मैत्रिणीकडून निघाले तेव्हा दुपारचे अडीच वाजले होते. आभाळ भरुन आले होते.मैत्रिण सारखी म्हणत होती "थोडीशी थांब!पण कालपासून आम्ही शाळेपासूनच्या मैत्रिणी तिच्या घरी जमलो होतो.सकाळी लवकर उठून पुण्या-नाशिकच्या निघून गेल्या होत्या.मी गावातलीच असल्याने दुपारच्या जेवणापर्यंत थांबले आणि तिला आवरायला मदत केली पण आता निघायला हवं होतं.रवीवार असल्याने घरचे सर्वजण वाट बघत असतील अस जाणवत होत.निघताना ह्यांना फोन करून निघालेय ते कळवल! तिच घर स्टेशनपासून लांब असल्याने तासभर लागेल हेही सांगितले.
मैत्रिण गेटपर्यंत सोडायला आली. तिनी"सरळ जा थोडेसे चालल्यावर रिक्षा स्टॅण्ड आहे"असं म्हटल.कदाचित रस्त्यातही मिळेल रिक्शा आणि स्टॅण्डच्या मागच्या बाजूला ४ बिल्डींगची सोसायटी आहे.मैत्रिणीच्या सुचना संपत नव्हत्या.
तिच्या गेटमधून बाहेर पडले आणि पाऊस सुरू झाला.समोर रिक्षा दिसत होती पण जवळ जाईपर्यंत गेली.मी खूप हात दाखवला पण भरलेली असावी बहुतेक!!
आता संपूर्ण रस्त्यावर मी एकटीच होते.आणि पावसाने जोर पकडला.स्टॅंडच्या मागे थोड्या अंतरावर एक बिल्डींग होती आणि तिच्या मागे चार बिल्डींग होत्या ज्यांच बांधकाम सुरू होत.
सुदैवाने स्टॅण्डच्या मागे एक मोठं झाड होतं त्याखाली उभं राहिल्यावर थोडं सुरक्षित वाटलं.अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस पडायला लागला.समोर विजा चमकू लागल्या आणि त्या प्रकाशात रस्त्यावरून पाणी वाहत असल्याच दिसत होत.मागे बिल्डींगमध्ये जाव अस मनात येत होत पण काळोख आणि पाऊस इतका होता की हिम्मत होत नव्हती.त्या बिल्डिंगच्या तळमजल्यावर एका खिडकीतून लाईट येत होती आणि कोणाचीतरी हालचाल जाणवत होती.
मनात आल अजून कोणाचाच फोन कसा नाही आला? इतक्या पावसात आपली कोणाला काळजीच नाही म्हणून पर्स मधून मोबाईल काढून बघितला! मोबाईल बंद झाला होता बापरे! कालपासून चार्जिंगच नव्हत केलं! ओढवलेल्या परिस्थितीची कल्पना आली.कमालीचा एकटेपणा जाणवत होता तो डोळ्यातून वाहू लागला.आईची आठवण आली.ती म्हणायची"कोणत्याही परिस्थितीत स्वतःला एकटं नाही समजायच परमेश्वर कोणत्यातरी रूपात मदतीला येतो! खूप दमले होते,बसायला जागा शोधायचा प्रयत्न केला मागच्या बाजूला एक काळा-पिवळा रस्त्यावर असतो तसला कट्टा दिसला.छत्री उघडून त्यावर बसले.आजुबाजुला चाललेल्या जलसोहळ्याची मी एकटी साक्षीदार होते.समोरची खिडकी आता थोडी जवळ आली होती.फ्रेंच विंडोमुळे टी.व्ही.चा उजेड दिसत होता आणि तिथून कोणी तरी मला बघताय असं मला वाटत होतं.पावसाचा जोर थोडा कमी झाला होता.
इतक्यात रस्त्यावर एक स्कुटर येताना दिसली जीवाच्या आकांताने मी धावले.ठरवल की त्या स्कुटरसमोर पाण्यात बसायच आणि सांगायच"मला इथून घेऊन चल."पण ती स्कुटर तर माझ्याच दिशेने येत होती.त्यावर बसलेली मुलगी माझ्याजवळ येऊन थांबली आणि म्हणाली"बसा मागे! माझ्यासाठी साक्षात परमेश्वर आलेला होता. कोणताही विचार न करता मी स्कुटरवर बसले... कमालीच सुरक्षित वाटत होतं.
स्कुटर त्या बिल्डींगच्या गेटमधून आत जाऊन थांबली."आन्टी, मी सानिका ह्या बिल्डींगमध्येच रहाते, तळमजल्यावरच्या दादाजींनी मला फोन करुन तुम्ही पावसात अडकलाय ते सांगितलं आणि आता आपण त्यांच्या घरी जाऊया"ती बोलत होती पण मला शब्दच सुचत नव्हते.घराच दार उघडच होतं.दारात आमची वाट बघणारे दादाजी उभे होते.उंचेपूरे, पांढ-या रंगाचा झब्बा घातलेले ते वाॅकर घेऊन उभे होते." घरात याना, आणि सानिका ह्यांना बदलायला कपडे घेऊन ये, अहो गेले दोन तास मी तुमची परिस्थिती बघतोय पण पायानी अधू असल्यामुळे काही करू शकत नव्हतो! त्यांना मध्येच थांबवून मी म्हटलं"मोबाईल चार्जिंगला लावू!"अरे नक्कीच"त्यांनी चार्जर आणलाआणि सुदैवानं तो लागला! इतक्यात सानिका टी शर्ट आणि ट्रॅक पॅण्ट घेऊन आली.हे कपडे!मी कपाळाला हात लावला."पर्याय नाही माझ्याकडे हेच आहेत"सानिका हसत म्हणाली.चिंब भिजलेल्या मला पण ते कपडे घालण्याशिवाय पर्याय नव्हता.
मी कपडे बदलून येईपर्यंत घरचा फोन येऊन गेला होता सानिकानी ह्यांना घडलेलं सर्व सांगितलं होतं.पुन्हा फोन लावताना सानिकानी ह्विडीओ काॅल लावला जेणेकरून घरची मंडळी मला बघू शकतील.माझा अवतार बघून सुनबाईंनी हसत "वा स्मार्ट,दिसताय"कमेंट केलीच.मी सुटकेचा निःश्वास टाकला.बोलताबोलता कळल की सानिका मुळची बनारसची, इथे मीडियामध्ये काम करते आणि दोन्ही मुल परदेशात असणा-या दादांजींची खास मैत्रीण!
सानिकानी चहा करून आणला आणि मनात आल "किती अविस्मरणीय अनुभव आहे हा माझ्यासाठी"तीन तासांपूर्वी अनोळखी असलेल्या ह्या दोघांशी आत्ता माझ जवळच नातं निर्माण झालं आहे! पावसाचा जोर पुन्हा वाढला होता आणि मी हातात चहाचा कप घेऊन त्याच्याकडे स्थितप्रज्ञ नजरेनी बघत होते.
पाऊस नेहमी तोच असतो पण आपल्या परिस्थती, मनस्थिती प्रमाणे तो आपण अनुभवतो.


No comments:
Post a Comment