
रात्रीच्या बसनी कोल्हापूरला जायला मंगल बसमध्ये चढली आणि तिला सोडायला आलेल्या नवर्याला तिनं पर्स मध्ये बघत "अहो,मोबाईल बहुतेक मी घरीच विसरलेय बहुतेक, नाहीतरी आईकडे लॅण्डलाईनवरच फोन करावा लागतो.तिथे जरा नेटचा प्राॅब्लेमच आहे". असं म्हटलं आणि तिच्या नवर्याची म्हणजेच माधवची "अशी कशी विसरलीस? तरी मी सगळ घेतलंस ना म्हणून सारखी आठवण करून देत होतो.वेंधळी कुठली!आमची किती पंचाईत होईल आता!अशी बडबड सुरु झाली.इतक्यात ड्रायव्हर बसमध्ये चढला आणि त्याला बसमधून उतरावच लागलं."आईला बरं असेल तर लगेच परत घरी ये"जाताजाता तो बजावायला विसरला नाही.
बस सुटली आणि तिनं मोठा श्र्वास सोडला.आईच्या आजारपणाच निमित्त सांगून निघालेल्या मंगलनी पर्स मधून मोबाईल काढला.तिच्या प्लॅनमध्ये सामिल असलेल्या तिच्या मैत्रिणीनी अस्मितानी तिचा जुना मोबाईल अगदी जरूर लागली तर देऊन ठेवला होता.
तिनी कोल्हापूरला विनायकला तिच्या चुलत भावाला फोन लावला."विन्या, निघाले रे मी" कारण ही टाईमप्लीजची कल्पना त्याचीच होती.
"ये, मी येतोय सकाळी तुला उतरवून घ्यायला.आणि तुला सांगू का! काकूला आज सकाळपासून थोडासा ताप येतोय.तेव्हा तू आईला बरं नाही म्हणून निघालीस ते खोटं नाही".विनायक हसत बोलला.
"मस्करी नको करू! जास्त आजारी नाही ना! मंगल काळजी च्या स्वरात म्हणाली.
"नाही ग,ये तू, मी आता काकूला सांगतो तू येतेयस ते! आपलं ठरल्याप्रमाणे मी तिला तुला कोल्हापूरवर आर्टीकल लिहायचं आहे म्हणून येतेयस असं सांगतोय.ओ.के.ना!"विन्या त्याच्या स्वभावाप्रमाणे मजेत बोलत होता.
मोबाईल बंद करून तिनं पर्समध्ये टाकला.आणि बाहेर बघितलं. बसनी मुंबई सोडली नव्हती.त्यामुळे बाहेर अजून जाग होती.रस्त्यावरून जाणार्या दोन मुलींना बघून तिला आपल्या लेकीची समीराची आठवण झाली. हूशार, देखणी नुकतीच सी.ए. झालेली लाडकी लेक अचानक दहा दिवसांपूर्वी म्हणाली" मम्मा,आम्ही लग्न करायचं ठरवतोय!"
दोन वर्षांपूर्वी तिनं असच अरुणला समोर उभा करून "मम्मा,हा माझा मित्र अरूण आम्ही दोघे एकेमेकांच्या प्रेमात आहोत.आमचं जमतय असं वाटलं की लग्न करू! असं म्हटलं होतं.आणि आज थेट लग्न करायचंय! आपण अवाक होऊन विचारलं होतं"म्हणजे?" सीटवर डोळे मिटून पडल्या पडल्या मंगलला सर्व समोर दिसत होतं.
"समीरा, आत्ता कुठे तुझ शिक्षण पूर्ण झालय, कुठेतरी नोकरी शोध, घरातली कामं शिक.आपण लग्नाची व्यवस्थित तयारी करूयात उगीच घाई नको!अग पैशाची पण सोय करावी लागेल" आपण आपलं उगीचच घोडं दामटलं होतं पण इतक्या वर्षांनंतर आपल्याला माहित होतं की हिने ठरवल की भूणभूण करून ही परवानगी मिळवणारच.आता ह्यांना काय सांगू? किती टेन्शन आलं होतं आपल्याला.
आणि संध्याकाळी हे ऑफिसमधून घरी आल्यावर भीतभीतच म्हटलं"अहो,समीरा लग्न करायचं म्हणतेय! जरा दिवाळीनंतर करूया असं जरा समजवा ना! "अरे व्वा छान बातमी आहे,"हे तर ऐकल्यावर खूषच झाले होते. मी पण मस्त बातमी आणलीय, लग्नासाठी आयती रजा मिळेल""म्हणजे? आपण जाम टेन्शननी विचारलं होतं.कारण मागचा पुढचा विचार न करता ठरवून टाकायच हा ह्यांचा स्वभाव तिला ठाऊक होता.
"अग, आमच्या ऑफिसमध्ये व्ही.आर्.एस्.ची स्कीम आलेय.आणि मी विचार करतोय व्ही.आर् एस्.घ्यायचा.बाविसाव्या वर्षांपासून मी नोकरी करतोय. आता तीस वर्ष होतील रोजचा बोरिवली ते चर्चगेट प्रवास करून". मंगलला काही कळेचना की ह्या दोघांना लग्न करणं, नोकरी सोडणं इतकं सहज कस वाटतंय.पैशाच काय? नोकरी सोडून अवघ्या बावन्नाव्या वर्षांपासून हे घरी काय करणार? असे इतरही अनेक प्रश्न तिच्यासमोर उभे राहिले."का नेहमी प्रमाणे आपल्या मनात येईल तसं ठरवून टाकायचं आणि मी आहेच निस्तरून न्यायला!
मंगलला मिहीरची म्हणजेच तिच्या मुलाची आठवण आली.इंजिनीअरींगच्या शेवटच्या वर्षाला हाॅस्टेलवर रहाणारा मिहीरच ह्या दोघांना समजवेल ह्या विचाराने त्यादिवसापुरती तरी ती थोडी रिलॅक्स झाली होती.आत्तातरी दोघांनाही काहीच प्रतिक्रिया द्यायची नाही असं तिनं मनाशी ठरवलं.दोघांची काहीतरी धुसपूस सूरू होती पण तिनं दूर्लक्ष केलं.
दुसऱ्याच दिवशी सकाळी अचानक मिहीर दरवाजात उभा राहिला.विस्कटलेले केस,वाढलेलीदाढी, चेहरा उतरलेला असा त्याला बघून तिनं घाबरून विचारलं होतं"अरे,काय झालं तुला?असा काय अवतार करून घेतलायस!
मला बरं नाहीय! दोनच दिवस ताप आला पण त्यामुळे खूप अशक्तपणा आलाय.म्हणून घरी आलोय".मिहीर बोलत आत गेला.मंगल हताश होऊन हाॅलमध्येच बसली होती.
मंगलची बस आता हायवे वरून जात होती.आजूबाजूला सगळी निजानीज झाली होती.बाहेरचा अंधार पण गडद झाला होता.मंगलला मात्र अजिबात झोप येत नव्हती.
तिला आठवलं सकाळी उठल्यावर तिनी समीराला म्हटलं होतं"मिहीर उठल्यावर त्याला विचारून डाॅक्टरांकडून औषध घेऊन ये "
"चिल माॅम, त्याला काही झालं नाहीये.त्याचा पुन्हा ब्रेक अप झालाय अरूणनी मला कालच फोन करून सांगितलंय" समीरा शांतपणे बोलली.
मंगलनी कपाळाला हात लावला.गेल्यावेळी किती समजावलं होतं की शिक्षण पूर्ण होईपर्यंत हे असं काही नकोय.आपण साधी मध्यमवर्गीय माणसं आहोत.तुझ्या शिक्षणाचा खर्च, समीराच शिक्षण,लग्न हे सर्व आम्ही तारेवरची कसरत करून करतोय.आणि आता पुन्हा!!
मंगल रागाने बाहेर जाऊन बसली आणि तेवढ्यात विनायकचा फोन आला होता.रागाच्या भरात तिनं घरातल्या तिघांनी उभ्या केलेल्या प्रश्र्नांबद्दल सांगितलं.
गाडी आचका देऊन थांबली.आणि ड्रायव्हर क्लीनर खाली उतरले आणि पंधरा मिनिटांनी गाडी सुटेल असं म्हणाले.मंगल आणि दोन चार पुरूष, एक बाई असे उतरू लागले.मंगल त्या बाईंच्या सोबतीनं खाली उतरून फ्रेश होऊन बाहेरच चहा घेत बसली. त्या बाई म्हणाल्या देखील "अहो झोप नाही येणार चहा घेतला तर!" मध्येच तो ड्रायव्हर बोलला"ताई झोपल्याच नाहीयत.ती नुसतीच हसली आणि म्हणाली"वेळेवर पोचू ना?"तो पण हसला आणि त्याने नक्की असा अंगठा दाखवला.
गाडी निघाली आणि तिला आठवलं "कोल्हापूरला मी यावं ही कल्पना विनायकचीच.तिनी सगळं घरातलं सांगितल्यावर तो म्हणाला होता"मंगे, तुला आठवतंय खेळात तुझ्यावर राज्य आलं की तू लगेच हात आडवा ओठावर ठेवून 'टाईमप्लीज' म्हणायचीस तसं कर.
खेळताना आम्ही कसे खेळ थांबवून तुझी वाट बघायचो कारण तू मध्येच खेळ सोडून गेलीस की दुसऱ्या कोणाला तरी राज्य घ्यावं लागायचं नाहीतर तुझं येणं गरजेचं आहे हे ओळखून वाट बघावी लागायची. कारण राज्य कोण घेणार?
तसच टाईमप्लीज म्हण आणि कोल्हापूरला ये, सांग आईला बरं नाहीय.आणि स्पर्धेसाठी तुला 'माझं माहेरचं गाव'बद्दल पण लिहायचं आहे ना?ते पण गावांतच राहून लिहीता येईल.
गाडीत आता थंडी वाजायला लागली होती.मंगलनी स्वेटर घातला आणि मनाशीच हसली."आपल्याला विन्याची कल्पना इतकी आवडली की लगेच मनातल्या मनात 'टाईमप्लीज' म्हणून आईच्या आजारपणाच निमित्त सांगून दुसऱ्या दिवशी आपण निघालोसुध्दा! हवेतल्या गारव्यानी तिचे डोळे मिटू लागले.
सकाळी 'कोल्हापूर'असा क्लीनरचा आवाज आला ती उठली आणि खिडकीबाहेर बघू लागली.दूर विनायक उभा होता.
आईकडे आल्यावर मात्र आपण आलो ते बरंच केलं असं तिला वाटलं.आई खूपच अशक्त झाली होती.बाबा गेल्यावर शेजारीच राहणाऱ्या विनायकनी त्याच्या घरी रहायला ये असं म्हटलं होतं पण "मला होतय तोपर्यंत एकटी रहाते आणि माझ्या दोन्ही लेकीना मी आहे तोपर्यंत माहेरच्या घरी आल्यासारखं पण वाटेल"असं म्हणून एकटी रहात होती.पण ह्या आजारपणात विनायक तिला त्याच्या घरीच घेऊन आला होता.
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी अस्मिताचा फोन आला."मंगल, इकडं पहिल्याच दिवशी दाणादाण उडालीय! सकाळी अलार्म वाजलाच नाही म्हणे.त्यामुळे काका ऑफिसला गेलेच नाहीत.पोळीभाजी विकत आणली आणि कुकर कसा लावायचा विचारायला समीरा आली होती.संध्याकाळी पावभाजी विकत आणणार आहेत"
मंगलनी मात्र "इकडे आई खरंच खूप आजारी आहे" हे तिला सांगितल्यावर "बरं झालं बाई तू आईकडे गेलीस ते" असं अस्मिता म्हणाली.आणि "मी रोज फोन करते"असंही तिनं आवर्जून सांगितलं.
घरातलं सगळ ऐकल्यावर मंगलला थोडंसं वाईट वाटलं पण गेम व्यवस्थित सूरू झालीय असं मनात येऊन हसू पण आलं....
रोज अस्मिताचा फोन येत होता.तिकडे अनपेक्षित आलेल्या जबाबदारीने समीराची खूप धावपळ होत होती.त्यात मंगल महिना अखेरीला इकडं आली होती त्यामुळे माधवला एक तारखेचे हिशोब करावे लागणार होते.आणि तसंच झालं होतं "दुध ह्यावेळी ज्यास्त घेतलंस का?वाण्याच बिल किती आलंय बापरे! असे रोज माधवचे फोन येतच होते.आपण पेपर किती घेतोय?मंगलला वाटलं आपण कसं दिलेल्या पैशात भागवतो त्याचा अंदाज तर आला ह्या टाईमप्लीजमुळे आपल्या नवऱ्याला!
मुलांच्या बाबतीत मात्र आपण चुकलोच दोघंही अभ्यासात हुशार आहेत म्हणून आपण त्यांना घरकाम,घरच्या जबाबदाऱ्या दिल्याच नाहीत.सगळ आपण अगदी दमेपर्यंत धावून धावून करत राह्यलो.दोघाना थोड्या जबाबदार्या द्यायला हव्या होत्या.
आठ दिवसांनी मिहीर कोल्हापूरला आला.दुपारी जेवणं झाल्यावर म्हणाला"साॅरी मम्मा,आठ दिवस बाबा आणि समीराची जी काही तारांबळ उडाली आहे ती बघून मला माझ्या प्रायोरिटीज् कळल्यात, मी ह्या प्रेमप्रकरणात ह्या वर्षी ड्राॅप घ्यायचा विचार करत होतो.पण आता मी इथून सरळ हाॅस्टेलवर जातोय फक्त तुला आणि आजीला भेटायला आलो होतो".मंगलनी भरल्या डोळ्यांनी त्याला निरोप दिला.
मिहिर गेल्यावर दोनच दिवसांनी समीरा आणि माधव गाडी घेऊन आले आणि समीरा दारातच विनायकला म्हणाली"मामा तुम्हा दोघा भाऊबहिणीची 'टाईमप्लीजची' कल्पना कळलीय अस्मितामावशी कडून आणि आम्ही आई आणि आजी दोघींना घेऊन जायला आलोय.
ते दोघं निघाल्याच अस्मितानी फोन करून मंगलला सांगितलं होतं.आणि मंगल पण तिला म्हणाली होती "बरं केलंस मला पण आता घरी परत यावस वाटतंय.माझ्या मनातून पण टाईमप्लीज संपलीय.
त्यामुळे लेकीला आणि नवऱ्याला बघून मंगलचा आनंद लपत नव्हता.विनायक पण हसत म्हणाला"दहा दिवसांनी आमच्या बहिणाबाईंची कळी खुललीय! तेव्हा आता आपण मस्त जेवूया आणि उद्या सकाळी निघा.
निघण्यासाठी गाडीत बसल्यावर समीरानी नाटकीपणानी हात जोडून मंगलला म्हटलं "माॅम, मी वर्षभर तरी लग्न करणार नाही आपल्या हाताखाली घर चालवायला,स्वैपाक करायला शिकणार आहे.तेव्हा थॅन्क्स"
मी काही वेगळं नाही बोलणार पण तुझ्या ह्या टाईमप्लीजमुळे मला घरात रहावं लागलं आणि कळलं की कामाशिवाय असं रहाण किती कठीण आहे ते! तेव्हा पुढची आठ वर्ष रिटायरमेंट नंतर काय करायचं त्याचं प्लानिंग करणार आहे.."
मंगलनी तिच्या आईकडे बघितलं.तिला काहीच कळत नव्हतं पण आपल्या लेकीनी ह्या दोघांना काही तरी धडा शिकवला आहे हे जाणवतं होतं त्यामुळे आईनं प्रेमानं मंगलच्या डोक्यावरून हात फिरवला.आणि मंगलच्या मनात आलं "पुन्हा एकदा खेळाला सुरुवात करायची तर तुझा आशिर्वाद हवाच!
ललिता छेडा
' टाईम प्लीज ' ची कल्पना आवडली. घराला घरपण देण्यासाठी दिवसरात्र धडपडणार्या बाईला गृृृृहित धरलं जातं. मी नसले तर घराचं दार होईल असं न म्हणता( ते खरं असलं तरी ) टाईम प्लीज घेऊन ती घरापासून काही दिवस दूर गेली तरच तिच्या 'घरात असण्याचं ' महत्व कुटुंबाला समजेल. कथा आवडली हे वेगळं सांगायला नकोच ! अभिनंदन ललिता !
ReplyDeleteअतिशय सुरेख
ReplyDeleteखूप खूप छान! गुंग होऊन गेले वाचनात ! मस्त कल्पना आहे टाईमप्लीज ची !
ReplyDeleteकिती छान...सुटसुटीत...मस्तच झालंय...प्रत्येकाची स्वतंत्र स्पेस असते...अगदी शिकणा-या मुलांचीही...मात्र घर सांभाळणा-या महिलेची स्पेस...तिची तळमळ..कधी कोणी जाणू शकत नाही...त्यामुळे टाईमप्लीजची कल्पना खरच मस्तच
ReplyDeleteटाईमप्लीज कथा चांगली वाटली.या कल्पनेने घरातील प्रत्येक व्यक्ती ला स्वतः ची जबाबदारी समजली ही महत्त्वाचे.
ReplyDeleteमला खूप आवडली कल्पना timepleas ची स्वतःला थोडी स्पेस आणि जबाबदारीची जाणीव दोन्ही साध्य झालय आणि हे घडवून आणताना विनायक सारख नात ही छानच
ReplyDeleteअसं टाइम प्लीज आपल्यालाही जमायला हवं आहे ना.
ReplyDeleteकथा वाचून छान परीक्षण केलंत त्याबद्दल मनापासून आभार
ReplyDeleteWonderful
ReplyDeleteVery subtle and emotional