Thursday, March 28, 2019

आजीची गोष्ट



  सकाळ पासून धावपळ करून स्कुटरवरुन बुटीकवर जाणार्‍या स्नेहाला बघून वसुधा ताईंना भरून आलं.त्यांच्या मनात आलं"केवढ्या हौसेनं आपण हिचं लग्न करुन दिलं होतं.तिच्या लग्नाला जेमतेम वर्ष झालं आणि त्यांना नातवाची चाहूल लागली.....
         त्याकाळात एकुलती एक लाडकी लेक आपल्या संसारात सुखी आहे हे बघून तिच्या आईला जितका आनंद होतो तितक्याच त्या खूषीत असायच्या.त्यात  पुन्हा लग्न झाल्यावर लेक ठाण्यातच जवळ रहायला आली होती. 
     आकाशच्या म्हणजेच त्यांच्या नातवाच्या जन्मानंतर तर रोज ती बुटीकला जाताना सकाळी  आकाशला  त्यांच्याकडेच सोडायची.त्यामुळे नातू पण त्यांना रोज भेटायचा. आकाशचा तर त्यांना खूपच लळा लागला होता.
     स्नेहाची मात्र किरकोळ कुरबुर चालूच असायची.सासूबाई जरा जास्तच 'आमच्या वैयक्तिक आयुष्यात लक्ष घालतात'. अरूण, त्यांचा जावई नोकरीवर न जाता बरेच वेळा घरी बसून असतो. स्नेहाचे सासरे मात्र तिला खूप मानसिक आधार देत असत. बायकोच्या न कळत स्नेहाला आर्थिक मदतही करत असत. त्यामुळेच वसुधाताई समजवायच्या"अग,तुझा नवरा पण एकुलता एक आहे.त्यामुळे त्याच्यावरचा हक्क तुझ्या सासुबाईंच्या मनातून जायला जरा वेळ लागेल. 
      कधी स्नेहाला समजावताना म्हणायच्या "तुझा नवरा पण थोडा लाडोबाच आहे.हळूहळू  होईल सगळं नीट! बघ थोड्या दिवसांनी आकाशमुळे दोघंही जबाबदारीनं वागतील." पण स्नेहाच्या नशीबात काही तरी वेगळंच लिहीलेलं होतं.
      स्नेहा रहात असलेली बिल्डींग रिडेव्हलपिंगसाठी गेली आणि अरूणनी जागा विकून पैसे घेऊन लांब स्वस्तात मोठी जागा घ्यायचं ठरवलं.स्नेहानी खूप समजावलं माझ बुटीक इथं आहे,स्टेशन जवळ आहे,आई जवळ रहाते त्यामुळे मी आकाशला तिच्याकडे ठेवू शकते पण अरूण अजिबात ऐकायला तयार नव्हता.नाईलाजानी तिनं होकार दिला. एक म्हणजे तीन बेडरूमची मोठी जागा झाली आणि पैसे पण थोडे उरले म्हणून स्नेहानी हो म्हटलं होतं.पण झालं भलतंच,  त्या पैशात अरुणनी जुनं फर्निचर विकून सगळं नवीन केलं.आणि त्याही पेक्षा वेडेपणा म्हणजे थोडेसे पैसे आहेत म्हणून एक दिवस अचानक चांगली नोकरी सोडून घरी बसला.त्याच्या वडिलांनी त्याला खूप समजावलं.पण व्यवसाय सुरू करायचाच आहे असं म्हणू लागला.
     आता अरुणची आईपण थोडीशी चिडचिड करायला लागली होती. चुक अरूणची असली तरी त्या राग स्नेहावर काढायच्या.आकाश आता वसुधा ताईंना महिन्यापंधरा दिवसांतून एखाद्या वेळेसच भेटू लागला होता.कारण त्याची आता शाळा सुरू झाली होती.वसुधाताई खरं म्हणजे नातवाच्या आठवणीने कासावीस व्हायच्या.आणि‌ तिकडे स्नेहाच्या सासुबाईंनी "माझ्यानी नाही होणार हो आकाशला सांभाळणं"म्हटल्यामुळे स्नेहाला आकाशला तिथल्या पाळणाघरात ठेवावं लागतं होतं.सासरे नसते तर ती एक दिवस सुध्दा तिथं राह्यली नसती.
    आकाश सातवीत गेला आणि सगळं असह्य होऊन स्नेहा आकाशच्या मे महिन्याच्या सुट्टीत त्याला घेऊन आईकडे रहायला आली.कारण अरूण आता व्यवसायाच्या नावानं कर्ज करून ठेवायला लागला होता.कर्जदार दारावर येऊ लागले होते.कंटाळून स्नेहा घर सोडून आली होती. 
    स्नेहाच्या वडिलांना तिच्या परत येण्याचा खरं म्हणजे खूप त्रास होत होता.त्याच मुख्य कारण म्हणजे एकुलत्या एक मुलीला हे स्थळ त्यांच्या मित्रानी सांगितलं आणि आपण चौकशी न करता लग्न लावून दिलं ह्याचा त्यांना त्रास होत होता. आणि त्याचा त्यांच्या तब्येतीवर परिणाम होऊ लागला.वसुधाताईंना मात्र असं काही तरी होणार ‌हे कळलं होतं.
    स्नेहा वडिलांना खूप समजवायची"बाबा मला मनासारखं करियर करु दिलंत. तुम्ही मला स्वत:च बुटीक काढून दिलंय. आज मी स्वत:च्या पायावर उभी आहे.तुम्ही नका काळजी करू".पण तिचा संसार मोडलाय हे त्यांना सहनच होत नव्हतं.
    आकाश आणि त्याची वसूआजी मात्र सतत एकत्र रहात होते."वसूआजी भरव ना,वसूआजी गोष्ट सांग ना,चल ना आपण दोघं आईस्क्रीम खायला जावू.दोघांचा तो महिना अविस्मरणीय झाला होता.लग्नाचा सीझन असल्यामुळे स्नेहाला पण बुटीकमध्ये खूप काम होतं.त्यामुळे आकाशसारखा आजीच्या मागेमागेच असायचा.
    स्नेहा माहेरी आल्यापासून अरुण आणि त्याची आई अजिबात फिरकले नव्हते. अरूणनी दोन वेळा फोन केला होता.पण 'परत ये' म्हणण्याऐवजी वाटेल ते बोलत होता.
      स्नेहाचे सासरे मात्र तीन-चार दिवसांनी येऊन आकाशला भेटून जात होते.
       असेच एक दिवस ते आले असताना आकाश सहज म्हणाला"आजोबा, मी आणि वसूआजी इकडे ना खूप धम्माल करतोय.तुम्ही पण आम्हाला जाॅईन कराना!
     "नाही रे राजा, मला नाही येता येणार! त्यांचा घसा दाटून आला होता." वसूआजी, नवरा-बायकोंच्या भांडणांत मुलं जेवढं दु:ख भोगतात तेवढच दु:ख ज्या आजी आजोबांच्या घरी नातवंड नसतं त्यांना होत असतं."बोलता बोलता ते थांबले.
        "अशा परिस्थितीत एका घरातल्या आजी आजोबांना आपलं नातवंड गमवावंच लागतं."असं बोलून ते आकाशच्या डोक्यावर हात फिरवून झटकन निघून गेले.
      आकाशची शाळा सुरू व्हायच्या वेळीच स्नेहाच्या बाबांची तब्येत बिघडली. त्यांना हाॅस्पिटलमध्ये हलवावं लागलं.त्यामुळे आकाशला अरुणचे बाबा घरी घेऊन गेले.कारण ठाण्यातच इतक्या लांब असलेली शाळा,बुटीक,हाॅस्पिटल अशी चौफेर धावपळ स्नेहासाठी शक्य नव्हती.
     खरं म्हणजे वसुधाताईंना आकाशला त्याच्या घरी पाठवणं काही पटलं नव्हतं पण इलाज नव्हता कारण काही दिवसांनी बाबांना बायपास सर्जरी करण्यासाठी मुंबईला न्यावं लागलं.
       स्नेहाला सारखं वाटायचं 'मलाच का' हे सगळं सहन करावं लागतंय.मग ती लगेच मनाशी म्हणायची "माझं आयुष्य मलाच घडवायचय, दुसऱ्या कोणालाही नाही! आणि पुन्हा एकदा कामाला लागायची.
       हाॅस्पिटलमध्ये भेटायला अरूणचे बाबा आले तेंव्हा त्यांना "आता नातवापासून दूर रहायची पाळी बहुतेक माझी आलेली दिसतेय"असं वसूआजी भरलेल्या डोळ्यांनी म्हणाल्या.आणि ते खरं ठरलं! स्नेहानी आणि तिच्या सासऱ्यानी आकाशला हाॅस्टेलमध्ये ठेवायचं ठरवलं.
     आकाश जाताना फक्त येवढंच म्हणाला"मम्मी,तू घर सोडून गेलीस म्हणून मला असं घर सोडावं लागतंय!  तो गेल्यावर स्नेहा अक्षरशः ओक्साबोक्शी रडली.
    नंतर बारावीपर्यंतची पांच वर्ष आकाश हाॅस्टेलवर राह्यला.स्नेहावर तर त्यान भलताच आकस धरला होता. अर्थात त्याला अरूण अणि त्याच्या आईचा स्नेहाविषयीचा बोलण्यातून व्यक्त होणारा राग पण कारणीभूत होताच. एकंदरीतच तो अबोल झाला होता.
     त्याकाळात वसूआजी हाॅस्टेलवर आकाशला पत्र लिहायच्या, कधी फुलं,पक्षी ह्यांची चित्र नावासकट कापून चिकटवून पाठवायच्या,कधी गोष्टी लिहून पाठवायच्या.अनेकदा पेपरातले काही चांगले लेख पाठवत असत.
सुट्टीत तो घरी भेटायला आला की त्या विचारत "आकाश पत्रं मिळतात का रे माझी? तो फक्त 'हो' म्हणायचा.
    अभ्यासात मात्र तो खूपच हूशार होता. बारावीला उत्तम मार्क मिळवून सुध्दा त्यानं इंजिनिअरिंगला बाहेरगावी अॅडमिशन घेतली.त्यामुळे तो पुन्हा दूर जाणार म्हणून वसूआजी कासावीस झाल्या.त्याला आवडणार्‍या चार खाण्याचे पदार्थ घेऊन आपण इतके वर्षात अरुणच्या त्या घरी गेलो नाही पण आकाशसाठी जावं का?असा त्या विचार करत असतानाच अचानक त्यांना आकाशचा मोबाईलवर फोन आला.
   "वसूआजी, घरी आहेस? मी येतोय तुला भेटायला!पण तू एकटीच हवीस घरी,मला जाताना फक्त तुलाच भेटायचंय"आकाश बोलत होता आणि वसूआजीच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता.डोळ्यातून घळाघळा अश्रू अनावर झाले होते.
‌ "येरे,बाळा कधीही ये. मी वाट बघतेय"वसूआजी गहिवरून गेल्या होत्या.
उद्या सकाळी येऊ?आकाशनी विचारलं.
"ये आणि आपण दोघं एकत्र जेवूया".वसूआजी.
  "पण तू एकटीच हं"आकाश.
    "तो आपणहून येणार आहे हेच खूप आहे.असा जर येत राह्यला तर तू नक्कीच त्याच्या मनातला माझ्याबद्दलचा राग दूर करशील. मी नाही येणार उद्या जेवायला! स्नेहाला तो येतोय हे कळल्यावर ती शांतपणे म्हणाली.वसूधाताईंना सगळ्यांचं खरं म्हणजे दडपणच आलं होतं.
       दुसऱ्या दिवशी आकाश आला आणि कोणी घरात नाही असं बघून सोफ्यावर निवांत बसून बोलायला लागला."वसूआजी, शेंगांची आमटी केलीय ना? मला गोड काही नको.त्याची मोकळी बडबड ऐकून वसूआजी धन्य झाल्या होत्या.
     दोघंही गप्पा मारत जेवले.आणि मागचं आवरुन वसूधाताई बाहेर आल्या आणि आकाशनी त्याच्या बॅग मधून एक पॅक केलेला बाॅक्स काढला आणि आजीच्या हातात ठेवला."हे काय आहे? आजीनं विचारलं.
    "तू उघडून तर बघ"आकाश म्हणाला.
    थरथरत्या हातांनी वसूधाताईंनी ते पॅकींग उघडलं.आतमध्ये 'वसूआजीच्या गोष्टी' असं नांव असलेलं पुस्तक होतं.
   "अरे हे कोणाचं पुस्तक आहे?"वसूताईंनी उत्सुकतेने विचारलं.
    'तुझं' आकाश म्हणाला." ह्या पुस्तकात तू मला जे जे पाठवत होतीस ते आणि मी हाॅस्टेलमध्ये मोबाईलवर काढलेले फोटो आहेत.मी हे सर्व बाईंडींग करून घेतलं आणि त्याच पुस्तक केलं.पुस्तकावरचा फोटो पण मीच काढलाय.झाडांमध्ये लपलेल्या एका घराचा तो फोटो होता.
       "ए मी पण तुझ्यासाठी माझ्या साडीची गोधडी स्वत:च्या हातानं बनवलेय"वसूआजीनी गोधडी आकाशला दिली.त्यानी पण ती लगेच उलगडून स्वत: भोवती गुंडाळून घेतली.

     गोधडीत गुंडाळलेला आकाश आणि पुस्तकाची पानं उलटणारी वसूआजी! दोघंही प्रत्येक पानाच्या आठवणीत रंगून खूप हसत होते, बडबड करत होते.
     रंगलेल्या त्या गप्पांमुळे 'आजीच्या गोष्टींची' पुन्हा एकदा नवीन सुरुवात झाली होती.
                                             ललिता छेडा

3 comments:

  1. बिघडलेल्या संसारात मुल भरडली जातात. ते मायेचे भुकेले असतात. ही माया प्रेम फक्त वसू आजी देऊ शकल्या. वस्तू स्थिती पुढे आई हतबल.एक हृदयस्पर्शी कथा. मनास भाऊन गेली.

    ReplyDelete