कवडसे

Thursday, April 25, 2019

ग्रे वाली शेड

'राजी' अशी हांक ऐकल्यावर सामंत मॅडमनी चमकून पाहिलं. इथे दिल्लीत
आपल्याला ह्या नावानं कोण हांक मारतोय? आणि आॅफिसमध्ये तर
शक्यच नाही. पण समोर रोहित उभा होता.'अरे रोह्या, तू? राजश्री पण
आपण कुठे आहोत ह्याचा विचार न करता आनंदानं तोंडावर हात ठेवून
जोरात बोलली. 
दोघांना तसं बघून आॅफिसमध्ये सर्वजण एकमेकाकडे
बघू लागले.
"Sorry, guys! आम्ही खूप जूने मित्र आहोत आणि जवळजवळ पंधरा वर्षांनी
एकमेकाला दिसतोय त्यामुळे थोडी एक्साईट झाले "सामंत मॅडम पुन्हा बाॅसच्या
भूमिकेत शिरल्या! "हॅलो, रोहित साने, कसे आहात? चला माझ्या केबिनमध्ये
बसून बोलूया" असं बोलून आणि इकडे तिकडे न बघता ती सरळ स्वत:च्या
केबिनकडे गेली.
तिच्या मागे केबिनमध्ये जाताना रोहितच्या मनांत आलं
दिसण्यात,वागण्यात अगदी शेवटच्या भेटीत होती तशीच आहे ही! तिच्या
केबिनच्या ग्रे रंगातल्या विविध शेड बघून तो म्हणाला" अजूनही रंगाची आवड
बदलली नाही" 
"तू सुद्धा ग्रे चेक्सचा शर्ट घातलायस!आणि असं म्हणू नकोस की लक्षात नाही
आलं,सहज घातलाय.कारण तू सहज काही करत नाहीस. तुझं सगळं ठरवून
असतं नाही का?  राजश्री हसत हसत म्हणाली.आणि "इथे दिल्लीत कसा?
असं पटकन विषय बदलून राजश्रीनी विचारलं.
 "अग, मी तुझी अॅडव्हटायजिंग एजन्सी मुंबईत जाॅईन केलीय"रोहित थोडा
हळूच म्हणाला. "अरे,तू तर रश्मीशी लग्न झाल्यावर तिच्या वडिलांच्या बिल्डिंग
लाईनच्या कंपनीत डायरेक्टर होतास ना? केवढा मोठा कारभार होता त्यांचा!
ती थोडी आश्र्चर्यचकीत होऊन म्हणाली.
"इथल्या बोर्डावर तुझं C.E.O. म्हणून नांव पाह्यलं आणि केवढा अभिमान वाटला.
रोहितनी विषय बदलला होता. "मी दिल्लीला नवीन असाईंनमेंटसाठी आलोय.
पंधरा दिवस राहून तुम्हा सर्वांशी चर्चा करून प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करून जाईन.
अरे पण,तू नोकरी का करतोयस? राजश्री अजूनही त्याची ही परिस्थिती का
झालीय हेच समजत नव्हती.
"सगळं सांगतो, पण आत्ता नको मी बाहेर इतर लोकांशी बोलून घेतो" बोलत बोलत
रोहित उठलाच. राजीला वाटलं हा किती बारीक, ओढलेल्या चेहर्‍याचा दिसतोय.
आत्ता लक्षात येतंय आपल्याला!
काम सुरू झाल्यावर दिवस कुठे गेला ते कळलंच नाही.संध्याकाळी उशीरापर्यंत राजी
कामातच होती.केबिन‌बाहेर आली तर तिचं लक्ष कोणाबरोबर तरी बोलत असलेल्या
रोहितकडे गेलं, तिला वाटलं ह्याला विचारलं पाहिजे की तुझी रहायची सोय झालीय
ना? परत वाटलं तो नाही म्हणाला तर आपण घरी घेऊन जाणार आहोत का?
मनातल्या मनात ठाम उत्तर नाही असं आलं.
नेहमीप्रमाणे तिच्या मनातलं ओळखून रोहित म्हणाला" कंपनीने माझी इथं
आॅफीसजवळ रहायची सोय केलीय! डोन्ट वरी,तू जा तुझी वेळ झाली असेल तर!
बाय, म्हणून ती निघाली खरी पण रोहित तिच्या मनातून जात नव्हता.
राजी, रोहित,रश्मी आर् गॅंग म्हणून त्यांच्या गृप मधे ओळखले जायचे. रोहित
आणि राजी एकाच चाळीत रहाणारे, एकाच वयाचे, दोघंही जे.जे.चे विद्यार्थी.
आणि अगदी समोर रश्मीचं स्वत:च घर! खरं म्हणजे रश्मी त्या दोघांपेक्षा दोन
वर्षांनी लहान होती. रोहितच्या धाकट्या भावामुळे झालेली रश्मीची ओळख,
पण आपल्या दोघांच्यात ती कधी आणि कशी शिरली आपल्याला कळलंच नाही.
रश्मीच्या विचारांनी राजी खूप अस्वस्थ झाली.
नको असलेल्या आठवणी किती जरी झटकल्या तरी एकदा विचार सुरू झाले की
थांबत नाहीत. अचानक चाळीतल छोटंसं भांडण जे रोहितची आई आणि आपल्या
आईमध्ये झालं ते इतकं विकोपाला गेलं की घरच्या सारखे असलेले संबंध पार
संपूनच गेले.
नेमकं त्याच सुमारास आपल्याला रोहितनी लग्नासाठी विचारलं होतं.आणि
आपणही लगेच 'हो' म्हटलं होतं.सिनेमात घडावं तसं एका बाजूला दोन घरातली
तेढ वाढत होती आणि आपलं प्रेम बहरत होतं.आपल हे गुपित फक्त रश्मीला
माहीत होतं. पण तिचा अल्लड स्वभाव राजीला अजिबात आवडत नसे.रोहित
मात्र तिची बडबड, जोराजोरात हसणं खूप एन्जॉय करायचा. कधी कधी रश्मी
म्हणायची" काय ग, सारखं ग्रे,ग्रे! तुझ्या मस्त पांढर्‍याशुभ्र आयुष्यात एखादा
काळ्या रंगाचा ठिपका पडला ना तर सगळं आयुष्यच तुझ्या आवडत्या 'ग्रे'
रंगाचं होईल" आणि तसंच झालं आणि तिनंच केलं.
राजी घरी पोचली आणि रोहितचा फोन आला.फोन कामाच्या संदर्भातच होता.
राजीला वाटलं तो काही तरी स्वत:बद्दल बोलेल पण तो तिच्या हुद्द्याचा मान
राखून बोलत होता.तिला त्याचा हा स्वभाव ठाऊक होता.
घरी तिची लेक रूजूल अभ्यास करत बसली होती. तिला बघितल्यावर राजीला
पुन्हा रोहितची आठवण झाली.पंधरा वर्षाची रूजू अगदी आपल्या सारखी दिसते
फक्त रोहितचे डोळे तेवढे तिनं घेतलेत.राजी काॅफीचा मग घेऊन तिच्या खोलीत
आली.
तिला जुने दिवस आठवले, तेव्हा खरं म्हणजे हळूहळू आई आणि रोहितच्या
घरातल्यांचा राग कमी होत होता.
रोहित आर्किटेक्ट झाला होता. आपण पण डिझायनिंग मध्ये पदवी घेतली.
अगदी पहिला नंबर मिळवला.वाटलं आता सगळं सुरळीत होईल. पण एका भेटीत
आपल्याकडून घडू नये ते घडलं! रोहितने काळजी नको करुस "मी आहे"
असं म्हटलं खरं पण आपण मात्र आपल्या कडून खूप मोठी चूक झाल्याच्या
भावनेने अस्वस्थ झालो होतो.
राजीला तो दिवस आठवला ज्या दिवशी रोहितच्या आई त्यांच्या दरवाजात उभ्या
राहून शेजारच्या काकूंना सांगत होत्या" काल रश्मीचे आई-वडील आले होते
रोहितसाठी विचारायला, आम्ही पण लगेच 'हो'म्हणून टाकलं.आपल्या जातीतलं
इतकं छान स्थळ कोण जाऊन देईल.त्यानंतर राजीला त्या दोघांशी आपण केलेलं
भांडण दोघांनी आपली घातलेली समजूत"आम्ही नाही लग्न करणार असं म्हणणं"
सगळं आठवत होतं.
पण छापून आलेल्या लग्न पत्रिका बघितल्यावर मात्र संतापाने आपण पटकन
स्वीकारलेली ही दिल्लीची नोकरी, एकुलत्या एक असल्यामुळे आई-बाबांना
समजावताना झालेली दमछाक, सगळं आठवून राजीचे डोळे भरून आले.
दिल्लीत आल्यावर महिन्याभरात आपल्याला दिवस गेल्याचं मला कळलं.आई
बाबांना इथे बोलावून पुन्हा एकदा समजावताना त्यांची झालेली वाईट अवस्था!
आईनी बिचारीनं सगळं निभावून नेलं पण बाबा मात्र सहन करू शकले नाहीत.
इथे राजीनं विधवा असल्याचं सांगितलं होतं. रूजूलच्या जन्माआधीच बाबा गेले.
रुजूल पांच सहा वर्षांची झाली आणि आई गेली.
देव अनेक दरवाजे बंद झाल्यावर एक उघडतो तसंच काहीस राजश्री सामंतच
दिल्लीत झालं.करीअर मध्ये खूप छान ओळखी,लिखाणाची मिळालेली संधी,
आवडत्या क्षेत्रात यश हे सगळं मात्र भरभरून मिळत गेलं.रंगांवरचा तिचा
अभ्यास तिला त्यासाठी ओळख देत गेला.आणि हल्ली तर खरं म्हणजे ती
जुनं
सगळं विसरून रूजूलबरोबर खूप छान आयुष्य जगत होती.
अशा वेळी हे अचानक रोहितच येणं तिला अजिबात आवडलं नव्हतं.
तीन चार दिवस थोडे कामातच गेले.आणि अचानक शनिवारी संध्याकाळी  रोहित
तिच्या घरी आला.दरवाजा नेमका रूजूलनी उघडला.आणि "मम्मा, कोणीतरी
आलंय असं ओरडून सांगितलं.राजश्री बाहेर आली त्याला बघून "अरे,इथे का आलास?
पत्ता कोणी दिला?असं रूजूलच्या समोरच संतापानं विचारलं."what happened
 मम्मा? Who is he? रूजूलच्या स्वरात काळजी होती.ह्या सगळ्यामुळे गांगरून
रोहित परत फिरू लागला."एक मिनिट,आला आहेस तर बस!रूजू,तू जा तयार हो,
he is my friend! Don't worry.राजीनी परिस्थिती सांभाळली होती.
"बोल, त्याच्यासमोर हात पुसत राजी बसली.
 "काय बोलू,परवा तू सारखी विचारत होतीस नोकरी का करतोयस तेच सगळं सांगायला
आलो होतो.बाहेर तू भेटणार नाहीस, आॅफिसमध्ये बोलणं योग्य नाही, म्हणून
आॅफिसमध्ये विचारून पत्ता मिळवला"रोहित एका दमात बोलला.
"तुझ्या कथा ऐकायला मला वेळही नाही आणि इच्छाही नाही रोहित.राजीनी बोलणं
संपवायचा प्रयत्न केला.
"तरीसुद्धा मी सांगणार आहे.मला माहित आहे तुला उत्सुकता असणारच"रोहित थोडा
रिलॅक्स झाला होता. "पहिलं म्हणजे आमच्या लग्नाच्या पत्रिका बघून  माझ्याशी न
बोलता तू निघून गेलीस.किती शोधलं पण अजिबात भेटली नाहीस.
रोहितला मध्येच थांबवून राजी "मी ऐकतेय म्हणजे मला पटतंय असं नाही. मी फक्त
तू इतक्या दूर आला आहेस म्हणून ऐकतेय"थोडी रूक्षपणे बोलली.
मला कल्पना आहे. मी नाईलाजानं लग्न केलं होतं.पहिली पांचसहा वर्ष बरी गेली.
पण रश्मीच्या वडिलांचा बिझनेस तिच्या धाकट्या भावाने हातात घेतला आणि अवघ्या
पाच वर्षांत बिझनेसची इतकी वाट लावली की स्वत:तर जेल मध्ये गेलाय आणि माझ्या
सारख्या अनेकांना रस्त्यावर आणलंन.
दिल्लीतल्या ह्या मोठ्या प्राॅजेक्टसाठी मला टेंपररी नोकरीवर घेतलंय. पण देवाचे मी
आभार मानतो की अनपेक्षितपणे तू भेटलीस.
इतक्यात रूजू तयार होऊन बाहेर आली.तिनं लाल टाॅप घातला होता.अगदी सहज रोहितनी
विचारलं"यू लव्ह रेड कलर! साॅरी, मलाही ‌मम्मासारखा ग्रे कलर आवडतो.रूजूलनी
त्याच्याकडे न बघत उत्तर दिलं आणि बाय, मी जाते असं आईला सांगून ती गेली.
रोहितच्या चेहर्‍यावरचं प्रश्र्नचिन्ह बघून"माझी मुलगी रूजूल! राजीनी शांतपणे सांगितलं.
"नवरा कुठे असतो? त्यानं चाचरत विचारलं. गेला, मी विधवा आहे.राजी आवाजात थंडपणा
आणण्यात यशस्वी झाली होती.
"खोटं बोलतेयस तू, रूजूल माझी मुलगी आहे ना?तिचे डोळे मला सांगतायत" रोहितला
कळलंच नाही इतकी हिम्मत आपल्यात कुठुन आली.
"रोहित तू जाऊ शकतोस! राजी उठून आत जाऊ लागली.रोहितला उत्तर मिळालं होतं.
तो गेल्यावर मात्र राजी हमसाहमसी रडू लागली..का आला आपल्या आयुष्यात? मी
एकटी खूप खुश होते पुन्हा एकदा जखमा भळभळू लागल्यात.रडता रडता तिच्या मनात एक
विचार आला आणि तिनं रोहितला फोन लावला" sorry, मी तुझा अपमान केला.
पण... तिला पुढे बोलू न देता रोहित "it's ok मला अपेक्षित होतंच. "हे बघ उद्या रविवार
आहे  तेव्हा डीनरला इथे घरी ये.रूजूल पण दोन दिवस पिकनिकला जातेय. राजीच्या
आवाजात मोकळेपणा होता.रोहित लगेच 'येतोय' म्हणाला. 
रविवारी रात्री दोघांनी खूप गप्पा मारत ड्रींक, जेवण एन्जाॅय केलं. मनातलं सांगताना
आपल्याला मुलं झाली नाहीत हे बोलताना रोहित खूपच हळवा झाला.मला मिळालेली शिक्षा
असं म्हणू लागला.ड्रींक जरा जास्तच झालय तू आता जाऊ नकोस असं म्हणून राजीनी
त्याची सोय गेस्ट रूम मध्ये केली.
हळूच त्याचा फोन आपल्याकडे ठेवायला विसरली नाही.
राजीच्या अपेक्षेप्रमाणे सकाळी रोहितला रश्मीचा फोन आला. हॅलो'रश्मीचा आवाज राजींनी
इतक्या वर्षांनी पण लगेच ओळखला होता. "हॅलो, मी राजी बोलतेय! समोर एकदम शांतता
पसरलेली राजीला जाणवली.पांढर्‍याशुभ्र रंगावर काळा ठिपका पडून पसरायला लागला होता.
"रश्मी, मी राजी! तू दिल्लीत कशी?रश्मीला काय बोलावं ते सुचत नव्हतं.रंग छान डार्क व्हायला
लागला होता. 
"अग, मी दिल्लीलाच रहाते, तुला असं विचारायचंय का रोहितचा फोन माझ्याकडे कसा?
राजी रंग व्यवस्थित सारखा करत होती.
 "तो माझ्याच कंपनीत टेंपररी लागलाय.काल माझ्याकडे डीनरला आला होता.ड्रींक्स थोडी जास्त
झाली म्हणून इथेच झोपलाय. राजीचा रंग मनाप्रमाणे चढत होता.
अग तो माझा नवरा आहे,त्याला फोन दे राजी, रश्मी घायकुतीला आली होती.
"साॅरी, तो माझ्या बेडरूममध्ये गाढ झोपलाय.उठला की नक्की सांगते तुझा फोन आल्याचं!
बाकी तू कशी आहेस? समोरचा फोन बंद झाला होता.
पॅशन, एनर्जी असणारा लाल रंग आवडणारी रश्मी,इमोशनललेस,डल् ग्रे शेड समोर हरली होती.
आत्तातरी तिच्या संसारावर ग्रे वाली शेड पसरली होती.
       ललिता छेडा


Posted by Lalita Chheda at 9:58 AM 2 comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

Thursday, April 18, 2019

चमत्कार


समोरच्या चाळीत तळमजल्यावर रहाणार्‍या रमाईंच्या घरीच कबीर, तिचा मुलगा खेळत असणार अशी खात्री असल्यामुळे अरूणानी दार ओढून घेतलं आणि कबीरचे बुट घेऊन ती खाली उतरली.
          रमाई  दारातच बसून कबीरला गोष्ट सांगत होत्या.आणि तो देखील तल्लीन होऊन ऐकत होता.आईला बघून तो लगेच म्हणाला"आई, मी आज रमाईंकडेच रहाणार तुझ्या बरोबर नाही येणार! "अरे कबीर, आपण आजीकडे चाललोय ती तुझी वाट बघतेय." अरुणानी त्यानी बुट घालावेत म्हणून त्याचा पाय पूढे ओढला.पण कबीरनी पटकन मांडी घातली.
      रमाताई पूढे होऊन म्हणाल्या"हे बघ,तू जर आजीकडे गेलास तर परवा तू आल्यावर मी तुला दोन गोष्टी सांगेन"
     "आजच्या सारख्या कृष्णाच्याच दोन गोष्टी सांगायच्या.कबीरला कळलं होतं आता आपल्याला आईबरोबर जावं लागणार आहे.त्यामुळे "आई आज पासून तू मला कृष्ण म्हण.माझ नांव बदलूया"बुट घालत घालत कबीरची बडबड सुरु झाली.तो खळखळ न करता निघालाय ह्याचाच अरूणाला आनंद झाला होता.
     रमाईंकडून निघताना अरूणाच्या मनांत आलं नशीबानीच आपल्याला असा शेजार मिळालाय. नाहीतर कबीरचा जन्म झाला आणि आपल्या नवर्‍याची इथे मुंबईत बदली झाली. आणि सगळं आयुष्य पुण्यात गेलेल्या अरूणाला मुंबईत इतक्या तान्ह्या बाळाला घेऊन रहायचं टेन्शनच आलं होतं. सासर माहेर दोन्ही पूण्यातच होतं.पण नवरा पोलिसात असल्यामुळे बदलीसाठी मनाची तयारी होतीच. सुरवातीला सासुबाई,आई महिना महिना राहून गेल्या.आणि त्या दोघींमुळेच तळमजल्यावर एकट्या रहाणार्‍या रमाताईंशी ओळख झाली. रमाताईंनी कबीरला सांभाळण्याची अगदी सहज जबाबदारी घेतली.अरुणाला पण त्यांचा खूप आधार मिळाला.
     रमाताईंना दोन मुलं एक मुलगी, एक मुलगा! मुलगा अक्षय अमेरिकेत स्थायिक झाला होता आणि मुलगी तन्वी लग्न करून बंगलोरला रहात होती. त्या पंचेचाळीस वर्षाच्या होत्या तेव्हा त्यांच्या यजमानांनच अपघाती निधन झालं.नोकरी करून मोठ्या जिद्दीनं त्यांनी एकटीनं मुलांचं शिक्षण, लग्न सगळं केलं होतं.
       रमाताईंना त्यांची मुलं 'रमाई' म्हणायची त्यामुळे परिसरात त्या रमाई म्हणूनच प्रसिद्ध होत्या. 
      त्यांच खास वैशिष्ट्य म्हणजे श्रीकृष्णावरची अपरंपार भक्ती  अर्थात ती भक्तीच त्यांच्या जगण्याची ताकद होती. आणि रमाईंची दुसरी आवड म्हणजे माणसांना घरी बोलवायचं आणि खाऊ घालायचं.त्यांच्या मते सर्व माणसं चांगलीच असतात.अरूणाला त्यांच्या ह्या स्वभावाच कौतुकही होतं आणि काळजीही वाटायची.
      रमाईंच्या घरासमोर एक मैदान होतं.जिथे चालायला सकाळ-संध्याकाळ खूप लोकं यायची.येणारा प्रत्येक माणूस एकदातरी रमाईंकडे काॅफी पिऊन गेलेला असायचाच.अरुणा म्हणायची" रमाई असं सगळ्यांना घरी नका आणत जाऊ.तुम्ही एकट्या रहाता ते कळतं!"एकटी कशानं,हा असतो की माझ्या बरोबर घरात."रमाई हाॅलमधल्या बासरी वाजवणार्‍या कृष्णाच्या मुर्तिकडे बोट दाखवून म्हणायच्या. त्यांच्या घरातल्या प्रत्येक कोपऱ्यात कृष्णाच्या छोट्या-मोठ्या मुर्ति, फोटो होते.कायम स्वच्छ आवरलेल्या घरांत कृष्णा जवळ सकाळ, संध्याकाळ ताजी फुलं ठेवलेली असत.रोज कबीरला शाळेत सोडून आली की अरूणाची रमाईंकडे एक फेरी असायची.थोड्या गप्पा,थोडी मदत असा तासभराचा दोघींचा कार्यक्रम असायचा.अर्थात कबीरच्या बाबांच्या शिफ्ट प्रमाणे ह्या वेळा बदलायच्या.
        दरवर्षी साधारण डिसेंबरमध्ये रमाईंचा लेक अमेरिकेतून यायचा आणि बहूतेक मेच्या सुट्टीत तन्वी रहायला यायची.त्या दिवसात रमाईंची लगबग काही वेगळीच असायची. आणि त्यांची मुलं देखील आल्यावर संपूर्ण वेळ आईसाठी द्यायची.अक्षय अरूणाला म्हणायचा देखील "तुम्हा सर्वांमुळे मी तिकडे निश्र्चिंत असतो.लगेच रमाई म्हणायच्या"अरे कान्हा पण असतोच की माझ्या सोबतीला" "हो ग बाई,तो तर खास!तन्वी तर त्यांना कृष्ण भक्तीवरून नेहमीच चिडवायची.पण त्यांना ओळखणार्‍या सगळ्यांनाच त्या भक्तीतला खरेपणा माहीत होता.
      रविवारी संध्याकाळी कबीर आणि अरूणा आले, आणि त्यांना आणायला कबीरचे बाबा गाडी घेऊन पुण्याला गेले होते.रात्रीच त्यांच जेवण नेहमीप्रमाणे रमाईंच्या घरीच होत.जेवताना कबीरची अखंड बडबड सुरु होती."मी उद्या शाळेतून आल्यावर मला कृष्णाची गोष्ट सांगायची नक्की, दोन गोष्टी सांगायची प्राॅमिस आहे.लक्षात आहे ना? 
       मध्येच  "ह्या जुलैमध्ये मी अमेरिकेला यावं असं अक्षय म्हणतोय.तुम्हा मंडळींना पण बोलावलंय, येणार का?रमाई अचानक म्हणाल्या.
    "छे हो रमाई, तुम्ही मात्र नक्की जा"अरूणा पटकन म्हणाली. मी देईन सगळी तयारी करून! अरूणा मनापासून बोलत होती.
      नंतरचे दोन महिने तयारीत कसे गेले कळलंच नाही.अरूणा रमाईंच्या सतत बरोबरच होती.
     रमाईंनी थोडेसे दागिने नव्या सुनेला अमेरिकेला जातोय तर देवूया असं ठरवलं. लाॅकर मधून दागिने आणल्यावर अरुणा रमाईंना सारखी बजावत होती की कोणाला सांगू नका की तुम्ही दागिने घेऊन चालला आहात.पण रमाईंच्या भरभरून बोलण्याच्या स्वभावानुसार भेटायला येणार्‍या प्रत्येकाला तयारी काय-काय केलीय हे सांगताना दागिने मात्र मी पर्समधूनच नेणार आहे.हे सांगत होत्या.
      बघता बघता जायचा दिवस उजाडला.फ्लाईट रात्रीची होती.रमाई लवकर उठून समोर मैदानात गेल्या.सर्वांचा निरोप घेऊन घरी येईपर्यंत उशीर झाला होता.त्यांनी वर बघितलं आणि त्यांच्या मनात आलं कबीर शाळेत गेला असेल.
    घर सगळं आवरलेलं,रिकाम पाहून त्यांना थोडं वाईट वाटलं.पण लेकाकडे जायच्या आठवणींनी पुन्हा त्या खूष झाल्या.बॅग,पर्स सर्व दाराजवळच्या सोफ्यावर आणून ठेवले होते.आज दिवसभर अरूणाकडेच जेवण खाणं होतं.संध्याकाळी एअरपोर्ट वर सोडायला तिच दोघं येणार होती.
   अचानक दरवाजाची बेल वाजली आणि मैत्रिणीचा फोनही आला.त्यामुळे मोबाईलवर बोलत रमाईंनी दार उघडलं.जाळीच्या दाराबाहेर दोन अनोळखी माणसं उभी होती."आजी,तुमची लॅण्डलाईन बंद आहे.आम्ही लाईनमन आहोत तपासायला आलों आहे.रमाई दारावर उभ्या राहून त्यांना 'थांबा'अशी खूण करत फोनवर बोलत होत्या.
        इतक्यात त्यांना दाराजवळच्या कट्ट्यावर कबीर कंबरेवर हात ठेवून उभा असलेला दिसला.फोनवर हात ठेवून त्या दरवाजामागून अरे,तू शाळेत नाही गेलास?असं‌ म्हणून दार उघडू लागल्या.नेहमीप्रमाणे दरवाजाच्या बाहेरच्या बाजूला उडी मारून मी आधी घरात जाणार म्हणून दरवाजा अडवून उभा राहिला.त्याची ही नेहमीची सवय होती.तो घरात पहिला जाणार आणि बाहेर पण पहिला पडणार."अंकल, तुम्ही मागे व्हा.मी फर्स्ट! 
        आणि अचानक कबीरनी बाबा-बाबा अशी खूप  जोरात हांक मारली.तेव्हाच रमाई फोन बंद करून दार उघडत होत्या.त्या दोघांनी दोन्ही हातानी दार धरून उभ्या असलेल्या कबीरला थोडंसं ओढूनच बाजूला केलं.पण कबीरचा हाक मारलेला आवाज ऐकून त्याचे बाबा तर बाहेर आलेच होते त्याबरोबर आजूबाजूच्या घरातली मंडळी पण बाहेर आली होती...
    ती दोघं झटक्यात आत शिरली‌ .त्यांच तस आत घुसणं कबीरच्या बाबांच्या पोलिसीनी नजरेनी टिपल‌ होतं.ते वीजेच्या वेगाने रमाईंच्या घराकडे धावले.तोपर्यंत त्या दोघांनी रमाईंना ढकलून सोफ्यावरची पर्स आणि बॅग उचलून घराबाहेर धाव ठोकली होती.कबीरमुळे रमाईंना धमकावून निवांत चोरी करण्याचा त्यांचा प्लान फसला होता.
      जीवाच्या आकांतानी ते दोघे बाहेर त्यांच्या साठी उभ्या असलेल्या रिक्शाच्या दिशेने धावले.पण चित्त्याच्या चपळाईने कबीरच्या बाबांनी त्यांना पकडलं  आणि बाहेर आलेल्या इतर मंडळींनी पण त्यांना  मदत केली.
    चोरांना पकडल्यावर सगळ्यांना रमाईंची आठवण झाली.त्या घाबरून सोफ्यावर बसल्या होत्या."रमाई काही झालं नाही ना!"अरूणानी त्यांना पाणी देत विचारलं. कृष्णाला काळजी, मला काही झालं नाही.अग पण कबीर कुठे आहे?तो ओरडला म्हणून बरं झालं,सगळेजण धावून आले"रमाई थकलेल्या आवाजात बोलल्या.
      "कबीर, कुठे रमाई!तो तर शाळेत गेलाय".अरुणा अचंबित होऊन म्हणाली.
      "असं कसं होईल!अग त्याने तर हांक मारली बाबांना!रमाई दोन्ही हात तोंडावर ठेवून म्हणाल्या.
      तोपर्यंत सर्वजण रमाईंच्या घरात आले होते.'बाबा' ही हांक सर्वांनीच ऐकली होती.पण कबीर कोणालाच दिसला नव्हता.रमाईं सर्वांना घडलं ते सर्व सांगत होत्या.त्या घटनेत कबीरच कट्ट्यावर असणं,दार अडवणं सगळ होतं पण अरूणा म्हणत होती "शक्यच नाही"तो शाळेत आहे.
    सगळेजण विचारात पडले होते.हे नक्की काय घडलंय! "रमाई, तासाभरात कबीरची शाळा सुटेल आणि तुम्हीच विचारा त्याला तो शाळेतून घरी आला होता का?
     तासाभरानंतर कबीर शाळेच्या बसमधून सोसायटीच्या दाराशी उतरला.रमाई तर जशा वाटच बघत होत्या.
       अरे, शाळेतुन तुला कोणी घरी आणलं होतं का रे?रमाईंनी त्याच्या डोक्यावरून हात फिरवत विचारलं.कबीरच्या शाळेच्या अवतारा वरुन त्यांना समजत होतं की आपला प्रश्र फोल आहे.
      नाही ग,रमाई, आज आम्ही शाळेत खूप धमाल केली.आम्हाला मैदानावर नेलं होतं" कबीर खूषीत होता.
      "अरूणा,अग माझा कृष्ण आला मला संकटातून सोडवायला" रमाई आनंदित झाल्या होत्या.लगबगीनं देवघरातल्या कृष्णाच्या मुर्तिसमोर दिवा लावायला गेल्या.
    "अरुणा, पटकन गोडाचा शिरा करते सगळ्यांसाठी, नेवैद्य दाखवून आणते पटकन! रमाईंच्या भक्ति पुढे अरूणाला काय बोलावं कळत नव्हतं.तिनं पटकन सामान आणून दिलं.
      पण तिच्या सारखं मनात येत होतं,आज वाचल्या असं दरवेळी नाही होणार!
     सर्वजण गेल्यावर रमाई हळूच अरूणाला म्हणाल्या"चमत्कार करून कृष्णानी मला चागलाच धडा शिकवला हो!आता नाही मी ज्याला त्याला सगळं सांगणार! आता नको काळजी करू, नेईल तो मला सुखरूप.
     अरूणाला वाटलं त्यांना म्हणावं"तुमच्या देवाच ऐकून जरी भाबडेपणा सोडलात तरी तो आमच्यासाठी चमत्कार असेल.पण काहीच न बोलता ती त्यांच्याकडे प्रेमाने बघून हसली.
                         ललिता छेडा
Posted by Lalita Chheda at 3:56 AM 1 comment:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

Thursday, April 11, 2019

उंबरठा


निर्मलाकाकू आता कधीही जाईल अशा परिस्थितीत आहे हे सर्वांना समजत होतं.आणि तिचा जीव कशात अडकलाय ते पण सगळ्यांना कळत होतं.पण "मीनलला बोलवूया" असं मोठ्या काकांना कोणी सांगायचं तेच कळत नव्हतं.
   निर्मला पण ताकद नसल्याने डोळे मिटून पडून होती.पण तिला सगळं ऐकू येत होतं.तिला वाटलं सांगावं"मला मीनल भेटायला हवीच आहे पण तिलाच नक्की  माहित आहे की मला काय हवंय, माझा जीव कुठे अडकलाय! ज्या उंबरठ्यावरच माप ओलांडून मी ह्या घरात आले आणि माझा अचेतन देह जेव्हा उंबरठा ओलांडून बाहेर जाईल.तेव्हा तो उंबरठा स्वच्छ, रोजच्यासारखा रांगोळीने रेखाटलेला हवा.
         मिटलेल्या डोळ्यांनी निमा भुतकाळात रमली होती.आज जवळजवळ चाळीस वर्ष झाली आपल्याला पुण्यातल्या ह्या केळकरांच्या वाड्यात लग्न करून आलो त्याला! मुंबईतल्या दोन खोल्यांच्या चाळीतून येवढ्या मोठ्या वाड्यात आल्यावर आपण किती हरखून गेलो होतो.
      दिंडी दरवाजातून आत जायचा उंबरठा थोडा उंचच होता.त्याला ओळंगून पूढे आलं की दोन बाजूला दोन दोन बिर्‍हाडं! नंतर विहीर तिथेच धूण्याचा दगड, तिथंच सर्वांसाठी संडास-बाथरुम आणि आपल्या घरातल्यांसाठी मात्र मागच्या दरवाज्याजवळ हीच सोय स्वतंत्र केलेली होती.
           पुढच्या बाजूला विहीरीनंतर छोटंसं तुळशीवृंदावन,नंतर ओटी, घरांतल्या मुख्य दरवाजाच्या चौकटीखाली  छोटासा उंबरठा ज्यावर ठेवलेल्या धान्यानं शिगोशिग भरलेलं माप ओलांडून आपण घरात आलो.इतकी सुंदर रांगोळी काढलेली होती त्या उंबर्‍यावर! लक्ष्मीची पावलं कोपऱ्यात होती तर उंबरठ्यावर गोपद्म, स्वस्तिक काढलेली होती. आणि आत आल्याबरोबर स्वागत करायला छोटी 'मीनू' सगळ्यात मोठ्या दिरांची एकुलती एक मुलगी. आणि तेव्हापासून मीनल,निमाकाकूची गट्टी जमली. मधल्या जाऊबाईंचा एकुलता एक मुलगा आणि आपले दोन मुलगे, आणि सासूबाई, केवढं भरलेलं घर होतं आपलं! सासूबाईंनी आपल्या स्वभावानी सगळ्यांना जोडून ठेवलेलं होतं. आणि आज त्या नाहीत तरी आपण सगळे एकत्र राहतोय. दहा वर्षापूर्वी मुलांचे वडील अचानक गेले.पण नशीबानी दोन्ही सुना चांगल्या आहेत.धाकटी तर इतकी बडबडी आणि हौशी आहे की सगळ्या घरातलं चैतन्य आहे ती! 
    लक्ष्मी रोडवर साड्यांच छोटं दुकान दोन्ही मोठे दिर चालवायचे.आणि आपले यजमान पुण्यातच नोकरी करत होते.यजमानांनच्या आठवणीने निर्मलाचे डोळे भरून आले.कुणीतरी म्हणालं"वहिनींच्या डोळ्यात पाणी आलंय" निर्मलाच्या धाकट्या सुनेनं काळजीपूर्वक डोळे पुसले.आणि म्हणाली"मी बोलते मोठ्या काकांशी आणि बोलावून घेऊया मीनलला"
      तिकडे मीनलला पण कळलं होतं की काकू खूप आजारी आहे. काकूला कॅन्सर झाल्याचं आपल्याला कोणीच सांगितलं नाही आणि आता ती सिरीयस झाल्यावर कळतंय, ती खूपच बेचैन झाली होती.
      सिंधी मुलाशी लग्न केल्यानंतर बाबांनी "परत इकडे यायचं नाही.तुझा आमच्याशी संबंध संपला."असा मधल्या काकांनकडून फोन केला.आणि बारा वर्ष झाली आपण घरी गेलो नाही.
     दोन-चारदा मैत्रीणींनी फोन लावून दिला त्यामुळे निमाकाकूशी,आईशी बोललो होतो.पण ते तेवढ्यापुरतं.
       आपली सर्वात जवळची मैत्रीण म्हणजे निमाकाकू, मीनलला सकाळपासून वेड्यासारखी काकूची आठवण येत होती.पहाटे साडेपाच पासून काकूचा दिवस सुरू व्हायचा.घराच्या मागच्या दारापासून दिंडी दरवाजापर्यंत स्वच्छ कचरा काढल्यानंतर आंघोळ झाली की काकू तुळशी वृंदावनापाशी, देवघरात, आणि महत्त्वाचा तिचा खास उंबरठा त्यावर रांगोळी काढायची.इतकी पटकन पण सुरेख,रेखीव काढायची की घरात येणार्‍या प्रत्येकाची कौतुकाची नजर उंबर्‍याकडे जायची. आणि दुपारच्या जेवणानंतर शिलाई मशीनवर बसलेली काकू डोळ्यांसमोरून  हलत नव्हती.मीनलनी ठरवलं पुण्याला जायचं.पण आपल्या वरून भाकर तुकडा ओवाळायला उंबर्‍यावर काकू नाही येणार.मीनलचे डोळे भरून आले.मधल्या काकूचा एकुलता एक लेक अमेरिकेत शिकायला निघाला आणि निमाकाकू म्हणाली होती " देशाचा उंबरठा ओलांडून विदेशात निघालायस पण परत ये बरं! पण तो काही आला नाही तिथंच सेटल झाला.नंतर मधली काकू गेल्याच कळलं!
    मिनल घरच्या आठवणींनी व्याकुळ झाली होती.इतक्यात मोहन तिचा नवरा तिथं आला."क्या हुआ? त्यानं विचारलं आणि मीनलला रडू आवरेना."माझी निमाकाकू खूप आजारी आहे.मला तिची खूप आठवण येतेय"
          अरे,फिर जाकर मिल आना।"मोहन सहज बोलला.गाडी लेकर जाना,तो तुरन्त वापस आ सकते हो। 
         दोघं बोलत असतानाच फोन वाजला "मी विद्या, तुमच्या निमाकाकूंची धाकटी सून! तुमची काकू खूप आजारी आहे.तुमची वाट बघतेय.लगेच निघाल?
       मीनलच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता.
  "काळजी नका करू, मी मोठ्या काकांच्या परवानगीनंच फोन केलाय"विद्याला फक्त "लगेच निघते"येवढं बोलून तिनं फोन ठेवला.
      जातीपातीच्या पलिकडे असलेलं आपलं नातं बाबांनी जाणलं की काकू साठी आपला अभिमान बाजूला ठेवला.जाऊ दे, मी काकूला भेटणार हे महत्त्वाच! 
    रस्ताभर काकूचीच आठवण, आपण दोघी कशा ऐनवेळी पापड तळून तासनतास जेवत बसायचो,निमा-मीना उलटसुलट एकच वेलांटी अस म्हणून हसायचो!
विचारात ती पुण्याला कधी पोचली कळलंच नाही.
     दाराशी काकूचा मुलगा,भाऊ जणू तिची वाटच बघत होते.
       दिंडी दरवाजाचा उंबरठा ओलांडून जाताना मीनलला आठवलं "ह्या उंबर्‍यावर बसून काकू,आई बरोबर किती गप्पा मारल्यात.आपल तोंड रस्त्याकडे आणि काकूचं नेहमी घराच्या दिशेने!इथेच आपण काकूला सांगितलं "आपल्याला मिडीया रिपोर्टर व्हायचंय,इथे आपण आपलं मोहनवर प्रेम आहे हे काकूकडे कबूल केलं.
       घराचा उंबरठा धूळीनी भरलेला केविलवाणा दिसत होता. मीनल आल्याची कुजबुज घरात सुरू झाली.पण कोणाकडेही न पाहता ती धावत काकू जवळ गेली."काकू मी आलेय,तुझी मिनू डोळे उघड ना!आणि तिचा आवाज ऐकून निर्मलानी क्षीणपणे डोळे उघडले.मीनल तिच्या डोक्यावरून हात फिरवत होती."काकू,आधी उंबरठ्यावर रांगोळी काढू ना? अस्वच्छ उंबरा बघवत नाहीय ना? मीनल बोलत बोलत उठली आणि हातात फडकं घेऊन घराचा,देवघराचा उंबरठा स्वच्छ पुसून काढला.काकूसारखीचं तिनं शिकवली तशीच सुरेख रांगोळी काढली.अनभिष नजरेनं निमाकाकू आणि सर्व घर तिच्या हालचाली बघत होतं. अगदी ठरवल्यासारखं कोणीही रडत नव्हतं.
      निर्मला काकूंच्या जवळ येऊन मीनल म्हणाली" रांगोळी झाली की तू म्हणायचीस तसं एकदा म्हणं ना"मिनूताई, दूध पिऊन घ्या.आल्यापासून नुस्ती धावपळ चाललीये!
       पण तिच्या निमाकाकूनी उंबरठ्यावरची रांगोळी पूर्ण झाल्यावरच शांतपणे डोळे मिटले होते.तिच्यासमोर हात जोडून उभ्या असलेल्या मीनलच्या वडिलांना रडू आवरत नव्हतं."जातीपातीच्या खोट्या विचारांत मी खरीखुरी नाती जपू नाही शकलो.वहिनी,माफ करा मला! 
     पण मीनलला डोळे भरून बघितल्यावर निर्मला तर रांगोळी रेखाटलेला उंबरठा ओलांडून अनंताच्या यात्रेला निघून गेली होती.
                       ललिता छेडा
Posted by Lalita Chheda at 3:17 AM 5 comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

Thursday, April 4, 2019

द्वंद्व

     माझं सगळं आयुष्यच द्वंद्वानी भरलेलं आहे.सुख-दु:ख, चांगल-वाईट,न्याय-अन्याय, खरं-खोटं आणि खूप काही! म्हणूनच बहूतेक माझं नाव नर्मदा ठेवलं असावं.काहीही घडलं तरी वहात रहायचं! 
      सांगली जवळच्या एका खेड्यात जन्मलेल्या मला मामानी अकरावी म्हणजेच हल्लीची दहावी झाल्यानंतर पूढे शिकवतो असं माझ्या आईला सांगून मुंबईला आणलं. मी पण मुंबईला जायला मिळणा वोर म्हणून खूष होऊन बॅग भरून मामाबरोबर अक्षरशः नाचतच निघाले.तशी मी उफाड्याची त्यामुळे आईला माझी काळजी होतीच. ती सारखी मामाला बजावत होती."पोर भाबडी आहे.तिला सांभाळत जा.रात्रीची बाहेर पाठवत जाऊ नकोस"भरून आलेल्या डोळ्यांनी आईनं निरोप दिला. खरं म्हणजे तिला मला पाठवायचं नव्हतं.पण एकत्र कुटुंबात पंधराजणांच करताकरता ती थकून जात होती.तिला वाटलं तीन मुलीतल्या एखादीचं तरी भल व्हावं. 
       मुंबईत मामाच्या दोन खोल्या होत्या.कोपर्‍यातल्या असल्यामुळे त्यानं बाल्कीनीची बंद करून एक जास्तीची खोली केली होती.मला ती जागा फार आवडली.आणि दुसरी आवडलेली गोष्ट म्हणजे शेजारी रहाणारा 'विश्राम'. मेडिकलच्या शेवटच्या वर्षाला असणारा विश्राम अगदी थोड्या दिवसात माझा मित्र झाला.
     मामांनी मात्र मला काम करायलाच आणलेलं आहे हे मला महिन्याभरात लक्षात आलं.मामामामी दोघंही नोकरी करत होते.त्यांची दोन्ही मुलं शाळेत जाणारी होती. मला घरकाम करायला त्यानं आणलं होतं. तो माझ्या शिक्षणाबद्दल काहीच बोलत नव्हता.
      विश्रामला माझी घुसमट समजली आणि त्यानं मला नर्सिंग शिकशील? असं विचारलं.मी हो म्हटल्यावर मामाला समजावलं आणि मामाचं घर सांभाळून मी शिकले आणि नर्स झाले.आणि माझ्या उत्तम मार्कांमुळे त्याच सरकारी हाॅस्पिटलमध्ये मला नोकरी देखील मिळाली.
       विश्राम मात्र सर्जन झाल्यावर ठरवल्याप्रमाणे कोकणातल्या आपल्या गांवी हाॅस्पिटल काढायला चाळ सोडुन गेला. माझ्या आयुष्याला मात्र दिशा त्याच्यामुळेच मिळाली होती.
     माझ करिअर सुरू झाल्याचा 'आनंद' होता पण बरोबरीनं विश्रामच्या रत्नागिरीला जाण्याचं 'दुःख' होतंच. आणि हे द्वंद्व मी विश्रामच्या खरं म्हणजे प्रेमात पडले होते त्यामुळे मनातल्या मनातच संपवलं....

      गावाकडे माझ्या दोन्ही मोठ्या बहिणीं सातारा,मिरजेत लग्न करून रहायला लागल्या होत्या. नोकरीच्या निमित्ताने धाकटा भाऊ नाशिकमध्ये रहायला गेला होता.आम्ही सगळी भावंडं विखुरले गेलो होतो.
     मामीची मुलंही मोठी झाली होती.त्यामुळे तिला  माझी असलेली गरज संपली होती.
       आईच्या सांगण्यावरून मामींनी माझ्यासाठी स्थळं बघायला सुरुवात केली.आणि तिच्या नोकरीच्या ओळखीतून कांजूरमार्गला स्वत:ची छोटीशी चाळ असलेल्या पाटीलांच स्थळ सांगून आलं. एकत्र कुटुंब होतं.सासूसासरे, दोन वर्षांपूर्वी लग्न होऊन आलेल्या मोठ्या जाऊबाई  होत्या.त्यांना एक मुलगा होता.दोन लग्न झालेल्या नणंदा आणि चांगली नोकरी असलेला माझा होणारा नवरा. मी 'नाही' म्हणाव असं काहीच नव्हतं पण मला मात्र 'हो' म्हणावं असं वाटत नव्हतं.
पण.....
       लग्न झाल्यावर मी नोकरी सोडावी असं घरातल्या सगळ्याजणांचीच इच्छा होती पण मी मात्र सगळ्यांच्या मनाविरुद्ध जाऊन माझी नोकरी सूरूच ठेवली.आणि महत्त्वाचं म्हणजे माझ्या नवर्‍यानं मला चांगलाच सपोर्ट दिला.
      लग्नाला दहा वर्षे झाली होती.मला दोन मुली झाल्या होत्या.जाऊबाईंशी मात्र माझं काही जमत नव्हतं.त्या खूप चिडक्या आणिभांडकुदळ होत्या.
    सतत 'खर-खोटं' करणं ही त्यांची एक वाईट सवय होती.ज्याचा मला प्रचंड संताप यायचा.
     सासूबाई गेल्यावर मात्र मी घरातल्या घरात वेगळी झाले.सासरे माझ्याबरोबर रहात होते.पण वेगळं झाल्याच्या अवघ्या दोन महिन्यांत ह्यांना अर्धांगवायूचा मोठा झटका आला.आणि ह्यांनी अंथरुण धरलं.वेगळ होऊन निवांत वाटत असलेल्या 'सुखाला' ह्यांच्या आजारपणामुळे 'दुःखाची' किनार लागली होती. ह्या सुखदुःखाचं द्वंद्व विसरून मी पुन्हा एकदा पदर खोचून कामाला लागले.मुली पण शहाण्यासारख्या मला मदत करत होत्या.पण.....
       माझ्या नशिबात काही वेगळेच लिहीलेलं होतं.
       अजूनही तो दिवस माझ्या लक्षात आहे.ह्यांचा वाढदिवस होता म्हणून खीर केली होती.सेकंडशिफ्ट असल्यामुळे त्यांना भरवून हाॅस्पिटलला जायला निघाले.मुलीपण शाळेत गेल्या होत्या.सासर्‍यांवर ह्यांना सोडून मी हाॅस्पिटलला जेमतेम पोचले आणि घरातून फोन आला."ह्यांची तब्येत बिघडलीय म्हणून ताबडतोब घरी ये"काही कळेना, घरी पोचले तर ह्यांना उलट्या, जुलाब झाल्यामुळे जवळच्याच हाॅस्पिटलमध्ये अॅडमिट केलंय असं कळलं! धावत धावत तिथे पोचले तोपर्यंत हे आम्हाला सोडून गेले होते.पोस्टमाॅर्टमचा रिपोर्ट 'विषबाधेनी मृत्यू! 
        माझ्या साठी खूप मोठा धक्का होता.
जे जेवण भरवून मी गेले होते ते माझ्या शिवाय अजून पर्यंत कोणीच खाल्लं नव्हतं.आणि मला काहीच झालं नव्हतं.संशयाची सूई जाऊबाई बडबड करून माझ्या दिशेने वळवत होत्या.पोलिस तपास केल्यानंतर काय ते ठरवतील असा विचार करून मी शांत रहाण्याचा प्रयत्न करत होते.
      दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिस येऊन मला तपासासाठी पोलिस ठाण्यात घेऊन गेले.आणि ह्यांच्या खूनाच्या संशयावरून मला अटक झाली.
      मला काही कळतच नव्हतं.पोलिसांच्या गाडीत बसताना मुलींचे चेहरे डोळ्यासमोरून हलत नव्हते.सासरे ज्या असहाय्यपणे बसले होते ते आठवून सारखं भरून येत होतं.
    खरं-खोटंच्या द्वंद्वात मी चांगलीच सापडले होते.आता कितीही ओरडून मी खरी आहे असं सांगितलं तरी माझी सरकारी नोकरी जाणार होती.मला वकील कोण देणार?    
         त्या चार दिवसांत फक्त जाऊबाई येऊन गेल्या होत्या. सासरे आजारी आहेत येवढंच बोलल्या. मुली कश्या आहेत विचारल्यावर कुत्सितपणे हसल्या.
      त्या संपूर्ण काळात माहेरचं कोणीही फिरकलं सुध्दा नाही.
    काही दिवसांनी माझी रवानगी मोठ्या जेलमध्ये झाली.खटला उभा राहिला.सासर्‍यानी वकील केला होता.ह्या वयात ते जे काही करत होते ते शब्दातीत होते.पण सारखं वाटत होतं की ह्यांना कोणीतरी मदत करतोय.ते काहीच बोलत नव्हते.
   वकिलाने मला त्यादिवशी घडलेलं क्रमानी सांगा.अस सांगितल्यावर एकच गोष्ट बोलताबोलता आठवली की ‌ह्यांना खीर भरवताना जाऊबाई बटाटे मागायला आल्या होत्या.आणि वाटी तिथेच ठेऊन मी स्वैपाकघरात गेले होते.वकीलांनी सर्व नोंद करून घेतलं होतं.
     जवळपास आठ महिन्यांनी माझी 'पुराव्याअभावी' निर्दोष मुक्तता! आता पुन्हा एकदा न्याय आणि अन्यायाचं द्वंद्व! म्हणजे पुरावा मिळाला नाही म्हणून मी सुटले! निर्दोष आहे म्हणून नाही असं उगीचच वाटत राह्यलं.
     पण जेलमधले आठ महिने! माझ्यासाठी एक आयुष्यभराचा अनूभव होता.किती प्रश्र्न आणि त्यांची उत्तर शोधायला केलेले किती वेगवेगळे गुन्हे केलेल्या स्त्रिया!! माझ्यासारख्या न केलेल्या ‌गुन्ह्याची शिक्षा भोगणार्‍या पण काहीजणी.
       सुटका झाल्यावर जेलच्या बाहेर पडले. जेलच्या बाहेर सासरे एक मोठी गाडी घेऊन उभे होते. दरवाजा उघडून म्हणाले "बैस, सर्व सांगतो"दुसरा कोणताही पर्याय माझ्यासमोर नव्हता.गाडीत बसले.
       गाडी सुरू झाली आणि मी विचारलं"कुठे जातोय आपण?मुली कुठे आहेत?
      "आपण कोकणात जातोय! डॉ.विश्राम पंडितांच्या घरी! मुली तिथेच आहेत.
     मला प्रचंड मोठा धक्का बसला होता.
     "आयुष्यात पहिल्यांदा तुझ्या जावेनं वाईट करता करता चांगलं काम केलं.तिनं आपल्या माहेरी तू जेलमध्ये गेल्याचं कळवलं आणि योगायोगाने डॉ.विश्राम पण त्याच गावचे आणि देवाला तुझी काळजी, त्यांच्या कानावर हे सगळं गेलं आणि ते लगेच मला भेटायला आले.देवमाणूस आहे तो.त्यांनी दोन दिवसांत वकील नेमला. मुलींच्या शाळेत जाऊन त्यांचे स्कुल लिव्हींगचे दाखले मिळविण्यासाठी एक माणूस नेमला.आणि मुलींना स्वत: बरोबर घेऊन गेले. मी केसचा निकाल लागेपर्यंत तिथंच राह्यलो.आता मला उलगडा होत होता.की कोर्टात मला केसच्या वेळी हजर करताना मला भेटल्यावर मुलींबद्दल,स्वत: बद्दल हे काही बोलत का नव्हते.
   माझा माझ्या कानावर विश्वासच बसत नव्हता.इतक्या मोठ्या संकटातून मला विश्रामनी बाहेर काढलं! पुन्हा एकदा विचारांच्या संघर्षाला अर्थात द्वंद्वाला सुरवात! आपण त्याच्याकडे रहायचं की नाही.पण एकदा भेटुन आभार तर मानायलाच हवे होते.
      रात्री उशिरा विश्रामच्या घरी पोचलो.मुली जाग्याच होत्या. धावत येऊन इतक्या प्रेमानं बिलगल्या की गेल्या आठ-दहा महिन्यांपासून झालेला मनःस्ताप एक क्षणभर मी विसरले.आणि विश्रामनी केलेल्या उपकाराची कल्पना आली.आणि मी ओक्साबोक्शी रडायला लागले.थोडीशी भानावर आले तर कोणीतरी डोक्यावर हात ठेवला होता.मान वर करून बघितलं.
     "मी विश्रामची बायको, ताई आधी घरांत चला.खूप उशीर झालाय.आधी थोडंसं खाऊन घ्या."इतकं गोड आणि आदराने बोलत होती ती की मी नाही म्हणूच शकले नाही.घरात विश्राम आणि त्याची दोन्ही मुलं एक मुलगी एक मुलगा सोफ्यावर बसलेली होती.विश्रामच घर छोटंसं मागेपुढे अंगण असलेलं दिसत होतं.
     आमची सोय मात्र जवळच असलेल्या हाॅस्पिटलमधल्या नर्स क्वार्टर मध्ये केलेली होती. त्या दोन खोल्या पण व्यवस्थित होत्या.मुली म्हणाल्या"आई, आम्ही इथंच रहात होतो.जेवायला मावशीच्या घरी जायचो".विश्रामनी माझ्यावर न फिटणारं ऋण करून ठेवलं होतं.
                ------------*-------------*--------------
       वीस वर्षं झाली इथं कोकणात येऊन!इथे आल्यावर वर्षभरात सासरे गेले.मुलीपण चांगल्या शिकून दोघींनी उत्तम करिअर केली.माझा भूतकाळ माहित असलेल्या सुसंस्कृत घरात दोघींची लग्न झाली.विश्रामच्या हाॅस्पिटलच्या नोकरीतून माझं स्वत:चं छोटंसं घर घेतलं.
     एकदा सहज बोलता बोलता मी विश्रामला त्याच्या बायकोसमोरच विचारलं होतं की"तू इतकं का केलंस माझ्या साठी? तेव्हा तो म्हणाला होता"तुझ्या त्यावेळच्या अवस्थेला मी कारणीभूत होतो.कारण हाॅस्पिटल सुरू झालं की मी तुझ्या मामीकडे येऊन तुला मागणी घालणार होतो! असं वाटलच नाही की इतक्या पटकन तुझं लग्न होईल माझी चुक झाली होती की मी जाताना तुला माझ्या मनातलं सारं सांगायला हवं होतं.त्यानं पण मोकळेपणाने बायकोसमोर उत्तर दिलं होतं.माझ्या मनातल्या एका द्वंद्वाला उत्तर मिळालं होतं.
     आणि नुकत्याच अतिशय आजारी, विपन्नावस्थेत जाऊबाई त्यांच्या माहेरी आल्या होत्या. मीच पुढाकार घेऊन त्यांना विश्रामच्या हाॅस्पिटलमध्ये अॅडमिट केलं.पण दोनच दिवसात त्या गेल्या. जायच्या आधी  सर्वांसमोर म्हणाल्या"भावजींना विष मीच घातलं होतं.मला मुंबईतली ती चाळ माझ्या एकुलत्या एका मुलाच्या नावाने करायची होती.म्हणून हा वाईट मार्ग मला सुचला. सासर्‍यांना ह्या सगळ्याचा अंदाज आला होता. त्यांनी इकडे यायच्या आधी सर्व कागदपत्रं सह्या करून मला सोपवली. 
     नंतर मुलाने मात्र चाळ विकून मिळालेले पैसे वाईट संगतीत संपवले.त्याचे वडिल गेल्यावर मला ह्याअवस्थेत घराबाहेर काढलं.माझ्या गुन्ह्याची मला जिवंतपणीच शिक्षा मिळाली".
      माझ्या मनातला न्याय-अन्यायाचा संघर्षपण संपला होता.
      आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात अशी द्वंद्व सुरूच असतात.मला मिळाली तशी उत्तरं सगळ्यांनाच मिळतील असं नाही.पण चांगलं वागण्याचा मार्ग मात्र निश्चित उत्तरापर्यंत नेतो हेच माझ्या ह्या अनूभव सांगण्याचे इप्सित आहे....
                          ललिता छेडा
Posted by Lalita Chheda at 4:14 AM No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest
Newer Posts Older Posts Home
Subscribe to: Comments (Atom)

Followers

About Me

Lalita Chheda
View my complete profile

Blog Archive

  • ►  2021 (6)
    • ►  March (2)
    • ►  February (2)
    • ►  January (2)
  • ►  2020 (20)
    • ►  December (2)
    • ►  November (2)
    • ►  October (2)
    • ►  September (3)
    • ►  August (2)
    • ►  July (2)
    • ►  June (2)
    • ►  May (2)
    • ►  April (2)
    • ►  March (1)
  • ▼  2019 (26)
    • ►  December (2)
    • ►  October (1)
    • ►  September (2)
    • ►  May (4)
    • ▼  April (4)
      • ग्रे वाली शेड
      • चमत्कार
      • उंबरठा
      • द्वंद्व
    • ►  March (4)
    • ►  February (4)
    • ►  January (5)
  • ►  2018 (31)
    • ►  December (4)
    • ►  November (5)
    • ►  October (4)
    • ►  September (4)
    • ►  August (5)
    • ►  July (4)
    • ►  June (4)
    • ►  May (1)
Simple theme. Theme images by RASimon. Powered by Blogger.