सकाळी साडेसहाच्या सुमारास चालायला निघाले की आमच्या गेटवर रोज एक छोटीसा पक्षी किलबिलाट करत असतो.खरं म्हणजे ह्या थंडीच्या दिवसात काळोख जरा जास्तच रेंगाळतो.त्यामुळे बाहेर पडताना तो दिसला नाही तर चुटपुट लागते.त्याच्याअसण्याची इतकी सवय झालीय की तो दिसला नाही की मी त्याला आजूबाजूच्या झाडांवर शोधू लागते.कारण जसा उन्हाळा सुरू होतो तो नाहीसा होतो. थंडीतलं हे सीझनल नातं खूप गंमतशीर असतं...
कोपऱ्यावरच्या बंगल्याबाहेर दोन तीन तगरीची झाड आहेत.सकाळी कायम खूप फुललेली असतात.त्यामुळे चालण्याबरोबर सकाळी देवासाठी फुलं वेचायला छोट्या पिशव्या घेऊन निघालेले आजोबा त्या तगरीपाशी भेटतातच. पण दहा वर्षांपूर्वी मी दोन्ही कानाला इयरफोन लावून गाणी ऐकत चालले होते आणि आजोबा माझ्याशी बोलायला थांबल्याच जाणवलं आणि मी इयरफोन काढून हसून भुवया उंचावून 'काय'असं विचारलं. आजोबा म्हणाले "रागावू नकोस पण एकाच कानात ती भुंगडी घाल.दुसरा कान आजूबाजूचे आवाज ऐकायला मोकळा ठेव.नाहीतर मोटारीचे हाॅर्न देखील ऐकू येणार नाहीत.आणि कुठेतरी गाडीघोड्याचा धक्का लागेल....त्यांचा तो आपुलकीचा आणि मोलाचा सल्ला मी कायम पाळला.आजोबा रोज दिसतात आणि हसून आम्ही दोघंही आपुलकीच नातं जपतो...
रस्त्यावर असलेल्या काॅलेजमधून वर्ग सुरू व्हायच्या वेळी 'जन गण मन'ह्या आपल्या राष्ट्रगीताचे स्वर संपूर्ण रस्ता भारून टाकतात आणि सगळा रस्ता आदरांनी निश्र्चल उभा रहातो. आणि सगळ्यांचच राष्ट्रप्रेमाचं असलेलं नातं दृढ होतं....
काॅलेजच्या थोड्याशाच पुढे असलेल्या बागेत हास्यक्लब, बॅडमिंटन अशा अनेक अॅक्टीव्हीटी सुखेनैव सुरू असतात.पण मला आठवते ज्योति!
हास्यक्लब चालवणारी ज्योति, बागेच्या गेटवर नवर्यानी स्कुटरवरुन सोडलं की माझी वाट बघत उभी असायची.भेटलं की रोज काहीतरी नवीन पिशवीतून काढून दाखवायची. आणि कोणत्या तरी मैत्रीणीला मदत करण्यासाठी कधी हेल्दी ज्युस,कधी कपडे,कधी मधुरांगणच सभासदत्व,कधी खाण्याच्या वस्तुंची पॅकेट,कधी एखादी टूर सुध्दा घ्यावी असा तिचा प्रेमळ आग्रह असायचा आणि ह्या सर्व गोष्टी स्कीममध्ये आहेत हेही ती आवर्जून सांगायची! तिचा उत्साह, उर्जा बघून खूप गंमत वाटायची.कधीकधी मी तिच्यावर जराशी चिडायची कशाला सर्वांना मदत करायला जातेस? पण ती आपली त्याच उत्साहात! पण अचानक एक दिवस ती झोपेतच गेल्याच कळलं.विश्र्वासच बसत नव्हता.इतक्या लहान वयात, कोणताही आजार नसताना,काल भेटलेलं माणूस आपल्यातून निघून जातं!!!.गेल्या दोन वर्षात त्या गेटवर आलं की तिची आठवण झाली नाही असा एकही दिवस गेला नाही.'ती' तिचं नातं आठवणींशी जोडून गेली...
रस्त्यात सकाळच्या शाळेत जाणाऱ्या चिमुकल्यांना स्कुटरवरून सोडायला जाणारे आई-बाबा आणि त्यांच्या कमरेला कधी पुढे उभं राहून, कधी मागं बसून पण घट्ट मिठी मारणारी पेंगुळलेल्या डोळ्यांची मुलं रोज दिसतात. पावसात रेनकोट, थंडीत स्वेटर, उन्हात टोपी, मुलांना घालणारी आई अनेकदा स्वत: अशीच निघालेली असते.हे बघितल्यावर वाटतं त्यांना सांगावं"मोठे झाल्यावर असंच आई-बाबांना तुमच्या बाईकवर तुमच्या खांद्यावर हात ठेवून उगीचच एक फेरी मारून आणा" कारण मुलांनी आईबाबांशी असलेलं नातं त्यांच्या हळव्या म्हातारपणी जपलंच पाहिजे.....
मैदानावर पोचेपर्यंत चहाच्या तीन टपरी रस्त्यात दिसतात.बाकीच्या दोन थोड्या उशीरा उघडतात.पण एक अगदी माझ्या जायच्या वेळी सुरू होते.आणि तो चहावाला माझ्या समोरच पहिला एक कप चहा जमिनीवर ओततो. एक दिवस न राहवून मी त्याला म्हटलं "उससे अच्छा किसी गरीबको वो चाय पिलाना!"लगेच तो म्हणाला "वो तो मैं दिनमें दो कप फ्री पिलाताही हूं,लेकिन भाभीजी,जिस जमीन पर खड़े होकर धंधा करता हूं,उसे पहली चाय देना जरूरी होता है। ये एक भोग चढानाही है ना।" जमिनीशी असलेलं नातं जपणा-या त्याच्याशी माझं पण छान नातं जुळलय....
मैदानावर पोचलं आणि रोजचे चेहरे बघितले की सकाळ प्रसन्न होऊन जाते.सगळ्यांचे गृप ठरलेले, जागा ठरलेल्या, डाव्या बाजूच्या पायर्यांवर कधी संक्रांतीची वाणं दिली जातात तर कधी सुखदुःखाची देवाणघेवाण होत असते.दोन मिनिटांचच ते शेअरींग असतं ते, पण पण एखाद्या कुटुंबाइतकच जपलेलं नातं असतं.....
चालणाऱ्या सर्वांमध्ये कोणी नगरसेवक असतात, एखाद्या मोठ्या मासिकाचा संपादक, प्रसिद्ध अभिनेत्रीचे बाबा अशी खूप वेगवेगळ्या क्षेत्रातली मंडळी असतात.पण तिथं मात्र सर्वजण फक्त चालणं, धावणं,योगा अशा आरोग्यपूर्ण जगण्यासाठीचे प्रयत्न करत असतो.कारण आरोग्य आहे तर सर्वकाही आहे.चालताचालता एकेमेकांची चौकशी करणं,राजकारणावर चर्चा,दिक्षीत-दिवेकर सल्ले असं सगळं सुरूच असतं.
फक्त जानेवारीचे पहिले चार दिवस संकल्प करणारे, लपून छपून भेटण्याचं ठिकाण असणारे,मे महिन्यात आजी, बाबांबरोबर येणारी बच्चेकंपनी अशी तात्पुरती खूप नाती असतात...
उजव्या बाजूचा कट्टा बहुतेक व्यायाम,योगा,दोरीवरच्या उड्या ह्यासाठी जणू राखीव आहे.प्रत्येकाची जागा ठरलेली....
समोरच्या नेटमध्ये क्रिकेट, फुटबॉल सारख्या खेळांची विविध वयोगटातल्या खेळाडूंची प्रॅक्टिस चालू असते.हल्ली त्यात एखादी मुलगी पण दिसायला लागली आहे.आपण उभं राहून एखादा मस्त शाॅट बघितला आणि खेळणार्याला आपण बघतोय ते कळलं की त्या खेळाडूच्या चेह-यावरच हसू आपली सकाळ प्रसन्न करून जातं....
त्या कट्ट्याच्या समोरच्या बाजूला असलेल्या कोपऱ्यात एक गुजराती साड्या नेसलेल्या, थोड्या वयस्कर,शरीरानी स्थुल अशा बिहारी स्रियांचा गृप व्यायाम करत असतो.मध्येच त्यातल्या दोघी तिघी चालायला सुरुवात करतात, कधी त्या जवळच्या पारावर बसतात. आणि त्यांच्या गप्पा सुरू होतात.पण त्यांच व्यायामामुळे एकेमेकींशी जुळलेलं नातं खूप घट्ट मैत्रीचं आहे....
परताना गेटवर हेल्दी ज्युस,गरम सुप एका व्हॅनमधुन घेऊन येणारे दीपकभाई नक्की असणारच.त्यांच्याकडे येणार्या प्रत्येक व्यक्तीशी त्यांच नातं फक्त गिर्हाईकाच कधीच नाहीय.तर घरातल्या माणसांसारख आहे.
त्यानंतर भाजी स्वच्छ निवडून जुडी बांधून गिर्हाईकांची वाट बघणार्या सत्तर वर्षांच्या 'आजी', पेपरच्या स्टाॅलवाल्या 'मावशी' ही ठराविक जागेवर असणारी,म्हणायला व्यावसायिक पण माझी रोजची सवयीची नाती....
ऋतू प्रमाणे बदलणारा निसर्ग चैत्रातल्या पालवीसारखा नवनवीन रूपानी भेटत रहातो.रस्त्यातली आंब्याची झाडं मोहरू लागली की वसंताची चाहूल लागते.गुलमोहर,बहावा फुलून येतात आणि कळतं की उन्हाळाआला.पावसाळ्यात सगळी सृष्टी हिरव्या रंगाच्या विविध शेडस् दाखवते.प्रत्येक ऋतुचक्रातील सुर्याची वेगवेगळी रूपं त्याच्या तेजासह मोहवतात. म्हणूनच निसर्गाशी,माणसांशी जुळणार्या नात्यांसाठी शांता शेळके ह्यांच्या कवितेच्या ओळी आठवतात.....
हे एक झाड आहे,याचे माझे नाते
वार्याची एकच झुळूक,दोघांवरून जाते......
-ललिता छेडा.

नात कथा चांगली आहे. रोजच्या जीवनात अशी नातं आपण जपतो. नेहमीच्या व्यक्ती आपणास नाही भेटल्यास मनाला रुखरुख वाटते .यातून भावनिक ता जपली जाते.
ReplyDeleteललित लेखनाशी ' नातं ' असलेला हा ब्लाॅग आवडला. हास्यक्लब फेम हसतमुख ज्योती साठवणे हिच्या आठवणीने डोळे पाणावले. लेख छान जमून आला आहे.
ReplyDeleteअभिनंदन !
mann ki baat.!!! कथेपेक्षा लेख वाटला.डोळ्यासमोर चित्र उभे राहिले.साधी सोप्पी मनाला भिडणारी सरळ भाषा
ReplyDeleteही तुमची खासियतच आहे.
आपण संवेदनशील असलो की सहज नाती जुळून येतात याचा अनुभव मी पण घेते,मग त्या गृप शी मैत्र जुळून येत वेगळा पदार्थ कुठल्याही देवाचा प्रसाद अगदी इमिटेशन ज्वेलरी पिकनिव तिळगुळ देणे असे सगळे सुखनैव चालते आणि एखादा दिवस भेटलो नाही की आठवण येते अशी नाती तू छान टिपलीस सहज सध्या शब्दात तुझं नेमकं लिहण खूप आवडतं
ReplyDelete