोप देणार्‍या आणि वर्षा ऋतूचं स्वागत करणार्‍या जेष्ठ महिन्यासाठी ना.धों.महानोरांच्या कवितेच्या ओळी म्हणाव्याशा वाटतात.
ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे
आणि ह्या मातीतुनी चैतन्य गावे।

                       जेष्ठ शुध्द प्रतिपदा

                         ता.२३.५.२०२० 
                          ललिता छेडा
        

Wednesday, May 6, 2020

।आरोग्यम् धनसंपदा।

वैशाख साधारणपणे एप्रिल महिन्यात येतो आणि ह्या महिन्यातला महत्त्वाचा दिवस म्हणजे ७ एप्रिलचा जागतिक आरोग्य दिन!
        आपण आणि आपल्या शरीराचा,मनाचा उत्तम संबंध म्हणजे निरामय 'आरोग्य' असं मला मनापासून वाटतं. कारण आजारपण येणं आणि त्यातुन बरं होऊन बाहेर पडणं ह्यासाठी आपलं शरीर आपल्याला माहीत असणं जितकं गरजेचं असतं तितकीचं मनात सकारात्मकता असणं पण आवश्यक असतं.मला झालेल्या वेगवेगळ्या  'आजारपणांच्या' अनुभवातून मी हे शिकलेय. आणि झालेल्या बहूतेक आजारांना  यशस्वीरीत्या मी परतवून लावलंय.हे महत्त्वाचं! 
        फक्त स्वभावामुळे शरीरात साखरेचा गोडवा असण्याचं प्रमाण मात्र जरासं असतं.
        लहानपणापासून माझी तब्येत तशी नाजूकच! आत्ता जे कस्तुरबा रुग्णालय कोरोनामुळे सर्वांना परिचित झालं आहे. तिथे मला साधारण तिसरी- चौथीत असताना घटसर्प झाल्यामुळे दाखल करावं लागलं होतं.जवळजवळ महिन्याभराच्या तिथल्या वास्तव्यात अनेक आठवणी मनात आहेत. माझ्या आईवडिलांनी घेतलेली काळजी,केलेली धावपळ अजुनही आठवतेय. तेव्हाही त्या रूग्णालयाची व्यवस्था, स्वच्छता, छान होती. आमचा लहान मुलांचा वाॅर्ड असल्यामुळे स्टाफ खूप चांगली काळजी घ्यायचा. शिफ्ट बदलली की थोडावेळ जायच्या आधी तिथल्या नर्स आमच्याशी गप्पा मारून, खेळून  जायच्या! खूप वर्ष झाली तरी  त्या आठवणी ताज्या आहेत. 
       मी डॉक्टरशी लग्न केल्यावर मैत्रीणी गमतीनं नेहमी म्हणतात" तू  तुझ्या आजारपणाला डाॅक्टरशी लग्न करून मस्त इलाज शोधलास!!
       माझ्या अनेक आजारांपैकी एक म्हणजे मला सोर्‍यासिससारखा स्कीनडिसीज झाला. आणि पायावर झालेल्या जखमा दिसायला आणि सहन करायला खूप कठिण झाल्या होत्या. पण त्यावेळी माझी नणंद हरकवंती धावत आली आणि जवळजवळ आठवडाभर दिवसांत तीन वेळा पाय स्वच्छ करून तिने त्या जखमा बऱ्या केल्या. माझ्या गुडघ्यांच्या ऑपरेशन नंतर इंदू,लता, राजश्री आणि जयश्री ह्यांनी दवाखान्यातल्या वेळा वाटून घेतल्या होत्या. अशी अनेक नावं सांगता येतील ज्यांच्या मदतीमुळे मी सर्व आजारपणांना अक्षरशः पळवून लावलं. त्यात घरच्यांची मदत तर असायचीच.
       पण आता संपूर्ण जगाला  हादरवून सोडणाऱ्या ह्या कोरोनाच्या साथीनं मात्र सर्वांना हतबल करून टाकलं आहे.युरोपसारखा निसर्गरम्य देश, अमेरिकेसारखा बलाढ्य,प्रगत देश सर्वांनी ह्या आजारापुढे हात टेकलेत. जीवितहानीचे आंकडे तर ऐकवत नाहीत.
        'लाॅकडाउन'हा शब्द पूर्वी कधी ऐकला सुध्दा नव्हता. तो शब्द आज जगण्याच्या एक महत्त्वाचा भाग बनून गेला आहे.पैसा, प्रतिष्ठा हे सगळं निरर्थक ठरलं आहे. प्रत्येकजण स्वत:च्या जगण्यासाठी धडपड करतोय. त्यामुळेच एकमेकांना भेटतानासुध्दा मोकळेपणाने न भेटता तोंडावर पट्टी लावून बोलावं लागतंय. 
         एका छोट्याशा व्हायरसनी आपलं संपूर्ण आयुष्य बदलून टाकलंय. मनात येत की पृथ्वी टाहो फोडून काहीतरी सांगत होती पण पुढे,पुढे जायच्या नादात आपल्याला तिचा आवाज ऐकूच आला नाही. आणि म्हणूनच तिनं बहूतेक संपूर्ण जग थांबवलं. तिनं दाखवून दिलं की खरा धर्म हा निसर्गाचे नियम पाळणं हाच आहे. कारण अवघ्या दोन महिन्यांत गंगा,यमुनेसारख्या सर्व नद्यांचं पाणी स्वच्छ झालं. आकाश निरभ्र दिसायला लागलं. हवेतलं प्रदुषण नियंत्रित झालं.
         गरजा इतक्या कमी झाल्या की घरात बसून कुटुंबातला हरवलेला संवाद  सापडला. खऱ्या-खोट्या नातेसंबंधांची ओळख झाली.  स्वत:च्याच घराकडे नोकरी,व्यवसाय,अशा अनेक कारणांमुळे झालेलं दुर्लक्ष नुसतं लक्षात नाही आलं. तर फक्त गरजेपुरती स्वच्छता आणि जेवण, झोपण्यासाठी घराकडे बघणारे आपण त्या घराला सुंदर कराण्यासाठी प्रयत्न करु लागलो. घरकाम, स्वैपाक करणार्‍या बायकांना आपण गृहीत धरून चाललो होतो ती आपली केवढी मोठी सपोर्ट सिस्टीम आहे ते कळलं!आणि हे सगळं अनपेक्षित आलेल्या आरोग्यावरच्या संकटाला घाबरल्यावर कळलं,हे सुध्दा विचार करावा असंच आहे नाही का?  
         कोरोनाग्रस्त आणि कोरोनामुक्त हे दोन्ही शब्द आपल्या सर्वांना शारीरिक, मानसिक, आर्थिकसुध्दा प्रचंड घाबरवणारे ठरलेत. कुठेतरी आपली चुकलेली जीवनशैली, रहाणीमानातला हरवलेला साधेपणा आपल्या स्वत:ला जाणवतोय! आजुबाजुच्या माणसांबरोबर निसर्गाकडे पण सजग दृष्टीने बघायला शिकल पाहिजे हे हा 'आजार' शिकवून जातोय. मजुरांची घराकडे जाण्याची ओढ, काही शेतकऱ्यांच्या मालाला न मिळणारी बाजारपेठ तर कुठे तरी होणारा काळाबाजार! प्रत्येक गोष्ट स्वत:च्या जगण्याचा शोध घ्यायला शिकवतेय. 
         पुन्हा एकदा सर्व संपवून आपण नव्यानं आयुष्याची सुरुवात करु तेव्हा मोठेपणाच्या भ्रामक कल्पनांसाठी धावणाऱ्या आपली ' जाणीवपूर्वक जगण्याची रेषा' मोठी व्हायला हवी. पुढच्या अनेक वर्षांसाठी हे अनुभव  थोडं थांबून जगायला शिकवणारे व्हायला पाहिजेत.
         तेव्हा सध्या तरी थांबलेली जगरहाट सुरू व्हायला कवींनी म्हटल्याप्रमाणे,
         "बाहर की हवा है कातिल युं ही।
         कातिल से उलझने की जरूरत क्या है।
         घरी रहा,स्वस्थ रहा कारण निरोगी आरोग्य हेच खरं धन आहे.
               वैशाख पौर्णिमा
               ता. ७ मे २०२०
                   ललिता छेडा
                    

Friday, April 24, 2020

वैशाखवैभव अमलताश

खरं म्हणजे अमलताश म्हणजे 'बहावा'.चैत्री पौर्णिमेपासून बहरायला लागणारा हा वृक्ष वैशाखात पिवळ्याजर्द रसरशीत घोसांंनी बहरून जातो. आम्ही बंगल्यात रहायला आल्यावर सर्वात प्रथम दाराशी बहावा लावला.दुसर्‍या बाजूला पिवळा गुलमोहर होताच. पिवळ्या फुलांचा पसरट घेराचा तो गुलमोहर वैशाखात अपार फुलतो.त्यामुळे उन्हाळ्यातल्या  सकाळी त्या दोन्ही झाडांच्या पिवळ्या रंगांवर पडणार्‍या कोवळ्या सोनेरी किरणांमुळे वैशाखवैभवाची चाहूल लागते.
      'अमलताश' हा शब्द मला कळला तो डाॅ. सुप्रिया दीक्षित-संत ह्यांच्या ह्याच नावाचं पुस्तक वाचनात आलं तेव्हा! सुप्रियाताई ह्या प्रकाश संतांच्या सुविद्य पत्नी आणि इंदिरा संतांच्या सुनबाई आहेत.संतांच्या कुटुंबीयांचे अनुभव, प्रकाश संताबरोबरच्या सहजीवनाचं उत्कट वर्णन म्हणजे हे पुस्तक आहे. पुस्तक वाचल्यावर बहाव्यापेक्षा मला 'अमलताश' जवळचा वाटू लागलाय.
      दुर्गाबाई भागवतांनी खूप छान म्हणून ठेवलंय"जे जे म्हणून वसंताच आहे त्याला पूर्णत्व व अखेरीस विराम देण्याचं काम वैशाखाचेच असते. म्हणूनच वैशाखाला त्यांनी 'चैत्रसखा' म्हटले आहे.
      वैशाखी पौर्णिमा म्हणजे बुद्ध पौर्णिमा! गौतम बुद्धांचा जन्म,ज्ञान साक्षात्कार आणि मृत्यू ह्याच पौर्णिमेला झालं असल्यामुळे ही पौर्णिमा त्रिगुणीत महत्त्वाची मानली जाते. 
        ह्या पौर्णिमेच्या शीतलतेला सुगंधाचीही साथ असतेच. कारण ह्याच काळात कुठेतरी रातराणीचा सुगंध,मोगरा, सायली,देखणी गुलबक्षी आणि वैशाखवैभव मदनबाण फुलून सृष्टीला सुगंधित करत असतात.
       मदनबाणाची एक छान आठवण म्हणजे लग्नानंतर डोंबिवलीत आल्यावर उन्हाळ्यात  फडके रोडवर एक गजरेवाला रोज मदनबाणाचे गजरे घेऊन यायचा. मी आणि माझी मैत्रीण जयश्री रोज त्याच्याकडे गजरा घ्यायला जात असू.मुख्य म्हणजे तोदेखील आमची वाट बघायचा.उन्हाळ्यात मदनबाण आणि श्रावणात हिरव्या बांगड्या भरणं आम्हा दोघींचा आवडता कार्यक्रम होता.
       वैशाखातल्या माझ्या लहानपणीच्या आठवणीत आईची वाळवणांची सुरू होणारी गडबड आहे. परळला असताना एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात माझी परीक्षा झाली की आई तिच्या भगिनी मंडळातर्फे मंडळाच्या जागेत पापड,लोणच्याचा स्टाॅल लावत असे. त्यामुळे तिची घरासाठी आणि मंडळासाठी चिकवड्या, कुरडया, बटाटा कीस, सांडगी मिरच्या असं बरंच काही बनवण्याची लगबग सुरू होई. तिचा साबुदाणा, गहू विकत घेण्याचा दुकानदार ठराविक....साबुदाणा शिजवायचं पातेलं ठराविक...वर्षभर जपून ठेवलेले प्लास्टिकचे दोन कागद ठराविक... वाळवणं भरुन ठेवायचे पत्र्याचे डबे ठराविक... सगळं कसं नीटनेटकं आणि शिस्तीत असायचं. अनेकदा गिरगावातून आजी तिला मदत करायला यायची.
       सकाळी खूप लवकर उठून आम्ही दोघी गच्चीवर चिकवड्या घालायला जायचो. आईच्या सुचना सुरू असायच्या ' एकसारखी घाल, एका ओळीत घाल.ती‌ म्हणायची " कोणी बघितलं तर  एखाद्या रांगोळी सारखं दिसलं पाहिजे.माझं लक्ष मात्र शेवटी उरलेला चीक खाण्याकडे असायचं. मला त्याच्यात साईचं दही घालून खायला आवडायचं.आई रात्री ‌छोट्याशा वाटीत माझ्यासाठी दही विरजून ठेवायची.जवळजवळ उन्हाळाभर तिची‌ कामं सुरूच असायची.चिकवड्या तर किती रंगांच्या बनवायची. 
       सतत कामात राहायला आईला फार आवडायचं त्यामुळे डोंबिवलीला रहायला आल्यावर ती उन्हाळ्यात गव्हाच्या कुरडया आणि सांडगी मिरच्या करून विकत होती.त्यात पैसे मिळवण्यापेक्षा नात्यातल्या, ओळखीच्या मंडळींना काही बनवून देण्याचा आनंद जास्त असायचा. आणि ‌महत्वाचं म्हणजे दादा( माझे वडील) तिला ह्या सगळ्यात खूप मदत करायचे. आईला ऑर्डर देणारी मंडळी वाळवणं न्यायला यायची आणि बहूतेक आईकडे, गप्पा मारून जेवूनच जायची.हे सगळं व्यवहाराच्या पलिकडचं असायचं.  
       माझं लग्न झाल्यावर माझ्या नणंदेचा, हरकवंतींचा उत्साह देखील आईसारखाच होता. ती दरवर्षी चुंदा करायला उन्हाळ्यात आमच्या घरी यायची आणि आईकडून महाराष्ट्रीयन पदार्थ शिकून जायची.दोघींच गुजराती लोणची, मराठी पन्हं अशी शिकवणी चालायची.आईची त्याकाळातली खास विद्यार्थी आणि मदतनीस म्हणजे रजनी उर्फ रजी सरदेसाई. आता मागे वळून बघताना एक गोष्ट जाणवतं की ' ही मंडळी कोणतंही काम टेन्शन न घेता आनंदाने, आवडीने करत असत.त्यामुळे त्यांना थकवाही जाणवत नसे.
       असा हा आठवणीतला वैशाख! माझ्या जिभेवर  गव्हाचा चीक, सायीच्या दह्यातल्या चिकवड्या,ताज्या तांदळाच्या फेण्या ह्यांची चव रेंगाळवणारा उन्हाळा! 
      सध्या मात्र अनोळखी व्हायरसवर ए.सी.मध्ये बसून टी.व्ही वरची चर्चा, बातम्या ऐकताना,ह्या लेखाच्या निमित्ताने जुन्या साध्या जगण्यातल्या आठवणींची ही हलकीशी झुळूक सध्याच्या लाॅकडाऊनच्या परिस्थितीत नक्कीच सुखावणारी ठरतेय.
             वैशाख शुद्ध प्रतिपदा
             २४ एप्रिल २०२०
                ललिता छेडा.
        
         

Wednesday, April 8, 2020

स्वत:ला शोधताना..


      मराठी महिन्यांवर ब्लाॅग लिहील्यावर तो महिना साधारणपणे ज्या इंग्रजी महिन्यात येतो त्या महिन्यातल्या खास दिवसावर लिहायचं ठरवतेय. चैत्र साधारणपणे 'मार्च' महिन्यात येतो. आणि मार्च म्हणजे महिला दिन! म्हणूनच स्री म्हणून आपल्याला मिळालेल्या संधींचा आपण कितपत स्वत:साठी उपयोग करून घेतला ह्याचा शोध घ्यायचा प्रयत्न करायचं ठरवलं.
    माझ्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा दिवस म्हणजे ८ मार्च,कारण लग्नानंतर  वर्षभरानी ह्याच तारखेला माझ्या लेकीचा 'निलमचा' जन्म झाला.त्यानंतर तीन वर्षांनी मुलाचा ' किरणचा' जन्म झाला.मुलांच्या जन्मानंतर खर्‍याखुर्‍या अर्थाने संसाराची सुरुवात होते. मग तो प्रेमविवाह असो की ठरवून केलेला विवाह असो, संसारातील तडजोडींना सामोरं जावंच लागतं. मला नेहमीच मुलं, घर सांभाळून काही तरी करावं असं सतत वाटत असल्यामुळे बाटिक प्रिंटींग,योगशिक्षक, ब्युटीपार्लर असे वेगवेगळे डिप्लोमा केले.गंमत म्हणजे पदवीची शेवटची परीक्षा मात्र आजतागायत देता आली नाही.
    घरातल्या घरात पार्लर चालवायला सुरुवात केली.पण स्वत:च्या बिल्डींगमध्ये स्वत:च्या घरात रहायला गेल्यावर  पार्लर बंद करावं लागलं.खरं म्हणजे पार्लर सुरू करून दोन वर्षे झाली होती आणि चांगलं चालतही होतं. छोट्या मोठ्या आॅर्डर येत होत्या पण कधी कधी आपण स्रिया भावनिक होऊन घरासाठी, मुलांसाठी निर्णय घेतो, तसं काहीसं माझं झालं होतं.आता मागे वळून बघताना वाटत तेव्हा जिद्दीनं पार्लर सुरू ठेवलं असतं तर कदाचित आयुष्य काही वेगळ्या वाटेनं गेलं असतं.
    व्यवसाय सुरू झाला नाही पण एक वेगळीच संधी मिळाली.
     रामनगरमध्येच रहाणाऱ्या भारती मोरे आणि वैशाली ओक‌ एक दिवस अचानक माझ्या घरी आल्या. वैशालीच्या चैतन्य ज्ञानदीप मंडळातर्फे पत्रकारिता वर्ग घेण्यात येणार होते आणि त्या वर्गाला मी यावं असा आग्रह त्या दोघीही करत होत्या. वर्गाच्या शेवटी लेखी परीक्षा घेतली जाणार होती आणि मला तेच नकोसं वाटत होतं. मग वैशालीनी " तू परीक्षेला बसू नकोस" असा पर्याय दिला. त्या अटीवर मी वर्गाला यायला तयार झाले.पण त्या वर्गाचे प्रमुख असलेल्या मा.बेटावदकर सरांनी इतकं छान शिकवलं की मी सहज परीक्षा दिली आणि पहिला वर्ग पण मिळवला.
     त्याच वर्गात रोज डोंबिवली पूर्वेला ज्ञानदीप मंडळं सुरू करायच्या चर्चा व्हायच्या! कारण पश्र्चिमेला ज्ञानदीपचं कार्य जोरात सुरू झालं होतं. भारती मोरे पुर्वेला ज्ञानदीपचं कार्य सुरू व्हावं ह्यासाठी मनापासून खूप प्रयत्न करत होती.अशाच एका मंडळाच्या स्थापनेसाठी स्मिता तळेकरकडे मिटींग ठरत होती. २७ सप्टेंबर १९८५ 'अनंत चतुर्दशीच्या' दिवशी ही मिटींग ठरली होती. स्मिता आणि भारतीनी मला आवर्जून आमंत्रण दिलं होतं. मीपण अगदी सहज उत्सुकतेपोटी तिथं जायचं ठरवलं.मिटींगमध्ये मंडळाचं नांव"उन्मेष" ठरलं! स्मिता मंडळाची अध्यक्ष असणार हे नक्कीच होतं. पण ऐनवेळी तिनं अध्यक्ष नाही होणार पण मंडळाची सक्रीय सभासद होऊन सगळ्याप्रकारची मदत करेन असं ठामपणे सांगितलं.त्यामुळे हजर असलेल्यांमध्ये 'तू हो अध्यक्ष' असं ऐकमेकांमध्ये अडम-तडम सुरू झालं. आणि‌ अगदी अनपेक्षितपणे अध्यक्षपदाची माळ माझ्या गळ्यात पडली. ह्यामध्ये भारतीने मी अध्यक्ष व्हावे अशी आग्रही भूमिका घेतली होती.
मी तिचे ह्या निमित्ताने नक्कीच आभार मानेन.कारण जो काही संस्थेत काम करण्याचा अनुभव, सामाजिक भान मला आलं आहे त्याच श्रेय नक्कीच ज्ञानदीपला जातं. भारतीनेही काम करतानाची शिस्त, कार्यक्रमाचं आयोजन हे सर्व वेळोवेळी शिकवलं. त्याशिवाय उमा आवटेपुजारी, विद्या राळे, मंदा खापरेंसारख्या असंख्य मैत्रिणी, आबासाहेब पटवारींसारखे अनेक मार्गदर्शक ' उन्मेष' च काम करताना मला लाभले.आणि  माझ्या मनातली पार्लर न काढल्याची खंत हे काम सुरू झाल्यावर निवळून गेली.अत्यंत महत्त्वाचा उल्लेख केलाच पाहिजे तो म्हणजे आकाशानंद! ज्ञानदीपच्या कार्यकर्त्यांच प्रेरणास्थान! मला देखील त्यांचे आशीर्वाद कायमच मिळाले. जे मला नेहमीच प्रेरणादायी ठरले. आणि माझं उन्मेष ज्ञानदीप मंडळ! ज्याच्या पहिल्या वर्षापासून आज ३५ वर्ष माझ्या सोबत असणार्‍या सर्वजणी सभासद न रहाता आमचं एक कुटुंब झालं आहे.
      ज्योतीनं ज्योत प्रगटवावी तशी डोंबिवली पूर्वेला एकंदर १८ ज्ञानदीप मंडळं स्थापली गेली.  भारतीच्या अथक प्रयत्नानं ती सर्व मंडळं एकत्र येऊन अश्र्विनी ज्ञानदीप संघ स्थापला गेला. आम्ही सर्वजण भारावल्यासारखे संघटितपणे काम करत होतो. स्वतंत्र आपआपल्या मंडळांच आणि अश्र्विनी संघाचं असं काम सुरू होतं.
      ज्ञानदीपमुळे मला अगदी जवळच्या दोन मैत्रिणी मिळाल्या.. वैशाली ओक आणि मीना गोडखिंडी! मी थोडी उंच आणि त्या दोघी बुटक्या त्यामुळे आम्हा तिघींना 'एक शुन्य शुन्य' असं गंमतशीर नांव‌ पडलं होतं. मी १९९० ते१९९५ अशी पाच वर्षे अश्र्विनीची अध्यक्ष होते. ह्या काळात आम्ही तिघी सतत बरोबर असायचो. वैशाली आणि मीना तशा वेगवेगळ्या स्वभावाच्या त्यामुळे माझ्या कामाचा खूप छान बॅलन्स व्हायचा.मीनाचं प्रत्येक काम वेळेत,शिस्तीत व्हावं ह्यासाठी आग्रही असणं आणि वैशालीचं काम हातात घेतलयं ना मग ते होईल ती वेळ आपली अशी वृत्ती! आम्हा तिघींना एकत्रित काम करायला मजा यायची. त्यामुळेच आम्ही ज्योती पाटकर,इंदू देढिया आणि जयश्री करमरकर‌ ह्या तिघींना आमच्या बरोबर घेऊन 'माध्यम' ही संस्था स्थापन केली.संस्थेच्या माध्यमातून घरगुती व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या  वस्तुंना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रदर्शनं भरवण्याचं ठरलं.जवळजवळ तीन‌ वर्ष आम्ही प्रदर्शनांच्या आयोजनाच्या निमित्ताने खूप मजा केली.आम्हा तिघींमध्ये अनेकदा रागवारागवी व्हायची,इतर मैत्रीणींशी मतभेद व्हायचे पण ते सगळं तेवढ्यापुरतं असायचं.पण अचानक दृष्ट लागल्यासारखी वैशाली आम्हाला सोडून गेली.तिच्यानंतर गेल्या वर्षी ज्योतिचं पण दु:खद निधन झालं. ह्या दोघीही आठवणीतून मनात सतत आहेत.
      ज्ञानदीप,माध्यम ह्या सर्व कामातून डोंबिवलीत खूप ओळखी झाल्या होत्या.त्यामुळेच डोंबिवलीत महिला बॅंक सुरू व्हावी ह्या परवानगीसाठी धडपडणाऱ्या मंगलाताई कुलकर्णीशी भेट झाली आणि त्याशिवाय आबासाहेबांनी महिला बॅंकेच्या परवानगीच्या प्रपोजलवर सह्या करणार्‍या दहाजणींमध्ये माझी सही घेतली होतीच. बारा वर्षांच्या परिश्रमातून १९९२मध्ये डोंबिवलीत महिला बॅंकेला परवानगी मिळाली.आणि मी ह्या बॅंकेची संचालक व्हावं असं मला सुचवलं गेलं.  मी अर्थात नाही म्हटलं होतं पण खूप आग्रह झाला आणि ‌२९मे १९९२ रोजी सुवर्ण मंगल महिला सहकारी बँकेच्या पहिल्या संचालक मंडळात माझं नाव लिहीलं गेलं. त्यावेळी नेहमी मनात यायचं ज्ञानदीपसारख्या दूरदर्शनशी संलग्न असलेल्या कामातून मला आवडणार्‍या अभिनय, लेखन ह्याची कधीच संधी मिळाली नाही आणि गणितासारख्या माझ्या नावडत्या विषयाशी संबंधित असलेल्या बॅंकेच्या संचालकपदावर काम करावं म्हणून आग्रह होत होता.
       बॅंकेत अठरा वर्षे संचालक,अध्यक्ष,उपाध्यक्ष अशा वेगवेगळ्या पदांवर काम करत असताना चांगले-वाईट खूप अनुभव आले. ज्ञानदीपचं काम करताना समाजासाठी काहीतरी करण्याचा आनंद मिळत होता.
        बॅंक मात्र एका राजकीय पक्षाच्या अधिपत्याखाली असल्यामुळे समाजकारणा इतकंच राजकारणपण बर्‍यापैकी अनुभवायला मिळालं. बॅंकेत काम करताना  जयश्री कर्वे आणि सुनिती रायकर अशा दोन  मैत्रिणी मिळाल्या. आर्थिक काम असुनही सगळ्या सहकारी संचालिका अतिशय प्रामाणिकपणे काम करणाऱ्या होत्या ही खूप महत्त्वाची आणि आनंददायी गोष्ट होती. त्याकाळात जवळच्या मैत्रिणी म्हणून सुनिती आणि जयश्रीशी प्रत्येक गोष्ट शेअर करायची सवय लागली. जी अजूनही तशीच आहे.
      बॅंकेच्या कामामुळे ग्लॅमर मिळालं, मोठ्या मोठ्या व्यक्तिचं कार्य जवळून बघायला मिळालं. त्याचबरोबर माणसातल्या वागण्यातला स्वार्थ,इर्षा जवळून अनुभवता आली. असे अनुभव आपल्याला नक्कीच प्रगल्भ करतात. बॅंकेत केलेल्या कामामुळे माझ्या स्वभावात कमालीचा पेशन्स आला. निर्णय घेताना, बोलताना विचार करून बोलायची सवय लागली.
   २०१० मध्ये परिस्थितीला शरण जाऊन बॅंक दुसऱ्या बॅंकेत विलीन करावी लागली. मला स्वत:ला हा माझा वैयक्तिक पराभव व्हावा इतकं दु:ख झालं.
       त्यानंतर मात्र  कोणत्याही संस्थेत, पदांवर अजिबात काम करणार नाही असा स्वत:शीच निर्णय घेतला. पण देवाच्या मनात काही तरी वेगळंच होतं. संस्था,पद काहीही नसलेल्या पै सरांच्या  कट्ट्यावर मी काम करावं अशी पै सरांनी इच्छा व्यक्त केली. आणि काम आवडतं असल्यानं आणि माझ्या मनातल्या अटींमध्ये बसणारं असल्यानं मी ती जबाबदारी घेतलीय. पुन्हा एकदा वेगळ्या संधींचा आनंद मिळतोय.
      बॅंक विलीन झाल्यावर अगदी सहज कथा लेखनाच्या स्पर्धेत भाग घेतला आणि पहिलं बक्षीस मिळालं. त्यानंतर वर्षभर आठवड्याला एक अशा ५२ कथा ब्लाॅगच्या माध्यमातून लिहील्या. ज्याचं ग्रंथालीनं पुस्तक प्रकाशित केलं. ह्या पुस्तकानी मात्र अनेकांनी मिळवून दिला असला तरी  जो आनंद मिळाला तो माझ्या एकटीचा होता. आणि आयुष्याच्या संध्याकाळी तो मिळाला म्हणून कृतकृत्य ही वाटतंय!
    महिला दिनानिमित्ताने स्वत:ला शोधताना स्वत:मधले सकारात्मक बदल नक्कीच जाणवले. श्रेयासाठी धडपड करण्यापेक्षा 'स्वान्त सुखाय' काम करत रहावे.मिळालेल्या संधींचा मनापासून काम करून आनंद मिळवावा.कारण काय,किती आणि केव्हा मिळणार हे आपल्यासाठी कोणीतरी ठरवून ठेवलंय.जे आपल्याला फक्त आनंदाने स्वीकारायचं आहे हे आता कळलंय!
      आयुष्याला जर संगीताची उपमा दिली तर संगीतातल्या सात सुरांसारखं सुंदर,मधुर मनात साठवून ठेवावं असं वाटतंय. कारण  रागांमध्ये जसे काही सुर वर्ज्य असतात.तशीच आता आयुष्याची भैरवी  वर्ज्य सुर विसरून मधुर आठवणींच्या सुरात गाता यावी हीच परमेश्वराजवळ प्रार्थना!
                 चैत्र पौर्णिमा
                 ८ एप्रिल २०२०
                           ललिता छेडा