Thursday, March 21, 2019

लढा एकटीचा


रोजच्या सवयीनुसार सकाळी उठल्यावर स्वैपाकघराच्या खिडकीतून समोरच्या बिल्डींगमधल्या दक्षाच्या दुकानाकडे लक्ष गेलं.दुकानाच्यामागेच दोन खोल्यात रहाणार्‍या दक्षाच्या दुकानाचा लाईट बरोबर साडेपाच वाजता लागायचा. आज मात्र सहा वाजले तरी उजेड दिसत नव्हता.थोडी काळजी वाटली.कारण गेल्या वीस वर्षांपासून एकही दिवस असा गेला नव्हता की दक्षानी दुकान उघडलं नाही.सकाळच्या शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी स्टेशनरी,डब्यासाठी खाऊ अशा गोष्टींच्या त्या दुकानात दहानंतर वडापाव आणि चहा मिळायचा.
     असा पहाटे साडेपाचला सुरू झालेला दक्षाचा दिवस रात्री अकरा वाजेपर्यंत अव्याहत कामात जायचा.
      दक्षा, जिला पंचवीस वर्षांपूर्वी घाटकोपरला आमच्या बिल्डिंगच्या समोर असलेल्या चाळीतल्या कोपऱ्यात एका खोपटात स्टेशनरीच दुकान चालवणारा रमेश लग्न करून घेऊन आला होता.
     गुजराथी असलेला रमेश आपल्या विधवा आई आणि धाकट्या भावासह त्या खोपट्यातच मध्ये पडदा लावून मागच्या बाजूला रहात असे. लग्न करून आलेल्या काळ्या सावळ्या दक्षानी मात्र सर्वांशी खूपच छान संबंध जोडले. माझ्याशी तर तिचं खूपच चांगलं जमलं. आमच्या घरी येऊन काही बनवायचं असेल किंवा पाहूणे येणार असतील तर दक्षा आवर्जून येणार आणि मदत करणार. आम्ही आजूबाजूचे सगळेच तिनं मदत केली की तिला पैसे,वस्तु देत असू. 
    तिचं नशीब ही चांगलं होतं, तिचं लग्न झाल आणि वर्षभरात चाळीच्या मालकानं चाळ पाडून तिथे बिल्डिंग बांधायला सुरुवात केली.
      नवीन चाळीत रमेशला जागा घेणं शक्यच नव्हतं पण मालकांनी दक्षाकडे बघून त्या खोपटाच्या जागी पक्कं बांधकाम करून दिलं. दुकानाच्या मागे एक मोठी खोली होईल येवढी जागा बांधून रमेशला ती भाड्यानी दिली.मालक गुजराती असल्यामुळे त्यानं स्वत:च्या नावाने जागा बांधून स्वार्थ-परमार्थ दोन्ही साधला होता.त्याशिवाय रमेशला सोसायटीसाठी टाकीत पाणी सोडणं-भरण्याच कामही मिळवून दिलं.
    त्याच काळात नेमके दक्षाला दिवस गेले त्यामुळे रमेशनी तिला आणि त्याच्या आईला दक्षाच्या माहेरी पाठवून दिलं.तो आणि त्याच्या धाकट्या भावानं बांधकाम होईपर्यंत कुठे तरी राहून दिवस काढले.धाकटा भाऊ दूध,पेपर टाकून काही तरी कमवत होता.पण रमेशनी ती दोन वर्षे काहीही काम न जुगार,लाॅटरी असले नस्ते उद्योग करून काढली.   दूकानाच बांधकाम झाल्यावर दक्षा वर्षाच्या  लेकीला घेऊन आली. 
     एकतर मुलगी झाली म्हणून तिला बघायला सुध्दा न आलेल्या जावयाची लक्षणं दक्षाला सोडायला आलेल्या तिच्या वडिलांनी बरोबर ओळखली .ते तर तिला आमच्या बरोबर 'परत चल' असंच म्हणत होते. बिचारे माझ्या घरी येऊन तिला समजवा असं पण सांगून गेले.पण दक्षानी त्यांना ठाम नकार दिला.
     बडोद्याजवळच्या खेड्यात राहणाऱ्या दक्षाच्या पाठच्या अजून एका बहिण,भावाची जबाबदारी पण वडिलांवर होती.तिथे परत जाण्यापेक्षा आपण इथंच राहून लढायचं असा तिनं निर्णय घेतला.
      दक्षाला सोडून परत जाणार्‍या तिच्या वडिलांकडे रमेशनी निर्लज्जपणे सामान भरायला पैसे मागितले.वडिलांनी पण पैशाऐवेजी मालच भरून दिला.
हे सगळं रमेशच्या आईला खरं म्हणजे अजिबात आवडलं नव्हतं.पण रमेशच्या पुढे मात्र तिचं काही चालतच नव्हतं.
       दक्षानी हळूहळू दुकान चालवायची जबाबदारी स्वत:च घेतली.सकाळच्या शाळेत जाणाऱ्या मुलांना डब्यासाठी ती काही तरी बनवून देऊ लागली.तिनं मुलांना शाळेला लागणारी स्टेशनरी ठेवायला सुरुवात केली.त्या एरियात ते दुकान 'दक्षाच दुकान' म्हणून प्रसिद्ध होऊ लागलं.आणि रमेशला त्याचाच राग येऊ लागला.सारखा तिचा दुकानात जाऊन अपमान करायचा, भांडण उकरून काढायचं असे उपद्व्याप त्यानं सुरू केले.अशात तिला पुन्हा दिवस गेले.तिला खरं म्हणजे हे मुल नको होतं पण विधी लिखीत काही ‌वेगळंच होतं.दक्षाला मुलगा झाला पण ‌खूप अशक्त, दोन्ही पायात ताकद नसलेला असा होता.त्याला बघून ‌रमेशनी हाॅस्पिटलमध्येच आरडाओरडा सुरू केला. तेव्हाच नेमकी मी  दक्षाला बघायला गेले होते.ते सगळं ऐकून पहिल्यांदाच मी त्याला चांगलाच दम भरला.  गरोदरपणात ‌तिची किती ‌हेंडसांळ झाली ते ऐकवलं.तेवढ्यापुरता तो गप्प राहिला पण तिला घरी आणल्यावर रोज आरडाओरडा चालूच असायचा. 
     आणि एक दिवस अचानक तो नाहीसाच झाला.
     स्वत:ची आई,भाऊ, दोन मुलं दक्षावर टाकून निघून गेला.कोणत्यातरी बाई बरोबर पैशाच्या मोहात कलकत्त्याला गेला असं ऐकू येत होतं.
    अवघ्या सहा महिन्याचा अधू मुलगा, चार वर्षाची मुलगी, दक्षा जरासुद्धा डगमगली नाही.तिचे वडिल तिला भेटायला आले त्यांना पण तिनं परत पाठवलं.
    ‌‌कोणीतरी म्हटलं पोलीसांना कम्प्लेंट द्या. पण तिच्या सासुनी सांगितलं "काही शोधू नका त्याला.बरी पीडा गेली."
    काळ पुढे धावत होता. आमच्या पूर्ण भागात दक्षा  सर्वांसाठी अन्नपूर्णा झाली होती. कोणाकडे पाहूणे आले दक्षा भाजी करून पाठव ना, कोणी माहेरी गेली की दक्षा टिफीन पाठवशील? कोणी हाॅस्पिटलमध्ये आहे की दक्षा जेवण द्यायला तयार! 
    दक्षानी कष्ट करून पुढच्या दहा वर्षांत भाड्याचं दुकान स्वत:च्या नावावर विकत घेतलं. 
     वीस वर्ष उलटून गेली.दक्षाचा दिर शिकून चांगल्या नोकरीला लागला आहे.मुलगी पॅथाॅलाॅजिस्ट झाली.ती एका लॅबमध्ये मध्ये नोकरी करतेय.तिला पण स्वत:ची लॅब काढायचीय.
    मुलासाठी दक्षाने केलेल्या प्रयत्नांना यश येऊन तो घरातल्या घरात चालायला लागलाय.दीराच लग्न झालं आणि सासु गेली. दक्षाचा मोठा आधारच गेला होता.त्यानंतर दिरानी पण स्वत:च घर कर्ज काढून घेतलं.आणि वहिनीला आपण ह्या घरी एकत्र राहू म्हणून खूप आग्रह केला.पण दक्षानी त्या दुकानात मुलासह रहाणार असं ठाम ठरवलं होतं. तिला मुलाला ते दुकान चालवण्या इतका सक्षम करायचा होता.त्याच्या हालचालींसाठी योग्य अशा सोयी करून घ्यायच्या होत्या. दक्षाची मुलगी मात्र रात्री झोपायला काकांकडे जाऊ लागली.दक्षाच्या ह्या एकटीच्या लढ्याचे आम्ही‌ सर्व साक्षीदार होतो.
     म्हणूनच आज दुकान न उघडल्याने मला काळजी वाटली.काम आवरलं की तिच्याकडे जाऊन येऊ असं ठरवून मी कामाला लागले.पण तोपर्यंत शेजारच्या वैद्य वहिनीनी बातमी आणली "दक्षाचा नवरा परत आलाय.खूप आजारी आहे.काल रात्री उशिरा कोणीतरी त्याला तिच्याकडे सोडलं. त्यानंतर दक्षानी डॉ.ना बोलावलं आणि त्याच्यावर उपचार सुरू केलेत. ह्या सगळ्या गडबडीत ती दुकान उघडू शकली नव्हती. वहिनींनी सगळ थोडंसं रागातच सांगितलं.आणि त्यांचा राग योग्यही होता.मनात आलं हिने का घेतलं रमेशला घरात?
       मी दक्षाकडे गेले तेव्हा तिची मुलगी,दिर,जाऊ, सगळेच आलेले होते.तिची लेक तर जाम चिडलेली दिसत होती.मला बघून ती सुरूच झाली" बघा, काकी ही आता ह्या माणसाला घरात ठेवून त्याच्या उपचारासाठी हैराण होणार आहे.कायतरी सांगा हिला!वीस वरस झाले आम्ही जिन्दा आहे की नाही हे ह्यांनी विचारलं सुध्दा नाही.आणि आज येवढे बीमार झाले म्हणजे आले इकडे!
          "अरे,ते तुझे पप्पा आहे."दक्षानी लेकीला समजवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला.
     नहीं,काकी तूला तर माहित आहे, मी माझ्या नावासमोर दक्षा मेहता लावते"दक्षाच्या लेकीनं न ऐकण्याचा जणू ठरवलच होतं.तिनी मलाही त्यात सहभागी करून घेतलं.
      माझं लक्ष रमेशकडे गेलं.त्याचे डोळे मिटलेले होते पण डोळ्यांच्या कडेनी अश्रू गळत होते.त्याची अवस्था बघवत नव्हती.त्याचा भाऊ माझा चेहरा बघून लगेच म्हणाला"काकी,नाटकी आहे तो लक्ष नका देऊ.
        ह्या सर्वांच खरं होतं.खूप कष्ट, गरीबी, अपमान त्यांनी सहन केले होते.दक्षाचा मुलगा काहीच न बोलता बसून होता.आवडलं नाही तरी तो आईच्या बाजूनी होता.ते जाणवत होतं.
        दुकान बंद का बघायला बरीच माणसं येऊन जात होती आणि रमेशला बघून कपाळाला हात लावून जात होती.
      "काकी,ह्या सर्वांना सांगा ना ते बरे झाले की मग आपण काय करायचं ते ठरवू या चालेल?"दक्षाने निर्वाणीच्या स्वरात माझ्याकडे बघत विचारलं.
     तिच्यापूढे कोपरापासून हात जोडून"तोपर्यंत मी इथं येणार नाही.असं म्हणून दक्षाची लेक निघाली.आणि भावाकडे बघून म्हणाली"दुकानमें आके मैं तुमको मिलके जाऊगी, कुछ भी प्राॅब्लेम है तो फोन करना!
     ती सर्वजण गेल्यावर दक्षा माझ्या शेजारी येऊन बसली."मेरी कुछ गलती हो रही है क्या? असं डोळ्यात पाणी आणून म्हणाली."नाही ग, तू खूप चांगली आहेस हीच तुझी गलती आहे.दरवेळी असं तुला एकटीनं लढताना बघून वाटतं की कधी संपणार हिच्या कष्टाचे दिवस? येवढंच बोलून मी पण घरी जायला निघाले.
       काकी,लढाईची नाही भीती वाटत पण हरायची मात्र हल्ली खूप भीती वाटते" दक्षा मला जाताना बघून केविलवाणी झाली होती. 
        मनांत आलं दक्षासारख्या एकट्या लढणार्‍यांच्यां पाठीवर हात ठेवून आपण 'फक्त लढ म्हणावं" कदाचित तोच एखादा धीराचा हात त्यांना  लढायला बळ देणारा असू शकतो.
                       ललिता छेडा.

5 comments:

  1. स्वतःच्या पायावर उभी राहून संसाराची जबाबदारी स्वीकारली. मुलांच्या संगोपनासाठी थडपड केली. पण शेवटी नवर्याला सांभाळण्याची जबाबदारी घेते हे सगळे अवघड आहे हे लक्षात येते. कथा चांगली वाटली.

    ReplyDelete
  2. कितीही संकटं येउदे त्याला ठामपणे लढा देण्याची शक्ती स्त्री कडे
    उपजत असतें. कथा छान वाटली.

    ReplyDelete
  3. कथा नेहमी प्रमाणे च छान लढाईची भीती नाही वाटत हारायची भीती वाटते हे वाक्य मनाला स्पर्श करून गेले

    ReplyDelete
  4. ' लढा एकटीचा ' हा ब्लाॅग वाचताना काही दिवसांपूर्वीच्या ' नाही म्हणायला शिकूया ' या ब्लाॅगची आठवण झाली. आयुष्यभर केवळ जगण्यासाठी आणि सासू , दीर , मुलांच्या सुखासाठी जिने अतोनात कष्ट केले त्या दक्षाला शेवटी ' नाही ' म्हणणे जमले नाही. भावनेच्या आहारी जाऊन तिने रमेशला आधार देण्याचा निर्णय घेतला. स्रीचे भावनिक दुबळेपण अधोरेखित करणार्‍या ही कथा वाचताना मनात प्रश्न उभा राहिला - सर्वार्थाने सक्षम असलेली दक्षा परिस्थितीला शरण का बरं गेली ?

    ReplyDelete