Sunday, December 8, 2019

तिचं घर

किल्लीनी दार उघडताना तिला झालेला आनंद, तिची अधिरता हाताच्या थरथरण्यांनी तिला कळत होती.दार उघडलं तर एक चिमुकली चिमणी घरात अडकलेली तिला जाणवलं, घरभर ते पाखरू भिरभिरत होतं. हातातलं सामान सोफ्यावर ठेवून तिनं हाॅलची खिडकी उघडली. पंख्यावर बसलेली ती चिमणी भूर्रकन उडाली.उडताना तिनं प्रचंड चिवचिवाट केला.अडकल्यावरची घालमेल आणि सुटकेनंतरचा आनंद आठवून हिनंच मोकळा श्वास घेतला. तिला जाणवलं की ह्या पांच मिनिटांच्या नाट्यात आपण आपलं ठरवलेलं विसरलोच की! पर्स मधून रिपोर्ट काढून बघताना तिला 'आशय'ची तिच्या नवर्‍याची आठवण झाली.लग्नाला सात वर्ष झाली तरी घरात पाळणा हलत नव्हता! दोघांचे रिपोर्ट नाॅर्मल होते पण पाहिजे ते घडत नव्हतं.
     आज अचानक तिच्या आॅफिसमध्ये येऊन  शिल्पांनी तिच्या प्रेग्नसीचा रिपोर्ट दिला आणि ती हरखून गेली होती.शिल्पा व्यवसायानं डॉक्टर असली तरी तिची खूप जवळची मैत्रीण होती.त्यामुळेच मळमळ होत होती आणि अन्नावरची वासना गेली म्हणून ती कावीळीचा संशय येऊन शिल्पाकडे तपासायला गेली.आणि आज न राहवून ही आनंदाची बातमी सांगायला शिल्पा तिच्या आॅफिसमध्ये आली होती.
   तिनं ठरवलं होतं की गुपचूप आपण आशयच्या कपाटाच्या दरवाजावर रिपोर्ट चिकटवून ठेवूया. म्हणजे दुकानातून आल्यावर आशय कपडे बदलायला जाईल तेव्हा तो बघेल आणि....
    तिनं रिपोर्ट पर्स मधून काढून हृदयाशी धरला आणि ती बेडरूममध्ये गेली आशयच कपाट उघडच होतं.उघड कपाट बघून ती चरकली. कपाट रिकामं होतं.तिथे फक्त एक चिठ्ठी होती.
   " साॅरी, जानू,
     मी घर सोडून कांचन बरोबर कलकत्त्याला जातोय. मला स्वत:चा व्यवसाय सुरू करायचा आहे. असं काकांच्या दुकानात वीस टक्क्यात काम नाही करायचंय.तू तुझ्या करिअरमध्ये दंग असल्याने तुझं माझ्याकडे लक्षच नाहीये. त्यामुळेच सात वर्ष झाली तरी आपल्याला मुल होत नाहीयेत. आणि कांचनच माझ्यावर खूप प्रेम आहे.म्हणून मी तिच्या बरोबर जातोय. कायदेशीर कागदपत्रं काही काळानंतर पाठवीनच.
              ‌.                          आशय
    तिला काही कळतच नव्हतं.दोन्ही कागद हातात धरून ती तिथेच बसली. येवढा मोठा निर्णय आणि आपल्याला कल्पना सुध्दा आली नाही. त्या चिठ्ठीकडे बघून ती हमसाहमसी रडू लागली.आपलं इतकं दुर्लक्ष झालं ह्याच्याकडे का  आपण आपल्या कामात इतकं गुंतलो होतो की हा आपल्या हातातून निसटून जातोय ते कळलंच नाही. कलकत्त्याहून दुकानासाठी साड्यांचा माल आणणारी कांचन तिच्या घरी दोन तीनवेळा आली होती.पण हे असं कधी घडेल असं स्वप्नातसुध्दा आपल्याला वाटलं नाही.
    दारावर वाजणार्‍या बेलनी ती दचकली तिच्या मनात आलं 'मला आत्ता कोणी भेटू नका रे बाबांनो!' दार उघडल्याचा आवाज आला आणि'अरे देवा,आई आलेली दिसतेय कारण घराची एक किल्ली जवळ रहाणाऱ्या आईकडे असायची. तिच्या मनात आलं,आता आई तिच्या संतापी स्वभावाप्रमाणे बडबड सुरु करेल आणि अपेक्षेप्रमाणे तसंच आईचं सुरू झालं" तरी मी म्हणत होते,हा मुलगा अजिबात प्रामाणिक‌ नाही पण त्याच्या‌ प्रेमात वेडी झाली होतीस ना! एवढी साॅफ्टवेअर इंजिनिअर होऊन इतक्या मोठ्या कंपनीत नोकरी करतेयस आणि ह्याच काय तर एक वर्ष इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जाऊन शिक्षण सोडलं आणि काकांच्या साड्यांच्या दुकानात बसला. तुला फसवायलाच जसा त्या काॅलेजात आला होता.आई संतापाने थरथरत होती.‌तिची पण चुक नव्हती. 
   "तुला कसं कळलं? तिनं चाचरत विचारलं.
   आई मोबाईल पुढे नाचवत म्हणाली" हा मेसेज वाच," तुमच्या मुलीला सांभाळा, मी तिला सोडून कांचन बरोबर कलकत्त्याला जातोय"ह्याला लाज नाही वाटत असा मेसेज पाठवायला!आईचा संताप आवरत नव्हता.आईच्या मागोमाग आशयची आई,काका, तिचा भाऊ-वहिनी सगळेच येऊन पोहचले.ह्या सगळ्या गोंधळात तिच्या मनात आलं "कसलं नशीब घेऊन येतंय माझं बाळ! मी कोणाला काही सांगू सुध्दा शकत नाहीये.
    चर्चा,सल्ले,रडारड झाल्यावर हळूहळू एकेक करत सर्वजण गेले. आई फक्त तिच्या जवळ राह्यली. थोडंसं कोणीतरी दिलेलं खाऊन आईचा थकल्यामुळे डोळा लागला.
     ती हळूहळू जड पावलांनी हाॅलमध्ये आली. तिला ती घरात आली तेव्हा घरांत अडकल्यामुळे कासावीस झालेली चिमणी आठवली. तिनं सहज खिडकीकडे बघितलं.खिडकीच्या कोपऱ्यात पडद्याआड झाडं ठेवायच्या फळीवर तिला चोंच मानेत घालून बसलेली तीच चिमणी दिसली. जवळ जाऊन बघायला ती उठली आणि तिची चाहूल लागून ती जागेवरच फडफडली. काचा उघडलेल्या होत्या पण ती उडाली नाही.तिथंच  बसून राह्यली." बस बाई, आत्ता तरी तुझीच सोबत आहे." असं म्हणत ती सोफ्यावरच आडवी झाली.
    सकाळी तिला जाग आली ती चिवचिवाट ऐकू आल्यामुळे आणि त्या चिमणीसह एक चिमणा पण त्या फळीवर होता. दोघांचे काहीतरी बोलणं सुरु होतं. तिनं हातानं 'हूश्श' करत उडवायचा प्रयत्न केला.पण दोघं ढिम्म हलले नाहीत आणि अचानक 'जातो बाई हाकलवू नकोस' असं म्हणत जावं तसा आवाज करत दोघेही उडाले.
  त्यांची ती भरारी बघून तिला एकदम फ्रेश वाटलं. आई पण उठून चहा घेऊन तिच्याजवळ उभी होती. आईनं विचारलं" चार दिवस रजा घेतेयस ना?आॅफिसमध्ये कळवून टाक तसं!
    तिनं बाहेर उडून आकाशात झेप घेतलेल्या पक्षांच्या दिशेकडे बघत म्हटलं" नाही ग, घरी बसून काय करायचं! कामात मन तरी रमेल आणि आमच्या आॅफिसमध्ये खूप व्यावसायिक तरीही मोकळं वातावरण आहे. मी  जाते आॅफिसला! तिनं निर्णय घेतला होता.
   चार दिवसांनी तिनं आईला तिच्या प्रेग्नसीची बातमी सांगितली. आई हळवी होऊन म्हणाली" काय ग बाई त्या लेकराचं नशीब. तुझ्या नशिबातही बाबांचं प्रेम नव्हतं आणि  तुझ्या पोराच्या नशिबातही असलं काहीतरी आलंय! तुझ्या बाबांचा थोडातरी सहवास तुला मिळाला पण त्यांच्या आजारपणा पुढं आपलं काही चाललं नाही.
     ती पण आईचा हात हातात घेऊन म्हणाली  "अगं, बाळाचं नशीब मी घडवेन.पण तू आता माझ्या घरीच रहाशील? "अगं, हे काय विचारतेस, मी दादाला केव्हाच सांगितलंय, आणि आता तर काय बाळासाठी मला इथं रहावंच लागेल ना!आई चार दिवसांनी जरा खुषीत दिसली.
       त्या चिमणीनी तिच्या हाॅलमधल्या खिडकीतली ती जागा स्वत:च्या घरट्यासाठी नक्की केली होती.दोघंही घरट्यासाठी काडी काडी जमवायला धावपळ करू लागले होते.आईला त्यांच्या चिवचिवाटाचा त्रास व्हायचा पण ती मात्र त्यांच्या घर बांधणीत मनापासून सामील झाली होती.आईदेखील त्यांच्यासाठी पाणी, तांदूळ असं काही ठेवू लागली होती.
      'तिचं घर' तयार झालं आणि चिऊताईंनी चार अंडी घातली. ती खिडकीवर चढून बघायला लागली की आई ओरडायची. पण ती चिमणी जणू तिची मैत्रीण झाली होती. खिडकीत बसून ती तिच्या चिऊलीशी गप्पा मारायची. ती आईला म्हणायची " अगं, हल्ली मला त्या चिमणीची भाषा कळते.अंडी उबवायला बसलेल्या चिमणीच्या आजूबाजूला त्या चिमण्याच्या घिरट्या सुरू होत असत. ते बघितलं की तिला आशयची आठवण यायची. पण तो तर तिला पूर्ण विसरुन गेला होता.त्याची आई मात्र आवर्जून तिला भेटायला यायची.
   एक दिवशी सकाळी छोट्या पिल्लांच्या हळूवार आवाजानं तिला जाग आली. ती धावत खिडकी जवळ गेली आणि त्याचवेळी तिच्या पोटातल्या बाळानं अस्तित्वाची जाणीव करून दिली.तिच्या अंगावर काटा उभा राहिला.आपल्या घरट्यात त्या चार पिल्लांना पंखाखाली घेऊन बसलेली तिची चिऊली तृप्त नजरेनं तिच्याकडे बघत होती.
      महिन्याभरात तो चिमणा यायचा बंद झाला.ते तिला जाणवलं कारण तेव्हाच आशयनी घटस्फोटाचे कागद पाठवले होते.तिनं ते शांतपणे वाचून  सही करून परत पाठवले.फक्त हे घर आपल्या दोघांच्या नावावर आहे ते मी माझ्या एकटीच्या नावावर करून घेणार आहे त्यासाठी ‌मदत कर कारण घराचे हप्ते मीच भरतेय. इतकंच कळवून तिनं मोकळा श्वास घेतला होता.
    एका संध्याकाळी ती पिल्लं घरट्यातून बाहेर आली चिऊली त्यांना अनिमिष नजरेनं बघत होती. ती देखील पिल्लांची धडपड बघायला जवळ गेली. आई ओरडली " अग त्यांच्याजवळ जाऊ नकोस ती चिमणी चोंच मारते." मला नाही मारणार" तिनं हसत हसत म्हटलं. पिल्लं खाली आली होती.तिनं खिडकीत पेपर पसरला पिल्लं त्यावर बसल्यावर तिनं पेपर घरट्यात ठेवला.चिऊली तर अक्षरशः घरभर उडत आनंद व्यक्त करत होती.
बघता बघता ती पिल्लं तिथल्या तिथंच उडायला लागली.त्यांच्यासाठी खाऊ आणणं वगैरे कामात चिऊली खूप बिझी होती. एका सकाळी त्यातल्या दोन पिल्लानी आकाशात झेप घेतली आणि परत घरट्यात परतली. हे सगळं बघताना तिला वाटलं आता ही आईला सोडून उडून जाणार.पण चिऊली तर आनंदाने त्यांचा हा भराऱ्यांचा खेळ बघत होती.तिला चिऊलीच्या स्थितप्रज्ञतेचं कौतुक वाटलं.तिच्या मनात आलं" आपण माणसं फार गुंततो एकमेकांत. 
   सगळी पिल्लं उडून गेल्यावर चिऊली मधूनच यायची घरभर उडायची की तिला कळायचं ही भेटायला आलेय.आई म्हणायची सुध्दा" काय म्हणाली तुझी चिऊली? म्हणाली" तुझं नांव सुध्दा माहित नाही  पण सगळ्या 'तीं'च दु:ख एकच! तेव्हा पुरुषी चिमण्याच्या वागण्याकडे दुर्लक्ष कर.आणि मजेत जग! आता आपण दोघीही तुझ्या पिल्लाची वाट बघुया. 
"इतकं बोलते का ती‌ तुझ्याशी? आई हसत म्हणायची.
  काही दिवसांनी आई ते घरटं झाडूनी काढायला लागली. ती धावत आली आणि म्हणाली " अगं,आई "तिचं घर" माझ्या कठीण दिवसात  मला कसं जगायचं शिकवत होतं! ते 'तिचं घर' मला जपून ठेवायचंय.
      आईनी  'तिचं घर' हलक्या हातानं खाली काढून शोकेसमध्ये ठेवलं.जगण्याच बळ देणारी एक आठवण छानशी जपली गेली होती.
                 ललिता छेडा

1 comment:

  1. चिमणी हे छोटे प्रतिक.स्थिर विचार करणारी पण आपला संसार वाढवण्यासाठी जिद्द आहे. हे च महतव या कथेचा भाग ठरतो.

    ReplyDelete