आम्ही रहात होतो त्या बंगल्याच्या आवारात माघाच्या थंडीत खूप वाळलेली पानं पडलेली असायची. ती झाडणं हे सकाळ-संध्याकाळ एक कामच असायचं. सकाळी अंगण झाडणार्या मावशी इतकं छान बोलायच्या "अहो ताई, पानं गळली म्हणजे आता पुन्हा झाडं बहरणार! जुनं गेल्याशिवाय नवं कसं येणार? आणि मग बाजूला बहरलेला चाफा दाखवून म्हणायच्या" बघा इतकी पानं गळली आहेत पण हा कसा बहरलाय...त्या बोलताना मनात यायचं "चांगल्या विचारांसाठी शिक्षणाची गरज नसतेच फक्त मन शुद्ध असायला हवं"
ह्या दिवसात आलेला आंब्याचा मोहोर पानगळीला विसरवतो. मोहरलेलं आंब्याचं झाड सोन्याचा मुकुट घातलेल्या राजासारखा दिसतं. पानगळ झाली की पक्षांची रिकामी घरटी दिसायला लागतात आणि थोड्याच दिवसानंतर पक्षांची घरट्यांसाठी जागा शोधायची लगबग सुरू होते आणि ही लगबग आंब्याच्या झाडावर हमखास पाहायला मिळते.
तसं बघितलं तर निसर्ग आणि आपलं आयुष्य ह्यात खूप साम्य आहे. पण निसर्गाकडे असलेलं सकारात्मकतेच देणं आपल्या विचारांत कमी प्रमाणात असल्यामुळे काही मंडळी पानगळ अर्थात वृध्दत्व आनंदी मनस्थितीत स्वीकारत नाहीत. सृष्टीच्या ह्या नियमाबद्दल एका कवीनं खूप छान लिहिलंय..
पीक बहरात आलं की सर्वच पक्षी गाणी गातात..
सुखाचे सारे सोबती, दु:खाचा वाली कोणीच नसतो..
आपलं आपणच जडाव पुन्हा बहरावं नव्या जोमानं
पानगळी नंतर वसंताचा बहर हमखास असतो..
माझ्या साठी माघ महिन्यातली खास आठवण म्हणजे माघी चतुर्थीला "माध्यम" संस्थेची स्थापना झाली. वैशाली ओकनी मीना गोडखिंडी, ज्योती पाटकर, जयश्री करमरकर, इंदू देढिया आणि मी अशा आम्हा पांचजणींना घेऊन ह्या संस्थेची स्थापना केली होती. ह्या मागची प्रेरणा पद्मजा वानखेडे ह्यांची होती. वैशालीच्या त्यांच्याशी झालेल्या ओळखीतून त्यांनी डोंबिवलीत प्रदर्शन भरवावीत असा सल्ला दिला आणि माघी चतुर्थीला आम्ही महिलांच्या वस्तूना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रदर्शनं भरवणं, महिलांना व्यवसाय मार्गदर्शन करणं अशा उद्देशाने संस्था स्थापन केली. आमचं पहिलं प्रदर्शन डोंबिवलीत शुभमंगल कार्यालयात आयोजित केलं होतं आणि आशालता वाबगावकर ह्यांच्या हस्ते ह्या प्रदर्शनाचे उद् घाटन झालं होतं. इतक्या मोठ्या अभिनेत्री असून सुध्दा त्या प्रदर्शनात इतक्या मोकळेपणानं वावरल्या आणि प्रत्येक महिला व्यावसायिकेशी बोलून तिची धडपड त्यांनी आस्थेनं जाणून घेतली. माध्यममुळे आमच्या खूप प्रसिद्ध व्यक्तींशी ओळखी झाल्या. त्या प्रदर्शनाला खूप छान प्रतिसाद मिळाला कारण त्यावेळी हल्ली सारखी प्रदर्शनं भरवली जात नव्हती. ही कल्पना नवीनच होती.
डोंबिवलीतल्या २/३ प्रदर्शनानंतर आम्ही हिम्मत करून मुलुंडला प्रदर्शन लावलं. शेवटच्या दोन दिवसांपर्यंत एकही स्टाॅल बुक झाला नव्हता. हताश होऊन आम्ही सहाजणी हाॅलवर येऊन प्रदर्शन रद्द करायचा विचार करत होतो!! इतक्यात तिथं दोन बायका येऊन स्टाॅलची चौकशी करू लागल्या. आमच्याशी चर्चा करून त्यांनी चार स्टाॅल बुक केले. तेव्हा दुपारचे अडीच वाजले होते. त्यानंतर त्या दोघींनी अनेकजणींना फोन केले. हाॅलच्या मालकांनी पण काही नावं दिली. आम्ही आजूबाजूच्या दुकानदारांशी बोललो आणि "अहो आश्चर्यम्" प्रदर्शनाच्या दिवशी आमचे ४२ स्टाॅल बुक झाले होते. हा आम्ही सहाजणींनी सामाजिक जाणीवेसोबत व्यवसायही करायचा असं ठरवलं असल्याने ज्या मुलुंडला आम्ही तोट्याची तयारी केली होती त्यानी आम्हाला सर्वात मोठा फायदा करून दिला. माध्यम आणि प्रदर्शनं हे आम्हा सहाजणींसाठी खूप आनंददायी अनुभव देवून गेले. आता वैशाली आणि ज्योती दोघीही ह्या जगात नाहीत पण त्यांच्याबरोबरच्या प्रदर्शनातल्या धमाल आठवणीं काढल्या की त्या आमच्यात आहेतच असं वाटत रहातं. ह्या प्रदर्शनातून मिळालेल्या पैशातून मी भारी कॅमेरा घेतला. जो घ्यावा अशी माझी खूप इच्छा होती. माझ्या कमावलेल्या पैशांनी मी घेतलेली एकमेव वस्तू!!
मागे वळून बघताना जाणवतं की आठवणींची, नात्यांची, मैत्रीची खूप पानगळ झाली आहे. पण पुन्हा पुन्हा बहरत रहाण्याचा स्वभाव ठेवला तर नवीन नाती, नवीन आठवणी मनात साठवायला सुरवात होते.
वृक्षांची थांबते सळसळ, होता पानांची पानगळ
माहित असते तरीही येते मनाला मरगळ
अशावेळी उभारी देतो मनाला मोहोराचा दरवळ
कारण आत कुठेतरी रूजत असते कोवळी हिरवळ
म्हणूनच माघातली पानगळ बरंच काही शिकवून जाते असं वाटतं. खास करून मी आता आयुष्याच्या ज्या वळणावर आहे तिथं पानगळीचं दु:ख न करता स्वतःला जुन्या गोष्टींमध्ये जखडून न ठेवता नवं जगणं समजून तरीही स्वतः साठी आपला आपणच आयुष्यात वसंत फुलवावा असं वाटतंय.
म्हणूनच पानगळीच्या पानांसाठी असं म्हणावं वाटतंय की....
पांव सुखे पत्तों पर अदब से रखना।
धूप में मांगी थी तुमने पनाह इनसे कभी।
माघ शुद्ध प्रतिपदा
ता. १२.२.२०२०
ललिता छेडा
मस्त !!
ReplyDeleteखुप सुंदर लिखाण
ReplyDeleteKhupach sunder aani kathecha shevatacha don ooli khup sunder👌
ReplyDeleteMitwa,
ReplyDeleteBeautiful concept and comparison of autumn season of renovation with our evolving life👍
Loved the last couplet💝
CA Jayshree Karve