हाय वेवरून गाडी चालवताना अमृताला खूप भरून येत होतं.आई आणि आत्या दोघीही गप्प गप्पच होत्या. पण त्या बाबांना बघायला यायला तयार झाल्या हेच अमृतासाठी खूप होतं....आत्या काही तरी कारणांनी बाबांना भेटायची तरी, पण आईनं मात्र गेल्या पंधरा वर्षांत भेटणं दूर बाबांच तोंड सुध्दा बघितलं नव्हतं. शेवटची भेटली होती शेतघराच्या वास्तुशांतीला आणि त्यावेळी अमृता बारा वर्षांची होती.
गाडी चालवता चालवता नकळत अमृता भुतकाळात गेली.किती छान आयुष्य होतं आपलं दादरच्या घरात.आई-बाबा,आजी,आपण आणि धाकटा भाऊ आनंद! आपल्या पाचजणांच एक छोटंसं जग होतं.बाबा संगीतात आकंठ बुडालेले.दिवसभर घरातच संगीताचे क्लास घेत असत. एका शाळेत ही संगीत शिकवायला जायचे.रोज रात्री माझी खास शिकवणी असायची.माझा आवाजही चांगला होता आणि सुरांची चांगली जाण होती.
आई नोकरी करायची. सरकारी नोकरीत चांगल्या पोस्ट वर होती.आजी आम्हा दोघांना सांभाळायची. दृष्ट लागावी असं आयुष्य होतं आपलं. एक आत्या होती तिनं लग्नच नाही करायचं असं ठरवलं होतं.ती पण चांगल्या नोकरीत होती.आमच्या मजल्यावरच तिनं जागा घेऊन ती वेगळी रहात होती. आपलं घर लहान असल्यामुळे आपण जास्त आत्याकडेच असायचो. अमृताला जुन्या आठवणींनी मन चिंब करून टाकलं होतं.तिला आठवलं....
अचानक रागिणी बाबांच्या क्लासच्या निमित्ताने आपल्या घरी आली.तिनंच बाबांना आठवड्यातले तीन दिवस पुण्यात क्लास सुरू करायला गळ घातली.ती पुण्यातलं मोठं प्रस्थ होतं.तिच्या मोठ्या मोठ्या लोकांशी ओळखी होत्या.तिच्या गोड बोलण्याला आम्ही सगळेच भुलले होतो. अमृताला आठवलं फक्त आई मात्र नको म्हणत होती.पण बाबा शनि,रवी,सोम पुण्याला जाऊ लागले.रागिणीकडे स्वत:ची जागा होती.अवघ्या तीन महिन्यांत बाबांचा छान जम बसला.त्यांना रागिणी मुळे चांगले कार्यक्रमही मिळू लागले. बाबांची अक्षरशः संगीतातली घोडदौडच सूरू झाली होती.चारी बाजूंनी पैसा येत होता.
ह्याच काळात बाबांनी तळेगाव जवळ एक शेत विकत घेतलं.स्वत:च फार्म हाऊस हे आईचं स्वप्न होतं. बाबा त्याला शेतघर म्हणायचे.
आई आणि आत्या काहीतरी बोलत होत्या अमृताचं बिलकुल लक्षच नव्हतं.आत्या म्हणाली देखील "अमू,अग बरा होईल तुझा बाबा! इतकं टेन्शन नको घेऊस.
अमृताला वाटलं ह्यांना कसं सांगू"काल रात्री आलेला फोन ते सिरीयस आहेत असाच होता.पण आपण ह्या दोघींना बाबा तुमची आठवण काढताहेत. असं सांगून यायला तयार केलं होतं. बाबांना कॅन्सर झालेला दोघींनाही माहित होतं.आत्या तर दोन तीन वेळा भेटून पण आली होती.आई मात्र फार्म हाऊसच्या वास्तुशांती नंतर आजच जाणार होती.
शेतघर जवळ येत होतं.आणि अमृताच्या डोळ्यासमोर शेतघराच्या वास्तुशांतीचा तो प्रसंग उभा राहिला. त्या दिवशी वास्तुशांतीच्या निमित्ताने आलेली मंडळी संध्याकाळपर्यंत परतली होती. रागिणी पण आता जाईल असं वाटतं असतानाच शेतघराच्या देखभालीसाठी ठेवलेल्या तानीबाईंना ती म्हणाली"माझ्या खोलीतून माझ्या कपाटातून काळी बॅग घेऊन ये.ती बोलून गेली आणि बाबा कावरे बावरे झाले.
आईनी तानीबाईंना विचारलं" ह्यांची कोणती खोली? ताई,त्या जेव्हा साहेबांबरोबर रहायला येतात ना तेंव्हा वरच्या मजल्यावरच्या कोपऱ्यातल्या खोलीत रहातात.घराच बांधकाम सुरू असताना ते दोघं नेहमीच उशीर झाला तर इथंच रहातात. तानीबाईंनी पूर्ण माहिती दिली.रागिणीच्या बाबतीत हे असं काही तरी असेल ह्याची आईला कुणकुण लागलीच होती.
आई आम्हाला दोघांना घेऊन लगेच निघाली."इतक्या रात्री नको जाऊस".बाबानी केविलवाणा प्रयत्न केला.रागिणीनी हलकेच 'साॅरी' म्हटलं पण आईचा संताप शब्दांच्या पूढे होता.
हा संवाद सर्वांसमोरच झाला.आजी,आत्यापण आई बरोबरच निघाल्या.बाबा त्यांना 'तुम्ही तरी थांबा' म्हणत होते पण आजीनं स्पष्टपणे नकार दिला होता.आठवणीतून बाहेर येताना नकळत अमृताचे डोळे भरून आले.
शेतघर आलं होतं.गाडी बघून बाबांचे सेक्रेटरी पानसे धावत आले.आईला बघून त्यांनी हात जोडले "बरं झालं वहिनी तुम्ही आलात! बोलत नाहीत पण तुमची वाट बघताहेत.
आईला बघितल्यावर खरोखरच बाबा फ्रेश दिसायला लागले.आईनी पण त्यांची अवस्था बघून काहीही मनात न ठेवता त्यांच्यासाठी भुतकाळातली सगळी ओझी बाजूला ठेवली होती.
अशीच होती आई, न बोलता एकटीने निर्णय घेणारी
त्या रात्री आम्हा दोघांना घेऊन निघाल्यावर मागे वळून न पाहणारी, बारावीनंतर पुण्याला शिकायला गेलेल्या आनंदला न अडवणारी, पण तो बाबांच्या घरी रहातो आहे हे कळल्यावर त्याचे नांव टाकणारी! अर्थात तिचा राग योग्यच होता तो रहात होता ते घर रागिणीच होतं.आणि आनंद तिथेच रहातोय हे तिला बाहेरून कळलं होतं.
आजसुद्धा आनंद तिथेच बाबांपाशी होता पण हिने त्याच्याकडे बघितलं सुध्दा नाही.
आईला जाणणार्या अमृतानं आणि आत्यानं मात्र तिच्या प्रत्येक निर्णयाचा आदरच केला.तिच्यासाठी अमृताने गाणं सोडून सी.ए. केलं.तिला सांगितल्याशिवाय त्या दोघी कधीच बाबांना भेटायला गेल्या नाहीत.
संध्याकाळी बाबांनी अमृताला 'अजहू न आये बालमा' म्हणायला सांगितलं.ती गात असतानाच बाबांनी डोळे मिटले.एक पर्व संपलं होतं.
आई लगेच निघाली.अमृता आणि आत्याला मात्र इथे रहा सांगायला विसरली नाही.
तेरावा होईपर्यंत दोघीही तिथे होत्या. आनंद, रागिणी दुसऱ्या दिवशी गेले ते दहाव्याला आले.
तेराव्यानंतर अमृता जायला निघाली तर रागिणीनी तिला थांबवलं."बाबांच मृत्यूपत्र उद्या वकील येऊन वाचणार आहेत" असं हळूच सांगितलं. "आम्हाला कोणालाच त्यात इंटरेस्ट नाही"अमृता थोडीशी तुटकपणेच बोलली.
"तू हजर असणं आवश्यक आहे,तशी अटच आहे असं वकीलांनी सांगितलंय" रागिणी आनंदकडे बघून बोलली.
अमृतानी आईला फोन केला.आणि सगळं सांगितलं.आईनी पण 'ठीक आहे' असं म्हणून विषय संपवला.
मृत्यूपत्र वाचनात कळलं की " पुण्यातलं सगळं रागिणीच होतं.आनंदला बाबांनीच घर आणि व्यवसायाला भांडवल दिलं होतं. तसा उल्लेख करून बाबांनी त्याला त्यांच्या बॅंकेच्या खात्याचा आणि एफ.डींचा वारस केलं होतं.
रागिणी आणि आनंद शेतघराच्या हक्काविषयी ऐकायला उत्सुक आहेत ते त्यांच्या बोलण्यातून जाणवत होतं.
शेवटचा पॅरा अमृताला पत्र लिहीलं होतं.वकीलांनी ते मोठ्यानं वाचायची अमृताची परवानगी घेतली.
अमृता,
वारस म्हणजे फक्त इस्टेटीवरचा हक्क नसतो.तर त्या माणसांनी दिलेल्या संस्कारांचा,कलेचा वारसा पण असतो. तू तुझ्या आईचे संस्कार आणि माझं गाणं वारसा हक्कानी मिळवलं आहेस.
मी हे शेतघर तुझ्या आईसाठी घेतलं होतं. मला ते तिच्या नावावर करायचं होतं.पण माझ्या मूर्खपणामुळे मी तसं करू शकलो नाही.आता मात्र मी हे तुला वारसा हक्कानी देतोय.नाही म्हणू नकोस.
जमलं तर इथे तुझ्या आईच्या नावानं कोणत्याही कलेला प्रोत्साहन देणारं विद्यालय सूरू कर.ही माझी शेवटची इच्छा आहे असं समज. तुझा--बाबा.
मृत्यूपत्राचं वाचन पूर्ण झालं होतं.
रागिणीनं तानीबाईंना रागाने हाक मारली."तानीबाई, वरच्या खोलीतून माझं सामान आणा.सगळं अगदी सगळं! तानीबाई पण लगेच म्हणाल्या"आणतू की, अगदी झाडून सगळं आणतो.
आनंदला हे इतकं अनपेक्षित होतं की तो काहीच न बोलता बसून राहायला होता.
अमृताला खूप रडाव असं वाटतं होतं पण नुसतीच घुसमट होत होती.आत्या जवळ आली, तिला जवळ घेतलं आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली" अमृता,अग तू खूप लाडकी होतीस दादाची! त्याच शेतघर स्वीकारलं तर आईला गमावण्याची भीती वाटतेय ना, नको घाबरूस! आनंद, रागिणी दादाच्या आणि वहिनीच्या ह्या शेतघराचे कधीच वारस होऊ शकत नाहीत.आणि वहिनीला हे समजावावही लागणार नाही. ती तेवढी सुज्ञ नक्कीच आहे"
आत्याच्या बोलण्यानी आनंद हमसाहमशी रडू लागला आणि त्याला तसं रडताना बघून अमृतानी पण आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली.
- ललिता छेडा.

भावस्पर्शी कथा आहे. शेवटी कलाकार कलेचा वारसा पुढे चालू ठेवण्याचा संदेश देतो. अम्रुताच्या भावना मनाला भिडतात. पन्नासावी कथा लिहिलीत खूप छान वाटले.अभिनंदन।
ReplyDeleteपन्नासाव्या कथे बद्दल मनापासुनअभिनंदन.
ReplyDeleteविषया वविध्य खुपचआहे
खूपच सुरेख! वाचताना गुंतुन गेले !
ReplyDeleteHearty congrats on half century story !!!
आपल्या50 व्या कथेसाठी हार्दिक अभिनंदन
ReplyDelete