१६ आॅक्टोबरचा 'जागतिक अन्न दिन' साजरा करताना अन्नाची गरज रोजच्या जगण्यात किती आहे ते ह्या वर्षी आलेल्या अनेक प्रसंगांतून कळलं.
लाॅकडाऊनच्या सुरवातीच्या काळात अनेक श्रमिक, गरीब, कुटुंबांना एकवेळच्या जेवणापासून वंचित रहावं लागलं. स्थलांतरित, हातावर पोट असलेल्यांना अक्षरश "अन्नासाठी दाही दिशा" कराव्या लागल्या. अशावेळी अनेक महिलांनी, काही संस्थांनी पुढाकार घेऊन ह्या मंडळींच्या दोन वेळच्या जेवणाची सोय केली होती. ह्याकाळाच्या सुरवातीला घरातून बाहेर न पडता आल्यामुळे अनेक एकट्या राहणाऱ्या ज्येष्ठ मंडळींचे पण खाण्यापिण्याचे हाल झाले.दुसरं महत्त्वाचं म्हणजे सध्या आलेलं आजारपण संसर्गजन्य असल्यामुळे घरकाम करणाऱ्या महिला कामाला यायच्या बंद झाल्या आणि घरातली सगळीच मंडळी घरकाम करायला लागली. त्यामुळे स्वैपाक आणि स्वच्छता ह्याबाबतीतला घरातल्या प्रत्येकाचा सहभाग अनिवार्य झाला आणि मग सूरू झाली पारंपरिक ते काॅन्टिनेंटल पदार्थांची रेलचेल! जोडीला what's app आणि Google search होतंच. नातवंड आजीच्या मदतीनं पारंपरिक पदार्थ शिकत होती तर परदेशातल्या केक, पास्ता, पिझ्झाचं इंडियन वर्जन घरात पोळ्यांना पर्याय म्हणून आवडायला लागलं. काही मंडळींनी आयतं मिळताय ते काहीही मदत न करता एन्जाॅयही केलं.
खरं म्हणजे ह्या परिस्थितीनं प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आहारातले बदल, हळदीच्या दुधाची गरज हे सगळं 'उदर भरण नोहे'...हे खर्या अर्थानं शिकवलं.
पारंपरिक पदार्थांची आठवण म्हटलं की प्रत्येकालाच आपल्या लहानपणीचे आई, आजीच्या हाताची चव असलेले पदार्थ आठवतात. मला तर त्या पदार्थांबरोबर उष्ट-खरकट, सोवळं-ओवळं, वाढतांना डाव्या-उजव्या बाजूचे पदार्थ ह्या शब्दांची शिकवण आणि शिस्त मनांत येते.
आईची अजून एक आठवण म्हणजे प्रत्येक पदार्थ प्रमाणात व्हायला हवा हा तिचा अट्टाहास! तिचं म्हणणं असायचं" खिचडी कशी मऊ- मोकळी व्हायला हवी, श्रीखंड कसं योग्य प्रमाणात आंबटगोड हवं, जिलबीचा खुटखुटीतपणा (जिलब्या ती नेहमी घरीच करत असे) मोदकांच्या बाहेरच्या पारीचा तलमपणा, हलव्यावरचा काटा कसा एक सारखा हवा, सगळं कसं अगदी उत्तम हवं!! आता मनांत येतं पारंपरिक पदार्थांच्या अशा प्रमाणबद्धतेमुळेच त्या काळच्या स्त्रीयांना आयुष्याचा समतोल राखायला छान जमलं होतं.
हल्ली 'काॅन्टिनेन्टल फुड' तर आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. काॅन्टिनेन्टल खरं म्हणजे 'युरोपियन' फुड! जे बिना तेलाचं, बिना मसाल्याचं लंच-डिनरला किंवा कधी कधी तर नुसत्या उकडलेल्या भाज्या असतात तेच जेवण! पण आपण भारतीयांनी मात्र जसं चायनीज पदार्थांना इंडियन चायनीज बनवलं तसंच ह्या उकडलेल्या भाज्या वेगवेगळ्या मसाल्यांनी स्वादिष्ट केल्या.
आम्ही इटलीला पिझ्झा खाल्ला त्याची चव खूप छान आणि वेगळी होती. ज्या गावचा जो पदार्थ प्रसिद्ध असतो तो तिथंच खायची खरी गंमत आहे. अमेरिकेत जाणवलेलं वैशिष्ट्यं म्हणजे तिथले पदार्थ चीज, बटर शिवाय पूर्णच होत नाहीत.
तरीसुद्धा पारंपरिक महाराष्ट्रीयन नेवैद्याचं ताट ज्यात वरणभात, मसालेभात, वर तुपाची धार, पक्वान्न, डाव्या बाजूला चटणी, कोशिंबीर, लिंबाची फोड, उजव्या बाजूला भाज्या, वाटीत अळूची भाजी ह्याची बरोबरी कशाशीच होऊ शकत नाही. तसंच दाक्षिणात्यांच्या इडली डोशाबरोबर केळीच्या पानावरचा गरमागरम सांबार भात, अवियल, खीर बघून कसं प्रसन्न वाटतं! तर सजलेल्या गुजराथी थाळीतल्या ५-६ वाट्यांमधली तोंडीलावणी, ढोकळा, भजी, दोन तरी मिष्टान्नं मन तृप्त करतात आणि तिकडे उत्तरेला पंजाबी समोसा, परोठा, आलू मटार आणि मोठा ग्लास लस्सी ह्या सर्वांची मजाच काही और!! आणि दही तर सर्वत्र हवंच. असा हा आपला भारत विविधतेने नटलेल्या पदार्थांमुळे एकेमेकांशी अन्नामुळे जोडलेला आहे.
सामिष आहार करणार्यांवर तर एक वेगळा लेखच लिहावा लागेल.
पण जागतिक अन्न दिनाला खरी आठवण केली पाहिजे शेतकऱ्यांची!! ज्यांचं ह्या वर्षी कोरोनाबरोबर महापूर, परतीच्या पावसामुळे झालेलं नुकसान ह्यामुळे जे हाल झाले आहेत. ते शब्दात व्यक्त करायचे तर...
निसर्ग हा कोपला भारी, धान्याची धुळधाण करी।
भाजीपाला सडला तरी, त्यासी कोणी मदत न करी।
बळीराजाच्या श्र्वासाची किंमत आहे काय तरी?
कृषीप्रधान म्हणवल्या जाणाऱ्या आपल्या देशाची ही खूप मोठी शोकांतिका आहे. तेव्हा पारंपरिक असेल किंवा काॅन्टीनेन्टल...पुढ्यात आलेल्या अन्नामागच्या कष्टांची जाणीव प्रत्येकानं ठेवून वागलं पाहिजे.
भुकेल्या पोटी स्वप्न बघत अनेक
गरीब मुलं झोपी जातात।
तेव्हा अन्नाची नासाडी टाळूया।
जगण्यासाठी आवश्यक तेवढंच खाऊया।
कारण अन्न कमवायला ही आपण
तेव्हा अन्नाची नासाडी टाळूया।
जगण्यासाठी आवश्यक तेवढंच खाऊया।
कारण अन्न कमवायला ही आपण
धावतोय आणि ते पचवायला ही आपण धावतोय हे लक्षात असुद्या।
अश्र्विन पौर्णिमा
ता. ३०.१०.२०२०
ललिता छेडा
अश्र्विन पौर्णिमा
ता. ३०.१०.२०२०
ललिता छेडा
Liked the poetic clip at the end😊
ReplyDelete-- CA JAYSHREE KARVE