Sunday, March 28, 2021

मनाच्या घरातली माणसं...

       ईश्वराची अनाकलनीय निर्मिती म्हणजे "माणूस". प्रत्येक माणूस वेगळा, व्यक्ती म्हणून स्वभाव, दिसणं, वागणं सगळंच वेगळं असतं. आपल्या सर्वांनाच आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर अनेक माणसं भेटतात.

      काही मनात घर करतात, काही अगदी सहज विस्मरणात जातात, तर काही फक्त मनावर कायमचा ओरखडा उमटवून जातात.

      मनात घर करून रहाणाऱ्या माणसांबद्दल लिहायचं ठरवलं तर सर्वात पहिले येतात ते नातेवाईक! माझे वडील म्हणजेच दादा लहानाचे मोठे झाले त्यांच्या मामांकडे त्यामुळे त्या पाच मामांच्या कुटुंबातल्या भावंडांनी दादांना मोठ्या भावाचा मान दिला. लहानपणीच्या आठवणी मनात गोंदवल्यासारख्या असतात. माझ्या आठवणी राजाकाका, मनोहर काका, रमणकाका, मोहनकाका,श्रीकांत काका ह्या सर्वांबरोबर सिनेमा बघणं, बिनाका ऐकणं, आईस्क्रीम खाणं ह्यांनी व्यापून राह्यल्या आहेत. काकांच्या पाठोपाठ आलेल्या उषा काकू आणि मीना काकू ह्यांची घरं आईनंतर माझं माहेर आहे.

        माझ्या सख्ख्या आत्या इतक्याच ‌माझ्या जवळच्या इंदू आत्या, कुसुम आत्या, सिंधू आत्या, नलू आत्या, यमु आत्या ज्यानी माझे "लल्या" म्हणून खूप लाड केलेत. ह्यातली सिंधू आत्या रहिमतपूरला रहात असल्यामुळे तिचा सहवास कमी मिळाला. पण ती मुंबईला आली की आमच्या घरी यायची आणि ती एकमेव आत्या होती‌ जी दादांशी मोकळेपणानं चर्चा करायची. दादांच्या कडक स्वभावामुळे त्यांच्याशी गप्पा फक्त ‌मनोहरकाका आणि सिंधू आत्या मारायचे ते दोघेच सल्ला घेण्याबरोबरच देतही असत. सिंधू आत्या पत्र सुंदर लिहायची तिची पत्र माझ्या निष्काळजीपणा मुळे गहाळ झाल्याचं मला कायमचं दु:ख राह्यलंय! मला मामा एकच त्याच्या तिन्ही मुलांबरोबरच्या गिरगावातल्या आठवणी खूप गहिर्‍या आहेत कारण त्या आठवणीत माझी आजी आहे.

       मला सख्खी आत्या एकच....तिचे तिन्ही मुलगे आणि दोन्ही मुलीं मामा-मामी म्हणजेच माझ्या आई-वडीलांना खूप मानत होते. खूप प्रेम करायची ती सगळीजणं आम्हा तिघांवर आणि आत्याचा धाकटा लेक श्रीकांत तर माझ्या आई-वडीलांना मुलासारखा होता आणि श्रीकांतनी पण हे नातं मनापासुन जपलंय!

       सासरच्या सर्वांनी मला खूप समजून घेतलं पण माझी लाडकी पुतणी मनीषा माझ्यासाठी खास जवळची व्यक्ती..

      त्यानंतर येते ती शाळा! शाळेत माझ्या जीवश्र्च कंठस्थ मैत्रिणी म्हणजे जोष्टे, भोसले, मुजुमदार, देवधर आणि जोग... ही मैत्री अजूनही तितकीच टवटवीत आहे. आता तर शाळेतल्या एकाच वर्गातल्या मैत्रिणी स्कुल-रियुनियन मध्ये जवळ जवळ ५० वर्षांनी भेटल्या आहेत आणि what's app मुळे तर मैत्रीचं वेगळंच नातं बहरतय!

      शाळेनंतर काॅलेज, जिथं मला भेटली लता गोठोस्कर जिच्या बरोबर घालवलेल्या पाच वर्षांत असंख्य स्वप्न आणि सिनेमे बघितले. ते दिवस आयुष्यातले सर्वात सुंदर दिवस होते.

       त्यानंतर "लग्न" आणि डोंबिवलीत रहायला आलो. डोंबिवलीनी मला असंख्य माणसांनी समृद्ध केलं. पण इथली सर्वात पहिली मैत्रीण म्हणजे "जयश्री" करमरकर जिचं माझ्या मनात घर नाही तर बंगला आहे...कारण गेली पस्तीस वर्षे आम्ही दोघींनी अनेक ‌सुख-दु:खाची वळणं एकेमेकींशी‌ शेअर करत पार केली आहेत. तिला माझ्या सासरची मंडळी "बाजूवाली" म्हणत असत.

       डोंबिवलीत आल्यावर माझ्या गुजराथी मैत्रिणी म्हणजे इंदू , लता, आणि मणी...आमच्या चौघींचं खरेदीसाठी भटकणं, गाॅसिपच्या गप्पा, एकमेकींच्या घरी खाणं-पिणं...आम्ही खूप एन्जॉय करतोय. आमच्या ह्या आनंदात आमची मुलं, नवरे पण सहभागी झालेत. नुकतीच आमच्या चौकटीतून एकजण सोडून गेली आहे पण आमच्यासाठी "मणी" आहे. शरीरानी नसली तरी मनाने नक्की...

       मला जगण्याचं बळ देणार्‍या, एकट्यानं आयुष्यातला आनंद शोधणार्‍या राजश्री कुलकर्णी, प्रज्ञा पोंक्षे, संघमित्रा, वैशाली पागे ह्यांसारख्या अनेकजणींच माझ्या मनाचा कोपऱ्यात नेहमीच स्वागत असतं. खूप उशिरा भेटलेली पण मनातलं "कुछ दिलसे दिलकी बात कही और... इतकी जवळची झालेली आरती मुनिश्र्वर. माझं दिसणं, असणं छान रहावं ह्यासाठी मनानं सतत माझ्या शेजारीच असलेली आरती तन्ना!!

       मला ज्ञानदीपशी जोडलं भारतीनं आणि त्या कामाचा आनंद मिळाला वैशाली-मीनाच्या मैत्रीमुळे! त्यातसुद्धा असंख्य अडथळ्यांना पार करून आता मीना आणि माझी मैत्री मनातून बहरलीय. स्मिता तळेकर, उमा आवटे पुजारी, विद्या राळे, सरोज भट्टु,‌ ज्योती पाटकर, अजय पागे ह्यासारख्या असंख्य मित्र-मैत्रिणींनी मला कार्यकर्ती म्हणून समृद्ध केलं. खास उल्लेख करावा लागेल सुप्रसिद्ध कवयित्री, लेखिका गौरी कुलकर्णीं आणि निस्वार्थ कार्यकर्ती परिणीता माविनकुर्वे ह्या दोघींशी असलेल्या मैत्राचा!

      मला वेगळ्या वाटेने नेणार्‍या सुवर्ण मंगल बॅंकेमुळे‌ माझ्या मनाचा कोपरा भाडं न देता न घेता अनुभवांनी व्यापलेला आहे. पण बॅंकेमुळे ग्लॅमरही खूप अनुभवलं!! पेपरात मुलाखती, बातम्या, टि.व्ही. ह्या सगळ्या गोष्टींमुळे माझी स्वतःची ओळख निर्माण झाली. इथं पत्रकार टोळकाकांचा आवर्जून उल्लेख केलाच पाहिजे. मला चांगल्या संधी मिळाव्यात यासाठी धडपडणारे आबासाहेब पटवारी, बॅंकेसारख्या आर्थिक संस्थेत काम करताना माझ्यावर विश्वास ठेवणारे मधुकरराव चक्रदेव, श्रीकांत जोशी, उदय कर्वे, जयंत पित्रे, दादा प्रधान, सरलाताई जोशी अशा अनेक मान्यवरांचा पाठिंबा हा माझ्या मनाला नेहमीच धीर देत असे. मंगलाताईं कुलकर्णींच्या उल्लेखाशिवाय माझा हा बॅंकेचा प्रवास पूर्ण होऊच शकत नाही.

      बॅंकेच्या १८ वर्षाच्या प्रवासात सुनिती रायकर, जयश्री कर्वे ह्या दोघींनी धरलेला मैत्रीचा हात इतका घट्ट झालाय की मनातलं शेअरिंग करायची माझी ही मैत्री म्हणजे हक्काची जागा झालीय! नेत्रा फडके, स्मिता नाख्ये ह्यांच्याबरोबर बॅंकेत काम करताना त्या कधी जवळच्या मैत्रिणी झाल्या कळलंच नाही.

       बॅंक मर्ज झाल्यावर निव्वळ मन रमावायला फ्रेन्डस् लायब्ररीच्या कट्ट्यावर जायला सुरुवात केली. पै फ्रेन्डस् लायब्ररीची मेंबरशीप तर घेतलीच होती. कट्ट्यावर रवीप्रकाश कुलकर्णींचे अनुभव ऐकणं खूप आनंददायी अनुभव होता. अचानक त्यांना यायला जमत नव्हतं म्हणून मला पै काकांनी कट्टा सांभाळायची‌ जबाबदारी दिली आणि मला मनासारखं काम करायची संधी मिळाली. ग्रंथाली प्रकाशनाचे संचालक असलेले प्रभाकर भिडे यांनी त्यांच्या स्वभावाप्रमाणे मला कट्ट्यावरचे कार्यक्रम ठरवताना मदत करायला सुरुवात केली. माझं पहिल पुस्तक प्रकाशित व्हावं म्हणून ही भिडे काकांनी मनापासून मदत केली. रागिणी उपासनी, धनश्री साने, दीपाली काळे,प्राची किल्लेकर अगदी जवळच्या मैत्रिणी झाल्या. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पै काका___ ज्यांच्यामुळे, ज्यांच्या माणसं जोडण्याच्या स्वभावामुळे, कष्टाळू वृत्तीमुळे मी पै फ्रेन्डस् लायब्ररीच्या कट्ट्याशी जोडले गेले आणि कट्ट्यावरच्या कार्यक्रमांनी माझ्या मनाला स्वतःला शोधायची सवय लावली.

       डोंबिवलीत रहात असल्यामुळे शं.ना.नवरे मला ओळखत होते ही जाणीव मला नेहमी सुखावत असते! जेष्ठ लेखिका विनीता ऐनापुरे ज्यांनी माझ्या पहिल्या पुस्तकाची प्रस्तावना लिहिली, आकाशवाणीवर मला संधी देणारी उमा दिक्षित, ज्ञानदीपचे प्रेरणास्थान आकाशानंद ही माझ्या मनाच्या गाभाऱ्यातली मंडळी... 

        अशी माझ्या आयुष्याच्या विविध टप्प्यांवर भेटलेली, मला सकारात्मक उर्जा देणारी, माझ्या मनातल्या घरातली माणसं! बरेच उल्लेख, बरीच नावं, नक्की राहून गेली असतील मनाचं दार उघडंच असतं ना तेव्हा ती सगळी जण माझ्या बरोबर आहेतच.

      अहंकार बाजूला ठेवून सर्वांची मने जिंकण्याचा मी नेहमीच प्रयत्न केला....

      कधीही हरल्यावर पुन्हा उठण्याची ताकद तुम्ही दिलीत म्हणूनच हा पाऊलवाटेवरचा शेवटचा लेख तुम्हा सर्वांना समर्पित!


                     फाल्गुन पौर्णिमा 

                     ता. २८.३.२०२१

                        ललिता छेडा


Sunday, March 14, 2021

उल्हसित फाल्गुन

        आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास!! असं का म्हणत असतील माहित नाही! ह्या म्हणीचा शब्दशः अर्थ म्हणजे "आधीच आळशी आणि त्यात फाल्गुन मास"!

.....तसं बघितलं तर फाल्गुन महिन्यात वसंत ऋतू आमच्या बंगल्याच्या अंगणातच दिसू लागायचा! आवारातल्या आंब्याला आलेला गच्च मोहोर आणि त्यात लपून बसलेल्या कोकिळेची साद....एकीकडे सरती थंडी आणि त्याचसोबत हलकेच जाणवत असलेला उन्हाळा! कदाचित तो येऊ घातलेला उन्हाळा आळशी करत असेल म्हणून ही म्हण प्रचलित झाली असेल....
      फाल्गुन महिन्यातला विशेष दिवस म्हणजे "होळी....आणि होळी म्हणजे "अग्नी" जो सर्व वाईट गोष्टी स्वतः मध्ये सामाऊन घेतो आणि त्याचा नाश करतो, असा एक समज आहे. 
     आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात वाईट अनुभव, मनस्ताप, गैरसमज किंवा ‌जाणूनबुजून केलेले अपमान असं बरंच काही असतं. पण आपण जसं वयानं मोठे होतो आणि आपलं अनुभवविश्व‌समृध्द होतं जातं तसं मग मागे वळून पाहताना जाणवतं की कधी कधी उगीचच आपण ताणून धरलं!!
      माझ्या बाबतीत मात्र मी ज्या संस्थांमध्ये मनापासून काम केलं त्या दोन्ही संस्थांच्या‌ बाबतीत कुठेतरी मनावर न कळत एक ओरखडा उमटला आहे. ज्ञानदीप मंडळं आणि त्याचा संघ अशी रचना असलेल्या ह्या संस्थेच्या डोंबिवलीतल्या अश्र्विनी संघाची ५ वर्ष अध्यक्ष म्हणून काम करताना खूप आनंद मिळाला माझ्या आधीच्या अध्यक्षा देखील माझ्या मैत्रिणींच असल्यामुळे ते सगळे दिवस भारावलेले होते. सगळ्याच जणी एका आत्मीयतेने काम करत होतो. माझ्या नंतर नव्या दमाच्या नव्या विचारांच्या टीमनं सुत्र हातात घेतली. खरं म्हणजे मला दूर राह्यला हवं होतं पण स्वभावाप्रमाणे त्यांना मदत करायला गेले आणि स्वतःचा अपमान करूंन घेतला. प्रत्येक निर्णयाची किंमत जी काही असते ती ज्याची त्यालाच चुकवावी लागते. ती मी चुकवली!! पण त्यावेळी भारती मोरे,परिणीता, गौरी ह्या मैत्रिणींनी मला समजून घेतलं, समजावलं आणि माझी बाजू आकाशानंदांपर्यंत पोचवली! आकाशानंदानी माझी बाजू ऐकून त्या मंडळींना चांगलीच समजही दिली. त्यावेळी भारतीनी दिलेल्या पाठिंब्यामुळे मला सगळं विसरण्यासाठी आणि पुढची वाट सुखकर होण्यासाठी मदतही झाली. त्याशिवाय त्या घटनेकडे तटस्थपणे पाहण्याची मॅच्युरिटी पण आता आलीय.
      इथं एक आठवण....आमच्या ज्ञानदीपच्या जेष्ठ कार्यकर्त्या कालिंदी तुळपुळे ह्यांचे यजमान मी अपमानाने दुखावली आहे‌ हे कळल्यावर आवर्जून माझ्या घरी आले आणि त्यांनी मला खूप समजावले. एखाद्या संस्थेत काम करताना त्या संस्थेच प्रेमानं जोडलेलं कुटुंब कसं बनत त्यांचं उत्तम उदाहरण!!
      ज्ञानदीप संघाशी संबंध संपले तरी माझं उन्मेष ज्ञानदीप मंडळ गेली ३५ वर्ष सुखेनैव सुरू आहे.‌ माझ्यासाठी आणि मंडळातल्या प्रत्येकीसाठी "उन्मेष" हे आमचं छानसं कुटुंब झालेलं आहे. त्याशिवाय ज्ञानदीप स्री‌ जागृती‌ मंचाच्या माध्यमातून एकल महिलांसाठी काम करणाऱ्या भारतीला जमेल तशी मदत करतेय. 
      ज्ञानदीप संघाच्या ह्या अनुभवातून जाताना मी सुवर्ण मंगल महिला सहकारी बँकेची संचालिका म्हणून काम करत होते. सहकारी बॅंक असल्यामुळे कामाचा व्याप भरपूर होता. ही बॅंक काढण्यासाठी धडपड करणाऱ्या मंगलाताई कुलकर्णी, सरलाताई जोशी कान्तवहिनी ह्यांच्या बरोबर काम करणाऱ्या अनेक महिलांमध्ये मी देखील होते. महत्‌प्रयत्नानी महिला बॅंकेला परवानगी मिळाली. ९२ साली बॅक सुरू झाली आणि पहिल्या संचालक मंडळात मी होते. पहिल्या दिवसांपासून "माझी बॅंक" अशा भावनेनं काम सुरू केलं. खरं म्हणजे गणित हा माझा‌ नावडता विषय पण जबाबदारी घ्यावी लागल्यावर मी मनापासून अभ्यास सुरू केला. १८ वर्ष बॅंकेच्या विविध पदांवर काम केलं.‌ एक निवडणूक लढायचा अनुभव पण घेतला आणि स्वतःला स्वतः साठी सिध्द केलं. चांगले-वाईट खूप अनुभव घेतले. माणसांच्या वेगवेगळ्या स्वभावाचे, रंग बदलण्याचे अगणित अनुभव घेतले. बॅंकेच कामं करताना स्त्रीयांची दु:ख जवळून पाहता आली. स्वतःच्या घरासाठी घडपड, मुलांची शिक्षणं, संसाराला हातभार, नवऱ्याच्या व्यसनांमुळे विस्कटलेले संसार असे असंख्य प्रश्न ह्या माध्यमातून सहकारी संचालिकांच्या मदतीनं सोडवायचा प्रयत्न केला. पण काही मंडळींच आयुष्य कब्बडीच्या खेळासारखं असतं" यशाच्या लाईनला हात लागतो‌ न् लागतो कोणीतरी पाय खेचतो! "आऊट" 
      ३ जानेवारी २०१० ला परिस्थितीनी पाय खेचले आणि बॅंक मर्ज करावी लागली. महिलांसाठी काम करण्याची संधी गमावली हा आयुष्यातला असह्य पराभव!!
      ह्यानंतर नक्की ठरवलं कोणत्याही संस्थेचं जबाबदारीचं पद घ्यायचं नाही. जे करायचं ते जमेल तेवढं एकट्यानं करायचं. ह्या परिस्थितीतुन बाहेर पडायला माझ्या नातवंडांच्या धमाल गमती-जमतींचा खूप उपयोग झाला. रिया आणि आदित्य दोघेही त्यावेळी ६/८ वर्षाचे होते त्यांची शाळा, मित्र-मैत्रिणी हे सगळं दोघेही माझ्याशी मोकळेपणानं शेअर करत असत त्यांना आजी हल्ली सतत घरात असते तेच खूप होतं.
      दु:खात पण समाधान शोधता आलं की जगणं कळलं असं म्हणायला हरकत नाही. 
      २०१२ मध्ये लोकप्रभेच्या कथा स्पर्धेत भाग घेतला आणि पहिला क्रमांक मिळाला. एकट्याने चालायचा रस्ता मिळाला होता. लिहू शकते हे कळल्यावर लिहीती झाले आणि गेल्याच वर्षी ५२ कथांचं पुस्तक प्रकाशित झालं!! 
     गेल्या वर्षी कोरोनामुळे आणि आयुष्यातल्या एका वेगळ्याच अनुभवाच्या वळणानंतर होळीच्या पवित्र अग्नीत मनातली दु:ख, पराभव, अपमान ह्या वर्षी टाकून द्यायचं ठरवलंय...आणि प्रत्येकानं असंच करावं म्हणून बहुतेक वर्षाच्या शेवटच्या महिन्यात ही होळी येत असावी. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मनातली जळमटं झटकून वसंतोत्सव साजरा करा असंच हा फाल्गुन महिना सांगत असावा...
         कोरोनामुळे आयुष्य जसं थांबून मोठ्या सुट्टीवर गेलं
          सगळ्यांबरोबर राहून एकान्ताचा शोध घेत राह्यलं.
                                   तेव्हा
          आलेला फाल्गुन, पंचमीचे रंग, विसरवतील सारं
                                  आणि
           उन्हाचा केशरी-पिवळा,चांदण्याचा शुभ्र- धवल...
          पानगळीचा तपकिरी-करडा, फुललेलं वसंतवैभव...
                                  म्हणूनच
      रंगाच्या उधळणीला ऋतुचक्रातील शिशीराच्या शेवटाकडून चैत्राच्या आरंभाकडे नेणार्‍या फाल्गूनाचं सगळंच स्वागतार्ह आणि न्यारं!!
   

 


                                फाल्गुन शुद्ध प्रतिपदा
                                    ता. १४.३.२०२१
                                      ललिता छेडा

Saturday, February 27, 2021

प्रत्येकीच्या मनातली *रोझी*

 गाईड सिनेमा प्रदर्शित झाला ६ फेब्रुवारी १९६५ ह्या वर्षी! त्यावेळी माझं वय होतं चौदा वर्षांचं! प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या पंधरा दिवसांनी आम्ही बहिणींनी कोहिनूर टाॅकीजला तो पाहिला. सिनेमा तितकासा कळला नाही पण कुठेतरी वहिदाचे डान्स कितीतरी दिवस मनात रुंजी घालत होते. त्यात सुध्दा मला आठवत राहिलं ते सपेर्‍यांच्या वस्तीवर वहिदाजींनी केलेलं नाग नृत्य! मला आठवतंय त्यावेळी मी ज्याला त्याला त्या ‌नृत्याबद्दलच सांगत होते.‌

कुठेतरी आपली कला आणि त्या कलेवरचं प्रेम नाचातल्या‌ विविध‌ मुद्रांनी सांगणारी रोझी आणि ती साकारणारी वहिदा....मनावर गारूड करून गेली! ते गारूड अजूनही तितकंच आणि तेवढंच आहे.
त्यानंतर काॅलेजला गेल्यावर मॅटिनीला गाईड वेगवेगळ्या गृप बरोबर अनेकदा बघितला. प्रत्येक वेळी तो नव्यानं उलगडत होता.
ह्या सिनेमाचं वैशिष्ट्य म्हणजे वहिदाजींच्या प्रत्येक नृत्यातूनच हा सिनेमा पूढे जात रहातो.आणि प्रत्येक नृत्यातून रोझी आपल्याला कळत जाते.
"आज फिर जीने की तमन्ना है, आज फिर मरने का इरादा है.... हे शब्द शैलेंद्रजीना विजय आनंद नी सिच्युएशन सांगितल्या बरोबर सुचले आहेत असं म्हणतात. अगदी कमी शब्दात रोझीची मनस्थिती सांगणारं हे गाणं आणि त्या गाण्याच्या सुरांशी जुळलेल्या अनेक स्त्रीयांची बंधमुक्तता...अत्यानंदानं चितोडच्या विजयस्तंभावर‌ बेभान नाचणारी रोझी..शुटींग करणं नक्कीच कठीण होतं पण ते साहस मुक्त स्त्रीमध्येच येवू शकतं. अशी प्रत्येकीच्या मनातली मनमुक्ता रोझी.....
ह्या सिनेमाची कथा फ्लॅशबॅकनी उलगडते. "स्वामी" म्हणून जगणार्‍या राजू गाईडचा भूतकाळ उलगडतो तो रोझी आणि राजूची आई तो सुटणार म्हणून जेलमध्ये त्याला घ्यायला एकत्र आल्या असताना त्याची आठ दिवस आधीच सुटका झाली असं त्यांना कळतं आणि रोझी राजूच्या आईला आपली कहाणी सांगते आणि कथा उलगडत जाते.त्या दोघींच्या संवादात रोझी " राजू वरच्या प्रेमासाठी मी कोर्टात खोटं का बोलले नाही? असं स्वतःला विचारते.हा प्रश्न अनेकदा माझ्याही मनात आला आणि अनेकांनी त्यावर लिहिलेलंही वाचलंय. पण मनाला जास्त भावते,पटते प्रामाणिक रोझी....
रोझी कडे पत्नीपेक्षा भोग्य वस्तू म्हणून पहाणाऱ्या ‌मार्कोनी तिच्या सहजीवनाचा आनंद हिरावून घेतलाय. आणि त्यामुळेच रोझी मार्कोला गुंफेत भेटायला जाऊन जे काही ऐकवते तो संपूर्ण संवाद अनेक‌ स्त्रीयांसाठी त्यांच्या मनातले विचार आहेत. ती मार्कोला‌ म्हणते" लग्न करून आईचं घर सोडताना वाटलं की ‌पतिच्या घरी जाईन पण माहित नव्हतं की तिथं घरपण नसेल आणि पतिपण नसेल! ती ओरडून सांगते " मार्को मैं जीना चाहती हूं।
नवऱ्यानं केलेल्या अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवणारी रोझी...
त्यानंतर बेसहारा, असहाय्य होऊन ती राजू कडे येते. राजूनी दिलेल्या प्रतिसादानंतर ती त्याच्या बरोबर रहायला तयार होते. आणि म्हणूनच "तेरे मेरे सपने" हे गाणं संपूर्ण सिनेमा व्यापून रहातं‌ आणि लक्षात रहाते त्या शब्दांवर आयुष्य उधळणारी रोझी....
त्यांच लग्नाशिवाय रहाणं त्याकाळी जरी स्वीकार करणं कठीण होतं तरी सगळ्या जगाच्या विरुद्ध जाऊन राजू रोझीला"नलिनी" ह्या नावानं प्रसिद्ध ‌नर्तकी बनवतो. राजूच्या प्रेमात आकंठ बुडालेली रोझी....
प्रेमात संपूर्ण समर्पित होऊन " पिया तोसे नैना लागी रे" म्हणत ती सर्वांना मोहवून टाकते. आपल्या प्रियकराच्या प्रेमातल्या प्रत्येकीच्या मनात ते गाणं आपलं म्हणून रूंजी घालायला लावणारी ‌रोझी....
सगळी दुखः विसरून नव्यानं जगताना "बदले दुनिया सारी तुम ना बदलना"" असं म्हणत गाणारी ‌रोझी....
खरं म्हणजे नवर्‍यापूढे हतबल झालेली ती राजूला मनापासून‌ प्रतिसाद देते.‌ तोही तिला पैसा-प्रसिध्दी मिळवून देतो. पण तोच पैसा पुन्हा एकदा त्यांच्या सहजीवनाचा आनंद हिरावून घेतो. आणि पुन्हा एकदा ती‌ फसवली जाते. एका प्रतिभावान स्त्रीचा आक्रोश म्हणजे " सैंया बेइमान"
बॅक टू बॅक एकाच रागातील दोन गाणी!! "क्या से क्या हो गया... ह्या गाण्यातला मागचा कोरस म्हणजे जणू रोझीचा आक्रोशच असावा असं वाटत‌ रहातं. फसवणूक झालेल्या प्रत्येकाची रोझी....
आणि मग शेवटच्या अर्ध्या तासात सिनेमात जे घडत ते प्रत्येकाचा ‌स्वतंत्र घेण्याचा अनुभव असतो. राजूचा अध:पतनापासून उन्नतीकडे जाण्याचा प्रवास सांगणारी त्याची स्वगतं! सिनेमा आध्यात्मिक उंचीवर नेऊन ठेवण्यात त्या स्वगतांचे लेखन करणारे दिग्दर्शक विजय आनंद यशस्वी झाले आहेत.
पण तितकीच ‌लक्षात रहाते राजूला ‌भेटण्यासाठी वाळवंटातून, उन्हात दागिने काढत चालणारी विरक्त रोझी....
मला माहित आहे गाईड सिनेमा हा फक्त रोझीचा नाही तर राजूचा देखील आहे.आणि महत्त्वाचं म्हणजे दिग्दर्शक, पटकथाकार विजय आनंद ह्यांचा आहे, संगीतकार सचिन देव बर्मन ह्यांचा आहे, गीतकार शैलेंद्र ह्यांचा आहे, कॅमेरामन, कोरिओग्राफर ह्या प्रत्येकाचा आहे. देव आनंद, वहिदाचा तर आहेच आहे. त्यामुळे "गाइड" ह्या मास्टरपीस बद्दल लिहीण्याचं साहस मी केलंच नाही....
फक्त आजूबाजूला दिसणाऱ्या रोझींसाठी ह्या कॅरेक्टरच्या माध्यमातून जाणवलेलं लिहीण्याचा हा प्रयत्न केला!
प्रत्येकीच्या जगण्यातली रोझी.....
माघ पौर्णिमा

ता. २७.२.२०२१
ललिता छेडा.

Friday, February 12, 2021

पानगळीचा माघ

        आम्ही रहात होतो त्या बंगल्याच्या आवारात माघाच्या थंडीत खूप वाळलेली पानं पडलेली असायची. ती झाडणं हे सकाळ-संध्याकाळ एक कामच असायचं. सकाळी अंगण झाडणार्‍या मावशी इतकं छान बोलायच्या "अहो ताई, पानं गळली म्हणजे आता पुन्हा झाडं बहरणार! जुनं गेल्याशिवाय नवं कसं येणार? आणि मग बाजूला बहरलेला‌ चाफा दाखवून म्हणायच्या" बघा इतकी पानं गळली आहेत पण‌ हा कसा बहरलाय...त्या बोलताना मनात यायचं "चांगल्या विचारांसाठी शिक्षणाची‌ गरज नसतेच फक्त मन शुद्ध असायला हवं"

        ह्या दिवसात आलेला आंब्याचा मोहोर पानगळीला विसरवतो. मोहरलेलं आंब्याचं झाड सोन्याचा मुकुट घातलेल्या राजासारखा दिसतं. पानगळ झाली की ‌पक्षांची रिकामी घरटी दिसायला लागतात आणि थोड्याच दिवसानंतर पक्षांची घरट्यांसाठी‌ जागा शोधायची लगबग सुरू होते आणि ही लगबग आंब्याच्या झाडावर हमखास पाहायला मिळते.

        तसं बघितलं तर निसर्ग आणि आपलं आयुष्य ह्यात खूप साम्य आहे. पण निसर्गाकडे असलेलं सकारात्मकतेच देणं आपल्या विचारांत कमी प्रमाणात असल्यामुळे काही मंडळी पानगळ अर्थात वृध्दत्व आनंदी मनस्थितीत स्वीकारत नाहीत. सृष्टीच्या ह्या नियमाबद्दल एका कवीनं खूप छान लिहिलंय..

     पीक बहरात आलं की सर्वच पक्षी                                            गाणी गातात..
     सुखाचे सारे सोबती, दु:खाचा वाली                                         कोणीच नसतो..
    आपलं आपणच जडाव पुन्हा बहरावं                                              नव्या जोमानं
    पानगळी नंतर वसंताचा बहर हमखास                                                    असतो..

       माझ्या साठी माघ महिन्यातली खास आठवण म्हणजे माघी चतुर्थीला "माध्यम" संस्थेची स्थापना झाली. वैशाली ओकनी मीना गोडखिंडी, ज्योती पाटकर, जयश्री करमरकर, इंदू देढिया आणि मी अशा आम्हा पांचजणींना घेऊन ह्या संस्थेची स्थापना केली होती. ह्या मागची प्रेरणा पद्मजा वानखेडे ह्यांची होती. वैशालीच्या त्यांच्याशी झालेल्या ओळखीतून त्यांनी डोंबिवलीत प्रदर्शन भरवावीत असा सल्ला दिला आणि माघी चतुर्थीला आम्ही महिलांच्या वस्तूना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रदर्शनं भरवणं, महिलांना व्यवसाय मार्गदर्शन करणं अशा उद्देशाने संस्था स्थापन केली. आमचं पहिलं प्रदर्शन डोंबिवलीत शुभमंगल कार्यालयात आयोजित केलं होतं आणि आशालता वाबगावकर‌ ह्यांच्या हस्ते ह्या प्रदर्शनाचे उद् घाटन झालं होतं. इतक्या मोठ्या अभिनेत्री असून सुध्दा त्या प्रदर्शनात इतक्या मोकळेपणानं वावरल्या आणि प्रत्येक महिला व्यावसायिकेशी बोलून तिची धडपड त्यांनी आस्थेनं जाणून घेतली. माध्यममुळे आमच्या खूप प्रसिद्ध व्यक्तींशी ओळखी झाल्या. त्या प्रदर्शनाला खूप छान प्रतिसाद मिळाला कारण त्यावेळी हल्ली सारखी प्रदर्शनं भरवली जात नव्हती. ही कल्पना नवीनच होती. 

        डोंबिवलीतल्या २/३ प्रदर्शनानंतर आम्ही हिम्मत करून ‌मुलुंडला प्रदर्शन लावलं. शेवटच्या दोन दिवसांपर्यंत एकही स्टाॅल बुक झाला नव्हता. हताश होऊन आम्ही सहाजणी ‌हाॅलवर येऊन प्रदर्शन रद्द करायचा विचार करत होतो!! इतक्यात तिथं दोन बायका येऊन स्टाॅलची चौकशी करू लागल्या. आमच्याशी चर्चा करून त्यांनी चार स्टाॅल बुक केले. तेव्हा दुपारचे अडीच वाजले होते. त्यानंतर त्या दोघींनी अनेकजणींना फोन केले. हाॅलच्या मालकांनी पण काही नावं दिली. आम्ही आजूबाजूच्या दुकानदारांशी बोललो आणि "अहो आश्चर्यम्" प्रदर्शनाच्या दिवशी आमचे ४२ स्टाॅल‌ बुक झाले होते. हा आम्ही सहाजणींनी सामाजिक जाणीवेसोबत व्यवसायही करायचा असं ठरवलं असल्याने ज्या मुलुंडला आम्ही तोट्याची तयारी केली होती त्यानी आम्हाला सर्वात मोठा फायदा करून दिला. माध्यम आणि प्रदर्शनं हे आम्हा सहाजणींसाठी खूप आनंददायी अनुभव देवून गेले. आता वैशाली आणि ज्योती दोघीही ह्या जगात नाहीत पण त्यांच्याबरोबरच्या प्रदर्शनातल्या‌ धमाल आठवणीं काढल्या की त्या आमच्यात आहेतच असं वाटत रहातं. ह्या प्रदर्शनातून मिळालेल्या पैशातून मी भारी कॅमेरा घेतला. जो घ्यावा अशी माझी खूप इच्छा होती. माझ्या कमावलेल्या पैशांनी मी घेतलेली एकमेव वस्तू!!

        मागे‌ वळून बघताना जाणवतं की आठवणींची, नात्यांची, मैत्रीची खूप पानगळ झाली आहे. पण पुन्हा पुन्हा बहरत रहाण्याचा स्वभाव ठेवला तर नवीन नाती, नवीन आठवणी मनात साठवायला सुरवात‌ होते.

     वृक्षांची थांबते सळसळ, होता पानांची पानगळ
     माहित असते तरीही येते मनाला मरगळ
     अशावेळी उभारी देतो मनाला मोहोराचा दरवळ
     कारण आत कुठेतरी रूजत असते कोवळी हिरवळ

      म्हणूनच माघातली पानगळ बरंच काही शिकवून जाते असं वाटतं. खास करून मी आता आयुष्याच्या ज्या वळणावर आहे तिथं पानगळीचं दु:ख न करता स्वतःला जुन्या गोष्टींमध्ये जखडून न ठेवता नवं जगणं समजून तरीही स्वतः साठी आपला आपणच आयुष्यात वसंत फुलवावा असं वाटतंय.

       म्हणूनच पानगळीच्या पानांसाठी असं म्हणावं वाटतंय की....

        पांव सुखे पत्तों पर अदब से रखना।
        धूप में मांगी थी तुमने पनाह इनसे कभी।

                          माघ शुद्ध प्रतिपदा
                           ता. १२.२.२०२०
                             ललिता छेडा
  
      






Thursday, January 28, 2021

मुलगी म्हणून जगताना...वेगळ्या वाटेनं जाताना...

      जानेवारीतला राष्ट्रीय "कन्या दिन" साजरा होत असताना मनांत आलं की मुलगी म्हणून हक्काइतकीच जबाबदारीही महत्वाची असते..

      मी आई-वडीलांची एकुलती एक लेक! माझा जन्म जरी गिरगावात झाला असला तरी माझा लहानपणापासून लग्नापर्यंतचा काळ परळसारख्या गिरणगावात गेला. परळसारख्या मुंबईतल्या मध्यवर्ती ठिकाणी रहात असल्यामुळे पाहूण्यांची वर्दळ खूप असायची.‌ पण आमच्या तिघांच वेगळं विश्व होतंच. आई-दादांसाठी त्यांची एकुलती एक लेक म्हणजे त्यांच्या जगण्याचं मुख्य कारण होतं. दादांची कडक शिस्त आणि आईचा सर्वांसाठी धावून धावून करण्याचा स्वभाव माझ्यासाठी नेहमीच आदर्श ठरले आहेत.
       माझं लग्न दोघांसाठी मनाविरुद्ध झालं असलं तरी नंतर त्यांनी ते मनापासून स्वीकारलं आणि त्यामुळेच मी लग्नानंतर डोंबिवलीला रहायला आल्यावर ते देखील डोंबिवलीत रहायला आले. नशीबानं माझ्या स्वतःच्या बिल्डींगमध्येच तळमजल्यावर त्यांना जागा मिळाली. थोडे दिवस बरे गेले पण अचानक दादांना पॅरॅलिसीस् चा अॅटॅक आला. त्यावेळी जाणवलं की माझ्या जवळ त्या दोघांना घर मिळणं किती आवश्यक होतं. आईच्या मदतीला माझे मामा कधी माझा आतेभाऊ श्रीकांत रहायला येत होते आणि महत्वाचं म्हणजे दादांच्या आजारपणात माझ्या नवर्‍यानं जावयापेक्षा सुध्दा जास्त मुलासारखं लक्ष घातलं. आजारपणामुळे जवळजवळ चार वर्षे ते बिछान्यावर पडून होते. श्रीकांत त्यावेळी फलटणला रहात होता. त्याच्या कामा निमित्ताने त्याची महिन्यातून एखादी फेरी डोंबिवलीला होत असे. एकदा सहज बोलता बोलता दादा त्याला म्हणाले "मुलगा नसल्याने माझे शेवटचे विधी तूच कर! आम्ही सगळ्यांनी ते हसण्यावारी नेलं. पण ह्या विषयांचं गांभीर्य ‌तेव्हा कळलं नाही!
      दादांच निधन १६एप्रिल रामनवमीच्या दिवशी झालं. रामाचे ते‌ परम भक्त असल्यामुळे रामजन्माचा सुंठवडा त्यांच्या तोंडात घातला आणि त्यांनी प्राण सोडले.
       त्यानंतर आम्ही फोन लावायला सुरुवात केली. तर एकही फोन लागेना. चौकशी केल्यावर कळलं महानगर टेलिफोन निगमच्या कामकाजात मोठा बिघाड झाल्याने संपूर्ण टेलिफोन व्यवस्था काही काळासाठी बंद राहील.
       "काय करायचं"? अशी आमची हळू आवाजात चर्चा सुरू असताना आई मला बोलवतेय असा निरोप मिळाला. मी लगबगीने तिच्या जवळ गेले तर "कसला विचार करता आहात मला माहित आहे, पण लक्षात ठेव तुझ्या दादांना अग्नी जावईच देणार. गेली चार वर्ष ‌ते मुलापेक्षा जास्त त्यांचं करत आहेत. "दु:ख बाजूला ठेवून तिनं निर्धारानं मला सांगितलं. तेवढ्यात मागून कोणीतरी म्हणालं" ते गुजराथी आहेत, गोत्र? आईनं त्या बाईंकडे नुसतं बघितलं आणि विषय संपला! पण माझ्यासाठी विषय मनात सुरू झाला होता. आईनं दिलेला निर्णय योग्यच होता पण माझ्या मनात आलं "माझ्या आई-वडिलांचे हे विधी मीच करायला हवेत....
       त्यानंतर माझी जवळची मैत्रीण वैशाली ओक हिच्याजवळ मी हे विचार बोलून दाखवले. तिनंही माझ्या विचारांना दुजोरा दिला आणि त्या काळात आम्ही ज्ञानदीपच्या माध्यमातून काम करत होतो. ती म्हणाली"आपण ह्या विषयावर चर्चा घेऊ या. आज ती नाही पण लिहीताना तिची आठवण झाली.
       दादांना अग्नी आईच्या जावयाने अर्थात माझ्या नवर्‍यानं दिला आणि नंतरचे सर्व १२/१३व्याचे विधी श्रीकांतने केले. हा निर्णयही अर्थात आईचाच होता.‌ स्वभावाने अगदी साधी असलेल्या माझ्या आईनं खंबीरपणे घेतलेला‌ निर्णय आठवला की मला नेहमी भरून येतं.
मी आईची पंचाहत्तरी ज्यादिवशी केली त्याच रात्री ती पडली. ‌त्या पडण्यामुळे तिचा डावा हात आणि कंबर दुखावले. पडण्याचं निमित्त झालं आणि हळूहळू ह्या आजारपणात ती बेडरिडन झाली. तिच्या ह्या आजारपणात तिच्या मैत्रिणी, आमच्या बिल्डिंगच्या दाराशी असलेले इस्त्रीवाले दोन्ही भाऊ ह्यांनी तिची खूप सेवा केली. ह्या सगळ्यांची मला खूप मदत होत होती.
       २७ आॅक्टोबरला भाऊबीजेच्या दिवशी ती गेली. मी ठरवलं होतं त्याप्रमाणे सर्वांना सांगितलं की"‌ माझ्या आईला अग्नी मी देणार! कृपा करून कोणीही मला परावृत्त करण्याचा प्रयत्न करु नका. उगीच अपमान होईल. तरीसुद्धा आमचे अगदी जवळचे नातेवाईक येऊन मला म्हणाले "हे धर्माच्या विरुद्ध आहे. तुम्ही हे करू नका" मी त्यांच्या समोरच हे विधी करणार्‍या भालके गुरुजींना फोन लावला आणि मी अग्नी देणार आहे हे सांगितलं. त्यांनी देखील" धर्मशास्त्रात मुलींना ह्यासाठी परवानगी असल्याचं उदाहरणासहित सांगितलं.
       इथं एक वेगळा प्रसंग सांगावासा वाटतो" मी स्मशानात जायला निघाल्यावर अनेकजणी माझ्या बरोबर यायला निघाल्या. वैशाली तर सतत माझा हात धरून होती. माझ्या मागे उभे असलेले एकजण आपल्या बायकोला स्मशानात येऊ नकोस असं सारखं म्हणत होते. ती काही ऐकत नव्हती शेवटी त्यांनी रागाने" हे‌ बघ मला तू तिथं आलेली अजिबात आवडणार नाही आणि चालणार नाही असं निर्वाणीचं रागाने सांगितलं. त्यांच्या बायकोने शांतपणे" गेल्या तीस वर्षात मला न आवडणार्‍या आणि न चालणाऱ्या अनेक गोष्टी तुम्ही केल्या आहेत. आज मी करून बघणार" असं उत्तर दिलं आणि त्या शेवटपर्यंत माझ्याबरोबर होत्या. त्यांच्या यजमानांनी दुसऱ्या दिवशी येऊन माझी माफी मागितली कारण त्यांचा‌ संवाद मी ऐकला होता ‌ह्याची त्यांना पूर्ण कल्पना होती.
       माझ्या मैत्रिणी त्या प्रसंगात सतत माझ्या बरोबर होत्या. स्मशानात मंत्राग्नी देताना सारखं भरून येत होतं पण भीती मात्र क्षणभरही वाटली नाही. तिसऱ्या दिवशीच्या स्मशानात जाऊन अस्थी सावडण्यापासून तेराव्या पर्यंतचे सर्व विधी पार पडले त्यात भालके गुरुजींचा मोठा वाटा आहे. त्यांनी प्रत्येक विधी मला समजावून सांगितले.
      श्रध्दा आणि अंधश्रद्धा ह्यातली‌ अस्पष्ट रेषा दाखवणारा प्रसंग म्हणजे दहाव्या दिवशी कावळा अजिबात पिंडाला शिवत नव्हता. आईच्या ‌मैत्रिणीनी 'रजनी'नं सुचवल्याप्रमाणे इस्त्रीवाल्या दोन्ही भावांना मी बघेन असं मी म्हटल्यावर लगेच कावळ्यानी चोच मारली होती....
       त्यानंतर माझी मैत्रिण मीना गोडखिंडी हिने लोकसत्तेच्या चतुरंग पुरवणीत माझ्या ‌ह्या अनुभवांबद्दल लेख ‌लिहीला. त्यानंतर अनेकजणींनी मला फोन करून ह्यासाठी कौतुक केलं तसंच अनेकींनी आम्हाला एकुलत्या एक असल्याने तुमच्यामुळे असं करण्यासाठी ‌प्रेरणा आणि धाडस मिळालं असंही सांगितलं.
      महत्त्वाचं म्हणजे हा लेख वाचून जेष्ठ रंगकर्मी सुलभा देशपांडे यांनी लोकसत्तामध्ये पत्र लिहीलं आणि माझ्या नावासहित हे धाडस केल्याबद्दल कौतुक केलं. मुलगी म्हणून ही जबाबदारी घ्यावी आणि त्याला समाजानं स्वीकृती द्यायला हवी‌ असं त्यांनी आवर्जून लिहिलं होतं.
       मी काही जगावेगळं केलं असं मला अजिबात वाटत नाही पण हे धर्मसंम्मत आहे आणि कोणत्याही अंधश्रद्धेला न‌ बळी पडता हे विधी मुली करू शकतात हे सगळ्यांच्याच मनात रूजलं पाहिजे.
      एकुलती एक असल्याने स्मशानातुन आल्यावर आईची रिकामी काॅट‌ बघून मात्र मला आपलं माहेर संपलं ही जाणीव झाली.....


‌                               पौष पौर्णिमा
                            ता. २८.१.२०२१
                               ललिता छेडा.

Thursday, January 14, 2021

संक्रमित पौष...

     पौष महिन्यात सुर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि आपली पृथ्वीकडची‌ परिभ्रमणाची दिशा बदलतो, अगदी सहजपणे उत्तरेकडे सरकत‌ तो संक्रमित होतो. म्हणूनच पौषातलं हे संक्रमण मकर संक्रांत म्हणूनही आपल्या सर्वांना परिचित आहे. ह्याकाळाला 'उत्तरायणही' म्हटलं जातं. ह्या वर्षी मात्र हे संक्रमण सांस्कृतिक इतकंच सामाजिक जाणीव जपण्याचा संदेश देणारं ठरलंय.

       ह्या महिन्यात थंडीचा कडाका चांगलाच जाणवत असतो. दिवसही हळूहळू मोठे होऊ लागतात. हेमंत ऋतूची अखेरही ह्याच महिन्यांत होऊ लागते. 

       ह्या दिवसातला प्रवास धुक्यात हरवली वाटचा अनुभव देतो. 

      माझ्या आठवणीतला असा धुक्यातला प्रवास म्हणजे शिर्डीहून शनिशिंगणापूर करून आम्ही मालशेज घाटातून परतत होतो आणि घाटात धुकं पसरलं होतं. अंधार अगदी गच्च होता. अगदी नशीबानं आमच्या गाडी पुढे जाणार्‍या गाडीच्या मागच्या दिव्यांच्या प्रकाशात आमची गाडी हळूहळू नेत होतो. त्यावेळी छोट्याश्या दिव्यांचं महत्व कळत होतं. अचानक पूढची गाडी थांबली आणि आमच्या हृदयाचा ठोका चुकला. उजव्या बाजूला डोंगरकडे आणि डाव्या बाजूला खोल‌ दरी असल्याचं जाणवत होतं. इतक्यात ड्रायव्हर साईडचा दरवाजा उघडून एक माणूस उतरला. दुसऱ्या दिवशी संक्रांत असल्यामुळे खूप थंडी होती. अशा थंडीत हा माणूस गाडीतून उतरून आमच्या दिशेने येत होता आम्ही जाम घाबरलो. पुढच्या गाडीत कोण असेल? अशी चर्चा सुरू झाली. काचा उघडू नका वगैरे सुचना सुरू झाल्या!! पण त्या माणसानं ड्रायव्हरच्या काचेवर टकटक केलं. काच उघडावीच लागली. "गाडी समोर दोन साप आडवे आले आहेत. म्हणून थांबलोय गाडीच्या दिव्यांच्या प्रकाशात नशीबानं दिसले म्हणून आम्ही थांबलोय त्यांना ओलांडणे शक्य नाही" त्या माणसानं खुलासा केला. दहा मिनीटे गेली आणि पुढची गाडी सुरू झाली. किर्र अंधारातला हा अविस्मरणीय अनुभव!!

        घाट उतरल्यावर रस्त्यावरचा दिवा 
        चहाची टपरी, पौषातला हवेतला गारवा
        आणि त्या टपरीवर आमची वाट बघणारी 
        पुढच्या गाडीतली माणसं...

      पौषातला‌ महत्वाचा दिवस म्हणजे 'मकर संक्रांत' आणि संक्रांतीच्या आदल्या दिवशी उत्तर प्रदेशात "लोहरी" नावाचा उत्सव साजरा होतो. भारतातील विविध प्रांतात संक्रांतीची विविधता आढळून येते. तामिळनाडू मध्ये हा सण "पोंगल" म्हणून साजरा होतो. तर आसाममध्ये "बिहू" हे सगळेच सण‌ शेती आणि शेतकऱ्यांशी‌ निगडीत आहेत.

      माहेरी आमच्या घरी आई भोगीची भाजी खूपच मस्त बनवायची आणि गुळपोळी! दोन दिवस चंगळ असायची. महत्वाचे तिळगुळ लाडू, जे मला खूप आवडतात, त्यामुळे आई माझ्यासाठी मोजून वाटीत काढून ठेवायची. आमच्या घरच्या हळदीकुंकवाच्या समारंभाला आई तिळाच्या वड्या करायची त्या तर माझ्यापासून लपवायला आईला कुलपात ठेवायला लागायच्या.

      लग्नानंतर भोगीच्या भाजी इतक्याच आवडीनें ह्या दिवसात बनवला जाणारा सर्व भाज्यांचा "उंधियु" करायला शिकले.

      मैत्रिणींमुळे शाकंभरी नवरात्र कळली आणि साठ तऱ्हेच्या भाज्यांचा नेवैद्य असणारी शाकंभरी पौर्णिमा जी पुन्हा भूमी आणि शेतीशी निगडितच आहे हे कळलं. ती भाजी खाल्ल्यावर ती शिकावी असं वाटलं.

     ज्ञानदीप परिवारानं हळदीकुंकू ऐवजी ‌सर्व महिलांचा समावेश व्हायला हवा असा "तिळगुळ समारंभ" करायला शिकवलं.

      शेतात पिकलेल्या भाज्यांचे प्रकार 
      सजलेल्या सुगडांची देवाण घेवाण
      तिळगुळ देऊन गोड स्नेहानं बोलणं
      नाजूक हातांनी केलेले हलव्याचे दागिने
      घालून ती नटलेली‌ साजरी नवी नवरी,
      बोरन्हाणाला सज्ज छोटे कृष्ण-राधा
      हलव्याचा मुकुट अन् हलव्याची बासरी, 
      उबदार गर्भरेशमी चंद्रकळा काळी...
      पतंगाचे रंग विविध, निळ्या केशरी आभाळी
  ‌    संक्रांतीची प्रत्येक गोष्ट कशी आनंद देणारी!
      म्हणूनच कवी कालिदासानी वर्णन                    केल्याप्रमाणे...

      "सुंदर ललनांना रिझवणारा, धनधान्याची‌ रेलचेल करून शेतकऱ्यांना सुखावणारा, क्रौंच पक्ष्यांच्या माळांनी उल्हसित करणारा,हेमंत ऋतूचा सुखद अनुभव देणारा..... 

      असा हा मनाला, शरीराला संक्रमित करून आनंदित करणारा पौष!

         

                         पौष शुद्ध प्रतिपदा
                          ता. १४.१.२०२१
                            ललिता छेडा

 

      

      

         

                  

Tuesday, December 29, 2020

नवे वर्ष, नवे संकल्प...

         सगळ्या जगाच्या जगण्यात बदल करून अनेक प्रश्न निर्माण करून २०२० हे वर्ष संपेल. त्याबरोबर एक दशक ही संपेल. कोणत्याही क्षणाला, दिवसाला अगदी वर्षाला सुध्दा लांबी रुंदी मिळते ती त्यावेळी आलेल्या अनुभवांच्या आधारावर!! आणि सरत्या वर्षाने कुठुनतरी निर्माण झालेल्या सुक्ष्म जीवाणूंनी निसर्गाचे अफाट सामर्थ्य आणि अहंकारी माणसाला आपल्या क्षुद्रपणाची जाणीव करून दिली आहे. 

       कितीतरी आपल्या जवळचे, नात्यातले, नामवंत चेहरे आपल्या आठवणीत राहून आयुष्यातुन‌ वजा झाले आहेत. ह्या वर्षात आपण शिकलो की पैशांनी हवं ते विकत घेता येत पण आॅक्सिजन विकत घेता येत नाही आणि साधं सोपं सरळ आयुष्य जगणंच खरं जगणं आहे. सगळ्या अडथळ्यांच्या शर्यतीतून आपण ह्या अवघड वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात आलो आहे आणि ३१डिसेंबरच्या रात्री नंतर उगवणार्‍या आशेच्या सोनेरी सकाळची आपण आतुरतेने वाट पहात आहोत.

       ३१ डिसेंबरची रात्र नेहमीच उद्या सकाळी नवं वर्ष नवा संकल्प! अशा विचारात जाते. डायटिंगसाठी आवडते आणि वजन वाढवणारे पदार्थ सोडायचे, सकाळी चालायला जायचं, डायरी लिहायला सुरुवात करायची, घरातली कामं वेळच्या वेळी रोज करायची असे अनेक संकल्प जे कमीत कमी दोन दिवस आणि जास्तीतजास्त एक महिना चालू शकतात. ह्या वर्षी मात्र सर्वसाधारण पूर्ण-अपूर्ण संकल्पांचे संदर्भच बदलून गेले आहेत.

      रोजच्या धावपळीच्या जीवनात कोरोनामुळे अचानक थांबावं लागलं आणि त्या काळात जाणवलं की आपलं स्वतःसाठी जगणं राहूनच गेलं आहे!! 

      त्यासाठीच नवीन वर्षाच्या सुरुवातीला संकल्प करूया की स्पर्धेच्या युगात आपण आपले छंद, आवड ह्याकडे ही लक्ष देऊया.

      अचानक घरकाम करणाऱ्या महिला कामाला यायच्या बंद झाल्या आणि घरातली कामं वाटून घ्यावी लागली. आता मात्र नवीन वर्षाच्या सुरुवातीला मुलगा मुलगी असा भेद न करता प्रत्येकानं घरकाम, स्वैपाक शिकून घ्यायचा संकल्प करायलाच हवा.

       ह्या काळात एकटे रहाणारे जेष्ठ नागरिक, आजारी मंडळी ‌ह्यांना मदतीची खूप गरज भासली. ह्या वर्षात आपण अशा गरजूंना लागणारी मदत करून माणूसकीची नाती जोडणं शक्य आहे. व्यावहारिक संबंधांपलिकडे जाऊन अशी मदत केली तर आपल्या मनाला भावनिक आनंद नक्कीच मिळेल. शेवटी असे नातेसंबंध आपल्या जगण्यावरचा विश्वास दृढ करतात. तेव्हा अनोळखी असले तरी गरजू लोकांना मदत हा संकल्प नवीन वर्षासाठी होऊ शकतो.

      कोरोनाच्या काळात नोकरी करणं हे सर्वात सुरक्षित असं जे समजलं जातं होतं ह्या संकल्पनेला छेद मिळाला आणि अनेक घरगुती व्यवसाय सुरू झाले. आमच्या गल्लीत दोन इंजिनिअर मुलं सकाळच्या वेळ ताजी फळं, भाज्या विकताना दिसली. आपली आवड जाणून घेऊन एखाद्या व्यवसायाचं ज्ञान घेण्याचा संकल्प करायला काहीच हरकत नाही.

      सर्वात महत्त्वाचं म्हणजे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी करायचा संकल्प! जगण्यासाठी आवश्यक असलेला प्राणवायू म्हणजे झाड, वृक्ष आहे. ज्यांचा भरमसाठ नाश आपण केला आहे. तेव्हा सर्वांनी वृक्षारोपणाचा संकल्प करायला हवाय.‌ कारण ह्या कमी प्रदुषण काळात सर्वांनीच पृथ्वीचे प्रेमगीत अनुभवलय. स्वच्छ नद्याचं वाहणं, प्रदुषणमुक्त हवेमुळे शहरांतून दिसणारी हिमशिखरे हे सर्व नक्कीच आनंददायी होत. तेव्हा कचर्‍याची योग्य व्यवस्था, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेचे नियम पाळणे, एखादं तरी झाड लावायचं, ह्या अगदी साध्यासुध्या संकल्पांमुळे स्वतः आणि समाज म्हणून आपली जबाबदारी निश्चित पार पाडता येईल.

       अनेक प्रकारांनी मी ३१ डिसेंबर साजरा केला आहे. मोठ्या हाॅटेलातल्या पार्ट्या बघितल्या आहेत. घरी मित्र-मैत्रिणींना बोलावून खूप धमाल केली आहे. पण ‌ह्यावेळी मात्र कुठे तरी आयुष्यातली असुरक्षितता व्याकूळ करून जातेय. ह्या असुरक्षिततेची लढाई आपल्या सर्वांना द्यायची आहे. एकत्रित येऊन द्यायची आहे. तेव्हाच २०२१ ची सकाळ सोनेरी होईल आणि ‌नव्या वर्षाचं स्वागत नव्या संकल्पानी करता येईल.


                             मार्गशीर्ष पौर्णिमा

                            ता. २९.१२.२०२०

                               ललिता छेडा