Saturday, October 17, 2020

प्रेरणादायी अश्र्विन

      अश्र्विन शुद्ध प्रतिपदेपासून शरद ऋतूच आगमन होतं आणि शारदीय नवरात्रौत्सवाची चाहूल लागते. आपल्याला मात्र बाजारात झेंडू, शेवंती, अॅस्टरची फुलं दिसू‌ लागली की नवरात्रीचे नऊरंग, घरोघरी होणारें आदिमाया आदिशक्तीचं पूजन, अखंड दीप ह्या सगळ्यांबरोबर भोंडल्याची, गरब्याची गाणी मनात रुंजी घालू लागतात.

      मी मात्र ह्या नवरात्रीच्या निमित्ताने माझ्या आयुष्यातल्या नव दुर्गांच्या आठवणींची ओंजळ रिकामी करायची ठरवलीय. 

             त्यात सर्वात पहिली "माझी आई"...
      शाळेत असताना आपण सर्वांनीच आपल्या आईवर निबंध लिहीलाय. त्या निबंधाचा तकलादूपण आपण आई झाल्यावर कळतो आणि हसू देखील येतं पण खरी आई कळते आपल्या आयुष्यातुन ती निघून गेल्यावर आणि संपूर्ण उलगडते आपण तिच्या वयाचे झाल्यावर!
       माझा आईचं माहेरच नांव 'शांता' आणि सासरचं 'सुमती'. दोन्ही नांव सार्थ ठरवणारा तिचा स्वभाव होता. सतत कामं करत रहाणं हे तिचं पॅशन (मराठी शब्द 'आवड') होतं. तिनं एका सुईवर जवळ जवळ तीन वर्षं सतत विणून सुंदर मोठी चादर विणलीय.‌ त्यात तिचं नांव, कलात्मक चित्रं हे सगळं तिनं स्वत: तयार केलंय! ती चादर माझ्यासाठी तिची सुंदर आठवण आहे. म्हणूनच मी पॅशन म्हटलं, अगदी शेवटपर्यंत ती काही जमत नव्हतं तर वाती आणि गव्हले करत असायची.
       तिचा दुसरा आनंद म्हणजे 'माणसं!! लहानथोर, गरीब-श्रीमंत कोणाशीही तिचं सहज जमून जायचं आणि‌ जुळलेलं नातं ती जिवापाड जपायची. ती सुगरण होतीच पण सर्वांना खायला करून घालणं हे पण तिच्या आवडीचं काम होतं. "मामींनी ऐनवेळी करून घातलेल्या पिठलं-भाताची चव अजूनही जिभेवर रेंगाळतेय! असं म्हणणारी अनेकजण अजूनही‌ तसं सांगतात. सर्वांचे वाढदिवस तिच्या लक्षात असायचे आणि ती आवर्जून त्या व्यक्तीला भेटीबरोबर दोन ओळींची कविताही करून द्यायची. सासर-माहेर कोणाच्या कडच्याही लग्न-मुंजीत ती सगळी जबाबदारी आवडीनं उचलायची आणि मनापासून सर्व पार पाडायची.
       आमच्या परळच्या घरच्या माझ्या लहानपणीच्या अनेक आठवणीत सतत नातेवाईकांचं येणं-जाणं, परळ भगिनी मंडळ, दामोदर हॉल मधली नाटकं हे सगळं आहेच. त्यातसुद्धा दादांचा (माझे वडील) तापट स्वभाव! पण आज मागे वळून बघताना आईनं किती सोशिकपणे हे सगळं निगुतीने सांभाळून नेलं त्याची जाणीव होते.
‌ ‌ ‌      माझं लग्न तिच्या मनाविरुद्ध झालं आणि तिची कोणतीच हौस झाली नाही म्हणून ती थोडी खट्टू झाली. पण नंतर माझं डोहाळजेवण, माझ्या लेकीच बारस तिनं थाटामाटात साजरं केलं आणि सगळी हौस पूर्ण करून घेतली!! आहे त्यात समाधानी असणं तिची खासियत होती.
       आईच्या माझ्या मनात असलेल्या आठवणी न संपणाऱ्या आहेत. त्यांना इतक्या थोड्या शब्दात व्यक्त करणं कठीण आहे. पण सुगरण म्हणजे आई...कामसू म्हणजे आई....सोशिक म्हणजे आई... नातं जपणारी म्हणजे आई... प्रत्येक गोष्टीत कलात्मकता आणणारी‌ म्हणजे माझी आई...
             माझी दुसरी दुर्गा म्हणजे माझी आजी...
       आजी म्हणजे माझ्या आईची आई! तिचं नांव ‌सरस्वती होतं पण ती खरीखुरी दुर्गा होती. तिचा खंबीरपणा, कोणत्याही परिस्थितीला न डगमगता धीराने सामोरं जाणं, अविरत कष्ट करण्याची ताकद हे गुण माझे आदर्श आहेत. आमच्या घरातल्या प्रत्येक चांगल्या-वाईट प्रसंगात ती आमच्या आईचा आधार असायची. तिला भजनं म्हणायला खूप आवडायची. तिचं आवडतं भजन "कैवल्याचा‌ पुतळा प्रगटला भूतला...हे होतं.
       ती तरुणपणी विधवा झाली, दोन मुलांना घेऊन कोकणात भावाकडे रहायला आली. मुलं मोठी झाल्यावर ‌त्यांना घेऊन मुंबईत आली. माझ्या आईचं लग्न करून दिलं पण मामानं मात्र तिला कधीच सुख दिलं नाही. तिनं मात्र त्याबद्दल कधीही बाहेर चकार शब्दही काढला नाही आणि जमेल तेवढं आणि जमेल तसा मामीच्या मदतीनं संसाराचा गाडा ओढला. अनेक प्रसंगात तिचं ठामपणे उभं राहणं माझ्या आठवणीत आहे. हलवा करणं, गोधड्या करणं, उन्हाळ्यात वाळवणं घालणं अशी अनेक कामं करून ती मामीच्या मदतीनं संसाराला आर्थिक मदत करत होती.
                  माझी तिसरी दुर्गा म्हणजे माझी आत्या...
       तिचं माहेरचं नांव मथु होतं. माझ्यासाठी ती खूप खास आहे. कारण हल्ली अनेकदा मला मी तिच्या सारखीच वागते असं खूप जाणवतं. तिची तब्येत हे तिचं आवडतं काळजी करायचं काम असायचं आणि मग त्यासाठी आपला आहार तिचा तिच ठरवायची. हल्ली माझं पण असंच होतं असतं. माणसं जमवणं, समारंभ आयोजणं ही तिची खासियत होती. पण खूप गंमतीशीर गोष्ट म्हणजे तिला त्या समारंभात अचानक थकवा जाणवू लागायचा आणि ती चक्क तो सगळा घोळ तसाच मागच्या माणसावर सोपवून पडायला जायची. मलाही तसंच अचानक थकायला होतं आणि तिची आठवण येते.
       ती एकमेव होती जी दादांना तिला जे काही वाटत असेल ते न घाबरता सांगायची. दादा पण तिचं ऐकून घेत. पण अशा वेळा फार कमी आल्यात कारण तिचा आपल्या भावाच्या निर्णयांवर पूर्ण विश्वास होता. माझी आई आणि ती मनानं खूप जवळ होत्या. माझ्यावर तिचं खूप प्रेम होतं. जे अनेक प्रसंगातून मला जाणवलंय. तिचं फलटणंच घर, तिचं डोक्यावर पदर घेऊन तुळशी जवळ दिवा लावणं, 'आरती ज्ञानराजा' ही आरती संध्याकाळी तन्मयतेने म्हणणं! अशी ही माझी आत्या अनेकदा‌ मला माझ्या वागण्यातून डोकावताना दिसते.
                  माझी चौथी दुर्गा माझी मामी...
       त्या‌ पिढीतल्या सोसणाऱ्या, न बोलता सहन करणार्‍या स्रीयांच प्रतिनिधित्व करणारी माझी मामी..सुशीला! अतिशय सुगरण असलेली मामी एक वाटी डाळीत पाच वाट्या पाणी घालून अप्रतिम आमटी करायची. तुटपुंज्या पैशात तिनं नेहमी हसतमुखानं संसार केला. तिच्या लाडक्या लेकीचा मृत्यू तिनं धीरानी सहन केला. नोकरीच्या निमित्तानं ती गिरगावातून परळला यायची. तिचं येणं-जाणं आमच्या दारावरूनच व्हायचं. पण कधी उगीचच येऊन आपलं रडगाणं सांगणं, काही मागणं, कधीच नाही. असं वागायला खूप ताकद लागते. आणि ती तिच्यात नक्कीच होती. माझ्यासाठी ती आदर्श दुर्गा आहे.
               माझी पाचवी दुर्गा आहे माझी नलू आत्या...
         माझ्या वडिलांची मामेबहीण असलेली ही आत्या म्हणजे माझ्या आईची नणंदेपेक्षा जवळची मैत्रीण होती. दोघींच्यात खरंखुरं शेअरिंग-केअरिंग होतं. सुरवातीला आईची लेक म्हणून ती माझे लाड करायची. मी साडी नेसायला लागल्यावर तिनं लगेच दोन सुंदर साड्या मला दिल्या आणि ‌ते साड्या देणं शेवटपर्यंत सुरुच राह्यलं. तिचं माहेरचं नांव नलिनी! ती पण एखाद्या कमळाची कशी प्रत्येक पाकळी स्वतंत्र सुंदर असते तशी आपल्या गाण्यानं, सौंदर्यदृष्टीनं, टापटीपीनं, सर्वांना सुंदर भेटी‌ देऊन ती कमळासारखी नेहमी प्रफुल्लित असायची आणि तिचं सासरच नांव 'प्रतिभा! तेही तिनं आपल्या कलागुणांनी सार्थ ठरवलं होतं. माझ्या लग्नानंतर ती माझी पण लाडकी आत्या होऊ लागली. तिचं पुण्यातलं घर माझं हक्काचं माहेर झालं होतं. तिच्या घरी कधीही गेलं तरी ते स्वच्छ, सजवलेलं, नीटनेटकं असायचं. इतकं प्रसन्न दिसायचं की ‌तिच्या सौंदर्यदृष्टीचं कौतुक वाटायचं. खरं म्हणजे तिचं आयुष्य तरूण मुलाचा‌ मृत्यु, प्रतारणा अशा ‌दु:खाच्या अनेक‌ अनुभवांनी खडतर झालं होतं. पण त्या खडकावर ‌फुलं फुलवायचा तिचा नेहमीच प्रयत्न असायचा. तिच्या घरी राहून सकाळी तिला गाताना ऐकणं ही माझ्या आत्याची आठवणीतली अत्तरकुपी!!
               माझी सहावी दुर्गा म्हणजे माझ्या सासूबाई...
        माझ्या सासूबाईंच नांव'लक्ष्मी' आणि त्या तशाच होत्या. त्यांच्या मनाविरुद्ध मी त्यांच्या घरात आले त्यामुळे ‌पहिले थोडे दिवस त्या थोड्याशा फटकून वागत होत्या. पण एकदा आमचं जमल्यावर मात्र त्यांनी स्वैपाकघरातली स्वच्छता जे त्यांच पॅशन होतं ते माझ्या कडून अक्षरशः गिरवून घेतलं. त्या खूप स्पष्टवक्त्या होत्या. त्यामुळे अनेकदा माणसं त्यांना घाबरून असायची.
              माझी सातवी दूर्गा म्हणजे माझी मोठी नणंद...
‌         ह्या नणंदेमुळे मला ह्या घरानं मनापासून स्वीकारलं. हिचं नाव 'हरकव़ंती'. प्रचंड उत्साह आणि सर्वांच्या मदतीला धावून जायचा त्यांचा स्वभाव ह्यामुळे त्या माझी सासरची छान मैत्रीण झाल्या.
             माझी आठवी दूर्गा म्हणजे माझी दुसरी नणंद...
‌‌        हिचं नाव 'निर्मला' ती मोठ्या नणंदेपेक्षा थोडी‌वेगळी! देवधर्म करणारी, थोडी मागे मागे रहाणारी, सासरच्या मोठ्या कुटुंबात रमणारी अशी आहे. मला जैन धर्म तिच्याकडून शिकायला मिळाला.
              माझी नववी दुर्गा माझी‌ धाकटी जाऊ सविता...
          आम्हा दोघींची लग्न दोन महिन्यांच्या फरकानीच झाल्यामुळे आमचा दोघींचा संसार तसा दोन रूळांसारखा समांतर होत गेला. ती मुंबईत आणि मी डोंबिवलीत पण रोजचे फोन, प्रत्येक गोष्ट        एकेमेकीला विचारून, सांगून करण्याची सवय आम्हा दोघींना कधी लागली कळलंच नाही. आमच्या मुलांना पण नेहमी ‌आईपेक्षा काकी जास्त जवळची वाटते.
        ह्या माझ्या आयुष्यातल्या आदिमाया आदिशक्ती! ज्यांनी मला शिकवलं, घडवलं आणि म्हणूनच ह्या नवरात्रीच्या निमित्ताने ही त्यांच्याबद्दलच्या कृतज्ञतेची ओंजळ देवीला अर्पण केली.
       दहावा दिवस "दसरा" जो माझ्या आते-मामे बहिणी, शाळा-काॅलेजच्या मैत्रीणी आणि गेली पन्नास वर्ष डोंबिवलीत राहिल्यामुळे माझ्या इथल्या सर्व सख्यांना समर्पित! ज्या माझ्या‌ प्रत्येक आनंदात सहभागी झाल्या आणि दु:खात मला धीर द्यायला पाठीशी उभ्या राहिल्या. अशा सगळ्या दुर्गांना मनोमन शतशः प्रणाम...



                           अश्र्विन शुद्ध प्रतिपदा
                              ता. १७.१०.२०२०
                                 ललिता छेडा.




3 comments:

  1. छान लिखाण नवीन परिचय झाले लिखाणातून

    ReplyDelete
  2. सुंदर शब्दात तू व्यक्त केले आहेस

    ReplyDelete