मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवरचा प्रवास म्हणजे सुमित्राचा आवडता प्रवास! आणि वर्षातून ७/८वेळा तरी ती तो करायचीच.त्याच एक कारण म्हणजे तिच सासर-..माहेर दोन्ही पुण्यात आणि निवृत्ती नंतर पुण्यालाच स्थायिक व्हायच नक्की असल्याने पुण्यात घेतलेलं स्वत:च घर!
कधी स्वत: ड्राईव्ह करत, कधी खाजगी बसनी जाताना प्रत्येक ॠतूचा वेगळाच आनंद तिला मिळायचा.फुडमाॅलवर अचानक भेटणारी ओळखीची माणसं, कधी होणा-या नवीन ओळखी,कधी कधी एखादा प्रसिद्ध अभिनेता किंवा अभिनेत्री चहा पिताना दिसले की होणारा आनंद लगेच फोटो, मेसेजची धावपळ!
पण आजचा दिवस सुमित्रासाठी वेगळाच अनुभव देणार होता.
गाडी तिची लेक सोनिया चालवत होती आणि शेजारी सुमित्राचे यजमान बसल्यामुळे सुमित्रा मागच्या सीटवर आरामात बसून बाहेरचा निसर्ग पहात होती.बाहेर पाऊस रिमझिमत होता.ह्यावेळी त्यांचा पुण्यातला मुक्काम ज्यास्त दिवसांचा होता.कारण दरवर्षी होणारा त्यांच्या गृपचा गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम ह्यावर्षी त्यांच्याच घरी होता.तयारीसाठी सुट्टी घेऊन तिघेही लवकर निघाले होते.गाडीतले किशोरीताईंचे स्वर ओल्या हवेत भरुन कानांना सुखावत होते.
इतक्यात एक खाजगी बस खूप जोरात त्यांच्या गाडीजवळून पुढे गेली.सोनिया म्हणाली सुध्दा "कसली घाई आहे ह्यांना? इतक्या पॅसेंजरांचा जीव का धोक्यात घालतात?
थोडा वेळ बस पुढेच होती.वेग पण कमी झालेला वाटत होता "सोनिया, तुझ ऐकल बरंका ड्रायव्हरनी! गाडीचा वेग कमी झालेला वाटतोय"सुमित्रा हसत म्हणाली.
इतक्यात डोळ्यासमोर बस उजव्या बाजूला फरफटल्या सारखी झाली आणि डिव्हायडर वर आदळली.काय होताय ते कळेपर्यंत गाडी डिव्हायडरच्या आधारावर कलंडली होती.गाडी पडल्याचा आवाज, बसमधल्या मंडळींचा आरडाओरडा, काचांचा खच कोणालाच काही कळत नव्हतं!सर्वात प्रथम मागच्या ईनोव्हातली तरूण मुलं उतरली, ती मंडळी ट्रेकींगला निघाली होती त्यामुळे त्यांच्याकडे बरच सामान होत. त्या सामानाचा उपयोग करून त्यांच्यातली दोघ बसमध्ये चढली.आता आजूबाजूच्या गाडीतले सर्वजण बस भोवती जमा झाले होते.नशीबानी मागचा आणीबाणीच्या प्रसंगी उघडणारा दरवाजा उघडला गेला.आतली मंडळी सुखरूप होती.सगळ्यांनाच थोडंफार लागलं होतं!पण काळजी करण्यासारख नव्हत.ड्रायव्हरला ज्यास्त लागलं होतं आणि तो घाबरला पण होता. इतक्यात वाहतूक पोलिसांची गाडी आली.ड्रायव्हरच्या बाजूचा टायर फुटल्याने अपघात झाला होता.पोलीसांनी त्यांची गाडी मागच्या दरवाज्याजवळ आडवी लावली आणि आतली मंडळी बाहेर काढायला सुरुवात झाली.उभ्या असलेल्या गाडीतल्यांनी त्या प्रवाशांना पुण्याला सोडायची जबाबदारी आपणहून स्वीकारली. पोलीसांनी सामानासह जवळजवळ सर्व प्रवाश्यांची सोय केली.पावसानी पण थांबून ह्या मदत कार्यात आपला सहभाग दाखवला.ईश्र्वर कृपेमुळे काही वाईट घडल नव्हत!काही मंडळींकडे प्रथमोपचार पेटी होती.त्यांनी किरकोळ जखमांवर उपचार केले.
सुमित्रानी आपल्या बरोबर दोन आजींना गाडीत घेतल. त्यांच्या गाडीत दोघांचीच सोय होत होती आणि महत्त्वाच म्हणजे त्या आजींना जायच ठिकाण सुमित्राच्या घराजवळ होत.दोघींना थोड खरचटलं होतं आणि बसलेल्या धक्क्यामुळे अंग दुखत होतं! सुमित्रा नी दोघींना जवळची पेनकिलर दिली.
गाडीत बसल्यावर त्या दोघी आजींनी श्र्वास सोडला.एका आजींचे तर डोळे भरून आले होते.सुमित्रानी दोघींना धीर दिला आणि गप्पा सुरू व्हाव्यात म्हणून दोघींना त्यांची नावं विचारली.दोघी सख्ख्या चुलत बहीणी सुमन आणि सावित्री!
कोकणात एकत्र कुटुंबात वाढलेल्या दोघीही खडतर आयुष्य जगलेल्या, बाळंतपणासाठी माहेरी आलेल्या सावित्रीला मुलगी झाली म्हणून सासरी परत नेलच नाही. सुमित्राच्या शेजारी बसलेल्या आजींनी थोडक्यात दोघींचा परिचय दिला पण सुमित्राला जाणवत होतं की ह्या दोघी आयुष्य नुसतच जगल्या नाहीत तर त्यांनी आयुष्या कडून झगडून काहीतरी मिळवलंय!ते आपल्याला कळलच पाहिजे.
सुमित्राच्या मनातलं जाणल्या सारख तिच्या यजमानांनी सोनियाला गाडी थांबवायला सांगितली. ते मागे वळून म्हणाले"आजी आता तुम्ही आमच्या घरी चला, थोडा आराम करा. दुपारी एकत्र जेवूया, गप्पा मारू, मगाशी तुम्ही गाडीत लावलेल्या गाण्यांबरोबर गुणगुणत होता तो अभंग आम्हाला ऐकवा, मी पेटी छान वाजवतो नक्की चांगली साथ करेन, संध्याकाळी आम्ही दोघे तुम्हाला जिथं जायचं आहे तिथे सोडू! चालेल ना? दोघींनी एकमेकींकडे बघितल आणि ठीक आहे अशी मान डोलावली.लगेच त्यांनी आजींकडून त्यांच्या लेकीचा नंबर घेऊन "आजी आमच्या बरोबर आहेत आणि संध्याकाळी आम्ही त्यांना सोडू "असा निरोप दिला.आजी पण लेकीशी सविस्तर बोलल्या.
मनासारख घडल्यामुळे सुमित्रा खूष झाली होती.तिने शेजारी बसलेल्या सावित्रीआजींना विचारलं"कुठे जाणार संध्याकाळी?"हिच्या लेकीकडे, गुरूपौर्णिमेला तिच्या नवीन घराची वास्तुशांत आहे.म्हणून आलोय! शेजारी बसलेल्या सुमनताईं कडे हात दाखवून सावित्रीआजी म्हणाल्या.
घरी गेल्यावर मात्र दोघीही खूलल्या.सुमनताईंनी स्वैपाकघराचा ताबाच घेतला.सावित्रीआजी सामान उघडून लेकींसाठी आणलेल्या कोकणच्या मेव्यातला थोडा सुमित्रा साठी काढू लागल्या.नको, कशाला! अस सुमित्रानी म्हटल्यावर"अग आम्ही सुमन-सावित्री आणि तू सुमित्रा तेव्हा आपल ह्या सकारामुळे नातंच झाल ना!आता धाकटी बहीण आहेस तू आमची! सावित्रीआजी हसत हसत म्हणाल्या.त्या थोड्या मिश्कील,बडबड्या होत्या आणि सुमनताई गंभीर!" तू दिलेली गोळी देखील छान आहे,बर वाटतय!! केवढा मोठा आवाज झाला होता त्यावेळी आणि जोरात हिसका बसून एकेमेकांवर पडलो.बापरे! आजींना पुन्हा ती आठवण झाली होती.
गप्पा मारता मारता कळलं की'सुमनताई लग्न होऊन सासरी गेल्या आणि त्यांना कळलं यजमान काहीच करत नाहीत. त्यांना घरकामासाठीच लग्न करून आणल आहे.त्यांनी खूप प्रयत्न केले कि यजमानांनी काही तरी करावे पण सर्व निष्फळ ठरले.
मुलीच्या जन्मानंतर तर जबाबदारी अजूनच वाढली.तेव्हा असं परावलंबी जगण्यापेक्षा शिक्षण घेऊन स्वत:च्या पायावर उभ रहायच त्यांनी ठरवलं.निर्णय सासरी आवडला नाहीच! कडाडून विरोध झाला. त्या घर सोडून माहेरी आल्या. आईनी आणि सावित्रीनी त्यांच्या मुलीची जबाबदारी घेतली.सावित्रीच्या दोन लेकी झाल्या! वेगवेगळ्या अनुभवांमुळे एकट्या झालेल्या दोघींनी एकत्रित लढायच ठरवलं.
बाविसाव्या वर्षी मुंबईला भावाकडे येऊन सुमनताईंनी शाळेत तिसरीत प्रवेश घेतला.पुढच शिक्षण जिद्दीने पूर्ण करून रत्नागिरीच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत नोकरी धरली.मुंबईत असताना गाण्याच्या परीक्षापण दिल्या. सावित्रीनी आपल्या शिवणकामाच्या आवडीच व्यवसायात रूपांतर केल.सुमनताईंनी घरची आर्थिक जबाबदारी घेतली.सावित्रीआजींनी घर सांभाळल.दोन्ही लेकींच शिक्षण,लग्न सर्व दोघींनी हिमतीने पार पाडल.दोघींच्याहि लेकींना पुण्यात सासर मिळाल. दोघींच्या जीवन संघर्षाला लेकींना मिळालेल्या चांगल्या सासुरवाडीमुळे पूर्णता मिळाली.हे सगळ अर्ध्या तासात ऐकण आणि खराखुरा संघर्ष करणं! सुमित्राचे डोळे भरून आले होते.
दुपारच्या जेवणानंतर भजन, भावगीतांची मैफल रंगली.सुमित्राच्या यजमानांनी तर सर्व गाणी रेकॉर्ड करून घेतली.संध्याकाळी त्या दोघींना निरोप देताना सर्वांनाच जड जात होतं.'एका दिवसात' आयुष्यभराचे ऋणानुबंध जुळले होते.
रात्री झोपताना सुमित्राच्या मनात आल.किती शिकवून गेला हा 'एक दिवस.' त्या तरूण मुलांनी अपघातानंतर दाखवलेल प्रसंगावधान, प्रत्येक गाडीवाल्यांनी प्रवाश्यांना दिलेल सहकार्य, पोलिसांच नियोजन प्रत्येकजण काही तरी देऊन गेला.आणि आजींशी झालेली ओळख तर जगण्याच बळ देऊन गेली. एका दिवसात इतके अनुभव आपल्याला समृद्ध करुन गेले.खरीखुरी गुरुपौर्णिमा आजच साजरी झाल्याचा आनंद सुमित्राला झाला होता.पौर्णीमेच चांदण तिच्या घरभर पसरलं होतं.
ललिता छेडा







