Thursday, March 14, 2019

अनुभव


                             मैत्रिणीच्या मुलीच लग्न सोलापूरला आहे असं कळल्यावर आम्ही तिघी मैत्रिणींनी जायचं ठरवलं.त्यानिमीत्ताने सोलापूर बघणं होईल म्हणून आम्ही दोन दिवस आधी गेलो.खूप हिंडलो फिरलो आणि लग्न पण एन्जाॅय केलं.
      बायकी आवडीप्रमाणे खरेदीपण झाली.येताना एक बॅग होती पण आता प्रत्येकीची एक बॅग वाढली होती.लग्नात झालेल्या ओळखींमुळे मुंबईला जाणारे आम्ही ८/१०जण आहोत हे कळलं होतं.सर्वांची रात्रीचीच गाडी होती.आणि गंमत म्हणजे तिकीटं बघितल्यावर कळलं होतं की आमच्या सर्वांचा एकच डबा आहे.
      रिझर्व्हेशन होतं तरीही थोडेसे लवकरच स्टेशनवर येऊन बसलो.इतक्यात एक दहावी बारावीत असावी अश्या वयाची मुलगी, तिच्या बरोबर दोन तरुण मुलं,एक जाडी बाई असे चारजण येऊन डबा नंबर सांगून तो इथेच येईल का असं विचारू लागले?. माझ्या स्वभावाप्रमाणे उठून त्यांची तिकीट बघितली फक्त त्या मुलीच तिकीट होत आणि ते आमच्याच डब्यात होतं.ती‌ मुलगी कोणाचीतरी वाट बघतेय असं जाणवत होतं.कारण ती सारखी मेनगेटकडे बघत होती.मोबाईल लावत होती.पण बहुतेक लागत नव्हता.ती हळूच माझ्याजवळ येऊन बसली. मी पुस्तक वाचत होते आणि ती मला इतकी खेटून बसली की असं वाटलं तिला काही तरी सांगायचंय. मला माझ्या नातीची आठवण झाली.ती पण काही हवं असेल की अशीच जवळ येऊन बसते. 
     मी तिच्याकडे बघितलं तर तिनी तेव्हाच तिच्या शेजारी येऊन बसलेल्या तिच्या बरोबर असलेल्या बाईंकडे बघितलं.त्या बाई तिच्या बरोबर होत्या पण तिच्या ओळखीच्या नसाव्यात असं मला उगीचच वाटलं.त्या बाईंशी ती अजिबात बोलत नव्हती.
     इतक्यात गाडी अर्धातास उशिरा सुटेल अशी अनौसमेंट झाली.म्हणजे आता जवळपास सव्वा अकरा वाजणार होते.इतक्यात बहुतेक ती वाट बघत असलेला मुलगा आला.कारण ती अक्षरशः वेड्यासारखी हातातली बॅग घेऊन धावत सुटली.पण त्या मुलानं तिला काही तरी समजावलं आणि तो जाऊ लागला.ती पण त्याच्याबरोबर जायला लागली.तो तिनं 'येऊ नकोस' असं समजावत होता आणि ती मात्र त्याचा हात धरून मी नाही जाणार असं बहुतेक सांगत होती.आता सगळ्यांचच लक्ष त्या दोघांकडे जात होतं.येवढ्यात गाडीचे दरवाजे उघडले होते.आम्ही सर्वजण सामानासह चढायला सुरुवात केली. सामान चढवताना वाटतं की कशाला येवढं सामान जमवतो.जागा शोधणं,सामान लावणं,जागा ठरवणं ह्यात थोडा वेळ गेला.आणि बघितलं तर ती आमच्या सीटशेजारच्या  समोर समोरच्या सीटवर बसलेली होती.ती खिडकीतून त्या मुलाला आत ये म्हणत होती...मध्येच मला "जरा पिशवीकडे लक्ष ठेवा"सांगून दरवाजाकडे गेली.त्याला आंत यायला सांगत होती.शेवटी गाडी सुटली.आणि तो मुलगा काही चढला नाही.माझं तिच्याकडेच लक्ष होतं.ती सीटवर येऊन बसली.तिच्याबरोबरची बाईच तिला घेऊन सीटवर बसवून गेली.त्या बाईला तत्काळमध्ये बहुतेक दाराजवळचं तिकीट त्या दोन्ही मुलांनी मिळवून दिलं होतं. परीक्षांचे दिवस असल्यामुळे गाडीला खास गर्दी नव्हती. 
      आमच्या बरोबरच्या मंडळींच पत्ते, गप्पा सुरू झालं होतं. मी मात्र त्या मुलीमुळे अस्वस्थ होते. डब्यात आमच्यासारखाच अजून एक तरूण मुलामुलींचा गृप होता.त्यामुळे आमचा डबा चांगलाच गजबजलेला होता.ती बाई मध्येच येऊन तिला थोडंसं दम मारावा तस काही तरी बोलून गेली.त्या मुलीचे डोळे भरून आले होते.
      ती मुलंपण जवळच्याच डब्यात असावीत त्यांची पण एक फेरी झाली होती. त्यांनी तिला आपण कल्याणला उतरायचं असं सांगितलं आणि ती मुलगी प्रचंड अस्वस्थ झालेली जाणवली.मला काही सुचत नव्हतं.पण ती काही बोलत नाही तोपर्यंत मला किंवा कोणालाच काही करता येणार नव्हतं.माझ्यासारखीच बेचैन तिच्या समोरच्या सीटवरची मुलगी झाली होती.कारण तिथं येऊन बोलून जाणारी ती मुलं,ती बाई ह्यांना तिनं ऐकलं होतं.
      इतक्यात कुर्डवाडी येतेय अशी चर्चा सुरू झाली.'चला ब्रेक घेऊया'अशी बडबड करत पत्तेवाली मंडळी सगळ आवारायला लागली.कोणीतरी बरोबर आणलेलं खाऊया.अशी जोरदार मागणी करू लागलं.लग्नघरातून आम्हाला पूरीभाजीच्या प्रत्येकाच्या नावानं छान प्लेट पॅक करून दिल्या होत्या.पाचसहा जास्तच होत्या.मला त्या मुलीशी बोलायचा चान्स मिळाला होता. मी तिला प्लेट पूढे करून विचारलं"खाणार?"ती जशी वाटच बघत होती.तिनी पटकन प्लेट घेतली.खाण्यासाठी तिला पेपर डिश दिली.आणि तिचे डोळे चमकले.तेवढ्यात ती बाई पण तिथं आली. मी लगेच तिच्या पुढेपण प्लेट केली.तिनं अगदी अधाशासारखी घेतली.मला कळलं होतं की दोघीही भुकेल्या आहेत.
   ती बाई आपल्या जागेवर जाऊन खाऊ लागली. मी तिला अजून एक प्लेट दिली.
    मी परत जागेवर बसायला गेले आणि वरती बसून  खात असलेल्या त्या मुलीनं पटकन माझ्या हातात काही तरी लिहीलेली प्लेट दिली.
    प्लेटवर लिहीलं होतं की" मी फसलेय.मला वाचवा.मला पुण्याला उतरायला मदत करा.प्लीज मी आयुष्यभर तुमचे उपकार विसरणार नाही.....शीतल आणि खाली तिचा मोबाईल नंबर लिहीला होता.
    इतकावेळ तिला मदत करावी असा विचार करणारी मी, पण आता माझे हातपाय कापायला लागले होते.माझ्याकडे लक्ष असलेली ‌खालच्या सीटवरची मुलगी माझ्या जवळ आली आणि तिनं माझ्या हातातली ती लिहीलेली प्लेट घेऊन वाचली.आणि म्हणाली "मला वाटलच होतं.काळजी नका करू मी बघते आता काय करायचं ते!"
    त्या खालच्या सीटवरच्या मुलीनं परिस्थिती हातात घेतली होती."काकू, मी मेघना तुम्हाला फोन लावतेय रिंगटोनचा आवाज बंद करा उगीच लोकांची झोपमोड होईल"त्याबरोबर वरती शीतलनी डोक्यावरून पांघरूण घेतलं.पोरगी हूशार आहे.मला बरं वाटलं.
    हळूहळू आमच्या सीट जवळ मेघनाच्या गृपच्या मुलांच्या फेऱ्या सुरू झाल्या होत्या.तिनं सर्वांना मेसेज केला असावा.थोड्यावेळानी मला पण तिचा मेसेज आला.मेघना एका एन्.जी.ओ.साठी काम करत होती.त्यामुळे  पुण्यात उतरल्यावर त्या मुलीशी बोलून ती पोलिसांची मदत घेणार होती. मेघनाची मैत्रीण पण स्टेशनवर येणार होती.मेघना पुण्यालाच उतरणार होती.अजून तरी सगळं व्यवस्थित पार पडत होतं.आता चांगलीच रात्र झाली होती.बरीचशी मंडळी झोपली होती ज्यांना हा गोंधळ कळला होता ते झोपायचा प्रयत्न करत होते.एक गोष्ट चांगली झाली होती की ती बाई पदरानी तोंड झाकून गाढ झोपली होती. बहुतेक पोट भरल्यामुळे झोप आली असावी.
    भिगवण, दौंड करताकरता गाडी शेड्युल वेळेप्रमाणे पुण्यात रात्री तीन वाजता पोचणार होती.पण आता साडेतीन वाजले होते आणि गाडी पुण्याजवळ आली होती.पुणे स्टेशन आलं आणि उतरणारे उतरू लागले.अपेक्षेप्रमाणे ती मुलं आली.पण शीतल आणि ती बाई गाढ झोपल्याच त्यांनी बघितलं.आणि ते परत आपल्या डब्याकडे गेले.जाताना त्या बाईला उठवून लक्ष राहू दे असं सांगितलं.तिनी पण झोपेत हो हो म्हटलं.
     ते गेल्याची खात्री झाल्यावर आवाज न करता शीतल आणि मेघना दरवाजापाशी जाऊन उभ्या राहिल्या. आणि गाडी हलल्यावर पटकन स्टेशनवर उतरल्या. उतरल्या बरोबर शीतलला सर्वांनी कोंडाळे करून सेफ केलं.आम्ही सर्व खिडकीतून बघत होतो.गाडीन स्टेशन सोडलं आणि आम्ही सगळ्यांनी मोठा आणि मोकळा श्वास घेतला.
     पाचच मिनिटांनी ती बाई उठून शीतलच्या सीटपाशी आली आणि म्हणाली" गेली ना सुरक्षित?"मी आयुष्यात कधी घाबरले नसेन इतकी घाबरले होते.
    "ताई घाबरू नका. मी जागीच होते.तिला जेव्हा कल्याणला उतरवायला सांगितलं आणि मला तुम्ही नका उतरू  दादरला जा असं त्या मुलांनी सांगितलं.आणि मला कळलं की इथे काही तरी काळेबेरं आहे.आणि त्या मुलीनं तुम्हाला लिहीलेलं दिलं.आणि मी समजले की तिनं तुमच्याकडे मदत मागितलेय.आणि तुम्ही ती करताय.
        ताई,माझा मुलगा खूप आजारी आहे.त्याच्या औषधोपचारासाठी मला हा पैशाचा मोह पडला. मला ह्या लोकांनी ‌सांगितलं होतं शीतल त्या मुलाशी पळून जाऊन लग्न करणार आहे.तू फक्त शीतलला दादरला सोड आम्ही तुला पन्नास हजार रुपये देऊ.मोह पडला हो ताई! पण सगळं चुकीचं सुरू झाल्यावर मला कळायला लागलं की मी हे पाप करतेय.सुरवातीला शीतल ज्या मुलांबरोबर पळणार होती तोच ट्रेन मध्ये चढला नाही तेव्हाच माझ्या मनात पाल चुकचुकली.त्या बाईनी आम्हाला हातानं 'थांबा'अशी खूण केली.आणि फोन लावला.जे घडत होतं ते अतर्क्य होत."अरे पोरांनो,त्या पोरीनं पूणे स्टेशनवर चालत्या गाडीतून उडी मारली. मी मागे धावले पण तोपर्यंत तिनी उडी मारली होती."बाईनी मुलांना फोन करून टाकला होता.ती मुलं धावत आमच्या डब्यात आली.आणि परिस्थिती बघून परत जायला लागली.मला कसं सुचलं काय माहित मी पटकन म्हटलं "अहो,वीजेसारखी वेगात चालत्या गाडीतून उडी मारली हो त्या पोरीनं"कल्याण पर्यंत आता काहीच करता येणार नाही.हे त्यांना कळून चुकलं होतं.
        कल्याणला मी उतरून सरळ चालायला लागले.पोलीसांनी त्या मुलांना पकडलंय ते मला दिसलं होतं पण मी दुर्लक्ष करून उलट्या दिशेने चालायला लागले.
      डोंबिवलीला घरी आल्यावर जाणवलं की आपण कोणत्या अनुभवातून गेलोय."त्या मुलांच्याकडे शस्त्र असती तर,त्या मुलीनं धावत्या रेल्वेतून जीव द्यायचा प्रयत्न केला असता तर, त्या बाईच्या मनातला परमेश्वर जागा झाला नसता तर, मेघनाच त्या गाडीत नसती तर!मेघनानी जितक्या सहजतेने सगळं निभावून नेलं मी करू शकले असते?आता हे सगळं मी कोणालाही सांगेन तेव्हा ती एक सस्पेन्स थ्रिलर कथा होईल.पण माझ्यासाठी एक अविस्मरणीय अनुभव होता.
      दोन दिवसांनी मेघनाचा फोन आला" काकू बारावी पास झालेल्या शीतलच सुजयवर प्रेम होतं.तो काहीच करत नव्हता त्यामुळे घरातून त्यांच्या लग्नाला विरोध होता.म्हणून सुजयवर विश्वास ठेवून ती घरातून पळून मुंबईला यायला निघाली होती.सुजय ट्रेनमध्ये चढला नाही म्हटल्यावर तिला संशय आला.कारण ती त्या मुलांना ओळखत नव्हती.त्या मुलांनी तिला मोबाईलवर मेसेज करून धमकवायला सुरवात केली.तिनी मला हे सर्व मी तिला काॅल केल्यावर माझ्या नंबरवर मेसेज करून कळवलं.खूप हूशार आहे ती."मेघना बोलत होती आणि माझ्याच ह्रदयाचे ठोके मला ऐकू येत होते."काकू शीतल सुखरूप घरी पोचलीय,मीच तिला सोडायला गेले होते.""तिला तो सुजय का कोण तो त्रास नाही ना देणार?"माझा उगीचच मेघनाला प्रश्र्न होता."नाही हो काकू, तिच्या घरच्यांना मी सगळं समजावून सांगितलय"मेघना हसत म्हणाली.
     ह्या अनुभवातून एक मात्र शिकायला मिळालं की सामाजिक काम करणाऱ्या त्या येवढ्याशा मेघनाकडे योग्य दिशेने योग्य निर्णय घ्यायची क्षमता माझ्यापेक्षा निश्चितच जास्त होती.जी आजच्या काळातल्या पिढीकडे जरा खासच आहे.
            ललिता छेडा

7 comments:

  1. मेघनाची निर्णय क्षमता मस्तच

    ReplyDelete
  2. मेघना सारख्या स्त्रीया समाजात असाव्यात. त्यांच्या निर्णय शक्ति मुळे मैत्रीणीला खूप मदत झाली. आशय छान आहे.

    ReplyDelete
  3. गोष्ट अत्यंत उत्कंठा वाढवणारी. आणि शेवटी मेघनाने केलेल्या मदतीने मुलीची झालेली सुटका पाहून समाधान.

    ReplyDelete
  4. 'अनुभव' मधल्या मेघनाने योग्य दिशेने केलेल्या हालचालींमुळे शितलची मोठ्या संकटातून सहीसलामत सुटका झाली. शितलसोबत असलेल्या बाईंचे पण कौतुक करायला हवे. झोपेचे नाटक करून त्यांनी सहकार्यच दिले. त्यामुळे मेघनाचा बेत विनाव्यत्यय पार पडला. Ngo मध्ये काम करणार्‍या तरूण मुलंमुलींनी समाजकार्याचा अभ्यासक्रम ( msw सारखा ) पूर्ण केलेला असतो. रीतसर प्रशिक्षण घेतलेले असते. त्यांच्याकडे निर्णयक्षमता , कोणत्या वेळी काय करायला हवे याची समज आणि शिस्त असते. त्यामुळे गोंधळून न जाता मेघनाने पावले उचलली आणि शितलला सुखरूप तिच्या घरी पोचवले. मेघनाचे कौतुक आणि हा विषय कथेसाठी निवडणार्‍या ललिता छेडा यांचे अभानंदन !

    ReplyDelete
  5. वेगळ्या विषयावर गोष्ट लिहिली.ती तुम्हा सर्वांना आवडली हे वाचून नक्कीच आनंद झाला.पुन्हा एकदा आभार.

    ReplyDelete
  6. मेघना ची निर्णय क्षमता आणि तडीस नेण्याचं सामर्थ्य कौतुकास्पद आहे अशा मेघना समाजात आहेत म्हणून काही शीतल वाचल्या असतील चित्र डोळयांसमोर उभं राहिलं,खूपच छान

    ReplyDelete