Thursday, February 28, 2019

नातं

        सकाळी साडेसहाच्या सुमारास चालायला निघाले की आमच्या गेटवर रोज एक छोटीसा पक्षी किलबिलाट करत असतो.खरं म्हणजे ह्या थंडीच्या दिवसात काळोख जरा जास्तच रेंगाळतो.त्यामुळे बाहेर पडताना तो दिसला नाही तर चुटपुट लागते.त्याच्याअसण्याची इतकी सवय झालीय की तो दिसला नाही की मी त्याला आजूबाजूच्या झाडांवर शोधू लागते.कारण जसा उन्हाळा सुरू होतो तो नाहीसा होतो. थंडीतलं हे सीझनल नातं खूप गंमतशीर असतं...
कोपऱ्यावरच्या बंगल्याबाहेर दोन तीन तगरीची झाड आहेत.सकाळी कायम खूप फुललेली असतात.त्यामुळे चालण्याबरोबर सकाळी देवासाठी फुलं वेचायला छोट्या पिशव्या घेऊन निघालेले आजोबा त्या तगरीपाशी भेटतातच. पण दहा वर्षांपूर्वी मी दोन्ही कानाला इयरफोन लावून गाणी ऐकत चालले होते आणि आजोबा माझ्याशी बोलायला थांबल्याच जाणवलं आणि मी इयरफोन काढून हसून भुवया उंचावून 'काय'असं विचारलं. आजोबा म्हणाले "रागावू नकोस पण एकाच कानात ती भुंगडी घाल.दुसरा कान‌ आजूबाजूचे आवाज ऐकायला मोकळा ठेव.नाहीतर मोटारीचे हाॅर्न देखील ऐकू येणार नाहीत.आणि कुठेतरी गाडीघोड्याचा धक्का लागेल....त्यांचा तो आपुलकीचा आणि मोलाचा सल्ला मी कायम पाळला.आजोबा रोज दिसतात आणि हसून आम्ही दोघंही आपुलकीच नातं जपतो...
रस्त्यावर असलेल्या काॅलेजमधून वर्ग सुरू व्हायच्या वेळी 'जन गण मन'ह्या आपल्या राष्ट्रगीताचे स्वर संपूर्ण रस्ता भारून टाकतात आणि सगळा रस्ता आदरांनी निश्र्चल उभा रहातो. आणि सगळ्यांचच राष्ट्रप्रेमाचं असलेलं नातं दृढ होतं....
काॅलेजच्या थोड्याशाच पुढे असलेल्या बागेत हास्यक्लब, बॅडमिंटन अशा अनेक अॅक्टीव्हीटी सुखेनैव सुरू असतात.पण मला आठवते ज्योति! 
हास्यक्लब चालवणारी ज्योति, बागेच्या गेटवर नवर्‍यानी स्कुटरवरुन सोडलं की माझी वाट बघत उभी असायची.भेटलं की रोज काहीतरी नवीन पिशवीतून काढून दाखवायची. आणि कोणत्या तरी मैत्रीणीला मदत करण्यासाठी कधी‌ हेल्दी ज्युस,कधी कपडे,कधी मधुरांगणच सभासदत्व,कधी खाण्याच्या वस्तुंची पॅकेट,कधी एखादी टूर सुध्दा घ्यावी असा तिचा प्रेमळ आग्रह असायचा आणि ह्या सर्व गोष्टी स्कीममध्ये आहेत हेही ती आवर्जून सांगायची! तिचा उत्साह, उर्जा बघून खूप गंमत वाटायची.कधीकधी मी तिच्यावर जराशी चिडायची कशाला सर्वांना मदत करायला जातेस? पण ती आपली त्याच उत्साहात! पण अचानक एक दिवस ती झोपेतच गेल्याच कळलं.विश्र्वासच बसत नव्हता.इतक्या लहान वयात, कोणताही आजार नसताना,काल भेटलेलं माणूस आपल्यातून निघून जातं!!!.गेल्या दोन वर्षात त्या गेटवर आलं की तिची आठवण झाली नाही असा एकही दिवस गेला नाही.'ती' तिचं नातं आठवणींशी जोडून गेली...
रस्त्यात सकाळच्या शाळेत जाणाऱ्या चिमुकल्यांना स्कुटरवरून सोडायला जाणारे आई-बाबा आणि त्यांच्या कमरेला कधी पुढे उभं राहून, कधी मागं बसून पण घट्ट मिठी मारणारी पेंगुळलेल्या डोळ्यांची मुलं रोज दिसतात. पावसात रेनकोट, थंडीत स्वेटर, उन्हात टोपी, मुलांना घालणारी आई अनेकदा स्वत: अशीच निघालेली असते.हे‌ बघितल्यावर वाटतं त्यांना सांगावं"मोठे झाल्यावर असंच आई-बाबांना तुमच्या बाईकवर तुमच्या खांद्यावर हात ठेवून उगीचच एक फेरी मारून आणा" कारण मुलांनी आईबाबांशी असलेलं नातं त्यांच्या हळव्या म्हातारपणी जपलंच पाहिजे..... 
मैदानावर पोचेपर्यंत चहाच्या तीन टपरी रस्त्यात दिसतात.बाकीच्या दोन थोड्या उशीरा उघडतात.पण एक अगदी माझ्या जायच्या वेळी सुरू होते.आणि तो चहावाला माझ्या समोरच पहिला एक कप चहा जमिनीवर ओततो. एक दिवस न राहवून मी त्याला म्हटलं "उससे अच्छा किसी गरीबको वो चाय पिलाना!"लगेच तो म्हणाला "वो तो मैं दिनमें दो कप फ्री पिलाताही हूं,लेकिन भाभीजी,जिस जमीन पर खड़े होकर धंधा करता हूं,उसे पहली चाय देना जरूरी होता है। ये एक भोग चढानाही है ना।" जमिनीशी असलेलं नातं जपणा-या त्याच्याशी माझं पण छान नातं जुळलय....
मैदानावर पोचलं आणि रोजचे चेहरे बघितले की सकाळ प्रसन्न होऊन जाते.सगळ्यांचे गृप ठरलेले, जागा ठरलेल्या, डाव्या बाजूच्या पायर्‍यांवर कधी संक्रांतीची वाणं दिली जातात तर कधी सुखदुःखाची देवाणघेवाण होत असते.दोन मिनिटांचच ते शेअरींग असतं ते, पण पण एखाद्या कुटुंबाइतकच जपलेलं नातं असतं.....
चालणाऱ्या सर्वांमध्ये कोणी नगरसेवक असतात, एखाद्या मोठ्या मासिकाचा संपादक, प्रसिद्ध अभिनेत्रीचे बाबा अशी खूप वेगवेगळ्या क्षेत्रातली मंडळी असतात.पण तिथं मात्र सर्वजण फक्त चालणं, धावणं,योगा अशा आरोग्यपूर्ण जगण्यासाठीचे प्रयत्न करत असतो.कारण आरोग्य आहे तर सर्वकाही आहे.चालताचालता एकेमेकांची चौकशी करणं,राजकारणावर चर्चा,दिक्षीत-दिवेकर सल्ले असं सगळं सुरूच असतं.
फक्त जानेवारीचे पहिले चार दिवस संकल्प करणारे, लपून छपून भेटण्याचं ठिकाण असणारे,मे महिन्यात आजी, बाबांबरोबर येणारी बच्चेकंपनी अशी तात्पुरती खूप नाती असतात...
उजव्या बाजूचा कट्टा बहुतेक व्यायाम,योगा,दोरीवरच्या उड्या ह्यासाठी जणू राखीव आहे.प्रत्येकाची जागा ठरलेली....
समोरच्या नेटमध्ये क्रिकेट, फुटबॉल सारख्या खेळांची विविध वयोगटातल्या खेळाडूंची प्रॅक्टिस चालू असते.हल्ली त्यात एखादी मुलगी पण दिसायला लागली आहे.आपण उभं राहून एखादा मस्त शाॅट बघितला आणि खेळणार्‍याला आपण बघतोय ते कळलं की त्या खेळाडूच्या चेह-यावरच हसू आपली‌ सकाळ प्रसन्न करून जातं....
त्या कट्ट्याच्या समोरच्या बाजूला असलेल्या कोपऱ्यात एक गुजराती साड्या नेसलेल्या, थोड्या वयस्कर,शरीरानी स्थुल अशा बिहारी स्रियांचा गृप व्यायाम करत असतो.मध्येच त्यातल्या दोघी तिघी चालायला सुरुवात करतात, कधी त्या जवळच्या पारावर बसतात. आणि त्यांच्या गप्पा सुरू होतात.पण त्यांच व्यायामामुळे एकेमेकींशी जुळलेलं नातं खूप घट्ट मैत्रीचं आहे....
परताना गेटवर हेल्दी ज्युस,गरम सुप एका व्हॅनमधुन घेऊन येणारे दीपकभाई नक्की असणारच.त्यांच्याकडे येणार्‍या प्रत्येक व्यक्तीशी त्यांच नातं फक्त गिर्‍हाईकाच कधीच नाहीय.तर घरातल्या माणसांसारख आहे.
त्यानंतर भाजी स्वच्छ निवडून जुडी बांधून गिर्‍हाईकांची वाट बघणार्‍या सत्तर वर्षांच्या 'आजी', पेपरच्या स्टाॅलवाल्या 'मावशी' ही ठराविक जागेवर असणारी,म्हणायला व्यावसायिक पण माझी रोजची सवयीची नाती....
ऋतू प्रमाणे बदलणारा निसर्ग चैत्रातल्या पालवीसारखा नवनवीन रूपानी भेटत रहातो.रस्त्यातली आंब्याची झाडं मोहरू लागली की वसंताची चाहूल लागते.गुलमोहर,बहावा फुलून येतात आणि कळतं की उन्हाळाआला.पावसाळ्यात सगळी सृष्टी हिरव्या रंगाच्या विविध शेडस् दाखवते.प्रत्येक ऋतुचक्रातील सुर्याची वेगवेगळी रूपं त्याच्या तेजासह मोहवतात. म्हणूनच निसर्गाशी,माणसांशी जुळणार्‍या नात्यांसाठी शांता शेळके ह्यांच्या कवितेच्या ओळी आठवतात.....
हे एक झाड आहे,याचे माझे नाते
वार्‍याची एकच झुळूक,दोघांवरून जाते......
                                                             
                                                   -ललिता छेडा.

Thursday, February 21, 2019

टाईमप्लीज



         रात्रीच्या बसनी कोल्हापूरला जायला मंगल बसमध्ये चढली आणि तिला सोडायला आलेल्या नवर्‍याला तिनं पर्स मध्ये बघत "अहो,मोबाईल बहुतेक मी घरीच विसरलेय बहुतेक, नाहीतरी आईकडे लॅण्डलाईनवरच फोन करावा लागतो.तिथे जरा नेटचा प्राॅब्लेमच आहे". असं म्हटलं आणि तिच्या नवर्‍याची म्हणजेच माधवची "अशी कशी विसरलीस? तरी मी सगळ घेतलंस ना म्हणून सारखी आठवण करून देत होतो.वेंधळी कुठली!आमची किती पंचाईत होईल आता!अशी बडबड सुरु झाली.इतक्यात ड्रायव्हर बसमध्ये चढला आणि त्याला बसमधून उतरावच लागलं."आईला बरं असेल तर लगेच परत घरी ये"जाताजाता तो बजावायला विसरला नाही.
     बस सुटली आणि तिनं मोठा श्र्वास सोडला.आईच्या आजारपणाच निमित्त सांगून निघालेल्या मंगलनी पर्स मधून मोबाईल काढला.तिच्या प्लॅनमध्ये सामिल असलेल्या तिच्या मैत्रिणीनी अस्मितानी तिचा जुना मोबाईल अगदी जरूर लागली तर देऊन ठेवला होता.
       तिनी कोल्हापूरला विनायकला तिच्या चुलत भावाला फोन लावला."विन्या, निघाले रे मी" कारण  ही टाईमप्लीजची कल्पना त्याचीच होती.
     "ये, मी येतोय सकाळी तुला उतरवून घ्यायला.आणि तुला सांगू का! काकूला आज सकाळपासून थोडासा ताप येतोय.तेव्हा तू आईला बरं नाही म्हणून निघालीस ते खोटं नाही".विनायक हसत बोलला.
    "मस्करी नको करू! जास्त आजारी नाही ना! मंगल काळजी च्या स्वरात म्हणाली.
     "नाही ग,ये तू, मी आता काकूला सांगतो तू येतेयस  ते! आपलं ठरल्याप्रमाणे मी तिला तुला कोल्हापूरवर आर्टीकल लिहायचं आहे म्हणून येतेयस असं सांगतोय.ओ.के.ना!"विन्या त्याच्या स्वभावाप्रमाणे मजेत बोलत होता.
      मोबाईल बंद करून तिनं पर्समध्ये टाकला.आणि बाहेर ‌बघितलं. बसनी मुंबई सोडली नव्हती.त्यामुळे बाहेर अजून जाग होती.रस्त्यावरून जाणार्‍या दोन मुलींना बघून तिला आपल्या लेकीची समीराची आठवण झाली. हूशार, देखणी नुकतीच सी.ए. झालेली लाडकी लेक अचानक दहा दिवसांपूर्वी म्हणाली" मम्मा,आम्ही लग्न करायचं ठरवतोय!"
    दोन वर्षांपूर्वी  तिनं असच अरुणला समोर उभा करून "मम्मा,हा माझा मित्र अरूण आम्ही दोघे एकेमेकांच्या प्रेमात आहोत.आमचं जमतय असं वाटलं की लग्न करू! असं म्हटलं होतं.आणि आज थेट लग्न करायचंय! आपण अवाक होऊन विचारलं होतं"म्हणजे?" सीटवर डोळे मिटून पडल्या पडल्या मंगलला सर्व समोर दिसत होतं.
    "समीरा, आत्ता कुठे तुझ शिक्षण पूर्ण झालय, कुठेतरी नोकरी शोध, घरातली कामं शिक.आपण लग्नाची व्यवस्थित तयारी करूयात उगीच घाई नको!अग पैशाची पण सोय करावी लागेल" आपण आपलं उगीचच  घोडं दामटलं होतं पण इतक्या वर्षांनंतर आपल्याला माहित होतं की हिने ठरवल की ‌भूणभूण करून ही परवानगी मिळवणारच.आता ह्यांना काय सांगू? किती  टेन्शन आलं होतं आपल्याला.
   आणि संध्याकाळी हे 
ऑफिसमधून घरी आल्यावर  भीतभीतच म्हटलं"अहो,समीरा लग्न करायचं म्हणतेय! जरा दिवाळीनंतर करूया असं जरा समजवा ना! "अरे व्वा छान बातमी आहे,"हे तर ऐकल्यावर खूषच झाले होते. मी पण मस्त बातमी आणलीय, लग्नासाठी आयती रजा मिळेल""म्हणजे? आपण जाम टेन्शननी विचारलं होतं.कारण मागचा पुढचा विचार न करता ठरवून टाकायच हा ह्यांचा स्वभाव तिला ठाऊक होता.
     "अग, आमच्या 
ऑफिसमध्ये व्ही.आर्.एस्.ची स्कीम आलेय.आणि मी विचार करतोय व्ही.आर् एस्.घ्यायचा.बाविसाव्या वर्षांपासून मी नोकरी करतोय. आता तीस वर्ष होतील रोजचा बोरिवली ते चर्चगेट प्रवास करून". मंगलला काही कळेचना की ह्या दोघांना लग्न करणं, नोकरी सोडणं इतकं सहज कस वाटतंय.पैशाच‌ काय?  नोकरी सोडून अवघ्या बावन्नाव्या वर्षांपासून हे घरी काय करणार? असे इतरही अनेक प्रश्न तिच्यासमोर उभे राहिले."का नेहमी प्रमाणे आपल्या मनात येईल तसं ठरवून टाकायचं आणि मी आहेच निस्तरून न्यायला!
     मंगलला मिहीरची म्हणजेच तिच्या मुलाची आठवण आली.इंजिनीअरींगच्या शेवटच्या वर्षाला हाॅस्टेलवर रहाणारा मिहीरच ह्या दोघांना समजवेल ह्या विचाराने त्यादिवसापुरती तरी ती थोडी रिलॅक्स झाली होती.आत्तातरी दोघांनाही काहीच प्रतिक्रिया द्यायची नाही असं तिनं मनाशी ठरवलं.दोघांची काहीतरी धुसपूस सूरू होती पण तिनं दूर्लक्ष केलं.
      दुसऱ्याच दिवशी सकाळी अचानक मिहीर दरवाजात उभा राहिला.विस्कटलेले केस,वाढलेली‌दाढी, चेहरा उतरलेला असा त्याला बघून तिनं घाबरून विचारलं होतं"अरे,काय झालं तुला?असा काय अवतार करून घेतलायस!
    मला बरं नाहीय! दोनच दिवस ताप आला पण त्यामुळे खूप अशक्तपणा आलाय.म्हणून घरी आलोय".मिहीर बोलत आत गेला.मंगल हताश होऊन  हाॅलमध्येच बसली‌ होती.
     मंगलची बस आता हायवे वरून जात होती.आजूबाजूला सगळी‌ निजानीज झाली होती.बाहेरचा अंधार पण गडद झाला होता.मंगलला मात्र अजिबात झोप येत नव्हती.
      तिला आठवलं सकाळी उठल्यावर तिनी समीराला म्हटलं होतं"मिहीर उठल्यावर त्याला विचारून डाॅक्टरांकडून  औषध घेऊन ये "
       "चिल माॅम, त्याला काही झालं नाहीये.त्याचा पुन्हा ब्रेक अप झालाय अरूणनी मला कालच फोन करून सांगितलंय" समीरा शांतपणे बोलली.
   मंगलनी कपाळाला हात लावला.गेल्यावेळी किती समजावलं होतं की शिक्षण पूर्ण होईपर्यंत हे असं काही नकोय.आपण साधी मध्यमवर्गीय माणसं आहोत.तुझ्या शिक्षणाचा खर्च, समीराच शिक्षण,लग्न हे सर्व आम्ही तारेवरची कसरत करून करतोय.आणि आता पुन्हा!! 
      मंगल रागाने बाहेर जाऊन बसली आणि तेवढ्यात विनायकचा फोन आला होता.रागाच्या भरात तिनं घरातल्या तिघांनी उभ्या केलेल्या प्रश्र्नांबद्दल सांगितलं.
      गाडी आचका देऊन थांबली.आणि ड्रायव्हर क्लीनर खाली उतरले आणि पंधरा मिनिटांनी गाडी ‌सुटेल असं म्हणाले.मंगल आणि दोन चार पुरूष, एक बाई असे उतरू लागले.मंगल त्या बाईंच्या सोबतीनं खाली उतरून फ्रेश होऊन बाहेरच चहा घेत बसली. त्या बाई म्हणाल्या देखील "अहो झोप नाही येणार चहा घेतला तर!" मध्येच तो ड्रायव्हर बोलला"ताई झोपल्याच नाहीयत.ती नुसतीच हसली आणि म्हणाली"वेळेवर पोचू ना?"तो पण हसला आणि त्याने नक्की असा अंगठा दाखवला.
     गाडी निघाली आणि तिला आठवलं "कोल्हापूरला मी यावं ही कल्पना विनायकचीच.तिनी सगळं घरातलं सांगितल्यावर तो म्हणाला होता"मंगे, तुला आठवतंय खेळात तुझ्यावर राज्य आलं की तू लगेच हात आडवा ओठावर ठेवून 'टाईमप्लीज' म्हणायचीस तसं कर.
     खेळताना आम्ही कसे खेळ‌ थांबवून तुझी वाट बघायचो कारण तू मध्येच खेळ सोडून गेलीस की दुसऱ्या कोणाला तरी राज्य घ्यावं लागायचं नाहीतर तुझं येणं गरजेचं आहे हे ओळखून वाट बघावी लागायची. कारण राज्य कोण घेणार? 
      तसच टाईमप्लीज म्हण आणि कोल्हापूरला ये, सांग आईला बरं नाहीय.आणि स्पर्धेसाठी तुला‌ 'माझं माहेरचं गाव'बद्दल पण लिहायचं आहे ना?ते पण गावांतच राहून लिहीता येईल.
   गाडीत आता थंडी वाजायला लागली होती.मंगलनी स्वेटर घातला आणि मनाशीच हसली."आपल्याला विन्याची कल्पना इतकी आवडली की लगेच मनातल्या मनात 'टाईमप्लीज' म्हणून आईच्या आजारपणाच निमित्त सांगून दुसऱ्या दिवशी आपण  निघालोसुध्दा! हवेतल्या गारव्यानी तिचे डोळे मिटू लागले.
      सकाळी 'कोल्हापूर'असा क्लीनरचा आवाज आला ती उठली आणि खिडकीबाहेर बघू लागली.दूर विनायक उभा होता.
     आईकडे आल्यावर मात्र आपण आलो ते बरंच केलं असं तिला वाटलं.आई खूपच अशक्त झाली होती.बाबा गेल्यावर शेजारीच राहणाऱ्या विनायकनी त्याच्या घरी रहायला ये असं म्हटलं होतं पण "मला होतय तोपर्यंत एकटी रहाते आणि माझ्या दोन्ही लेकीना मी आहे तोपर्यंत माहेरच्या घरी आल्यासारखं पण वाटेल"असं म्हणून एकटी रहात होती.पण ह्या आजारपणात विनायक तिला त्याच्या घरीच घेऊन आला होता.
   दुसऱ्या दिवशी संध्याकाळी अस्मिताचा फोन आला."मंगल, इकडं पहिल्याच दिवशी दाणादाण उडालीय! सकाळी अलार्म वाजलाच नाही म्हणे.त्यामुळे काका 
ऑफिसला गेलेच नाहीत.पोळीभाजी विकत आणली आणि कुकर कसा लावायचा विचारायला समीरा आली होती.संध्याकाळी पावभाजी विकत आणणार आहेत"
     मंगलनी मात्र "इकडे आई खरंच खूप आजारी आहे" हे तिला सांगितल्यावर "बरं झालं बाई तू आईकडे गेलीस ते" असं अस्मिता म्हणाली.आणि "मी रोज फोन करते"असंही तिनं आवर्जून सांगितलं.
   घरातलं सगळ ऐकल्यावर मंगलला थोडंसं वाईट वाटलं पण गेम व्यवस्थित सूरू झालीय असं मनात येऊन हसू पण आलं....
   रोज अस्मिताचा फोन येत होता.तिकडे अनपेक्षित आलेल्या जबाबदारीने समीराची खूप धावपळ होत होती.त्यात मंगल महिना अखेरीला इकडं आली होती त्यामुळे माधवला एक तारखेचे हिशोब करावे लागणार होते.आणि तसंच झालं होतं "दुध ह्यावेळी ज्यास्त घेतलंस का?वाण्याच बिल किती आलंय बापरे! असे रोज माधवचे फोन येतच होते.आपण पेपर किती घेतोय?मंगलला वाटलं आपण कसं दिलेल्या पैशात भागवतो त्याचा अंदाज तर आला ह्या टाईमप्लीजमुळे आपल्या नवऱ्याला!
       मुलांच्या बाबतीत मात्र आपण चुकलोच दोघंही अभ्यासात हुशार आहेत म्हणून आपण त्यांना ‌घरकाम,घरच्या जबाबदाऱ्या दिल्याच नाहीत.सगळ  आपण अगदी दमेपर्यंत धावून धावून करत राह्यलो.दोघाना थोड्या जबाबदार्‍या द्यायला‌ हव्या होत्या.
    आठ दिवसांनी मिहीर कोल्हापूरला आला.दुपारी जेवणं झाल्यावर म्हणाला"साॅरी मम्मा,आठ दिवस बाबा आणि समीराची जी काही तारांबळ उडाली आहे ती बघून मला माझ्या प्रायोरिटीज् कळल्यात, मी ह्या प्रेमप्रकरणात ह्या वर्षी ड्राॅप घ्यायचा विचार करत होतो.पण आता मी इथून सरळ हाॅस्टेलवर जातोय फक्त तुला आणि आजीला भेटायला आलो होतो".मंगलनी भरल्या डोळ्यांनी त्याला निरोप दिला.
    मिहिर गेल्यावर दोनच दिवसांनी समीरा आणि माधव गाडी घेऊन आले आणि समीरा दारातच विनायकला म्हणाली"मामा तुम्हा दोघा भाऊबहिणीची 'टाईमप्लीजची' कल्पना कळलीय अस्मितामावशी कडून आणि आम्ही आई आणि आजी दोघींना घेऊन जायला आलोय.
      ते दोघं निघाल्याच  अस्मितानी फोन करून मंगलला सांगितलं होतं.आणि मंगल पण तिला म्हणाली होती "बरं केलंस मला पण आता घरी परत यावस वाटतंय.माझ्या मनातून पण टाईमप्लीज संपलीय.
      त्यामुळे लेकीला आणि नवऱ्याला बघून मंगलचा आनंद लपत नव्हता.विनायक पण हसत म्हणाला"दहा दिवसांनी आमच्या बहिणाबाईंची कळी खुललीय! तेव्हा आता आपण मस्त जेवूया आणि उद्या सकाळी निघा.
     निघण्यासाठी गाडीत बसल्यावर समीरानी नाटकीपणानी हात जोडून मंगलला म्हटलं "माॅम, मी वर्षभर तरी लग्न करणार नाही आपल्या हाताखाली घर चालवायला,स्वैपाक करायला शिकणार आहे.तेव्हा थॅन्क्स" 
     मी काही वेगळं नाही बोलणार पण तुझ्या ह्या टाईमप्लीजमुळे मला घरात रहावं लागलं आणि कळलं की कामाशिवाय असं रहाण किती कठीण आहे ते! तेव्हा पुढची आठ वर्ष रिटायरमेंट नंतर काय करायचं त्याचं प्लानिंग करणार आहे.."
     मंगलनी तिच्या आईकडे बघितलं.तिला काहीच कळत नव्हतं पण आपल्या लेकीनी ह्या दोघांना काही तरी धडा शिकवला आहे हे जाणवतं होतं त्यामुळे आईनं प्रेमानं मंगलच्या डोक्यावरून हात फिरवला.आणि मंगलच्या मनात आलं "पुन्हा एकदा खेळाला सुरुवात करायची तर तुझा आशिर्वाद हवाच!
            ललिता छेडा

Thursday, February 14, 2019

कातरवेळ


                   देवकाकांच्या घरातून मराठी गाण्यांचे सूर आले आणि चाळीतल्या सगळ्यांना कळलं की आज आठ दिवसांनी काका संध्याकाळचे‌ घरात आहेत.
    शेजारच्या मामींनी येऊन विचारलं सुध्दा " अरे देवदत्ता,बरी आहे का ती मीरा? घरी आणलं वाटतं? नाही म्हटलं, गेले आठ दिवस तू रोज तिच्यासाठी संध्याकाळचा हाॅस्पिटलमध्ये सोबतीला जात होतास म्हणून विचारलं हो!
     "मामी,आता बरी आहे ती आणि काल रात्री घरी‌ सुध्दा आली"देवदत्तनी हसत हसत म्हटलं."येताय उद्या तिला भेटायला?देवकाकांनी विचारलं.
  "अग बाई, चालेल का तिला? फार शिष्ट आहे म्हणे ती. मामी हळूच बोलल्या. 
     खरं म्हणजे चाळी समोरच्याच सोसायटीत देवदत्तच्या मुलाचा ब्लाॅक होता त्यामुळे ते‌ बहूतेक रोज सकाळी तिथे चालायला जात असत.तिथे त्यांचा एक समवयस्कांचा छान गृपही झाला होता. सोसायटीत आणि चाळीत मात्र देवदत्त 'देवकाका'म्हणून ओळखले जात होते.मीराही त्याच सोसायटीत रहात असल्यामुळे ती बागेत सोसायटीतल्या बायकांसाठी योगा क्लास घेत असताना दिसायची...पण माॅडर्न विचारांची आणि तशीच रहाणारी मीरा थोडीशी शिष्टच आहे असं सोसायटीतल्या सर्वांचच मत होतं. तीही कोणाशी जास्त बोलत नसे.
      देवदत्तच मात्र थोडंसं वेगळं होतं.त्यांच्या चाळीसमोर बांधल्या जाणाऱ्या सोसायटीत ब्लाॅक घ्यायच देवदत्तच्या मुलानं जेव्हा ठरवलं तेव्हा"पप्पा,आपण सगळे एकत्र रहायला हवं तर तीन बेडरूमचा ब्लाॅक बुक करावा लागेल तुम्ही डाऊन पेमेंट साठी थोडी मदत कराल का? "अशी विनंती केली.स्मिताला म्हणजेच देवदत्तच्या बायकोला हे अजिबात पटलं नव्हतं.ती लेकाला म्हणाली सुध्दा "अरे, तुझ्या बजेटमध्ये येतोय तेवढाच घे,सध्या तरी आम्ही दोघे इथे चाळीत खूष आहोत.पण लेका जवळ रहायला मिळेल आणि दोन्ही नातींचा सहवासही मिळेल.ह्यासाठी ब्लाॅकच्या डाऊन पेमेंटला देवदत्तनी चांगली मोठी रक्कम दिली.पण दुर्दैवानं बिल्डींग पूर्ण व्हायच्या आधीच चार ‌दिवसाच्या तापानं स्मिताचा मृत्यू झाला.
    त्यानंतर नवीन घरी रहायला जाताना देवदत्तला मुलगा म्हणाला"पप्पा, तुम्ही इथं चाळीतच रहाल  का? आम्ही दिवसभर घरी नसतोच, रात्री जेवायला येत जा.आणि आपल्या चाळीचाही आता रिडेव्हलपमेंटसाठी विचार सुरू आहेच की!!! देवदत्तला कळलं की आता स्मिता नाही तर आपण त्यांच्या उपयोगाचे नाही त्यामुळे आता आपण त्यांना त्यांच्या घरी नकोय"त्यानंतर मात्र देवदत्तनी मुलाच्या घरात पायही ठेवला नाही.आणि हे सगळं सर्वांनाच माहीत असल्यामुळे हा विषय कोणीच त्यांच्या कडे काढत नसे.पण त्यांच्या मनमिळाऊ स्वभावाने मात्र ते सर्वांना हवेहवेसे वाटायचे.
      त्याउलट घटस्फोटित मीराचा‌ मुलगा अमेरिकेत सेटल झालेला होता.आणि एकट्या रहाणार्‍या मीराचा काही तरी व्यवसाय असल्याची जुजबी माहिती सोसायटीतल्या मंडळींना होती.कोणीशीही जास्त संबंध नसलेल्या मीराकडे तिची एक मैत्रीण मात्र नेहमी येत जात असे.
     अचानक एक दिवस योगा क्लास सुरू असतानाच  मीराला अस्वस्थ वाटू लागलं.छातीत दुखू लागलं. वाॅक करून नुकत्याच बसलेल्या देवदत्तच तिच्याकडे लक्ष गेलं आणि तो धावतच तिच्या जवळ गेला.तिला खूपच त्रास होत होता.सर्वांनी धावपळ करून तिला अॅडमिट केलं.सुदैवानी मायनर अॅटॅक होता आणि वेळेवर उपचार मिळाले होते.
     हाॅस्पिटलमध्ये सकाळचं जेवण, तिच्या जवळ बसायची जबाबदारी सोसायटीच्या मंडळींनी देवकाकांनी सांगितल्यानंतर घेतली होती.संध्याकाळी देवकाका आणि रात्री तिची मैत्रीण नंदिनी असायची. मीराला ह्या सगळ्यांनी केलेल्या मदतीमुळे खूप ओशाळ वाटतं होतं. तस ती सारखं बोलूनही दाखवत होती.पण तिच्या जुन्या अनुभवांमुळे कोणी तिच्या जास्त जवळ जात नव्हतं.मीरानी मुलाला अमेरिकेत कळवू नका असं म्हटल्यामुळे कोणी त्या भानगडीतही पडलं नाही.पण देवदत्तशी मात्र तिची छान गट्टी जमली होती.
   आठ दिवसांनी तिला हाॅस्पिटलमधून डिसार्ज मिळाला.पण महिनाभर तरी तिनं विश्रांती घेतलीच पाहिजे असं डॉक्टरांनी बजावून सांगितल. त्यामुळे तो महिना देवदत्त रोज संध्याकाळी तिच्याकडे जात होता.तिला लागणारं सामान आणून देत होता,  स्वैपाकाला बाई असल्याने कधी कधी तिथंच जेवत होता. त्याच्यामुळे इतरही मंडळींच तिथं येणजाण सूरू झाल होतं.
     मीराशी बोलता बोलता कळत गेलं की "आई वडिलांची एकुलती एक असलेल्या मीराचं लहानपण गिरगावात गेलं होतं.तिच्या वडिलांच गिरगावात स्टीलच्या भांड्याच छोटंसं दुकान होतं. मीराच शिक्षण पूर्ण झाल्यावर लगेचच तिचं वडिलांनी लग्न लावून दिलं. लग्नानंतर ती अंधेरीला रहायला गेली.दुर्दैवानी नवरा खूपच ऐदी,व्यसनी निघाला. मीरानी कशीबशी सात आठ वर्षे काढली त्यातच तिला एक मुलगा झाला.मीराच्या वडिलांनी त्यांच दुकान त्याच्या नावावर करावं ह्यासाठी मीराला तिचा नवरा अतिशय त्रास देऊ लागला.नाईलाजानं शेवटी तिनं घटस्फोट घेतला.तोपर्यंत आई-वडील पण गिरगांवची जागा विकून ह्या सोसायटीत अंधेरीला रहायला आले होते.दूकानाकडे मीरानी बघायला सुरुवात केली होती.तिचा मुलगा शिकून अमेरिकेला गेला आणि तिनी गिरगांवातलं दुकान पण विकून टाकलं होतं.एकंदरच  एकटेपणा,  दुकान विकल्यामुळे आलेलं रिकामपण,घटस्फोट घेतल्यापासून स्वत:ला सगळ्यांपासून दूर  ठेवणं ह्या सर्वांचा तिला ताण आला होता आणि हा अॅटॅक त्यामुळेच आला असावा असं ती सहज म्हणाली होती.
    तेव्हा देवदत्त तिला म्हणाला होता"आयुष्याच्या ह्या कातरवेळी जोडीदार बरोबर नसेल तर अशीच घुसमट होते पण आपण स्वत:ला आपल्या आवडत्या छंदात,कामात,मित्र मैत्रीणींमध्ये इतकं व्यस्त ठेवायचं की एकटं वाटूच द्यायचं नाही.सांगणं सोपं आहे पण प्रयत्न तरी मनापासून करायचे.मीरानी पण हसून "नक्की प्रयत्न करेन" असं म्हटलं.
    एक दिवस मीराच्या घरी सोसायटीच्या मंडळींचा पत्ते,गप्पांचा फड रंगला असताना अचानक देवदत्तचा मुलगा तिथं आला.. आणि सर्वांसमोर थोड्याशा रागाच्या स्वरात देवदत्तला म्हणाला"पप्पा, तुम्ही इथे सारखे येता,जेवता, कधी कधी रात्री रहाता लोकं हल्ली बोलायला लागली आहेत. 
     देवदत्तनी शांतपणे विचारलं"कोण बोललं त्याच नांव तरी सांग!"
      "तसं नांव नाही सांगता यायचं पण मलाच नाही आवडत"तो गडबडून गेला.
     "असं स्पष्ट सांग ना रे,कारण मी इथे का येतो, काय करतो, हे सोसायटीच्या मंडळींना, चाळीतल्याना सगळ्यांना माहीत आहे.ते पण सगळे आमच्या बरोबर गाणी ऐकायला,पत्ते खेळायला येत असतात.तेव्हा तू मला कोणाचीही भीती घालू नकोस.
     "आणि माझ्या बद्दल विचारणाऱ्यांना हे पण सांग की"माझ्या पप्पांनी, माझ्या घरी वास्तूशांतीनंतर पाय सुध्दा ठेवला नाहीय. तेव्हा बेटा, मी कुठे रहायचं हे तू ठरवलस आता मी कसं जगायचं ते ठरवू नकोस"देवदत्तांनी विषय संपवला होता.मुलगा थोडासा तणतणतच तिथून गेला.
    सगळीजणं स्तब्ध झाली होती.मीरा म्हणाली "माझ्यामुळे तुम्हाला उगीचच ऐकावं लागलं!
    "अजिबात नाही,उलट मलाच तुझ्यामुळे त्याला सणसणीत ऐकवायला मिळालं".देवदत्त खुषीत होते.
     काही दिवसांनी मीराचा मुलगा 'मनीष' आला.आईच्या आजारपणाच कळल्यावर तो दोन महिन्यांसाठी आला होता.मनीषच्या सहवासात असताना तो खूपच मनमोकळ्या स्वभावाचा आणि विचारांचा पक्का असल्याचं देवदत्तला जाणवलं.
    कारण तो आला तेव्हा देवदत्तच्या मुलाच्या अनुभवामुळे सर्वजण जरा घाबरत घाबरत येत-जात होते.पण मनीषनी इतकं मोकळेपणानी सगळ्यांशी बोलायला सुरुवात केली की त्यामुळे पुन्हा सगळी धमाल मीराच्या घरात सुरू झाली.आणि मनीषही त्यात मनापासून सामिल झाला.
   नंतर मनीषनी आईच्या आजारपणात मदत केलेल्या गृपची थॅन्क्स गिव्हींगची एक वन डे पिकनिक  आयोजली.दुपारच्या जेवणानंतर चाळीतल्या मामी म्हणाल्या"मनीष, बरं केलंस हो आमची ट्रीप काढून! कारण आता आमच्या चाळी ठिकाणी टाॅवर बनणार आहे त्यामुळे आम्ही सगळेजण विखूरले जाणार आहोत पण मला खरी काळजी देवदत्तची वाटते.कारण नवीन जागा तयार होईपर्यंत बिल्डर देईल तिथं सर्वांनाच जावं लागेल. लांब जागा दिली तर देवदत्त एकटा होईल कारण तो काही मुलाकडे नाही जायचा.
     मामींच्या बोलण्यानंतर मनीष बोलायला उभा राहिला" माझ्या आईच्या आजारपणात तुम्ही सर्वांनी जी मदत केलीत त्यासाठी खरच मनापासून आभार! आणि आभार त्या आजाराचे देखील कारण आम्हाला बाबा सोडून गेला तेव्हा पासून माझ्या आईने जगाशी ठेवायच्या संबंधांचा दरवाजा इतका घट्ट बंद करून घेतला होता. की ती कोणाशीही बोलत नव्हती.पण तुम्हा सर्वांमुळे तिला कित्येक वर्षानी मोकळेपणानं हसताना, गप्पा मारताना‌ मी बघतोय.आणि त्यामुळे मी खरच खूप रिलॅक्स झालोय! 
     मी अमेरिकेन मुलीशी लग्न केलं  त्यामुळेच तिथे स्थायिक व्हायचं ठरवलं पण आईची फार काळजी वाटायची.पण आज तिला इतका छान गृप मिळालाय  हे मी बघतोय आणि हे मिरॅकल देवदत्त अंकलनी केलाय... हेही मला आईनं सांगितलंय.
       देवदत्त अंकल, तुम्हाला जेव्हा चाळीतली खोली सोडावी‌ लागेल तेव्हा ‌बिनदिक्कत सामान घेऊन आमच्या घरी रहायला या.मला खूप आवडेल!
      लग्नाशिवाय असं दोघानी एकटच कसं रहायचं?मामींना त्याच बोलणं काही समजलं नव्हतं.
      "मामी,ह्या‌ वयात आता रिलेशन्सनां कोणतंच लेबल नाही लावायचं".मनीष हसत हसत म्हणाला."त्या दोघांची फ्रेन्डशिप इतकी क्लीन अॅंण्ड ट्रान्सपरण्ट आहे की मला नाही वाटत त्यांच्या एकत्र रहाण्यानी कोणाला प्राॅब्लेम असेल! आणि कुणाला असेलच तर त्यानी आयुष्याच्या संध्याकाळच एकटेपण अनुभवल नसेल म्हणून असला विचार करतोय असं म्हणून आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करुया.
   मामींनी न कळून इकडेतिकडे बघितलं.
   मीरा मात्र गहिवरून म्हणाली"बाळा, खूप अभिमान वाटतोय तुझा, तुला एकट्याने वाढवताना सारख वाटायचं मी कुठे कमी तर पडत नाही!!पुढे ती बोलूच शकली नाही.देवदत्त उठून थोडासा दूर एकटाच जावून बसला.
      नंदिनी,मीराची मैत्रीण उठली आणि मीराच्या जवळ येऊन मामींना म्हणाली"खरंय आहे मामी,मनीष म्हणतो तशी आपली सर्वांची मैत्री, संबंध इतके स्वच्छ आणि पारदर्शक आहेत की ह्या नात्यांना काही नांवे द्यायची गरजच नाही.
     बघता बघता संध्याकाळ झाली. रंगात आलेल्या गाण्याच्या भेंड्या मनीषनी थांबवल्या आणि म्हणाला"चला, संध्याकाळ झाली.देवदत्तअंकल कुठे आहेत? सोसायटीतले सावंत म्हणाले"तो बघ तिकडे दूर झाडाखाली एकटाच बसलाय. 'मी घेऊन येतो' अशी हातानी खूण करून मनीष त्या दिशेनं चालू लागला.
     देवदत्तच्या जवळ येऊन खांद्यावर हात ठेवून म्हणाला"आॅण्टींची आठवण आली ना?
     देवदत्तनी मान वळवली आणि डोळ्यातलं पाणी पुसायचा प्रयत्न केला.पण मनीषला बघून त्याला अश्रू आवरेचनात.
     मागून आलेल्या मामी" खर आहे रे बाबा, दिवेलागणीची ही कातरवेळ गेलेल्या जवळच्यांची आठवण व्याकुळ करते.अस गहिवरून म्हणाल्या.
     "अरे,पण नंतर येणारी सुंदर पहाट नवीन सुरुवात करून देते ना! आणि उद्या तर व्हेलेंटाईन डे आहे.तुम्ही सर्व तर एकेमेकाचे व्हेॅलेंटाईन आहातच .मनिष हसत हसत म्हणाला पण त्यासाठी आधी घरी जाऊन झोपायला हवं ना अंकल! मामी आणि देवदत्त दोघांनाही हसू आवरेना.वातावरणातला ताण गेला होता.मनीष देवदत्तला बस मध्ये घेऊन आला.आणि.....
    कातरवेळच्या मंद पिवळ्या प्रभेतला प्रवास प्रसन्न केशरी पहाटेकडे सुरू झाला होता.
                                                                              -ललिता छेडा

Thursday, February 7, 2019

मोह

ऑफिसमध्ये प्रेझेंटेशनची गडबड असल्यामुळे रश्मीनी सकाळी मोबाईल सायलेंटवरच ठेवला होता.लंचला जाताना मोबाईल बघितला तेव्हा तिच्या नवऱ्याचे म्हणजेच आशिषचे ४/५मिस काॅल दिसत होते.
‍ "अरे आज त्याच प्रमोशन डिक्लेअर होणार होतं.म्हणून बहुतेक हा फोन लावत असणार रश्मीच्या‌ मनात आलं आणि तिनं लगेच त्याला फोन लावला.
"अग, किती फोन लावतोय,उचलत का नव्हतीस? माझं प्रमोशन झालंय आणि मला दोन वर्षं दुबईला जावं लागेल.आणि हे तुला सांगायचं तर तू फोनच घेत नव्हतीस!
"बोलत का नाहीस? आशिष विचारत होता.
"अरे तू दोन वर्ष नाहीस, एकटेपणाच्या कल्पनेने शब्दच सुचेनासे झालेत."रश्मीला भरून आलं होतं.
"अगं,वर्षात दोनदा फॅमिली येऊ शकते"आशिष खूप खूष होऊन बोलत होता.
तिला जाणवलेला विरह त्याला कळतच नव्हता आणि हळव्या,कवी मनाच्या रश्मीला नक्की माहीत होतं की असाच आहे हा प्रॅक्टिकल,अॅम्बिशियस आणि आपल्या दृष्टीनं 'अरसिक' पण आपण तर त्याच्या ह्याच जिद्दी स्वभावावर भाळलो होतो ना!...रश्मीनी बघितलं तर त्यानं फोन ठेवला होता. 
रश्मी खरं म्हणजे रंग संगतींची उत्तम जाण असणारी चित्रकार आणि हळव्या मनाची कवियत्री होती. एका प्रसिद्ध अॅडव्हटायझींग एजन्सीत डिझायनिंग विभागाची प्रमुख होती.घरापासून तिच्या केबिनपर्यंत सगळीकडे तिचा नीटनेटकेपणा आणि सौंदर्याची जाण तिला ओळखणार्‍या सगळ्यांना माहीत होती. 
तिच्या सासूबाईंना तर तिचं खूप कौतुक होतं.नोकरी सांभाळून तिच्या जुळ्या मुलींना सांभाळून ती घराच्या सर्व जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडत होती. दोन्ही मुली आठवीत होत्या त्यांची शाळा,क्लास सर्व गोष्टींकडे तिचं बारीक लक्ष असायचं.आणि तिच्या ह्या स्वभावाच कौतुक तिच्या सासूबाईंना खूप होतं.
पण मल्टीनॅशनल कंपनीत इंजिनिअर म्हणून मोठ्या पदावर असलेल्या आशिषला मात्र तिचा हाच नेटकेपणा जाचक वाटायचा.त्याच म्हणणं 'काम करा यश मिळणारच'.त्यासाठी हे रंगसंगती, सौंदर्य, टापटीप ह्याची काही गरज नाही.सुरवातीला रश्मीनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला पण नंतर मात्र तिनं ह्या विषयावर बोलणंच सोडून दिलं.
‌आशिषच ध्येय होतं कंपनीच संचालकपद आणि त्यादृष्टीने दुबईला जाणं ही त्या दिशेच पहिलं पाऊल होतं.त्यामुळे रश्मीला जाणवलेला एकटेपणा त्याच्या विचारातही नव्हता.
आज कंपनीतर्फे आशिषला दिलेल्या सेंडॉफ पार्टीत रश्मी खास निमंत्रित होती.आणि त्या पार्टीत रश्मीचा परिचय कंपनीच्या व्हाईस चेअरमन आनंद शर्मा यांच्याशी झाला.
उंचापुरा,देखणा, आनंद पार्टीत आपल्या वागण्यानं सर्वांचंच लक्ष वेधून घेत होता.त्यानी घातलेला रेड टी शर्ट वर ग्रे ब्लेझर बघून रश्मी मनातल्या मनात त्याला शंभर मार्क देऊन मोकळी झाली होती.
अचानक आशिष आनंदला घेऊन तिच्या जवळ आला.आणि "मीट माय वाईफ रश्मी,शी इज अ कमर्शियल आर्टिस्ट"अशी ओळख करून दिली.
आनंदनी हात पुढे केला आणि तिनं पण नकळत हातात हात दिला.का कुणास ठाऊक पण तो स्पर्श तिला काही तरी वेगळाच जाणवला! हात हातात असतानाच आनंदनी विचारलं"जाॅब करता?" पट्कन हात सोडवून घेत तिनं चमकून त्याच्याकडे बघितलं.
"मला मराठी येतं,जन्म कोल्हापूरचा असल्यामुळे सुरवातीच शिक्षण मराठीतून झालंय."बाकी आयुष्य मुंबईत तेव्हा मराठी इज मस्ट!आनंदच बोलणं कमालीच मृदू होतं.
रश्मीनी थोडक्यात तिच्या जाॅब विषयी सांगितलं.'"व्हेरी गुड, आपल्या कंपनीच्या नवीन प्राॅडक्टसाठी तुमच्या एजन्सीकडे नक्कीच अँप्रोच करू."आनंद बोलत बोलत उठला आणि तिच्या खांद्याला स्पर्श करून'बाय' म्हणून दुसऱ्या कोणाशी तरी बोलू लागला. त्याच्या सेंटचा सुगंध मात्र तिच्या अवतीभवती दरवळत राह्यला.तिच्या मनात आलं"सुगंध कोण आणि कसा लावतं ह्यावर असं दरवळणं अवलंबून असावं बहुतेक"आणि तिच तिलाच ह्या विचारानं हसू आलं."काय बाई,मोठी ऑर्डर  मिळतेय म्हणून हसू येतय ना? आशिष जवळ येऊन कानात पुटपुटला.
दुसऱ्या दिवसापासून आशिष जायच्या तयारीला लागला.महिन्याभरात त्याला निघावं लागणार होतं.तस आनंदनी कालच्या पार्टीत त्याच कौतुक करताना जाहीरच केलं होतं.आशिषला पण आता एकटं रहाण्याच टेन्शन यायला लागलं होतं.तरी कंपनीने त्यांची सर्व सोय केलेली होती.त्याच्याबरोबर पुणे,बंगलोर, हैदराबाद मधून पण तीन जणांना पाठवलं होतं.ते तिघेही काहीना काही कारणांमुळे एकटेच होते त्यामुळे त्या सर्वांच्या सोयीसाठी रश्मीनी आशिष बरोबर जावं असं सगळ्यांचच मत पडल्यामुळे आशिषला तशी वेगळी परवानगी काढावी लागली.नशीबानी रश्मीला आठ दिवसांसाठी ती मिळाली देखील!
दुबईत सोयी खूपच चांगल्या होत्या.रश्मीनी स्वैपाकघरात सामान भरून तिथल्या स्वैपाकाच्या माणसाला घरगुती स्वैपाकाच्या टीप दिल्या.
चौथ्या दिवशी आनंद अचानक दुबईला आला.आणि सरळ आशिष रहात होता त्या अपार्टमेंट मध्येच त्यांच्या घरी आला.रश्मी एकटीच घरी होती."ह्या मंडळींची ओळख आणि कामं समजवून द्यायला आलो"आनंदनी येण्याचा खुलासा केला... आणि"इज एव्हरीथिंग ओ.के.हिअर? असं रश्मीला विचारायलाही विसरला नाही.रश्मीनी पण जे काही हवं होतं ते मोकळेपणानं सांगितलं.
दुबईहून परताना आनंद तिच्या बरोबरच विमानात होता.तिच्या शेजारची सीट घेऊन "सो,वी कॅन टाॅक अबाऊट अवर अॅड!विल डू ना? असं नम्रपणे विचारलं. तिच्या एजन्सी बद्दल, तिच्या कामाबद्दल त्यानं आवर्जून चौकशी केली.बोलता बोलता त्याच शिक्षण,कामाचा आवाका, कंपनीतली पोझिशन लक्षात आल्यावर रश्मीपण त्याच्याशी मोकळेपणाने बोलू लागली.
नंतरच वर्ष आनंदनी तिच्या एजन्सीला जाहिरातीसाठी संपर्क केल्यामुळे ती खूपच बिझी झाली कारण त्या जाहिरातीची पूर्ण जबाबदारी एजन्सीनं तिच्यावर टाकली होती.शूटींग, पेपरसाठी राईटअप,जिंगल् ,फेमस अॅक्टरच्या अपाॅटमेंटस् सर्व करताना दोन वर्षे कुठं गेली कळलंच नाही.आनंदशी पण खूप छान जवळीक निर्माण झाली होती.
जाहिरातीचं खूप जोरात लाॅंचिंग झालं.आणि अवघ्या काही दिवसांत जाहिरात आवडल्याच्या बातम्या देखील येऊ लागल्या.रश्मी खूप खूष होती.
आशिषचे यायचे दिवस जवळ यायला लागले होते.मुली,आजींना घेऊन रश्मीनी त्याला घ्यायला जायच ठरत होतं.तशी तिकीटं पण काढली गेली.पण अचानक आलेल्या कामामुळे तिची रजा कॅन्सल झाली.आणि मुलींना घेऊन सासुबाई एकट्याच दुबईला गेल्या.आणि अचानक रश्मीला स्वत: साठी वेळ मिळाला.
सगळी मंडळी यायला दोन दिवस असताना आनंदनी तिला फोन करून "ऍडचा  सक्सेस सेलिब्रेट करूया? आज डिनरला तुझ्या घराजवळच्या फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये भेटशील? असं विचारलं.तिला‌ पण कंटाळा आला होता त्यामुळे ‌ती लगेच तयार झाली.
आनंदनी तिला वाईन ऑफर  केली.अनेकदा आशिष बरोबर ती घेत असल्यामुळे तिनी पण घेतली! पण ह्यावेळी तिला लागल्याचं जाणवू लागलं. थोडंसं खाऊन निघते म्हणून ती उठली पण तिचा तोल गेलाच.आनंदनी तिला कमरेत हात घालून सावरलं.तिच्या नकळत ती त्याच्या मिठीत होती.
तिला सावरत आनंदनी हाॅटेलच्या रूमवर नेलं.कारण तिला अजिबात शुद्ध नव्हती.शरीराचं ते बहरणं, फुलणं घेऊन ती एका धुंदीत आनंदच्या मिठीत गेली होती.आणि त्याच्या सुगंधात विरघळून गेली होती.हवहवंस वाटणारं काहीतरी आनंद भरभरून देत होता.
जाग आली तेव्हा पहाटेचे चार वाजले होते.ती झटकन बेडवर बसली.मंद प्रकाशात आनंद समोरच्या खुर्चीवर झोपलेला होता."अरे बापरे,काय घडलं हे! धडपडत उठून ती दरवाज्याकडे निघाली.तिच्या चाहूल लागून आनंद उठला."साॅरी म्हणत तो जवळ येऊ लागला. त्याच्याकडे न बघता ती तडक खाली पोर्च मध्ये उभ्या असलेल्या तिच्या गाडीकडे गेली.घरी पोचल्यावर बाथरूम मध्ये शाॅवरखाली उभी राहिली."कसला मोह पडला आपल्याला? कित्येक वेळा आपण वाईन घेतोय.पण असं कधीच झालं नाही.उद्या आशिष येतोय, मी कशी त्याच्या समोर जाऊ? रश्मीला विचारानी काही सुचत नव्हतं.
फ्लाईट मध्यरात्री होती त्यामुळे शांतपणे विचार करायला हवा असलेला वेळ मिळणार होता.नशीबानी आज रविवार आहे."रश्मीला काही सुचतच नव्हतं.तिच्या मनात आलं अस जर आशिष वागला असता तर.....आपण सहनसुध्दा करु शकणार नाही!नाही कोणत्याही परिस्थितीत आपण हे आशिषला कळू द्यायचं नाही.मोहाच्या एका क्षणासाठी आपलं संपूर्ण आयुष्य आपण पणाला नाही लावायचं.
ड्रायव्हरला गाडी पार्क करायला सांगून रश्मी एअरपोर्टच्या काॅरीडाॅरमध्ये वाट बघत होती.विमान लॅण्ड झालं होतं.बाहेर यायला अर्धा तास तरी लागणार होता.गेल्या वर्षभरात आशिषला बघितलं नव्हतं.
समोरून स्लीम, रेड टी शर्ट मधल्या आशिषला बघून ती धावली आणि आशिष पण तिचा हात धरुन म्हणाला"रशी, दुबईला मला तुझ्या नीटनेटकेपणाची इतकी गरज जाणवली की मी जिम जाॅईन केलं"आशिष बोलत होता पण रश्मीला वाटलं मला नको ती टापटीप मला तू हवा आहेस.आणि कळल्यासारख आशिषनी तिला जवळ ओढलं आणि त्याच्या मिठीत जाणवलेली सुरक्षितता ,नकळत ती हमसाहमशी रडू लागली.
रडतारडता तिचं लक्ष समोर उभ्या असलेल्या मुलींकडे गेलं त्या तिच्याकडे छोटंसं तोंड करून बघत होत्या.... तिनं स्वत:ला आशिषच्या मिठीतून सोडवलं आणि मुलींकडे धावली खाली बसून तिनं मुलींना जवळ घेतलं आणि तिला वाटलं'हे सगळं खरंखुरं माझं आहे. शाश्वत आहे.मला हे अजिबात गमवायचं नाहीय.तिच्या सासूबाई तिच्या डोक्यावर हात फिरवत होत्या.
"खूप दिवसांनी हिंदी गाणी, असं म्हणत आशिषनी रेडिओ सूरू केला.आणि 'ये मोह मोह के धागे। तेरी उंगलियोंसे जा उलझे। गाण्याचे स्वर तिला अंतर्मुख करत होते.पुन्हा भरलेल्या डोळ्यांनी तिनं गाडीत मान मागे टाकली.
ललिता छेडा