समृद्धीचा एक उत्सव म्हणजे दीपोत्सव! दिवाळीतलं उत्सवी वातावरण, थंडीची सुरवात आणि अभ्यंगस्नान हे सगळं पारंपरिक असलं तरी आपण प्रत्येक दिवाळी फराळ, साफसफाई, खरेदी ह्या सगळ्यांमुळे नव्यानं अनुभवतो.
माझी लहानपणीची दिवाळी परळ, गिरगावातल्या चाळींमध्ये साजरी झाली आहे. दोन खोल्यांची ती घरं दिवाळीच्या आधीच्या आठवड्यात साबण घालून धुवून स्वच्छ करायची आणि मग फराळ बनवायला सुरुवात व्हायची. वसूबारसेला आई बरोबर देवळात जाऊन गाय आणि वासरू ह्यांची पूजा करायची आणि त्यांना नेवैद्य म्हणून आई गव्हाच्या पिठाचे लाडू करून न्यायची. नरकचतुर्दशीच्या दिवशी आंघोळीच्या वेळी फुलबाज्या लावायच्या, फराळाबरोबर दही पोहे इतके मस्त लागायचे की अजूनही ती चव जिभेवर रेंगाळतेय. खरेदी म्हणजे वडिलांची धोतर-जोडी, आईला एक साडी आणि मला घरी आईनं शिवलेला फ्राॅक!! खरेदी गिरगावातल्या माझ्या मामांच्या दुकानातच व्हायची. चाळीत, नातेवाईकांसाठी द्यायला फराळाचे डबे तयार व्हायचे. झिरमिळ्यांचे कंदील घरी बनायचे. अशी अगदी साध्यासुध्या गोष्टींत आनंद शोधत त्यावेळी दिवाळी साजरी व्हायची.लग्नानंतर डोंबिवलीत आल्यावर माझ्या मैत्रिणी जयश्री आणि अनघा आम्ही तिघी दिवाळीचा फराळ एकत्रच बनवत असू. खूप धमाल यायची. आम्ही तिघी दिवाळीची खरेदी करायला क्राॅफर्ड मार्केटला जायचो. तेव्हा ट्रेनला हल्ली सारखी गाड्यांना गर्दी नसायची. त्यामुळे ती क्राॅफ्रर्ड मार्केटची खरेदी आठवणीतली ट्रीप होत होती येवढं मात्र खरं!! एकदा तर आम्ही तिघींनी इतकी खरेदी केली की आम्हाला हमाल करावा लागला होता...
आता अनघा आमच्यात नाही पण तिच्या अनेक आठवणी मनात रेंगाळत असतात...
डोंबिवलीत आल्यावर दरवर्षी लक्ष्मीपूजनाला माझ्या नवऱ्याचे मित्र आणि माझ्या मैत्रिणी संध्याकाळी आमच्या आमच्या घरी येतात आणि आमचं एक छानसं गेट-टूगेदर आम्ही कायम करत आहोत. दिवाळीची एक कायमची आठवण!!
सुवर्ण मंगल महिला सहकारी बॅंकेच्या संचालक पदामुळे अठरा वर्षे व्यावसायिक दिवाळीचा वेगळाच अनुभव घेतला! स्टाफचा बोनस, खातेदारांसाठी नवीन स्कीम जाहीर करणं, लक्ष्मीपूजन अशी वेगळ्या पध्दतीची, वेगळ्या विचारांची दिवाळी अनुभवलीय.
ह्याच बॅंकेच्या अध्यक्षपदी असताना डोंबिवलीचं ग्रामदैवत असलेल्या गणेश मंदिरात तर्फे दिवाळी पहाटेच्या सकाळी माझा सन्मान करण्यात आला तो क्षण अविस्मरणीय!! अर्थात माझं नेहमीच कौतुक करणाऱ्या आबासाहेब पटवारींचा इथं आवर्जून उल्लेख करावासा वाटतोय.
ह्यावर्षीच्या दिवाळीत मात्र कोरोनाच्या अंध:काराला आरोग्यपूर्ण जगण्याच्या छोट्याश्या पणतीनं भेदायचंय. त्याशिवाय ह्या आजारपणामुळे थकलेल्या वृध्द पावलांना, कष्टकरी हातांना, नैसर्गिक आपत्तींमुळे बेजार शेतकऱ्यांना जमेल तसं सहकार्य करून एक सामाजिक भान जपायचं आहे. प्रदुषणमुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी फटाके आता उडवायचेच नाहीत असं सर्वांनीच ठरवायचं आहे.
अशा ह्या दिवाळीच्या प्रत्येक दिवसाच्या कथा आहेत. भाऊबीजेची एक कथा माझी आजी सांगायची "असं म्हणतात भाऊबीजेला यम आपल्या बहिणीकडे "यमीकडे" दिवसभरासाठी जातो आणि जाताना नरकाचे दरवाजे बंद करून स्वर्गाची दारे सताड उघडी ठेवतो! आणि त्यामुळे भाऊबीजेला मृत्यू झाला तर ती व्यक्ती सरळ स्वर्गात जाते आणि माझ्या आईचा मृत्यू भाऊबीजेला झालाय....
कार्तिक शुद्ध प्रतिपदा
ता. १६-११-२०२०
ललिता छेडा
Good remembrances of celebrating Diwali at different stages in life--
ReplyDeleteCA Jayshree Karve