जानेवारीतला राष्ट्रीय "कन्या दिन" साजरा होत असताना मनांत आलं की मुलगी म्हणून हक्काइतकीच जबाबदारीही महत्वाची असते..
मी आई-वडीलांची एकुलती एक लेक! माझा जन्म जरी गिरगावात झाला असला तरी माझा लहानपणापासून लग्नापर्यंतचा काळ परळसारख्या गिरणगावात गेला. परळसारख्या मुंबईतल्या मध्यवर्ती ठिकाणी रहात असल्यामुळे पाहूण्यांची वर्दळ खूप असायची. पण आमच्या तिघांच वेगळं विश्व होतंच. आई-दादांसाठी त्यांची एकुलती एक लेक म्हणजे त्यांच्या जगण्याचं मुख्य कारण होतं. दादांची कडक शिस्त आणि आईचा सर्वांसाठी धावून धावून करण्याचा स्वभाव माझ्यासाठी नेहमीच आदर्श ठरले आहेत.माझं लग्न दोघांसाठी मनाविरुद्ध झालं असलं तरी नंतर त्यांनी ते मनापासून स्वीकारलं आणि त्यामुळेच मी लग्नानंतर डोंबिवलीला रहायला आल्यावर ते देखील डोंबिवलीत रहायला आले. नशीबानं माझ्या स्वतःच्या बिल्डींगमध्येच तळमजल्यावर त्यांना जागा मिळाली. थोडे दिवस बरे गेले पण अचानक दादांना पॅरॅलिसीस् चा अॅटॅक आला. त्यावेळी जाणवलं की माझ्या जवळ त्या दोघांना घर मिळणं किती आवश्यक होतं. आईच्या मदतीला माझे मामा कधी माझा आतेभाऊ श्रीकांत रहायला येत होते आणि महत्वाचं म्हणजे दादांच्या आजारपणात माझ्या नवर्यानं जावयापेक्षा सुध्दा जास्त मुलासारखं लक्ष घातलं. आजारपणामुळे जवळजवळ चार वर्षे ते बिछान्यावर पडून होते. श्रीकांत त्यावेळी फलटणला रहात होता. त्याच्या कामा निमित्ताने त्याची महिन्यातून एखादी फेरी डोंबिवलीला होत असे. एकदा सहज बोलता बोलता दादा त्याला म्हणाले "मुलगा नसल्याने माझे शेवटचे विधी तूच कर! आम्ही सगळ्यांनी ते हसण्यावारी नेलं. पण ह्या विषयांचं गांभीर्य तेव्हा कळलं नाही!
दादांच निधन १६एप्रिल रामनवमीच्या दिवशी झालं. रामाचे ते परम भक्त असल्यामुळे रामजन्माचा सुंठवडा त्यांच्या तोंडात घातला आणि त्यांनी प्राण सोडले.
त्यानंतर आम्ही फोन लावायला सुरुवात केली. तर एकही फोन लागेना. चौकशी केल्यावर कळलं महानगर टेलिफोन निगमच्या कामकाजात मोठा बिघाड झाल्याने संपूर्ण टेलिफोन व्यवस्था काही काळासाठी बंद राहील.
"काय करायचं"? अशी आमची हळू आवाजात चर्चा सुरू असताना आई मला बोलवतेय असा निरोप मिळाला. मी लगबगीने तिच्या जवळ गेले तर "कसला विचार करता आहात मला माहित आहे, पण लक्षात ठेव तुझ्या दादांना अग्नी जावईच देणार. गेली चार वर्ष ते मुलापेक्षा जास्त त्यांचं करत आहेत. "दु:ख बाजूला ठेवून तिनं निर्धारानं मला सांगितलं. तेवढ्यात मागून कोणीतरी म्हणालं" ते गुजराथी आहेत, गोत्र? आईनं त्या बाईंकडे नुसतं बघितलं आणि विषय संपला! पण माझ्यासाठी विषय मनात सुरू झाला होता. आईनं दिलेला निर्णय योग्यच होता पण माझ्या मनात आलं "माझ्या आई-वडिलांचे हे विधी मीच करायला हवेत....
त्यानंतर माझी जवळची मैत्रीण वैशाली ओक हिच्याजवळ मी हे विचार बोलून दाखवले. तिनंही माझ्या विचारांना दुजोरा दिला आणि त्या काळात आम्ही ज्ञानदीपच्या माध्यमातून काम करत होतो. ती म्हणाली"आपण ह्या विषयावर चर्चा घेऊ या. आज ती नाही पण लिहीताना तिची आठवण झाली.
दादांना अग्नी आईच्या जावयाने अर्थात माझ्या नवर्यानं दिला आणि नंतरचे सर्व १२/१३व्याचे विधी श्रीकांतने केले. हा निर्णयही अर्थात आईचाच होता. स्वभावाने अगदी साधी असलेल्या माझ्या आईनं खंबीरपणे घेतलेला निर्णय आठवला की मला नेहमी भरून येतं.
मी आईची पंचाहत्तरी ज्यादिवशी केली त्याच रात्री ती पडली. त्या पडण्यामुळे तिचा डावा हात आणि कंबर दुखावले. पडण्याचं निमित्त झालं आणि हळूहळू ह्या आजारपणात ती बेडरिडन झाली. तिच्या ह्या आजारपणात तिच्या मैत्रिणी, आमच्या बिल्डिंगच्या दाराशी असलेले इस्त्रीवाले दोन्ही भाऊ ह्यांनी तिची खूप सेवा केली. ह्या सगळ्यांची मला खूप मदत होत होती.
२७ आॅक्टोबरला भाऊबीजेच्या दिवशी ती गेली. मी ठरवलं होतं त्याप्रमाणे सर्वांना सांगितलं की" माझ्या आईला अग्नी मी देणार! कृपा करून कोणीही मला परावृत्त करण्याचा प्रयत्न करु नका. उगीच अपमान होईल. तरीसुद्धा आमचे अगदी जवळचे नातेवाईक येऊन मला म्हणाले "हे धर्माच्या विरुद्ध आहे. तुम्ही हे करू नका" मी त्यांच्या समोरच हे विधी करणार्या भालके गुरुजींना फोन लावला आणि मी अग्नी देणार आहे हे सांगितलं. त्यांनी देखील" धर्मशास्त्रात मुलींना ह्यासाठी परवानगी असल्याचं उदाहरणासहित सांगितलं.
इथं एक वेगळा प्रसंग सांगावासा वाटतो" मी स्मशानात जायला निघाल्यावर अनेकजणी माझ्या बरोबर यायला निघाल्या. वैशाली तर सतत माझा हात धरून होती. माझ्या मागे उभे असलेले एकजण आपल्या बायकोला स्मशानात येऊ नकोस असं सारखं म्हणत होते. ती काही ऐकत नव्हती शेवटी त्यांनी रागाने" हे बघ मला तू तिथं आलेली अजिबात आवडणार नाही आणि चालणार नाही असं निर्वाणीचं रागाने सांगितलं. त्यांच्या बायकोने शांतपणे" गेल्या तीस वर्षात मला न आवडणार्या आणि न चालणाऱ्या अनेक गोष्टी तुम्ही केल्या आहेत. आज मी करून बघणार" असं उत्तर दिलं आणि त्या शेवटपर्यंत माझ्याबरोबर होत्या. त्यांच्या यजमानांनी दुसऱ्या दिवशी येऊन माझी माफी मागितली कारण त्यांचा संवाद मी ऐकला होता ह्याची त्यांना पूर्ण कल्पना होती.
माझ्या मैत्रिणी त्या प्रसंगात सतत माझ्या बरोबर होत्या. स्मशानात मंत्राग्नी देताना सारखं भरून येत होतं पण भीती मात्र क्षणभरही वाटली नाही. तिसऱ्या दिवशीच्या स्मशानात जाऊन अस्थी सावडण्यापासून तेराव्या पर्यंतचे सर्व विधी पार पडले त्यात भालके गुरुजींचा मोठा वाटा आहे. त्यांनी प्रत्येक विधी मला समजावून सांगितले.
श्रध्दा आणि अंधश्रद्धा ह्यातली अस्पष्ट रेषा दाखवणारा प्रसंग म्हणजे दहाव्या दिवशी कावळा अजिबात पिंडाला शिवत नव्हता. आईच्या मैत्रिणीनी 'रजनी'नं सुचवल्याप्रमाणे इस्त्रीवाल्या दोन्ही भावांना मी बघेन असं मी म्हटल्यावर लगेच कावळ्यानी चोच मारली होती....
त्यानंतर माझी मैत्रिण मीना गोडखिंडी हिने लोकसत्तेच्या चतुरंग पुरवणीत माझ्या ह्या अनुभवांबद्दल लेख लिहीला. त्यानंतर अनेकजणींनी मला फोन करून ह्यासाठी कौतुक केलं तसंच अनेकींनी आम्हाला एकुलत्या एक असल्याने तुमच्यामुळे असं करण्यासाठी प्रेरणा आणि धाडस मिळालं असंही सांगितलं.
महत्त्वाचं म्हणजे हा लेख वाचून जेष्ठ रंगकर्मी सुलभा देशपांडे यांनी लोकसत्तामध्ये पत्र लिहीलं आणि माझ्या नावासहित हे धाडस केल्याबद्दल कौतुक केलं. मुलगी म्हणून ही जबाबदारी घ्यावी आणि त्याला समाजानं स्वीकृती द्यायला हवी असं त्यांनी आवर्जून लिहिलं होतं.
मी काही जगावेगळं केलं असं मला अजिबात वाटत नाही पण हे धर्मसंम्मत आहे आणि कोणत्याही अंधश्रद्धेला न बळी पडता हे विधी मुली करू शकतात हे सगळ्यांच्याच मनात रूजलं पाहिजे.
एकुलती एक असल्याने स्मशानातुन आल्यावर आईची रिकामी काॅट बघून मात्र मला आपलं माहेर संपलं ही जाणीव झाली.....
पौष पौर्णिमा
ता. २८.१.२०२१
ललिता छेडा.