Monday, November 30, 2020

गृहीणी


गृहीणी...

घर सावरते घर आवरते...
तरीही घड्याळाच्या काट्यावर धावते

धावता धावता थकली दमली तरी...
स्वत:च्या गायन वाचनाचे छंदही जपते

रोज मनाच्या खिडक्या आनंदाने उघडते...
आणि खिडकीतल्या कुंड्यांमध्ये निसर्ग शोधते

नोकरी व्यवसाय करावा असा मनातला ध्यास..
घराचा कोपरा न कोपरा मात्र सजवते खास

मुलांसाठी ऊन पाऊस झेलत लढत रहाते...
पण उडालेल्या पिल्लांकडेे दूरूनच पहाते

घरातल्यांच्या खुशीचा मार्ग पोटातून जातो हे जाणते..
आयुष्यभर करायच्या स्वैपाकात नाविन्य शोधत रहाते

सासर-माहेर नणंदा-भावजया नात्यांत अडकून पडते..
आणि सांभाळताना नाती स्वत:ला शोधायला विसरते

खिडकीतून दिसणारं तिचं आभाळ मधूनच अंधारते..
पण लावलेल्या पणतीनं ती घराच अंगणच उजळते

धाग्यानं वडाभोवती ज्याच्यासाठी फेऱ्या घालते...
त्याचा अहंकार,त्याचा राग,धाग्याच्या गाठी सोडवत जगते

हाताला लागणारे चटके, डोळ्यात येणारं पाणी...
होणारे पराभव सगळं हसत हसत सहन करून जाते

दिवसभराची कामं मोलाची अपेक्षा न करता करत जाते..
दिवसभर करतेस काय? ह्या प्रश्राचं उत्तर शोधत रहाते.

३ नव्हेंबरचा राष्ट्रीय गृहिणी-दिन त्यानिमित्ताने
मनांत आलं 'गृहीत' धरली जाते ती 'गृहीणी' की जिच्या 'ऋणात' सारं घर असतं ती 'गृहिणी!! आणि म्हणूनच जे मनात आलं ते लिहीलं. गृहिणीला मन असतं, विचार असतात, कलागुण असतात ह्याची जाणीव सर्वांना असायला हवीच पण ती जाणीव तिच्यापर्यंत पोचणं पण आवश्यक आहे.
कोरोनाच्या ह्या अवघड काळात जिच्या मनोबलावर अवघा समाज टिकून राह्यला होता ती घरातली गृहिणी होती. कारण तिनं.
Work from home.. केलं
Work for home..... केलं आणि
Work with patience... शिकवलं.
अशा सर्व गृहिणींना माझा मनापासून सलाम!

कार्तिक पौर्णिमा
ता. ३०. ११. २०२०
ललिता छेडा.

5 comments:

  1. अतिशय सुंदर, समर्पक !

    ReplyDelete
  2. मनांत आलं 'गृहीत' धरली जाते ती 'गृहीणी' की जिच्या 'ऋणात' सारं घर असतं ती 'गृहिणी!!
    Liked this structure of thought .Mostly she is taken for granted. Assumed and abused.
    CA Jayshree Karve

    ReplyDelete
  3. प्रत्येक स्त्रीचया मनातील बोल आपण आपण खुपच छान
    मांडले आहेत.सगळे घर तिचया ऋणात असते हे तिला
    कधीच कळत नाही ती नाती सांभाळत करत असते करत
    असते करतच असते...मेधा बोडस.

    ReplyDelete
  4. मनापासून आभार सर्वांचे

    ReplyDelete
  5. सर्व खरेच आहे. शेवटचा paragraph पण योग्य.

    ReplyDelete