पौष महिन्यात सुर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि आपली पृथ्वीकडची परिभ्रमणाची दिशा बदलतो, अगदी सहजपणे उत्तरेकडे सरकत तो संक्रमित होतो. म्हणूनच पौषातलं हे संक्रमण मकर संक्रांत म्हणूनही आपल्या सर्वांना परिचित आहे. ह्याकाळाला 'उत्तरायणही' म्हटलं जातं. ह्या वर्षी मात्र हे संक्रमण सांस्कृतिक इतकंच सामाजिक जाणीव जपण्याचा संदेश देणारं ठरलंय.
ह्या महिन्यात थंडीचा कडाका चांगलाच जाणवत असतो. दिवसही हळूहळू मोठे होऊ लागतात. हेमंत ऋतूची अखेरही ह्याच महिन्यांत होऊ लागते.
ह्या दिवसातला प्रवास धुक्यात हरवली वाटचा अनुभव देतो.
माझ्या आठवणीतला असा धुक्यातला प्रवास म्हणजे शिर्डीहून शनिशिंगणापूर करून आम्ही मालशेज घाटातून परतत होतो आणि घाटात धुकं पसरलं होतं. अंधार अगदी गच्च होता. अगदी नशीबानं आमच्या गाडी पुढे जाणार्या गाडीच्या मागच्या दिव्यांच्या प्रकाशात आमची गाडी हळूहळू नेत होतो. त्यावेळी छोट्याश्या दिव्यांचं महत्व कळत होतं. अचानक पूढची गाडी थांबली आणि आमच्या हृदयाचा ठोका चुकला. उजव्या बाजूला डोंगरकडे आणि डाव्या बाजूला खोल दरी असल्याचं जाणवत होतं. इतक्यात ड्रायव्हर साईडचा दरवाजा उघडून एक माणूस उतरला. दुसऱ्या दिवशी संक्रांत असल्यामुळे खूप थंडी होती. अशा थंडीत हा माणूस गाडीतून उतरून आमच्या दिशेने येत होता आम्ही जाम घाबरलो. पुढच्या गाडीत कोण असेल? अशी चर्चा सुरू झाली. काचा उघडू नका वगैरे सुचना सुरू झाल्या!! पण त्या माणसानं ड्रायव्हरच्या काचेवर टकटक केलं. काच उघडावीच लागली. "गाडी समोर दोन साप आडवे आले आहेत. म्हणून थांबलोय गाडीच्या दिव्यांच्या प्रकाशात नशीबानं दिसले म्हणून आम्ही थांबलोय त्यांना ओलांडणे शक्य नाही" त्या माणसानं खुलासा केला. दहा मिनीटे गेली आणि पुढची गाडी सुरू झाली. किर्र अंधारातला हा अविस्मरणीय अनुभव!!
घाट उतरल्यावर रस्त्यावरचा दिवा
चहाची टपरी, पौषातला हवेतला गारवा
आणि त्या टपरीवर आमची वाट बघणारी
पुढच्या गाडीतली माणसं...
पौषातला महत्वाचा दिवस म्हणजे 'मकर संक्रांत' आणि संक्रांतीच्या आदल्या दिवशी उत्तर प्रदेशात "लोहरी" नावाचा उत्सव साजरा होतो. भारतातील विविध प्रांतात संक्रांतीची विविधता आढळून येते. तामिळनाडू मध्ये हा सण "पोंगल" म्हणून साजरा होतो. तर आसाममध्ये "बिहू" हे सगळेच सण शेती आणि शेतकऱ्यांशी निगडीत आहेत.
माहेरी आमच्या घरी आई भोगीची भाजी खूपच मस्त बनवायची आणि गुळपोळी! दोन दिवस चंगळ असायची. महत्वाचे तिळगुळ लाडू, जे मला खूप आवडतात, त्यामुळे आई माझ्यासाठी मोजून वाटीत काढून ठेवायची. आमच्या घरच्या हळदीकुंकवाच्या समारंभाला आई तिळाच्या वड्या करायची त्या तर माझ्यापासून लपवायला आईला कुलपात ठेवायला लागायच्या.
लग्नानंतर भोगीच्या भाजी इतक्याच आवडीनें ह्या दिवसात बनवला जाणारा सर्व भाज्यांचा "उंधियु" करायला शिकले.
मैत्रिणींमुळे शाकंभरी नवरात्र कळली आणि साठ तऱ्हेच्या भाज्यांचा नेवैद्य असणारी शाकंभरी पौर्णिमा जी पुन्हा भूमी आणि शेतीशी निगडितच आहे हे कळलं. ती भाजी खाल्ल्यावर ती शिकावी असं वाटलं.
ज्ञानदीप परिवारानं हळदीकुंकू ऐवजी सर्व महिलांचा समावेश व्हायला हवा असा "तिळगुळ समारंभ" करायला शिकवलं.
शेतात पिकलेल्या भाज्यांचे प्रकार
सजलेल्या सुगडांची देवाण घेवाण
तिळगुळ देऊन गोड स्नेहानं बोलणं
नाजूक हातांनी केलेले हलव्याचे दागिने
घालून ती नटलेली साजरी नवी नवरी,
बोरन्हाणाला सज्ज छोटे कृष्ण-राधा
हलव्याचा मुकुट अन् हलव्याची बासरी,
उबदार गर्भरेशमी चंद्रकळा काळी...
पतंगाचे रंग विविध, निळ्या केशरी आभाळी
संक्रांतीची प्रत्येक गोष्ट कशी आनंद देणारी!
म्हणूनच कवी कालिदासानी वर्णन केल्याप्रमाणे...
"सुंदर ललनांना रिझवणारा, धनधान्याची रेलचेल करून शेतकऱ्यांना सुखावणारा, क्रौंच पक्ष्यांच्या माळांनी उल्हसित करणारा,हेमंत ऋतूचा सुखद अनुभव देणारा.....
असा हा मनाला, शरीराला संक्रमित करून आनंदित करणारा पौष!
पौष शुद्ध प्रतिपदा
ता. १४.१.२०२१
ललिता छेडा
No comments:
Post a Comment