मी भैरवी,चार मुलींमधली धाकटी आणि म्हणून भैरवी! मोठ्या दोघी जुळ्या बहिणी,चित्रा-गौरी,नंतरची दुर्गा आणि धाकटे आम्ही दोघे पुन्हा जुळे केदार-भैरवी.अशी आम्ही पांच भावंडं! आमचे बाबा निरंजन देशमुख हे प्रसिद्ध गायक, संगीताचे अभ्यासक असल्यामुळे आमची नांव रागांवरून ठेवलेली होती.
झालं असं की नुकताच माझा पंन्नासाव्वा वाढदिवस साजरा झाला. आणि गेली पंचवीस वर्षे स्त्रियांसाठी काम करणाऱ्या एका संस्थेत मी काम करतेय त्यामुळे असं वाटलं की आपणही थोडंसं मनातलं आपल्या, बहिणींच्या आयुष्यावर लिहावं त्या लिखाणातून जर एखादा प्रसंग, एखादा विचार,कोणाला तरी जगण्याचं बळ देऊन गेला तरी....
आमची आई तशी गृहिणी, जुन्या वळणाची, साधी भोळी! तिचं घर,आम्ही पांचजण आणि आमचे बाबा हेच तिचं जग होतं.
आम्ही रहायला दादरला होतो.कोकणातून बर्याच वर्षांपूर्वी नोकरीच्या निमित्ताने मुंबईला आलेल्या
आजोबांनी दादरला मोठ्या चार खोल्यांचं घर घेतलं होतं.आणि सध्याच्या काळात हे तेव्हा घेतलेलं घर आमच्यासाठी खूप मोठं वरदान ठरलं होतं.
माझ्या दोन्ही मोठ्या बहिणी स्वभावानी आईसारख्याच आणि आम्हा धाकट्या तिघांनाही मायेनं सांभाळणार्या!
खरं म्हणजे ह्या दोघींनंतर दोन वर्षानी दुर्गा आणि त्यानंतर तीन वर्षांनी आम्ही दोघे. त्यामुळे आमच्या जन्माच्या वेळी अवघ्या पांच वर्षाच्या असलेल्या त्या दोघींना लवकर मोठं व्हावं लागलं होत.
आमच्या घरात मात्र सर्वांनीच काम करायचं असा बाबांनी घातलेला नियमच होता. अगदी केदारसाठी सुध्दा तोच कायदा लागू होता. मी आणि दुर्गा थोड्याशा बंडखोर,जिद्दी होतो तर दुर्गा आणि गौरी बाबांचा गाण्याचा वारसा पुढे चालवत होत्या.दोघीही संगीत विशारद आहेत.मला मात्र शिक्षणाची आवड जास्त होती. बाबांनी आम्हा सर्वांनाच शिक्षणाचं महत्त्व सांगितलेल होतं.किंबहूना किमान पदवीपर्यंत तरी शिक्षण घेतलच पाहिजे असं बजावलंही होतं.
दुर्दैवानी केदार एक़ंदर शिक्षणात यथातथाच होता.कसा कुणास ठाऊक पण घाबरट ही होता.आईला नेहमी त्याची काळजी वाटायची.ती म्हणायची सुध्दा"ह्या चौघीजणी कशा बिनधास्त आहेत आणि हा असा कसा?मला वाटायचं की 'त्याला आमच्या चौघींच्या हूशारीचा, बिनधास्तपणाचा काॅमप्लेक्स येतोय.तस मी बहिणींना, आई-बाबांना बोलले सुध्दा होते.आम्ही त्या दृष्टीने प्रयत्न करत रहायचो. पण केदारमध्ये मात्र फारसा फरक पडत नव्हता. नशीबानी आमच्या घरचं वातावरण खूपच मोकळं आणि एकेमेकांना समजून घेणारं होतं.
बघता बघता आम्ही सगळे मोठे झालो.
बी.ए.झालेल्या चित्राला पुण्याजवळच्या गावातल्या स्वत:चा दुधाचा व्यवसाय असणार्या सधन घराचं स्थळ आलं.आणि जास्त चौकशी न करता लग्न ठरलं आणि झालं सुध्दा!
वर्षभरात चित्राच्या चुलत दिरासाठी त्या मंडळींनी गौरीला मागणी घातली.पण तोपर्यंत चित्राचा नवरा अत्यंत तापट स्वभावाचा असल्याचं आम्हाला जाणवलं होतं.चित्रा बिचारी काही बोलत नव्हती पण नवरा बरोबर असताना तिच्या चेहऱ्यावरचे भाव सगळं सांगून जात होते.
गौरीसाठी स्थळ घेऊन आलेल्या आमच्या लांबच्या आत्याला आमची आई म्हणत होती"जावईबापू जरा तापटच आहेत हो.पोर अगदी सुकून गेलीय. त्यावर आत्या म्हणाली "अहो वहिनी,पुरुष जरा असतातच रागीट थोड सहन केलं की झालं,बाकी सगळं चांगलं आहे ना!मग झालं तर.
मला राहवलच नाही"आत्या, तिला खायला प्यायला मिळत नव्हतं म्हणून आम्ही लग्न करून नाही दिलंय.बाबा पण चिडलेलेच होते.त्यांनी आत्याकडून चित्राच्या नवऱ्याला मी समज देणार आणि तुम्ही आणलेल्या स्थळाला संपूर्ण चौकशी केल्यावरच होकार देणार अशा दोन अटी घातल्या.
आत्यानी पण चित्राच्या नवर्याला बाबांबरोबर जाऊन चांगली समज दिली. घरी आल्यावर बाबा अगदी सहज म्हणाले होते की " मुलींच्या सासरच्यांना घाबरून न जाता मोकळेपणाने बोललं पाहिजे" आणि तेव्हाच मला कळलं होतं की माझ्यातला धीटपणा बाबांकडून आलाय.
चित्राच्या नवर्यात फारसा बदल नाही झाला पण बाबांना मात्र तो आणि त्याच्या घरचे वचकून राहू लागले.
त्यानंतर आलेल्या स्थळाची पूर्ण चौकशी करून गौरीच लग्न झालं.तिचं नशीब असं की तिला मुलं नाही झाली.सुरवातीला तिला सासरी थोडा त्रास झाला.देवदेवस्की, अनेक डॉक्टरांचे उपाय वगैरे झालं दोघांमध्ये काही दोष नव्हता पण मुलं नाही झाली.थोड्या वर्षांनी गौरीनी तिचं गाण पुन्हा सुरू केलं आणि त्यात चांगलच नांव कमावलं. ह्यासगळ्यात तिच्या नवऱ्यान मात्र तिला चांगली साथ दिली.
दुर्गानी ह्या सगळ्या लग्नांच्या गडबडीत स्वत:च एम्.एस्.सी. पूर्ण केलं होतं.तिला पी.एच्.डी करायचं होतं पण आधी स्वत:च्या पायावर उभी रहायचं असं ठरवल्यामुळे ती नोकरीच्या शोधात होती.ती ललित लेखन करत असे.महिला सक्षमीकरण हा तर तिच्या लिखाणाचा खास आवडीचा विषय होता.ह्या लिखाणाच्या माध्यमातून तिची ओळख पत्रकार अशोकशी झाली.आणि आमची बंडखोर विचारांची दुर्गा त्याच्या प्रेमात पडली.आमच्या घरातून नकार नव्हताच पण त्याच्या घरातलं वातावरण मात्र तिच्या विचारांशी सहमत असेल असं जाणवत नव्हत.आणि तसंच घडलं.लग्नानंतर सासूने तिला नोकरी करायला ठाम नकार दिला.आणि अशोक पण आपल्या आईच्या विरोधात जायला अजिबात तयार होत नव्हता. भांडूप मधल्या एका सोसायटीतल्या घरात दीर,जाऊ,त्यांची दोन मुलं, सासु अशा कुटुंबात तिची घुसमट होऊ लागली.अशोक वेगळं रहायचं तर आई आपल्या बरोबर रहाणार असं म्हणू लागला.
दुर्गानी घरात कोणालाही न सांगता पुण्याच्या काॅलेजात नोकरी धरली.आणि ती तिथेच भाड्याच्या घरात राहू लागली.अशोकनी तिथे येऊन तिच्याबरोबर रहावं म्हणून तिनं अनेकदा बोलावलं पण त्याचा ईगो आड येत होता.आणि दुर्गाचा घटस्फोट झाला.
दुर्गानी तिच्या लेखनानं खूप नांव काढलं.काॅलेजच्या नोकरीतही ती छान रमली होती.पुण्यातच तिनं स्वत:च घर घेतलं. खूप महत्त्वाचं म्हणजे तिनं बाबांच्या शेवटच्या आजारपणात अतिशय जबाबदारीनं त्यांचं सर्व काही केलं.आई तर त्याकाळात सारखी म्हणायची"आपण उगीच मुलगा,वंशाचा दिवा वगैरे म्हणतो पण ह्या पोरीने तर कमाल केलीय.किती मनापासून करतेय सगळं!
केदार पण लग्नानंतर थोडासा बदलला.त्याची बायको पण आम्हा बहिणींना सांभाळून घेत होती. मी तर त्यांच्या घरातच रहात होते.कारण मी लग्नच केलं नव्हतं.....
माझ्या बाबतीत मी जे काही ठरवतं होते ते कधीच होत नव्हतं.'निनाद' आमच्या घरासमोर रहाणारा, माझा शाळेपासूनचा अगदी जवळचा मित्र.इतका जवळचा की आम्ही दोघे लग्न करणार हे जवळजवळ निश्चितच होतं.मला खरं म्हणजे सी.ए.व्हायचं होतं.पण निनाद म्हणाला म्हणून त्याच्या बरोबर सिव्हील इंजिनिअर झाले.मी शेवटच्या वर्षाला पहिली आल्यामुळे असेलही पण मला लगेच सरकारी नोकरी मिळाली.मला खरं म्हणजे स्वतंत्र व्यवसाय करायचा होता.पण पुन्हा निनाद म्हणाला"मी व्यवसाय सुरू करतो,सेटल झालो की तू जाॅईन हो.
निनादच व्यवसाय, नोकरी काहीच जमत नव्हतं. तरी सुद्धा माझी आई त्यांच्या घरी जाऊन आपण लग्नाच ठरवून तरी ठेवूया का? असं विचारायला गेली.तर पठ्ठ्यानं "आम्ही दोघं फक्त मित्र आहोत.माझ्या तसं काही मनातही नाही" अस सर्वांसमोर बिनदिक्कत सांगितलं.
आई तर अक्षरशः शाॅकमध्येच परतली."अग,तुम्हा दोघांच काही बोलणंच नव्हतं का झालं?"आईनी हताशपणे विचारलं. मी हिला काय सांगू? आम्ही बोलण्याच्या किती पूढे गेलो होतो.दुर्गाला कल्पना होती.त्यामुळे हे कळल्यावर ती लगेच आली.तो असं का वागला ह्याची मला पुसटशी सुध्दा कल्पना येत नव्हती.पण अपमानानी मात्र मी प्रचंड दुखावले होते.
दूर्गा त्यांच्या घरी जाऊन त्याला खूप बोलून आली.
थोड्याच दिवसांनी निनादच एका बड्या बिल्डरच्या मुलीशी थाटामाटात लग्न झालं. आणि त्याच्या स्वार्थी वागण्याचा अर्थ कळला.आपल्याला इतके वर्षात तो कळलाच नाही ह्याचा खूप संताप आला.
पण लग्न न करण्याचा मात्र मनाशी निर्णय घेतला.
त्यानंतर अवघ्या तीन वर्षात त्याच्या पदरात वर्षाचा मुलगा ठेवून त्याची बायको कॅन्सरनी गेली.त्यानंतर अधूनमधून माझ्या ऑफिस
पण त्यानं दिलेलं फसवणूकीच दु:ख इतकं मोठं होत की तो माफ करायच्या लायकीचा सुध्दा मला वाटत नव्हता.
माझ्या नोकरीनं मला इतक्या मोठ्या संधी मिळाल्या, कर्तृत्ववान व्यक्तींचा सहवास मिळाला की हे सगळं विसरायला झालंय.
पण एखादी संध्याकाळ एकटेपणा जाणवून व्याकुळ करते.
आज मागे वळून बघताना वाटतं "आम्ही बहिणींनी आम्हाला पडलेल्या ज्या प्रश्र्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केला ते प्रश्र्न कदाचित आता जुने झाले असतील पण त्यात महत्त्वाचं होतं आम्हाला घरच्यांनी दिलेलं लढण्याचं बळ! जे कोणत्याही पिढीला आवश्यक असतं.
सध्याचा जास्त महत्त्वाचा प्रश्र आहे 'महिलांची सुरक्षितता' आणि त्यासाठी पुन्हा एकदा घरातलं,समाजातलं वातावरण जे स्त्री-पुरुष समानता मानणारं असायला हवं असं मला मनापासून वाटतंय!
एक स्री म्हणून स्वत:ला शोधताना जे मनात माझ्या आलंय.....
मला खात्री आहे तेच अर्थात तुमच्याही मनातअसणार...
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

महिला दिनानिमित्त शुभेच्छा. बहिणींचे प्रश्न त्या काळात कठीण होते उत्तर शोधण्याचा प्रयत्न केले आजही अशा प्रकारच्या समस्या सोडवण्यासाठी सगळ्या नी हातभार लावला पाहिजे. महिला सुरक्षितता महत्वाची
ReplyDeleteMahila dinachya hardik shubheccha .ya mulinsarkhyach aapan hi saksham sabal aahot n nehmi raahuyaat.ekmekichya paathishi raahuyaat .हम सब साथ है
ReplyDeleteत्या काळातले प्रश्न आजही फार बदलले नाहीत पण ते सोडवताना कुटुंबाची साथ सगळ्यात महत्वाची आणि सुरक्षित पणा असेच नेहमी असायला हवे ब्लॉग नेहमी प्रमाणे छानच
ReplyDeleteमनातलं माझ्या
ReplyDeleteस्री पुरूष समानता कुटुंबात आणि समाजमनात रुजायला हवी असा विचार मांडणारी कथा महिलादिनाच्या पूर्वसंध्येला वाचली. ८मार्च उजाडला. स्रिया आपल्या हक्कासाठी प्रथमच रस्त्यावर आल्या . त्या सामूहिक कृृृृतीची आठवण म्हणून आंतरराष्ट्रिय स्तरावर महिलादिन साजरा होऊ लागला हे सर्वांना माहीत आहेच.यावर्षी सकाळी सकाळी व्हाॅट्सअपवर एक पोस्ट आली. एका संस्थेने जाहीर केलेल्या निबंधस्पर्धेचा एक विषय होता ' स्रीपुरुष समानता .. कुटुंबसंस्था उध्वस्थ करणारी '.पोस्ट वाचून धक्का बसला. मैत्रीणींमध्ये संतापाची लाट उसळली. त्या संस्थेला निषेध पत्र पाठवायचे ठरले. आयोजकांना फोन करून आमची तीव्र नाराजी आम्ही कळवली. आणि त्यांनी निबंधाचा विषय बदलला .. खरं तर बदलावा लागला. नवा विषय - ' स्रीपुरूष समानता : कुटुंबाच्या हिताची '. आमच्या सामूहिक प्रयत्नाना यश आले. महिलादिन २०१९ संस्मरणीय ठरला.
' मनातलं माझ्या ' मध्ये स्रीपुरूष समानतेचा विचार ललिता छेडा यांनी मांडला.पण वास्तव वेगळे आहे . निबंधाचा विषय बदलला पण विचार कधी आणि कसे बदलणार??
छान
ReplyDeleteGood narration. I feel girls should be more sensible and practical before making long term relationships, or you can be duped like Bhairavi.But atleast she did not relent and large heartedly forgave Ninad .Nowadays girls are becoming practical rather more than necessary commercial minded before choosing life partner.
ReplyDeleteएकाच प्रवाहातल्या पण चार दिशा असलेल्या चार मुली...किती छान कथा गुंफलीय तुम्ही मॅडम...खरं तर त्यातल्या आई वडीलांचंही कौतुक...प्रत्येक मुलीच्या मताचा त्यांनी आदर ठेवला आहे. अगदी लग्न न करणा-या मुलीच्या मतालाही त्यांनी मान दिलाय....
ReplyDelete