जगणं... अधिक-उणं
ह्यावर्षी अधिक अश्र्विन आला आहे. आणि अधिक महिना ही खरं म्हणजे खगोलशास्त्रीय अॅडजस्टमेंट आहे. अगदी साध्या भाषेत सांगायचं तर दैनंदिन जीवनचर्या ठरवताना सुर्यामधले बदल नोंदवून कालगणना करण कठीण जात होतं आणि म्हणूनच दैनंदिन जीवनात चंद्र उपयोगी ठरला. त्यामुळेच जगभरातील अनेक संस्कृतींमध्ये दैनिक व्यवहारासाठी चांद्र आणि वार्षिक व्यवहारासाठी सौर कॅलेंडर वापरले जाऊ लागले. या दोन्ही कॅलेंडर मधल्या कालगणनेत तफावत येऊ नये म्हणून काही सुधारणा करून चांद्रवर्षामध्ये ठराविक कालावधीनंतर म्हणजेच तीन वर्षांनंतर एक महिना अधिक घेतला जाऊ लागला.
ह्यावेळचा अधिक महिना मात्र काही तरी वेगळं शिकवून जाणार आहे. एखाद्या देशाच्या नव्हे तर जगभरातल्या सीमा ओलांडून कोरोना विषाणूने संपूर्ण जगासमोर भयंकर आव्हान उभं केलंय. त्यातही चक्रीवादळ, आर्थिक मंदी अशा अनेक संकटांनी आपल्या देशाला घेरून ठेवलंय!
ह्या परिस्थितीत फेसबुकवर एक सुंदर पण विचार करायला लावणारी पोस्ट वाचली. लेखिकेने अपरिग्रहावर तिचे विचार मांडलेत....
"कमळ हे अपरिग्रहाचं प्रतिक मानलं जातं! अलिप्ततेचं न गुंतण्याचं प्रतिक!! अनेक धर्मात, मातीत, लोकांत 'कमळ सांगते स्वत:कडे साठवून ठेवू नको, वाहू दे पानावरून ओघळू दे. जितकं धरून बसशील तितकं ते दूर जाणार!!
लेखिकेने लिहीलेले संदर्भ तिचे स्वत:चे आहेत. पण मला मात्र हे विचार कुठेतरी आजच्या परिस्थितीशी जोडून घ्यावेसे वाटले...
आज कोरोनाशी लढताना जाणवलं की आपण आपल्या गरजा नकळत अपरिग्रहाच्या दिशेने नेत होतो. गरजेच्या पूढे सुरू होतो तो मोह आणि त्यानंतर येतो हव्यास! आज घरात बसलेल्या आपल्या सर्वांना गेल्या सहा महिन्यांत वापरलेल्या कपड्यांच आणि कपाटात जमा असलेल्या कपड्यांच्या संख्येचं गणित गरजेपेक्षा अधिक असल्यांच जाणवतंय! मोठेपणा साठी लग्नावर पैसा, अन्न ह्यांची वारेमाप उधळण करणाऱ्या आपल्याला ५० जणांना बोलवून पण लग्न समारंभ संपन्न करता येतोय ते कळतंय. महत्वाचं म्हणजे हे सगळं वेगवेगळ्या बाबतीत सगळ्यांनाच जगण्यातलं अधिक- उणं दाखवून देतंय.
माझ्यासाठी अधिक महिना म्हणजे आई करत असलेले अनारसे, कारण तिला अनारसे खूप आवडायचे आणि त्यासाठी ती एखाददुसरी आॅडरही घ्यायची आणि अनेकदा ती ह्या महिन्यात जेवताना मौन पाळायची त्या आठवणी !!
तशीच एक बोचरी आठवण आहे ती म्हणजे "आमच्या ओळखीतल्यांच्या घरी माझ्या आई-वडिलांना ३०+३ मेहूणातले एक म्हणून बोलावलं होतं. समारंभ खूप थाटामाटात आणि देखणा व्हावा ह्यासाठी सर्वजण धावपळ करताना दिसत होते. त्या काकू माझ्या आईची मैत्रीण त्यामुळे आईनी अगदी सहज विचारलं" का गं, तुझी बहिण दिसत नाही कुठे? त्यावर काकू उतरलेल्या चेहर्यानी म्हणाल्या होत्या तिचे यजमान गेल्या वर्षी गेले ना, म्हणून सासूबाई तिला बोलावू नको म्हणाल्या!! त्यावेळी माझं वय अडनेडी होतं. पण तरीही मला ते काही पटलं नव्हतं येवढं नक्की आठवतंय.
घरी आल्यावर मी आईला विचारलं होतं की "हे ३०+३ काय आहे. तेव्हा तिनं काय सांगितलं ते आठवत नाही पण तिलाही काकूंच्या बहिणीला जी वागणूक दिली गेली ते आवडलं नव्हतं असं जाणवलं.
आज वाटत विचारांचा सुध्दा अपरिग्रह नसावा, प्रत्येकाबद्दल भूतकाळातल्या घटनांमधून मतं बनवून मनात साठवून ठेवण्यापेक्षा माणसं काळानुसार बदलतात हे लक्षात घेऊन नदीसारखं वाहतं रहावं.
ही पोस्ट लिहीण्यासाठी वाचन करताना कळलं की जावयाला दीपदान आणि अनारसे ह्यांचं अधिकाच वाण देण्यामागची संकल्पना म्हणजे मुलीला आणि जावयाला लक्ष्मी-नारायणाचा जोडा समजून हे वाण द्यायचं आणि म्हणूनच तेहत्तीस न म्हणता ३०+३ म्हणायची पद्धत आहे. म्हणूनच अधिक महिन्यांला पुरुषोत्तम (विष्णू) मास म्हणतात. ह्यावेळी तर लीप ईयर आहे त्यामुळे असा योग १६० वर्षांनंतर जुळून आला आहे.
माझी मैत्रीण मेधाताईं बोडस ह्यांनी अधिक महिन्याची एक वेगळीच गोष्ट सांगितली. त्यांच माहेर अलिबागचं असल्यामुळें अलिबाग पासून २ कि. मी. वर असलेल्या वरसोली गावांत एका नारळाच्या वाडीत असलेल्या देवळाची कथा त्यांनी सांगितली. त्या नारळाच्या वाडीत एक चौथरा आहे ज्याला चार खांब आहेत तिथे एक शिवलिंग आहे जे कायम नारळाच्या झावळ्यांनी झाकलेलं असतं. पण ज्यावेळी अधिकमास येतो तेंव्हा झापं काढून शिवलिंग मोकळं केलं जातं. त्यामुळे अधिकमासात तिथे खूपजण दर्शनासाठी जातात. त्यांनी हे सांगितल्यावर मनांत आलं...
ह्या अधिक महिन्यांपासून अपरिग्रहाची, जुन्या चुकीच्या रीतरिवाजांची झापं काढून मन मोकळं करायला हवं.
जावयाला दान देताना माझ्या लेकीला सन्मानाची वागणूक दे आणि लेकीला सासरी सर्वाना प्रेमाने जिंकुन घे असं सांगायला हवं.
३०+३ गरीब विद्यार्थ्यांना पुस्तकाचं,एकल महिलांना जगण्याच्या बळाचं अधिकाचं वाण द्यायला हवं.
तरच जगण्यातलं, मनातलं उणं जाऊन अधिक महिना सफळ सुफळ संपूर्ण होईल.
अधिक अश्र्विन शुद्ध प्रतिपदा
ता. १८- ९-२०२०
ललिता छेडा
खूप सुरेख!!
ReplyDeleteलेख नेहमीप्रमाणे छान. विचार वास्तव्याशी सकारात्मक बदल व्यक्त करणारे मस्तच
ReplyDeleteHave learnt and decided to live one day at a time. Not to carry forward bitter Incidents and memories.
ReplyDeleteअधिक महिन्यांपासून अपरिग्रहाची, जुन्या चुकीच्या रीतरिवाजांची आणि आठवांची झापं काढून मन मोकळं करायला हवं. पटलं.
जयश्री कर्वे
सर्वांचे मनापासून आभार
ReplyDelete