Thursday, July 19, 2018

अशी पाखरे येती


अभिजितच्या आठवणींचा पसारा घरभर पसरला होता.त्याच्याकडे उदास नजरेने पहाणा-या उमाताईंना वाटल'कुठुन सुरवात करु हा पसारा आवरायला.'दर २/३वर्षानी अमेरिकेहून येणारा त्यांचा लाडका लेक ह्यावेळी बायको-मुलांसह आला होता आणि जवळ जवळ दोन महिने राह्यला होता.त्या आधी महिनाभर तो येणार म्हणून तयारी! तीन महिने कसे गेले कळलेच नाही आणि आता हे रिकाम घर आणि वाटणारं एकटेपण!उमाताईंचे डोळे भरून आले पण लगेचच त्यांना त्यांच्या यजमानांनी अभिला सोडायला जाताना म्हटलेल आठवल"हे बघ उमा तुझे पाय दुखताहेत म्हणून तू आमच्या बरोबर येत नाहीयस.उगीच घरात बसून रडू नकोस.तुझ्या राहिलेल्या सिरीयल बघ, मैत्रीणींना फोन कर! सगळे महिनाभराचे बॅकलॉग भरून काढ!काहीच नाही तर तुझ्या लेकीला अस्मिताला फोन कर.

अस्मिताची आठवण आल्यावर उमाताईंना चार दिवसांपूर्वी अभिजितच त्याच्या बाबांशी झालेल बोलण आठवलं! त्यादिवशी रात्री जेवताना अचानक अभीनी ह्यांना विचारलं"बाबा सोसायटीत आपल्या घराचा नाॅमिनी फाॅर्म भरायचाय ना?काल सोसायटीचे सेक्रेटरी विचारत होते.प्रश्न अचानक विचारला गेला होता पण ह्यांनी शांतपणे त्याच्याकडे बघितलं आणि म्हटलं'हे बघ मी काहीतरी ठरवलय , अजून मी उमाशी सुध्दा बोललो नाहीय,पण आता आपण सगळेच एकत्र बसलोय तर सांगतो'मी नाॅमिनी अस्मिताला करणार आहे.'आणि दिवाळीनंतर तिच्या सासरच्या मंडळींशी बोलून जावईबापूंना इथेच आमच्या बरोबर रहायला येण्याची विनंती करणार आहे.आपली जागा भरपूर मोठी आहे, त्यांच्या घरापासून जवळ आहे आणि त्यांच्या एकत्र कुटुंबासाठी त्यांची जागा मात्र खरंच खूप लहान आहे! पण ती सगळी मंडळी इतकी चांगली आहेत कि त्या जागेत आनंदाने रहातात.आणि महत्वाच म्हणजे आमचा पण स्वार्थ आहेच! आता आमची वय झाली आम्हालाही सोबत हवीच आहे.त्यात पुन्हा आमच्यापैकी एकजण पुढच्या प्रवासाला जाईल, मागे रहाणा-याच्या एकटेपणाचा ही विचार करायला हवा. अर्थात हे सर्व जावईबापूंशी मोकळेपणाने बोलून मग तुमच्याशी बोलणार होतो.पण ठीक आहे झाल ते चांगलच झाल!चला उमाबाई झोपायला जाऊया!" ह्यांनी समारोप केला होता.अभिजीत आणि सुनबाई शब्दही न बोलता त्यांच्या खोलीत गेले.उमाताईंना तर अगदी कानकोंड झाल.पण स्पष्ट बोलले तरी खर बोलले होते मुलांचे बाबा!हे मात्र त्यांना पटलं होतं.
नंतर जाईपर्यंत अभिजीत गप्प गप्पच होता.त्याच्या मनात काय चाललंय ते कळत नव्हत त्यामुळे उमाताई पण अस्वस्थ होत्या.
इतक्यात फोनची रिंग वाजली.फोन अभिजीतचाच होता."आई आम्हीं व्यवस्थित पोचलो.सामान चेक इन करून बाहेर बाबांना भेटायला आलोय.आई, बाबा समोरच उभे आहेत तुम्हा दोघांना मला साॅरी म्हणायचंय.जो विचार मी करायला हवा होता तो बाबांना करावा लागला!जी जबाबदारी मी घ्यायला हवी ती अस्मिताला घ्यावी लागेल.हे सगळं मला घरीच सांगायच होत पण धीर नाही झाला.पण न सांगता गेलो असतो तर मन खात राह्यल असत! आतापासून माझ्या जबाबदारीची जाणीव मी नक्कीच ठेवेन.आई मी अस्मिताची नेहमी काळजी घेईन.फक्त तुम्हां दोघांचे आशिर्वाद असु देत! अभिजीतने फोन बाबांना दिला."चल उमा येतो तासाभरात घरी"ह्यांनी फोन ठेवला होता.
‌. उमाताईंच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते पण त्यानी ते तसेच वाहू दिले 'त्यांच आकाशात उंच भरारी घेणाऱ पाखरू घरट्याशी असलेलं नातं विसरल नव्हत'.कारण त्यांना नक्की माहित होतं त्यांच्या घरट्याची वीण संस्काराच्या धाग्यांनी विणली होती.


No comments:

Post a Comment