Thursday, May 23, 2019

कवडसा

                      

              डॉ.नील  लांज्या जवळच्या गावात आजीच्या घरी पोचले तेव्हा सकाळचे साडेआठ वाजले होते.रात्रभर ड्रायव्हिंग करून ते खूप दमले होते.तरी दोन वेळा धाब्यावर जेवले तेव्हा आणि पहाटे चहा प्यायल्यावर त्यांनी तासभर गाडीतच झोप काढली होती. त्यांना देवळाजवळ गाडी लावताना बघून बयो धावतच बाहेर आली.
      "अरे, नील दादा तुम्ही कसे अचानक? तुम्ही तर जून महिन्यात येणार होतात ना? बयो प्रश्र्न विचारत त्यांचं सामान काढत होती.तिच्या लेकीने डॉक्टरांना तांब्यात पाणी आणून दिलं.पाणी इतकं गार होतं की त्यांच्या शरीरातून एक शिरशिरी येऊन गेली.फ्रीजशिवाय इतका गारवा! त्यांना तसं विचारात बघून बयो हसली"आता  उतारावर पायर्‍या आहेत. काळजी नका करू. नीलला आठवलं त्या उतारावर तो किती वेळा पडला असेल त्याची खिजगणतीच नाही.पण गेल्या वर्षी नंदीनी त्याची बहीण येऊन गेली तिनं सांगितलं होतं की आजीनं उतारावर छान पायर्‍या करून घेतल्या आहेत.
     तो आल्याची वर्दी बयोच्या मुलानं आजीला दिलीच होती.त्यामुळे खाली घरापुढच्या गोठ्याबाहेर येऊन ती डोळ्यांवर तिरपा हात ठेवून वर बघत होती. त्यानं पण हात हलवून आजीला आपण आल्याचं सांगितलं.आणि येतोय अशी खूण केली.
      बयो सामान घेऊन खाली पोचली होती.बाहेरूनच त्यानं  गणपतीला नमस्कार केला.आणि इकडे तिकडे बघत तो पायऱ्या उतरू लागला.आजूबाजूचा निसर्ग बघून सगळा थकवा दूर झाल्यासारखा वाटत होता.गोठ्याजवळ आजी उभी होती. "इंदर,राजा कधी निघालास? रात्रभर गाडी चालवत होतास? आणि एकटाच आलास? आजीचे प्रश्र संपत नव्हते. आणि सगळ्या जगासाठी तो नील होता पण आजी मात्र इंन्द्रनील मधला इंद्र म्हणायची आणि ते इतकं गोड उच्चारायची कि नीलला ते फार आवडायचं. नील पूढे येवून तिच्या पाया पडला.आणि म्हणाला "अग हो हो, मला घरात तर येऊ दे!...
       घराच्या पायऱ्यांजवळच्या डोलग्यात पाणी भरलेलं होतं.नीलनी नेहमीप्रमाणे त्यातून पायावर पाणी घेतलं. आणि पायर्‍या चढून वर आला तर बयो भाकरतुकडा घेऊन उभी होती.आणि तिच्या बरोबर मागे आजोबांचा मोठा फोटो होता.आणि नीलला बयोमध्ये आजोबांचा एकदम खूप भास झाला.आणि त्याला तो आणि नंदिनी सारखी बयोपण डावखूरी आहे हेही जाणवलं. आजोबा डावखूरे असल्याने आपण दोन्ही नातवंडे डावरे आहोत. हे ठीक आहे. पण ही कशी? घरात शिरताना आपण हे काय विचार करतोय? नीलनी सगळं मनातून झटकलं. 
     आजी समोर बसल्यावर त्यांना जाणवलं आपल्याला जाम भूक लागलीय.आणि आजींनी आपला आवडता गुरगुट्या भात केलाय.किती वर्षांनी आपण आजीच्या हातचा असा भात खाणार आहोत.
       खाऊन नीलनी ताणून दिली आणि त्यांना जाग आली तेव्हा चार वाजले होते.
      बाहेर आले तर आजी आणि बयो झाडांपाशी काही तरी करत होत्या. त्याला बघून आजीनं हातानेच 'ये खाली' अशी खूण केली. आजोबांच्या त्या घराची रचना उतारावर होती.सर्वात वरती पिढ्यानपिढ्यांच गणपतीचं देऊळ,त्यानंतर उतरल्यावर घर आणि गोठा, आणि खाली उतरलं की हौद आणि आजीची फळं,भाज्यांची बाग! आणि देवळासमोरच्या रस्त्यापलिकडे दीड एकरवर  आंब्याची कलमे आणि भाताची शेती. जे सगळं बयोचा नवरा बघत होता.
      नील  तोंडावर पाणी फिरवून आजीच्या दिशेने खाली उतरून गेला त्याला बघून आजी म्हणाली" झाली का झोप डॉक्टरसाहेब,हाॅस्पिटल बायकोवर टाकून आलात का? आजी बोलल्यावर नीलला रेवतीची त्याच्या बायकोची आठवण झाली, कालपासून आपण रागारागाने निघालो आणि फोनसुध्दा केला नाहीय.आई काळजी करत असेल." विचार नको करू, मी फोन करून तुझ्या आईला कळवलय तू पोचल्याचे! आजीनं नीलचा प्रश्र्न सोडवला होता. नाहीतरी आजीचं तिच्या सुनेशी म्हणजेच त्याच्या आईशी खूप गुळपीट होतं.
         नीलला अचानक जाणवलं की आईनं तर आजीला सगळं सांगितलंच असणार. पण त्यानं ठरवलं की आपणहून काहीच बोलायचं नाही.
       नील मांडी घालून हौदाच्या कट्ट्यावर बसला. पंप सुरू होता त्यामुळे पाणी हौदात पडत होते आणि त्याचे तुषार अंगावर उडत होते. "आजी अग, जून महिन्यात यायचंच होतं, मी विचार केला  थोडं आधी जाऊन तुझ्याशी बोलून घ्यावं आणि पेपर तयार करून घ्यावेत म्हणजे रेवती येईल तेव्हा वेळ जाणार नाही.आणि मला पण चेंज हवाच‌ होता. आजी सुचक हसली. जणू काही म्हणत होती " तू लपव पण मला सगळं कळलाय!
     वरून चहा घेऊन बयो आली आणि पुन्हा एकदा नीलला आजोबांची आठवण झाली. तिनं चहाचा कप नीलच्या हातात ठेवला आणि म्हणाली" रात्री जेवायला काय करू? "काहीही चालेल, मी थोडा गावांत फेरी मारून येतो" नील चहाचा कप ठेवून हौदावरुन उतरत म्हणाला.
      आधी वरती देवळात जायचं त्यानं ठरवलंच होतं. देवळात बयोची मुलगी गाभाऱ्यात काही तरी करत  होती.तिला बघून नीलच्या मनांत आलं की ही बयो आपल्यापेक्षा जवळजवळ वर्षभरानी लहान पण हिची मुलं किती मोठी आणि आपला पार्थ तर अवघा आठ वर्षांचा आहे.
     पार्थची आठवण झाली आणि तो हरवल्यासारखा देवळातल्या मंडपात बसला.
      त्याला रेवतीशी आपलं झालेलं भांडण आठवून वाटलं किती छोट्या गोष्टी वरुन आपण आरडाओरडा केला. 
       त्यादिवशी सकाळी हाॅस्पिटलमध्ये कोणत्यातरी पेशंटला भेटायला आलेला श्रीराम त्यांच्या केबिनमध्ये आला आणि  रेवतीला बघून अगदी सहजपणे म्हणाला" कशी आहेस रेवती? किती वर्षांनी भेटतेयस! मग रेवतीनी ओळख करून दिली"हा श्रीराम, आमचा जुना शेजारी, आमच्या दोन्ही घरांत खूप जिव्हाळ्याचं नातं होतं."इतकं की आमच्या दोघांचं लग्न जवळजवळ ठरलेलंच होतं."श्रीराम हसतहसत म्हणाला.
    "मग कुठे माशी शिंकली? आपण थोडं कुत्सित स्वरात विचारलं.आणि रेवतीनं चमकून आपल्याकडे बघितलं."अरे डॉक्टरसाहेब,तुम्ही सिरीयसली घेतलं! झालं असं की  मीच एका मुलीच्या प्रेमात पडलो आणि रेवती तुमची झाली."श्रीरामच्या बोलण्यातला उपरोध नीलला प्रचंड संताप देऊन गेला.रेवतीनी श्रीरामकडे फारसं लक्ष न देता त्याच्यासाठी काॅफी मागवली आणि त्याच्याशी संबंधित पेशंट बद्दल बोलणं सूरू केल.काॅफी आणि बोलणं संपल्यावर "चल श्री,आम्ही दोघेही जरा बिझी आहोत तेव्हा नंतर भेटूया"असं बोलून रेवतीनं त्याला अक्षरशः केबिन बाहेर काढलं.नंतर दुपारच्या जेवणापर्यंत आपण उगीचच चिडचिड करत होतो.आठवून नीलला हसू आलं. देवळात तो एकटाच बसला होता. ती शांतता, समोरची सुंदर मुर्ती त्याला खूप रिलॅक्स वाटलं. त्याला आठवलं, आपण घरी आल्यावर किती भांडलो रेवतीशी की तिनं लग्नाआधी, लग्नानंतर कधीच श्रीरामविषयी का नाही सांगितलं. तिचं त्याच्यावर प्रेम होतं का?जर होतं तर तिनं माझ्याशी प्रेमविवाह कसा केला.असं काहीही आपण बडबडलो. आणि हे सगळं आपण वेड्यासारख आईसमोर बोललो. नीलला रेवतीची खूप आठवण आली. ती सारखी म्हणत राह्यली "अरे, इतकं काही सिरीयसली आमच्या घरातून बोललं जात नव्हत. मी तर कधी त्याच्या बद्दल असा काही विचारदेखील केला नव्हता.नीलला वाटलं आपण येवढा आरडाओरडा का केला? आपण हल्ली रेवतीच्या होणार्‍या कौतुकामुळे जरा जेलस होतोय का? का पेशंट पण रेवतीच हवी असा आग्रह धरतात म्हणून आपली चिडचिड होतेय, विचारांनी नील एकदम दचकला. 
       आपण दोघंही गायनॅक, रेवतीनी दोन्ही घरातल्या मंडळींना समजावून लग्न थाटामाटात न करता कोर्ट मॅरेज करून खर्च वाचवला आणि त्या पैशातून आपण हाॅस्पिटल काढलं. 
      रेवती आहेच तशी विचारांनी स्पष्ट, गोड बोलून माणसांना जोडणारी!! नीलला वाटलं फोन करून तिची माफी मागावी. पण पुन्हा त्याच्या मनात आलं की तिनं इतकं महत्त्वाचं माझ्या पासून लपवलं आणि मी कशाला माफी मागू..... डोळे बंद करून बसलेल्या नीलला कसलीतरी चाहूल लागली. त्यानं डोळे उघडले तर समोर आजी उभी होती. "अरे,तू वर चढून आलीस! 
नील उठून उभा राहिला.
      "इंदर, अरे तू गावात जाणार होतास ना? पण मला बयो म्हणाली तू इथेच बसलायस! चल आता मी वरती चढून आलेच आहे तर गांवात जावून भागवत वकीलाला उद्या संध्याकाळी बोलवून येऊ" आजी ठरवूनच आली होती.
"चल जाऊया, भागवत म्हणजे विनायक ना? नीलनी विचारलं.
     अरे व्वा, आठवतोय का विनायक? लहान असताना तू आणि विनायक किती खेळायचात! तो वकील झाला पण त्यानं गावातच वकीली करायचं ठरवलं! शिवाय त्यांची शेती पण आहे ना! एकुलता एक असल्याने सगळं त्यालाच बघावं लागतं.बोलताबोलता विनायकच घर आलं होतं.
विनायक पडवीतल्या झोपाळ्यावर बसलेला होता,त्या दोघांना बघून विनायक उठून दाराशी आला"अरे, डॉक्टरसाहेब तुम्ही जून मध्ये येणार असं आजी म्हणाली होती.लवकर आलात? विनायकनी नीलशी हात मिळवून हसत हसत विचारलं.
    "हे बघ आधी अहोजाहो करू नकोस. आणि किती वजन वाढवलयस! नील पण मोकळेपणाने बोलत होता.
     त्या दोघांना तसं बोलताना बघून आजी आत गेली.
     " आजी,ग्रेट आहे ना! चौर्‍याएंशी वर्षाला पण किती अॅक्टीव आहे नाही.विनायक पाठमोऱ्या आजीकडे बघून म्हणाला.
       कामाचं ठरवायला उद्या संध्याकाळी विनायकनी आजीच्या घरी यायचं ठरलं. तेवढ्यात नीलला रेवतीचा फोन आला.तिनी दोन दिवसाचं सर्व पेशंटस् चे अपडेट दिले.तिचं तसं औपचारिक बोलणं नीलला जाणवत होतं.पण त्यानंही तिला तशीच उत्तरं दिली. 
       रात्रीची जेवणं झाली आणि नील बाहेर अंगणात आला.पाठोपाठ आजी पण आली.
        "आजी,ही बयो इतकी कशी आजोबांसारखी दिसते" न राहवून नीलने आजीला विचारलं.
       आजीनं मोठा सुस्कारा सोडला आणि म्हटलं"तू  डाॅक्टर आहेस ना?मग समजलं नाही ती तुझ्या आजोबांचीच मुलगी आहे.
       "अग पण ती माझ्यापेक्षा वयाने लहान आहे. असं कसं होईल?नीलला कळत होतं पण मनाला पटत नव्हतं.
      "हे सर्वांना माहीत असलेलं गुपित आहे. फक्त तू पहिलाच आहेस ज्यानं मला विचारलं.आजी थोडी अस्वस्थ झालेली जाणवली. "जाऊ दे आजी, तुला त्रास होत असेल तर नको बोलूया हा विषय! नीलला वाटलं आपण किती घाई करतो बोलायची!
       नाही आता ऐक, तुझ्या वेळेस तुझ्या आईचं बाळंतपण करायला मी मुंबईला राह्यले होते. तेव्हा बयोचे आई-वडील शेती, देऊळ सर्व बघायचे.त्यांना मुलबाळ नव्हतं. ती दोघं इथेच देवळातल्या खोलीत रहायचे. मी तीन महिने त्यांच्याच जीवावर पहिल्यांदा हे घर सोडून इतके दिवस मुंबईला राह्यले होते.
      "पूढे काही बोलू नकोस! नील आजीकडे न बघता म्हणाला.
     "ऐक रे राजा, पहिल्यांदाच मी हा विषय कोणाशी तरी बोलतेय".आजीचे शब्द रात्रीच्या शांततेला चिरत जात होते." मी अनाथ होते, मामांकडे लहानाची मोठी झाले सोळाव्या वर्षी माझं लग्न तुझ्या आजोबांशी झालं. आजोबांनी मला खरंच खूप प्रेम दिलं. त्यामुळे बयोच्या जन्माआधी तिच्या आईनं आणि तुझ्या आजोबांनी त्यांची चुक कबूल केली.माझ्यावर तर आभाळ कोसळलं होतं.पण कुठे जायचं हे घर सोडून काहीच कळत नव्हतं. बयोच्या जन्मानंतर दोन दिवसांत तिची आई गेली.आणि मी पुढे होऊन बयोची जबाबदारी घेतली.तिला लहानाचं मोठं केलं, लग्न करून दिलं, दहा वर्षापूर्वी तुझे आजोबा गेले. बयोच्या दिसण्यामुळे सर्वांना कळतं पण मला कोणी काही विचारत नाही.
       "इंदर बेटा आपल्याला दुखवणार्‍याला माफ करणं खूप कठीण असतं त्यापेक्षा जास्त कठीण असतं आपलं  दुःख आपण विसरलोय असं लोकांना दाखवणं. 
     आजी कमरेवर हात ठेवून उठली आणि घराकडे जड पावलांनी जाऊ लागली.नीलला रेवती ची खूप आठवण झाली त्यानं घड्याळ बघितलं एक वाजून गेला होता.
      सकाळी  उठल्यावर नील बाहेर आला.अंगणातल्या डोलग्यातल्या पाण्यावर कवडसा पडला होता. आणि नीलला आठवलं'आपण पाण्यात हात घातला की तळ वरती आलेला दिसायचा आणि हात मात्र खूप आत बुडून जायचा. त्याच्या मनात आलं'असाच कवडसा आपल्या मनावर पडलाय ज्यानं आपल्या  खोल असलेल्या मनाचा तळ उंचावलाय! सहन करणारे,त्याग करणारे  विचारांनी किती खोल असतात.
       त्यानं रेवतीला फोन लावला" साॅरी, रेवती मी खूप चुकीचं वागलो. रेवतीला काय ‌बोलावं कळत नव्हतं, तिच्या डोळ्यातलं पाणी बघून नीलच्या आईनं ‌ तिच्या हातातून फोन घेवून"या आता घरी आणि बोला काय बोलायचं ते, दोन दिवस पोर येवढस तोंड करून आहे.आधी इथे येऊन तिची समजूत काढ आणि मग पुढच्या आठवड्यात सगळेच जाऊया आजीकडे! असं म्हटलं. नीलला कळलं तिथे काय घडलं असेल ते!!!
     संध्याकाळी विनायक आला आणि नीलनं बोलायला सुरुवात केली " आजीला हे सगळं माझ्या नावांवर करायचंय आणि त्यासाठी ती गेली चार पाच वर्षे मागे लागली होती. त्याबद्दल मी माझं मत आजी समोर सांगू इच्छितो.
       नीलनी बयोला पण बोलावून तिथे थांबायला सांगितलं.
      देवळाचं आपण ट्रस्ट करूया. त्यात मी,नंदीनी दोन्ही आत्यांची मुलं असतील.
      हे घर आणि परिसर रेवतीच्या नावांवर करावं असं मी सुचवतो.
        आणि महत्वाचं म्हणजे रस्त्यापलिकडची दीड एकर जमीन बयोच्या नावांवर करायची.कारण इथलं सगळं आणि आजीला तिच सांभाळणार आहे. नील बोलायचा थांबला आणि आजीनं त्यांच्या डोक्यावरून हात फिरवला.जणू ती त्याच्याशी सहमत असल्याचं सुचवत होती. 
          तिला कळलं होतं की आपल्या नातवाच्या मनात पडलेल्या कवडशांनी त्याच्या मनाचा तळ उंचावलाय.
  विनायक उठून उभा राहिला आणि नील जवळ येऊन म्हणाला"मित्रा, खूप छान वाटणी केलीस. मी तुझ्या मनाप्रमाणे सर्व कागदपत्रं तयार करून ठेवतो. फक्त एक इच्छा आहे, इतका मोठा डाॅक्टर आहेस त्याचा ह्या गावाला उपयोग होईल असं काही तरी कर."
      नील उठून आजीच्या पाया पडला आणि म्हणाला"आजी, उद्या जातोय,सगळ्यांना घेऊन जुनच्या पहिल्या आठवड्यात येईन.विनायक तुझी सुचना मी नक्की लक्षात ठेवेन. हे सगळं ऐकत असलेल्या बयोला अश्रू आवरत नव्हते.तिच्याजवळ येऊन नीलनी "ऐ,वेडाबाई रडतेस काय तू पण आता  आमच्या घरातलीच आहेस, चल सर्वांसाठी चहा कर. असं म्हटलं.
     घरात जाताना नीलनं डोलग्यात हात घालून ते पाणी स्वत:वर उडवलं. कवडसा आपलं काम करून नाहीसा  झाला होता.
                                                                             -ल़लिता छेडा



                             गेलं वर्षभर 'एकटेपणाशी मैत्री' ह्या विषयावर दर गुरुवारी संध्याकाळी मी छोट्या कथा ह्या ब्लाॅगवर लिहिल्या. त्यातली ही शेवटची बावन्नावी कथा. ह्या कथांना दिलेल्या प्रतिसादाबद्दल सर्व वाचकांचे मनःपूर्वक आभार!! 
                                                        

Thursday, May 16, 2019

जाणीव

अंधेरीच्या आमच्या फ्लॅटच्या समोरचे दोन वन बेडरूमचे फ्लॅट बिल्डरने दोन्ही टाॅवरची कामं पूर्ण होईपर्यंत स्वत:साठी ठेवले होते. पहिल्या मजल्यावरच्या ह्या दोन्ही फ्लॅटच्या किल्ल्या कायम आमच्याकडेच असायच्या.कारण आमच्या ह्यांचा समाजसेवी स्वभाव! सोसायटी रजिस्टर होईपर्यंत बिल्डरला मदत करायचं ह्यांनी मनावरच घेतलं होतं."अग, रिटायर्ड झाल्यावर मला किती आवडतं काम मिळालंय ते बघ! ह्यांच उत्तर ठरलेलं होतं.आणि ते खरं पण होतं.
      आम्हा एकंदर आठ बिर्‍हाडांना जागा दिल्यावर बिल्डर दोन टाॅवरच बांधकाम सहज करू शकत होता.आणि तसं त्यांनं ते केलं.आम्हाला प्रत्येकाला टू बेडरूमचे ब्लाॅक दिले होते.आमच्या मजल्यावर आम्ही जुने तीन भाडेकरू वैद्यमामी, सावंत काका, आम्ही आणि बिल्डरचे दोन ब्लाॅक जिथं त्यांचं आॅफिस होतं.त्यामुळे आमच्या मजल्यावर सतत वर्दळ असायची. आणि आम्ही सगळे जुने शेजारीअसल्यामुळे दरवाजे उघडेच असायचे.
      आणि मग वर्षंभरात दोन्ही टाॅवरची सोसायटी रजिस्टर झाली आणि आमचे हे त्या‌ सोसायटीचे सेक्रेटरी झाले. आणि नोकरी पेक्षा जास्त बिझी झाले. शेजारच ऑफिस पण बंद झालं.आणि आमचे बिल्डर प्रतापभाईंनी त्या ब्लाॅकची स्वच्छता, रंगरंगोटी करून किल्ल्या  आमच्याकडे ठेवल्या. कारण आता तो विक्रीसाठी तयार झाला होता.
       पंधरा-वीस दिवसात हे म्हणाले" ऐकलंस का?समोरचे दोन्ही ब्लाॅक विकले गेले. मी पण लगेच विचारलं"अरे व्वा,न बघता दोन्ही फ्लॅट विकत घेणारे कोण आहेत हे टिकोजीराव? 
    हे पण हसत हसत म्हणाले" खरंच टिकोजीराव आहेत! इथे आॅफीस होतं तेव्हा बघून गेले होते म्हणे, आता बुकिंग करताहेत.एक ब्लाॅक मेघना साने आणि दुसरा अखिलेश शर्मा! आहे की नाही गंमत आणि दोघंही एकमेकांचे जवळचे मित्र आहेत."तुम्हाला बरं इतके डिटेल्स कळले. अग, मी जरा कामासाठी  प्रतापभाईंच्या आॅफिसमध्ये गेलो होतो तेव्हा नेमके दोघं तिथं आले होते. उद्या सकाळी येणार आहेत. शर्मा घर बघायला" ह्यांच्या शेवटच्या वाक्याला वैद्यमामी आल्या आणि"अगोबाई, कोणी शर्मा येणार आहे का शेजारी?" कपाळावर हात लावून उद्गारल्या. मग पुन्हा एकदा ह्यांनी त्यांना सगळी गोष्ट  सांगितली.सगळं ऐकल्यावर मामी"काय तरी बाई हल्लीच्या पिढीची तर्‍हा !  पण उद्या ती मंडळी आल्यावर मला बोलवा बरं! असं मला सांगायला विसरल्या नाहीत.
      दुसऱ्या दिवशी सकाळी दहाच्या सुमारास जीन्स,टी शर्ट घातलेल्या दोघंजणानी आमच्या दाराची बेल वाजवली." समोरच्या ब्लाॅकची किल्ली हवी होती! बोलक्या डोळ्याची, गोरीपान, थोडीशी बुटकी पण स्मार्ट मुलगी दारात उभी राहिली होती.तिच्या हातात किल्ल्या ठेवताना मी सहज म्हटलं"आत या, पाणी प्या.मग उघडा दार. त्याबरोबरच त्याला शोभणारा चष्मा लावलेला, गोरापान असलेला तो मुलगा सरळ आतच शिरला."मेघना,तुम जाओ सब अच्छे-से नक्की करलो, मैं यहां काकीजी के घर पे बैठा हूं। ती अर्थात मेघना चिडून म्हणाली" अरे,  अखिलेश,तुझ्या घराचं पण ठरवायचंय ना! त्या इंटिरियरला नंतर वेळ नाहीये."आता हूं बाबा, तुम्हारे रूमसे शुरू करो। तबतक मैं चाय पीके आता हूं। अखिलेश सोफ्यावर येऊन ह्यांच्या शेजारी बसला होता.मला त्याचा मोकळेपणा आवडला होता. त्या दोघांची चाहूल लागताच वैद्यमामी आल्याच होत्या. अखिलेश ह्यांच्या शेजारी छान मांडी घालून बसला होता. "काकी,आपके दो बेटे है ना? गप्पा सुरूच झालेल्या होत्या." हो रे बाबा, एक बंगलोरला रहातो, शादीशुदा है. आणि दुसरा शिकतोय,पुण्याला असतो. त्यामुळे आम्ही इथं एकटेच! मी पण मोकळेपणाने सांगितलं आणि चहा टाकायला आत जाऊ लागले तर म्हणतो कसा "क्यूं मैं आ गया हू ना!"पूढे लगेच"काकी,मुझे बडे मगमें चाय देना,मुझे वो बशी नहीं चाहिए। असं म्हणून हा मोकळा. वैद्यमामी माझ्या बरोबर स्वैपाकघरांतच होत्या." काय बाई हा मुलगा, ओळख ना पाळख. कसा वागतोय घरातल्यासारखा!"वैद्यवहिनी,असतात काही माणसं अशी मनमोकळी, हे बघा आता तुम्ही हा चहा घेऊन बाहेर जा आणि मी त्या मेघनाला चहा देऊन येते.मी दोन कप घेऊन तिथून निघालेच. वहिनींना तेच हवं होतं.
      परत येईपर्यंत मामी आणि अखिलेश भाच्याची गट्टी जमली होती.
        मला बघितल्यावर "अबसे ये हमारी भी मामी बन गयी है" अखिलेश चहाचा कप ठेवत म्हणाला.
     "अरे, तुम्ही शर्मा म्हणजे... वैद्यमामी मुद्यावर आलेल्या होत्या.
    "मामी, हम लोग मारवाड़ी है" अखिलेशच्या बोलण्यानं मामींनी श्र्वास सोडला आणि म्हटलं"म्हणजे"
      "हां,हम लोग पक्के शाकाहारी! अखिलेश एक परीक्षा पास झाला होता. वैसे मामी,शर्मा तो पंजाबी,यु. पी. में भी होते हैं। 
     तुम्ही कुठचे?मामी सुरू झाल्या होत्या.
      "आम्ही,बनारसचे  तिथे माझ्या बाबुजींच मोठं मिठाईचं दुकान आहे.मेरे औरभी दोन भाई है एक सबसे बडी बहन है। मुझे फिल्म लाइन में जाना था तो मैंने दिल्लीकी फिल्म इंन्स्टीट्युडकी पदवी लेकर बम्बई नसीब आजमाने आया हूं। मैं फिल्म एडिटिंग करता हूं, आणि मेघना कुठे भेटली तुला?मामींना सगळ्या प्रश्नांची उत्तरं लगेच हवी होती. पण तेवढ्यात मेघना रिकामे कप घेऊन आली आणि ते टेबलावर ठेवून 'thanks'  म्हणून अखिलेशकडे बघून 'चलो' म्हणून बाहेरचं पडली.अखिलेश तिच्या जाण्याकडे डोळे मिचकावत आम्हा सगळ्यांना "बाय"म्हणून तिच्या मागे पळायची अॅक्शन करत गेला. 
     त्यानंतरच्या अवघ्या दोन महिन्यात खूप धावपळ करून मेघनानी दोन्ही ब्लाॅक सुंदर सजवले. स्वैपाकघर एकच होतं.अखिलेशच्या हाॅलमध्ये खिडकीजवळ छोटा ओटा केला होता आणि खिडकीतच छानशी दोन कपाटं केली होती.ज्यात गरजेपुरती स्वैपाकाची भांडी,सामान ठेवलं होतं.अखिलेश चहा, खिचडी करू शकत होता. मधली भिंत तोडून काचेची खिडकी केली होती. त्यामुळे लग्नानंतर ती खिडकी उघडली की मोठा फ्लॅट तयार!
       रोज सकाळचा नाश्ता आणि रात्रीच जेवण ती दोघं एकत्र घेत असत. मेघनाच बनवत असे. त्या दोघांचं लग्न ठरलेलंच होत.मेघना एम्.एसी करून मोठ्या काॅलेजमध्ये नुकतीच नोकरीला लागली होती.पण सध्या लग्न न करण्याचा निर्णय मेघनाचाच होता.
    अखिलेशशी गप्पा मारताना कळलं होतं की मेघनाचे वडील रेल्वेत नोकरीला होते.त्यांची बनारसला बदली झाली आणि अखिलेशच्या बाबूजींच्या वाड्यात ओळखीने त्यांना जागा मिळाली.तेव्हाच अखिलेशचा जन्म झाला होता.त्यानंतर त्या दोघांची इतकी घट्ट मैत्री झाली की मेघनाच्या बाबांच्या सर्व नातेवाईकांनी बाबूजींच्या वाड्यावर राहून काशीयात्रा केली.आणि बाबूजींच्या कितीतरी नातेवाईकांनी मेघनाच्या घरी राहून मुंबई बघितली. दोन्ही घरांत एक आपुलकीचं नातं निर्माण झालं होतं.आणि त्यात अखिलेशनी मेघनाशी लग्न करायची इच्छा प्रगट केली आणि दोन्ही घरांनी आनंदाने परवानगी दिली होती.
       अचानक मेघनाच्या बाबांचं हार्ट अॅटॅकनी दु:खद निधन झालं.आणि एकुलत्या एक मेघनावर आईची जबाबदारी आली.  मेघनाच्या आईचं रहात घर पागडीच होतं.त्यामुळे स्वत:च घरं घेऊन आईला तिथं आणायचं हे तिचं ठरलेलंच होतं.
    एक दिवस अचानक वैद्यमामींनी अखिलेशला विचारलं" तुमची प्रेमाची गाडी अडलेय कुठे?तुझे आईवडिल येऊन गेले किती छान मंडळी आहेत ती,मेघनावर तर किती प्रेम करतात.आता तर डोंबिवलीचं घर बंद करून मेघनाच्या आई पण इथं पावसाळ्यानंतर रहायला येतील.पण तुमचं ठरत का नाहीये?
      "सच बोलू मामी, उसका कहना है कि उसको मेरे प्यारका 'एहसास' नहीं हो रहा है उसे मुझसे प्यार है कि नहीं मालूम नहीं हो रहा है। 
     उसके पिताजी के अचानक जाने से वो confused है।अखिलेश खरं मनातलं बोलला होता.
  ‌   अरे हा 'एहसास' असतो तरी काय? मामींचा भाबडा प्रश्न!
       'जाणीव' मी थोडंसं विचार करून दिलेलं उत्तर.
        अजून कसला एहसास हवाय तिला?तुला तर आता कामं पण मिळायला लागली आहेत.?मामींना अजूनही एहसास कळला नव्हता.विषय तिथेच अर्धवट राह्यला.
     पण मामींनी मात्र अर्थ विचारून शोध लावला असावा.
        थोड्याच दिवसात मामींच्या कोकणात रहाणाऱ्या भावाची मुलगी वीणा,  मामींकडे रहायला आली. मुलबाळ नसल्याने मामा मामी वीणाच्या येण्यानं खूप खूष झाले होते. मामीच्या स्वैपाक करण्याला एक चांगलं कारण मिळालं.कोकणातच लहानाची मोठी झालेली वीणा थोडी शहरांत रूळावी.म्हणून आणि तिच्या लग्नाचं मामींनी बघावं ह्या इच्छेनं तिला इथं मामींच्या भावानं पाठवलं होतं.आल्याआल्या तिची अखिलेशशी छान गट्टी जमली आणि सावंतकाकांच्या सुनेनंपण तिच्याशी मैत्री केली.त्यामुळे आमचा मजला धमाल मस्तीची एक जागा झाली.सगळ्यांच्या सल्ल्याप्रमाणे तिनं अखिलेश ज्या कम्प्युटर क्लासमध्ये वेळ जावा आणि पैसा मिळावा ह्यासाठी शिकवत होता.तिथेच वीणाने आणि सावंत काकांच्या सुनेने देखील कम्पुटर शिकायला अॅडमिशन घेतली होती.रोज तिघं सकाळी बहूतेक एकत्रच निघत असत.संध्याकाळी आमच्या घरी पत्ते,कॅरम,गाणी अशी धमाल चालायची.अनेकदा तिन्ही घरातले आम्ही एकत्रच जेवायचो.
      ह्यात मेघना खास इंन्व्हाॅल्व्ह नसायची.अखिलेश मात्र दोन्ही  बिल्डींगचा हीरो होता.
     त्यादिवशी मेघना कामावर जाताना काही तरी विसरली आणि तिनं अखिलेश, वीणाला अखिलेशच्या बाईक वरून जाताना बघितलं.आणि पहिल्यांदाच आपणहून माझ्या घरी येऊन विचारल " ती शेजारची पण जाते ना वीणा बरोबर शिकायला?
    "अग,सावंतांकडे आज सकाळी जेवायला पाहूणे येणार आहेत त्यामुळे ती नाही गेली.का ग?"मी विचारलं पण ती गुळमुळीत 'सहजच' असं म्हणून गेली.
     त्यादिवशी संध्याकाळी कॅरम खेळताना अचानक मेघना आली आणि अखिलेशच्या जवळ जाऊन बसली.तो पण थोडा गडबडला पण खूष ही झाला होता."वीणा कुठे दिसत नाही?" मेघनानी इकडे तिकडे बघत मला विचारलं. लगेच अखिलेश म्हणाला"अरे, वो तो कुछ अपने गांव की स्पेशल डिश बना रही है। आज उसकी तरफ से ट्रीट है। वो क्लासमें फर्स्ट आयी है ना।
       मेघनानी काही तरी विचार केला आणि म्हणाली" तोपर्यंत मी काॅफी करून आणते.....ती आत गेल्यावर मामी लगेच म्हणाल्या"क्या रे बाबा,  लगता है,तुझा तो एहसास की फैसास होतोय की काय? 
      अखिलेश थोडासा आश्र्चर्यचकीत होऊन म्हणाला "बदलाव तो है, लेकीन आपको कैसे पता चला?
       मामी आणि मी दोघी एकमेकींकडे बघून फक्त हसलो."एकटं पडलं आणि असुरक्षित वाटलं की असंच काहीसं होतं."मामी हळूच म्हणाल्या.
     काॅफी आणल्यावर मेघना अखिलेशकडे बघून म्हणाली " मी शुक्रवारी आईला चार दिवसांसाठी इथे आणते.आपल्या घरी आपल्या ह्या गृपला रविवारी दुपारी जेवायला बोलवू या.
      त्यादिवशी वीणाने केलेले कोळाचे पोहे सर्वांनाच खूप आवडले.वीणाचं खूप कौतुक झालं. मेघना पण सगळ्यांच्यात मिसळून अखिलेशच्या जोडीनं वावरत होती.
        रविवारची मेघनाची पार्टीपण खूप छान झाली. मेघनाच्या आईला मेघनाचं हे बदलेले रूप आवडलं होतं. त्यामुळे त्यांनी पण मनापासून स्वैपाक केला होता. 
      जेवणं झाल्यावर सावंत काका अगदी सहजपणे म्हणाले" मामी, तुमच्या वीणाचा, आता लग्नाचा काय विचार? अखिलेश.... त्यांचं वाक्य पूर्ण व्हायच्या आत मेघना अखिलेशच्या जवळ उभी राहून त्याच्या दंडाला धरून म्हणाली"अखिलच तर माझ्याशी लग्न ठरलय ना, तिनं हे सगळं इतकं अचानक आणि तिच्याही न कळत केलं की अखिलेशसह सर्वचजण स्तब्ध होऊन गेले.
      शांतता भंग करून सावंत काका म्हणाले" अग मेघना ते तर जगजाहीर आहे. तुझ्या आईसकट आम्ही फक्त तुम्ही कधी जाहीर करताय त्याची वाट पहातोय! मेघनाला आपण केलेली घाई कळली होती.ती लाजली आणि त्याबरोबर अखिलेशनी चक्क सर्वांसमोर तिला मिठीच मारली.
       "जाणीव नव्हे नव्हे 'एहसास' झाला बरं एकदाचा! मामींनी अखिलेशला चिडवायची संधी मिळवली होती.
     "अरे बाबांनो माझं बोलणं तर ऐका, सावंत काका हसत हसत म्हणाले."मी ह्या निमित्ताने माझ्या धाकट्या लेकासाठी वीणाला मामींकडे मागणी घालतोय.आणि ती दोघं एकमेकांना पसंत करतात हे मला अखिलेशनीच सांगितलंय. पण माझं बोलणं पूर्ण व्हायच्या आत मेघनानी तिच्याच प्यारका इजहार कर दिया। त्याबरोबर सगळेजण इतकं हसायला लागले की...
      हसण्याच्या त्या आवाजांच्या आवर्तात आमची चारही कुटुंबे जाणीवेच्या एका वेगळ्या पुलानी जोडली गेली होती.


                                                               -  ललिता छेडा.

Thursday, May 9, 2019

वारस

                   

                          हाय वेवरून गाडी चालवताना अमृताला खूप भरून येत होतं.आई आणि आत्या दोघीही गप्प गप्पच होत्या. पण त्या बाबांना बघायला यायला तयार झाल्या हेच अमृतासाठी खूप होतं....आत्या काही तरी कारणांनी बाबांना भेटायची तरी, पण आईनं मात्र गेल्या पंधरा वर्षांत भेटणं दूर बाबांच तोंड सुध्दा बघितलं नव्हतं. शेवटची भेटली होती शेतघराच्या वास्तुशांतीला आणि त्यावेळी अमृता बारा वर्षांची होती.
     गाडी चालवता चालवता नकळत अमृता भुतकाळात गेली.किती छान आयुष्य होतं आपलं दादरच्या घरात.आई-बाबा,आजी,आपण आणि धाकटा भाऊ आनंद! आपल्या पाचजणांच एक छोटंसं जग होतं.बाबा संगीतात आकंठ बुडालेले.दिवसभर घरातच संगीताचे क्लास घेत असत. एका शाळेत ही संगीत शिकवायला जायचे.रोज रात्री माझी खास शिकवणी असायची.माझा आवाजही चांगला होता आणि सुरांची चांगली जाण होती. 
        आई नोकरी करायची. सरकारी नोकरीत चांगल्या पोस्ट वर होती.आजी आम्हा दोघांना सांभाळायची. दृष्ट लागावी असं आयुष्य होतं आपलं. एक आत्या होती तिनं लग्नच नाही करायचं असं ठरवलं होतं.ती पण चांगल्या नोकरीत होती.आमच्या मजल्यावरच तिनं जागा घेऊन ती वेगळी रहात होती. आपलं घर लहान असल्यामुळे आपण जास्त आत्याकडेच असायचो. अमृताला जुन्या आठवणींनी मन चिंब करून टाकलं होतं.तिला आठवलं....
      अचानक रागिणी बाबांच्या क्लासच्या निमित्ताने आपल्या घरी आली.तिनंच बाबांना आठवड्यातले तीन दिवस पुण्यात क्लास सुरू करायला गळ घातली.ती पुण्यातलं मोठं प्रस्थ होतं.तिच्या मोठ्या मोठ्या लोकांशी ओळखी होत्या.तिच्या गोड बोलण्याला आम्ही सगळेच भुलले होतो. अमृताला आठवलं फक्त आई मात्र नको म्हणत होती.पण बाबा शनि,रवी,सोम पुण्याला जाऊ लागले.रागिणीकडे स्वत:ची जागा होती.अवघ्या तीन महिन्यांत बाबांचा छान जम बसला.त्यांना रागिणी मुळे चांगले कार्यक्रमही मिळू लागले. बाबांची अक्षरशः संगीतातली  घोडदौडच सूरू झाली होती.चारी बाजूंनी पैसा येत होता.
     ह्याच काळात बाबांनी तळेगाव जवळ एक शेत विकत घेतलं.स्वत:च फार्म हाऊस हे आईचं स्वप्न होतं. बाबा त्याला शेतघर म्हणायचे.
    आई आणि आत्या काहीतरी बोलत होत्या अमृताचं बिलकुल लक्षच नव्हतं.आत्या म्हणाली देखील "अमू,अग बरा होईल तुझा बाबा! इतकं टेन्शन नको घेऊस.
      अमृताला वाटलं ह्यांना कसं सांगू"काल रात्री आलेला फोन ते सिरीयस आहेत असाच होता.पण आपण ह्या दोघींना बाबा तुमची आठवण काढताहेत. असं सांगून यायला तयार केलं होतं. बाबांना कॅन्सर झालेला दोघींनाही माहित होतं.आत्या तर दोन तीन वेळा भेटून पण आली होती.आई मात्र  फार्म हाऊसच्या वास्तुशांती नंतर आजच जाणार होती.
      शेतघर जवळ येत होतं.आणि अमृताच्या डोळ्यासमोर शेतघराच्या वास्तुशांतीचा तो प्रसंग उभा राहिला. त्या दिवशी वास्तुशांतीच्या निमित्ताने आलेली मंडळी संध्याकाळपर्यंत परतली होती. रागिणी पण आता जाईल असं वाटतं असतानाच शेतघराच्या देखभालीसाठी ठेवलेल्या तानीबाईंना ती म्हणाली"माझ्या खोलीतून माझ्या कपाटातून काळी बॅग घेऊन ये.ती बोलून गेली आणि बाबा कावरे बावरे झाले.
       आईनी तानीबाईंना विचारलं" ह्यांची कोणती खोली? ताई,त्या जेव्हा साहेबांबरोबर रहायला येतात ना तेंव्हा वरच्या मजल्यावरच्या कोपऱ्यातल्या खोलीत रहातात.घराच बांधकाम सुरू असताना ते दोघं नेहमीच  उशीर झाला तर इथंच रहातात. तानीबाईंनी पूर्ण माहिती दिली.रागिणीच्या बाबतीत हे असं काही तरी असेल ह्याची आईला कुणकुण लागलीच होती.
        आई आम्हाला दोघांना घेऊन लगेच निघाली."इतक्या रात्री नको जाऊस".बाबानी केविलवाणा प्रयत्न केला.रागिणीनी हलकेच 'साॅरी'  म्हटलं पण आईचा संताप शब्दांच्या पूढे होता.
    हा संवाद  सर्वांसमोरच झाला.आजी,आत्यापण आई बरोबरच निघाल्या.बाबा त्यांना 'तुम्ही तरी थांबा' म्हणत होते पण आजीनं स्पष्टपणे नकार दिला होता.आठवणीतून बाहेर येताना नकळत अमृताचे डोळे भरून आले. 
    शेतघर आलं होतं.गाडी बघून बाबांचे सेक्रेटरी पानसे धावत आले.आईला बघून त्यांनी हात जोडले "बरं झालं वहिनी तुम्ही आलात! बोलत नाहीत पण तुमची वाट बघताहेत.
      आईला बघितल्यावर खरोखरच बाबा फ्रेश दिसायला लागले.आईनी पण त्यांची अवस्था बघून काहीही मनात न ठेवता त्यांच्यासाठी भुतकाळातली सगळी ओझी बाजूला ठेवली होती.
     अशीच होती आई, न बोलता एकटीने निर्णय घेणारी
त्या रात्री आम्हा दोघांना घेऊन निघाल्यावर मागे वळून न पाहणारी, बारावीनंतर पुण्याला शिकायला गेलेल्या आनंदला न अडवणारी, पण तो  बाबांच्या घरी रहातो आहे हे कळल्यावर त्याचे नांव टाकणारी! अर्थात तिचा राग योग्यच होता तो रहात होता ते घर रागिणीच होतं.आणि आनंद तिथेच रहातोय हे तिला बाहेरून कळलं होतं.
     आजसुद्धा आनंद तिथेच बाबांपाशी होता पण हिने त्याच्याकडे बघितलं सुध्दा नाही. 
      आईला जाणणार्‍या अमृतानं आणि आत्यानं मात्र तिच्या प्रत्येक निर्णयाचा आदरच केला.तिच्यासाठी अमृताने गाणं सोडून सी.ए. केलं.तिला सांगितल्याशिवाय त्या दोघी कधीच बाबांना भेटायला गेल्या नाहीत.
     संध्याकाळी बाबांनी अमृताला 'अजहू न आये बालमा' म्हणायला सांगितलं.ती गात असतानाच बाबांनी डोळे मिटले.एक पर्व संपलं होतं.
    आई लगेच निघाली.अमृता आणि आत्याला मात्र इथे रहा सांगायला विसरली नाही.
    तेरावा होईपर्यंत दोघीही तिथे होत्या. आनंद, रागिणी दुसऱ्या दिवशी गेले ते दहाव्याला आले.
    तेराव्यानंतर अमृता जायला निघाली तर रागिणीनी तिला थांबवलं."बाबांच मृत्यूपत्र उद्या वकील येऊन वाचणार आहेत" असं हळूच सांगितलं. "आम्हाला कोणालाच त्यात इंटरेस्ट नाही"अमृता थोडीशी तुटकपणेच बोलली.
      "तू हजर असणं आवश्यक आहे,तशी अटच आहे   असं वकीलांनी सांगितलंय" रागिणी आनंदकडे बघून बोलली.
      अमृतानी आईला फोन केला.आणि सगळं सांगितलं.आईनी पण 'ठीक आहे' असं म्हणून विषय संपवला.
    मृत्यूपत्र वाचनात कळलं की " पुण्यातलं सगळं रागिणीच होतं.आनंदला बाबांनीच घर आणि व्यवसायाला भांडवल दिलं होतं. तसा उल्लेख करून बाबांनी त्याला त्यांच्या बॅंकेच्या खात्याचा आणि एफ.डींचा वारस केलं होतं.
   रागिणी आणि आनंद शेतघराच्या हक्काविषयी ऐकायला उत्सुक आहेत ते त्यांच्या बोलण्यातून जाणवत होतं.
       शेवटचा पॅरा अमृताला पत्र लिहीलं होतं.वकीलांनी ते मोठ्यानं वाचायची अमृताची परवानगी घेतली.
        अमृता,
         वारस म्हणजे फक्त इस्टेटीवरचा हक्क नसतो.तर त्या माणसांनी दिलेल्या संस्कारांचा,कलेचा वारसा पण असतो. तू तुझ्या आईचे संस्कार आणि माझं गाणं वारसा हक्कानी मिळवलं आहेस.
     मी हे शेतघर तुझ्या आईसाठी घेतलं होतं. मला ते तिच्या नावावर करायचं होतं.पण माझ्या मूर्खपणामुळे मी तसं करू शकलो नाही.आता मात्र मी हे तुला वारसा हक्कानी देतोय.नाही म्हणू नकोस. 
    जमलं तर इथे तुझ्या आईच्या नावानं कोणत्याही कलेला प्रोत्साहन देणारं विद्यालय सूरू कर.ही माझी शेवटची इच्छा आहे असं समज. तुझा--बाबा.
    मृत्यूपत्राचं वाचन पूर्ण झालं होतं.
        रागिणीनं तानीबाईंना रागाने हाक मारली."तानीबाई, वरच्या खोलीतून माझं सामान आणा.सगळं अगदी सगळं! तानीबाई पण लगेच म्हणाल्या"आणतू की, अगदी झाडून सगळं आणतो.
      आनंदला हे इतकं अनपेक्षित होतं की तो काहीच न बोलता बसून राहायला होता.
       अमृताला खूप रडाव असं वाटतं होतं पण नुसतीच घुसमट होत होती.आत्या जवळ आली, तिला जवळ घेतलं आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली" अमृता,अग तू खूप लाडकी होतीस दादाची! त्याच शेतघर स्वीकारलं तर आईला गमावण्याची भीती वाटतेय ना, नको घाबरूस! आनंद, रागिणी दादाच्या आणि वहिनीच्या ह्या शेतघराचे कधीच वारस होऊ शकत नाहीत.आणि वहिनीला हे समजावावही लागणार नाही. ती तेवढी सुज्ञ नक्कीच आहे"
     आत्याच्या बोलण्यानी आनंद हमसाहमशी रडू लागला आणि त्याला तसं रडताना बघून अमृतानी पण आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली.
                                                                          - ललिता छेडा.

Thursday, May 2, 2019

घड्याळ


 नाना यायच्या आधी त्यांच्या देवपुजेसाठी फुलं काढून ठेवायची,त्यांना सकाळी फिरून आल्यावर प्यायला गरम पाणी, चहा द्यायचाय.ननी पेपर वाचायच्या  विचारात होत्या पण घड्याळाकडे लक्ष गेल्यावर ननीनी पेपर वाचायचा विचार बाजूला ठेवला. कारण आज जाताजाता चार गरम तिखटमीठाच्या पुर्‍या नाश्त्याला करून ठेव हे सांगायला नाना विसरले नव्हते.
      खरं म्हणजे आज सुनेने कामावर जायच्या आधी बाईकडून वेगवेगळ्या भाज्यांचे परोठे करून ठेवले होते.पण "मी ते जेवताना खाईन, सकाळचा नाश्ता जरा गरमच हवा"असं नानांच स्पष्ट मत होतं.
       ननींच सकाळचं आवरता आवरता साडेबारा कधी वाजले कळलंच नाही.नातू शाळेतून यायची वेळ झाली होती.तो आला की नाना त्याच्याबरोबर जेवतात.ही रोजचीच त्यांची जेवायची ठरलेली वेळ होती. मागचं आवरेपर्यंत नात काॅलेजातून येत असे.
      त्यांचं ननींना नेहमीच म्हणणं असे"मी कसा प्रत्येक गोष्ट शिस्तीत,वेळेत करत असतो म्हणूनच मला डायबिटीस वगैरे काही नाही.ननींच्या मनांत यायचं"सगळ्यांच्या  वेळा सांभाळताना मला कसा स्वत:साठी वेळ काढता येईल ते सांगा.खरं म्हणजे, आपल्याला पण हे सगळं करायला आवडतं त्यामुळे नाना म्हणतात तसा होतो डायबिटीस तर होऊ दे, हरकत नाही. ह्या विचारांनी नेहमी त्या मनातल्या मनात हसायच्या.
      एकंदरच ननी तश्या हसतमुख, समाधानी! पण नानांचा इगो आणि घड्याळ सांभाळताना मात्र त्या थकून जायच्या.
      माझ्या येवढी जबाबदारीची,वेळेची जाणीव घरात‌ कोणालाच नाही असं नानांच ठाम मत होतं.
      संध्याकाळी नाना क्लबवर गेले की ननींना हूश्श व्हायचं कारण ते साडेपाचला  गेले की आठ वाजता परत यायचे.मग साडेआठ वाजता जेवण! मधले अडीच तास मात्र ननींचे असायचे!त्या जवळच्या बागेत जायच्या.तिथे त्यांच्या वयाच्या मैत्रीणी वाट बघत असायच्या.गप्पा,भजनं, विणकामाचे टाके असं बरंच काही तिथे घडायचं आणि ननी ताज्यातव्यान्या होऊन घरी परतायच्या.सुदैवानी त्यांची सुनही समजूतदार होती.संध्याकाळी कामावरून आल्यावर शक्यतो तीच सर्व बघायची.
       मध्ये एकदा ननींचा मोठा मुलगा अभय त्यांना म्हणाला" ननी आज रात्री तू घड्याळ्याबरोबर नको जेवूस, कारण नानांच जेवण झाल्यावर आम्ही भजी करणार आहोत.तुला तर माहित आहे नानांची भजी खायची वेळ आणि ऋतु फिक्स आहेत.त्यामुळे त्यांचं जेवण झालं आणि ते झोपायला गेले की भजी कार्यक्रम आहे.
    "करा हो तुम्हाला हवं ते, माझं म्हणशील तर मी लग्नच घड्याळ बरोबर केलंय.तू जेवणाचं काय घेऊन बसलास"ननी हसत हसत म्हणाल्या.
      ननींचा दुसरा मुलगा अजय अमेरिकेत रहात होता.तो बोलावून थकला पण नानांचा आपलं तेच म्हणणं "तिथे जाणं येणं म्हणजे नुस्ता वेळेचा अपव्यय"
      ननींची लग्न झालेली धाकटी लेक 'मीता' मात्र नानांच लाडकं शेंडेफळ! आणि नानांच्या अगदी विरुद्ध, पण उत्साहाचा झरा! ती आली की नानांच वेळापत्रक जरासं तरी हलवून जायची.नाना हसत म्हणायचे"अग,मीता जरा तरी वेळ पाळायला शीक.पण तिचं उत्तर ठरलेलं" मला वेळ द्यायला आवडतो.नाना, वेळ पाळणं सोपं आहे पण आपल्या वेळातला वेळ काढून आपल्या माणसाला देणं खूप गरजेचं आहे"
     त्यावर नाना म्हणायचे"अग,वेळ पाळणं म्हणजेच वेळ देणं आहे.
      हा संवाद महिन्या दोन महिन्यात व्हायचाच.अभय म्हणायचा "ही बोलू तरी शकते आम्ही बोलायचा विचार सुध्दा करु शकत नाही"
     खरं म्हणजे नाना अत्यंत हुशार सायंटिस्ट त्यामुळे instituteच्या चेंबूरच्या सोसायटीत ते नोकरी करेपर्यंत राह्यले.तेव्हा ननींनी पण जवळच्याच शाळेत प्रायमरीत शिक्षक म्हणून नोकरी केली.
     नोकरी करत असतानाच्या काळातच घराजवळ म्हणजेच वाशीला स्वत:च्या कष्टांनी, कर्तृत्त्वानी नानांनी बंगला बांधला होता.त्या बंगल्याचा त्यांना प्रचंड अभिमान होता.नव्या मुंबई जवळ असलेल्या त्या बंगल्याला आता भरपूर किंमत मिळत होती.त्यामुळे" मी योग्य वेळी जबाबदारीने गुंतवणूक केल्यामुळेच हा फायदा दिसतोय हे पण त्यांचं नेहमीच ‌सांगणं असायचं.
      एकदा सहज बोलता बोलता बोलता नाना मीताला म्हणाले" मी त्या काळात हिम्मत करून जबाबदारीनी जो बंगला बांधला त्याची किंमत सध्या करोडो झालेय.
        मीतानी लगेच उत्तर दिलं"नाना, तुम्ही हिमतीनं बंगला बांधलाय पण जबाबदारी मात्र ननींनी घेतली होती.  प्राथमिक शाळेत ननी शिकवायची म्हणून चेष्टा करणारे तुम्ही विसरलात की त्यादिवसात तुम्ही तुमचा पगार, सेव्हींग बंगला बांधण्यासाठी ओतत होतात आणि तेव्हा ननी तिच्या तुटपुंज्या पगारावर घर चालवत होती.आणि ती आम्हा तिघांना समजवायची."नाना आपल्यासाठी बंगला बांधताहेत  की नाही! त्यामुळे आपण थोडे दिवस काटकसरीने राहूया.
        का कुणास ठाऊक नाना थोडे विचारात पडलेले ननींना वाटले.त्यांना नाना आता चिडतील अशी थोडीशी भीती देखील वाटली.पण तो विषय तिथेच थांबला.
     त्यानंतर महिनाभरानंतर रात्री जेवताना नानांना अचानक अस्वस्थ वाटू लागल.त्यांना आलेला घाम आणि उलटी होतेय असं वाटणं! अभयनी क्षणाचाही विचार न करता त्यांना गाडीत घालून हाॅस्पिटलमध्ये नेलं.नानांना massive heart attack आला होता.
     दोन दिवसांनी डॉक्टरांनी धोका टळलाय असं सांगितलं.तोपर्यंत अजय पण अमेरिकेहून यायला निघाला होता.
     हाॅस्पिटलचे पंधरा वीस दिवस तपासण्या, उपचार ह्यातच गेले.ननी सतत तिथे नानांबरोबर होत्या.उगीच वेळा चुकायला नको.पण नाना मात्र खूप बदललेले जाणवत होते.
       महिन्याभरानी नाना घरी आल्यावर अजय परत जायला निघाला.तर ते त्याला म्हणाले" तीन महिन्यानंतर अमेरिकेला यायला सीझन चांगला असतो का रे? मी आणि ननी यायचं म्हणतोय.
     अजय एक मिनिट आश्र्चर्यचकीत होऊन बघतच राह्यला आणि आनंदाने म्हणाला"नाना, मस्त सीझन असतो. अहो तुमची सुन येईल तुम्हाला न्यायला! मी बिझनेस क्लासची तिकीटं पाठवतो.
      ननी विश्र्वास न बसून हळूच म्हणाल्या" अहो, पोराला उगीच आशा नका लावू.अठरा तासाचा प्रवास आहे.येण्या-जाण्यात फार वेळ जाईल.आणि तुमचं इथलं वेळापत्रक बदलेल.ननींच्या शब्दात प्रामाणिकपणा होता.
   "नलिनी,वेळापेक्षा माणसं महत्वाची आहेत,हे मी ह्या आजारपणात अगदी चांगलं समजलोय. हाॅस्पिटलमधला प्रत्येकजण सहजगत्या वेळ पाळत होता त्यात कोणताही अभिनिवेश नव्हता. 
      माझ्या ह्या वेळ पाळण्याच्या नादात घरात, बाहेर मी एकटा पडत गेलो आणि आयुष्यातल्या कितीतरी आनंदाला मुकलोय. आता माझ्यासाठी घड्याळ असेल.घड्याळासाठी मी नाही हे मात्र नक्की!नाना हसत हसत मीता कडे बघून म्हणाले.
      नाना बरेच वर्षांनी नलिनी म्हणाले म्हणून ननी खूष झाल्या होत्या. 
     कितीतरी वर्षांनी त्या घरात मोकळ्या हसण्याचा मोठा आवाज आला.तो आवाज ऐकून घड्याळाचे काटे पण जरासे थरथरले. जणू त्या घरातल्या  हसण्यात घड्याळही सामील झाले होते.
                              ललिता छेडा.