Thursday, February 14, 2019

कातरवेळ


                   देवकाकांच्या घरातून मराठी गाण्यांचे सूर आले आणि चाळीतल्या सगळ्यांना कळलं की आज आठ दिवसांनी काका संध्याकाळचे‌ घरात आहेत.
    शेजारच्या मामींनी येऊन विचारलं सुध्दा " अरे देवदत्ता,बरी आहे का ती मीरा? घरी आणलं वाटतं? नाही म्हटलं, गेले आठ दिवस तू रोज तिच्यासाठी संध्याकाळचा हाॅस्पिटलमध्ये सोबतीला जात होतास म्हणून विचारलं हो!
     "मामी,आता बरी आहे ती आणि काल रात्री घरी‌ सुध्दा आली"देवदत्तनी हसत हसत म्हटलं."येताय उद्या तिला भेटायला?देवकाकांनी विचारलं.
  "अग बाई, चालेल का तिला? फार शिष्ट आहे म्हणे ती. मामी हळूच बोलल्या. 
     खरं म्हणजे चाळी समोरच्याच सोसायटीत देवदत्तच्या मुलाचा ब्लाॅक होता त्यामुळे ते‌ बहूतेक रोज सकाळी तिथे चालायला जात असत.तिथे त्यांचा एक समवयस्कांचा छान गृपही झाला होता. सोसायटीत आणि चाळीत मात्र देवदत्त 'देवकाका'म्हणून ओळखले जात होते.मीराही त्याच सोसायटीत रहात असल्यामुळे ती बागेत सोसायटीतल्या बायकांसाठी योगा क्लास घेत असताना दिसायची...पण माॅडर्न विचारांची आणि तशीच रहाणारी मीरा थोडीशी शिष्टच आहे असं सोसायटीतल्या सर्वांचच मत होतं. तीही कोणाशी जास्त बोलत नसे.
      देवदत्तच मात्र थोडंसं वेगळं होतं.त्यांच्या चाळीसमोर बांधल्या जाणाऱ्या सोसायटीत ब्लाॅक घ्यायच देवदत्तच्या मुलानं जेव्हा ठरवलं तेव्हा"पप्पा,आपण सगळे एकत्र रहायला हवं तर तीन बेडरूमचा ब्लाॅक बुक करावा लागेल तुम्ही डाऊन पेमेंट साठी थोडी मदत कराल का? "अशी विनंती केली.स्मिताला म्हणजेच देवदत्तच्या बायकोला हे अजिबात पटलं नव्हतं.ती लेकाला म्हणाली सुध्दा "अरे, तुझ्या बजेटमध्ये येतोय तेवढाच घे,सध्या तरी आम्ही दोघे इथे चाळीत खूष आहोत.पण लेका जवळ रहायला मिळेल आणि दोन्ही नातींचा सहवासही मिळेल.ह्यासाठी ब्लाॅकच्या डाऊन पेमेंटला देवदत्तनी चांगली मोठी रक्कम दिली.पण दुर्दैवानं बिल्डींग पूर्ण व्हायच्या आधीच चार ‌दिवसाच्या तापानं स्मिताचा मृत्यू झाला.
    त्यानंतर नवीन घरी रहायला जाताना देवदत्तला मुलगा म्हणाला"पप्पा, तुम्ही इथं चाळीतच रहाल  का? आम्ही दिवसभर घरी नसतोच, रात्री जेवायला येत जा.आणि आपल्या चाळीचाही आता रिडेव्हलपमेंटसाठी विचार सुरू आहेच की!!! देवदत्तला कळलं की आता स्मिता नाही तर आपण त्यांच्या उपयोगाचे नाही त्यामुळे आता आपण त्यांना त्यांच्या घरी नकोय"त्यानंतर मात्र देवदत्तनी मुलाच्या घरात पायही ठेवला नाही.आणि हे सगळं सर्वांनाच माहीत असल्यामुळे हा विषय कोणीच त्यांच्या कडे काढत नसे.पण त्यांच्या मनमिळाऊ स्वभावाने मात्र ते सर्वांना हवेहवेसे वाटायचे.
      त्याउलट घटस्फोटित मीराचा‌ मुलगा अमेरिकेत सेटल झालेला होता.आणि एकट्या रहाणार्‍या मीराचा काही तरी व्यवसाय असल्याची जुजबी माहिती सोसायटीतल्या मंडळींना होती.कोणीशीही जास्त संबंध नसलेल्या मीराकडे तिची एक मैत्रीण मात्र नेहमी येत जात असे.
     अचानक एक दिवस योगा क्लास सुरू असतानाच  मीराला अस्वस्थ वाटू लागलं.छातीत दुखू लागलं. वाॅक करून नुकत्याच बसलेल्या देवदत्तच तिच्याकडे लक्ष गेलं आणि तो धावतच तिच्या जवळ गेला.तिला खूपच त्रास होत होता.सर्वांनी धावपळ करून तिला अॅडमिट केलं.सुदैवानी मायनर अॅटॅक होता आणि वेळेवर उपचार मिळाले होते.
     हाॅस्पिटलमध्ये सकाळचं जेवण, तिच्या जवळ बसायची जबाबदारी सोसायटीच्या मंडळींनी देवकाकांनी सांगितल्यानंतर घेतली होती.संध्याकाळी देवकाका आणि रात्री तिची मैत्रीण नंदिनी असायची. मीराला ह्या सगळ्यांनी केलेल्या मदतीमुळे खूप ओशाळ वाटतं होतं. तस ती सारखं बोलूनही दाखवत होती.पण तिच्या जुन्या अनुभवांमुळे कोणी तिच्या जास्त जवळ जात नव्हतं.मीरानी मुलाला अमेरिकेत कळवू नका असं म्हटल्यामुळे कोणी त्या भानगडीतही पडलं नाही.पण देवदत्तशी मात्र तिची छान गट्टी जमली होती.
   आठ दिवसांनी तिला हाॅस्पिटलमधून डिसार्ज मिळाला.पण महिनाभर तरी तिनं विश्रांती घेतलीच पाहिजे असं डॉक्टरांनी बजावून सांगितल. त्यामुळे तो महिना देवदत्त रोज संध्याकाळी तिच्याकडे जात होता.तिला लागणारं सामान आणून देत होता,  स्वैपाकाला बाई असल्याने कधी कधी तिथंच जेवत होता. त्याच्यामुळे इतरही मंडळींच तिथं येणजाण सूरू झाल होतं.
     मीराशी बोलता बोलता कळत गेलं की "आई वडिलांची एकुलती एक असलेल्या मीराचं लहानपण गिरगावात गेलं होतं.तिच्या वडिलांच गिरगावात स्टीलच्या भांड्याच छोटंसं दुकान होतं. मीराच शिक्षण पूर्ण झाल्यावर लगेचच तिचं वडिलांनी लग्न लावून दिलं. लग्नानंतर ती अंधेरीला रहायला गेली.दुर्दैवानी नवरा खूपच ऐदी,व्यसनी निघाला. मीरानी कशीबशी सात आठ वर्षे काढली त्यातच तिला एक मुलगा झाला.मीराच्या वडिलांनी त्यांच दुकान त्याच्या नावावर करावं ह्यासाठी मीराला तिचा नवरा अतिशय त्रास देऊ लागला.नाईलाजानं शेवटी तिनं घटस्फोट घेतला.तोपर्यंत आई-वडील पण गिरगांवची जागा विकून ह्या सोसायटीत अंधेरीला रहायला आले होते.दूकानाकडे मीरानी बघायला सुरुवात केली होती.तिचा मुलगा शिकून अमेरिकेला गेला आणि तिनी गिरगांवातलं दुकान पण विकून टाकलं होतं.एकंदरच  एकटेपणा,  दुकान विकल्यामुळे आलेलं रिकामपण,घटस्फोट घेतल्यापासून स्वत:ला सगळ्यांपासून दूर  ठेवणं ह्या सर्वांचा तिला ताण आला होता आणि हा अॅटॅक त्यामुळेच आला असावा असं ती सहज म्हणाली होती.
    तेव्हा देवदत्त तिला म्हणाला होता"आयुष्याच्या ह्या कातरवेळी जोडीदार बरोबर नसेल तर अशीच घुसमट होते पण आपण स्वत:ला आपल्या आवडत्या छंदात,कामात,मित्र मैत्रीणींमध्ये इतकं व्यस्त ठेवायचं की एकटं वाटूच द्यायचं नाही.सांगणं सोपं आहे पण प्रयत्न तरी मनापासून करायचे.मीरानी पण हसून "नक्की प्रयत्न करेन" असं म्हटलं.
    एक दिवस मीराच्या घरी सोसायटीच्या मंडळींचा पत्ते,गप्पांचा फड रंगला असताना अचानक देवदत्तचा मुलगा तिथं आला.. आणि सर्वांसमोर थोड्याशा रागाच्या स्वरात देवदत्तला म्हणाला"पप्पा, तुम्ही इथे सारखे येता,जेवता, कधी कधी रात्री रहाता लोकं हल्ली बोलायला लागली आहेत. 
     देवदत्तनी शांतपणे विचारलं"कोण बोललं त्याच नांव तरी सांग!"
      "तसं नांव नाही सांगता यायचं पण मलाच नाही आवडत"तो गडबडून गेला.
     "असं स्पष्ट सांग ना रे,कारण मी इथे का येतो, काय करतो, हे सोसायटीच्या मंडळींना, चाळीतल्याना सगळ्यांना माहीत आहे.ते पण सगळे आमच्या बरोबर गाणी ऐकायला,पत्ते खेळायला येत असतात.तेव्हा तू मला कोणाचीही भीती घालू नकोस.
     "आणि माझ्या बद्दल विचारणाऱ्यांना हे पण सांग की"माझ्या पप्पांनी, माझ्या घरी वास्तूशांतीनंतर पाय सुध्दा ठेवला नाहीय. तेव्हा बेटा, मी कुठे रहायचं हे तू ठरवलस आता मी कसं जगायचं ते ठरवू नकोस"देवदत्तांनी विषय संपवला होता.मुलगा थोडासा तणतणतच तिथून गेला.
    सगळीजणं स्तब्ध झाली होती.मीरा म्हणाली "माझ्यामुळे तुम्हाला उगीचच ऐकावं लागलं!
    "अजिबात नाही,उलट मलाच तुझ्यामुळे त्याला सणसणीत ऐकवायला मिळालं".देवदत्त खुषीत होते.
     काही दिवसांनी मीराचा मुलगा 'मनीष' आला.आईच्या आजारपणाच कळल्यावर तो दोन महिन्यांसाठी आला होता.मनीषच्या सहवासात असताना तो खूपच मनमोकळ्या स्वभावाचा आणि विचारांचा पक्का असल्याचं देवदत्तला जाणवलं.
    कारण तो आला तेव्हा देवदत्तच्या मुलाच्या अनुभवामुळे सर्वजण जरा घाबरत घाबरत येत-जात होते.पण मनीषनी इतकं मोकळेपणानी सगळ्यांशी बोलायला सुरुवात केली की त्यामुळे पुन्हा सगळी धमाल मीराच्या घरात सुरू झाली.आणि मनीषही त्यात मनापासून सामिल झाला.
   नंतर मनीषनी आईच्या आजारपणात मदत केलेल्या गृपची थॅन्क्स गिव्हींगची एक वन डे पिकनिक  आयोजली.दुपारच्या जेवणानंतर चाळीतल्या मामी म्हणाल्या"मनीष, बरं केलंस हो आमची ट्रीप काढून! कारण आता आमच्या चाळी ठिकाणी टाॅवर बनणार आहे त्यामुळे आम्ही सगळेजण विखूरले जाणार आहोत पण मला खरी काळजी देवदत्तची वाटते.कारण नवीन जागा तयार होईपर्यंत बिल्डर देईल तिथं सर्वांनाच जावं लागेल. लांब जागा दिली तर देवदत्त एकटा होईल कारण तो काही मुलाकडे नाही जायचा.
     मामींच्या बोलण्यानंतर मनीष बोलायला उभा राहिला" माझ्या आईच्या आजारपणात तुम्ही सर्वांनी जी मदत केलीत त्यासाठी खरच मनापासून आभार! आणि आभार त्या आजाराचे देखील कारण आम्हाला बाबा सोडून गेला तेव्हा पासून माझ्या आईने जगाशी ठेवायच्या संबंधांचा दरवाजा इतका घट्ट बंद करून घेतला होता. की ती कोणाशीही बोलत नव्हती.पण तुम्हा सर्वांमुळे तिला कित्येक वर्षानी मोकळेपणानं हसताना, गप्पा मारताना‌ मी बघतोय.आणि त्यामुळे मी खरच खूप रिलॅक्स झालोय! 
     मी अमेरिकेन मुलीशी लग्न केलं  त्यामुळेच तिथे स्थायिक व्हायचं ठरवलं पण आईची फार काळजी वाटायची.पण आज तिला इतका छान गृप मिळालाय  हे मी बघतोय आणि हे मिरॅकल देवदत्त अंकलनी केलाय... हेही मला आईनं सांगितलंय.
       देवदत्त अंकल, तुम्हाला जेव्हा चाळीतली खोली सोडावी‌ लागेल तेव्हा ‌बिनदिक्कत सामान घेऊन आमच्या घरी रहायला या.मला खूप आवडेल!
      लग्नाशिवाय असं दोघानी एकटच कसं रहायचं?मामींना त्याच बोलणं काही समजलं नव्हतं.
      "मामी,ह्या‌ वयात आता रिलेशन्सनां कोणतंच लेबल नाही लावायचं".मनीष हसत हसत म्हणाला."त्या दोघांची फ्रेन्डशिप इतकी क्लीन अॅंण्ड ट्रान्सपरण्ट आहे की मला नाही वाटत त्यांच्या एकत्र रहाण्यानी कोणाला प्राॅब्लेम असेल! आणि कुणाला असेलच तर त्यानी आयुष्याच्या संध्याकाळच एकटेपण अनुभवल नसेल म्हणून असला विचार करतोय असं म्हणून आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करुया.
   मामींनी न कळून इकडेतिकडे बघितलं.
   मीरा मात्र गहिवरून म्हणाली"बाळा, खूप अभिमान वाटतोय तुझा, तुला एकट्याने वाढवताना सारख वाटायचं मी कुठे कमी तर पडत नाही!!पुढे ती बोलूच शकली नाही.देवदत्त उठून थोडासा दूर एकटाच जावून बसला.
      नंदिनी,मीराची मैत्रीण उठली आणि मीराच्या जवळ येऊन मामींना म्हणाली"खरंय आहे मामी,मनीष म्हणतो तशी आपली सर्वांची मैत्री, संबंध इतके स्वच्छ आणि पारदर्शक आहेत की ह्या नात्यांना काही नांवे द्यायची गरजच नाही.
     बघता बघता संध्याकाळ झाली. रंगात आलेल्या गाण्याच्या भेंड्या मनीषनी थांबवल्या आणि म्हणाला"चला, संध्याकाळ झाली.देवदत्तअंकल कुठे आहेत? सोसायटीतले सावंत म्हणाले"तो बघ तिकडे दूर झाडाखाली एकटाच बसलाय. 'मी घेऊन येतो' अशी हातानी खूण करून मनीष त्या दिशेनं चालू लागला.
     देवदत्तच्या जवळ येऊन खांद्यावर हात ठेवून म्हणाला"आॅण्टींची आठवण आली ना?
     देवदत्तनी मान वळवली आणि डोळ्यातलं पाणी पुसायचा प्रयत्न केला.पण मनीषला बघून त्याला अश्रू आवरेचनात.
     मागून आलेल्या मामी" खर आहे रे बाबा, दिवेलागणीची ही कातरवेळ गेलेल्या जवळच्यांची आठवण व्याकुळ करते.अस गहिवरून म्हणाल्या.
     "अरे,पण नंतर येणारी सुंदर पहाट नवीन सुरुवात करून देते ना! आणि उद्या तर व्हेलेंटाईन डे आहे.तुम्ही सर्व तर एकेमेकाचे व्हेॅलेंटाईन आहातच .मनिष हसत हसत म्हणाला पण त्यासाठी आधी घरी जाऊन झोपायला हवं ना अंकल! मामी आणि देवदत्त दोघांनाही हसू आवरेना.वातावरणातला ताण गेला होता.मनीष देवदत्तला बस मध्ये घेऊन आला.आणि.....
    कातरवेळच्या मंद पिवळ्या प्रभेतला प्रवास प्रसन्न केशरी पहाटेकडे सुरू झाला होता.
                                                                              -ललिता छेडा

7 comments:

  1. Valentine day special .bharri goshta.aawdli .

    ReplyDelete
  2. ' कातरवेळ ' मध्ये एक नवा विचार मांडला आहे. उतारवयातला एकटेपणा जीवघेणा असतो. मग ती व्यक्ती स्री असो किंवा पुरुष , सोबतीची गरज असतेच. शेअरिंग आणि केअरिंगसाठी 'आपलं माणूस ' हवं असतं. ज्येष्ठ नागरिकांसाठी आता 'लिव्ह इन ' चा पर्याय समोर आला आहे. त्यासाठी एकट्या स्रीपुरूषांचे परिचय मेळावे काही संस्था आयोजित करताहेत. कथेत स्पष्ट उल्लेख नाही. पण लेखिकेने तसे सूचित केले आहे. देवदत्त आणि मीराच्या मैत्रीचा सहज स्वीकार करणारे शेजारी , मनीष त्या दोघांच्या एकत्र राहण्याच्या निर्णयाचेही स्वागत करतील असे वाटते.
    कथा आवडली. अभिनंदन !

    ReplyDelete
  3. ' कातरवेळ ' मध्ये एक नवा विचार मांडला आहे. उतारवयातला एकटेपणा जीवघेणा असतो. मग ती व्यक्ती स्री असो किंवा पुरुष , सोबतीची गरज असतेच. शेअरिंग आणि केअरिंगसाठी 'आपलं माणूस ' हवं असतं. ज्येष्ठ नागरिकांसाठी आता 'लिव्ह इन ' चा पर्याय समोर आला आहे. त्यासाठी एकट्या स्रीपुरूषांचे परिचय मेळावे काही संस्था आयोजित करताहेत. कथेत स्पष्ट उल्लेख नाही. पण लेखिकेने तसे सूचित केले आहे. देवदत्त आणि मीराच्या मैत्रीचा सहज स्वीकार करणारे शेजारी , मनीष त्या दोघांच्या एकत्र राहण्याच्या निर्णयाचेही स्वागत करतील असे वाटते.
    कथा आवडली. अभिनंदन !

    ReplyDelete
  4. आयुष्यचा संध्याकाली नात्याच्या कोणत्याही बंधनात न अडकता लाभलेली सुंदर मैत्री सुखावून गेली खऱ्या अर्थाने प्रेमदिवस

    ReplyDelete
  5. कथा छान आहे. आज या विचारांची जास्त गरज आहे.

    ReplyDelete